Author: abhi

नटसम्राट… असा नट होणे नाही!!!

नटसम्राट… असा नट होणे नाही!!!

नटसम्राट चित्रपट बघितला. असा ट्रजेडी चित्रपट होणे नाही. नटसम्राट ह्या नाटकाबद्धल बरच ऐकून होतो, पण नाटक पाहायचा योग कधी जुळून आला नाही. पण ह्या नाटकावर आधारीत चित्रपट येणार अन त्यात नाना पाटेकर प्रमुख भूमिका साकारणार अशी सुवर्णसंधी चुकवण्याचं पाप घडणार नव्हतं. अखेर महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट हा चित्रपट बघितला!!! एक वेगळाच अनुभव होता संपूर्ण!!! अप्रतिम!!!

चित्रपटाची कथा काही नवीन नाही. एका वाक्यात सांगायचं झालं तर ते म्हणजे, एका जोडप्याची म्हातारपणात स्वतःच्या मुलांमुळे होणारी फरफट!!! या विषयावर आजवर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. हिंदीत अमिताभ यांचा बाघबान, मराठीत आई जो महेश मांजरेकर यांनीच दिग्दर्शित केला होता, मान-अपमान, राजेश खन्ना यांचा अवतार वगैरे वगैरे!!! ह्या सगळ्या चित्रपटात बरचसं साम्य आहे. नटसम्राटही त्यातच मोडला असता पण याचा शेवट इतर सर्व चित्रपटांपेक्षा वेगळा अन सरस आहे.

नाना हे गणपत बेलवलकर ह्या एका यशस्वी पण आता निवृत्त झालेल्या नाटक अभिनेत्याची भूमिका साकारतात. रंगमंचावर विविध अन अजरामर भूमिका साकरून ते निवृत्त झालेले असतात. त्यांना रसिकांनी नटसम्राट ही प्रेमाची पदवी दिलेली असते. पण आता ते निवृत्त होऊन राहिलेलं आयुष्य आरामात आपल्या मुला-नातवंडांच्यासोबत घालवू इच्छित असतात. निवृत्त झाल्यावर लागलीच ते स्वतःचं घर पैसे वगैरे संपत्ती मुलांना देऊन टाकतात. आणि पुढे तेच होत जातं जे प्रेक्षकांना अपेक्षित आहे, जे आजवर इतर चित्रपटात आपण पाहिलेलं आहे. पण केवळ ह्या कथेत चित्रपट अडकून बसत नाही. चित्रपट पुढे जातो तो गणपत यांनी साकारलेल्या विविध भूमिकांच्या वाक्यतून. चित्रपटाच्या सुरूवातीला गणपतराव एक वाक्य म्हणतात की, लेखकांच्या लेखणीमुळे ह्या खडकाचा नट झाला. त्याच लेखकांचे रंगमंचावर बोललेले वाक्य न वाक्य गणपतराव यांच्या मेंदूत कायम घर करून असतात अन प्रसंगानुसार ते बाहेर पडतात. गणपतराव यांच्या पत्नी, ज्यांना ते सरकार असं म्हणतात, जी भूमिका साकारली आहे मेध मांजरेकर यांनी, त्या म्हणतात तुम्ही नाटक सोडलं नाही घरी घेऊन आलात. हे वाक्य अगदी तंतोतंत जुळलं आहे. कारण गणपतराव नेहमी एका भूमिकेत वावरत असतात. स्वतःचं स्वपण हे त्यांनी केंव्हाच विविध पात्रांना बहाल केलेलं असतं जे त्यांचं आयुष्य जगत असतं.
मग प्रवास सुरू होतो वार्धक्यत होणार्‍या वारंवार अपमान अन उपरेपणाचा!! चित्रपट असाच पुढे चालत जातो. चित्रपटाच्या प्रत्येक सीन मध्ये गणपतराव यांच्यातील कुठलंतरी पात्र त्यांच्यावर अधिराज गाजवताना दिसतं अन तेच त्यांना तारक अन मारक असतं. शेवटी मग एक रक्ताचा ना नात्याचा असा एक माणूस गणपतराव यांना सांभाळत असतो (नेहमीप्रमाणे) वगैरे. पण शेवट इतर चित्रपटाप्रमाणे प्रेक्षकांच्या मनाला आनंद देणारा नसतो, तर तो मनाला चटका लावणारा, हुरहूर लावणारा, एका क्षणी डोळ्यात पाणी आणणारा आहे.

कथा नवीन नसतानाही, तोच-तोचपणा असतांनाही चित्रपट का बघावा असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर तो प्रश्न चुकीचा ठरेल. हा चित्रपट वेगळा ठरतो तो ह्या चित्रपटातील सर्वांचा अभिनय अन उत्कृष्ट संवाद यामुळे. नाना पाटेकर ह्या अवलिया कलाकाराला त्रिवार अभिवादन करावं असा अभिनय त्याने केला आहे. ज्या पिढीने लागू यांनी साकारलेला नटसम्राट बघितला नसेल (मीही बघितलेला नाही) त्यांना नाना हेच एकमेव नटसम्राट भूमिका करू शकतात असं वाटल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक प्रसंगात नाना यांची देहबोली, संवादफेक, भाव हे केवळ अप्रतिम आहे. नटसम्राट याचं आपल्या पत्नीला सरकार म्हणणं हे तर नाना यांनी कमालीचं साकारलं आहे. नाना यांच्यातोंडी असलेले विविध पात्रांचे संवाद हे तर लज्जतदार वाटतात!!! एक यशस्वी नट, एक नाठाळ मित्र, एक पती, एक प्रेमळ आजोबा, प्रेमळ बाप ते असहाय बाप, एक कलाकार आणि नटसम्राट बेलवलकर हे समीकरण केवळ नानाच साकारू शकतो.
गणपतराव याचा मित्र राम्या ही भूमिका केली आहे ती विक्रम गोखले यांनी. नाना यांच्यानंतर विक्रम गोखले यांची भूमिका सर्वाधिक दमदार वाटते, भूमिकेला वाव कमी असला तरी त्यातच कमाल करायची किमया गोखले जाणतात. गोखले अन नाना यांच्यातील हॉस्पिटलमधील शेवटचा प्रसंग; अर्थात राधेय अन वासुदेव यांच्यातील संवाद अंगावर काटा आणतोच आणतो. सुरूवातीला त्यांचं एकमेकाला शिवीगाळ करणं, एकमेकांची उनीदुनी काढणं, भांडणं, शिव्या देणं, हक्काने कानफटात मारणं हे अस्सल मैत्रीचं प्रतीक हास्य, उत्कंठा अन उत्सुकता निर्माण करणारं आहे. ह्या दोघांच्या जोडीलाही सलाम!!!
नंतर येते बारी सरकार अर्थात गणपतराव यांच्या पत्नीची. मेधा मांजरेकरांनी ही भूमिका वठवली आहे. मेधा यांनी अशा भूमिका आधीही साकारल्या आहेत, पण ही भूमिका काकणभर प्रभावी आहेच आहे यात वाद नाही. एका नाठाळ पण तितक्याच प्रेमळ नवर्‍याची सय्यमी, समजूतदार पत्नी अशी ही भूमिका मेधा यांनी उत्तम साकारली आहे. वय झालेल्या नवरा-बायको यांचं प्रेम. त्यांच्यातील वादावादी, खोड्या ह्या सुंदर जमून आल्या आहेत. आयुष्यात ह्या सरकारांशिवाय कोणीच नाही हे माहीत असणं अन तिलाही ते माहीत असणं, त्यातून व्यक्त होणारं त्यांचं प्रेम, आयुष्यभराची फरफट, त्याग हे क्षणाक्षणाला जाणवत राहतं. समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये हे म्हणताना त्याचे संदर्भ लागू होतात. हे सगळं अगदी उत्तमप्रकारे समोर येत जातं.    
             इतर भूमिकांत सुनील बर्वे याची सय्यमी भूमिका भाव खाऊन जाते. मृण्मयी देशपांडे हिचा अभिनयही चांगला झाला आहे. नेहा पेंडसे हिचा एका कठोर आईचा अन जराशा स्वार्थी बाईचा प्रकार राग आणतो खरा. अर्थात, अभिनय! विशेष कौतुक करावं लागेल अजित परब याचं. ह्या सगळ्या मोठ-मोठ्या कलाकारांसमोर तो कुठेही कमी वाटत नाही. चला हवा येऊ द्या यामध्ये त्याच्यावर पंच टाकला होता की, गायन-संगीतासोबत अभिनय फ्री; हा चित्रपट पाहिल्यानंतर समजेल की ही चांगली ऑफर आहे. दिग्गज कलाकारांसमोर उभं राहून तितक्याच आत्मविश्वासाने संवाद बोलणे याचं दडपण त्याने जाणवू दिलं नाही. बाकी राजा अन सिद्धार्थ यांच्या भूमिका, अतिशय लहान भूमिकेतील आपले संदीप पाठक बुवा चांगले जमून आले आहेत.

