आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Category: Short Story

तोच असे सोबती…

तोच असे सोबती…

तोच असे सोबती…  ||  मराठी कथा   ||   गुंतागुंत   || पौगंडावस्था   ||  मैत्री  || Marathi Story  || Alone

माझी त्याची ओळख घरासमोरच्या बागेत झाली. अस्मित त्याचं नाव. माझं नाव नचिकेत. मी पाचवीत वगैरे असेन, त्यावेळेस शाळा सुटली की मी त्या बागेत जाऊन बसायचो. मैदानी खेळ खेळावेत म्हणून घरचे फार आग्रही असायचे. तसे माझे फार कोणी मित्र नव्हते. म्हणजे अगदी पहिलेपासूनच. मी थोडासा मितभाषी होतो. फार कमी बोलायचो. घरी नातेवाईक आले तरीही तोच प्रकार होता. आई-बाबांशीही फार बोलायचो नाही.

अस्मित मला फार जवळचा वाटायचा. तो जवळपास माझ्याच वयाचा. अगदी थोड्या वेळात आमची मस्त मैत्री झाली होती. दिसायलाही तो खूप गोड. गोरापान, मांजरासारखे हिरवट डोळे, छोटुसं नाक अन तो गोंडस चेहरा. मला तो खूप आवडायचा. माझे बाकीचे कोणी मित्र नव्हते पण हा मात्र मित्र म्हणून सदैव माझ्यासोबत असायचा. तोच एकटा होता ज्याच्याशी मी खूप आणि मनसोक्त बोलायचो.

रोज संध्याकाळी पाच वाजता मी त्या बागेत जायचो. गुलमोहराच्या झाडाखाली एक हिरवा बेंच ठेवलेला होता. तो तिथे बसलेला असायचा. त्यालाही फार कोण मित्र नव्हते. माझ्यासारखीच परिस्थिती. तो माझीच वाट बघत तिथे बसलेला असायचा. आम्ही भेटलो की भरपूर गप्पा मारायचो. मी कधीच कोणाला न सांगायच्या गोष्टी अस्मितला सांगत होतो. मनात जे जे येईल ते ते ते मी बोलून मोकळं व्हायचो. तो मला खूप जवळचा, विश्वासार्ह वाटायचा. त्याच्याशी बोललं की मन शांत व्हायचं. तोही सगळं सांगायचा.

अस्मितचे आई-वडील त्याच्याकडे लक्ष देत नसत. त्याला मारत. म्हणून तो दिवसभर बाहेरच बसायचा. तो कोणत्यातरी महापालिकेच्या शाळेत जात असे. तो इथे येऊन बसत हे त्याच्या घरी माहीत नसायचं. दिवसभर शाळेत, संध्याकाळी इथे बागेत अन मग उशिरा रात्री घरी असं तो करायचा म्हणे!

अस्मित मला माझ्या प्रत्येक गोष्टीत मदत करत असे. माझा अभ्यास, स्पोर्ट्स, कपडे कसे घालावे असो किंवा इतर अनेक लहान-मोठ्या बाबी, त्यात तो मला सहकार्य करत असे. मी लिहीलेल्या कविताही तो लक्ष देऊन ऐकत असे. मी इतरांना माझ्या कविता सांगत नसे.

रोज संध्याकाळी पाच ते सात आमच्या गप्पा चालायच्या. तो खूप हुशार आहे असं मला वाटायचं. पण त्याने कधीच तसं भासू दिलं नाही. कदाचित यातच त्याचं मोठेपण होतं.

काळानुरूप आमची मैत्री खुलत गेली. आमच्या दोघांच्या मैत्रित तिसरा कधी कोण आला नाही. नंतर नंतर तर मला त्याच्याशिवाय बिलकुल करमायचं नाही. सतत त्याची सोबत असावी असं वाटायचं. मनात गर्दी करत असलेल्या अनेक गोष्टी त्याच्याशी बोलून मन मोकळं करावं असं वाटायचं. तोही निमूटपणे सगळं ऐकून घेत अन त्यावर मला सल्ला देत. मी त्यासाठी कुठे गावाला जायचंही टाळायचो. माझ्या घरी, आई-बाबाला मी अस्मितबद्धल फार काही सांगितलं नव्हतं. एक दोनदा आईने मला त्याच्यासोबत बागेत बघितलं, पण ती कधी काही बोलली नाही.

आमची मैत्री नवनवे टप्पे गाठत होती. कदाचित जगात तोच एकटा होता जो मला व्यवस्थित समजून घ्यायचा. निव्वळ काळ्या पेन्सिलीने काढलेलं चित्रात त्याने रंग भरले होते. त्याच्यामुळेच माझं आयुष्य उत्साही अन मनोरंजक झालं होतं. सतत वाटणारा एकटेपणा नाहीसा झाला होता.

आता दोन वर्षे झाली होती आमच्या मैत्रीला. आम्ही हुल्लडबाजीही करायला शिकलो होतो. त्या नाल्याच्या तेथून वेगाने धावणार्‍या रेल्वेवर पाण्याने भरलेले फुगे मारायचो अन पळून जायचो, कधी लहान मुलांना चॉकलेट देऊन खुश करायचो, हमाल लोकांच्या गाडीला धक्का मारून मदत करायचो, झाडवरच्या मधमाशीच्या मोहोळाला दगड मारून पळून जायचो तर कधी दुसर्‍यांच्या लग्नाच्या वरातीत जाऊन नाचायचो. खूप मजा यायची… मला तर इतकं हलकं हलकं वाटायचं जणू मी आकाशात उडत असल्याचा भास व्हायचा.

आता आम्ही केवळ मित्र नव्हतो तर भागीदार होतो. खट्याळपणा, दंगामस्ती, लोकांची मदत या सर्व गोष्टी आम्ही मिळून करत असू. मैत्रीचे बंध अधिकच घट्ट झाले होते. मला सख्खा भाऊ किंवा बहीण नव्हती. पण तोच मला भावासारखा होता. असंही, सख्या भावाप्रमाणे तो माझी काळजीही घेत असे. मला खूप चांगला मित्र मिळाल्याचा खूप अभिमान वाटत होता.

इतके वर्षे एकटं, अभ्यासाच्या गर्तेत अन नीरसपणे जाणारं माझं आयुष्य अतिशय झगमगीत अन खेळकर पद्धतीने जात होतं. घरी गेल्यावरही मी मजेत राहत असल्याने आई-बाबा निश्चिंत होते.

नववीत असतानाची घटना असेल. मी खूप आजारी होतो. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. बरेच नातेवाईक वगैरे भेटून गेले. क्लासटीचर, शाळेतील एक-दोन मित्रही भेटून गेले पण हा अस्मित काही आला नाही. मला त्याचा खूप राग आलेला. त्याच्याशी कधीच बोलायचं नाही असं मी मनाशीच ठरवलं होतं. मी बरा झालो. बरेच दिवस बागेकडे फिरकलो नाही. मला अस्मितची आठवण येत पण मी जाणीवपूर्वक टाळत असे. मी त्याच्यावर नाराज होतो. पण एके दिवशी सहज म्हणून बागेत फिरत गेलो. त्या बेंचवर शांतपणे, एकटाच बसलेला असताना अस्मित मागून आला अन त्याने माझ्यासमोर केक ठेवला, मला गिफ्ट दिलं अन आम्ही माझ्या दुखण्यातून बरं झाल्याची पार्टी केली. माझा राग लागलीच गेला. मला समजलं की तोही आजारी होता. पण तो रोज माझी वाट बघायचा म्हणे त्या बागेत.

मला खरच स्वतःचं वाईट वाटलं. मी त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. त्याला माझी चिंता होती. पण ह्यामुळे आमची मैत्री अजूनच घट्ट झाली.

मला आठवतं, मी दहावीला असेन. आम्ही गावाबाहेरच्या एका चिल्ड्रेन पार्कमध्ये चेस खेळत बसलो होतो. तो जिंकत होता, पण मीही हार मानणार नव्हतो. आम्ही खेळत असताना एक मुलगी समोर बसलेली दिसली. आमच्यापेक्षा थोडीशी मोठी होती. आमची पैज लागली… त्या मुलीला जाऊन कीस करायचा… मला खरं तर प्रचंड भीती वाटत होती. ही कल्पना अस्मितची होती. तो आग्रह करत होता. पण कोणाला जर समजलं किंवा त्या मुलीने कोणाला सांगितलं तर कठीण होणार होतं. पण मलाही ‘ते’ करावंसं वाटत होतं.

आधी अस्मित गेला. तो तिला काहीतरी म्हणाला अन त्या मुलीने त्याला लागलीच कीस केलं. मला आश्चर्य वाटलं. चित्रपटात दाखवतात तसं माझ्या डोळ्यांसमोर घडलं होतं. माझ्या अंगातून घाम गळत होता. शरीर मात्र थंडगार पडलं होतं. तो हसत, आनंदाने उड्या मारत माझ्याकडे आला अन म्हणाला, “आता तुझी बारी…”

मला भीती तर वाटत होती पण खूप उत्सुकता तर होती. अस्मित म्हणल्याप्रमाणे त्याला ‘ते’ करण्यात खूप मजा आली होती. पण तो खूप हँडसम दिसायचा. त्याच्याकडे कोणतीही मुलगी आकर्षित झाली असती. पण मी फार काही चांगला नाही दिसायचो. पण किल्ला लढवणे तर भाग होतं.

मी हळूहळू त्या मुलीजवळ गेलो. तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. तिच्या खांद्याला हात लावला तशी ती माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. मी तिच्याकडे बघून हसलो. ती उभी राहताच मी तिला कीस करायचा प्रयत्न केला… तिच्यावर स्वतःला लादत होतो… पण क्षणात तिने माझ्या कानफटात लगावली. गाल लालबुंद झाले. ती रागाने माझ्याकडे बघत होती.

“how dare you? Who are you?” म्हणत होती…

नशीब की त्या वेळेस बागेत कोणीच नव्हतं. तिने कोणाला बोलवायच्या आधी मी आणि अस्मितने धूम ठोकली. तो माझ्यावर प्रचंड हसत होता. मला मात्र त्याचा खूप दुस्वास वाटत होता. त्या मुलीने त्याला स्वीकारलं अन मला नाकरलं याचा जास्त खेद होता. तो माझी खिल्ली उडवत होता.

त्या दिवसानंतर आम्ही त्या जागेवर परत कधीच गेलो नाहीत. पुढे काय झालं आम्हाला समजलं नाही, पण आम्ही तिथे परत कधीच गेलो नाहीत. मी दोन-तीन दिवस अस्मितलाही भेटलो नाही. मला त्याचा राग आला होता. पण त्या दिवशी दुपारी, आई-बाबा कामाला गेलेले असताना तो आमच्या घरी आला. आज तो पहिल्यांदाच आमच्या घरी आला होता. मी त्याला भाव दिला नाही. पण तो नेहमीप्रमाणे खेळकर मूडमध्ये होता.

मी काही बोलत नाही, त्याला भाव देत नाही हे बघून तो माझ्याजवळ आला अन म्हणाला, “मी असताना तुला कधीच कसल्याच गोष्टीची कमी पडणार नाही असं म्हणत त्याने माझा कीस घेतला…”

मला क्षणभर ओकारी आली… कसतरीच वाटलं… अत्यंत घाण… त्याला मारवसं वाटत होतं… पण क्षणात ते घडलं अन मला प्रतिक्रियाही देता आली नाही…

“हा असा करायचा असतो कीस…” असं म्हणत तो क्षणपणे निघूनही गेला.

मी रात्रभर विचार करत होतो. मला त्याचं वागणं उमगलं नाही. तो असा विक्षिप्त कधीच वागलेला नव्हता. पण आज तो असा का वागला? तो ‘तसला’ तर नाही न? शक्य नाही…

परत काही दिवस आमची भेट झाली नाही. काही दिवसांनी बागेत आमची भेट झाली. मी जरा सावधपणे अन आकसलेपणाने वागत होतो.

“त्या दिवशी काय केलस?” मी निग्रहाने विचारलं.

तो जोरजोराने हसू लागला. त्याचं हसणं थांबतच नव्हतं.

मी गंभीरच होतो. मी त्याच रोखाने म्हणालो, “तुझ्याशी मैत्री ठेवायची का नाही याचा विचार करावा लागेल…?”

तो लागलीच शांत झाला अन माझ्याकडे बघू लागला. तो नंतर म्हणाला, “तू माझा खरा अन एकमेव मित्र आहेस… तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो… तुला आयुष्यात जर कोणत्या गोष्टींची कमी वाटत असेल तर मी ती भरून काढेन… तुला त्या मुलीने स्पर्श करू दिला नाही… तुला त्यातलं काहीच कळत नाही… तू नाराज होतास… तुला सगळ्या गोष्टी ज्ञात करून देणं मित्र म्हणून माझं काम आहे…”

मी आश्चर्याने म्हणालो, “बास एवढच????”

तो ठामपणे म्हणाला, “हो… तू मला काही वेगळं समजलस का मग? मी मैत्री निभावतो… तुझ्यासाठी काही पण…”

मग मीही हसायला लागलो. त्याने केवळ माझ्यासाठी ‘तो’ प्रकार केला आणि तो ‘तसला’ नाही हे ऐकून बरं वाटलं.

रात्री बराच विचार केला. अस्मितचा स्वभाव माझ्यापेक्षा भिन्न होता. अगदी उलटा. माझ्यात जे नव्हतं ते त्याच्यात होतं. मित्र म्हणून तो माझ्यासाठी काहीही करायला तयार होता. त्याची ही मैत्री बघून मला खरंच अतिशय आनंद होत होता. जगात कोणीतरी माझ्यासाठी कायम उभा आहे ही जाणीव दृढ झाली होती. मला भाऊ असता तर त्यानेही माझ्यासाठी इतका विचार केला नसता. अस्मित मला त्याच्या आयुष्यातील आमुलाग्र स्थानी समजतो हे मला समजलं होतं. त्याच्या घरातील वातावरण असेल किंवा अजून काही, तो मला खूप मानत होता.

आम्ही तो प्रसंग विसरूनही गेलो. पुन्हा पहिल्यासारखे कुचाळक्या करत गावभर फिरत होतो. आमची मैत्री आता आमच्या दोघांच्या आयुष्यात सर्वोच्च ठिकाणी गेलेली होती.

दहावीचं वर्ष होतं. खूप हौस, मजामस्ती झाली होती. परीक्षाही आलेल्या. ज्याची भीती होती तेच झालं. मी दहावीत नापास झालो. आई-बाबा प्रचंड संतापले. त्यांनी माझ्या संगतीचा, माझ्या सर्व सवयींचा अन आयुष्याचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. काहीच दिवसांत त्यांना माझं समांतर आयुष्य समजलं होतं.

मला डॉक्टर बोरफळे यांच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भारती केलं होतं. डॉक्टर बोरफळे psychiatrist होते. ते मला वेडा समजत होते. माझ्या समांतर आयुष्यात गुप्तहेरी, हेरगिरी केल्यानंतर माझ्या आई-बाबांना ज्या गोष्टी समजल्या त्यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की मला मानसोपचारतज्ञाची गरज आहे.

ते म्हणतात की “अस्मित” नावाचा मुलगा अस्तीत्वात नाहीच…! हे कसं शक्य आहे? गेली चार-पाच वर्षे मी ज्याच्यासोबत आयुष्य काढतो आहे तो मुलगा, मनुष्यप्राणी अस्तीत्वात नाही…? मग मी कोणाशी बोलायचो…? कोणासोबत खेळायचो…? माझा डॉक्टर आणि इतर लोकांवर विश्वास नव्हता. अस्मित माझा जवळचा मित्र आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.

डॉक्टर बोरफळे यांनी याचं काहीतरी विश्लेषण केलं होतं म्हणे… मी लहानपणापासून एकलकोंडा होतो. मला बोलायला, खेळायला व्यक्त व्हायला कोणीच नव्हतं. आजी-आजोबा-भाऊ-बहीण नाही. आई-बाबा दिवसभर कामावर जायचे. मी अबोल होत गेलो. माझ्यासोबत कोणीही मैत्री करत नव्हतं. मी कोणाशी बोलू शकत नव्हतो. माझ्या मेंदूचा मानसिक विकास थांबला. मग माझ्या मेंदूनेच एक प्रती “मी” उभा केला. एक मित्र म्हणून. तो फक्त माझ्या मेंदूने “consider” केला होता. मला “मी” जसा हवा आहे तसा अस्मित बनत गेला. कारण माझा मेंदुच त्याला घडवत होता. तो फक्त मला दिसायचा, माझ्याशी बोलायचा अन सर्वकाही माझ्याशी त्याचं विश्व मर्यादित होतं. त्यामुळेच तो मला कधी दुसर्‍यांसोबत दिसला नाही. कारण माझा मेंदू मलाच मूर्ख बनवत होता. तो मला ह्या भ्रमातून बाहेर येऊ देत नव्हता की “अस्मित” खोटा आहे. त्याचं चांगलं दिसणं, भाडभड बोलणं, हुशार असणं, हुल्लडबाजी ही मला मनातून हवी होती. ती मी स्वतःहून, माझ्या ‘नचिकेत’ या प्रतिमेसह, स्वभावासह ते करू शकत नव्हतो. माझ्या इच्छा असल्या तरी त्या मी पूर्ण करू शकत नव्हतो. माझं व्यक्त होणं बंद झालं होतं. त्यामुळेच मेंदूने “अस्मित” उभा केला अन त्याच्याकडून सर्व घडवून घेतलं. मी सतत मीच निर्माण केलेल्या ‘आवरणाखाली’ वावरत होतो.

मला ‘मीच’ सर्वात जवळचा मित्र होतो. दुसरे सजीव मित्र माझ्याजवळ येत नव्हते, त्यांची माझी मैत्री होत नव्हती म्हणून मीच स्वतःचा सर्वोत्तम मित्र बनलो होतो. माझ्याशिवाय माझा कोणीच मित्र नव्हता. म्हणूनच मी आजारी असलो की ‘अस्मित’ही आजारी असायचा. माझ्या मनाची अवस्था त्याच्या आयुष्य बनली. पण एक क्षण आला जेंव्हा माझ्याच मेंदूला अस्मित खरा की खोटा यातील भेद समजत नव्हता. तो समजेना झाला म्हणून मी अस्थिर झालो.

आता गेली सहा महीने झाले माझ्यावर ह्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. ते डॉक्टर लोक रोज नसलेल्या ‘अस्मित’ बद्धल बोलत असतात. ते ‘अस्मित नाही’ असं माझ्या मनावर बिंबवत असतात. अस्मित असो किंवा नसो, माझ्याशी त्याचं काही देणं घेणं नव्हतं. मीच माझा सर्वोत्तम मित्र होतो हे तरी मला समजलं होतं. जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत मीच माझा मित्र राहणार होतो हे मला लक्षात आलं होतं. मग ते रूप आज अस्मित सारखं असलं तर उद्या अन्य कोणाचं असतं… पण माझा मित्र मीच…

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित || copyrights @ abhishek buchake

latenightedition. in   }{  @Late_Night1991

कल्याण

कल्याण

कल्याण

मराठी कथा  ||  Marathi Story  ||     पौगंडावस्था   ||  वैफल्य  ||   चुकलेली वाट ||  #मित्र

आज माझा मुलगा अंगद शाळेत जाणार नाही असा हट्ट करत होता. सहावीत आहे तो. असं कधी करायचा नाही पण आज काय झालं ते कळायला मार्ग नव्हता. त्याला माझ्या बायकोने रागावून शाळेत जायला भाग पाडलं तरीही तो जाण्यास तयार नव्हता. आजीने समजावून सांगायचा प्रयत्न केला तरीही तो कोणाचं काहीही ऐकायला तयार नव्हता. मी हे सगळं शांतपणे पाहत होतो. मनात एक अडगळ असते, कुठेतरी तळघरात… तिथून काहीतरी बाहेर येऊन समोर उभं राहतं अन आपण काही क्षण स्तब्ध होतो. मला माझे शाळेतले दिवस आठवत होते, त्या जुन्या आठवणी अचानक डोळ्यासमोर ठळकपणे उभ्या होत्या.

मी अंगदला शाळेत जाऊ नकोस असं सांगितलं. त्याला त्याच्या आजोबाबरोबर चित्रपट बघायला जाण्याची परवानगी दिली. यामुळे माझी बायको माझ्यावर प्रचंड संतापली, असले लाड पुरवू नका, भलत्या हट्टाला शरण जाऊ नका असं म्हणत होती. पण काहीही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. बायकोलाही माझं वागणं वेगळं वाटल्याने तीही शांत झाली.

मी त्या दिवशी कामावर गेलो नाही. मी ज्या शाळेत शिकलो तिथे गेलो. बर्‍याच दिवसांनी लक्ष देऊन मी त्या शाळेकडे बघत होतो. कितीतरी बदल झाले होते. अनेकदा मी शाळेसमोरून जात-येत असेन, पण तेथील बदल मला कधी इतक्या प्रकर्षाने दिसले नव्हते जितके आज दिसत आहेत.

शाळेसामोरील एका झाडाखाली बसून होतो मी. डोळ्यासमोर कल्याणचा चेहरा सतत दिसत होता. आठवणीचा पेटारा उघडल्या गेला होता, त्यातून नेमकं काय काय बाहेर निघेल याची शाश्वती नव्हती.

कल्याण! माझा शाळेतील मित्र. पाचवीपासून तो आमच्या वर्गात होता. आम्ही एकाच बाकावर बसायचो. तो माझा चांगला मित्र झाला होता.

सहावीत असतांनाची घटना ती! कल्याणने अचानक शाळेत येणं कमी केलं होतं आणि हळूहळू ते बंदही झालं. त्या काळी काही फोन नव्हते की लागलीच एकमेकांचे हालहवाल विचारता यावेत असं.

एके दिवशी वर्ग चालू असताना कल्याणचे वडील वर्गात आले आणि म्हणाले, “कल्याण आहे का? त्याला भेटायचं आहे…”

कल्याण तर शाळेत नव्हताच. शिक्षकांनी त्याचा हजेरीपट त्याच्या वडलांना दाखवला. त्याची गैरहजेरी खूप होती. त्याच्या वडलाला धक्का बसला. ते म्हणाले की कल्याण तर शाळेत जाण्यासाठी रोज घरातून बाहेर पडतो. मग मी त्याचा मित्र म्हणून मला बोलावून त्याची चौकशी केली. मलाही काहीच माहिती नव्हतं. तो शाळेत का येत नसावा याबद्दल मलाही तितकस माहीत नव्हतं. पण त्याच्या स्वभावात झालेला बदल मला जाणवत होता.

काही दिवसांनातरची गोष्ट जी माझ्या मनात कायमची लक्षात राहिली. त्या दिवशी शाळेत कल्याणला घेऊन पोलिस आले होते. सोबत त्याचे वडीलही होते. आमच्यासमोर हा प्रकार घडत होता.

कल्याण शाळेतून गायब असतो हे कळताच त्याच्या वडलांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरू केलं होतं. ते त्याचा पाठलाग करायचे तेंव्हा त्यांना कळलं की काही टपोरी मुलं त्याला त्रास देत होती. ती टपोरी मुलं याचं दफ्तर ताब्यात घ्यायची आणि दिवसभर त्याची टिंगल टवाळी करायची, त्याच्याकडून आपली लहान-मोठी कामे करून घ्यायची. ती टपोरी मुलं चांगल्या वळनाची नव्हती. त्यांनी कल्याणला धमकी दिली होती की त्याने जर हे कोणाला सांगितलं तर ते त्याला घरात घुसून मारतील. सहावीत असणार्‍या मुलाला खर्‍या-खोट्याची काय ती जाणीव असणार. तो घाबरून काहीच बोलला नाही आणि सर्व सहन करत होता. कल्याणच्या वडलांनी त्याचा पाठलाग करून सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि थेट पोलिसांना सांगून त्या टपोरी पोरांना पकडून दिलं.

