आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Category: Filmy Chakkar

ती सध्या काय करते?

ती सध्या काय करते?

हरवलेलं प्रेम वगैरे शोधताना…

ती सध्या काय करते? Ti Sadhya Kay Karte? मराठी चित्रपट Marathi Movie Review

Director – Satish Rajwade

Actors – Ankush Cahudhari, Tejashri Pradhan, Urmila Kothare, Arya Ambekar, Hruditya Rajwade Nirmohi Agnihotri, Isha Phadke and Abhinay Berde WITH Sanjay Mone, Sukanya Mone and Tushar Dalvi.

मृगजळ, गैर, मुंबई-पुणे-मुंबई, प्रेमाची गोष्ट, एक डाव धोबीपछाड आणि पोपट यासारख्या विविध ढंगाच्या कलाकृती देणारा दिग्दर्शक सतीश राजवाडे ती सध्या काय करते? हा मराठी प्रेमपट घेऊन आला आहे. ती सध्या काय करते? ह्या नावानेच प्रेक्षकाला साद घातली आहे. आयुष्यात अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची उदाहरणे प्रचंड आहेत. त्या प्रत्येकाला हा चित्रपट बघायची घाई झाली असणार यात शंका नाही. आपण जिच्यावर एकेकाळी जिवापाड प्रेम केलं ती आज काय करत असेल असे प्रश्न प्रेमभंग्या लोकांना अधून-मधून पडत असतात. केवळ तिचं असलेलं नाव जरी कुठे ऐकलं तरी कान टवकारले जातात अन काळजाचे ठोके वाढू लागतात. सतीश राजवाडेने ह्या सगळ्याचा विचार करूनच चित्रपट निर्माण केला आहे.

गोष्टीची सुरुवात होते जुन्या मित्रांच्या गेट टुगेदरपासून. त्यात जुने फोटो बघता-बघता अनुराग (अंकुश-अभिनय-हृदित्य) ला तिचा अर्थात तन्वीचा फोटो दिसतो अन आठवणींचा पेटारा उघडला जातो. चित्रपटाच्या सुरूवातीलाच गोष्ट वेगाने पुढे सरकू लागते.

अनुराग लहान असताना (हृदित्य असताना) ज्या सोसायटीत रहायचा तिथे तन्वी व तिचं कुटुंब रहायला येतं. पहिल्या नजरेत अनुरागचं तिच्यावर प्रेम जडतं. मग नेहमीप्रमाणे घटना घडतात. अनुरागचं तिच्या वडलाशी पंगा, मग मनोमीलन, अनुराग-तन्वी यांच्यात झालेली गट्टी, एकमेकांना मनापासून ओळखणं वगैरे. नंतर जरा वयात येताच अव्यक्त प्रेम; नंतर क्षुल्लक कारणावरून ‘निकल जाव मेरी जिंदगी से’ वगैरे. त्यानंतर पश्चाताप. पण वेळ निघून जाणं. मग पुन्हा भेटणं. असा प्रवास!

चित्रपटाची कथा एकदम साधी आहे. त्यात नावीन्य असं काहीच नाही. अव्यक्त प्रेम यावर जास्त भर दिलेला आहे. यावर आधीही बरेच चित्रपट आलेले आहेत. शिवाय, चित्रपटाच्या कथेत बर्‍याच उणिवा आहेत. पण याचा अर्थ असा नाही की चित्रपट पडला आहे. चित्रपट पूर्णवेळ तुम्हाला धरून ठेवतो. चित्रपटाचा लुक, कलाकार अन मांडणी चोख असल्यामुळे काहीच असह्य वाटत नाही. उलट हळुवारपणे घडत जाणार्‍या घटना बघत प्रेक्षक खिळून राहतो. चित्रपट चांगला का वाईट हे ठरवताना मात्र फार विचार करावा लागेल. कारण कथा अर्धवट अन चुकल्यासारखी वाटते. एक तर मध्यंतरापर्यन्त ज्या घटना घडताना दाखवल्या आहेत त्या आजवर आपण अनेक चित्रपटांत बघितल्या असतील. ते दोघे लहान वयात जसं वागतात ते ‘नेमकं असं होतं का?’ असंही तुम्हाला वाटू शकतं. कारण लहान मुलांतील प्रगल्भपणा हा वेगळा विषय आहे. त्यानंतर ते दोघे तरुण झाल्यावर, हे असंच असतं असंही तुम्ही बिनधास्त म्हणाल.

अनुराग हा पुर्णपणे गोंधळलेला अन भरकटलेला मुलगा आहे आणि तन्वी ही अतिशय समजूतदार आणि त्याला पुर्णपणे ओळखणारी आहे. तिचं त्याच्याशी वागणं हे जवळजवळ त्याच्या बायकोसारखंच वाटतं. तन्वी त्याच्याबाबतीत काकुबाई वगैरे असते. अनुरागचं लहानपणापासून तिच्यावर प्रेम असतं पण कॉलेज विश्वात येताच त्याला अनेक ‘पर्‍या’ खुणावत असतात. त्यात तो मोहिनी, अंजली यांच्याही तो प्रेमात पडतो. पण ते त्याचं केवळ आकर्षण असतं. चित्रपटात हे सगळं फारच वरवर दाखवण्यात आलं आहे. अनुराग लहानपणापासून तिच्या प्रेमात असतांनाही मग इतरांच्या प्रेमात कसा पडतो? हे स्थित्यंतर कुठेही दिसत नाही. बरं, त्याला तन्वीही आवडत असते. तो तिलाही प्रेमपत्र देतो. अनुरागसोबत लेखकही ह्या वर्तुळात जरासा गोंधळल्याप्रमाणे वाटतो. इकडे तन्वी त्याची बेस्ट फ्रेंड असते, तीही आवडत असते आणि इतर मुलीही. हे सगळं जरा भयंकरच वाटतं. मग शेवटी अनुरागला उमगतं की तन्वी हीच खरी आपली ‘प्रेम’ आहे. मग तो शेवटी तिला प्रपोज करायचं ठरवतो. पण त्या दिवशी तो ‘घेतो’ अन अचानक त्याच्यावर चिडतो. मग ‘निघून जा माझ्या आयुष्यातून’ असं वाक्य. हे फारच वरवर वाटतं. अचानक असं काय झालं हेच समजू शकत नाही. तिच्यावर चिडायचं नेमकं कारण काय हे उघडपणे समोर येत नाही. बर, खरं प्रेम असतं तर एकाच सोसायटीत राहणारे दोघे नंतर आयुष्यभर भेटलेच नाहीत असाही समज करून घ्यावा लागतो. कथा मांडताना हे उणेदुवे ठळकपणे दिसणारे आहेत. हे अर्थात प्रेझेंटेशन मागे जरा विरून जातात. कारण बहुतेक प्रेक्षक आतापर्यंत त्याच्याशी किंवा तिच्याशी रीलेट होऊ लागलेला असतो.