चित्रपटाचा खरा आत्मा आहे चित्रपटाचे संवाद. कुसुमाग्रज यांच्या अजरामर कलाकृतीबद्धल आपण काय बोलणार. शब्दा-शब्दात मनाला भिडणारे भाव. एक एक असे शब्द आहेत जे आज आपण रोजच्या बोलायच्या मराठीत वापरतही नाहीत; असे शब्द कानावर पडल्यावर अनोळखीपणाची जाणीव होते पण कानाला अन मनाला समृद्ध करून जाणारा अनुभव तो. किरण यज्ञोपवित अन अभिजीत देशपांडे या दोघांनी कथेला अन काळाला अनुरूप असे संवाद लिहिले आहेत. सुंदर! काळजाचा ठाव घेणारे शब्द अन त्या शब्दांची जादू. आजकालच्या चित्रपटांत अभावानेच दिसणारे सलग संवाद हे ह्या चित्रपटात नाना यांच्या मुखी पाहायला-ऐकायला मिळतात हे भाग्यच म्हणावं लागेल. हे संवाद केवळ नानानेच म्हणावे असं वाटतं.

चित्रपटात काही गोष्टी खटकतात. एक तर चित्रपटाचा काळ जुना असला तरी तसे संदर्भ दिसत नाहीत. त्या काळात बायका आपल्या नवर्‍याला नावाने हाक मारायच्या का नाही हे माला ठाऊक नाही, पण चित्रपटात तर तसं दाखवलं आहे. त्या काळात हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ईसीजी मशीन वगैरे होत्या का तेही मला माहीत नाही. अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी डोळ्याला सलतात, पण त्याचा आपल्या चित्रपटातील गुंतण्यावर फरक पडत नाही. cinematic liberty! असो, एक चूक माफ!!! संगीत अजून प्रभावी असायला हवं होतं, अजून चांगलं वाटलं असतं.

दिग्दर्शन कसं आहे हे सांगता येणार नाही. मूळ नाटक, त्यातील पात्रे अन त्यांच्यामुखी असलेले संवाद यात काही बदल करून चित्रपटात वापरले आहेत का हे माहीत नाही. कदाचित फार बदल नसावेत? त्यामुळे सीन तो सीन नाटक ते चित्रपट असा प्रवास असेल तर दिग्दर्शकाला फार कष्ट पडले नसावेत. फक्त चित्रपट पडू नेये यासाठी तो एका पट्टीच्या बाहेर जाऊ नये इतकी काळजी घेतली आहे हे नक्की!!!

आता सर्वात महत्वाची गोष्ट…
to be or not to be that is the question.  जगावं की मरावं हा एकच सवाल आहे…
आणि
कुणी घर देता का घर? ह्या तुफानला कुणी घर देता का रे???

ह्या दोन ऐतिहासिक संवादांबद्धल!! अर्थात माझी ती पात्रता नाही. हे संवाद नाट्यसृष्टी अन चित्रपट अन अभिनय कला जीवंत आहे तोपर्यंत संपणार नाहीत असे आहेत. नटसम्राट नाटक बघणार्‍याने तर सोडाच, पण मी व माझ्यासारख्या अनेकांनी हे नाटक बघितलं नाही त्यांनाही हा संवाद माहीत आहे. असं म्हणतात की, लागू यांच्या अभिनयाद्वारे केवळ या संवादाचा आस्वाद घेता यावा यासाठी पुन्हा-पुन्हा हे नाटक बघितलं जायचं. नाना यात कुठेच कमी नाहीत. हे संवाद चालू असताना चित्रपटगृहात ब्रंहांड शांतता होती इतकच म्हणावं लागेल. ह्या संवादाच्या जन्मदात्याला त्रिवार अभिवादन!!! मनाचे भाव इतक्या मोहक शब्दांत मांडायचं कौशल्य हे दैवीच!

प्रत्येकाने हा चित्रपट बघावाच बघावा अशी विनंती आहे. एका वेगळ्या विश्वाची, कदाचित अनोळखी वाटणार्‍या पण अंतर्भावतच लपलेल्या विश्वाचं दर्शन घडेलच!!!

चित्रपटाचा थाट पण इतिहासाची वाट…

चित्रपटाचा थाट पण इतिहासाची वाट…

 बाजीराव-मस्तानी चित्रपट. वाद यावर समीक्षा

इतिहासाची विटंबना

आज संजय लीला भन्साळी कृत ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट बघितला… हा चित्रपट म्हणजे संजयलीलाच म्हणाव्या लागतील… चित्रपट खूप खर्च करून उभा केला आहे त्याचा थाटही न्यारा आहे पण इतिहासाची थोडी-थोडकी नव्हे तर खालपासून वरपर्यंत वाट लावली आहे… बरं चित्रपट म्हणजे काय तर, त्याच्याच आजवरच्या सर्व चित्रपटाची भेळ… रामलीला, देवदास वगैरे चित्रपटांत जे दाखवलं आहे तेच आहे यातही… संपला विषय…
            चित्रपटाच्या सुरूवातीलाच एक असा सीन आहे जो बघून ज्ञानी माणसाला समजेल की पुढे काय वाढून ठेवलं आहे!!!! बुंदेलखंडचा राजा संकटात सापडलेल्या स्वतःच्या राज्याला वाचवण्यासाठी पेशव्यांची मदत मागण्यास पाठवतो स्वतःच्या अतिप्रिय (होती का नव्हती माहीत नाही?) मुलीला, अर्थात मस्तानीला पाठवतो, तेही सैनिकी वेशात… त्यातही मग सुरूवातीला पेशवे तिला भेटायला नाही म्हणतात, नंतर ती पेशव्यांच्या सैनिकांना मरते अन पेशव्याला भेटते… मग काय पेशवा ‘आपके इस अंदाज से बेहद खुश हुवे’ असं म्हणतो अन मदत करायला तयार होतो!!! धन्य ती संजयची लीला अन त्याला इतिहास सांगणार्‍याची..
        
आपण अनेकदा ऐकतो-बघतो की पेशवा किंवा राजघराण्यातील स्त्रिया स्वतःच्या पतीला ”इकडून-तिकडून” असं म्हणतात… इथे तर काशीबाई यांना आजच्या काळातील मुलींपेक्षा जास्त बोल्ड दाखवलं आहे… बरं संपूर्ण चित्रपटात काशीबाई पेशवाई घरातील बाईला शोभेल असं वागत नाहीत…..

आता बाजीराव याच्याबद्धल म्हणाल तर त्याला देवदास म्हणावं इतकं वाईटरित्या प्रदर्शित केलं आहे… जणू काही पेशव्याला मस्तानीपुढे कर्तव्य, राज्य, स्वराज्य वगैरे काही महत्वाच नव्हतंच… त्यात पेशव्याचा पेहराव!!! कपडे तर इतके रंगीत दाखवले आहेत जणू त्या काली तयार कपड्यांच्या दुकानातून पेशवे खरेदी करत असावेत… सुरूवातीला लढाईतील दृश्यात जो रुमाल का काय तो पेशव्याच्या गळ्यात दाखवला आहे, नंतर पायातील शानदार शुज पाहून तो पेशवा आजच्या काळात येऊन खरेदी करून गेला असावा असं वाटत असतं… त्यात पेशव्याला पाण्यात खेळायचीहौस होती का काय असाही प्रश्न पडतो; अगदी प्रणयदृश्य यापासून निजाम भेट इथपर्यंत पेशवा पाण्यात उतरायची घाई का करतो की देव जाणो…
               
चित्रपटात केवळ गाणेच नाही तर प्रत्येक क्षणाला आक्षेप घ्यावेत असे प्रकार आहेत… इतिहासाची पुरती खिल्ली उडवायची असा चंगच संजयने बांधला होता की काय… याला cinematic liberty च्या नावाखाली जर आपण खपवून घेत असू तर जगासमोर आपला काय इतिहास मांडला जाणार आहे देव जाणे…?