पोलिसांनी आणि कल्याणच्या वडलांनी शाळेत सगळा प्रकार सांगितला आणि अजून कोण मुले यात अडकू नयेत याची काळजी घ्यायला सांगितली.

त्या दिवसानंतर सगळी मुलं कल्याणकडे वेगळ्याच नजरेने बघत होती. तो आमच्या सगळ्यात वेगळाच वाटत होता. तो अजूनही माझ्याच शेजारी बसायचा. पण आता त्याचा स्वभाव पूर्णतः बदलला होता. तो पहिलेसारखा राहिला नव्हता. त्याच्या वागण्यातही थोडासा टपोरीपणा आल्यासारखा वाटत होता. फार विक्षिप्त झाला होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून कोणाचीही कॉलर पकडून मारामारी करायचा. आम्ही पहिलेसारखे फार बोलत नव्हतो. त्याचं अभ्यासातही लक्ष नसायचं. सतत कसल्यातरी गहन विचारात तो असायचा. दुसर्‍यांचे डबे जबरदस्तीने किंवा चोरून खायचा. तो कल्याण राहिला नव्हता.

काही दिवसांनी त्याने मला काही गोष्टी सांगायला सुरू केल्या तेंव्हापासून तर मला त्याची खूपच भीती वाटू लागली. त्याने मला सांगितलं की त्याच्या आईवर कोणीतरी करणी केली आहे. त्यांच्या घरात कुठेही लिंबू-मिरची-हळद असल्या गोष्टी सापडतात. त्याची गुरांसारखी ओरडायची म्हणे, उगीच रडायची. तिला जिथे-तिथे किडे-पाली अन साप दिसायचे म्हणे, जेवणाचं ताट ती फेकून मारत म्हणे. तिने कल्याणलाही फेकून मारलं होतं म्हणजे ज्याच्या कपाळावर झालेल्या जखमा त्याने मला दाखवल्या. तिच्यावर कोणीतरी काळी जादू केलीय असं तो मला सांगायचा. मला तेंव्हा यातील फार काही माहिती नव्हतं, पण मला खूप भीती वाटत होती. कल्याण जेंव्हा माझ्याकडे बघायचा तेंव्हा मला त्याची खूप भीती वाटत असे. त्याचा वर्ण काळा होता अन पिंगट डोळे होते. त्याने केस वाढवल्याणे तो मला भयावह वाटे. मला तो आता नकोसा झाला होता. तो कल्याण नाहीच असं मला वाटे.

एकदा त्याने एका मुलाच्या अंगावर लिंबू-मिरची अन कुंकू टाकलं होतं. मुलं त्याला घाबरत होती. मग मी सरांना सांगून माझी बसायची जागा बदलून घेतली. माझा त्याचा संपर्क कमी झाला होता, पण एकाच वर्गात असल्याने आमची भेट होत असे. पण मी त्याला टाळत होतो.

काही दिवसांनी तो स्वतः माझ्याजवळ आला आणि गळे पडून रडत-रडत म्हणाला, “माझी आई मेली, तिला मारलं… करणी केली होती कोणीतरी… सगळं रक्त बाहेर पडलं तिचं…”

आमची वये कोवळी होती. न त्याला व्यवस्थित व्यक्त होता येत होतं न मला त्याला सावरता येत होतं. बास तेवढाच शेवटचा मला खराखुरा कल्याण भेटला होता. त्यानंतर तो पुर्णपणे बिथरला. तो वाट्टेल तसा वागत होता. वर्गात येणारा प्रत्येक शिक्षक त्याला तुडवत असे. तोही निगरगट्ट असल्याप्रमाणे ते सगळं सहन करत. त्याचं आयुष्य चुकीच्या मार्गाने जात होतं.

त्यानंतर माझा व त्याचा संबंध संपला होता. तो शाळेतही कधी दिसला नाही. एकदा नववीत असताना मला तो बाहेर एका रस्त्यावर भेटला. आता तो अत्यंत टपोरी दिसत होता. चेहर्‍यावर निरागसपणा लवलेशही नव्हता. त्याने मला ओळखलं, पण मी नाही.

त्याने मला त्याच्या नवीन मित्रांशी भेट घालून दिली. ती मुलही तशीच टपोरी दिसत होती. त्याने मला आवर्जून सांगितलं की, ही तीच मुलं आहेत जी त्याला सहावीत असताना त्रास द्यायची. माझी तर भंबेरी उडाली. मला भीती वाटत होती. कल्याण मला समोरून म्हणाला, “घाबरू नकोस आम्ही त्रास देणार नाहीत तुला, पण काही पैसे असतील तर देतोस का…?”

दफ्तरात होते तेवढे पैसे मी त्याला देऊन टाकले. त्याने मला मिठी मारली आणि जाऊ दिलं. मग मी दोन-तीन दिवस शाळेत गेलो नाही. नंतर काहीतरी कारण करून मी आई-बाबा ला घेऊन शाळेत जात होतो.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट, मला पेपरमधून कळलं की कल्याणचा encounter झाला आहे. तो अट्टल गुन्हेगार झाला होता आणि पोलिसांनी त्याला ठार मारलं होतं. मी ती बातमी वाचून बधिर झालो होतो. एकेकाळीचा माझा जवळचा मित्र, आज त्याने काय करून घेतलं…? चुकत गेलेला रस्ता सतत चुकतच गेला अन त्याचा अंत असा भयावह अन दुर्दैवी झाला. चांगल्या घरातला मुलगा असा…

त्याच्या आयुष्यात क्रमाने घडलेल्या घटना त्याच्यात संक्रमण घडवत गेल्या. दुर्दैवाने प्रत्येकवेळेस ते बदल नकारात्मकच होते. एक चुकीचं वळण त्याच्या आयुष्यासाठी इतकं घातक ठरलं. रस्ता चुकायला नको आणि त्यात वाटकरी तर अजिबात चुकायला नको… सगळं नेस्तनाबुत होतं…

सगळ्या घटना डोळ्यासमोरून जात होत्या. मन अस्थिर झालं होतं. शाळेचा बदललेला परिसर बघत मी बदललेला काळाचा ओघही बघत होतो. मन अतिशय खट्ट झालं. खिशातील सिगारेट काढली; त्या धुराबरोबर, त्या झुरक्याबरोबर सगळं विसरून जाणार होतो. मी सिगारेट पेटवणार तितक्यात शाळेतील काही मुले माझ्यासमोरून जात असताना मी बघितलं. माझं मलाच चूक वाटलं. मी ती सिगारेट फेकून दिली. त्या मुलांसमोर सिगारेट ओढणे मला अनैतिक वाटलं.

रात्री घरी गेलो. अंगद चित्रपट बघून अतिशय आनंदित झाला होता. मला बरं वाटलं. शाळेचा ताप त्याच्या डोक्यात नव्हता. जेवण वगैरे झाल्यावर मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हंटलं की, कधीही कसलीही अडचण आली तर तुझा बाप कायम तुझ्यासोबत असेल… तू चूक असलास तरीही…

मी इतक्या गंभीरपणे काय सांगतोय अशा आश्चर्यचकित नजरेने अंगद माझ्याकडे बघत होता.

अडचण कसलीही येऊ देत पण कितीही सोपा वाटला, तरी आपल्याला योग्य मार्ग कोणता हे आपल्याला निवडता आलं पाहिजे. लहानपणी, तुझ्याएवढा असताना माझा एक मित्र असाच चुकला होता, तोही शाळेत जायला नको म्हणायचा.. त्याचं वाईट झालं नंतर… तू शाळेत जायला का नको म्हणतोस यालाही काही कारणे असतीलच… ती काहीही असोत, पण एकमेव मीच तुला त्यातून बाहेर काढून योग्य मार्गावर नेऊ शकतो. एकदा वळण चुकलं की मग खूप त्रास होतो.

अंगद एक-दोन दिवस शाळेत गेला नाही. पण त्या रात्री त्याने मला सत्य सांगितलं. त्याने मला ते सांगितलं यातच माझा विजय होता. त्याचं कल्याण व्हावं आणि कल्याणसारखं होऊ नये यासाठी मलाच काळजी घ्यावी लागणार होती. त्याला शाळेतीलच काही मुलं त्रास देत होते. ही गोष्ट त्याने सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. मला त्याच्यात कल्याण जन्म घेताना दिसत होता. पण मी ते कदापी होऊ देणार नव्हतो. कदापी नाही… माणसाने चुकांतून शिकावं, अनुभावातून शहाणं व्हावं…

मी अंगदच्या शाळेत जाऊन योग्य त्या गोष्टी केल्या. त्यानंतर अंगदला त्याबद्दल विचार करायला वेळ भेटू नये अशी सोय केली. कल्याणच्या आयुष्यात ज्या चुकीच्या घटना घडल्या त्या अंगदपासून कशा लांब राहतील यासाठी मी सतत दक्ष होतो…

अंगद योग्य मार्गावर राहिला. मी त्याला मुकलो नाही. त्याच्यासोबत कायम उभा होतो. कदाचित कल्याण नावाचा धडा माझ्या आयुष्यात आला नसता तर माझ्या मुलाला चुकीच्या व अज्ञात मार्गावर जाण्यापासून मी रोखू शकलो नसतो. कधीकधी अंधारातील सावल्याही बरचकाही शिकवून जातात…

===समाप्त===

सर्व हक्क सुरक्षित @ अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

पाटील पेटले

जोकर – भयकथा : भाग २

जोकर – भयकथा : भाग २

मराठी कथा  ||  भयकथा  ||  Horror Story   ||  Fear Factor  ||  भय  ||  बागेतील शापित जोकर ||  अतृप्त

सकाळी जाग आली तेंव्हा बायको माझ्यावर प्रचंड संतापली होती.

उठल्यावर माझं डोकं खूप दुखत होतं. मळमळ होत होती. बायकोने लिंबू-पाणी माझ्यासमोर आणून आपटलं अन बडबड सुरू केली.किती प्यावं माणसाने? जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी. रात्रभर ओकत होतात. वाट्टेल ते बरळत होता. ड्यूटी सोडून असं पिऊन पळून आलात तर आहे तीही नोकरी जाईल. मग राहावं लागेल उपाशी. काहीतरी वाटू द्यात. उद्या साहेबाने काढलं कामावरुन तर कुठे जाणार तोंड घेऊन. काय अवतार होता रात्री… बंद करा हो घेणं आता तरी…

तिची कटकट चालू असताना मला रात्रीचा प्रसंग हलकासा आठवला. मला तो स्वप्नाप्रमाणे वाटत होता. एखाद्या भीतीदायक स्वप्नाप्रमाणे! ते खरं होतं की भास मला कळत नव्हतं. पण त्याचं ते विचकट खिदळणे अजूनही कानात घुमत होतं अन त्यानेच माझी शुद्ध आली… मी पुन्हा घाबरलो अन बायकोला सगळं एका दमात सांगितलं.

तिने ते ऐकून घेतलं अन मलाच शिव्या देत म्हणू लागली, तुमचं दारू घेणं काही आजचं नाही मला. आणि आता असल्या थापा का मारताय??? नोकरी सोडायचा विचार आहे का? मग भागणार कसं हो? मी तिला खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला पण तिने काही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मीही प्यायलेलो होतं हे खरं होतं. कारण आठवड्यातून दोन-तीनदा पिऊनच मी रात्रीची ड्यूटी करायचो. पण काल जे झालं ते खरं होतं याची मला खात्री होती.

मी चटकन उठलो अन तडक साहेबांकडे गेलो. मी रात्रीची ड्यूटी बदलून सकाळची वेळ देण्याची मागितली. त्यांनी कारण विचारलं. माझी इच्छा नव्हती पण हो-नाही करत मला सगळं खरं सांगावं लागलं अन साहेबही भयंकर संतापले.

संजय एकतर दारू पिऊन ड्यूटीवर येता. गरीब माणूस म्हणून मी कधी काही म्हंटलं नाही. पण असला मनमानी कारभार मला नका सांगू. सकाळची वेळ पाहिजे म्हणून असल्या बाता काय मारता… आणि हेबघा, असली कथा जर बाहेर कुठे ऐकवलीत तर माझ्याइतका वाईट माणूस नाही कोण. मला असल्या अफवा नकोत… चार पैसे वाढवून घेण्याचे नाटकं आहेत ही हे काही मला समजत नाही का? हे जर कुठे सांगितलात तर तुमची आहे ती नोकरी तर जाईलच पण गावात दुसरीकडे कुठेही काम मिळणार नाही याची सोय करू शकतो मी… गपचूप काम करा… अन जरा कमी ढोसत चला रात्री… नाहीतर मी तुमच्या मानगुटीवर बसेन…

साहेबांनी माझा पानाउतरा केला. तसं रेकॉर्ड खराब असल्याने माझ्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. पण मीही मग जरा गोंधळून गेलो. काल झालं ते खरं होतं की अति दारू पिल्याने झालेला भास… पण आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. दारू पिल्यावर स्वप्नातही असला प्रकार कधी दिसला नव्हता. शेवटी विचार करून-करून मेंदू थकून गेला.

नंतर मी दिवसा बागेत जाऊन आलो. त्या जोकरकडे निरखून पाहिलं… दिवसा तरी तसं काही जाणवलं नाही. तेथे सकाळच्या ड्यूटीवर असलेल्या हरदेवला विचारलं, काही गडबड वगैरे? तो नाही म्हणाला. ह्या पुतळ्याकडे लक्ष ठेवा महाग आहे, असं मी सहज म्हणालो अन निघालो.

सूर्याच्या प्रकाशात त्या जोकरचं विदूषकी तोंड फारच अवघडल्यासारखं वाटत होतं.

त्या रात्री मी अतिशय सावधपणे कामावर जायचं ठरवलं. दारूला तर स्पर्शही केला नाही, शिवाय जवळ हनुमान चाळिसाची लहानशी पुस्तिका घेतली अन एक रुद्राक्ष माळही. साडेदहा वाजता मी त्या बागेच्या गेटच्या आत पाऊल टाकलं. मन थरथर कापत होतं. काय होईल ह्या भीतीने हाता-पायाला घाम सुटला होता. गेल्या-गेल्या पुतळ्याकडे बघितलं. तो सामान्य होता. दिवसापेक्षा थोडासा भेसूर वाटत होता इतकच.

मनात भीती होतीच, पण सत्य की भास यात अडकल्याने मीही जरा साशंक होतो.मी रात्रभर अतिशय सावध होऊन फिरत होतो. स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता असल्याने डोळ्यात तेल अन कानात प्राण आणून मी संपूर्ण बाग फिरत होतो. पण माझं पूर्ण लक्ष त्या जोकरच्या पुतळ्याकडे होतं. अधून-मधून मी त्याच्याकडे एकटक बघायचो.

वार्‍याने पानांची साधी सळसळ झाली तरी काळीज थरथर कापायचं अन पोटात धस्स व्हायचं. पक्षांचे आवाज अन वाळलेल्या पानांच्या कचर्‍यातून सरपटणार्‍या प्राण्यांमुळे होणारे आवाज मनात नको नको त्या शंका उपस्थित करायचे. पण मला तेंव्हाही वाटत होतं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेऊन आहे आणि संधी मिळताच ते माझ्यावर झेपावेल.

हातात हनुमानचाळिसा घेऊन मी फिरत होतो. गळ्यात रुद्रक्षांची माळही होती. त्या रात्रीच्या घटनेने किंवा भासाने मी कधी नव्हे ते देव-धर्माच्या वाटेला गेलो होतो. ती संपूर्ण रात्र कडेकोट जागून पहारा देण्यात गेली. काहीच झालं नाही. तो जोकराचा पुतळा तसाच्या तसा होता. पण त्याच्या डोळ्यात बघितलं की ते हिरवट गहिरे डोळे अंगाचं पाणी-पाणी करायचे.

नंतरचे काही दिवसही सामान्य पण दडपणातच गेले. रात्रभर घाबरत अन अखंड सावध राहण्यात वेळ निघून जायचा. सकाळची सोनेरी सूर्यकिरणे मदतीला घवून आलेल्या देवदूतांप्रमाणे वाटायची. असं वाटायचं जणू काही उंदीर-मांजर पकडापकडीचे खेळ चालू आहेत. तो माझ्या मागावर आहे आणि काहीतरी हेतु ठेऊन आहे असं वाटायचं. मधूनच त्याचं ते ठेंगणं रूप, तो अवतार, तो फाकलेला जबडा आठवायचा अन मन विषन्न व्हायचं. मनातून सतत असं वाटायचं की ते जोकर माझ्या जीवावर उठलं आहे.

मनातील भीती जात नसल्याने मी दुसरी नोकरी शोधत होतो. दुसरी नोकरी मिळताच येथून कायमची सुटका करून घेता येणार होती. आयुष्यात इतक्या सावधपणे नोकरी कधीच केली नसेल.

मध्यंतरी एका रात्री बागेतून काठी वाजवत फिरत असताना एक प्रसंग घडला. मी ठक__ठक अशी काठी वाजवत संपूर्ण बाग फिरत होतो. काठीचा आवाज येताच एक मांजर समोर येऊन उभं राहिलं. त्या काळ्या रात्री काळंभोर मांजर समोर आलं. बागेच्या बाहेरून कुत्र्यांचे मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. मी मनातून खूप घाबरलो. त्या मांजराचे घारे-हिरवे-पिवळे डोळे त्या रात्री खूप भीतीदायक वाटत होते. ते मांजर माझ्या पाठीमागे फिरत होतं. मी जात होतो तेथे ते यायचं. मी त्याला हाकललं तरीही चित्रविचित्र आवाज करत, गुरगुरत ते माझ्यासोबत चालायचं. मग त्या गर्द झाडीच्या वाटेतुन, ट्रॅकवरुन जात असताना मधूनच लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. ते हसणं सामान्य वाटत नव्हतं. कोणीतरी मला चिडवत आहे, माझ्यावर संतापून आहे असं ते हास्य होतं. मी हनुमान चाळिसा काढून मोठ्याने वाचू लागलो. तो आवाज एक-दोनदाच आला.

त्या रात्रीही माझी गाळण उडाली होती. पण खात्री पटली की ही जागा आता शापित झाली आहे, पहिलेसारखी राहिली नाही. ते जोकर याला कारणीभूत आहे का दुसरं काही, ते मला समजत नव्हतं. बागेत कोण हळूच एखादा मुडदा गाडला असेल, किंवा पलीकडे वाहणार्‍या नाल्यात तर नेहमी काहीतरी मेलेलं असतच; कदाचित त्याचा आत्मा भटकत असेल, असे नाही नाही ते विचार मनात येत.

तो हसण्याचा आवाज ऐकून मला काहीतरी आठवलं अन मी धावत त्या जोकरच्या पुतळ्याकडे गेलो. पुतळा जागेवर आहे का हे बघायला. मी लांबूनच तो पाहणार होतो. पुतळा तेथेच होता. पण आज उत्तररात्रीच्या शुष्क प्रकाशात तो पुन्हा भयावह वाटत होता. त्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेला लहानसा पिवळ्या दिव्यामुळे त्या पुतळ्याची सावली समोरच्या बाजूला पडत होती. ती सावलीही मला खूप भयानक वाटली. खासकरून त्याची हातात हात घेतलेली कृती अन चेहर्‍यावरील हिशेबी भाव यामुळे तो जोकर विनोदी न वाटता खूप बेरकी, घातकी अन कपटी वाटायचा. मला त्याचा खूप राग आला. मी दूर उभा होतो. त्याला चार शिव्या हासडून मी पुन्हा दुसरीकडे गेलो. तशा थंडीत, रात्रीच्या वेळी अन आडवाटेला कसलाही मानवी आवाज हा अशक्यच होता. अन तो आवाज आला की अंगावर काटा यायचा.

दूरवरून येणारे गाड्यांचे आवाज काने तृप्त करत अन मानवी वस्तीची खूणगाठ सांगत. पण कितीही केलं तरी मी एकटाच तेथे असायचो ज्याचं दडपण मला यायचं.

त्या रात्रीचा लहान मुलाच्या हसण्याच्या आवाजाचा प्रसंग मला अजूनच सावध करून गेला. मी आता अखंड सावधपणे फिरायचो. दरम्यान, मी त्या जोकरची इकडे-तिकडे चौकशी केली तेंव्हा समजलं की तो जोकराचा पुतळा एका सर्कसचा आहे. सर्कसचा मारवाडी मालक कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करून मेला अन त्याच्या एक-एक वस्तु लिलाव करून विकून टाकल्या. त्यात हा पुतळा तेथून कोणीतरी विकत घेतला अन ह्या उद्यानाला गिफ्ट म्हणून दिला. त्या पुतळ्याचा इतिहास फार काही बरा नव्हता. आणि ही गोष्ट मला अजून भयभीत करायला पुरेशी होती.

दोन-चार दिवसात मला दुसरीकडे नोकरी लागणार होती. बँकेच्या बाहेर वॉचमन म्हणून काम मिळेल अशी शक्यता होती. पगारही बरा होता. जीवाला चोर-दरोडेखोर यांपासून धोका असला तरी कायमची दहशत पाठ सोडणार होती. कसेबसे चार-सहा दिवस काढावे अन मोकळं व्हावं असं ठरवलं.

त्या रात्री मी शांतपणे उद्यानाच्या गिरट्या घालत होतो. उजव्या हातात काठी, डाव्या हातात हनुमानचाळिसा होती. मी शांतपणे फिरत असताना अचानक पोटात कळ लागली. आज पाहुणे आले म्हणून घरी बोकड कापलं होतं. चापून खाल्लं! पण आता फिरताना पोटात कळ येत होती. मी कंट्रोल करत फिरत होतो पण काही केल्या कंट्रोल होईना. शेवटी बागेच्या कोपर्‍यात असलेल्या स्वच्छतागृहात जायच्या हेतूने मी तिकडे वळलो. घाईघाईत तिकडे गेलो. पोटातून जोराची घंटा वाजत होती. मग मी धावतच तिकडे गेलो. स्वच्छतागृहातील अस्वच्छता कपड्यांना लागू नये म्हणून मी गडबडीने वरचे कपडे काढून आत गेलो.

मोकळं होऊन बाहेर आलो तेंव्हा समोर काढून ठेवलेले कपडे कोठेच दिसेनात. मग लक्षात आलं की मी हातातील बॅटरी, काठी, हनुमानचाळिसा पुस्तिका अन गळ्यातील रुद्राक्ष माळ काढून ठेवली होती. गडबडीत कसलच भान राहिलं नव्हतं. ते सगळं कुठेतरी गायब आहे म्हणजे काहीतरी गडबड होती. धोका होता? मन बेभान होऊन धावू लागलं. मी आत गेल्यावर कोणीतरी येऊन गेलं होतं. कोण? इतक्या रात्रीचं कोण? खरं तर उत्तर पहिल्या क्षणाला मनात आलं होतं पण मन-मेंदू ते मानायला तयार नव्हते.

रात्रीचे बारा वाजून गेले असावेत. मी कान टवकारून प्रत्येक ध्वनी ऐकू लागलो. अंधारात डोळे रोखून काहीतरी शोधत होतो. मला समजलं होतं की हे सामान्य नाही. तो जोकरच हे करत असणार. माझ्या मनातील शंका क्षणात खरी ठरली. आसमंतातून दाही दिशांतून विक्षिप्त हसण्याचा आवाज येत होता. मला तो आवाज परिचित होता! पहिल्या रात्री तोच आवाज माझा पाठलाग करत होता. अंगावर शहारा आला. आता काहीतरी अघोरी होणार हे मी जाणलं होतं. माझ्या डोळ्यांतून पाणी येत होतं. मी धावायचा प्रयत्न करणार पण पायात अवसानच नव्हतं. समोरच्या झाडीतून, अंधारातून एक आकृती येताना मला दिसली. मी एकटक तिकडे बघत होतो. फार विलंब लागला नाही.