चित्रपटाचं नाव जरी ‘ती सध्या काय करते?’ असं असलं तरी चित्रपट ‘त्या’च्या नजरेतून आहे. अनुरागच्या आयुष्यात येणारे प्रेमप्रसंग, त्यात गोंधळून जाणारा अनुराग अन शेवटी एका वेगळ्याच मुलीशी, राधिका (उर्मिला कानीटकर-कोठारे) लग्न करतो. हे सगळे अनुरागच्या आयुष्यात घडणार्‍या घटना अन प्रसंग आहेत. त्यात तन्वी एक भाग आहे असं काही क्षण वाटतं. अनुरागला काय वाटतं आहे हेच येथे जास्त अधोरेखित केलं आहे.

नंतर मग आयुष्याच्या एका टप्प्यावर त्या दोघांची भेट होते. ती परदेशातून परत येते. दोघांचही लग्न झालेलं असतं. दोघांना एकमेकांना बरच काहीतरी सांगायचं असतं पण ते बोलू शकत नाहीत. दोघांच्याही मनात पश्चाताप असतो. जे घडलं ते घडायला नको होतं असं दोघांनाही वाटत असतं. पण अनुरागच्या मनात कुठेतरी पुरुषी लोभही क्षणभर जागा होताना दिसतो. तन्वीला भेटताना बायकोला अंधारात ठेवणं किंवा तिचा नवरा तिला नीट ठेवत असेल का? नसेल तर मी आहे… असे विचारही त्याला शिवून जातात. त्या दोघांनाही, लहानपणी अपूर्ण राहिलेली कथा संपवायची असते. एकमेकांच्या बाबतीत असलेले वेगळे भाव बाजूला सारून पुन्हा पक्के मित्र म्हणून राहायची दोघांची इच्छा असते.

ह्या चित्रपटाचा शेवट कसा होणार हे खूप उत्सुकतावर्धक आणि तितकच महत्वाचं होतं. दोघांचीही लग्न झालेली आहेत. त्यात अनुराग बायकोपासून लपवून तन्वीला भेटतो. बायको त्याची चोरी पकडते. इथे काही क्षण, चित्रपट #सावधानइंडिया #क्राइमपट्रोल वगैरे प्रकारात जातो की काय अशी भीती वाटायला लागते. कारण आत्तापर्यंत निरागसपणे समोर आलेली कथा एका guilt पर्यन्त पोचते का असं वाटायला लागतं. त्याला तसे संदर्भही आहेत. पण अखेर मराठी चित्रपटाला शोभेसा शेवट होतो. संवादातून मार्ग!

संपूर्ण चित्रपट अव्यक्त प्रेम, पहिलं प्रेम अन विसंवाद यावर प्रकाश टाकणारा आहे. चित्रपटात निरागसपणा जपला आहे. पहिल्या प्रेमाच्या किंवा बालपणीच्या प्रेमाच्या आठवणी चांगल्या रंगवल्या आहेत. चांगले मित्र असणारे ती आणि तो नेहमीच मित्र, सोबती किंवा साथीदार होऊ शकत नाहीत. खासकरून प्रेमभंग्या पात्रांसाठी हा चित्रपट म्हणजे मेजवानीच म्हणायला पाहिजे. कारण यात फूल इमोशनचा भरणा आहे. म्हणजे प्रेमात आडकाठी ठरणारा पोरीचा बाप किंवा दूसरा मुलगा, प्रेमपत्र, तिला गाडीवरून फिरवणे, भेटायची विशिष्ट जागा वगैरे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना उगाच आठवणीत वगैरे बुडालेला प्रेक्षक दिसतोच. त्यांना बिचारे म्हणून पुढे जावं लागतं.

चित्रपटाचे संवाद मस्त जमले आहेत. ही जमेची बाजू म्हणावी लागेल. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे संवाद मनाला भिडतात अन मजाही आणतात. एकदम शेवटी थोडंसं भाषणवजा संवाद सर्वांनाच आवडतील याची मात्र खात्री नाही.

अभिनय:-

चित्रपटात सर्वात उत्तम अभिनय कोणाचा असेल तर तो हृदित्य राजवाडे ह्याचा आहे. लहानपणीच्या प्रेमात जो गोडवा, निरागसपणा अन मिष्किलपणा असतो तो खूपच उत्तम आहे असं म्हटलं पाहिजे. त्याचे हावभाव अन अभिनय याला दाद दिलीच पाहिजे. त्यासोबत असलेली लहपणीची तन्वी हीसुद्धा खूप गोड आहे.

Image result for ती सध्या काय करते?

ह्या चित्रपटाचा मुख्य आकर्षणबिन्दु होता अभिनय बेर्डे; आपल्या लाडक्या लक्ष्याचा मुलगा. तो अभिनयक्षेत्रात अन चित्रपटसृष्टीत पदार्पण करत होता. त्याचा परफॉर्मेंसही चांगला झाला आहे. खासकरून त्याला उत्तम नाचता येतं. अभिनयही चांगला असला तरी उत्तम म्हणता येणार नाही. पण वडलांच्या पाऊलवार पाऊल ठेवायला तो नक्कीच काबिल आहे. त्यात, अधूनमधून त्याच्यात दिसणारी लक्षाची झलक, छबी हीसुद्धा भाळून जाते. तरुणपणातील तन्वीचं काम केलं आहे आर्या आंबेकर हिने. झी मराठीवर लिटिल चंप्स मध्ये ती गायक म्हणून आली होती. ती मूळ गायकच आहे. तिने मात्र निराशा केली आहे. हे तिचं अभिनय क्षेत्रातील कदाचित पहिलं पाऊल. पण तिच्यातला कृत्रिमपणा चित्रपटात जाणवत होता.

आता मोठेपणीच्या अनुराग-तन्वीकडे येऊ. अंकुश चौधरी – तेजश्री प्रधान! अंकुश लगातार वेगवेगळ्या भूमिकेतून आपल्यासमोर येत आहे. त्याच्यात आलेला अनुभवीपणा खूपच महत्वाचा आहे. त्याने उत्तम काम केलं आहे. सोबतच तेजश्रीनेही भावनिक प्रसंग चांगले खुलवले आहेत. तिलाही थम्ब्स अप द्यायला हवेत…

मोजक्याच सीनमध्ये येणारे सुकन्या मोने, संजय मोने, तुषार दळवी यांनी अनुभवी काम काय असतं याची ओळख करून दिली आहे. तिघेही अप्रतिम! सोबतच उर्मिला कोठार (राधिका) हिनेही अनुरागच्या बायकोच्या भूमिकेत मस्त काम केलं आहे. एका प्रसंगात अंकुश दरवाजात असतो अन उर्मिला दरवाजा उघडते, तो प्रसंग खरच उर्मिलाने झकास केला आहे. काही महत्वाच्या क्षणांत पव्याची भूमिका करणार्‍या कलाकारानेही छान काम केलं आहे.