त्यामुळे एकच सांगणं आहे की, ज्याने त्या काळाचा इतिहास थोडासा का होईना वाचला आहे त्याने चित्रपट अजिबात बघू नये अथवा नसता मनस्ताप अन भन्साळी ला शिव्यांचा भर मिळेल….

 चित्रपट कसा???

आता महत्वाची गोष्ट ती म्हणजे केवळ चित्रपट म्हणून बघायला गेलो तर काय? उत्तर आहे, ठीक!!! संजयला कथा सांगायची होती का स्वतःचं art direction मधील ज्ञान जगाला दाखवायचं होतं हाच प्रश्न पडतो… वर सांगितल्याप्रमाणे चित्रपटाची कथा ही रामलीला+देवदास अशी आहे जी फार कंटाळवाणी वाटत जाते… चित्रपट श्रीमंत (अगदी बाजीराव पेशव्यापेक्षा) कसा दिसावा एवढी एकच काळजी भन्साळीने पुरेपूर घेतली आहे… प्रत्येक फ्रेम भव्य-दिव्य अन सुंदर काशी दिसेल याचा विचार अन त्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेली मेहनत ही उल्लेखनीय गोष्ट आहे… म्हणजे हॉलीवुड मध्ये कसे चित्रपट असतात तसा हा प्रकार आहे… मला तर असा पूर्ण संशय आहे की, हा चित्रपट भन्साळीने कुठलातरी इंग्रजी चित्रपट पाहून आलेल्या हुक्कीनंतर हातात घेतला असावा… त्यामुळे कथेपेक्षा चित्रपट सौन्दर्य यावर जास्त लक्ष केन्द्रित केलेलं आहे…

अभिनय:-
             अभिनयाच्या बाबतीत तर अख्खा चित्रपट कोसळतो… सगळ्यांच्या व्यक्तिरेखा दिसायला त्या-त्या ऐतिहासिक पात्रांप्रमाणे दिसतात पण त्यांच्या अभिनयात कुठेही ऐतिहासिक पात्रे जागताना दिसत नाहीत… बाजीराव पेशव्यांच्या भूमिकेत रणवीर का रणबीर सिंग शोभून दिसतो, पण त्याचं वागणं, बोलणं, चालणं हे पेशव्याप्रमाणे अजिबात वाटत नाही.तो आजच्या काळातील तरुणाप्रमाणेच वावरतांना दिसतो. रामलीला चित्रपटातील पात्राबाहेर तो पडताना दिसत नाही… दरबार, सैन्य किंवा निजाम प्रसंग येथील गोष्टी तर हास्यास्पद आहेत. ज्याने इतिहास थोडासा जारी वाचला आहे त्याला हे अजिबात पटणार नाही. बरं तो पेशवा एखाद्या गल्लीतील टपोरी वाटतो तेंव्हा खरं काळीज जळजळतं… श्रीमंत बाजीराव पेशवे नेमके कसे होते हे कदाचित संजयला माहीत करूनच घ्यायचं नव्हतं अन सांगायचं तर अजिबात नव्हतं.. संजयला तर त्याच्यातील लीला पेशव्याच्या नावाखाली खपवायच्या होत्या. इतिहासातील अनेक वीर पुरुषांनी कर्तव्यापुढे सगळं त्याग केलं आहे अन इथे एका स्त्रीच्या प्रेमापुढे (अय्याशी नाही बरंका!!) सगळं खड्ड्यात घालायला तयार आहे. हा काही तेरे नाम वगैरे चालू आहे का काय? फालतूपणा सगळा.

दीपिका तर मस्तानीच्या भूमिकेत शोभून दिसत नाहीच. अभिनय इतरांपेक्षा थोडा बरा असंच म्हणावं  लागेल. त्या काळातील लकब अन अदा दीपिकाला जमल्या आहेत.

प्रियंका चोप्राने जी काशीबाई दाखवली आहे ती कुठल्याही कोणातून पेशवीनबाई दिसत नाही. एखाद्या खेडेगावातील नटखट मुलगी ते टीव्ही सिरियल मधील सून इतका साधा प्रवास प्रियंकाने केला आहे. टूकार काम…

संजयला प्रश्न विचारावा वाटतो की त्याने येथे बाजीराव वगैरे नावे का वापरली? त्यांच्यापेक्षा दुसर्‍यांची नावे वापरली असती तर काहीच फरक पडला नसता. निदान कोण दुखावल्या तरी गेलं नसतं. उद्या जर समजा मी एक चित्रपट काढला भन्साळी कुटुंबिय यांच्यावर अन cinematic liberty नावाखाली काहीही दाखवू लागलो तर चालेल का त्याला. समजा त्याच्याच कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे खरे नाव घेऊन प्रणयदृश्य आणि तत्सम प्रकार दाखवले तर चालतील का? इथे तर हे एक राजघराण्यातील अन इतिहासातील मोठ्या कुटुंबाची कथा संगत आहात ना तुम्ही. काहीतरी चित्रपट करायचा असेल तर दुसरं काहीतरी करा, इतिहासाची विटंबना का? जगभरात हा चित्रपट पाहणार्‍या लोकांच्या मनात प्राचीन भारताची काय प्रतिमा उभी राहत असेल, बाजीराव व त्या काळातील इतर लोकाविषयी काय मत होतील याचा विचार संजयने केला होता का? ज्या बाजीरावाने चाळीस लढाया जिंकल्या, देशात मराठा साम्राज्य वाढवलं अशा पेशव्याला केवळ एका मस्तानीपुरता मर्यादित ठेऊन त्याची कुचंबणा का करावी वाटली हे कळत नाही. पेशव्याला देवदास रूपात दाखवणे हा तर टोकाचा भाग झाला.

जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्धल चुकीच्या (कदाचित?) लिहीलेल्या चार ओळींबद्धल पुरंदरे यांना चाळीस वर्षे त्रास दिला जातो तिथे असे विटंबना करणारे चित्रपटाबद्धल काहीच बोललं जात नाही हे काय म्हणायचं?

संजयच्या लीला जर वरती पेशवे यांनी बघितली असेल तर ते याची वाटच बघत असतील. तिथे पोचल्यावर याला पिंगा घालायला लाऊन त्याची चांगली वाट लावणार यात शंका नाही!!!

एकंदरीत काय तर इतिहासही नाही, चित्रपट थोडासा बरा अन प्रदर्शन मोठं अशातला हा भाग झाला!!!

उदय – Arise?

उदय – Arise?

रविवार.  ६/१२/२०१५
 

आजचा दिवस भाग्याचा आहे असं वाटत आहे… निदान अपेक्षा तरी आहे… अंधारलेल्या मार्गावर प्रकाशची किरणे पडत आहेत… काहीतरी चांगलं घडणार असं वाटत आहे… मनात उल्हास अन नवी उमेद दाटली आहे… सगळं व्यवस्थित अन यश घेऊन येणारं होऊ दे अशी प्रार्थना आहे…!

Sunday: 6/12/2015

Today is lucky day for me… at least feeling so… something happening positively… getting new ways and getting light on old and shadow paths… Praying to get succeed…!!!

शनीचा विनयभंग अन पुरोगाम्यांची साडेसाती!

शनीचा विनयभंग अन पुरोगाम्यांची साडेसाती!

