भारत जगातील असा एकमेव देश आहे जिथे सरसकट 130 कोटी जनतेला एकाच वेळेस Lockdown मध्ये जावं लागलं होतं. जगभरात कोरोना वायरसने उच्छाद मांडला होता तेंव्हा भारत त्यापासून अलिप्त होता. पण या राक्षसाची भारतावरही वक्रदृष्टी पडली आणि बघता बघता देश बंद करावा लागला. दररोज नवनवीन बातम्या येऊ धडकत होत्या. शिवाय माणसाला अशा परिस्थितीचं गांभीर्य लवकर समजत नाही अन कधी कधी नाविण्याचं कुतूहलही असतं. ज्यावेळी 21 दिवसांचा Lockdown जाहीर झाला तेंव्हा सुरुवातीला भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पण केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. या अवस्थेत अनेकांचे हाल झाले हेही सत्य आहे. गरीब, श्रीमंत असे सर्वच भरडुन निघाले. पण आपल्या घरात सुरक्षित असलेल्या माणसाने Lockdown एन्जॉय केला असंही एक निरीक्षण आहे.
कामाच्या व्यापात कुटुंबाला, स्वतःला वेळ देणं बर्याचदा अशक्य होतं. पण या Lockdown दरम्यान घरी राहण्याची अनिवार्यता असल्याने कुटुंबासोबत कायम स्मरणात राहतील असे क्षण घालवले असल्याचं एक समाधानही असेल. अनेकांनी आपल्या धूळ साचलेले स्वतःचे छंदही नव्याने जोपासले. कपाटात ठेवलेले वाद्य बाहेर पडले, आयुष्याच्या धकाधकीत हरवलेले गळ्यातील सूर पुन्हा एकदा अजमावून पाहिले, जुने फोटो अल्बम काढून भूतकाळात डोकावता आलं, पाककलेला अजून खुलवता आलं… असं बरंच काही त्या चार भिंतीत केलं गेलं! त्या चार भिंतीत एका स्वतंत्र विश्वाचा मनासारखा कारभार सुरू होता. उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या खोडातून पालवी फुटावी तसं आयुष्य फुलतानाही दिसून आलं.
जगत राहणं आणि जगता जगता आनंदाचे क्षण शोधत राहणं ही मानवी मनाची सवय आहे. झोपडीत राहणारा मनुष्यही हसतोच, आपला आनंद आपल्या पध्दतीने शोधतो तर आलिशान बंगल्यात राहणारा माणूसही आपापल्या परीने आनंदी राहतोच! जनावरं भविष्याच्या चिंतेने ग्रासले जात नाहीत, तो श्राप मानवाला आहे. पण या दरम्यानच्या काळात ज्यांनी भविष्याची चिंता सोडून वर्तमानात आनंद मिळवला त्यांना हे क्षण सदासर्वकाळ स्मरणात राहणार आहेत.
या कोरोना ने आपल्याला बरंच काही दिलं आहे, शिकवलं आहे. याच्या येण्याने जग थांबलंय, जग बदलतंय कदाचित उद्या ते कुरूप बनेलही, पण आज त्याने अनेक नवकथांना जन्म दिला आहे. जगण्याचे जुने मार्ग प्रशस्त केले आहेत.
आज पुस्तकं चाळत असताना त्यात एक दुमडून ठेवलेलं पान सापडलं. तीन चार वर्षांपूर्वी ते तिथे ठेवलं असेल. इतकी वर्षे ते विस्मरणात गेलं होतं. त्या पुस्तकांच्या पानांत त्याचा जीव गुदमरला नाही, त्या शब्दांनी भरलेल्या पुस्तकात त्या कागदावरील शब्दांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवलं. त्या पानाला वहीतील पिंपळपानाप्रमाणे आठवणींचा गंध होता. आपलीच भूतकाळातील प्रतिमा आपल्यासमोर ठेवणारं होतं ते पान!
आज प्रत्येकजण विचार करत आहे की Lockdown उठल्यावर सर्वात आधी हे करेन ते करेन! पण Lockdown असताना जे केलं आहे ते कित्येकदा ठरवूनही करू शकलो नाहीत ते आत्ता अनपेक्षित पणे करता आलं. कोणीतरी म्हंटलं आहे, Life is full of surprises! कधी कधी वाईट पध्दतीने बांधलेल्या चमकीच्या कागदात चांगलं गिफ्ट दडलेलं असतं…
“पान संपत आले की लिहिणं संपवावं, व्यक्त होणं नाही…
आयुष्य संपत आलं की इच्छा आवरत्या घ्याव्या, जगणं नाही!”


© 2020, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!