विशेष सांगायचं म्हणजे, कथा जरा कमकुवत असली तरी अभिनयाच्या जोरावर चित्रपट तारल्या जातो. कथेत उणिवा नक्कीच आहेत आणि त्या चित्रपटाला मारक ठरल्या असत्या, पण सतीश राजवाडेसारख्या दिग्दर्शकामुळे त्या झाकल्या गेल्या आहेत असंच म्हणावं लागेल. सतीशच्या विविध विषयांना हात घालायच्या यादीत हा चित्रपट पुर्णपणे बसणार नाही. सतीशनेच ‘प्रेमाची गोष्ट’ नावाचा एक चित्रपट केला होता. तोही अव्यक्त प्रेमाची गोष्ट होती. हा चित्रपट त्या चित्रपटाच्या जरा डावा ठरतो असं म्हणायला पाहिजे. कारण तिथे ज्या जानिवांसकट प्रेमाचं ओलेपण पुढे सरकत जातं त्याचा इथे अभाव प्रकर्षाने जाणवतो. निव्वळ प्रेम हा विषय असणं अन प्रसंगातून ते समोर येणं यात गफलत होते. फोडणी देण्याच्या नादात मूळ तांदूळच चांगला भिजवला नव्हता असंही म्हणू शकतो.

चित्रपटातील गाणी ठीकठाक म्हणावी लागतील. मुख्य गाणं हे उत्तम असलं तरी इतर गाणी रटाळ वाटतात. त्यात चित्रपटात मध्यंतरापूर्वी लागोपाठ येणारी गाणी बघूनही कंटाळा येतो.

                   शेवटी, ती सध्या काय करते? चित्रपट एक अनुभव आहे. पहिलं प्रेम, आठवणी, जुन्या प्रेमाचा ओलावा अशा गोष्टींत ज्यांना आवड असते त्यांनी हा चित्रपट बघायला हरकत नाही. खासकरून जुनं प्रेम घेऊन प्रेमभंगी झालेल्यांनीतर हा चित्रपट बघावाच!!!

एक सांगायचं म्हणजे…

हृदयात वाजे something…

सारे जग वाटे happening…

असतो सदा मी आता dreaming…

latenightedition.in  ||  @Late_Night1991

एक हजाराची नोट

एक हजाराची नोट

एक हजाराची नोट

#मराठीचित्रपट  }{ Ek Hazaraachi Note  }{  भावस्पर्शी  }{   अप्रतिम कलाकृती  }{

पंतप्रधान मोदींनी नुकतीच नोटबंदीची घोषणा केली. त्या निर्णयाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. त्याचे जे चांगले-वाईट परिणाम व्हायचे आहेत ते येणारा काळ ठरवेल. आजच एक मराठी चित्रपट बघितला. त्याचं नाव होतं ‘एक हजाराची नोट’. एरवी हा चित्रपट बघितला असता तर त्यात विशेष काही नव्हतं, पण नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट विचार करायला भाग पाडतो अन एका वेगळ्याच अवकाशात नेऊन ठेवतो.

गोष्ट आहे एका म्हातारीची. विदर्भात राहणारी एकटी म्हातारी.  तिचं नाव बुढी! एक गरीब म्हातारी, जिच्या तरण्या शेतकरी पोराणं आत्महत्या केलेली असते. मग उरलेलं आयुष्य ती एकट्याने पुढे ढकलत असते. निराधारपणे पण समाधानाने ती जीवन जगत असते. तिच्या शेजारी राहणारा सुदामा हा तिला पोरसारखाच असतो. त्या कुटुंबाच्या साथीने ती जगत असते. कधीतरी अगदी दोन रुपये घालून चहा पिणे यातच तिला आनंद असतो. जीवन असच चालू असतं, पण आयुष्य एक महत्वाचं वळण घेतं. निवडणुकीच्या निमित्ताने गावात एक पुढारी येतो अन सर्वांना पैसे वाटत असतो. सुदामा त्या बुढीची करूनकहाणी नेत्यापर्यंत पोचवतो आणि तो नेता निवडणुकीचा काळ म्हणून सहानुभूती दाखवत तिला एक हजाराच्या पाच नोटा वाटतो. मग त्या म्हातारीच्या आयुष्याला एक कलाटणी मिळते. सगळ्या गावात बोभाटा होतो. नेहमी दोन रूपयांचा गूळ, दूध देणारे तिला पैसे मिळाले म्हणून वेगळी वागणूक देतात. त्या बुढीलाही पैसे खर्च करून टाकायचे असतात. त्यासाठी ती सुदामाला घेऊन तालुक्याला जाते. तेथूनच सुरू होतो दुर्दैवाचा खेळ!

चित्रपटाची मांडणी अतिशय सरळ आणि साधेपणाने आहे. लेखक-दिग्दर्शकाला कथा थेटपणे सांगायची असल्याने विनाकारण कसलेही अडथळे येत नाहीत. कथेबाबतीत स्पष्टपणा असल्याने चित्रपट कुठेच कंटाळवाणा होत नाही. टप्प्याटप्प्याने घडत जाणार्‍या घटना ह्याच चित्रपटाला एका आशयासहित पुढे घेऊन जात असतात. बुढीचं पात्र साकारणार्‍या उषा नाईक यांनी उत्तम अभिनय केला आहे. गरीब, बिचारी, निराधार आजीची भूमिका त्यांनी खणखणीतपणे बजावली आहे. एक-एका सीनमध्ये चेहर्‍यावरचे भाव तर थेट काळजाला भिडणारे आहेत. त्यात संदीप पाठक नावाच्या अवलियाने सुदामाची भूमिकाही सुरेख उमटवली आहे. नेहमी वेगवेगळ्या भूमिकेतून सर्वांना हसवणारा संदीप सुदामा म्हणून चांगुलपणा घेतो अन कुठेतरी मनाला चटकाही लावून जातो. बाकी उत्तमराव जाधवच्या भूमिकेतील गणेश यादव अन पोलीसाच्या भूमिकेतील श्रीकांत यादव यांनीही खलनायकी ठसा चांगलाच उमटवला आहे.

Related image

शहरातील माणूस रोज हजारांची उधळण करत असतो. केवळ सिगार, सुपारीवर दिवसाला शेकड्यावर खर्च करणारे असतात. पण एकेकाची परिस्थिती अशी असते की चहा पिण्यासाठीही पैसे जमा करावे लागतात. रोजच्या जगण्यासाठी संघर्ष अटळ असतो. त्यात चार सहानुभूती अन आपुलकीचे शब्दच मोठा आनंद देऊन जातात. ही बुढीही तशीच परिस्थितीने गांजलेली आहे. पण जेंव्हा ती गूळ मंदीरासमोरील मुंग्यांना ठेवते तेंव्हा मनात कालवाकालव होते. ज्या लोकांना कशाशी काहीच देणं-घेणं नसतं त्या लोकांसमोर नेते भाषणं ठोकून जातात. केवळ जेवायला मिळेल म्हणून जमा होणार्‍या गर्दीसमोर देशाचे प्रश्न मांडतो तेंव्हा आपलीच लाज वाटते. केवळ जेवणाकडे डोळे लावून बसणारी जनता हेच देशाचं खरं वास्तव आहे. त्यांना आपण काय समजावून देऊ शकतो. अशा म्हातारीच्या हातात जेंव्हा हजाराची नोट येते तेंव्हा तिचं विश्व एकाच वेळेस, पण विविध संदर्भात आकुंचन आणि प्रसरण पावतं. तिच्याकडे हजाराची नोट आल्याचं समजल्यावर नेहमी दोन रूपयांचा गूळ देणारा दुकानदार तिला नकार देतो. तिच्या आयुष्याचे संदर्भ बदललेले असतात. रात्री झोपताना आठवणीने दरवाजा लावला आहे का तपासताना आपल्याला तिच्या मनातील कल्लोळ जाणवतो. गरीबाला त्या हजार रूपायाचंही किती अप्रूप असतं. तालुक्याला गेल्यावर तिला त्या हजाराच्या नोटेचं चिल्लर मिळत नाही. मुळात तिच्यासारख्या दरिद्री, खेडूत म्हातारीकडे हजार रुपयांची नोट असूच कशी शकते हाच मुख्य प्रश्न असतो इतरांना.