ती आकृती माझ्याकडे हात पसरून म्हणाली, मी आलो… आज तर यावच लागेल… चल…तोच… जोकर… त्या रात्री दिसलेला… दुर्दैवाने तो भास नव्हता… तोच बुटका देह, विद्रूप चेहरा, रक्ताळलेला, लांब जबड्यातून बाहेर आलेले पिवळसर सुळे, रुंद कपाळावर गडद काळ्या भुवया अन तीच घातकी हिरवट नजर… माझी भंबेरी उडाली… तो विचकट हसत माझ्याकडे येत होता.

मी स्वतःला सावरत पळू लागलो तसा तो अजूनच आनंदाने अन विक्षिप्त हसत होता. तो शांतपणे माझ्यामागे चालत येत होता. मी त्या उद्यानात सैरावैरा धावत होतो.

सगळे दिवे अचानक बंद झाले. आकाशातून येणारा प्रकाशही नव्हता. आभाळ दाटलं होतं. थंडगार वारं अंगावरच्या घामाला स्पर्शून जात होतं. मागे वळून बघितलं तर त्याचे ते लाल मोजे घातलेले हात लांब-लांब होत माझ्याकडे येत होते. मी ठेचकळत होतो, धावत होतो पण थांबत नव्हतो. समोर झुडुपा-झाडांची गर्दी होती. मी त्या कोपर्‍यात जाऊन बसलो. तोंड दाबून रडत होतो.

तो हसण्याचा आवाज अचानक थांबला. मी काही क्षण शांत बसलो अन मान बाहेर करून अंदाज घेऊन लागलो तेंव्हा मला काहीच दिसलं नाही. अचानक पाठीमागून, त्या झुडुपांच्या अंधारातून एक थंडगार हात माझ्या डोक्यावर आला अन पुन्हा तो थंडगार आवाज,

‘तू वाचू शकत नाहीस आज… माफ कर… चल…’

तो माझ्या बाजूलाच होता. चेहर्‍यावर अभद्र भाव असले तरी तो चेहरा हसरा ठेवत होता. त्याचे हिरवट डोळे माझ्यावर गाडले गेले होते. त्याला इतक्या जवळून पाहून माझी वाचा बसली. त्याचा तो थंडगार हात माझ्या डोक्यावरुन खांद्यावर अन गळ्याकडे सरकू लागला तसा मी सारी ऊर्जा एकवटून मोठ्याने किंचाळत बाहेर पडलो. माझा आवाज बाहेर जाऊन उपयोग नव्हता. मदतीला कोणीच येणार नव्हतं.अंधाराच्या उदरात माझे दुबळे पाय वेडेवाकडे पडत होते अन तो शापित जीव माझ्यामागे लागला होता. माझी छाती भरून आली. मी अडखळत एका जागेवर जाऊन पडलो. खूप दम लागला होता. आजूबाजूला मिकी माऊस, डॉनल्ड डक आणि इतर बाहुले-पुतळे दिसत होते. मी चक्रवलो. मती गुंग झाली. मी जोकरचा पुतळा असायचा तिथे पोचलो. पण त्याच्या जागेवर कोणीच नव्हतं. बागेतील दिवे बंद-चालू होऊ लागले. मेंदू ब्लॉक झाल्यासारखा होत होता. मागून दोन हात माझ्या मानेभोवती आवळले गेले. त्या थंडगार हातांना मी ओळखलं. हे त्याचेच होते. जोकर…

जोकर!!!

हळूहळू तो फास आवळत गेला. ते विक्षिप्त हास्य कानात घुमू लागलं. काहीतरी तीव्र माझ्या पाठीत घुसलं. कदाचित त्याचे दात असावेत… त्याचा जबडा माझ्या शरीरावर सूरीसारखा फिरत होता. अखेर मृत्युने मगरमिठी मारली होती. त्या दिवशी केवळ ईश्वराच्या दयेने वाचलो… नंतरही एकदा वाचलो… पण शेवटी काळ आला होता…

हळूहळू शरीर बधिर होत गेलं, तरीही त्याच्या विक्षिप्त हसण्याचा आवाज कानात घुमत होता आणि ते हिरवट गहिरे डोळे नजरेसमोर दिसत होते. ते थंड हात लक्षात होते. शेवटी अंधाराने घेरलेली प्राणज्योत मालवली.

देहाची पीडा संपली होती. पण आत्म्याचे हाल अजून बाकीच होते. मी त्या पुतळ्याच्या, त्या निर्जीव नसलेल्या पुतळ्याच्या आत होतो. एका अंधार्‍या जगात. तेथे सर्कस चालू होती. अतृप्त आत्मे, काही जबरदस्तीने कैद केलेले तर काही स्वेच्छेने तेथे होते. एक मारवाडी त्यांना नियंत्रित करत होता. त्याची नजर मला खूप हिशोबी अन बेरकी वाटली. तो माझ्याकडे बघून विक्षिप्त हसत होता. रात्रीच्या गडद अंधारात मी त्या पुतळ्याच्या आतून माझाच मृत पडलेला देह बघत होतो. रक्ताळलेला! माझा आत्मा त्या सजीव शरीरातून ह्या निर्जीव नसलेल्या पुतळ्यात येऊन पडला होता. मीच त्या जोकराच्या अंतर्धानात विसावलो होतो!!! आता ह्या जगाची चाकरी सुरू झाली होती!!!

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in

पहिला भाग…

जोकर भाग १ – भयकथा

जोकर – भयकथा : भाग १

जोकर – भयकथा : भाग १

मराठी कथा  ||  भयकथा   }{  Marathi Story   ||   Horror Story  ||  जोकर  ||  अंधार रात्र  ||    थरकाप  || Fear

तो जोकर आल्यापासून मला ही नोकरी नकोशी वाटत होती. त्या निर्जीव पुतळ्यात काहीतरी होतं हे नक्की. काहीही करून मला ही नोकरी सोडणं आवश्यक वाटत होतं. पण दुसरी नोकरी मिळेपर्यंत काही इलाज नव्हता. ज्या दिवशी दुसरी नोकरी मिळेल त्याक्षणी मी इथून, ह्या शापित जागेतून पळ काढणार होतो.

मी संजय. ह्या बागेचा अन त्याला लागून असलेल्या लहान मुलांच्या प्ले-ग्राऊंडचा पहारेकरी आहे. गेली दोन वर्षे मी इथे हेच काम करत आलो आहे. माझी रातपाळीची नोकरी होती. रात्री दहा ते सकाळी सहा-सात वाजेपर्यंत मला इथे रखवलदारी करावी लागायची. तसं इथे चोरीला जाईल असं फार काही नव्हतं किंबहुना रखवाली करावी अशी महाग वस्तु नव्हती. पण बागेत-उद्यानात रात्रीचे कोण दारुडे, जुगारी, गरदुले येऊन बसू नयेत म्हणून माझी नोकरी होती. ह्या जागेची सुरक्षितता माझ्यावर असली तरी माझी सुरक्षितता परमेश्वराच्या हाती होती.

गेल्या दोन वर्षांत मला काही त्रास नव्हता. रात्री बागेत फिरायचो, रखवाली करायचो अन झोप आली तर झोपायचो. बाग बरीच मोठी होती/ गर्द झाडी, बसायला मोठमोठाले कट्टे, बेंच, मध्यात एक मस्त चौथरा होता. बागेत निरनिराळे पुतळेही होते. समाजसेवक, स्वातंत्रसैनिक वगैरे पुतळे विविध ठिकाणी बसवले होते. पलीकडे लहान मुलांच्या खेळण्यासाठी छान बाग-मैदान सजवलं होतं. रंगीबेरंगी फुलांची झाडी होती होती, पाळणे, घसरगुंडी, सी-सॉ आणि बरचकाही होतं. मिकी माऊस, डॉनल्ड डक आणि विविध कार्टूनचे छान गुबगुबीत पुतळेही होते. रात्रभर इथे फिरतानाही मस्त वाटायचं. रम्य जागा होती. झाडी तर अशी होती की पोर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश कधी जमिनीला स्पर्शही करू शकत नसे. दिवसाही छान गारवा असायचा.

पण महिन्याभरपूर्वी तो अभद्र पुतळा आणला आणि हा सगळा खेळ सुरू झाला. एका विचित्र दिसणार्‍या जोकरचा पुतळा तो. पुतळा कसला; अघोरी राक्षस म्हंटलं पाहिजे त्याला. तो पुतळा नव्हता, त्यात प्राण होता पण मानवी नाही, अमानवी, अनैसर्गिक अन अभद्र!!!

ठेंगणा पुतळा. माझ्या खांद्याइतकी त्याची ऊंची. अंगावर रंगीबेरंगी कपडे. पिवळसर कापडावर लाल-हिरवे ठिपके. ढगळ कपडे सगळे. हातात लाल मोजे. डोक्यावर उभट गुलाबी-पिवळी उंच टोपी. चेहरा पावडर लावल्याप्रमाणे पांढराशुभ्र. त्यात मोठाले डोळे. डोळे फारच बेरकी वाटायचे. हिरवट रंगाचे. लांब पसरलेल्या भुवया अन रुंद कपाळ. नाकाच्या ठिकाणी तो लाल रंगाचा बॉल आणि ते विकट हास्य… ते हास्य फारच धडकी भरवणारं होतं.. शिवाय त्या पुतळ्याची, जोकरची अवस्था अर्थात पोजिशन फार विचित्र होती. तो डावा हात उजव्या हातात घेऊन तो चोळत आहे अशी ती पोज होती. एखादा मनुष्य कुठल्यातरी कामाला लागताना उत्साहीपणे हात चोळत जशी पोज करेल तशी ती पोज होती. त्याच्या बुटकेपणामुळे ती पोज फारच बेरकी अन हिशोबी वाटायची.

लहान मुलांना तो पुतळा कसा आवडायचा ते मला कधीच समजलं नाही. इतक्या विद्रूप रूपावर लहानगी मुलं हसूच कशी शकतात, त्यांच्याशी खेळूच कशी शकतात हा प्रश्न मला नेहमी सतावत असे. त्याच्या चेहर्‍यावर फारच विचित्र भाव होते. कसल्यातरी गणितात अडकलेला तो चेहरा वाटायचा. त्या धीरगंभीर चेहर्‍याकडे बघितलं की खूप उदास-उदास वाटायचं. त्या हास्यामागे काहीतरी लपलेलं होतं. त्या डोळ्यात कसलीतरी हाव दिसायची. ते रूप, तो वेश ते रंग हे सगळे फसवे आहेत असं वाटायचं. त्याच्या ह्या चेहर्‍यामागे अतिशय क्रूर आणि घातकी काहीतरी आहे असं मला पहिल्या रात्रीच वाटलं होतं. अगदी पहिल्या रात्रीपासून मला त्याची भीती वाटायची.

मला अजूनही ती रात्र आठवते जेंव्हा त्या जोकरचा पहिला दिवस किंबहुना रात्र होती. नेहमीप्रमाणे मी ड्यूटिला आलो अन बागेत शिट्टी वाजवत फिरत होतो. बारा वगैरे वाजले असावेत. बागेत खूपच गारवा होता. पण सगळीकडे लॅम्प असल्याने काही वाटत नव्हतं. अंगात स्वेटर अन कानटोपी घालून मी फिरत होतो अन फिरत-फिरत मी तिथे, त्या जोकरपाशी जाऊन पोचलो. त्याला पहिल्यांदा बघितलं तेंव्हा मला जाणवलं की तो मिश्किलपणे माझ्याकडे बघत आहे, त्याचे ते हिरवट डोळे माझ्याकडे एकटक लक्ष देऊन आहेत. स्वतःचे हात चोळत असलेल्या पुतळ्याकडे बघितल्यावर मला अंतर्मनात काहीतरी जाणवलं. जणू माझ्या आयुष्यातील सर्व सुख-दुखे हरवून जातील अन मीही एखाद्या निष्ठुर पुतळ्याप्रमाणे स्थिर होईन. मला पहिल्या नजरेतच त्याच्यापासून धोका वाटत होता. चंद्राची चंदेरी-निळे किरणे त्याच्यावर पडत होती अन तो अजूनच घातकी वाटत होता.

मी अंदाज घेण्यासाठी जवळ गेलो. जवळ जात असताना मला अस्वस्थ वाटत होतं. सगळ्या बागेत चिडिचूप शांतता होती. त्याच्याकडे हळूहळू पडत जाणारी माझी पाऊले जणू माझ्या नियंत्रणात नव्हतीच. त्या अंधारात मला केवळ तो एकटा जोकरच दिसत होता. त्याची हिरवट हिशोबी डोळे मला स्वतःकडे बोलावत होते. रातकिडे-रातपक्षांचे आवाजाही हळूहळू माझ्या कांनातून नाहीसे झाले अन अंगावर काहीतरी आवरण आल्यासारखं वाटत होतं. मी त्याच्या समोर जाऊन उभारलो. तो जोकर माझ्या डोळ्यांत एकटक बघत होता. कसलीतरी धग माझ्या अंतर्मनाला जाळत होती असं वाटत होतं. आजूबाजूच्या झाडीत अनेक लोक दबा धरून बसले आहेत अन ते आता सावधपणे माझ्यावर चालून येतील असं वाटत होतं. क्षणात होत्याचं नव्हतं होईल असं झालं होतं. मी अतिशय सावकाशपणे त्या जोकरच्या हाताला हात लावला. त्या लालसर मोज्यांना माझा स्पर्श झाला अन जणू एखाद्या प्राचीन शिळेला हात लावल्याप्रमाणे थंडगार स्पर्श मला जाणवला. अलीकडेच माझे काका वारले होते तेंव्हाही त्याच्या मृतदेहाचा असाच स्पर्श झाल्याचं मला आठवलं. मी ताडकन मागे कोसळलो… गवतावर पडून मी त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत होतो. घशाला कोरड पडली होती. मी गडबडीत उठलो अन धावत बागेच्या दुसर्‍या भागात जाऊन बसलो. मला काहीच सुचत नव्हतं. अजूनही माझ्या मागावर कोणीतरी आहे असं वाटत होतं. एकतर त्या मोठ्या बागेत मी एकटाच, रात्रीचे बारा-एक वाजले असावेत आणि अशा स्थितीत माझ्यावर कोणीतरी हल्ला करेल असं मला वाटत होतं.

मी घाबरून कट्ट्यावर बसलेलो असताना अंधारातून दोन हिरवट डोळे माझ्याकडे रोखून बघत असल्याचं मला दिसलं. माझा श्वास वाढत होता. हृदयाचे ठोके इतक्या मोठ्याने-वेगाने पडत होते की त्या बागेच्या दुसर्‍या टोकाला उभारलेला माणूसही तो ऐकू शकेल असं वाटत होतं. तो प्राणी नव्हता किंवा माणूसतर नाहीच नाही. ते काहीतरी वेगळंच होतं. माझी वाचा गेली. मी आता वाचणार नाही असं मला वाटत होतं. ते हिरवट डोळे अतिशय खुनशी भावाने माझ्याकडे रोखून बघत होते. मी हातातील बॅटरी कशीतरी चालू केली अन त्या झाडींकडे प्रकाश टाकला अन बघतो तर मघाचाच तोच जोकर तिथे होता. पण आता त्याचं रूप पहिलेसारखं नव्हतं. डोळे मोठे अन ओठ फाकलेले होते त्यातून लांब-लांब पिवळसर दात बाहेर दिसत होते. त्या उभट टोपीटुन काळे केस बाहेर आले होते. तो बुटका जोकर आपले हात फाकवून माझ्याकडे बघत होता. माझ्या अंगावरचे केस ताठ उभे राहिले. मी मोठ्याने ओरडत त्या निर्जन वाटेवरून, बागेतून धावत सुटलो तो थेट गेटच्या बाहेर जाऊन पोचलो. माझी मती गुंग झाली होती. मी धावत सुटलो. वाट मिळेल तिथे. पाठीमागून विचकट खिदळण्याचा आवाज येत होता. अतिशय विक्षिप्त हास्य होतं ते. सार्‍या आसमंतातून, दाही दिशांनी तो आवाज येतोय असं वाटत होतं मला. तो आवाज हळूहळू जवळ येत होता. मी धावत-धावत घरी पोचलो अन घरात जाताच बेशुद्ध पडलो….

===अपूर्ण=== (दूसरा भाग याच वेबसाइटवर प्रकाशित)

सूचना => कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. ह्या कथेचा वापर करण्यापूर्वी लेखकाची रीतसर परवानगी आवश्यक आहे. ||

All Copyrights Of The Story Reserved @ Author Abhishek Buchake.

सहकारी माध्यम=> http://latenightedition.in/wp/

“खिडकी” एक रहस्यकथा… खालील लिंकवर…

खिडकी: भाग १

मी ब्रम्हचारी

मी ब्रम्हचारी

मराठी कथा  ||  मराठी साहित्य  || स्वलेखन  ||  वैचारिक वगैरे  || Marathi Stories  ||  तत्वज्ञान

अविवाहित जीवन जगू इच्छिणार्‍या मित्रांसाठी…

 

मी ब्रम्हचारी, म्हणजे माझं नाव ब्रम्हचारी नाही, माझं नाव मुकुंद आहे, पण लोक मला ब्रम्हचारी म्हातारा म्हणूनच ओळखतात. आज माझं वय सत्तरीच्या वर आहे. जवळजवळ मृत्युने जवळ घ्यावं इतपत तर नक्कीच आहे. लोकांना मी कसा आहे हे माहीत आहे पण मी कसा जगतो आहे ते मलाच माहिती.

मी ब्रम्हचारी आहे हे लोक अभिमान वाटावा अशा रीतीने सांगतात, अर्थात ते जेंव्हा तसं सांगतात किंवा मला तशा नावाने हाक मारतात तेंव्हा माझ्या मनातील अन चेहर्‍यावरील भावात डाव्या-उजव्याचा फरक असतो.

तसा मी अगदीच ‘ब्रम्हचारी’ आहे असं म्हणता येणार नाही, फार-फार तर ‘अविवाहित’ आहे असं म्हणता येईल. ब्रम्हचारी अन अविवाहित यात असा कितीसा फरक आहे!

हे ब्रम्हचारी असण्याचं प्रकरण फार आधी सुरू झालं, म्हणजे ‘जब मै जवान था’ अगदी तेंव्हा… तारुण्याच्या पहिल्या पायरीवर चढल्यावर आणि सर्वार्थाने जीवनाचा अर्थ समजू लागला होता… तारुण्यात स्व-स्वातंत्र्य यापेक्षा अजून मोठी कुठली गोष्ट असते यावर विश्वास बसत नसतो…

कॉलेज मध्ये वगैरे जायचो, अनेक मित्र-मैत्रीनी होते… त्यातच घरी आई-बाबा, काका-काकू नंतर इतर नातेवाईक आणि शेजारी-पाजारी यांच्यात नवरा-बायको संबंध कसे असतात हे बघायचो. विवाहित लोकांचं आयुष्य कसं असतं ते बघायचो… जाम भीती वाटायची की आपलंही नंतर हेच होणार… सकाळी उठणे (याला जागं होणे असं म्हणावंसं वाटत नाही तेंव्हा… आता मी जागा आहे!) कामावर जाणे, घरी लवकर येण्यासाठी धडपड, बायको-मुलांच्या मागण्या, एकत्र जेवण, परिवार सुख, दरवर्षी गणपती-दिवाळीही तशीच, ठरलेली आजारपण, त्याचा ताण, मुलांचा अभ्यास, बायकोच्या अपेक्षा, कामाचा त्रास, पैशांची चणचण, छोट्या गोष्टीत मोठं सुख तत्सम नेहमीच्याच गोष्टी बघून अंगावर घाम फुटायचा! जीवनात इतका तोचतोचपणा??? हे तर मृत माणसाच्या ‘हार्ट बीट’ प्रमाणे वाटायचं… सरळसोट! हार्ट बीट खाली-वर होणे म्हणजे आपण जीवंत आहोत याचा पुरावा, पण वैवाहिक जीवनात इतका तोचतोच अन रटाळपणा…! त्यात टीव्हीवर रोज कसले-कसले कार्यक्रम बघायचो… पती-पत्नीचे भांडणं, खून, अनैतिक संबंध, रोजची कटकट… छे… छे… छे! आपल्याला नाही हे जमणार… मी तर मुक्त हवेप्रमाणे कधीही कुठेही जाऊ शकतो आज… अख्खं आयुष्य असंच पाहिजे… कोठे गेलो, कधी गेलो, कुठे गेलो, कधी आलो, काय खाल्लो, का प्यायलो अशा प्रश्नांची उत्तरे कोणाला कशाला द्यायची?? केवळ शरीराच्या गरजेसाठी लग्नाच्या बंधनात अडकून नाही चालायचं… शारीरिक गरजा कुठेही पूर्ण करू… त्याचा एवढा तो काय पसारा… होईल ते… पण लग्नाच्या नावाखाली पारतंत्र्य नको… आपण स्वतंत्र आहोत, कशाला असली आडकाठी? मीच माझ्या मर्जीचा मालक आहे, कुणाला उत्तरदायी नाही… आहे तेच सर्वोत्तम आहे… दुनिया गेली  झाडावर… ठरलं! मनाशी गाठ… आहे असंच राहायचं जिथपर्यंत जगू तोपर्यंत… अविवाहित!!!

कॉलेज लाइफ मध्ये तर हे खूपच ‘कूल’ वाटायचं… अभिमानाने सांगायचो अविवाहित राहीन, मजा वाटायची अन चार-चौघात वेगळंही वाटायचं… किती मुलींची हृदये तुटली म्हणून मनातल्या मनात हसायचो.. तशा मैत्रिणी अफाट होत्या, एखादीला तरी काहीतरी वाटतच असेल ना? पण अविवाहिती ठामपणा असल्याने माझ्या नादाला कोणी लागलं नाही…

कॉलेज संपलं अन लागलीच नौकरी लागली, पैसा हातात खेळू लागला, मग काय लाइफ डिवाईन! दर सुट्टीला मित्रांसोबत फिरायला जायचो, दोन  महिन्याला गोवा चुकायचं नाही… शारीरिक गरजा तिथे भागल्या जायच्या… मग तर “हे तारुण्य असे बेफाम, त्याला कशाला लग्नाचा ताप!” हे ब्रीदवाक्य झालं… खाणे-पिणे, पिक्चर-पार्ट्या, केंव्हाही या काहीही करा, अर्थात वाया गेलो हे न दाखवता… उत्साह होता उन्माद नव्हे; सगळं वेशीवर टाकलं अशातला भाग मुळीच नव्हता.. स्वतःची अन घराची बेअब्रू होईल अशी वेळ कधीही येऊ दिली नाही… सगळं स्वातंत्र्य उपभोगत होतो… घरच्यांनीही ते तसं बहाल केलेलं होतं…

तिशीकडे सरकायला लागलो अन घरच्यांनी लग्नाचा पाढा सुरू केला, पण माझा ना-ना चा पाढा मोठयाने सुरूच होता… घरचे “मुली आवडतात तरी ना? का दुसर्‍या जातीतली आहे कोण? असेल तर लाऊन देतो..” वगैरे सर्व प्रकारांनी विचारून थकले पण मी विचलित झालो नाही, शेवटी निर्वाणीचं सांगितलो की मागे लागलात तर घर सोडून जाईल. काही दिवस खडाखडी झाली पण विजय माझाच ठरलेला होता… स्व-स्वातंत्र्यापुढे कशालाही थारा नव्हती… माझी तिशी भरत आली होती…

मुलगा-मुलगी बघायचे दाखवायचे ते ‘कांदेपोहे’ कार्यक्रम तर अगदीच विचित्र वाटायचे मला, त्यातल्या त्यात प्रेम प्रकरण वगैरे बरं…

लग्न म्हणजे दोन समसमान गाड्यांनी योग्य अंदाज घेऊन अगदी नेम धरून एकमेकांवर आदळण्यासारखं आहे अन प्रेम प्रकरण म्हणजे अकारण घडलेला अपघात असा माझा समज आहे… अनोळखी अपघात बरा पण ओळखीचं आदळणे नको.