शनीदेवाची साडेसाती फार कठोर असते असं म्हणतात. पण आपल्याकडे स्वयंघोषित पुरोगामी लोकांची शनीला साडेसाती लागलेली दिसत आहे. संपलेल्या मक्याच्या कणसाला पुन्हा-पुन्हा मीठ-मिरची घासून चाटायचे प्रकार चालू आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलीने शनी शिंगंनापूर येथील परवानगी नसताना जवळ जाऊन तेल वाहिलं अन पुजा का काय ती केली. झालं! देशात अन समाजात जणूकाही एक क्रांतीची ज्वालाच पेटली आहे असं ओरडणारे पुढे आले. त्यावर ‘साधक-बाधक, सखोल, वैचारिक, पॉइंट वेल टेकन’ चर्चा घडल्याही अन नेहमीप्रमाणे हाही विषय लगेच विरत आला. पण चर्चेला काही नाही म्हणून आल पुन्हा त्यावर चर्चा सुरू केली. निमित्य होतं महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर एक प्रतिक्रिया दिल्याचं. एक प्रतिक्रिया आली की सुरू झाल्या पुन्हा चर्चा. एका बाजूला हेच पत्रकार, साहित्यिक अन स्वयंघोषित पुरोगामी लोक नामंतर, स्मारक वाद आले की म्हणतात, महाराष्ट्रात एवढे गहन प्रश्न असताना असल्या विषयावर वेळ का वाया घालवायचा; आता हेच लोक अशा विषयावर वेळ वाया घालताना बाकीचे विषय सोयिस्कररित्या विसरतात.
विषय काय होता, परवानगी नसताना एका मुलीने शनीदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन पुजा का काय ती केली. यावर पंकजाताई मुंडेही म्हणल्या की हा काही खूप मोठा चर्चेचा विषय नाही. पण आज त्यावर पुन्हा चर्चा सुरू केली अन बौद्धिक वाद घातले गेले. अतिबुद्धिवादी लोकांना तर असे विषय चघळायला हवेच असतात. सध्या फार विचित्र परिस्थिती आहे; मोदी किंवा त्यांच्या विचारसारणीविरोधी बोलनार्‍याना थेट देशद्रोही ठरवलं जात आहे तर खोटं पुरोगामित्व वगैरे विरोधी बोलनार्‍याना मोदी अन आरएसएस चे चेले म्हंटलं जात आहे. जणू काही भारतात एवढ्या दोनच प्रकारचे लोक राहिले आहेत. अतिशय हास्यास्पद!!!

मी जर एखाद्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडलो अन तिच्या मागे लागलो समजा. पण त्या मुलीने आधीच जाहीर करून टाकलं आहे की ती अविवाहित राहणार आहे आणि तिच्याशी ज्या मुलाने वागावं ते एक मित्र म्हणून अन तिच्या मतानुसार वागावं. ह्या परिस्थितीत मी काय करणार? एक तर मुलगी खूप गर्विष्ठ किंवा अतिकठोर आहे म्हणून तिच्यापासून दूर राहणार किंवा खरंच जर माझं तिच्यावर प्रेम असेल तर ती म्हणते तसं वागून तिच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करणार. मी जर एखादी तिसरी गोष्ट करायला गेलो तर मी त्या मुलीचा केलेला विनयभंग असेल कारण मी तिला त्रास होईल असं अन तिच्या मर्जीविरुद्ध वागत आहे, हे सर्वथा चूक आहे ना? हा पुरुषी अहंकारच की? मी तिची मर्जी नसतानाही तिला त्रास देत आहे.
आता मला बुद्धिवादी लोकांनी सांगावं की जो कोण शनी (त्यांच्या दृष्टीने) आहे तो तरी वेगळं कुठे काय म्हणतो आहे. एक तर हे सगळे पुरोगामी देव मानणे (हिंदूंचा) म्हणजे घटनाविरोधी अन पाप (सॉरी, अपराध!) असल्यासारखं मानतात. शनीदेव किंवा हनुमान जर म्हणत आहे की मी ब्रम्हचारी आहे माझ्याजवळ स्त्रियांनी येऊ नये तर त्यात स्त्रियांचा अपमान कसा? उलट जी मुलगी शनीच्या चौथर्‍यावर गेली तिने शनीचा विनयभंग केला आहे असं मानलं पाहिजे. जर तुम्हाला शनीदेवाचं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही त्यावर भक्ति कशाला ठेवता? तुम्हाला तिथे कोण आमंत्रित केलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, तुम्ही जर शनीचे खरे भक्त असाल तर तो म्हणतो ते ऐका ना; जाऊ नका त्याच्याजवळ. पण तुम्हाला सुटले आहेत अहंकारी पुरोगामीत्वाचे पंख. नेहमी विवेकाच्या अन कसल्या गोष्टी करणारे तुम्ही आता विवेक सोडून देता अन वैयक्तिक अपमान झाल्याप्रमाणे जाऊन बदला घेऊन येता. म्हणजे वटसावित्रीची पुजा आम्हीच का करायची म्हणूनही तुम्हीच ओरडायचं अन आम्हाला पुजा का करू देत नाही म्हणूनही तुम्हीच ओरडायचं? काय अर्थ?

तसे बुद्धिवादी हे खरे बुद्धिवादी असतात. ह्या सगळ्या गोष्टीला त्यांच्याकडे पद्धतशीर उत्तर असेलच. मी कसं भारी उदाहरण दिलं, कसा अतिचतुर आहे, किती मुद्देसूद बोललो याचा सार्थ अभिमान तुम्हाला वाटाण साहजिक आहे.        

विचार करा, अशी गोष्ट तुम्ही इतर धर्मातील प्रार्थनास्थळात करू शकाल का? (करूही नये असंच आमचं मत आहे कारण कुठलाही धर्म इतरांच्या भावना दुखवण्याची शिकवण देत नाही.) समजा, तुम्ही जर आपल्या शीख बांधवांच्या पवित्र गुरुद्वारा मध्ये गेलात अन म्हणालात की आम्हाला डोक्याला रुमाल किंवा काहीच बांधायचं नाही आत दर्शन घ्यायचं आहे. तर? हे एक उदाहरण आहे फक्त. अशा स्थितीत तुमच्यावर कायद्याने काय कारवाई होऊ शकते तेही तुम्हाला माहीत आहे.

मलाही एखाद्या धर्मस्थळाला भेट दिल्यावर तेथील प्रशासनाला तेथील काही गोष्टींवरून भांडवं वाटतं, पण त्याचा राग मी तेथील परमेश्वरावर किंवा धर्मावर काढत नाही.

तस्लीमा नासरीन, ज्या बांगलादेशी लेखिका आहेत त्या बरोबर म्हणतात; हिंदूंना अन त्यांच्याधर्माला विरोध करणं म्हणजे आपलं पुरोगामित्व सिद्ध करणं असंभारतातील पुरोगामी लोकांना वाटतं. तेबर्‍याच अंशी बरोबरही आहे. असे विषय आले की अनिस कुठून समोर येतात कोण जाणे? हे त्या दुष्काळ किंवा इतर प्रश्नावर बोलत नाहीत जो सर्वधर्मियांना समान छळतो आहे. पण धर्म नाव ऐकलं की यांचे कान टवकारले जातात अन यांचा विवेक जागा होतो अन हे बिलातून बाहेर पडतात.  पत्रकार अन माध्यमांचं ठीक आहे की त्यांना रोज नवीन विषय कुठले भेटणार? काहीतरी स्वतःच्या मनाने तयार करावं लागतं अन कंटाळा येईपर्यंत चालवावं लागतं.

आज अनेक गावांत, शहरांत स्त्रिया हनुमान, शनी ह्या मंदिरात जातात. ते चूक बरोबर हे ज्याने-त्याने ठरवावे. पणस्वतः देव मानायचा नाही अन इतरांच्या भावना दुखावत धर्मात सुधारणा करायच्या नावाने काहीतरी करत बसायचं. कदाचित यामुळे आपलं नाव फुले, शाहू आंबेडकर यांच्या यादीत खाली कोठेतरी ठळक अक्षरात लिहिलं जाईल अशा अपेक्षेने. जात-धर्म-पंथ-भाषा याचा कसलाही विचार न करता उपाशी पोटाला अन्न-पानी देणारा खरा पुरोगामी! बाकी सगळे कुचकामी!