थोडं विषयांतर म्हंटलं तर, आज सरकार दोन हजारांच्या नोटा वाटत आहे, पण गरीब माणसाला त्याचा जराही उपयोग नाही. कशातरी फाटक्या नोटा अन चिल्लर गोळा करून त्यावर जीवनाचा गाडा पुढे ढकलणारे आपल्या देशात अजूनही अस्तीत्वात आहेत याचं भानच राजकीय मंडळींना राहिलेलं नाही. हजारभर रुपयांत आयुष्यभराची स्वप्नं पूर्ण करायची हौस त्यांच्यात असते. हातात कधीतरी आलेल्या पैशात आभाळभरून सुख मिळवायची त्यांची तयारी असते. पण प्रस्थापित व्यवस्थेत त्यांचं हे सुखही हिरावून घेण्याचा क्रूरपणा असतो. त्यांच्यासारख्या गरिबाचा वापर करून पोलिसांसारखी भ्रष्ट अन सडकी प्रशासकीय यंत्रणा केवळ गरिबाचं सुखच हिरावून घेत नाही तर त्यांच्या जीवनाची आसही शोषून घेत असते. पदाला असलेल्या अधिकाराचा माज दाखवत, गैरवापर करत गरीबांना लुटायचा खुला तमाशा चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. त्या बुढी अन सुदामाची निष्कारण झालेली होरपळ खरच बघवत नाही. श्रीमंतांच्या दृष्टीने किरकोळ असलेल्या पैशात ते स्वर्ग मिळवत असतात अन त्याच जगाचा चकनाचूर होतो अन त्यांच्या गरीबीचे धिंडवडे निघतात. आपण कुठल्या देशात राहतो असा प्रश्न क्षणभर डोळ्यासमोर उभा राहतो. हराम मार्गाने आलेला पैसा पचत नाही हेच शेवटी त्यांच्या मनावर कोरलं जातं. लक्ष्मी आपल्या गरिबाच्या घरी राहत नसते असं त्यांना वाटत राहतं.

एक हजाराची नोट हा चित्रपट बरच काही देऊन जातो. चार-सहा रुपयांवर आयुष्य जगणारी जमात ह्या देशात राहते हे बघून मन स्तब्ध होतं. नोटबंदी वगैरे निर्णय घेताना ह्या लोकांना कोणीही लक्षात घेत नसावं. बुढीच्या आयुष्यावर सतत दया येत असते. पण त्यातही इतरांना काहीतरी देण्याचं अन सुख वाटण्याचं काम समाधानानं करताना कोणालाही आपल्या मोठेपणाची लाज वाटेल. शेवटाला पोलिसाने दिलेले त्याचे पन्नास रुपयेही ती म्हातारी तसेच ठेऊन गरिबीतही असलेला स्वाभिमान दाखवून पोलिसाला त्याची जागा दाखवते. गावाकडून येताना आनंदानं नदीत टाकलेलं नाणं आणि परतत असताना पीडेने टाकलेली हजाराची नोट यातच सर्व मानवी भावनांचा स्फोट उलगडला जातो. उषा नाईक यांच्या रूपाने ती बुढी मनाला घरघर लाऊन जाते तर संदीप पाठक सुदामाच्या रूपाने इतरांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देऊन जातो.

श्रीहरी साठे हा संवेदनशील मनाचा माणूस असल्याशिवाय अशी कलाकृती करू शकत नव्हता. त्याच्या ह्या प्रयत्नाला सलाम! सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या नजरा बद्ध करून ठेवणारा कॅमेरा चांगलाच बोलका आहे. संगीतही ठीकठाक म्हणावं लागेल. पण भावुक कथेपुढे हे दुय्यम म्हणावं लागेल. कथा संपताना हुरहूर लागून राहते. शेवट काहीतरी गोड होईल ह्याच आशेने प्रेक्षक सर्व अनाचार बघत असतो. पण त्यात त्याची पुरती निराशा होते. चित्रपट करूनामय दुखाने संपतो. शेवटी गरीब-पीडित तसाच किंबहुना त्याहून पीडलेला असतो. हे मनाला अस्वस्थ करणारं असतं.  लेखक-दिग्दर्शक जे सांगायचं आहे ते मोजक्या पण प्रभावी पद्धतीने मांडतो. काही वर्‍हाडी संवाद सोडले तर चित्रपटात काहीच कृत्रिम जाणवत नाही.

नदीच्या संथ पाण्याप्रमाणे चित्रपट पुढे जात असतो. अचानक कुठेतरी डबकं, कुठेतरी झरा, कुठेतरी धबदबा बनून तो शेवटाला पोचतो. शेवटाला एक म्हातारा बुढीला त्याच्या मेलेल्या पोराचा नीट करायला टाकलेला फोटो परत करतो तेथे संवेदनशीलतेचा अविष्कार जाणवतो. बटाव्यातून काढलेल्या पाचच्या फाटक्या नोटा अन चिल्लर यांचं मूल्य त्या फुकटात संकट घेऊन आलेल्या हजाराच्या नोटेपूढे प्रचंड महान असतं…

एक हजाराची नोट… एक संवेदनशील कलाकृती

हूल – भालचंद्र नेमाडे

जाऊं द्या ना बाळासाहेब!

जाऊं द्या ना बाळासाहेब!

#जाऊं द्या ना बाळासाहेब!  समीक्षा का काय म्हणतात ते! Film Review

Baby Bring It On

गिरीश पांडुरंग कुलकर्णी ह्या अवलिया लेखकाची दिग्दर्शित केलेली पहिली कलाकृती म्हणजे जाऊं द्या ना बाळासाहेब! हा चित्रपट. आजवरचे गिरीशचे लेखक म्हणून पाहिलेले चित्रपट हे मुख्यतः ग्रामीण जीवनावर आधारलेल्या कथेंचे होते. जाऊं द्या ना बाळासाहेब! हा चित्रपटही पूर्णतः ग्रामीण भागातील कथेवर आधारित आहे. आजवर लेखक व अभिनेता म्हणून एक वेगळीच लकब घेऊन भेटणारा गिरीश पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून भेटत असताना प्रेक्षकांच्या त्याच्याकडून अपेक्षा असणं साहजिकच आहे. पण जाऊं द्या ना बाळासाहेब! ही कलाकृती पाहताना थोडासा हिरमोड होतो. एक संवेदनशील लेखक म्हणून परिचित असलेला गिरीश आणि आजवरच्या त्याच्या कलाकृती बघून एकंदरीत काहीतरी सामाजिक विषय असेल यात शंका नव्हती. नेहमीप्रमाणे विनोदी मांडणी करून एक गंभीर विषय उलगडण्याची गिरीश कुलकर्णी यांची पद्धत आहे.