दरम्यान माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींचे बार उडाले होते, त्यांची लग्ने होत होती, ते माझ्यासारखे स्वातंत्र्यप्रेमी नव्हते… त्यांच्याकडे बघून मला हसू यायचं, त्यांची कीव अन स्वतःचा गर्व वाटायचा… अगदी जवळचे असे तीन-चार मित्र अन एक मैत्रीण होती… हळूहळू सगळ्यांची लग्ने उरकली होती…. मैत्रिणीच्या नवर्‍याला माझ्या ‘अविवाहित’ बद्धल कळलं तेंव्हा त्याने माझ्या मैत्रिणीला माझ्यापासून दूर केलं, कारण त्याला आमच्याबद्धल कसल्याही संशयाला जागाही ठेवायची नव्हती… हे ऐकून मला समाधान वाटलं अन दुसर्‍यांना सांगायला उदाहरण भेटलं की, बघा लग्नानंतर काय होतं ते? नशीब एवढच की मित्रांच्या बायकोने माझ्या मित्रांचा माझ्याशी असलेला ‘दोस्ताना’ खटकला नाही, कारण माझ्यासोबत दरवेळी नवीन ‘मैत्रीण’ दिसायची…

काहीही असलं तरी सगळे माझ्यापासून सावध अन थोडेसे दूर राहू लागले… नवीन पिक्चर आल्यावर मित्रांचे तिकीट बूक करू लागलो पण ते तर त्यांच्या बायकांसोबत आधीच जाऊन आलेले असायचे… पिक्चर बघायला एकटं कसं जावं म्हणून अगदी कोणालाही पिक्चर बघायला घेऊन जायचो… एकदा आमच्या ऑफिसच्या सुंदर रीसेप्शनिस्ट ला सोबत घेऊन गेलो, ती पिक्चर कमी बघत होती अन फर्र फर्र करत पेप्सी जास्त पित होती… साला नाद सोडला तिचा… कानाला खडा! दरवेळेस कोण भेटणार सोबतीला पिक्चरला, फिरायला… पण एवढ्यासाठी बायको असावी असं कधी वाटलं नाही… दुनिया गेली झाडावर… अनेक पर्याय हुडकले अन मोकळा होत गेलो…

एकदा कॉलेजच्या मित्रांची ट्रीप निघलेली. सगळ्या मित्र-मैत्रिणींचे बायका-नवरे सोबत होते अन मीच सगळीकडे एकटा फिरायचो… सगळे गुलू-गुलू करत फिरायचे अन मी बसायचो निवांत… माझ्यासोबत येण्यास माझ्या कुठल्याही अविवाहित मैत्रिणीने तयारी दाखवली नाही हे विशेष… कहर तेंव्हा झालं जेंव्हा त्या सगळ्यांनी ‘अंकल’ बनवून त्यांची पिल्ले माझ्याजवळ ठेवली अन सगळीकडे मस्त एंजॉय करून आले… मित्र साले! नाद सोडला… पुन्हा अशा ट्रीपला नाही जायचं… तिथेच जायचं जिथे फक्त बॅचलर असतात… साला तेथेही फार वाव राहिला नाही, सगळे बॅचलर माझ्यापेक्षा वयाने कमी असल्याने त्यांच्यात मिसळणे अवघड झालं… ऑप्शन कमी झाले… जगण्याची चौकट कमी झाली… फिरणं कमी झालं… गोवा-वारीही कमी झाली… असून स्वातंत्र्य उपयोग होईना…! पण एवढ्याने काय होतं… लग्न करू? छे… मी अजूनही उत्तम जगतो आहे…

आता वयाची चाळीशी जवळ आली होती… मी अजूनही तिशीतीलच वाटत होतो… तब्यत झकास होती माझी पण घरच्या जबाबदार्‍या वाढल्या होत्या… आई-पप्पा थकत चालले होते… मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो… सर्वकाही माझ्यावर होतं… त्यात माझी चिंताही होती त्यांना… वडील सारखे आजारी पडायचे, आईला एकटीला सर्वकाही झेपायचं नाही… इतकं होऊनही माझ्या लग्नाचा किंवा त्यांच्या भावी सुनेबद्धल चकार शब्दही त्यांनी काढला नाही… माझा निर्वाणीचे वाक्य आठवत असावेत… ऑफिस मध्ये गेलो तरी घराची चिंता लागून असायची… फिरणं तर आधीच कमी झालेलं होतं, आजारपण केवळ निमित्त्य झालं… काय करावं?

नात्यातल्या एक-दोन जेष्ठांनी अधिकारवाणीने सांगितलं, “आतातरी लग्नाचा विचार कर… जी असेल ती, जशी असेल ती मुलगी म्हणा बाई म्हणा घरी लग्न करून आण… असं एकट्याने घर, आयुष्य ओढता येत नसतं…” त्यांचा तो अधिकार होता… मी बाई आणली, पण सून म्हणून नाही तर ‘केअर टेकर’ अर्थात कामवाली म्हणून… सकाळपासून मी येईपर्यंत ती घरी असायची… तशी हुशार बघूनच ठेवली होती तिला… विशेष म्हणजे मुद्दाम विवाहित अन माझ्यापेक्षा वयाने जरा मोठी बघून ठेवली होती, म्हणजे माझी तिच्याशी जोडी लावायला कोणाला विषय नको… पैसा खर्च होत होता पण घराची चिंता थोडीशी हलकी झाली… आयुष्य आता मात्र घर आणि ऑफिस इतक्यात मर्यादित झालं होतं… घराची सगळी जबाबदारी माझ्यावर होती.. ऑफिस मधून येताना मित्रांसोबत जरा घोट मारायला बसलो की ह्या बाईंचा फोन यायचा, “सायब, कदी यूलालाव?? घरी जायचाय मला.. तुमी आल्याबिगर जाता नाई याचं” मग काय घोट रिचवायच्या आत घर गाठावं लागायचं…

साला वीट आला होता त्याच-त्याच गोष्टींचा… लग्न झालं नव्हतं तरी अडकलो होतो… पण हट्ट कायम होता, अविवाहित! स्वातंत्र्याची चौकट अजून लहान झाली… जगाला आनंदी दाखवायचो, पण फडकणार्‍या झेंड्यावरून स्वातंत्र्य आहे असं मानण्यातला हा भाग आहे…

प्रेमात म्हणाल तर बर्‍याचदा पडलो, पण लग्न नाही हा स्पष्टपणा आधीच होता… अर्थात तात्पुरतं प्रेम! अशाने चांगल्या घरच्या मुली फार जवळ येत नसत… बाकी दुनिया होतीच… प्रेम वगैरे कामपुरतं… अडकलो कधीच नाही अन कधीच अडकणार नव्हतो… एकदा, अर्थात वयाच्या पस्तीशीच्या आसपासची गोष्ट ही… नौकरीनिमित्त लांब गावात राहायचं होत, तब्बल तीन वर्षे.. नवीन जागा होती अन अजूनच स्वातंत्र्य होतं… मजेत गेलो तिथे… तेथेच कामावर असलेल्या एका मुलीच्या प्रेमात पडलो, अर्थात तात्पुरतं… तीही आकंठ प्रेमात बुडाली माझ्या… लग्न? छे ते शक्य नव्हतं… तीही आधुनिक विचारांची होती… उपाय काढला… लीव इन रिलेशनशिप चा…

ह्या गावात आम्हाला ओळखणारं कोणीही नव्हतं.. दिलं ठोकून… दोन वर्षे सोबत राहिलो आम्ही, बिन-लग्नाचं… मस्त आयुष्य होतं ते… हळूहळू तिच्यात अडकलो मी, थोडीशी बंधने बरी वाटू लागली होती… तन आणि मन घरीच रमू लागलं होतं… अधे-मध्ये विचार यायचे की हिच्याशी लग्न करून घरी घेऊन जावं, पण मनावर ताबा होता… शेवटी फार वाईट घडलं… दीड-दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर तिला माझा कंटाळा आला होता… नवीनच कोणीतरी भेटला होता वाटतं… कसलीच बंधने नव्हती… ती आपल्या मार्गाला निघून गेली… सहा महीने मी अस्ताव्यस्त होतो… नौकरी सोडून उगाच सगळीकडे फिरायचो… नंतर जागेवर आलो अन आपल्याच गावात नवीन नौकरी अन जुन्या गोष्टी सुरू केल्या… प्रेमाची ही असली तर्‍हा! निव्वळ भंपकपणा!!

एकांत
एकांत

माझी पन्नाशी आली… वडील गेले होते, अंथरुणात खिळलेली आई अन थोडासा म्हातारा होत चाललेला मी असे दोघेच राहिलो घरात… आता नौकरीही करवत नव्हती अन ती करूही शकत नव्हतो… दोघेही घरात पडून राहायचो… कामाला बाई ठेवली होती… जीवन चार भिंतीत बंदिस्त झालं होतं… जुने मित्र तेवढे भेटायला यायचे… त्यांच्यासमोर आनंदी चेहरा घेऊन बसल्याशिवाय गत्यंतर नव्हतं…

एका अत्यंत जवळच्या मित्राला माझ्या मनीच्या वेदना कळल्या अन त्याने तसं विचारलं मला, “तुला कधी स्वतःच्या निर्णयाचा, अर्थात लग्न न करण्याच्या, पश्चाताप नाही वाटला?”

बेटा पत्रकार होता… खरा पत्रकार… मी लाख लपवायचा प्रयत्न केला पण त्याने सगळं ओळखलं…

मी अवघडुन मन मोकळं केलं त्याच्यापाशी. तोच मनातील जाणणारा होता. पण वेळ निघून गेली होती… ह्या वयात माझ्या लग्नाचा विषय काढणारा तोच फक्त… एव्हाणा सगळे नातेवाईक, शेजारी (मित्र नाही) वगैरे मला ‘ब्रम्हचारी’ म्हणायला लागले होते… हे शब्द मला कधी चिकटले हे मला आठवत नाही, पण बराच जवळचा वाटावा, अगदी स्वतःच्या नावाईतपत, असा तो शब्द होता… मला ब्रम्हचारी समजणार्‍यांना माझी गोवा ट्रीप, परगावचे प्रकरण, इकडचे-तिकडचे प्रताप माहीत नसावेत… ब्रम्हचारी हा शब्द प्रातींनिधिक होता… माझे जवळचे मित्र मला ब्रम्हचारी कधी म्हणत नसत… ते माझ्याबद्धल सर्वज्ञानी किंवा पुष्कळ ज्ञानी होते…

आता मी साठीच्या आसपास होतो… सर्वत्र एकटा… घरात कामाला येणारा चंदू सोडला तर घरात असं कोणी नसायचं… पण आता चार भिंतीत अडकून नव्हतो… आई गेल्यावर स्वतःचं मन रमवण्यासाठी अनेक उपक्रम घेतले होते… कुठल्याही सामाजिक संघटना यांच्याशी जोडल्या गेलो होतो, कुठले क्लब, संध्याकाळी फिरायला जाणे वगैरे जोरात सुरू होतं… पुस्तकही लिहीत होतो… लोक मला विचारवंत वगैरे म्हणत होते… अर्थात ब्रम्हचारी ही ओळख पुसल्या गेली नव्हती… पण मी काय होतो ते मलाच माहिती होतं.

सामाजिक कामामुळे चार लोक ओळखायला लागले होते, भेटी-गाठी घडायच्या… बरं होतं… दिवसभर माणसांत गुंतल्या गेल्याने एकटेपणा तेवढ्यापुरता कमी व्हायचा… रात्र वैर्‍यासारखी असायची… बोलायला सोबत कोणीही असायचं नाही, जेवण एकटं-एकटं, चिंता तर कसल्याच नव्हत्या, पण रुखरुख असायची… जीवन कसं मृत माणसाच्या हार्ट बीट प्रमाणे संथ होतं… माझ्या घरातून इतर घरे दिसायची, तिथे बरीच चहल-पहल असायची, एकत्र जेवणे, टीव्ही, गप्पा-गोष्टी, अक्षरशः भांडणे वगैरे सगळं चालायचं… जीवंत माणसाच्या हार्ट बीट प्रमाणे… माझ्यासमोर मोठ्या झालेल्या अरविन्दचं लग्न झालं होतं, त्याला मुलं-बाळं होती.. तसा गरीब तो स्वभावाने अन परिस्थितीनेही. त्याला चिंताही अनेक होत्या, पण त्याला भेटलं की प्रसन्न असायचा… त्याची इवलूशी मुलगी माझ्या पाया पडायची अन गुड मॉर्निंग वगैरे म्हणायची, सकाळी फिरायला गेल्यावर भेट होत असे…

आज मी सत्तरीचा… आता केवळ एकटा नाही, सोबतीला आजार अन औषध-गोळ्या आहेत… डोक्याशी टेबलवर ठेवलेले औषधांची गर्दी होती अन प्रेमाने, आग्रहाने ते देणारं कोणी नव्हतं. आई-वडील बर्‍याचदा स्वप्नात येऊन विचारपूस करून जायचे. मी मनातून खंगलो होतो.

चंदू नौकर सेवा करतो, पण त्याचा डोळा मी गेल्यावर एकटी राहणार्‍या माझ्या संपत्ती वर आहे… माणसे ओळखतो मी… पण त्याचा हिरमोड नाही करणार, त्याच्या नावावर काहीतरी ठेवणं कर्तव्य आहे माझं… बाकी सामाजिक संस्थेला दान वगैरे… मी एकटाच पडून असतो ह्या बिछान्यावर…

तारुण्यात ज्याला घाबरून मी लग्न न करता स्वतःच्या दृष्टीने अविवाहित अन जगाच्या दृष्टीने ब्रम्हचारी राहिलो ती भीती लग्न न करताही वास्तव्यात माझ्या पाठीवर बसून शेवटपर्यंत माझ्यासोबत आली… मित्र-नातेवाईक-नौकर आयुष्यभर पुरले नाहीत… जाळताना येतील याची शास्वती मात्र आहे… सहानुभूती अन आदर… मृत्यूनंतर तर शत्रूलाही क्षमा आहे, मी तर अनेकांच्या दृष्टीने सुखी-समाधानी अन त्यांचा कोणीतरी आहे…

ज्याला अर्थहीन समजून भलत्या स्वातंत्र्याच्या मागे लागलो त्यानेही तेच दिलं ज्याची भीती होती… प्रतिष्ठेने घेतलेला निर्णय बदलल्याने अहंकार गळून पडला तरी माणूस उभा राहण्याची शक्यता असतेच असते… मी निर्णय बदलला नाही अन स्वतःच्या समजुतीवर अन निर्णयावर ठाम राहिलो… अहंकार नाही सोडला. पण माझ्यामुळे जगात कुठेच काही फरक पडला नाही… आमचा वंश काही थांबला नाही.. ते तरी समाधान माझ्या आई-वडलांना असावं… अर्थात तो वंश माझ्यापासून वाढला नाही, माझ्या काकाच्या मुलांनी लग्न वगैरे केली अन सगळीकडे वाढतो तसा आमचा वंश वाढत राहिला… माझ्या आई-वडलांचं अन माझं नाव पुढे चालणार नाही याचं वाईटही वाटतं… कुठेतरी फोटो किंवा संगमरवरी दगडावर आम्ही असणार होतो…

माझ्या समाधानी-आनंदी चेहर्‍यामागे वेदना होत्या ज्या माझ्याच निर्णयामुळे मी जगासमोर दाखवूही शकत नव्हतो… दाखवल्या असत्या तर जीवन अजून बिकट झालं असतं अन दुसर्‍यांच्या नजरेतुनही मी पडलो असतो… लोक तुम्हाला असेही उलट्या बाजुनेच बघत असतात… असो…

माझ्या आई-वडलांची अन माझ्या अनेक हितचिंतकांची मी माफी मागतो अन त्यांचा सल्ला न ऐकता माझ्या चुकीच्या (जे खूप उशिरा समजलं) निर्णयावर अडलो… जाताना इतकेच…

 

माझ्या मृत्यूनंतर चंदूने हे पत्र माझ्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना व परिचितांना आवर्जून द्यावं हीच शेवटची इच्छा…

– मुकुंद (ब्रम्हचारी)

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in

MORE STORIES…  अजून काही कथा… 

गल्लोगल्ली नटसम्राट!!!

जाग आली तेंव्हा

जाग आली तेंव्हा

जाग आली तेंव्हा  || मराठी कथा  || स्वलेखन   ||  Marathi Stories  ||  सामाजिक कथा वगैरे  ||  दृष्टीकोण 

 

 हर बार, देरसे आनेवाले दुरुस्त नही होते…

 

विलासराव बारणे यांचं गावात बस स्टँडच्या समोर मोठं मेडिकलचं दुकान होतं. गेली सव्वीस वर्षे ते हे दुकान चालवत होते. बस स्टँड समोर स्वतःचं घर अन तेथेच दुकानाची जागा असल्याने आजवर त्यांच्या धंद्याला कधी मंदी आली नाही. रोगराई, आजारपणाला कधी मंदी नसतेच! त्यामुळे वाढणार्‍या रुग्णांसह त्यांचं दुकान जोरात चालत गेलं.

काळ उलटत गेलं तरी त्यांचा व्यवसाय कधी कमी झाला नाही. तसं पाहायला गेलं तर संधी असूनही तो व्यवसाय कधी वाढलाही नाही.

विलासराव अगदी निवांत माणूस! आराम, चिंतामुक्त, भयमुक्त, सरळ साधं आयुष्य जगणारा माणूस. पैशाच्या मागे कधी लागला नाही असा मनुष्य म्हणजे विलासराव बारणे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाल्याने कधी पैशाची फार चणचण जाणवली नाही. शहरात मोक्याची जागा असूनही त्याचा वापर अमाप पैसे कमावण्यासाठी विलासरावांनी कधीच केला नाही. त्यांचे मित्र, सगे-सोयरे, हितचिंतक वगैरे त्यांना अनेकदा सांगायचे की जागेचा काहीतरी व्यावसायिक वापर करा म्हणजे रग्गड कमवाल. पण गेली अनेक वर्षे विलसरावांचं एकच उत्तर असायचं, काय छातीवर घेऊन जायचाय का पैसा? सामान्य माणसाला लागतो त्यापेक्षा कणभर जास्तीच दिलं आहे परमेश्वराने; अजून कमवून पुढच्या पिढ्यांना निष्क्रिय करून ठेवायची माझी इच्छा नाही. अशा विचारांमुळे विलासरावांनी आपल्या सहा हजार स्क्वेर फुट मोक्याच्या जागेत स्वतःच्या राहण्याची, स्वतःच्या दुकानाची अन सोबतीला म्हणून एक अशा भाडेकरू कुटुंबाची सोय केलेली होती. स्वतःला मोठा वाटेल इतका बंगला, गरजेपुरता जागा व्यवसायला अन लागूनच चार खोल्यांची जागा भाड्याने दिलेली होती. बाकी मागच्या जागेत मस्तपैकी बाग फुलवली होती.

विलासराव अगदीच अव्यवहारीक होते अशातला भाग नव्हता. व्यवसाय ते काटेकोरपणे करायचे. गावाकडची वीस एकर शेतीही चांगली सांभाळायचे. पण एकातून दूसरा, दुसर्‍यातून तिसरा असं करत पैशासाठी व्यवसाय अन पर्यायाने डोक्याचा ताप त्यांनी कधीच वाढवून ठेवला नाही. खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी बक्कळ पैसा लागतो अन तो कुठल्याही मार्गाने आपली श्रीमंती दाखवण्याची झिंग त्यांना कधीच नव्हती. कामापुरता काम अन बाकीचा वेळ कुटुंब असा त्यांचा गेल्या अनेक वर्षांचा क्रम होता.

त्यांचे आई-वडील गावाकडे राहायचे, कसली भाऊ-बंदकी नाही, एक मुलगा शिकून नौकरीला परगावी, लग्न झालेली मुलगी परगावी असं होतं त्यांचं आजचं आयुष्य. चिंतामुक्त आयुष्य जगल्यानेच त्यांना आजवर कधीही स्वतःच्या मेडिकल मधून वरवा लावल्याप्रमाणे औषध-गोळ्या लावाव्या लागल्या नव्हत्या. एकंदरीत काय तर स्वतःच्या दृष्टीने तर विलासराव बारणे हा सुखी मनुष्य होता.

आज पंचावन्न वर्षांचे विलासराव दुकानात मालकाच्या खुर्चीवर आरामात बसले होते. दोन-तीन नोकर-चाकर रोजची कामे करत होती. इतक्यात दुकानातील जुना नोकर (खरं तर त्यांना नोकर म्हणावं अशी परिस्थिती नव्हती) भानुतात्या आले. येताच त्यांनी मालकाच्या अर्थात विलासरावांच्या पायावर डोकं ठेवलं. तसं तर भानुतात्या विलासरावांपेक्षा दहा-एक वर्ष मोठे. दुकानात सर्वाधिक टिकलेले व्यक्ति. विलासराव जागेवरून उठले अन त्यांना धरू लागले. भानूतात्या भरलेल्या डोळ्यांनी विलासरावांकडे बघत होते अन उभे राहताच त्यांनी विलासरावांना मिठी मारली.

विलासरावांना कळलं की काहीतरी चांगलं किंवा वाईट घडलं असावं. कारण मागे भानूतात्या त्यांचा मुलगा मोठ्या कंपनीत कामाला लागल्यावर अन त्यांची आई गेल्यावर असच काहीतरी करत होते. सगळे ड्रामा सीन झाल्यानंतर भानूतात्यांनी विलासरावांना सगळी हकीकत सांगितली.

भानूतात्यांची त्यांच्या गावाकडे पाच एकर पडीक नापिकी जमीन होती. ती जमीन तशी होती म्हणूनच त्यांना दुसर्‍यांच्या हाताखाली काम करायची वेळ आली होती. पण आज त्या पडीक जमीनिने त्यांना लखपती बनवलं होतं! सरकारने कसल्यातरी कामासाठी त्यांची जमीन विकत घेण्याचं ठरवलं होतं. जमिनीची किम्मत येणार होती, फक्त पन्नास लाख! भानूतात्या स्वर्गसुखाला पोचले होते.

भानूतात्या तसे सद्गृहस्त. इमाने-इतबारे नोकरी करून गेली वीस-बावीस त्यांनी स्वतःचं कुटुंब चालवलं होतं. भानूतात्या विश्वासाचे अन सभ्य असल्याने विलासरावांनीही त्यांच्यासाठी कधी हात आखडता घेतला नाही. भानूतात्यांच्या मुलाच्या शिक्षणात जेंव्हा केंव्हा अडचणी आल्या तेंव्हा तेंव्हा विलासरावांनी त्यांना सढळ हाताने मदत केली होती. आपल्याला परमेश्वराने गरजेपेक्षा जास्त पैसा दिला अन भानूतात्यांना गरजेपुरताही नाही असं विलासरावांना वाटे, म्हणून त्यांनी जमेल तितकी मदत भानूतात्यांना केली. भानूतात्याही कधी त्यांचे उपकार विसरत नव्हते. विलासरावांच्या दुकानाचंच नव्हे तर त्यांच्या घरचीही कामे करायला ते कधी कमी मानत नव्हते. मुलाला चांगली नोकरी लागली अन घरात लक्ष्मी स्थिरावू लागली तरी त्यांनी विलासरावांची नोकरी कधी सोडली नाही.