आज मराठवाड्यात पाण्याची मारामार आहे. सगळ्यांनाच पाण्याचा त्रास होतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना समान त्रास होतो. हिंदुत्ववाद्याला जास्त अन सेकूलर ला कमी होतो का? एखादा खराब रस्ता सगळ्यांनाच त्रास देतो. हिंदुत्ववाद्याला जास्त अन सेकूलर ला कमी होतो का? ह्या गोष्टीचा विचार करा की? आजच्या काळाची गरज काय, पिढीची गरज काय अन तुम्ही वाद कसले घालता? अस्सल होते फुले, शाहू अन आंबेडकर… आताचे सगळे जोकर!!! 

बाळासाहेबांच्या स्मारकला विरोध का?

बाळासाहेबांच्या स्मारकला विरोध का?

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसर्‍या
पुण्यस्मरणानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अन महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली. शिवसेनाप्रमुखांचं दिमाखदार स्मारक
मुंबईच्या महापौर निवासात करायचं ठरवण्यात आलं. ही घोषणा होते न होते की लगेच अनेकांनी
बिळातून बाहेर पडून याला विरोध करायला सुरुवात केली. बाळासाहेबांचं स्मारक व्हावे यासाठी
एक सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीसमोर ह्या महापौर निवासाचा उल्लेख
आला नव्हता का? आला होता तर मग त्यावेळेस सर्व गप्प का होते? महापौर निवासाचं नाव तर पहिल्यापासूनच चर्चेत होतं. त्यावेळेस राजकीय पक्ष
अन कुठलेही पत्रकार किंवा इतर कोण साधा विरोध करायलाही समोर आले नाहीत. ते कदाचित वाटच
बघत होते की कधी एकदा घोषणा होते अन आपण कधी एकदा विरोध करून स्वतःची नैतिकता स्पष्ट
करतो.
आजवर अनेकांचे अनेक स्मारके अनेक ठिकाणी उभी राहिली
आहेत. भारतरत्न बाबासाहेबांचं, महात्मा गांधींचं वगैरे स्मारक
तर कुठेही उभं करायचं म्हंटलं की सगळे शांतपणे माना डोलावतात. त्यात युक्तिवाद करायची
त्यांची इच्छा नसते कारण तसं केलं नाही तर ते पुरोगामी राहतील का नाही याची भीती त्यांना
वाटत असते. त्यामुळे सावरकर, बाळासाहेब किंवा अशा उजव्या विचारसरणीच्या
नेत्यांच्या स्मारकाचा प्रश्न येतो तेंव्हा यांची नैतिकता जागी होते.
अजून गोष्ट आता बोलावी वाटते. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर
करायची वेळ आली तेंव्हा तथाकथित विचारवंतांना महाराष्ट्रातील दुष्काळ अन इतर प्रश्न
महत्वाचे वाटत होते. तेंव्हा नामकरण, स्मारक वगैरे मुद्दे
यांवर वाद नको असं ते ओरडून सांगत होते. काही दिवसांपूर्वी टिपू सुल्तान यावर वाद चालू
होता, विशेष म्हणजे त्याला सुरुवात तथाकथित पुरोगामी अशा गिरीशजी
कर्नाड यांनी सुरू केला तेंव्हा इतर समस्या कोणाला आठवल्या नाहीत. आता बाळासाहेबांच्या
स्मारकला विरोध करून हे विचारवंत स्वतःचं महत्व वाढवून घेत आहेत. आपण किती नैतिक आहोत
याचे पुरावे ते देत आहेत. अगदी काल औरंगाबाद येथे चार तरुण शेतकर्‍यांनी आत्महत्या
केल्या तो प्रश्नही ते विसरले. का? त्यावर बोलून त्यांना किम्मत
भेटत नाही जी किम्मत बाळासाहेबांच्या स्मारकला विरोध करून मिळते आहे.
यात हास्यास्पद आरोप करण्यात येत आहे तो म्हणजे शिवसेना
अन उद्धव हे महापौर निवासस्थान बळकाऊ पाहत आहेत. आता यांची कीव करावी वाटते. शिवसेना
काही तेथे शाखा उघडणार आहे का उद्धव तेथे जाऊन राहणार आहेत का ती जमीन व्यावसायिक कारणासाठी
वापरणार आहेत? जमीन व्यावसायिक कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे.
कदाचित त्यांनाच डोळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक खुपत असावं. बरं सेनेला अन उद्धव
यांना जर जागाच बळकवायची असती तर ती छोटी कशाला मोठीच बळकावली असती की. तुम्हीच म्हणता
ना की इतक्या छोट्या जागेवर स्मारक कशाला? बरं गेली वीस-पंचेवीस
वर्षे मुंबई महापालिकेत सेनेची सत्ता आहे आणि इतके वर्षे महापौर निवासस्थान सेनेच्या
ताब्यातच आहे आणि पुढेही राहील अशीच स्थिती सध्या आहे. मग इतका अट्टहास सेनेने कशाला
केला असता.
अजून एक शंका एक-दोन विचारवंतांनी काढली ती अशी की यशवंतराव
चव्हाण यांच्याइतकं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व मोठं नव्हतं. स्वतःला बुद्धिवादी समजणार्‍या
लोकांना बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व कळत नाही हेच खरं. बाळासाहेबांसाठी महापौर निवासस्थान
कशाला द्यायचं असा त्यांचा प्रश्न? मग आजवर ज्या थोर
नेत्यांच्या स्मारकासाठी मोठाले भूखंड वाटले ते आधी परत घ्यायची मागणी त्यांनी करावी.
अजून एक विचारावं वाटतं की, संजय गांधी यांचं व्यक्तिमत्व किती
मोठं होतं जेणेकरून त्यांच्या नावाने मोठाले पार्क, उद्यान वगैरे
बांधले?
सामान्य नागरिकांपैकी काही म्हणत आहेत की शिवसेनेने
स्वतःच्या पैशातून हे स्मारक बांधावं. उत्तम! म्हणजे स्वतःला फिरायला, मुलांना खेळायला जागा महापालिकेने अन राजकीय नेत्यांकडे तुम्ही मागणार अन
ज्यांनी इतकी वर्षे मुंबईवर राज्य केलं त्यांना स्मारकासाठी जागा नको? हे भलतंच आहे. बरं स्मारक बांधल्यावर काय तिथे फक्त शिवसैनिक अन उद्धव जाणार
आहेत का? सगळ्यात आधी तोंड वर करून तुमच्यासारखे टीका करणारेच
जटिल की, अगदी मुला-बाळांना घेऊन. विचित्र लोक असतात काही.
काही बुद्धिवंत तर म्हणताहेत महापौरांना बेघर करू नका
अन मातोश्री वर स्मारक बांधा. आता यांची बुद्धी किती मोठी ते बघा. महापौर काही महापौर
निवासस्थानात जन्माला येत नाही. जे महापौर होतात ते तेवढ्या कलावधीसाठी तेथे जाऊन राहतात.
त्यांना स्वतःची घरे असतात. मातोश्री वर तर बाळासाहेबांचे वंशज राहत आहेत आणि तेच खरे
स्मारक आहेत. महापौरांना पर्यायी व्यवस्था असल्याचं आधीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं
आहे.
बाळासाहेबांचं कितीही भव्य स्मारक दादरच्या बाहेर बांधलं
असतं तर सगळ्यांनी सेनेवर टीका केली असती की बाळासाहेबांचं स्मारक दादर येथे बांधणे
सेनेला जमलं नाही. 
मराठी माणसाचा जो नायक होता त्याच्या नशिबी अशी गोष्ट येणे खरच दुर्दैवी आहे. मराठी माणूस विनाकारण एकमेकांचे पाय ओढून खड्ड्यात पडत असतो. नाना शंकरशेठ यांनी मुंबईला मोठी जमीन दिली अन त्यांचं मोठं स्मारकही नाही अन काहीच पाऊलखुणा नाहीत. तसं बाळासाहेबांचं होऊ नये असं वाटतं.
मुंबईतल्या मोक्याच्या जमिनी परप्रांतीय लोकांनी लातल्या त्यावेळेस कोण गप्प होते अन कोण संघर्ष करत होते??? उद्या जर महापौर निवासस्थान येथे जर काही दुसरी गोष्ट बनवली तर मराठी माणूस बसेल त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत. ज्यांच्या हातात मुंबई सुरक्षित राहिली त्या मुंबईच्या हृदयात बाळासाहेबांचं स्मारक होत असेल तर त्याचा प्रत्येक माणसाला अभिमान वाटला पाहिजे. उगाच नैतिकतेच्या गोष्टी करून तमाशा करू नये. परप्रांतीय लोकांकडून काहीतरी शिका.