कथा आहे गावातील एका बड्या राजकारण्याच्या (मोहन जोशी) आफराट पोराची. बाळासाहेब त्यांचं नाव. अर्थात गिरीश कुलकर्णी. तर हे बाळासाहेब म्हणजे बापाच्या इस्टेटी वर ऐशो-आरामात जीवन जगणारे तरुण! बाळासाहेब म्हणजे रंगेल, मनमौजी पण चांगल्या मनाचा माणूस. एखाद्या पाटलाच्या बिघडलेल्या पोराच्या अंगात जितके खोड्या असतात त्या इथे नाहीत. पण बाळासाहेब वाईट वाटेला लागलेले नक्कीच आहेत. बाळासाहेबांना त्यांच्या वडलांचं राजकारण वगैरे आवडत नसतं. मस्त हुंदडत राहावं एवढीच त्यांची मनीषा असते. असं हे आत्मकेंद्री पात्र. त्यांच्या संगतीला असतात त्यांचे दोन जिवलग मित्र. बारा धंदे बसवलेला विकास अन लेखक असलेला चौधरी. बाळासाहेबांचं त्यांच्या वडलांच्या हट्टामुळे लग्न मोडलं असतं. अगदी वरात मागे फिरवावी लागलेली असते. मग त्यानंतर बाळासाहेबांच्या डोक्यावर थोडासा परिणाम होतो. असेच डॉक्टरचे उंबरठे झिजवत बाळासाहेब पुण्यात जातात अन तिथे अपघाताने ते बघतात उर्मी अर्थात मनवा नाईक हिच्याशी! मनवा ही स्वतंत्र विचारांची, वेगळ्या वाटेवरची मुलगी. तिच्या संपर्कात येऊन बाळासाहेब जरा विचारी होतात. किंबहुना तिच्यावर इम्प्रेशन पडावं म्हणून ते तसा घाट घालतात. बाळासाहेबांना ती आवडलेली असते. मग त्याच सगळ्या प्रकारात ते लेखक चौधरीच्या लिखानावर नाटक बसवायला घेतात. मग नाटकात काम कोण करणार? तर गावातील गावकरी. बाळासाहेबांना त्यांच्या वडलांनी एक तर आहे ते राजकारण करा किंवा काहीतरी नवीन मांडणी करून दाखवा अन बिनपैशाचे दोन माणसं तरी जमा करून दाखवा असं आव्हान. ह्यात मग डाव-प्रतिडाव आले अन राजकारणही आलं. शेवटी मग ते बसवत असलेले नाटक अन खरं आयुष्य यांत काहीतरी संबंध….

Image result for जाऊ द्या ना बाळासाहेब चित्रपट

अभिनय –

अभिनयाच्या बाबतीत तर सर्वांनी कमाल केली आहे असं म्हणावं लागेल. गिरीश कुलकर्णीने आजपर्यन्त बर्‍याचदा ग्रामीण भूमिका साकारल्या आहेत. ही त्यापेक्षा नक्कीच वेगळी आहे, पण बाज अन लहेजा तोच वाटतो. पण चेहर्‍यावरचे हावभाव अन एकंदरीत मिश्किलपणा त्याने मस्त रंगवला आहे. पाटलाचा निर्बुद्ध पोर हे सुरूवातीला थोडं अति वाटतं पण गम्मत आणि विनोद म्हणून तो आपण सहज पचवू शकतो. मध्यंतराच्या आधीचा बाळासाहेब अन नंतरचा बाळासाहेब यांत बराच फरक आहे जो गिरीशने अतिशय उत्तमपणे टिपला आहे. गिरीशची ही भूमिका जारी वेगळी असली तरी त्याला नेहमीच्या पठडीतून बाहेर काढणारी वाटत नाही. मध्यंतरी पुणे 52 किंवा अग्लि चित्रपटात त्याने ह्या चौकटीतून बाहेर पावले टाकली होती जी यशस्वी झाली होती. पण पुन्हा ग्रामीण भागातील भूमिका हे अभिनेता म्हणून त्याची वाढ खुंटवणारं वाटतं. नेहमीप्रमाणे गिरीशने ही भूमिकाही उत्तम पार पाडली असंच म्हणूया शेवटी. बाकी बाळासाहेबांचे मित्र म्हणून दिसणारे विकास, योगेश यांच्याही भूमिका उत्तम झाल्या आहेत. लेखक चौधरी तर अगदीच जमून आला आहे. त्याच्या हावभावातून व्यक्त होणारी हतबलता, नैराश्य, कधी धूर्तपणा हा कोणत्याही मानसाच्या स्थायी भावाला जागृत करणारा वाटतो. मोहन जोशी यांनीही आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. सुरुवातील गाणं चालू असताना तर काही सेकंदाचा सीनमध्ये मोहन जोशींनी जो वात्रट मिष्किलपणा दाखवला आहे तो कमाल आहे. रीमा लागू यांना एका वेगळ्या शैलीत बघायला मिळालं यात आनंद आहे. त्यांचा अभिनय ‘perfect’ असतो. वेगळी भूमिका असली तरी भूमिकेला फार काही हाताला आहे असं वाटत नाही. काही सीन वगळता त्यांचं पात्र थोडसं निशब्द वाटतं. म्हणजे बाळासाहेब अन त्यांच्या वडलांतील दुवा असलेल्या आईसाहेब किंवा पहलवान ह्या विनोदनिर्मिती यातच गुंग असतात. भाऊ कदम नेहमीप्रमाणे चौकार मारून मोकळा होतो आणि क्षणभर डोळ्यात टचकण पाणीही आणतो. बाकी मनवा नाईक सुंदर दिसतेच अन सुंदर अभिनयही आहे. सईला ह्या भूमिकेत घेण्याचा अट्टहास का? हा प्रश्न पडतो. ह्या भूमिकेत तिला imagine करणं जरा जड जातं. तिच्याकडून काहीतरी अजून चांगलं नक्कीच अपेक्षित आहे.

कथा –

गिरीश हा संवेदनशील अन उत्तम लेखक आहे. त्याच्या लिखाणात एक मार्मिक विनोद असतो. त्याच्या लिखाणाला एक वेगळाच फॉर्म आहे. एका उंचीवरून सुरू झालेली कथा दुसर्‍या उंचीवर जाताना किती घाटवळण घेत जाते हे गिरीशलाच माहीत असतं. ही कथा मात्र कुठल्यातरी घाटात घुटमळते. कथा उत्तम आहे पण कथेचा शेवट काहीतरी वेगळा असेल अशी अपेक्षा असते. चित्रपटाच्या सुरूवातीला ग्रामीण विनोद अन अतिशयोक्तिचा मारा आहे. तिथे माणूस हास्यात खिळून जातो. पण नंतर कथा खुंटल्यासारखी वाटते. मध्यंतरानंतरही काही कंटाळवाणे सीन आहेत. प्रेक्षकांना शेवट काय होईल याची उत्कंठा अन घाई लागते. शेवटी ही गाडी अपेक्षित वळण घेत अपेक्षित ठिकाणीच पोचते. हा प्रकार काही रुचत नाही. शेवटचा नाटक करताना भाषण हा प्रकार तर बालिश वाटू लागतो. पुण्यात असं काही घडलं असतं तर पुणेकरांनी भयंकर ‘अपमान’ केला असता. नाटक करत असताना अन दुसर्‍यांच्या तोंडून पुस्तक वाचून बाळासाहेब अचानक बदलतात अन बापाच्या विरोधात बंड करून उभे राहतात हा प्रकार काही समजत नाही.