पण आज मात्र भानूतात्या मुक्त असल्याप्रमाणे बोलले की, मालक मी आता मुक्त होऊ म्हणतोय! भानूतात्या म्हणत होते की, ह्या वयात नोकरी नाही होणार. आयुष्य गेलं यात, आता म्हातारपण कुटुंबासोबत आरामात घालावं म्हणतोय. पोरगा जिथे नोकरी करतोय तिथे जाऊन राहणार आहोत. तुम्ही परवानगी दिल्याशिवाय मी नाही जाऊ शकणार. तुम्ही अन्नाला लावलं आमच्या कुटुंबाला, आधार दिला, पोराला शिकवलं. तुमच्या इच्छेशिवाय मी काहीही करू शकत नाही.

विलसरावांना कसंतरी होत होतं. इतक्या वर्षांचे सहवास तुटणार याचं दुखं असावं कदाचित. पण त्यांनी मोठ्या मनाने भानूतात्यांना मुक्त केलं. सहा महीने लागणार होते सरकारी पैसे यायला, वर्ष गेला अन भानूतात्या मुक्त झाले.

विलासराव थोडे अस्वस्थ होते. अंतर्मुख झाले होते. भानूतात्यांसाठी त्यांना आनंद होता जरून पण त्यात त्यांना स्वतःचं काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. त्यांना समजत नव्हतं काय होत आहे, पण कुठेतरी गल्लत होते आहे, काहीतरी विसरलं आहे हरवलं आहे असंच त्यांना वाटत होतं. कदाचित भानूतात्यांचा इतक्या वर्षांचा सहवास तुटल्यामुळे काहीतरी असेल असं त्यांना वाटत होतं. पण ह्या अस्वस्थतेचं मूळ हे भानूतात्यांच्या जमिनीतून आलेल्या पैशाच्या अन त्यानंतर त्यांच्या मुक्त होण्याशी आहे याची मनोमन खात्री त्यांना होती.

विलासराव दरवर्षी दसर्‍याला शहरातल्या देवीची मोठी पुजा करत अन अनेक भिकार्‍यांना दान-धर्म करत. दरवर्षी हे सगळं नियोजन भानूतात्या करत असत पण आज ते येथे नव्हते. फोनवरून संपर्कात असले तरी हजार किलोमीटर लांबच! यंदा दसर्‍याला विलासरावांनी नेहमीपेक्षा कमी दान-धर्म केला अन नेहमीप्रमाणे ते उत्साहीही नव्हते.

काही दिवसानंतरची गोष्ट आहे. विलासरावांनी राहायला सोबत होईल म्हणून स्वतःच्या जागेवर चार खोल्यांचं एक घर भाड्याने दिलेलं होतं. सध्या त्या जागेत एक जोडपं राहत होतं. तेथे राहणारा माणूस एका खासगी संस्थेत शिक्षक होता अन बाकीच्या वेळेत शिकवण्या घ्यायचा. त्याची बायकोही घरी बसल्या-बसल्या कम्प्युटरवर कसलीतरी नोकरी करून चार पैसे कामवायची. गेली चार वर्षे हे जोडपं ह्या घरात राहत होतं.

विलासराव दुकानातून घरी आले तेंव्हा हे दोघे यांच्याच घरात बसलेले होते. विलासराव येताच त्या दोघांनी त्यांचे पाय धरले अन विलासरावांच्या हातात एक निमंत्रण पत्रिका ठेवली. ती भूमिपूजन समारंभाची पत्रिका होती. ह्या जोडप्याने गावाला लागून एक मोठी जागा घेतली होती जिथे ते लहान मुलांची शाळा अन शिकवणी वर्ग सुरू करणार होते. त्या बांधकामाच्या भूमिपूजनाचा सोहळा होता त्याचं ते निमंत्रण होतं. दोघांनी निमंत्रण दिलं अन निघून गेले. विलासरावांनी दोघांचाही अभिनंदन केलं. बांधकाम पूर्ण झाल्यावर हे कुटुंब तिथेच जाऊन राहणार होतं.

विलासराव त्या भूमिपूजन सोहळ्याला गेले. तेथे त्यांचा मोठा आदरही राखण्यात आला. त्या निमित्ताने विलासरावांची त्या शिक्षकाच्या वडलांशी ओळख झाली अन गप्पाही झाल्या. विलासरावांना समजलं की हा शिक्षक बनला केवळ स्वतःच्या हट्टामुळे. घरचा तो खूप चांगला होता. त्याच्या बापाने सांगितलं की गावाकडे त्याची तीस एकर शेती आहे मोठा वाडा आहे. हा शिकला अन शहरातच काहीतरी करायचं म्हणून येथे आला. मिळेल ती नोकरी केली अन आज संधी मिळताच मोठी झेप घेतली. सगळंकाही असतानाही त्याने आहे त्यापेक्षा मोठं करायची जिद्द बाळगली होती.

कार्यक्रमावरून घरी आल्यावर विलासराव प्रचंड अस्वस्थ होते. त्यांच्या डोळ्यासमोर सारखे भानूतात्या अन हा शिक्षक उभा राहत होता. त्यांच्या आकृत्या लहानपासून मोठ्या होत जात होत्या अन विलासराव मात्र आहेत तेवढेच राहून, आहेत तेथूनच त्यांच्याकडे फक्त बघत उभे होते. ह्या दोघांनीही काहीतरी कष्ट करून स्वतःची ध्येय मिळवली होती. भानूतात्यातर अगदी शून्य होते. दोन वेळेसच्या जेवणाची अडचण होती त्यांची. अतिशय गरीबी. आज कोठे आहेत? मीच तर त्यांना अनेकदा मदत केली होती, मला सगळं आठवतय! त्याच्या मुलाला मदत केली नसती तर तो शिकून मोठाही झाला नसता. अनेकदा माझ्यामुळेच त्यांचं कुटुंब तरलं आहे. पण त्यांनी त्याचा नकार तरी कधी केला मग. जाताना माझ्याकडून मुक्ती मागून गेले भानूतात्या. मान होता माझा. पण नुसता मान काय उपयोगाचा. आज ते माझ्याहीपेक्षा मोठे झालेत. लोक काय बोलत असतील; दुकानात काम करणारा दुकान मालकापेक्षा श्रीमंत झाला अन मालक अजून तेथेच आहे. वीस वर्ष साधी कारकुणी करत आलेले भानूतात्या आज माझ्याहिपेक्षा श्रीमंत होऊन बसले होते. मी इतक्या वर्षांत जे कमावलं नाही ते त्यांनी सरतेशेवटी का होईना कमावलं. अर्थात, यासाठी त्यांनी एक तपस्या केली, सय्यम ठेवला अन मेहनत घेत राहिले. पण त्यांच्याकडे कुठेतरी पोहोचायच स्वप्न मात्र नेहमीच होतं ज्यामुळे आज ते तिथे पोचले होते.

शिक्षकाच्या बाबतीत मात्र आपला गैरसमज झाला. मला वाटलं की खासगी संस्थेत काम करणारा म्हणजे साधारण असेल. पण हा पठ्ठ्या तर जन्मजात श्रीमंत निघाला. भाडं द्यायला उशीर होईल म्हणून सांगायला यायचा हा अन मीही मोठ्या मनाने माफ करायचो. जणू लगान माफ करावा. पण हा तर वतनदार निघाला. याला असं राहायची गरज काय होती? स्वप्न होतं याचं काहीतरी करायचं अन त्याने ते केलं. चला, आपला थोडा हातभारतरी लागला. तेवढच पुण्य! पण पुण्य मिळवून काय होणार? ज्याला काहीच मिळत नाही तो पुण्य मिळेल याच आशेवर काम करत असतो. तो शिक्षक चुन्ना लाऊन गेला. स्वतःचं स्वप्न साकार करत असताना त्याने कसलीच मागे-पुढे पाहिलं नाही. त्यानेही कष्ट केले अन चार वर्षाच्या खटाटोपनंतर तो यशस्वी झाला. आता त्याला मागे वळून बघायची गरज नाही. शहरातील एक नंबर शाळा आहे त्याची. त्याचं घर तर आपल्या घरापेक्षाही मोठं दिसत होतं. इथे चार रूम मध्ये पडायचा. लोक काय बोलत असतील? भाडेकरूने मालकापेक्षाही मोठं घर घेतलं अन मालक अजूनही तिथेच आहे.

छे! छे! छे! आपण इतके वर्ष झोपलेले होतो. आता यांच्याकडे बघून जाग आली. काहीतरी केलं पाहिजे. इतकी वर्षे पैसा काय करायचा म्हणून कधी व्यवसायवृद्धी केली नाही न कधी असलेल्या पैशाला वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज मी आहे तिथेच आहे अन माझ्याकडे कामाला असणारे, माझ्या येथे भाड्याने राहणारे, ज्यांच्यावर मी अनेकदा कृपा केली म्हणून ते तरुन गेले ते माझ्याही पुढे निघून गेले. मला कोणी समाजसेवा करायला सांगितली नव्हती, पण मूळ स्वभाव म्हणून ह्या गोष्टी केल्या. ते त्यांच्या स्वप्नांकडे वाटचाल करत राहिले, मी तर त्यांच्या वाटेतील एक सावलीचं झाड बनून राहिलो. पैशांच्या बाबतीत काहीतरी गफलत झाली आपली. अनेकांनी अनेकदा सांगितलं होतं की मोक्याच्या जागेचा काहीतरी वापर करा, असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करून अजून सधन व्हा. पण मी संपत्ती अन मोठ्या-खोट्या प्रतिष्ठेला कमी मनात आलो. पण मला त्याचाही फायदा झाला म्हणा. आज सुखी-समाधानी, निरोगी आयुष्य जगत आहे. त्याचा काय उपयोग? लोक माझ्याही पुढे निघून गेले. ते अधिक समृद्ध झाले अन मी मात्र तिथेच राहिलो. बास झालं! आता जागं होण्याची वेळ आली आहे. स्वतःपुरता पैसा असला तरी आता लोकांना दाखवण्यासाठी, कर्तुत्व उजळ करण्यासाठी तरी अमाप पैसा गोळा केला पाहिजे. उशिरा का होईना जाग आली हे महत्वाचं!

विलासराव स्वतःशी प्रश्न-उत्तरं करत होते. एका बौद्धिक संक्रमणातून जात होते.

विलासराव आता जराही उसंत घेणार नव्हते. त्यांना आता विश्रांती नव्हती. ते दुसर्‍या दिवशीपासूनच कामाला लागले होते. जेथून जेथून शक्य आहे तेथून तेथून पैसा मिळवायचा अन तो वाढवत न्यायचा अशा हट्टाला ते लागले होते.

त्यांच्या बायकोला हे काय होत आहे हे पुर्णपणे समजत नव्हतं, पण काहीतरी गंभीर आहे हे त्या जाणून होत्या. इतक्या वर्षांत त्यांनी विलासरावांत असा बदल अन असं वागणं कधीच बघितलं नव्हतं. विलासराव ह्या बाबतीत कोणाशीच काहीच बोलत नसत. फक्त पैसा कमवायचा एवढाच विषय त्यांच्या डोक्यात होता. त्यांनी आता रोजचा आराम, रोजचं वेळापत्रक बदललं होतं.

सर्वात आधी त्यांनी त्यांच्या हातात असलेल्या मोक्याच्या जागेचा बळी द्यायचं ठरवलं. जी जागा त्यांनी शिक्षकाला भाड्याने दिलेली होती त्याचा त्यांनी कायापालट केला. तिथे अजून दोन खोल्या टाकल्या अन ती जागा ‘बाजारभाव’ याप्रमाणे भाड्याला देण्याचं ठरवलं. त्या जागेचं जितकं भाडं इतके वर्ष त्यांना यायचं आता त्याच जागेतून त्याच्या दुप्पट भाडं त्यांना येऊ लागलं. त्यांचं दुसरं पाऊल होतं ते घराच्या मागे असलेल्या जागेवर. तिथे इतके वर्ष हाताने लावलेली-फुलवलेली बाग होती. त्या बागेची त्यांनी निर्घुनपणे कत्तल केली. ज्या बागेला ते इतकी वर्षे दिवसातून एकदातरी न चुकता चक्कर टाकायचे तिथे आता सपाट जागा झाली होती. हे करताना त्यांच्या मनात काय वेदना असतील त्या कोणाला दिसल्या नाहीत पण वरवर तर ते आनंदी दिसत होते. त्यांच्या घरच्यांनी व इतरांनी त्यांना बाग न तोडण्यासाठी लाख विनवण्या केल्या, बायकोशी भांडणे झाली पण ते आता मागे हटणार नव्हते. त्या जागेत त्यांनी विश्रामगृह (लॉज) सुरू करायचं ठरवलं होतं. समोर बस स्टँड असल्याने ह्या व्यवसायात रग्गड नफा होणार हे उघड होतं. अशा नफ्यापुढे निरर्थक बागेला काय महत्व होतं.

दूसरा मोर्चा त्यांनी वळवला तो त्यांच्या शेतीकडे. इतके वर्षे शेतीतून ‘येईल ते येईल’ असा विचार करून त्यांनी कधी त्यात विशेष लक्ष घातलं नव्हतं. पण आता मात्र ते अशी चूक करणार नव्हते. त्यांनी असलेल्या शेतीतील दोन-चार एकर जागा एनए करून घेतली अन तिथे प्लोट्टिंग सुरू केली. बाकीच्या शेतीतून जास्त नफा कसा होईल याकडे ते लक्ष देऊ लागले. त्यांचा हा अवतार बघून शेती सांभाळणारे त्यांचे गडी अवाक झाले होते.

तिसरा दृष्टी पडली ती त्यांच्या मेडिकल दुकानावर! बावीस वर्षांत त्यांनी मेडिकल दुकानात त्यांनी इतर कुठल्याही वस्तु विकायचं कटाक्षाने टाळलं होतं. बस स्टँड समोर असूनही हे मेडिकल २४ तास सेवा पुरवणारं नव्हतं इतके दिवस. पण आता तो परवानाही मिळाला होता. आता हे मेडिकल २४ तास सेवा पुरवणारं मेडिकल आणि जनरल स्टोर झालं होतं. पाणी विकायचं नाही असं एक विलसरावांचं तत्व होतं. पैशापुढे तत्वांना तिलांजली देणे काही नाही. इतके वर्षे मेडिकलच्या दारात ठेवलेली अन सर्वांसाठी कायम अविरतपणे सुरू असणारी पाण्याची टाकी आता गेली होती. मोफत पाणी बंद झालं अन बाटलीबंद पाणी विक्री सुरू झाली. इतके वर्षे ‘मोक्याच्या जागेचा उपयोग करा’ ह्या वाक्याचा आत्ता कार्यान्वयन होत होतं.

हे सगळे उपद्व्याप करायला विलासरावांचं एक वर्ष गेलं. सगळ्या गोष्टी स्थिर होत होत्या अन लक्ष्मीही घरात आधीपेक्षा अधिक वावरू लागली होती. यश मिळणार यात कसलीच शंका नव्हती. दृष्ट लागावं असं ते यश होतं. ह्या गोष्टी स्थिर होत असताना विलासरावांची प्रकृती मात्र अस्थिर होत होती. ह्या वयात वारंवार फिरणं, जागरण, डोक्याला ताप वगैरे गोष्टी वाढल्याने त्यांच्या चेहर्‍यावर दिसणारं हास्य विरत गेलं होतं, चेहरा निस्तेज वाटत होता अन एकंदरीत चालणं-बोलणं यात बराच फरक पडला होता. मध्यंतरी पंधरा दिवस दवाखान्यात मुक्काम होता. कायमस्वरूपी बीपी ची गोळी लागली होती.

पैसा येतो तो एकटा येत नसतो. केवळ वर्षभरात विलासराव करोडपती झाले होते. त्यांच्याकडे इतका पैसा आला हे बघून अनेक आप्तंचे त्यांच्याशी घरोबा वाढला होता. आलेला पैसा बघून त्यांच्या मुला-मुलीने पैसा मागायला सुरवात केली होती. मुलाने नोकरीच्या ठिकाणी नवीन घर घेण्यासाठी पैसा मागितला होता तर मुलीने नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी! ही कटकट इतके वर्ष नव्हती. पण अमाप पैसा बघून दोघांना असं वाटत होतं की आपल्या बापानंतर हा पैसा दुसर्‍याने नको लाटायला. इतके वर्ष पैसा नव्हता अशातला भाग नव्हता, पण डोळे मोठे होतील इतका पैसा आत्ताच दिसत होता. इतकी वर्ष समोरच्याची गरज-अपेक्षा ओळखून विलासराव स्वतःहून खिसा रिकामा करत, पण आता पोटच्या मुलांनीही पैसा मागितला तरी ते मागे-पुढे बघत होते. कुटुंब-कलहाची ही सुरुवात असावी कदाचित.

चारचौघात विलासरावांना आता पहिलेपेक्षा जरा जास्त आदर मिळत होता. लोक पुढे-पुढे करत होते त्यांच्या. तेही आता कुटुंबात कमी रमत होते. मोठ्या लोकांत ऊठ-बस चालू होती. शहरात विलासराव बारणे हे नाव श्रीमंत लोकांच्या यादीत मोठ्या दिमाखात चमकत होतं. विलासरावही आता मागे वळून बघण्याच्या मनस्थितीत नव्हते. काहीच दिवसांत त्यांनी स्वतःचं हॉटेल सुरू केलं, फूड पॅकेजिंगचा व्यवसाय सुरू केला. एकंदरीत काय तर विलासराव चार वर्षांपूर्वी ठरवलेल्या मोहिमेत पुर्णपणे यशस्वी झाले होते.

एके दिवशी योगायोगाने विलासरावांचा एक जुना मित्र त्यांना भेटाला. जवळ-जवळ सात-आठ वर्षानी ही भेट होत होती. दोघांची बराच वेळ चर्चा चालली होती. त्याचा मुक्काम विलासरावांच्याच लॉजवर होता.

विलासरावांना वाटलं होतं की आपला मित्र आपली प्रगती बघून खुश होईल. पण जरा उलट झालं. दोघांनी एकमेकांच्या आयुष्याची खबरबात घ्यायला सुरुवात केली. विलासरावांनी गेल्या पाच वर्षात मिळवलेलं यश सांगितलं. त्या मित्राने सांगितलं की तो आता त्याच्या गावाकडे राहायला असतो. दोन वर्षे झाली होती निवृत्त होऊन. मिळालेल्या पैशातून गावात घर बांधलं अन आरामात राहत होता. कसला ताप नाही व्याप नाही. मुलं-सुना-नातवंड वगैरे बराच मोठा परिवार एकत्र राहत होता. सगळं काही व्यवस्थित चालू होतं.

तसं पाहायला गेलं तर पाच-सात वर्षांपूर्वी दोघं एका समान पातळीवर होते. त्यावेळेस झालेल्या भेटीत त्या मित्राने विलासरावला सांगितलं होतं की तुझ्यासारखं आयुष्य जगायची माझी इच्छा आहे. त्या वाक्याने विलासरावच्या मनात काहीतरी चमक मारून गेली.

आज त्या मित्राकडे जे आहे ते माझ्याकडे होतं पण आता त्यातलं काहीच नाही. त्याला जे पाहिजे होतं ते त्याला मिळालं होतं. मित्र आला आणि गेला. मित्राने मित्राच्या यशाचं कौतुक केलं. जरा आश्चर्य वाटलं पण जगासोबत माणसे बदलत असतात असं म्हणून तो निघून गेला.

पाच वर्षांनंतर विलासराव आज पुन्हा विचारमंथनात अडकले होते. आपण भानूतात्या व त्या शिक्षकाच्या सुखाचा मत्सर करू लागलो अन भलत्या फंदात पडलो. आज अनेकजण माझ्यासारखं आयुष्य जगायची स्वप्न बघत असतात अन मी मात्र कसल्यातरी मोह-मत्सराच्या जाळ्यात अडकून वाहवत गेलो. तेंव्हा मी सुखी होतो अन आता मी यशस्वी झालो आहे.

यश अन सुख हे एकत्र नांदत असतातच असं नाही. आज माझ्याकडे मागेल तेवढा पैसा आहे, पण त्या पैशाचा उपयोग काहीच नाही. पैशातून पैसा अन त्यातून सुख हे सगळं एक चक्र आहे अन मी त्या चक्रात अडकलो. गरजेपुरता पैसा तर तेंव्हाही होता अन त्यात आपण सुखीही होतो पण दुसर्‍याच्या पट्टीने स्वतःचं माप घ्यायला गेलो अन सगळी गल्लत झाली. प्रत्येकाची स्वप्न वेगळी असू शकतात. भानूतात्यांनी आयुष्यात कधी पैसा बघितला नसल्याने त्यांना पैशाने विलासी जीवन जगायची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर वाट पहिली अन आयुष्याच्या शेवटी कुठं त्यांना पैशातून सुख मिळू लागलं. दुसरीकडे, त्या शिक्षकाच आयुष्य तेंव्हा कुठे सुरू झालं होतं जो तो स्वतःच्या मर्जीने जगू इच्छित होता, त्यासाठी त्याने धडपड केली.

पण माझं काय?

माझ्याकडे गरजेपुरता पैसही होता अन सुख तर होतच होतं. तर मग मी कशाच्या मागे धावलो? पैशातून सुखाच्या मागे धावलो? नाही. मत्सर अन खोट्या प्रतिष्ठेच्या नादाने मी पैशातून प्रतिष्ठेच्या मागे लागलो. माझ्यासमोर गरीब असलेला माझ्याहून श्रीमंत झाला हे मला बघवत नव्हतं. ते जर शून्यातून विश्व निर्माण करत असतील तर मी का थांबू? माझ्याकडे तर सगळं आहे ज्यातून मी पैसा मिळवू शकतो. पण मी अनेक वर्षांपूर्वी माझं आयुष्य ठरवलं होतं. स्वतःच्या अटींवर आयुष्य. आरामात जगायचं! ताप-व्याप नाही काही नाही. तेंव्हा ज्या गोष्टीतून आनंद मिळत होता आज त्या गोष्टी माझ्याकडे शिल्लकही नाहीत अन त्या विकत घेणं तर अशक्य आहे.

मग मी काय मिळवलं?

काहीच नाही. फक्त स्वतःचा दुखवलेला अहंकार मी थंड करून घेतला. ते त्यांची स्वप्न साकार करण्यात यशस्वी झाले अन माझ्याकडे आज जे आहे ते माझं स्वप्न होतं का?  ज्या लोकांकडे जे नसतं त्याचच त्यांना आकर्षण असतं. सुखीपण हे पैशाच्या आधारावर मोजायला गेलो तर कुठलाच गरीब कधीच सुखी राहू शकला नसता. एका श्रीमंताने आपल्या मुलीला एखादी आलीशान गाडी भेट दिल्यावर तिला आनंद होऊ शकतो, पण एखाद्या गरीबाने पैसे जमा करून त्याच्या मूला-मुलीला एक सायकल खरेदी करून दिल्यावर त्या गरीबाला अन त्याच्या मुला-मुलीला जो आनंद होईल तो त्या श्रीमंत बाप-लेकरांना होईलच याची शास्वती नाही.

सुख स्वतःच्या मनातील अपेक्षांवर असतं. भानूतात्याचा मुलगा ग्रॅजुएट झाल्यावर त्याच्या बापाच्या पाया पडायच्या आधी माझ्या पाया पडला होता तिथे सुख असतं हे मी विसरलो होतो. रात्री बेरात्री माझ्या दुकानसमोरुन पाण्याची बाटली मोफत भरून नेल्यावर जे मिळतं ते सुख असतं. चार पाण्याच्या बाटल्या विकून त्यातून येणार्‍या पैशाची अन त्या सुखाची तुलना होणं शक्यच नाही.