 

यावर एकच म्हणता येईल.. ‘मूर्खस्य वादम, बहिरस्य गीतम!!!’

खरच… कट्यार काळजात घुसली!!!

खरच… कट्यार काळजात घुसली!!!

“कट्यार काळजात घुसली” सारख्या अजरामर कलाकृतीवर आधारित चित्रपट करण्यासाठी एक धाडस लागतं आणि ते धाडस दाखवून सुबोध भावे अन त्यांच्या टीम ने ते धाडस लीलया पेललं आहे…. एक सुंदर चित्रपट बघितल्याची अनुभूती!!! अप्रतिम!!!

कट्यार काळजात घुसली हे संगीतनाटक आपल्या आधीची पिढीने डोक्यावर घेतलं ते उगाच नाही. त्यावेळेस ज्यांनी हे नाटक याची देही याची डोळा पाहिलं असेल त्यांना खरच सुंदर कलाकृती काय असते हे माहीत असेल. आजही चित्रपटगृहात गेलो तेंव्हा वयस्कर मंडळी आवर्जून उपस्थित होती हे त्या कलाकृतीवर असलेलं प्रेमच म्हणावं लागेल. नाटक जितकं संगीतमय आहे तितकाच चित्रपटही संगीतमय अन चित्रमय झाला आहे. या चित्रपटच्या संगीताबद्धल बोलायची माझी पात्रता नाही… ते फक्त माझ्या कानाला,मनाला,आत्म्याला भिडून एक मंनःशांती देऊ शकतं इतकंच वर्णन मी त्याचं करू शकतो…

चित्रपटाच्या कथेत नाटकाच्या कथेपेक्षा थोडेसे बदल केलेले असले तरी मूळ गाभा तोच आहे. चित्रपटाचा एक शक्तीस्थळ आहे ते म्हणजे सचिन पिळगावकर अन शंकर महादेवन यांचा अप्रतिम अभिनय!!! चित्रपट पाहत असताना खांसाहेब म्हणजे आपला गम्मत-जम्मत, बनवाबनवी मधील सचिन आहे हे अजिबात लक्षात येत नाही इतका अप्रतिम अभिनय सचिन यांनी केला आहे. खांसाहेब यांची भूमिका त्यांनी एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली असं म्हणण्यापेक्षा एक नवीन प्रकारचे खांसाहेब बघायला भेटतील हे नक्की!!! या भूमिकेसाठी सचिंजींनी काय मेहनत घेतली असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. एका शब्दात सांगायचं झालं तर ‘लाजवाब’ असंच त्याचं वर्णन करता येईल. शंकर महादेवन जितके चांगले संगीतकार-गायक आहेत तितक्याच उत्तम प्रकारे त्यांनी पंडितजींची भूमिका साकारली आहे. शांत, प्रेमळ, निस्वार्थी पंडितजी त्यांनी उत्तमरीत्या साकारले आहेत. कविराज यांची भूमिका नाटकातल्या भूमिकेपेक्षा कमी लांबीची आहे, पण जितकं काम आहे तितकं पुष्कर श्रोत्री ने चांगलं पार पाडलं आहे. येथे सदाशिवच्या भूमिकेला जास्त वाव देण्यात आला आहे. सुबोध भावेनेच ही भूमिका अन चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असल्याने हे पात्र भाव खाऊन जाणार हे वेगळं सांगायला नको. अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे यांनी आपापली कामे चोख पार पाडली आहेत.

ज्या पिढीने साक्षात वसंतराव देशपांडे यांना, त्यानंतर राहुल देशपांडे यांना खांसाहेब यांची भूमिका पार पाडताना पाहिलं असेल यांची प्रतिक्रिया सांगता येत नाही, पण ज्यांनी नव्यानेच, सर्व संदर्भ विसरून खांसाहेब हे पात्र बघितलं असेल त्यांना सचिन पिळगावकर यांचं काम आवडणारचं!!!

आजच्या पिढीने आजच्या पिढीसाठी तयार केलेली ही कलाकृती आहे. आपला सोनेरी इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे हे कलाकाराचे काम असते जे ज्यात हा चित्रपट बनवणारी टीम पुर्णपणे यशस्वी झाली आहे असं म्हणावं लागेल. हा चित्रपट नाटकावरून बनवला असल्याने यातील काही प्रसंग-संवाद नाटकीय वाटले तरी ते कथेला, कथेच्या काळाला धरून आहेत.

चित्रपटाची तांत्रिक बाजुही छानपणे सांभाळली आहे. जंगलातील काजव्याचा प्रसंग, दरबारातील, दर्ग्यातील प्रसंग हे बेलाग झाले आहेत. सिनेमॅटोग्राफर याचीही खास भूमिका आपल्या डोळ्यांवर, मेंदूवर छाप सोडून जाते.
चित्रपट अजून थोडासा वाढवून सदाशिव-खांसाहेब यांच्यातील प्रसंग दाखवले असते तर अजून मजा आली असती… पण ठीक आहे… समीक्षकांना ‘चित्रपट खूप लांबवला’ असं म्हणायची संधी दिग्दर्शक देऊ इच्छित नसावा…

कट्यार काळजात घुसली नावाचा जो काही चित्रपट पाहिला त्याला शब्दात सांगता येणार नाही… संगीतप्रमाणेच याचाही आपल्या इंद्रियाणी अनुभव घेतला पाहिजे….

चित्रपट पाहून एकच सांगतो… दर्दी प्रेक्षकाच्या काळजात ही कट्यार घुसतेच घुसते… 

दिवाळी संपली

दिवाळी संपली

#दिवाळी_आठवण   #दिवाळीफराळ   #दिवाळी   #दीपोत्सव
 
दिवाळी जवळजवळ संपली आहे,
उडवलेल्या फटाक्यांचा कचरा रस्त्यावर तसाच आहे,
लढीचे कागदं, रॉकेटच्या अर्धवट काड्या, जळालेली भुईचक्कर-नळे,
सगळे अस्ताव्यस्त दिसत आहेत
 राहिलेला कचरा, खराब फटाके यांची शेकोटी होणार आहे,
फुलबाज्याच्या तारा मात्र जपून व्यवस्थित ठेवल्या आहेत,
काही कामाला येतील म्हणून…
घरा-दाराला लावलेली झेंडूची तोरणे वाळून गेलीत,
पण त्यांचा गंध अजूनही मनात दरवळतो आहे…
आकाशदिवा तुळशीच्या लग्नापर्यंत तसाच राहणार आहे,
एकटा बिचारा वार्‍याच्या मंद झोक्याने गारठून जाणार आहे,
तेलकट पणत्या, धूळखात अंगणात पडून आहेत,
पावसाळा येईपर्यंत त्या तशाच राहतील कदाचित,
घरही थोडसं तेलकट वाटत आहे,
घरात फराळाचे डबे रिकामे होत आले असावेत,
डब्याच्या तळाला तेल, तूप, मीठ अन पदार्थांचे तुकडे शिल्लक दिसतात,
माहेरवाशिनीला जाताना देण्यासाठी थोडासा फराळ शिल्लक ठेवला आहे,घरातला पसारा अजून तसाच आहे,
नवीन आणलेले कपडे आता जुने झाले आहेत,
कपड्यांवर फटाक्यांची दारू अन फराळाचे डाग दिसताहेत,
साड्या मात्र व्यवस्थित घडी करून जागेवर पोचल्या आहेत,

दिवाळीत लागलेल्या दिवाळ्याचे हिशोब चालू आहेत,
कोणाचे देणे नाही याची खात्री चालू आहे,
घर आता थोडं शांत वाटत आहे,
पाहुणे परत गेले आहेत,
कालची लगबग-गोंधळ आता राहिला नाही,
मन जरा निराश वाटत आहे,
कसलीतरी हुरहूर वाटत आहे,
दिवाळी लवकर संपली असं वाटत आहे,
पुढच्या दिवाळीची तारीखही बघितली जात आहे,
अभ्यंग स्नान आता नसणार,
उटणे-तेल हेही नसणार,
शाळेची तयारी सुरू झाली आहे,
उडवलेल्या फटाक्यांची अन खाल्लेल्या फराळाचे साहसकिस्से चालूच आहेत,
ग्रीटिंग्स रद्दी पेपर मधून बाहेर डोकावत आहेत,
थंडी कसलीतरी आठवण करून देत आहे,
बास!!! दिवाळी संपली आहे…
अलगद झोपेत असणारं स्वप्न संपलं आहे,
आता जागं होण्याची वेळ आहे,
दिवाळी म्हणजे केवळ मनाचा खेळ आहे!!!