सर्वात महत्वाचं म्हणजे चित्रपटाच्या कथेत नावीन्य असं वाटत नाही. असे चित्रपट हिंदीत येऊन गेले आहेत. बाळासाहेब तर अगदी राजा बाबू किंवा अक्षय कुमार वाटतात. आजची निम्मी तरुणाई फेसबूक वर आहे अन निम्मी बॅनर वर हे शब्द बरच काही सांगून जातात. समाजात काहीतरी वेगळं राजकारण काहीतरी वेगळी मांडणी तरुणांनी करावी असा कथेचा मतीतार्थ आहे. पण वाट थोडीशी चुकल्याप्रमाणे वाटते. बिघडलेले बाळासाहेब, उर्मी, लेखक, मग काहीतरी प्रकल्प, पाडला जाणारा वाडा, सईचं लग्न, सुधारलेले बाळासाहेब, आईसाहेबांचा आशीर्वाद आणि गावकर्‍यांचं नाटक यात कुठेतरी ताळमेळ सुटल्याप्रमाणे वाटतो. गाडी थेट जात नाही, जरा जास्तच वळण घेत जाते त्यामुळे खूप गोंधळल्यासारख होत जातं. एका ऊतम विषयाला थोडं विसकटल्याप्रमाणे कथा मिळते, तेही गिरीशकडून हे रुखरुख लाऊन जातं.

दिग्दर्शन –

दिग्दर्शक म्हणून गिरीशचा हा पहिलाच चित्रपट. पण गिरीशने ती जबाबदारी लीलया पेलली आहे असंच वाटतं. सुरुवातीच्या गाण्यापासून ते शेवटच्या वाड्यातील भागापर्यंत एक दिग्दर्शकीय दृष्टीकोण दिसून येतो. कुठेही नवखेपणा वाटत नाही. अगदी चित्रपटाची शीर्षक नावे देताना ‘पेशल अभिनय’ वगैरे जे अस्सल गावरण शब्दांची उधळण केली आहे ती संकल्पना भारीच आहे. सुरूवातीला गाणं चालू असताना काही घडामोडी घडतात तेही सुंदरच म्हणावं लागेल. सगळी locations पुणे व आसपासची आहेत. FTII मधले मोजके सीन आहेत त्यातही नायिका/मनवा सिगरेट वगैरे ओढते वगैरे ओढते आहे अन वैचारिक बोलते आहे हे खूपच अति होतं. कारण तिथे नेहमी तेच दृश्य असतं. बाकी दिग्दर्शक म्हणून गिरीश कमी पडला नाही. पुढे त्याच्याकडून अजून उत्तम कलाकृती बघायला मिळतील हे नक्की!

संगीत –

अजय-अतुल यांचं संगीत हे चित्रपटातील एक पात्र असतं. चित्रपटाच्या सुरुवातीच्या डॉल्बी गाण्यापासून ते शेवटच्या गोंधळापर्यन्त सगळीच गाणी उत्तम आहे चित्रपटासाठी महत्वपूर्ण आहेत. मोना डार्लिंग गाणं गरजेचं नव्हतं अन खूपच भिकार वाटतं. पण अजय-अतुल ह्यांनी जे संगीत दिलं आहे ते अप्रतिम आहे. त्या संगीतामुळे चित्रपटाला एक वेगळीच शोभा येते. सैराट नंतर ही त्यांच्या संगीताची मेजवानीच म्हणावी लागेल. उत्तम!

थोडक्यात काय —-

थोडक्यात काय तर, चित्रपटात अर्भाट विनोद आहेत जे तुम्हाला हसवतात. ग्रामीण ठसका आहे. काही क्षण भावनात्मक प्रसंगही आहेत. उत्तम संगीत आहे. उत्तम अभिनय आहे. वेगळी मांडणी हुकली आहे. थोडीशी अतिशयोक्तिही होते. महत्वाचं म्हणजे एक गंभीर विषय आहे. गोळाबेरीज म्हणाल तर एकदा बघून यावा असा चित्रपट आहे. फार अपेक्षा न ठेवता अन फार निराशाही होणार नाही!!! तुमचे शंभरपैकी 65-70 रुपये वसूल होतील.

ती सध्या काय करते?

Harry Potter Characters are Like Mahabharata

Harry Potter Characters are Like Mahabharata

#The Hindu Epic Mahabharata and Harry Potter Characters have Similar Characters.

#Professor Dumbledore & God Shrikrushna  #Pottermore

#महाभारत अन हॅरी पॉटर मधील मिळतेजुळते कॅरक्टर!

आपल्यातील बर्‍याच जणांनी J.K. Rolling लिखित हॅरी पॉटर हा चित्रपट बघितला असेलच. अनेक लोक त्या चित्रपटाचे, कथेचे अन कथेतील पात्रांचे जबरदस्त चाहते आहेत. अनेकदा तर ते characters खरे आहेत की काय असाही भास अनेकांना होत असतो. हॅरी पॉटर कथेतील नवीन पुस्तक येणार असेल तर रात्र-रात्र जागून, लांबलचक लाइनमध्ये थांबून ते पुस्तक खरेदी करायचा अनेकांचा अट्टहास असतो. अर्थात, हे त्या पात्रांवरील प्रेम आहे. हॅरी पॉटर चित्रपटाने तर जगभरातील रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

मीही हॅरी पॉटरचा असाच एक फॅन आहे. चित्रपटाचे सात पार्ट आहेत. अर्थात sequel म्हणतात त्याला. त्यातील प्रत्येक चित्रपट मी पन्नास-एक वेळा नक्कीच बघितला आहे. पहिल्या चित्रपटातील घटनेचा संबंध आणि रहस्य शेवटच्या भागात उलगडलं जातं त्यातच खरं लेखिकेचे श्रेय आहे. सातही भागांची गुंफण अशी आहे की संपूर्ण भाग बघितल्यावर प्रेक्षकाच्या लक्षात येतं की एकंदरीत काय घटना आहेत. ते जादुई जग, ते पात्र, त्या जागा, ते hogwarts school हे सगळं सत्य भासत असतं.

हॅरी पॉटर मधील प्रत्येक character ला परिपूर्ण असा अर्थ आहे. कोणातही character अपूर्ण किंवा विनाकारण नाही. प्रत्येकाची भूमिका आहे. त्यामुळेच हॅरी नायक असला तरी severus snape किंवा Albus Dumbledore हे पात्र जास्त भाव खाऊन जातात.