माझ्याकडे पैसा नसता अन तो कमवायच्या भानगडीत मी पडलो असतो तर एखाद वेळेस ठीक होतं पण सगळं असताना मी पैशाच्या मागे लागणं म्हणजे आयुष्यात व्यर्थ घेतलेली मेहनत.

शेवटी मी म्हणत होतो तेच बरोबर होतं, पैसा काही छातीवर घेऊन जायचा नाही! चूक झाली! काहीतरी गफलत झाली! कुठेतरी चुकलं! आज जे कमावलं आहे ते मी कधीही कमावू शकलो असतो, पण पाच वर्षांपूर्वी जे गमावलं ते कमावणे आता अशक्य आहे. पाच वर्षांपूर्वी मला वाटलं की मला उशिराने जाग आली. जाग आली पण डोळे बंद करून मी जगू लागलो. खरी जाग आता आली आहे. आता झोप मात्र शेवटच्या श्वासानंतरच लागेल.

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in

READ MORE STORIES…  अशीच एक कथा…

मी ब्रम्हचारी

पाटील पेटले

पाटील पेटले

मराठी कथा  ||  बोधकथा  || स्वलेखन  || Marathi Story  ||  विचारवादी..

 

शेर पिंजरे में क्यों न हो, शेर ही होता है…

 

आज नरखेड जे काही छोटंसं शहराचं रूप धारण करत होतं त्यात विष्णु पाटील अन त्यांच्या पूर्वजांचा मोठा हातभार होता. विष्णु पाटलांचे पूर्वज ह्या भागाचे वतनदार होते. पाटलांचा दौलतवाडा हा तर आजूबाजूच्या शंभर गावांची शान होता. पण वतनदार्‍या गेल्या, वतन गेले, लोकशाही मोठ्या थाटात नांदू लागली होती. पाटलांच्या वंशजांनीही मोठ्या मनाने म्हणा किंवा मजबूरीने म्हणा किंवा काळाची पाऊले ओळखून म्हणा उगाच पाटीलकीचा अट्टहास धरला नाही. काळाच्या ओघात लोकशाहीचा आदर करत पाटील घराण्याने आपला रुतबा, मान-मरातब, आदर मोठ्या खुबीने जपला होता. कुठे नमतं-जमतं घेत तेही काळासोबत पुढे जात होते.

विष्णु पाटलांचे वडील, पंढरी पाटील, म्हणजे एक खंबीर राजकीय नेतृत्व होतं. इथल्या मातीतील जनतेनेही त्यांना भरभरून प्रेम दिलं. ते कर्तबगारीने मोठे झाले अन याच मातीशी मिसळून राहिले. सत्तेचा उपयोग करून ह्या भागाचा अन काही प्रमाणात स्वतःचाही विकास करून घेतला. आजूबाजूच्या गावांची, स्थानिक लोकांची मदत घेऊन नरखेड हे छोटसं गाव त्यांनी छोट्या शहरात बदलण्यासाठी बरीच मेहनत घेतली. त्यांची अख्खी हयात यात खर्ची पडली तेंव्हा नरखेड तालुका झाला.

नरखेड तालुका झाला अन सव्वा महिन्यात विष्णु पाटलांचे वडील अर्थात थोरले पाटील कैलासवासी झाले. थोरल्या पाटलांनी जाताना आपले आशीर्वाद, मोलाचे सहकारी, दौलतवाडा, अन मोठी जमीन विष्णु पाटलांच्या जिवावर सोडली होती. वतनदरी गेली, गावाचा तालुका करताना गेलेली जमीन सोडूनही मोठी जमीन विष्णु पाटलांच्या हाती होती. शहर वसवताना आपल्या जमिनीला सोन्याचे दिवस कसे येतील याची व्यावहारिक जाण थोरल्या पाटलांना होती अन तशी तजवीजही त्यांनी करून ठेवली होती.

विष्णु पाटील थोरल्या पाटलांच्या मागे दौलतीचा गाडा मोठ्या खुबीने हाकत होते. थोरले पाटील सक्रिय राजकरणातून मोठे झाले तरी विष्णु पाटलांना राजकरणात रसही नव्हता अन त्याची फार जाणही नव्हती. त्यामुळेच ते राजकारणापासून अलिप्त राहिले होते. थोरल्या पाटलांएवढा त्यांचा दरारा नसला तरी त्यांच्या मानपानात कुठलीही कमी आली नव्हती. या भागातील जनता त्यांना तितक्याच आदराने वागवायची.

विष्णु पाटलांचीही मोठ्या लोकांत ऊठ-बस होती. विष्णु पाटील तसे शांत-निवांत, सरळमार्गी व्यक्तिमत्व. कुणाच्या अध्यात-मध्यात न येता ते आपापल्या मार्गाने पुढे जायचे. विनाकारण मोठेपणा, रुबाब याचं प्रदर्शन मांडणे ते टाळायचे. त्यांच्या अशा स्वभावाने काही लोक त्यांना, “थोरल्या पाटलांवणी पाणी नाही हे!” म्हणून कमी समजायचे, पण काही जाणकार त्यांच्या अशा स्वभावाने त्यांना फायदाच होईल असं म्हणायचे.

हे चालायचंच! म्हणून विष्णु पाटीलही याकडे कानाडोळा करायचे.

दिवस सरत होते. देशात जागतिकीकरण पसरू लागलं होतं. नरखेडही त्यात मागे नव्हतं. नरखेडही वेगाने वाढत होतं. नरखेड वाढलं, प्रगती करू लागलं तर कोणत्या दिशेने करणार याची तजवीज थोरल्या पाटलांनी आधीच करून ठेवली होती. ज्या भागात पाटील घराण्याची शेकडो एकर जमीन आहे तिकडेच शहर कसं वाढेल, त्या जमिनीला सोन्याचे भाव येऊन आपल्या पुढच्या पिढीला त्याचा कसा उपयोग होईल असा दूरदर्शी विचार थोरल्या पाटलांनी चतुरपणे करून ठेवला होता अन घडलंही तसंच.

पाटलांच्या जमिनीला सोन्याचे भाव येऊ लागले. असलेल्या शेताचे प्लोटिंग करून विकणे, उद्योगाला जमीन देणे, रेल्वेला किंवा सरकारला जमीन देणे यामुळे विष्णु पाटील यांना मोठा फायदा होऊ लागला. इतकं करूनही शहराच्या दुसर्‍या भागात पाटलांची बरीच जमीन शिल्लक होती.

एखादं निष्पाप रोपटं एका विराण जमिनीत येऊन रुजावं नंतर त्यामुळे अजून रोपटे येऊन वसावेत, त्यांची संख्या वाढावी अन नंतर त्यांची बाग व्हाही, वन व्हावं ही गोष्ट नवीन नाही. नंतर त्या वनाला काहीही केलं तरी काढता येऊ नये अशीही परिस्थिती उद्भवल्याचं आपल्याला माहीत आहेच. तेच येथे घडलं.

शहर वाढू लागलं तशी शहराची लोकसंख्याही वाढू लागली. शहरात विविध प्रकारचे लोक येऊन राहू लागले. काही आसपासच्या गावांतील असायचे तर काही दूर कुठूनतरी यायचे अन येथे येऊन काम करून पोट भागवायचे. नोकरदार वर्ग चांगली नौकरी करू लागला अन पैसे कमावू लागला. पाटलांनी केलेल्या प्लॉटला भाव येऊ लागला. नोकरदार वर्ग परवडेल तसे पैसे देऊन जागा घेऊ लागले अन आनंदाने राहू लागले. पण ज्यांना परवडत नव्हतं त्यांना कुठे राहावं असा प्रश्न पडू लागला. गावात प्लॉट घेऊन राहावं इतकी ऐपत त्यांची अजिबात नव्हती. यात सगळा मजूर वर्ग होता. हमाल, गवंडी, सुतार, लोहार, मजूर, सफाई कर्मचारी, शिपाई आणि असे अनेक गरीब वर्गाचे प्रतींनिधी.

शहर वाढत होतं अन अनेक परदेशी स्वप्न येथे साकार होत होते. पण ते साकार करण्यासाठी ज्यांचे हात राबत होते त्यांचा फार विचार कोण करत नव्हतं. हा वर्ग जमेल तेथे आडोसा घेत एक-एक दिवस पुढे ढकलत होता. ऊन-पाऊस-वारा यापासून बचाव मोठ्या कसरतीने करावा लागायचा. सभ्य लोकांना असा उघडावलेपणा डोळ्याने बघायलाही नको वाटायचा. हळूहळू ही समस्या मोठी होत गेली. लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत ही समस्या पोचली. चर्चा वगैरे घडल्या पण त्यांच्याजवळ कुठलाच पर्याय नव्हता. सरकारकडे यांची देखभाल करायला पैसे नाहीत हे मोठं कारण समोर आलं अन सगळे गप्प बसले. आता सरकारकडेच पैसे नाहीत म्हणल्यावर ह्या लोकांची तर काय पात्रता होती घरं घेऊन राहायची. पण लवकरच सरकार यांच्यासाठी स्वस्त घर योजना आणेल अशी घोषणा झाली. ह्या “लवकरच” अर्थ त्या काळी नेमका माहीत नव्हता. तात्पुरती सोय करा असा काहीतरी संदेश आला. मग काय स्थानिक प्रशासन-लोकप्रतिनिधी यांची धावपळ सुरू झाली.

शहराजवळ सरकारच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर या लोकांना तंबू ठोकून द्यायची असा प्रस्ताव पास झाला. पण त्यालाही फार यश आलं नाही. सरकारकडे जास्त जमीन शिल्लक नव्हतीच. सगळीकडे काहीतरी काम चालू होतं, आरक्षण होतं अन काय काय.

शेवटी एक उपाय काढला. शहरातील मोठ्या लोकांची जमीन भाडेतत्वावर किंवा ‘दान’ म्हणून घ्यायची. शोध सुरू झाला. गावातील अनेक व्यापारी अन जमीन मालकांनी यासाठी असमर्थता दर्शवली. कोणालाही ही ब्याद साडेसातीसारखी मागे लाऊन घ्यायची नव्हती. त्यातल्या त्यात सोन्याचे भाव आलेल्या जमिनीला अशा फुकट्या कारणासाठी देणं कोणालाही व्यावहारिक वाटलं नाही. एका बड्या दिलवाल्या माणसाने शहराला लागून असलेली आपली मोकळी जमीन दहा वर्षांच्या अटीवर देऊ केली, पण तेथील मध्यमवर्गीय मंडळींनी त्याला विरोध केला. मजूर वर्ग आपल्या गल्लीत नको असं त्यामागचं खरं कारण होतं. हाही पर्याय मिटला.

शेवटी प्रशासनातील एक माणूस, मजुरांचा एक प्रतींनिधी अन स्थानिक लोकप्रतिनिधी मिळून पाटलांच्या वाड्यावर गेले. जागेच्या बाबतीत ह्या भागात पाटलांएवढं कोणीच श्रीमंत नव्हतं. शहारच्या आजूबाजूला पाटलांची जमीन आहे हे काही लपून नव्हतं.

सगळी समस्या पाटलांच्या कानावर घालण्यात आली. सगळ्यांनी मिळून विष्णु पाटलांना गळ घातली अन रेल्वेच्या बाजूला असलेल्या त्यांच्या शेतजमिनीवर मजुरांना तंबू ठोकून तात्पुरतं राहायची परवानगी द्यावी. सरकार लवकरच स्वस्त घर योजना आणणार आहे अन ती पूर्ण झाल्यावर ही मंडळी आपली जागा सोडतील अशी खात्री त्यांना देण्यात आली.

लोकप्रतिनिधी, सरकार यांच्यावर पुर्णपणे अविश्वास दाखवण्याचे दिवस अजून सुरू झाले नव्हते. पाटील आपल्याला “नाही” म्हणणार नाहीत अशी त्या लोकांची अपेक्षा होती. पाटलांनी गावासाठी इतकं केलं आहे हेही करतील असं सगळ्यांना वाटत होतं. सरळमार्गी विष्णु पाटीलही याला जवळजवळ बळी पडलेच होते.

विष्णु पाटलांशी चर्चा चालू असतानाच पाटलांचे एक तरुण सहकारी त्यांना खुणावत होते. पाटलांची त्यांच्यावर दृष्टी पडली. पाटील निर्णय घेऊन मोकळे होण्याच्या आधी जरा सावध झाले. पाटील निर्णय घेणार होते पण त्यांनी जरा सावकाश घ्यायचं ठरवलं. सगळी चर्चा झाली होती.

पाटील त्या मंडळींना म्हणाले की, “आम्हाला जरा वेळ द्या, तिथे जमीन कशी आहे काय आहे हे तपशील बघतो अन तुम्हाला निरोप धाडतो.”

“हो” अशा निर्णयाच्या अपेक्षेने आलेली मंडळी थोडेसे हिरमुसले होते पण निरोप येईल या अपेक्षेने त्यांचा धीर अजून सुटला नव्हता. चर्चा झाली अन मंडळी निघून गेले.

ती मंडळी निघून गेल्यावर पाटलांनी टोपे नावच्या त्या तरुण सहकार्‍याला “काय झालं?” असं विचारलं.

टोपे म्हणाले की, “मालक त्यांना जर ती जमीन दिली तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. न सुटणारी ब्याद ते कायमचे आपल्या गळी मारायचा प्रयत्न करत आहेत.”

पाटलांना अर्थ कळाला नाही, त्यांनी सविस्तर सांगायला सांगितलं. टोपे सुरू झाले.

मालक, एक तर जी जमीन ते मंडळी मागत आहेत त्याची आजची किम्मत सोन्याहून चमकदार आहे. त्यात आपल्याला त्यातून चांगलं शेतकी उत्पन्न येतं. ती जमीन जर त्या लोकांच्या ताब्यात गेली तर आपल्याला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्या जमिनीत मजूर लोकच राहतील कशावरून? ही लोक पैसे घेऊन कोणालाही तंबू ठोकून देतील अन रहा म्हणतील. त्या लोकांकडून पैसे घेतील. मजुरांना पुढे करून काही लोकांचा त्या जमिनीवर डोळा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही मालक.

पाटील अजूनही पुर्णपणे समाधानी नव्हते.

“ते म्हणाले ना पर की स्वस्त घर योजनेत या मजुरांना धाडू अन जमीन मोकळी करून देऊ.”

टोपे आता तावातावाने बोलू लागले. हो बरोबर आहे. पण ती योजना सुरू कधी होणार अन पूर्ण कधी होणार? त्यात ह्या सगळ्यांना घरं मिळणारच का? न मिळालेले लोक पुन्हा कुठं जाणार? आपली जागा सोडणार का? अन तेथे राहणारे मजूर भलतेच कोण निघाले तर? त्यांनी आपली सोन्यासारखी जागा सोडली नाही तर?

टोपेंनी अनेक व्यावहारिक शंका उपस्थित केल्या.

पाटील जरा अस्वस्थ झाले अन म्हणाले, “आपल्याशी या भागात अशी बेईमानी कोण करल असं वाटत नाई… अजून इतके वाईट दिस आले नाहीत…”

टोपे न राहवून म्हणाले, मालक जुने दिवस कवाच गेले अन नवे दिवस चांगले असतील याची कोण शास्वती? अन लोकशाहित सगळ्यांना बराबर मानतात… माफ करा मला… नंतर कायद्यापुढे आपलाही मुलाहिजा राखला जाणार नाही.

पाटील विचार करून म्हणाले, “मग कसं करायचं म्हंतुस???”

टोपे जराही न थांबता म्हणाले, “सरळ नाही म्हणून टाका.”

पाटील तोंड वाकडं करत म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी या भागासाठी काय नाही केलं, माझी वेळ आली तर मी कसा मागं फिरू, लोकात काय नाक राहील… आपली पाटिलकी नाही टिकणार मग…”

टोपे नुसते कपाळावर आठ्या आणून उभे होते.

शेवटी बराच मेंदू अन वेळ जाळल्यावर दोघांनी एक मार्ग काढला. शहराच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या अन जरा कमी किम्मत असलेल्या पाटलांच्या जमिनीवर त्या मजुरांनी राहावं.

त्या मंडळींना निरोप गेल्यावर ते लागलीच हजर झाली.

पाटलांचा निर्णय ऐकून ते अवाक झाले. पाटील असा निर्णय घेतील असं त्यांना वाटलं नव्हतं. पण पाटलांनी आपला नाईलाज असल्याचं सांगितलं.

मजुरांना कामाच्या ठिकाणापासून खूप दूर यावं लागेल अशी मेख काढण्यात आली. टोपेंनी यावर आधीच काम केलं होतं त्याप्रमाणे त्यावर पाटलांनी येण्या-जाण्यासाठी उपाययोजना सुचवल्या अन त्यातून रोजगार निर्मिती होईल असंही सांगितलं.

ती मंडळी मनापासून खुश नव्हती. पण पाटलांना थेट बोलताही येईना अन याचक म्हणून आले म्हणून जे पदरात पडेल ते घ्यावं लागत होतं. टंगळमंगळ करत ती मंडळी तयार झाली. काहीच नसल्यापेक्षा काहीतरी असणं बरं असा विचार त्यांनी केला असावा.

जमीन कोणती द्यायची, कशी द्यायची ही सगळी जबाबदारी पाटलांनी टोपे यांच्यावर सोपवली. टोपे विश्वासाचे होते. शिवाय शिकलेला माणूस. त्यांनी लागेल तितकीच जमीन आखून दिली. दिलेल्या जमिनीला संरक्षण भिंत उभी करून दिली जेणेकरून न दिलेल्या जागेत कोण घुसू नये. कोण राहणार, किती राहणार याची बारीकपणे नोंद करण्यात आली. दानधर्म पण व्यावहारिकपणे आणि चोख केला गेला. काम फत्ते झालं होतं.

 

बरीच वर्षे उलटली. पाटील आता थकले होते. नरखेड आता नटलं होतं, चारी दिशेने वाढलं होतं. राजकरणी, प्रशासन, सरकार यांच्यावर विश्वासाचे दिवस मावळले होते. जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या, अपेक्षा केली नसावी तितक्या वाढल्या होत्या. पाटलांनी पुढच्या पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती केवळ जमिनीच्या व्यवहारातून जमवली होती. त्याकाळी टोपे म्हणाले ते ऐकलं ते बरं झालं असं पाटलांना वाटत होतं. जी जमीन आधी मागितली होती त्या एका जमिनीवर पाटलांची गगनचुंबी इमारत उभी होती अन त्यांची शान वाढवत होती. जुना दौलतवाडा ढासाळत होता.

विष्णु पाटलांचा स्वभाव अजूनही बदलला नव्हता. शहर चारही बाजूंना वाढलं होतं. सरकारचं ‘लवकरच’ धोरण अजून सुरूही झालं नव्हतं. ज्या बाजूची जमीन मजुरांना दिली होती तिकडेही शहर मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्या जमिनीलाही मोठी किम्मत होती. पण ती जमीन आता पाटलांच्या ताब्यात नव्हती. मजुरांना दिली तेंव्हापासून त्यांनी त्या जमिनीवर पायही ठेवला नव्हता. त्यांना जे अपेक्षित नव्हतं तेच झालं होतं. तेथील मजूर केंव्हाच गायब झाले होते, त्यांनी इथे जमीन भलत्याच कोणालातरी विकली होती. तंबू तर सहा महिन्यात उडाले अन मग पत्र्याचे अन भिंतीचे पक्के घरं आले होते.

पाटलांना आता मनस्ताप, पश्चाताप होत होता. प्रश्न पैशाचा नव्हता, विश्वासाचा अन त्याच्या घेतलेल्या गैरफायद्याचा होता. जमीन पाटलांची, दान किंवा तडजोड म्हणून काही काळासाठी ती दिली मजुरांना. मजुरांनी परस्पर सौदा करून भलत्यालाच विकली.

पाटील हतबल होते. टोपे यांनी कष्ट करूनही आजूबाजूची जमिनीवर अतिक्रमण झालं होतं. पाटलांना क्लेश होत होते. टोपे यांना पाहिलं की पाटलांना ती जमीनच आठवायची. सगळी अवैध वस्ती असल्याने तेथे चांगले प्रकल्प उभा राहत नव्हते. आजूबाजूची जमीनही उपयोगी पडत नव्हती. तेथे राहणार्‍या परक्या लोकांची मगरुरी होती ती वेगळीच. पाटलांनी एकदा पोलिसात तक्रारही केली अन जमीन परत मिळवण्याचे प्रयत्नही केले पण सगळं निष्फळ गेलं. लोकशाही नांदत होती. जमीन दिली नाही तर पाटिलकीला डाग लागेल या भीतीने विष्णु पाटलांनी ती जमीन दिली होती, पण जमीन दिल्याने तोंडघशी पडून पाटीलकीला अन त्यांच्या दरार्‍याला डाग पडतोय याची खंत त्यांना होती.

पाटील बरेच थकले होते. मरायच्या आधी काहीही झालं तरी जमीन परत मिळवायची असा प्रण त्यांनी केला होता. लोकशाहीत लवकर काहीच होत नसतं याचा शोध उशिरा लागला होता.

पाटलांनी वकिलांची फौज उभी केली अन जमीन मिळवण्याचे प्रयत्न वेग धरू लागले. पाटील घराण्याचं रक्त त्यांना दाखवून द्यायचं होतं.

एक दिवस उजाडला अन पाटलांचा आनंद गगनात मावेना. न्यायालयाने निकाल दिला की पाटलांनी मोठ्या मनाने दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण हे न्यायविरोधी आहे, पाटलांना ताबडतोप जमीन परत मिळावी.

आता पाटील थांबणार नव्हते. विष्णु पाटील पेटले होते. पाटलांनी सगळी शक्ति पणाला लावली. ओळखी-पाळखीच्या सर्व मोठ्या नेत्यांना हाताशी धरलं. पोलिस अन स्वतःची शंभर-एक पहलवान लोकांची फौज घेऊन पाटील त्या जमीनिसमोर उभे राहिले. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्या जमिनीला पाटलांचे पाय लागले होते. जमीनही शहरून उठली होती. जमिनीवर अवैधपणे राहणार्‍या लोकांचा धिंगाणा सुरू होता. मारामारी, बाचाबाची सुरू होती. अनेकांनी पाटलांना धीर धरा, शांतपणे घ्या, मागे व्हा असं सांगितलं. पण पाटलांनी मागे होण्याचं साफ नाकारलं. टोपे स्वतः सगळं समोर होऊन आवरत होते.

लोकांना बाजूला करून घरं पाडायला सुरुवात झाली होती, पण सीमेंट-विटाचे घर हातांनी पडेनात. शेवटी बुल्डोजर आला. लोक अजून खवळले. काही येऊन बुल्डोजर समोर आडवे झाले. पाटलांना राहवलं नाही. मेंदू तप्त झाला होता अन रक्त सळसळत होतं. झालेल्या विश्वासघाताने अन इतक्या वर्षाच्या प्रतिक्षेने ते चवताळून उठले. पाटील बुल्डोजरकडे धावले. हातातील काठी फेकून दिली. पाटील ह्या वयात स्वतः बुल्डोजरवर चढले. सगळे त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघू लागले. अंगावर शहारा आला. लोकंही घाबरली. त्यांचा रुद्रावतार प्रथमच दिसत होता.

पाटलांच्या पवित्र्याने आता समोरचा विरोधही मवाळ झाला.