 @Late_Night1991

बिहारी बाबू छा गए!!! अच्छे दिन आ गए?

बिहारी बाबू छा गए!!! अच्छे दिन आ गए?

विश्लेषण:- बिहार निवडणूक निकाल २०१५ 

बिहार निवडणुकीचे आज निकाल लागले. सर्वप्रथम नितीशकुमार अन लालूप्रसाद यांचं अभिनंदन!!! बाकी मोदी-शाह (भाजपला नव्हे!) यांचं सांत्वन! विशेष म्हणजे, मोदी पराभवाने आनंदित झालेल्यांना विशेष शुभेच्छा!!!

बिहार निवडणुकीच्या निकालांकडे सर्व देशाचे (अमित शहांच्या मते पाकिस्तानचेही) लक्ष लागले होते. दिवाळी तोंडावर येऊन ठेपली असताना बिहारमध्ये मोदी कंपनीचं दिवाळं निघालेलं सर्वांनी याची देही याची डोळा अनुभवलं आहे. नितीशकुमार-लालू-कॉंग्रेस यांच्या महागठबंधन ने भाजप किंवा मोदी यांच्या आघाडीची पुरती धूळदान उडवून दिली. लोकसभा निवडणुकीत स्वबळावर दिल्लीच तख्त काबिज केल्यानंतर भाजप सत्तेची खुर्चीवर बसून विरोधकांना धुळीसमान समजत होता त्यांनाच धुळीत मिळालेलं पाहून अनेकांना आनंद झाला नसता तरच नवल! मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर अनेक ठिकाणी विधानसभा आणि अन्य निवडणुका झाल्या आणि त्यात भाजपला चांगलं यशही मिळालं. पण ह्या यशाने भाजपाच्या मंडळींनी विंनम्रता सोडून दर्प जागा झाला. भाजपला जेथे-जेथे यश मिळालं तेथे-तेथे आधीच्या सरकारने चांगलं काम केलं नव्हतं म्हणून जनतेने भाजपाला निवडलं. पण भाजपने याचा असा गैरसमज करून घेतला की जनतेने मोदींना देशात हवं ते करण्याचे अधिकार सोपवले आहेत. याला ते मोदी लाट म्हणायचे! अर्थात हे सर्वथा चूक होतं. जनतेने विकासाची आस ठेऊन एका पर्यायाची निवड केली होती जी निवड चुकत असेल तर ती बदलायचीही जनतेची तयारी होती. पण भाजप अशा यशाने हुरळून गेला अन दिल्लींनंतर बिहारमध्ये पुर्णपणे होरपळून निघाला; इतका की पळायला अन लपयालाही जागा मिळू नये.

बिहारमध्ये निवडणुका कशा झाल्या, प्रचार कसा झाला, कोणत्या पातळीवर झाला, कोणत्या मुद्द्यांवर झाला हे सार्‍या जगाने बघितलं आहे. बिहारमध्ये लालू-नितीश जिंकले कारण त्यांनी जातीय समीकरण चांगले जुळवले, बिहारी-बाहरी मुद्दा केला, भाजपाकडून चुकीची वक्तव्ये झाली वगैरे गोष्टींना काही अर्थ नसतो. विजय हा विजय असतो अन पराजय हा पराजय असतो, त्याला बघायला गेलं तर हजार कारणं असू शकतात. साधी नगरपालिका, पंचायत जिंकली तरी मोदींच्या विकासाच्या राजकारणाला श्रेय देणारे भाजप कार्यकर्ते बिहारचा पराभव हा मोदींचा पराभव आहे हे का बोलत नाहीत??? पण आता असे आवाज पक्षातूनच निघतील याबद्धल वाद नाहीत. येणार्‍या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान किंवा नंतर मोदींना प्रखर विरोधाला सामोरं जावचं लागेल; मग ते स्वपक्षीय असोत, तथाकथित मित्रपक्ष किंवा विरोधक असोत!!! हा पराभव शंभर टक्के मोदींचाच आहे, कारण भाजप नावाची संघटना मोदींनी स्वतःच्या बोटावर ठेवली आहे. त्यात त्यांचे विश्वासू अमित शाह आलेच. अमित शाह यांना तर असं दाखवलं जायचं जणू त्यांच्यासमोर कोण जिंकूच शकणार नाही. पण प्रत्येकाची वेळ येत असते. अतिचाणक्या, मॅनेजमेंट गुरु, सर्वज्ञानी अशा अमित शाह यांचा हादारुण पराभव पाहिल्यावर मोदींचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत होऊ नये म्हणजे मिळवली!

आज भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा जन्मदिवस आहे. आज त्यांच्या जितकं दुखं असेल तितकाच आनंदही होत असेल. ज्या उत्तर भारतातील आंदोलणाद्वारे अटल-आडवाणी या जोडगोळीने आज यशाच्या शिखरावर बसलेल्या भाजपचा पाया रचला होता त्या पायाला हादरे बसताना त्यांना पाहावं लागत आहे. आपण उभ्या केलेल्या घराला तडा जरी गेला तरी मनात जी कालवाकालव होत असते तसं अडवाणींना होत असेल. पण आनंदही होत असेल; मोदी यांच्या पराभवाचा! ज्या मोदींनी आडवाणी यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला, पक्षातून बाजूला केलं त्यांचा होत असलेला पाणउतार बघून आडवाणी यांना थोडसं हायसं नक्कीच वाटत असेल. शेवटी तेही मनुष्यच आहेत. एकेकाळी मोदी अन बिहार या मुद्यांवर आपलं संपूर्ण राजकीय जीवन पणाला लावणार्‍या आडवाणी यांना आज नक्की काय वाटत असेल ते त्यांनाच माहीत. बिहारही गेलं अन मोदींची हवाही!!!

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंना यांना जितका आनंद झाला असेल त्याहून कितीतरी पट जास्त आनंद आज होत असावा. आपल्याला पायाशी बघणार्‍या भाजपला पायदळी तुडवलं जात असलेलं बघून आनंद होणं साहजिकच आहे. पण याचा विचार भाजपने केला पाहिजे. आपल्या पराभवानंतर एकेकाळच्या आपल्याच कट्टर मित्राला इतका आनंद होतो असा दिवस उजाडावा हे भाजपच दुर्भाग्य आहे. पण केजरीवाल, नितीशकुमार-लालू यांच्यानंतर उद्धव यांचाच नंबर आहे भाजपची हवा उडवायचा. त्यात त्यांना थोडं यश येतही आहे…बाकी पुढचं पुढे…

कोंग्रेस हा निवडणुका लढवून त्या जिंकायच्या या दृष्टीने पुढे जाणारी संघटना आहे असा आरोप भाजपाची काही मंडळी करायची, पण आज भाजपचंही तेच झालं आहे. पार्लमेंट से पंचायत तक हे त्याचच प्रतीक आहे. निवडणुका म्हंटल्या की देशभरातील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बोलवायचे वाट्टेल ते करायचं अन निवडणूक जिंकायचीच असा चंग कशासाठी? साध्या केडीएमसी महापालिकेसाठी तुम्ही सत्तेचा गैरवापर करता, मुख्यमंत्री प्रतिष्ठा पणाला लावतात; कशासाठी? जगातील सर्वात मोठा पक्ष बनण्यासाठी? सत्तेसाठी? हे जनतेला कळत नाही असं नाही. तुमचे पक्ष जनतेसाठी आहेत, निवडणुका जनतेच्या कल्याणासाठी आहेत, तुमच्या वैयक्तिक महत्वाकांक्षासाठी नाही.