पण आपल्याला आठवतं का, की असेच characters आपण आधी कुठल्यातरी कथेत वगैरे ऐकले, वाचले आहेत???? Albus Dumbledore सारखा सर्वज्ञानी, सर्वपरिचित, सर्वशक्तिमान असा नायकापेक्षाही मोठी व्यक्तिरेखा असलेला… किंवा Severus Snape सारखा धूर्त, चलाख पण शेवटपर्यंत कोणाशी इमान आहे हे न समजू शकलेला… किंवा धाडसी नायक असूनही नेहमी द्विधा मनस्थितीत असलेला, सतत मार्गदर्शनाची गरज असलेला हॅरी…

मला तर यातील काही character हिंदू महाकाव्य महाभारतातील पात्रांप्रमाणे भासतात…. आपण एक-एक करून बघूयात… हॅरी पॉटर अन महाभारत यातील सम characters बद्धल….

**************

1 Albus Dumbledore Is Similar To God Shrikrishna….. Dumbledore हा आपल्या वासुदेव कृष्णसारखा????????

Albus Dumbledore कडे जरा लक्ष द्या. हे hogwarts school चे सध्याचे मुख्याध्यापक. जादुई दुनियेतील सर्वशक्तिमान मानला जाणारा जादूगर. याला सगळेच टरकून असतात. ह्यांना सगळ्यातील सगळं माहीत असतं. म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना माहीत असतात, वर्तमानावर सतत पकड असते, सर्वच समस्यांवर इलाज असतात, ज्ञान असतं आणि सगळं काही. हेच Albus Dumbledore किंवा Professor Dumbledore हॅरी पॉटरचे मुख्य मार्गदर्शक अन रक्षक असतात. त्यांचा हॅरी वर अन हॅरी चा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो. ते सगळ्या वाईट शक्तींच्या विरोधात लढणार्‍या संघटनेचे order of the phoenix चे संस्थापक अन सेनापती असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे ते कितीही सत्याच्या बाजूने असले तरी त्यांचे मार्ग कूटनीतीचे असतात. त्यांना सर्वशक्तिमान बनायची प्रबळ इच्छा असते. असं त्यांचाच भाऊ Aberforth हॅरीला सांगतो. ताकत मिळवण्यासाठी ते अनेक उठाठेवी करत असतात. पण हे सगळं सत्याचा विजय व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. मी चांगला आहे आणि माझ्याकडे सर्वशक्ति असतील तर सगळ्यांवर मी नियंत्रण ठेऊ शकतो असा त्यांचा समज असतो. Severus Snape जेंव्हा त्यांच्याकडे मदतीला येतो (हॅरी जन्माच्या वेळेस) तेंव्हा ते Severus कडून एक वचन मागतात अन त्यांच्या मृत्यूपर्यंत ते Severus चा भल्यासाठी वापर करून घेतात. त्यांच्याकडे जगातील सर्वशक्तिमान अशी Elder Wand असते, जे त्यांच्या सर्वशक्तिमान असण्याचा पुरावा असते. त्यांना सर्वच क्षेत्रातील माहिती असते. एखाद्याला योग्यप्रमाणे मार्गदर्शन करणे हे तर त्यांचा विशेष गुण म्हणावा लागेल. Professor Dumbledore हे हॅरीला सतत मार्गदर्शन करत असतात अन सर्वप्रकारे (direct & indirect) मदत करत असतात अन गरज पडली तरच त्याची मदत करत असतात. काळ्या शक्तीचा अन Lord Voldemort चा नाश करणे अन सत्याची स्थापना करणे हेच त्यांचं उद्दीष्ट असतं. त्यासाठी वेळ पडली तर कुठल्याही मार्गाचा अवलंब करायची त्यांची तयारी असते. Professor Dumbledore असण्याचे काही फायदे आहेत असं म्हणत ते वेळ पडल्यावर बिनधास्त नियम तोडतात. चांगल्या ध्येयसाठी बंडखोरी हा त्यांचा स्वभावगुण. चेहर्‍यावर सतत मंद हास्य, नम्र अन विनोदी स्वभाव, गरज पडेल तेंव्हा कठोरपणा अन स्पष्टपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टे.

^^^^

आता वळूयात वासुदेव कृष्णाकडे. भारतीय अध्यात्ममधील सर्वात लोकप्रिय देवता. चेहर्‍यावर मंद हास्य, सावळे रूप, खट्याळपणा पण सत्य बोलण्याची सवय. सर्वांना मोहक असं रूप. भगवान कृष्ण हे महाभारतातील सर्वात शक्तिमान पात्र आहे. वासुदेवाला काय घडलं, काय घडणार असं सगळं काही ज्ञात असतं. त्याच्या शक्ति अन युक्तिपुढे सगळेच हतबल असतात. अधर्म संपवून धर्माची स्थापना करणे हेच त्याच्या अवताराचं साध्य! सत्याची अन धर्माची स्थापना करण्यासाठी एखाद वेळेस छळ-कपट करणे किंवा धूर्तपणा हा त्याचा धर्ममार्ग! सत्याची स्थापना करताना कितीही बळी गेले तरी सत्य हेच अंतिम उद्दीष्ट एवढीच त्याची मनोकामना असते. सर्व पांडवांचा अर्थात सत्याचा सेनापतिच कृष्ण! अर्जुन अन इतर पांडवांना मार्गदर्शन अन त्यांचे रक्षण हे त्याचं कर्तव्य. त्याला लीलाधार म्हणतात हे त्याच्या लीला बघूनच! त्याच्याकडे सर्वशक्तिमान असं शस्त्र असतं, सुदर्शन चक्र, म्हणूनच तो चक्रधर…. वासुदेवाला महाभारताचा अन कुरुक्षेत्र युद्धाचा परिणाम माहीत असतांनाही अखेरच्या धर्माच्या होणार्‍या स्थापनेसाठी त्याला सर्व पार पाडावे लागते… अर्जुन अन पांडवांचा त्याच्यावर पुर्णपणे विश्वास असतो आणि विरोधकांना त्याची भीती असते. अनेकांचा वाढ करताना त्याने वापरलेली कूटनीती ही आड्मार्गाने सत्यच्या स्थापनेचाच मार्ग असतो. सर्व क्षेत्रातील ज्ञान अन प्रत्येक क्षणाची माहिती. विरोधकांचे कच्चे दुवे माहीत असणे. कर्ण हा महारथी अन प्रतिपक्षातील असल्याने त्याचा धूर्तपणे वापर करून घेणारा वासुदेव हा चतुर होता. सत्यच्या वाटेत कोणीही येणार असेल तर त्याला बाजूला करणे, शासन करणे हाच त्याचा धर्म होता.

देवआनंद

देवआनंद

धरमदेव आनंद ऊर्फ देव आनंद वाढदिवस
(सप्टेंबर २६, इ.स. १९२३ – डिसेंबर ३, इ.स. २०११)

देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. भारताच्या केंद्रशासनाने इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान गौरवले.

जीवन
इ.स. १९४६ साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला ‘हम एक है’ या चित्रपटाने सुरवात झाली. इ.स. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर-गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.

संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्‍या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई.

मृत्यू
देव आनंद यांचा ३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी वयाच्या ८८व्या वर्षी लंडन, इंग्लंड मुक्कामी हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. ते वैद्यकीय तपासण्यांसाठीच लंडन येथे गेले होते.