पाटलांनी डरकाळी फोडली अन बुल्डोजर घरांवर फिरू लागला. बघता बघता अनेकांचे संसार कोसळले. लोकं हाय देऊ लागले. पाटलांना शिव्या देऊ लागले. पण गावातील लोकांनी पाटलांच्या हिमतीला दाद दिली होती. मोठ्या मनाने केलेल्या मदतीला लोकांनी गैरफायदा घेतला होता. चीड होती. पाटलांनी सगळी घरे जमीनदोस्त केली.

जमीन मोकळी झाली.

ती पाटलांची जमीन होती. पाटील बराच वेळ तेथे उभे राहून मोकळ्या अन स्वतःच्या मालकीच्या जमिनीकडे अभिमानाने पाहत होते.

आज प्रथमच नरखेडने विष्णु पाटलांचं असं रूप पाहिलं होतं. पाटलांचं खरं रक्त समोर आल्याची चर्चा सुरू होती. अनेकांना पंढरी पाटलांची आठवण झाली. शांत असणारे पाटील पेटलेले पाहून अनेक जणांना कौतुक वाटत होतं. उदो उदो चालू होता.

दुसर्‍या दिवशी सर्व स्थानिक वृत्तपत्रात विष्णु पाटलांना विजयी घोषित केलं होतं अन नायकाच्या रूपात दाखवलं होतं.

एका वृत्तपत्राची पहिल्या पानावर बातमी होती, “पाटील पेटले!!!”

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in

Some More Stories…. अजून कथा वाचा… 

खिडकी: भाग १

बनाएंगे मंदिर!

बनाएंगे मंदिर!

मराठी कथा  ||  सामाजिक वगैरे  || वादग्रस्त  || Marathi Story  || देऊळ  ||  स्वलेखन 

 देवा, तुला शोधू कुठं…

 

मंदिरात भुतडा सेठजी मोठ्या गर्वाने फिरत होते. मनाने भक्त अन पेशाने व्यापारी असलेल्या एका गृहस्थाला सांगत होते की, “आपला ह्या मंदिरासाठी महिन्याचा खर्च वीस लाख रुपयापर्यंत असतो.” असा आकडा ऐकून दूसरा व्यापारीही डोळे मोठे करून व्वा! व्वा! करतो. भुतडा सेठजी येणार्‍या प्रत्येक व्यापर्‍याला अथवा बड्या माणसाला मंदिर परिसराचा संपूर्ण आवार स्वतः फिरून दाखवत असत. मंदिराची सगळी व्यवस्था समजावून सांगत असत आणि शेवटी त्यांनीही येथे ‘investment’ करावी असं सांगत. भुतडा सेठजींची मान अजून ताठ होत असत.

भुतडा हे तसं शहरातील बडं प्रस्थ. त्यांचे पूर्वज हे गावातील जुने व्यापारी. आज त्यांच्या नावावर शहरात एक सोन्या-चांदीचं मोठं दुकान होतं, पारंपरिक धान्य विक्रीचा धंदा तर नेहमीप्रमाणे तेजीतच होता. एका मुलाची स्वतःची बांधकाम क्षेत्रात मोठी कंपनी होती, हॉटेल्स होते, शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा होत्या, शैक्षणिक संस्था होत्या.

शहरात त्यांच्या घराण्याला मोठा मान होता, त्यांच्याबद्धल आदरही होता. असं सगळं काही होतं. आणि एक होतं शहरातील जुनं बालाजी मंदिर! अर्थात होतं. आता ते त्यांचं नव्हतं.

त्याचं असं की, गावात एक प्राचीन बालाजी मंदिर होतं. त्याचा जीर्णोद्धार केला जाणार होता तेंव्हा भुतडा घराण्यातील आधीच्या पिढीचे गंगाधर भुतडा यांनी स्वतः पुढाकार घेऊन आर्थिक व इतरही बरीच मदत केली.

भुतडा घराणं हे पहिल्यापासूनच श्री बालाजीचे मनस्वी भक्त होते. भक्त ह्या नात्यानेच गंगाधर सेठजींनी मंदिरासाठी सेवा केली. इतर लोकांनीही त्यांचा मान केला. त्यांची एकंदरीत भक्ति आणि सेवा पाहून मंदिराचा जेंव्हा ट्रस्ट झाला तेंव्हापासून गंगाधर सेठजी त्या ट्रस्टचे अध्यक्ष राहिले. अध्यक्ष असले तरी ते एका सेवकाच्या भूमिकेतूनच सर्व कामकाज पार पाडत होते. लोकांनाही त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. सर्व काही सुरळीत चालू होतं.

गंगाधर सेठजींच्या नंतरची पिढी, अर्थात त्यांचे सुपुत्र जमनालाल भुतडा हे त्यांचे वारस होते. गंगाधर भुतडा यांच्या मृत्यूनंतरचा, मध्यंतरीचा काही काळ वगळला तर भुतडा कुटुंबाला पुन्हा ट्रस्टचं अध्यक्षपद द्यावं असं इतर सदस्यांनी ठरवलं. त्यानंतर जमनालाल हे त्या ट्रस्ट चे अध्यक्ष झाले.

पण जमनालाल हे ‘पुढारलेल्या’ विचारांचे होते. त्यांनी काळाप्रमाणे मंदिर देवस्थानामध्ये बदल करायला सुरुवात केली. त्यांनी मंदिराला एक ‘व्यावसायिक’ स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू केला.

जमनालाल हे अतिशय व्यावहारिक गृहस्थ होते. केवळ पाच-सहा वर्षांत त्यांनी पूर्वजांचा रूढीपार चालू असलेला व्यापार दुप्पट केला होता. विविध क्षेत्रात हातपाय पसरून त्यात यश अन पैसा मिळवला. त्यांच्या गुणवत्तेबद्धल कोणालाही शंका नव्हती. पण त्यांचा देवस्थांनातील व्यावहारिकपणा बर्‍याच जणांना बोचू लागला. भक्त तर तेच होते पण त्यासोबत व्यापारी प्रवृत्तीची मंडळी जास्त येऊ लागली. मंदिरात मंगल कार्यालय, दुकान, साहित्यविक्री, आकर्षक गुंतवणूक योजना, पतपेढी, मंदिराची आसपासच्या गावांत जाहिरात व इतर अनेक गोष्टींतून जमनालाल यांनी देवस्थांनाची आर्थिक बाजू सुधृड केली.

ह्या सगळ्या बाबी खुपणार्‍या लोकांची संख्या वरचेवर वाढू लागली. शिवाय, जमनालाल समितीचा कारभारही एकाधिकारशाहीने हाकू लागले अन समितीवर अनेक व्यापारी लोकांची नियुक्ती करू लागले.

व्हीआयपी दर्शन सुरू झालं. पैसे देणार्‍याला लवकर दर्शन मिळू लागलं. जेंव्हा एका उत्सवादरम्यान महाप्रसाद व इतर गोष्टीवरून भक्तांची पिळवणूक झाली तेंव्हा इतर लोक पेटून उठले. आता खूप झालं! हेच सर्वांच्या तोंडी होतं. भुतडा घराण्याचा मान व पुण्याईला बघून आजवर सर्वच लोक शांत होते पण अतिरेक झाल्यावर त्यांचा नाईलाज झाला.

अखेर एक कटू निर्णय घेण्यात आला. शहरातील जुनी मंडळी, भक्त आणि समितीवरील इतर लोकांनी जमनालाल व त्यांच्या सहकार्‍यांची ट्रस्टवरुन हकालपट्टी केली. त्या लोकांना मंदिरात केवळ एका भक्ताच्या माणानेच मंदिरात यावं असा निर्णय झाला. जनरेटा अन जनप्रक्षोभ यापुढे यापुढे भुतडा घराण्याला झुकावं लागलं.

जमनालाल ‘अपमानित’ भावनेतून ह्या सर्व गोष्टींपासून दूर झाले. पण त्यांच्या मनात तो अपमान, तो पराभव सलत होता. त्यांच्या मनाला तीव्र वेदना होत होत्या. रात्ररात्र ते ह्याच गोष्टींचा विचार करून जळत होते. शेवटी त्यांनी एक निर्धार केला… एक निर्णय… त्यांचं अन अनेकांचं आयुष्य बदलणारा निर्णय…

सेठजींचं वय आता साठीला आलं होतं. त्यांना दोन मुलं होती. त्यांनी एका मुलाला अन त्याच्या पत्नीला संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी देऊन टाकली. दूसरा मुलगा सिविल इंजीनियर होता. त्याचा त्यांना त्यांच्या ‘निर्धारात’ उपयोग होणार होता.

सेठजींनी शहरापासून थोडं दूर, तिरुपति बालाजीची प्रतिकृती असलेलं एक भव्य मंदिर उभारायचा संकल्प सोडला होता. प्रतीबालाजी !!

असं मंदिर जे भाविकांची गर्दी ओढेल, असं मंदिर जे एक भक्तीसह व्यापाराचा एक उत्कृष्ट नमूना असेल, असं मंदिर जे आसपास कोठेच नसेल, असं मंदिर जे देखणीय स्थळ असेल, असं मंदिर जे बघून डोळे दीपतील, असं मंदिर जेथे सेठजींचा शब्द अंतिम असेल, असं मंदिर जे शहरातील बालाजी मंदिर बंद पाडून सेठजींच्या अपमानाचा बदला घेईल!!!

सेठजी तातडीने कामाला लागले होते. त्यांना जळी-स्थळी-पाषानी-अत्र-तत्र-सर्वत्र-ध्यानी-मनी-स्वप्नी ते प्रस्तावित मंदिर दिसू लागलं. ते रात्र-रात्र काम करू लागले. भेटी-गाठी वाढू लागल्या, फिरणं वाढलं. त्यांनी शहरापासून दूर अशी एक जागा बघितली जी त्यांना मोक्याची वाटली. तेथे आसपास दोन-तीन गावे होती. त्यांनी तेथील शेतकर्‍यांना गोळा केलं. ज्यांची जमीन होती त्यांच्याशी चर्चा सुरू झाल्या.

सेठजींचं नशीब बलवत्तर होतं, दोन-तीन वर्ष तो विभाग दुष्काळाने होरपळून निघाला होता. शेतकरी मेटाकुटीला आले होते. त्यांना सेठजींनी मोठ-मोठी आश्वासणे दिली, भावनिक साद घातली, वाट्टेल तितका पैसा मोजला, गरज पडल्यास दडपशाही व इतर मार्गांचा वापर केला. त्यांना तेथील दीडशे एकर जागा कुठल्याही अटींवर पाहिजेच होती. सेठजी माघार घेणार नव्हते. त्यांनी एक-एक नामी युक्त्या सुरू केल्या. मंदिर बांधणीच्या कामात मदत करा, हे देवाचं काम आहे, यात अडसर आणून स्वतःच्या माथी पाप घेऊ नका असं भावनिक आव्हान झालं.

बरेच भोळे लोक अडकले. काहींना त्यांनी समितीवर घेतो असं आमिष दाखवलं. मंदिर आल्यावर अनेकांना रोजगार मिळेल, गावात पैसा येईल अशा गोष्टी समजावून सांगितल्या.

शेवटी सेठजी जिंकले. त्यांना हवी असलेली जमीन त्यांनी मिळवली. सेठजींचे करोडो रुपये खर्च झाले होते. पण सेठजींना पैशाची पर्वा नव्हतीच. ते एका वेगळ्याच मानसिकतेने पछाडले गेले होते. त्यांना ते करून दाखवायचं होतं जे त्यांना गावातील मंदिरात करू दिलं नव्हतं. त्यांना स्वतःला सिद्ध करायचं होतं अन स्वतःच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता.

जमीन मिळाल्याच्या नंतर त्यांनी स्वतःच्या मुलाकडून त्या जागेचा बांधकाम नकाशा तयार करून घेतला. यासाठी त्यांच्या मुलाला दोन महीने तिरुपति बालाजीला जाऊन मुक्काम करावा लागला होता. सेठजींनी तिरुपति बालाजी देवस्थानाला संपर्क केला, स्वतःचं ‘पवित्र’ कार्य सांगितलं; त्यात मदत करायचं आव्हान केलं. तेथील मंदिर समितीनेही श्रध्देच्या भावनेतून थोडीशी आर्थिक रसद, बालाजीची प्रतिकृती असलेली मूर्ति आणि इतर गोष्टी जमवून दिल्या.

इकडे सेठजींनी आसपासच्या शहरातील, गावातील श्रीमंत लोकांना संपर्क करायला सुरुवात केली. नवीन मंदिराच्या समितीत येण्याची गळ घातली. व्यापारी लोक एकंदरीत ‘प्लॅन’ पाहून खुश होत होते. त्यांना भक्ताच्या नजरेतून नव्हे तर व्यापारी दृष्टीकोणातून हा प्रकल्प नफ्याचा वाटू लागला.

काळा पैसा पांढरा करायला एक स्कीम हवी होती ती सुरू झाली होती.

त्यांनी ह्यात गुंतवणूक करायला उत्साह दाखवला. मंदिराच्या आजूबाजूचे प्लॉट आणि व्यापारी गाळे विकले गेले. सेठजींचा बराचसा खर्च निघू लागला. इतर बाजूनेही त्यांनी व्यापार सुरू केला. मंदिराच्या कामासाठी लागणारी साधन-सामुग्री ते ‘दान’ ह्या स्वरुपात घेऊ लागले. भक्तही मोठ्या मनाने आणि सढळ हाताने मदत करत होते. आसपासच्या गावाचे सरपंच व इतर राजकीय लोकांचा यात ‘interest’ वाढला. त्यांना येथे भक्तांच्या रूपाने मोठी मतपेटी दिसत होती. त्यांनीही काळा पैसा यात गुंतवला.

पैसा कसलाही असो गरिबाचा, श्रीमंतचा, काळा-पांढरा देव तो स्वीकार करतो, असं आपण मानतो. सेठजींनीही येणार्‍या लक्ष्मीला प्रणाम केला. दुष्काळाचे दिवस असले तरी पैशांचा सुकाळ होता. अनेकांना यातून रोजगार भेटणार होता. दुष्काळी स्थितीतही पाण्याची कमतरता भासू न देता बांधकाम जोरात सुरू होतं.

केवळ दोन वर्षांच्या कालावधीत सेठजींच्या इच्छाशक्तीने एका नव्या भव्यतेची निर्मिती केली होती. एक अप्रतिम, सुंदर, रेखीव, भव्यदिव्य, एखाद्या राजवाड्याप्रमाणे भासणारं तिरुपति बालाजीची प्रतिकृती असलेलं मंदिर उभं राहिलं होतं. मंदिर उभं राहायच्या आधीच मंदिराची चर्चा पंचक्रोशीत चालू होती. सेठजींनी प्रत्येक प्रसंग ‘event’ कसा होईल याची काळजी घेतली. मूर्तीच्या प्रतिष्ठापना ते मंदिर उद्घाटन सोहळा हे सगळं भव्यदिव्य आणि एका इवेंटप्रमाणे केलं आणि त्यातून लोकांची गर्दी जमवली होती. लोकांची ‘भक्ति’ वाढली होती. प्रत्येकजण मंदिरात येऊन जाण्यासाठी वेळ काढायचा. भक्त म्हणून नाही तर  मंदिराची भव्यता बघण्यासाठी यायचे, काही लोक निवांत वेळ घालवण्यासाठी यायचे, काही फिरण्यासाठी, काही व्यापारासाठी तर काही नुसतेच! सगळ्यांची सरमिसळ गर्दी झाली होती. सेठजी भयंकर खुश होते. यश त्यांना खुणावत होतं.

मंदिर परिसरात अनेक गोष्टींची सोय करण्यात आली होती. भव्य देखावे होते, प्राचीन मुर्त्या आणून ठेवल्या होत्या, वॉटर-पार्क होते, बडे हॉटेल्स होते, मंगलकार्यालय होतं, नाट्यगृह होतं, मनोरंजनाचे इतर पर्याय होते. सगळं होतं…

दर आठवड्याला नवनवीन संतांचे प्रवचन होत असत, रात्री कीर्तन चालू असायचे, अन्नछत्र चालू होतं. लोकांना आकर्षित करण्याचे नाना प्रकार यशस्वी होत होते. सेठजींनी सुरूवातीला गुंतवलेला पैसा अजून पुर्णपणे निघाला नव्हता, पण सुरुवातीचाच प्रतिसाद बघता हा ‘प्रकल्प’ नुकसानीत जाणार अशी तीळमात्रही शक्यता नव्हती. मंदिर काम व देखभालीसाठी अनेक स्वयंसेवक आणि पगारी नोकर राबत होते.

अजूनही मंदिर परिसरात कामकाज चालूच होतं. मंदिराला सोन्याचा कळस चढवायचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यासाठी देणग्या गोळा करणं चालू होतं. अनेक श्रीमंत लोक स्वतःहून पैसा घेऊन येत होते. देवाची भक्ती होती की देवावर असलेल्या भक्तीचा-श्रध्देचा देखावा होता माहीत नाही, पण स्वतःच्या नावाच्या गर्जनेसह मोठमोठाल्या देणग्या दिल्या जात होत्या.

सगळीकडे सेठजींचा शब्द अंतिम मानला जायचा. तेच येथील सर्वेसर्वा होते. देवस्थान हे मंदिर कमी अन एक picnic spot जास्त होत होता. पैशाला भक्ती अन श्रद्धेपेक्षा मोठं स्वरूप प्राप्त झालं होतं.

दर्शनाच्या वेगवेगळ्या रांगा लागत होत्या. पैसे देऊन दर्शन घेणार्‍यांची एक अन सामन्यांची एक! महाप्रसादाच्या एका पेढ्यासाठीही पैसे भरावे लागायचे. पैसे देऊन अभिषेक, आरत्या, पुजा, पाठ करणार्‍यांसाठी थेट गाभार्‍यात प्रवेश होता आणि सामान्यांना दुरूनच देवाचा आशीर्वाद घ्यावा लागायचा.

प्रत्येक वस्तूवर सरकार कर आकरतं त्याप्रमाणे येथेही प्रत्येक देखावा पाहाण्यासाठी पैसे भरावे लागायचे. श्रीमंत व मध्यमवर्गीय लोक पैसा टाकून सगळं मनसोक्त लुटत होते आणि गरीब लोक त्यांच्या अन त्यांच्या मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद बघून समाधानी होऊन हात हलवत परत फिरायचे.

पैसेवाली मंडळी आणि त्यातल्या त्यात मोठ्या पदावर असलेले नोकरदार आणि बडे व्यापारी तर खूप खुश होते. नेहमीच्या कटकटीतून जरा विसावा मिळेल असं हक्काचं ठिकाण त्यांना मिळालं होतं. सुट्टीच्या दिवशी त्यांची येथील भेट ठरलेली असायची. त्यातील बर्‍याच मंडळींनी त्याच प्रकल्पात प्लॉट व घरे विकत घेतली होती.

सेठजींचा अंदाज होताच तसा!

कोणता वर्ग आकर्षिला जाणार हे सेठजींनी आधीच अचूकपणे हेरलं होतं. आसपासच्या शहरांत जाहिरातही तशीच केली जात होती, देवाच्या आशीर्वादाच्या सानिध्यात, पवित्र वास्तूचा सहवास! अशा जाहिरातीला अनेक प्रतिसाद येत होते. सातवा वेतन आयोगवाले, व्यापारी, बडे शेतकरी, नेते, अभिनेते किंवा अजून कोणी, भल्या-भल्यांनी येथे जागा घेऊन ठेवल्या होत्या. येथे कसला आयकर नव्हता, कसली पावती नव्हती आणि कसली सरकारी कटकट नव्हती. बेहिशोबी पैशाची विल्हेवाट लावायची ऊतम जागा.

ह्या यशानंतर तर सेठजींचा गर्व स्वर्गाहूनही अजून काहीतरी मोठं प्राप्त झाल्याचा आवेगात होता. सेठजींनी पैज जिंकलीच होती जणू! स्वतःच्या अपमानाचा बदला घेतला होता. आपल्या व्यावसायिक बुद्धिचं सारं कौशल्य पणाला लाऊन, मेहनत घेऊन त्यांनी हे सर्व साध्य केलं होतं.

असं असलं तरी शहरातल्या प्राचीन मंदिरातील गर्दी काही कमी झाली नव्हती. रोज संध्याकाळी तेथे गावातील बायका न चुकता यायच्या, तेथे विनाअट प्रवेश-प्रसाद चालू होता, वेदिक पद्धतीने पुजा-अर्चा चालू होत्या, भक्त तेथेही डोकं टेकवायला जरूर जायचे, पण आजकाल चर्चा तर सेठजींच्या गावाबाहेरील भव्य मंदिराचीच जास्त होती.

अगदी टीव्हीवाले सुध्दा सेठजींची मुलाखत घेऊन गेले, त्यांच्या मंदिराचं वैभव पाहून गेले अन नंतर जगाला दाखवू लागले. गावातील स्थानिक वृत्तपत्र आणि पत्रकारांना सेठजी न चुकता पाकीट पाठवायचे आणि वृत्तपत्रांतून न चुकता त्यांच्या मंदिराची महती छापून यायची.

सेठजींना काही मंडळींनी प्रश्न विचारले होते की, हा श्रद्धेचा बाजार नव्हे का? यात लागलेला पैसा कुठून आला? मंदिरात मनोरंजनाची साधने कशाला? मंदिराची जाहिरात कशासाठी?

सेठजी सांगायचे, लोकांची खरी भक्ति देवावर आहे आणि त्याच्याच ओढीने ते येथे येतात. जाताना त्यांना, त्यांच्या मुलांना काहीतरी नवीन पाहायला मिळावं, आनंदाने चार क्षण घालता यावेत यासाठी ही मनोरंजनाची साधने आहेत. देवाला आल्यावर मन प्रसन्न करून पाठवणे हे मंदिर समितीचं कर्तव्य आहे. आमच्या मंदिरामुळे आजूबाजूच्या गावातील अनेक तरुणांना रोजगार भेटला, येथे विकासाची कामे होऊ लागली आहेत, सर्व सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत, लवकरच येथे शाळाही सुरू होईल वगैरे गप्पा सेठजी अतिशय मनोभावे सगळ्यांना पटवून देत. हे सांगताना सेठजी चेहर्‍यावर अतिशय सात्विक भाव आणत आणि नम्रपणे निवेदन करत.

तसं पाहायला गेल्यावर सेठजींच्या बोलण्यात तथ्यही होतं. कशाचा का असेना पण बाजार चांगला चालत होता. रोजगार उपलब्ध झाला होता, त्या दुष्काळी भागाची प्रगती होत होती, पर्यटन वाढत होतं, प्रशासनाला रस्त्याची, पाण्याची सोय करावीच लागली होती, त्या भागाची अन सोबत सेठजींचीही प्रसिद्धी होत होती अशा सकारात्मक घटना घडत होत्या, भले त्याची सुरुवात कुठल्याही द्वेष, मत्सर, अहंकारच्या भावनांनी का होईना!

येथे सर्वकाही आलबेल होतं अशातला भाग नव्हता. एकदा एक दहा वर्षाचा पोरगा व्हीआयपी रांगेत घुसला आणि तसाच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करत होता. त्याला व्हीआयपी अन साधी रांग वेगळी असते याबद्धल माहिती नव्हती. तो थेट देवाजवळ जात होता. सेठजी समोरच बसले होते. त्यांच्या नजरेला ही बाब पडली आणि त्यांचं मस्तक पेटलं. आपण इतकं उत्तम नियोजन ठेवतो आणि असे फुकटे येऊन दर्शन घेऊन जातात याचा त्यांना राग आला होता. त्यांनी त्या पोराच्या हाताला धरून ओढत त्याला मंदिराच्या बाहेर काढलं. सेठजींचं दुर्दैव होतं की तो मुलगा दलित होता. देशभरात वादंग उठलं. राज्य, राष्ट्रीय माध्यमांनी ती घटना उचलून धरली. प्रश्नोत्तरे झाली आणि काही दिवसांनी त्या वादावर पडदा पडला.