बिहारमध्ये नितीशकुमार जिंकणार का हरणार यापेक्षा महत्वाचा प्रश्न होता भाजप जिंकणार की हरणार? यावरच पुढची गणितं अवलंबून होती. देशाचे पंतप्रधान निम्मा वेळ देशाबाहेर असतात अन देशात आले की प्रचारात; मग देशाला चालवणार कोण? अच्छे दिन येणार कसे? बिहारमध्ये जिंकण्याच्या इर्षेने पेटलेल्या भाजपने वाट्टेल त्या क्र्लुप्त्या लढवल्या पण जनतेने दोन बिहारी बाबूंनाच आपलं मानलं. मोदी-शाह जोडगोळी पराभूत झाली ती नितीश-लालू या जोडीपुढे. ही काही बिहारी जोडीने गुजराती जोडीला दिलेली हार नाही; उगाच याचा तमाशा भाजपने केला नाही म्हणजे मिळवलं. हा महाआघाडीचा विजय कमी अन मोदी-शाह यांचा पराभव जास्त आहे. नितीश गेली दहा वर्षे सत्तेत आहेत; त्यांना अॅंटीइंकंबन्सी चा फटका बसू शकला असता. लालू यांची कारकीर्द बिहारी जनतेला चांगलीच स्मरणात आहे. हे दोघेही त्या मानाने दुबळे होते. भाजपने शांतपणे, साहजिकपणे यांच्याशी लढाई केली असती तर आज जे झालं तितकं वाईट भाजपचं झालं नसतं. पण आम्हाला कोणीच हरवू शकत नाही, आम्ही हे काबिज करणारच, बघू कोण आडवं येतं ते, आम्ही देशभक्त इतर देशद्रोहि वगैरे बोलून, टोकाचा प्रचार करून भाजपने बिहारी जनतेच्या स्वाभिमानाला धक्का लावला अन कट्टर शत्रूंना एकत्र येण्याची संधी दिली. (सत्तेत आल्यावरही नितीश-लालू किती दिवस एकत्र राहतील हेही कोडचं आहे). येथेच भाजपचा पराभव निश्चित झाला. केडीएमसी मध्येही भाजप सरळमार्गी निवडणूक लढवत असता तर तेथील कारभाराला कंटाळलेली जनता भाजपाला निवडून दिली असती, पण तेथेही सगळी सत्ता, प्रतिष्ठा, सम, दाम, दंड, भेद वगैरे वापरल्याणे जनतेने आधीचं काय वाईट होतं असा विचार केला. केडीएमसी अन बिहार निवडणूक जवळजवळ सारख्याच वाटाव्या अशा होत्या फक्त येथे भाजपची डाळ जराशी शिजली
.
रस्त्यात गतिरोधक नाहीत याची शास्वती एखादा ठामपणे देऊ शकतो, पण रस्त्यात खड्डेच नाहीत असं जर कोण ठामपणे सांगत असेल तर तो अनाडी असतो. नितिन गडकरी याबद्धल मोदी-शाहना जास्त सांगू शकतील. 

लोकसभा निवडणूक २०१४ ने गल्लीपासून दिल्लीपर्यंत बदल घडवले; ते भाजपसाठी सकारात्मक होते. बिहार विधानसभा २०१५ ही निवडणूकाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत बदल घडवेल; भाजपसाठी नकारात्मक असतील असा अंदाज आहे.    

असो. पुन्हा एकदा नितीश-लालू अन तमाम मोदी विरोधकांचे अभिनंदन!!! मोदी-शाह यांचे सांत्वन. बाकी विनाशकाले विपरीत बुद्धी.

आले परत फिरूणी!!!

आले परत फिरूणी!!!

आपल्याकडे एक म्हण आहे, येरे माझ्या मागल्या; ह्या म्हणीचा प्रत्यय केडीएमसी मधील राजकीय परिस्थितीशी तंतोतंत जुळत आहे. केडीएमसी निवडणूक सुरू झाली तेंव्हापासून शिवसेना आणि भाजप हे ‘मित्रपक्ष’ एकमेकांना कसे नामोहरण करता येईल याचाच विचार करत होते. यासाठी ह्या दोन्हीही पक्षांनी खालची पातळी गाठली. महाराष्ट्राच्या राजकरणात (अलीकडच्या) त्यातल्या त्यात मवाळ अन नम्र नेते म्हणजे उद्धव ठाकरे अन देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जायचं, पण केडीएमसी निवडणुकीच्या निमित्ताने ह्या दोघांनीही विंनम्रता थोडीशी बाजूला ठेवली. काहीही झालं तरी केडीएमसी मध्ये सत्ता मिळवयाचीच या हेतूने दोन्ही पक्षांनी निकराची झुंज दिली. पण जनता ह्या दोघांना वेगळं पाहू इच्छित नसेल कदाचित! जनतेने शिवसेनेला मोठा भाऊ बनवलं पण बहुमत मात्र दिलं नाही आणि भाजपला पाहिलेपेक्षा मोठं बनवलं पण सत्तेजवळ काही जाऊ दिलं नाही. ह्या सगळ्यात मजा म्हणजे मागच्या वेळेस २७ नगरसेवक असलेल्या मनसेला त्यावेळेस जेवढी किम्मत नव्हती तेवढी ह्यावेळेस ९ नगरसेवक निवडून आणल्यानंतर आली! लोकशाहीची गम्मत! मनसेशिवाय एकमेकांना पराभूत तर करता येत नाही पण आता राज ठाकरे यांचे नखरे कोण सहन करणार? त्यात एकमेकांना नाटकी म्हणणार्‍या सेना-भाजप वाल्यांना राज ठाकरे कोण वाटत असतील कोण जाणे? सगळं त्रांगडं होऊन बसलेलं. मग काय ‘नैसर्गिक मित्र’ किंवा ‘जनतेचा जनादेश’ वगैरे नावाखाली पुन्हा सेना-भाजप युती!
                प्रचारात एकमेकांच्या कार्यकर्त्यांना मारामारी करायला लावणार्‍या, अन्याय होतो म्हणून राजीनामा देणार्‍या, मित्रपक्षाला गुंड म्हणणार्‍या अन काय काय गोष्टी साफ विसरल्या नेत्यांनी. मुख्यामत्र्यांनी तर ‘वाघाच्या जबड्यात घालूणी हात, मोजितो दात..’ अगदी आवेशात म्हंटलं होतं. आता वाघाने खुद्दच तशी परवानगी दिली वाटतं? इकडून सरकारला रस्त्यावर आणायची भाषा झाली होती, पण आता सगळं 5 स्टार मध्ये सेट होत आहे वाटतं.
बड्या नेत्यांचं ठीक आहे, ते सत्तेसाठी सगळं विसरतील अन पुन्हा एकत्र येतील; पण कार्यकर्त्यांचं काय? त्यांनी तर समोरच्या पक्षाला दुश्मन मानून, सगळं विसरून वैयक्तिक दुश्मण्या घेतल्या होत्या; एकमेकांना शिव्या घातल्या होत्या; पक्षासाठी वाट्टेल ते केलं होतं पण आता त्यांच्यासोबतच एकत्र बसायचं? कितपत शक्य आहे? ते सोडा, जनतेचं काय? जनतेने तर दोघांना एकमेकांच्या विरोधात मते दिली होती ना… आता ही त्यांची थट्टा नव्हे का? जनता हे विसरणार नाहीच… कॉंग्रेस-एनसीपी ने सत्तेत असताना ज्या चुका केल्या त्याच सेना-भाजप करत आहेत… अशाने जनता यांच्यावर किती दिवस विश्वास ठेवेल हे सांगता येत नाही…

error: Content is protected !!