इतका वाद झाला तरी स्थानिक माध्यमांनी याची दखल घेतली नाही कारण त्यांची नैतिकता सेठजींच्या पाकीटामुळे गहाण पडली होती. ह्या प्रकरणात देवस्थांनाची बदनामी झाली पण तेथे येणार्‍या व्यापार्‍यांची अन भक्तांची काही कपात झाली नाही. हे थोडक्यात निभावालं.

नंतर एकदा नवनिर्वाचित स्थानिक आमदार व मंत्री त्या मंदिराला भेट द्यायला आले होते. सेठजींना बड्या लोकांच्या पुढे-पुढे करणं गरजेचं होतं.

सेठजी मोठ्या अदबीने, दोन्ही हात पोटावर बांधून मंत्री महोदयांना सर्व सवारी घडवत होते. अडाणी मंत्रीही मान हलवत सगळीकडे डोळे मोठे करून बघत होते. सगळे सोपस्कार झाले. मंत्री देवस्थानावर भलते खुश झाले. तेथे येणार्‍या भक्तांकडे ते मतदार म्हणून पाहत होते. त्यांच्यावर नियंत्रण यावं म्हणून ते मंदिरात partnership मागत होते. सेठजींनाही सत्तेच्या जवळ जाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी तात्काळ होकार दिला.

मंत्री महोदय समितीवर दाखल झाले. पदाचा गैरवापर करून मंदिराचा उद्धार सुरू झाला. विरोधकांना याचा सुगावा लागला पण मंत्र्याचे पाय खोलात जावेत म्हणून ते सुरूवातीला जरा शांत होते. शेवटी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देवस्थांनाच्या नावावरून मंत्र्यांवर आरोप सुरू झाले. दिवस निवडणुकीचे असल्याने कारवाई निश्चित होती. देवस्थांनाच्या आर्थिक चौकशीचे आदेश निघाले. सर्व समिती बरखास्त केली आणि त्यावर सरकारने नियंत्रण मिळवले.

सेठजींना दुधातून माशीप्रमाणे बाजूला केलं गेलं. सेठजी प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांचा करोडो-लाखोंचा पैसा अडकला गेला आणि शिवाय चौकशीचा ससेमिरा लागला. हाताने लावलेलं झाड दूसरा ताब्यात घेतो आणि त्यावर हक्क सांगतो तो प्रकार झाला होता.

पण ईश्वराच्या बाबतीत निवडा ईश्वरानेच करायचं ठरवलं होतं. एक काळरात्र आली अन सगळं कवेत घेऊन गेली. भूकंप! त्या भागात प्रचंड भूकंप झाला. अनेक घरे पडली, लोक मेली, विध्वंस झाला. आणि त्या मंदिराच्या बाबतीत तर भलताच प्रकार घडला. मंदिर व आजूबाजूचा संपूर्ण परिसर जमिनीत धसल्या गेला आणि तेथे शिल्लक राहिला तो मोठा विवर!!! वैज्ञानिक ह्या सगळ्याचा अजून शोध घेत आहेत. अनेकांचा रोजगार हिसकावला होता. चर्चा चालू होत्या.

सेठजी दुसर्‍या दिवशी सकाळी आपल्या पलंगावर मृत पावले गेले.

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in // @Late_Night1991

अजून काही कथा…

देव पावला

रुचा

रुचा

मराठी कथा  || स्वलेखन  || Marathi Stories  || लघुकथा  ||  साहित्य  || लिखाण  || मोबाइल जग / आभासी जग ||

 

रुचा सोफ्यावर पडून आपल्या मोबाइलवर काहीतरी करत होती. तिच्या चेहर्‍यावर पडणार्‍या मोबाइलच्या प्रकाशामुळे तिचे डोळे चमकत होते. ती एकटक त्यात काहीतरी बघत होती. कानात हेडफोन घुसवलेले होतेच. ती आपली मस्त गाणी ऐकत मोबाईलवर ट्विटर बघत बसलेली असते.

घरात सगळीकडे कामाची लगबग चालू असते. आई, बाबा, आजी, आजोबा सगळेजण काहीतरी काम करण्यात गुंग असतात. सगळे खूप घाईत, गडबडीत अन व्यस्त आहेत. सगळ्यांना काम कसं पूर्ण करावं याचे हिशोब पडले आहेत. त्यात सगळे एकमेकांनाच ऑर्डर सोडत असतात.

इतकं सगळं चालू असतं ते कशासाठी?

कामाचा ताण कितीही असला तरी सगळ्यांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसत आहे. त्यांना कुठल्यातरी गोष्टीचा आनंद अन समाधान होतं. प्रत्येकजण आपलं काम कसं चोख पूर्ण होईल याचाच विचार ते करत आहेत.

पाहुणे?

पाहुणे म्हणजे, सगळ्यांच्या घरात येणारे, सगळ्यांचे लाडके… गणपती बाप्पा अन गौरी माता! गौरी-गणपतीचा सण!

गेली दोन महीने रुचाला तिचे बाबा बजावून सांगत होते की काहीही झालं तरी यंदाच्या गौरी-गणपती सणाला तू आलंच पाहिजेस. रुचा परदेशात नोकरी करणारी तरुणी. जर्मनी! गेली दीड वर्षे ती तिथेच काम करत आहे. ती ह्या घरातील एकुलती एक! तिला ना भाऊ ना बहीण. त्यामुळे सगळ्यांची लाडकी. गेली अनेक वर्षे ती शिक्षण अन नोकरीसाठी आपल्या घरापासून-गावापासुन दूर राहिलेली. त्यामुळे तिला घरातील कुठल्याच गोष्टींशी फार जवळचा संबंध आला नाही. लहानपण अभ्यास अन लाडात गेलं आणि मोठेपण गावाबाहेर शिक्षण अन नौकरीसाठी. तिच्या घरच्यांनीही तिला कधीच कसल्या बंधनात अडकून टाकलं नाही. मुलगी अन मुलगा असा भेद तिथे कधी रूजलाच नाही. तिला तिच्या आयुष्यात तिला हवं ते करण्याची मुभा दिली होती. आणि तिनेही सगळीकडे यश मिळवत घरच्यांचा विश्वास सार्थ ठरवला.

पण आज तिची तिशी जवळ आली होती. घराण्याला वारस नाही याचं दुखं असण्यापेक्षा आपली परंपरा, संस्कृती खुंटुन बसेल याची घरच्यांना रुखरुख वाटत होती. पैसा-संपत्ती तर कोणच नेत नाही, पण जाताना एक संस्कृती-परंपरा मागे असावी यासाठी धडपड असतेच.

त्यासाठीच तिच्या बाबांनी-आजोबांनी तिला सणवार करायला आपल्या गावी येण्यासाठी गळ घातली होती. जेणेकरून घरातील संस्कार-रिती तिला माहीत होतील. ते पाळावेत अशी बंधने तिच्यावर लादायची नसली तरी ते तिला माहीत असावेत, त्याच्याशी ती समरूप व्हावी एवढीच त्यांची इच्छा असे. घराण्याचे जे काही रिती-रिवाज होते ते आठवणीत तरी अस्तीत्वात असावेत म्हणून त्यांची ही धडपड होती. आपल्या मुळाशी नातं तुटू नये, मूळ संस्कृतीशी नाळ तुटू नये यासाठी त्यांचा हा आटापिटा होता. त्यासाठी ते तिला नेहमी घरी-गावाकडे यायला सांगत.

रुचा तशी मित्र-मैत्रिणी यांच्यात रमणारी मुलगी. तिला गावाकडे आल्यावर फार कंटाळा यायचा. तिला सतत आपल्या मित्रांच्या संपर्कात राहायची सवय होती. गावात करमणुकीची फार साधने नव्हती. घरात कोण समवयीनही नसल्याने तिला गुदमरून यायचं. मग ती गावाकडे आल्यावर आपल्या जिवलग मित्रांशी फेसबूक, फोन, ट्वीटर वगैरेच्या माध्यमातून सतत संपर्कात असायची. त्याशिवाय तिला करमत नसे. तिचा दिवस यातच जात असे. यातच तिचे सुट्टीचे दिवस यातच निघून जात. हे तिचं दुसरं जग होतं, जे तिला अतिशय प्रिय होतं. त्यामुळे विविध माध्यमातून ती आपल्या दुसर्‍या जगाशी संपर्कात राहायची.

घरच्या मंडळींना वाटायचं की लेकरू कित्ती दिवसांनी घरी आलं आहे, त्याने आपल्याशी बोलावं, गप्पा कराव्यात, मदत करावी, घरातील कारभारात लक्ष घालावं, इकडे-तिकडे फिरावं आणि बरच काही अशा अपेक्षा होत्या. पण ह्या अपेक्षा ती काही पूर्ण करू शकत नव्हती.

तिला घरच्यांशी काय बोलावं, कुठल्या विषयावर बोलावं हा मोठा प्रश्न पडायचा. त्यामुळे काय जेवणार? कधी झोपणार? वगैरे प्रश्नोत्तरे एवढाच काय तो संवाद असायचा. तिचा असा स्वभाव कधीकधी तुसडेपणाची जाणीव करून देत, पण दोन वेगळ्या जीवनशैलीत ती अडकली आहे याची तिच्या घरच्यांना जाणीव होती. त्यामुळे प्रत्येकवेळ ती आपल्या virtual अर्थात इंटरनेट, मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही माध्यमातून दुसर्‍याच जगात वावरत असायची.

तशी रुचा चांगली मुलगी. घरच्यांना उलटून बोलणे, दुखावणे वगैरे असंस्कृत लक्षणे तिच्यात नव्हती. उलट ती सगळ्यांचा आदर करायची, सगळ्यांबद्दल तिच्या मनात प्रेम होतंच. घरचे सगळे तिला अतिशय प्रिय होते. किंबहुना, बाहेरून येताना ती नेहमी घरच्यासाठी आठवणीने त्यांच्या आवडीच्या-उपयोगाच्या वस्तु घेऊन यायची. आपल्या आजोबांसाठी तर नेहमी न विसरता सिगरेट पाइप आणायची. पण इतकी वर्षे बाहेर राहिल्याने तिच्या वागण्यात, सवयीत जरा तुटकपणा आला होता. झाड खूप उंच झाल्याने त्याच्या मुळातील अन शेंड्यातील अंतर पडतं तसं काहीतरी झालं होतं.

तिच्या बाहेरच्या अन ह्या जगात खूप अंतर होतं. ती रोज जिथे राहायची, वावरायची तिथून अशा ठिकाणी आल्यावर तिच्यात एक स्थित्यंतर यायचं; तिच्याही नकळत.

आजोबांच्या चेहर्‍यावरील वाढत्या सुरकत्या, बाबांचे हळूहळू पांढरे होत चाललेले केस यातील फरक तिला लवकर जाणवायचा नाही. तिला दुसर्‍या जगाची, बाहेरच्या जगाची, ज्यात ती रोज राहते त्याची जास्त ओढ होती, कारण तेच जग तिचं वर्तमान अन भविष्य. कुटुंबातील जगाच्या केवळ गोड आठवणी राहणार हा वास्तविक विचार तिच्या मनाला पटलेला होता. हे गावाकडचं जग तिला मागासलेलं अन मुख्य म्हणजे कंटाळवाणी वाटायचं. त्यामुळे ती येथे येण्यास टाळाटाळ करत.

घरात गौरी आगमनाची जय्यत तयारी चालू होती. सगळे राबत होते आणि रुचा सोफ्यावर पडलेली होती. तिला कशाशीच काही देणं-घेणं नव्हतं. पण घरचे सांगतील ते छोटी-मोठी कामे ती बिनबोभाट करायची.

आजोबा आजीला ओरडत होते, सकाळपासून काय ते वातींचं घेऊन बसलीस, जरा मदत कर मला. बाबा तर लांब-लांब उड्या मारत काम करत होते.

ही सगळी गडबड चालू असताना अचानक मोठा पाऊस पडू लागला. सोसाट्याचा वारा सुटला. रुचाला याची चाहूल लागताच ती जागेवरून उठली अन घराच्या बाहेर येऊन सगळा नजारा बघू लागली. बघता-बघता काळेकुट्ट ढग सगळीकडे पसरले अन जणू तूफान आलं. ती थोडीशी घाबरून आत आली आणि घराच्या खिडकीतून ते सगळं पाहू लागली. तितक्यात प्रचंड वीज चमकली. भली मोठी. काही क्षण त्याचा प्रकाश सगळीकडे पसरून नाहीसा झाला. रुचाने ते पाहिलं अन आता भला-मोठा गर्जनेचा आवाज येणार म्हणून तिने डोळे बारीक केले अन खांदे कानाला टेकवले.

धडाम… वीज पडल्याचा आवाज आला. काही क्षणात लाइट गेली. आभाळ इतकं काळं अन दाटून होतं की दुपारीही रात्र झाल्याप्रमाणे वाटत होतं. सगळं बंद झालं. अख्ख्या शहराची लाइट गेली. सगळीकडे पावसाचं राज्य होतं.

तीन तास झाले लाइट जाऊन. सगळा संपर्क तुटला होता. लाइट तर बंद होतेच पण लँडलाइन फोन, मोबाइल नेटवर्क वगैरे सगळे बंद पडले. कोणीतरी बातमी आणली की, खूप मोठं वादळ झालं आणि आजूबाजूला खूप नुकसान झालं. मोबाइल टावर अन लाइट चे transformer उन्मळून पडले अन जळाले वगैरे. दोन-तीन दिवस हे सुरळीत होईल असं वाटत नाही असं तो म्हणाला.

लाइट गेल्यावर झोपेचं सोंग घेतलेल्या रुचाने हे ऐकलं अन तिचे त्राण निघून गेले. आता दोन दिवस असं अश्मयुगात वावरल्याप्रमाणे राहावं लागणार ह्या कल्पनेने तिच्या अंगावर काटा आला. काही वेळात मोबाइल अन लॅपटॉपची बॅटरी संपली. जसा-जसा वेळ वाढत चालला तसा-तसा रुचाचा सय्यम सुटत होता. गेली आठ तास ती आपल्या दुसर्‍या जगाशी संपर्क साधूच शकत नव्हती. तिला हे घर एक भयाण बेट वाटत होतं.

ती अस्वस्थ व्हायला लागली. तिला काही सुधारेना! ती सतत आपला बंद पडलेला मोबाइल बघू लागली. मनात हजार विचार येत होते. बोटे सळसळत होती. एका जागेवर पडून-पडून तिला अजूनच असहाय वाटायला लागलं. काहीतरी करावं असं तिला वाटत होतं. मन उडत होतं, सैरावैरा पळत होतं. त्याला कुठेतरी गुंतवायला पाहिजे होतं.

रुचाच्या आजोबाला हा प्रकार ध्यानात आला. त्यांनी खडे फेकायला सुरुवात केली. घरात मेणबत्त्या, कंदील वगैरे लावून कामे सावकाश-शांतपणे चालू होती. बाहेर पावसाची बॅटिंग मात्र जोरात चालू होती.

आजोबा अगदी थकून-भागून आले अन रुचाचा बाजूला येऊन बसले.

रुचाने विचारलं, “काय झालं आजोबा?”

आजोबांनी पाणी वगैरे मागितलं. निष्क्रिय बसलेल्या रुचाने तत्परतेने आणून दिलं.

आजोबा म्हणाले, रुचा बाळा जरा काम करशील?

ती कुठेतरी मन अडकवून घ्यायला तयारच होती. कारण एकटेपणा तिला खात होता. त्यात घरातले सगळे कामात असल्याने तिच्याशी कोण बोलेना. मग आजोबा म्हणाले, अंधारात मला अन तुझ्या आजीला काही दिसत नाही. उगाच धडपडू कुठेतरी. आमची कामे तुला करावी लागतील? करशील??

पलीकडे बसलेल्या आजीला आजोबांचा खेळ समजला होता. रुचा सुरूवातीला थबकली. तिला वाटलं, आता वाती वळणं, साफसफाई, पडदे लावणं, डेकोरेशन अशी अफाट कामे करायची? आपल्याला झेपेल का? पण भयाण एकांतापेक्षा अन अस्वस्थतेपेक्षा तिला ती खूप सोपी वाटली. एकटं बसून काय करायचं. जर सोबतीला मोबाइल, लॅपटॉप, गेम्स, इंटरनेट, whatsapp, ट्वीटर वगैरे मित्र नसतील तर आपण वेडे होऊ अशी तिची ठाम समजूत झाली होती. म्हणून तिने स्वतःला कामात जुंपून घेतलं. अशीही ही संधी समोरून चालत आली होती आणि ती एकप्रकारची मदत अन कर्तव्य होतं. ती एका झटक्यात कामाला लागली.

Social Media, Interaction, Abstract, Lines, Head Woman

रुचा अगदी सगळ्या प्रकारची कामे करू लागली. मग गौरीला अलंकार घालताना समजलं की किती सुंदर दागिने आहेत घरात. मी कधी पाहिलेच नाहीत. कंदिलाच्या प्रकाशात तर ते अजूनच शोभून दिसत होते.

मग तिने आजीला आपोआप पण मनापासून प्रश्न विचारायला सुरुवात केली की, हे दागिने कधीचे? याला काय म्हणतात? आज हीच साडी, हाच नैवेद्य का? यात काय असतं?

लहानपणी कधीतरी केलेल्या गप्पा-गोष्टी अन कामे तिला डोळ्यासमोर दिसत होती. स्मृतीतील एक दरवाजा उघडल्या गेला होता. काळाच्या अन कामाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या स्मृती अलगद कळी उमलावी तशा उमलत होत्या. गेली कित्येक वर्षे आपण ह्या मजा अनुभवल्या नाहीत याचं तिला दुखं वाटत होतं. लहानपणी तर ती हे जादुई जीवन जगताना  वेडी होत असे. हे एक event organize केल्याप्रमाणेच आहे याचं वास्तविक भान तिला आलं.

आजोबाला तर नाना प्रश्न विचारत सुटली. हे कशासाठी? ते तसं का? हे कुठे ठेवलं आहे? मागच्यावर्षी काय होतं?

अलीकडच्या काळात तिने हे सगळं फक्त लांबून पाहिलेलं होतं. त्यातील उत्साह तिला कधीच जाणवला नव्हता. ती त्याच्यात कधीच समरस झाली नव्हती. पण आज तिचं मन बहरत होतं. तिला तिच्या दुसर्‍या, virtual जगाची आठवण येतच नव्हती. काही क्षणांसाठी तिचे रोजचे साथीदार इंटरनेट, मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही सगळे हरवले होते. मन मनोरंजन करण्याची इतर साधने तिला भेटली होती.

ह्या जुन्याच पण हरवलेल्या जगातील अनेक प्रश्नांची उत्तरे तिला जाणून घ्यायची होती. इथल्या जगातील मजा तिला खुणावत होत्या. आणि आजी-आजोबा तिला त्या उत्तरांध्ये अजूनच गुंतवून ठेवत होते. मग तिला अगदी प्राचीन काळातल्या अध्यात्म अन इतिहासाच्या गोष्टी समजल्या. घराचे रितीरिवाज समजले. अगदी सहज. बोलता-बोलता. मग त्या अध्यात्मामागे नेमकं विज्ञान कसं दडलं आहे याचा विचार ती करू लागली. तर्क लाऊ लागली. स्वतःचं ज्ञान अन पूर्वीचे समज यात ताळमेळ साधत ती मग्न झाली. आईला स्वयपाकात मदत करताना तिला समजलं की आपली आई तर एखाद्या ‘कुक’ पेक्षा जास्त प्रकारचे पदार्थ बनवू शकते. अगदी सोळा प्रकारच्या भाज्या अन अष्टपक्वान्न, तेही एका ताटात, एका देवीसाठी! हे तर एमबीए करून कंपनी चालवल्यापेक्षाही अवघड आहे. ती जवळच असलेल्या पण हरवलेल्या जगाच्या सताड उघड्या दरवाजातून आत आली.

फक्त छत्तीस तास! ते छत्तीस तास रुचाच्या आयुष्याला अन विचारसरणीला कलाटणी देणारे ठरले. जेंव्हा लाइट आली तेंव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्या घरच्यांना आपल्यापेक्षाही जास्त ज्ञान आहे. ते कुठल्याही क्षेत्रातील असो, पण ते ज्ञानच आहे. ते माझ्याकडे किंचितही नाही जे त्यांच्याकडे भरभरून आहे. मी आजवर फेसबूक, गूगल वर अनेक नवनव्या गोष्टी वाचत होते, पण माझ्या आजीकडे तर त्याहूनही भन्नाट अन विलक्षण गोष्टी आहेत. आजोबा तर ग्रेट माणूस! जसे ट्वीटर वगैरे share करून connect करायची माध्यमे आहेत तसे आजोबाही एक प्रकारचे ‘social media’च आहेत. जुन्या काळातील संदर्भ, ज्ञान, परंपरा ह्या नवीन पिढीपर्यंत share करायची त्यांची मोठी जबाबदारी आहे. आम्हाला share केल्यावर आम्ही ते like करायचं का नाही ते आमच्यावर, पण आजोबांना त्यांचं कर्तव्य करावच लागणार!

ह्या सगळ्या लोकांकडे ज्ञानाचं भंडार आहे, ते पुढे share केलं पाहिजे. माझी आजी तर चार गावे सोडून त्याच्या बाहेर कधी गेली नाही, पण तिला इतकी माहिती? हे सगळं अचंबित करणारं आहे. फक्त मौखिक ज्ञान अन संस्कार यातून हे आजीला समजलं होतं; कुठल्याही पुस्तकातून नाही. तिला ह्या चार भिंतीत स्वातंत्र्य मिळालं, मित्र मिळाले अन तिने इथेच स्वतःचं जग थाटलं. जसं तिचं घरातील जग अन बाहेरील जग, तसं माझं हे जग अन ते जग! अन मला काही क्षणांसाठी आपल्या virtual जगापासून दूर राहता आलं नाही.

बोलण्यातून, संवादातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो अन नाती टिकतात. हा संवाद इंटरनेटवर अनोळखी व्यक्तींशी असायलाच हवा पण ओळखीच्या व्यक्तींशीही टिकवलाच पाहिजे. झाडाने उंच उंच वाढताना मुळांकडून येणारा प्रवाह दुर्लक्षित करून चालणार नव्हतं. रुचाला अचानक वेगळाच हुरूप चढला. देश-विदेशातील संस्कृतीच्या संपर्कात आलेली रुचा आता आपल्या संस्कृतीलाही जवळून निरखू लागली. घरच्यांशी घट्ट असलेले पण अंधारात गेलेले नातेसंबंध अधिक दृढ होत होते. ती संवाद साधत होती, बोलत होती हेच खूप होतं. तिच्या virtual, दुसर्‍या जगात अनोळखी व्यक्तीशी संवाद करून त्यांना मित्र बनवलं जात, पण इथे आपल्याच नात्यांना अधिक जवळून बघायची किमया करावी लागते हे तिला समजलं.

परदेशी परतत असताना रुचा खूप बदललेली दिसत होती. परतताना नेहमी उत्साही, आनंदी दिसणारी रुचा ह्यावेळेस थोडी अस्वस्थ दिसत होती. आई-आजी ओवाळताना भरल्या डोळ्यांनी, परत कधी येणार म्हणून विचारत.

पण आज ती स्वतः म्हणाली, मला खूप गोष्टी शिकायच्या आहेत, सुट्टी मिळाली तर लवकर येईन!

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in || @Late_Night1991

ALSO READ …

बंधन – मराठी कथा

PROMOTIONS
error: Content is protected !!