चित्रपट कारकिर्द
इ.स. १९४६ – हम एक है – प्रभातच्या सिनेमातून सुरुवात
इ.स. १९४७ – जिद्दी- पहिला हीट सिनेमा-गुरूदत्त यांचं दिग्दर्शन

प्रसिद्ध चित्रपट
जिद्दी, पेईंग गेस्ट,बाजी, ज्वेल थिप, सीआयडी, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, गाईड, वॉरंट, हरे रामा हरे कृष्णा आणि नौ दो ग्यारह.

पुरस्कार
इ.स. १९५० – काला पाला चित्रपटासाठी बेस्ट ॲक्टर, फिल्मफेअर पुरस्कार
इ.स. १९६५ – गाइड चित्रपटासाठी बेस्ट ॲक्टर, फिल्मफेअर पुरस्कार
इ.स. २००१ – पद्मभूषण पुरस्कार
इ.स. २००२ – दादासाहेब फाळके पुरस्कार
इ.स. २००० – भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल अमेरिकेतर्फे सन्मान,हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला होता.
इ.स. २००० – इंडो-अमेरिकन असो.चा स्टार ऑफ मिलेनियम सिलीकॉन व्हलीत हा सन्मान करण्यात आला

जाऊंद्याना बाळासाहेब!

जाऊंद्याना बाळासाहेब!

#Jaaudya naa Balasaheb  गिरीश पांडुरंग कुलकर्णीचा प्रथम दिग्दर्शित चित्रपट!

वळू, देऊळ, पुणे 52 ते अगदी अनुराग कश्यप चा अग्ली चित्रपट असू देत. आपल्या हरहुन्नरी अभिनयाने भूमिकेला वेगळाच साज चढवणारा लेखक-अभिनेता आणि आता दिग्दर्शक आपल्यासमोर येतो आहे एक नवा करकरीत अन हटके कलाकृती घेऊन! अर्थात, गिरीश पांडुरंग कुलकर्णी असं नाव पडद्यावर चिटकलं तर ते हटके आणि बहारदार असणार यात शंका नाहीच. आपल्या ग्रामीण भागातील शैलीमुळे प्रसिद्ध असलेला गिरीश घेऊन येतो आहे जाऊंद्या ना बाळासाहेब! नावाचा चित्रपट!! नावातच नावीन्य अन हटके अंदाज आहे. पण ह्या चित्रपटाद्वारे तो तो आपल्या दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करत आहे. कुठल्याही अभिरुचिसंपन्न लेखकाला अन संवेदनशील कलाकाराला चित्रपट दिग्दर्शन नावाचा दरवाजा खुणावत असतोच. आपल्या लेखणी अन अभिनयाने कमाल करणार्‍या गिरीशला त्या दरवाजाने खुणावले नसते तर नवलच! त्याच्या ह्या पदार्पणतील कामगिरीला आमच्या लाख लाख शुभेच्छा!!!

Bring It On

हा बघा teaser चित्रपटाचा!   मी शब्द शोधतो दिव्य नव्या तेजाचा….

Baby Bring It On!!!

Baby Bring It On!!!

संगीतकार #अजय-अतुलचे नवीन गाणं…. #bring_it_on!!! #आलिंगांनाला… लईच भारी ना… कसं??? एकदा ऐका की मंग… झिंगाट चा फील आहे यात…  #जाऊं द्या ना बाळासाहेब!!!   #Full Lyrics Of Bring It On Song by Ajay-Atul

अगं मनात माझ्या आली साधी नितळ भावना

किती Alone राहू आता चल couple होऊना?

बघ तरी गोडीत, लक्झरी गाडीत आलोया मै हूं Don, ||

Baby Bring It On…. आलिंगंनाला!!! |||

आली तू गावात, बाराच्या भावात, गेलया सारच भान

अन कॉलेजात भेट झाली तुझी, भेटून वाटलं छान!!! bring it on

वळखपाळख वाढली म्हणून लागली तुझीच गोडी,

अगं प्रपोसे माझं तू अपोज करून, कशी गं जमल जोडी…!

होतो म्या किडकिडा, हाडं बी काडीची,

गुटका खाऊन वाट लागली body ची…

येड्यागाबळ्याला राणी तूच प्रीती दावली,

तुझ्याविना राणी मला एक न्हाई भावली,

फालतूपणा बी गेला, नवी रीत घावली,

तुझ्या मागं मागं राणी, म्या बी जीम लावली,

करतोय झोंबा अन मारतोय बोंबा, न हालत झाली घान!

Baby Bring It On…. आलिंगंनाला!!! |||

raman raghav 2.0

raman raghav 2.0

#रमन राघव 2.0 ची समीक्षा

आज Big Cinemas मध्ये जाऊन raman raghav 2.0 हा अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपट बघायचा दुर्दैवी योग जुळून आला. एक तर Big मध्ये चित्रपट पाहणे म्हणजे मनस्ताप असतो. कारण तिकीट वाढवून-चढवून विकणे हा त्यांचा गैरधंदा आहे. पण प्रेक्षकाला वेळ भेटल्यावर चित्रपट बघायची आवड असते. Big मध्ये खुर्च्या मोडलेल्या असतात, एसी बंद असतो त्यामुळे सामान्य चित्रपटगृहात बसल्याप्रमाणे फील येतो. दुसरी गोष्टी म्हणजे interval मध्ये ‘समोसा-समोसा’ म्हणून विचारात एक पोरगा येतो; तो feel तर महामंडळाच्या बसमध्ये बसल्याप्रमाणे असतो.

हे सगळे प्रकार प्रेक्षक सहन करतो आणि अपेक्षा एकच असते की दिलेले पैसे वसूल व्हावे; अर्थात चित्रपट चांगला असावा. पण आज तोही हिरमोड झाला. अनुराग कश्यपचे चित्रपट हे वेगळे आणि वेगळ्याच दर्जाचे असतात यात वाद नाही. पण गेल्या वेळचा ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि आजचा ‘रमन राघव 2.0’  बघून वेगळेपणाचा अतिरेक झाल्यासारखं वाटतं. १९६० च्या दशकात मुंबईत एका सिरियल किलर ने दहशत माजवली होती. त्याच्याच नावावर अन घटनांवर आधारित हा चित्रपट असेल असा आपला समज चित्रपटाच्या सुरूवातीलाच खोटा ठरतो. ज्याला रमन राघव १९६६ च्या घटना माहीत आहेत तो चित्रपटातील रमन हा त्याच रमनचं आयुष्य समजेल आणि ते तसं आहेही. पण चित्रपटातील जो रमन आहे (नवाज) तो आजच्या काळातील, म्हणजे २०१३ ते २०१५ मधील आहे. मुळात हा जो रमन आहे तो १९६६ च्या रमन ला आदर्श मानत असतो. याला त्याच्याप्रमाणे बनायचं असतं. हा स्वतःला तोच रमन समजत असतो. पण ह्याचं नाव रमन असतं आणि याला शोध असतो तो राघव चा!!!

दुसरीकडे पोलिस खात्यातील एक तरुण अधिकारी. जो स्वतः पोलिस असून नशेच्या आहारी गेलेला असतो. इतका की त्यासाठी तो कोणाचा खुनही करू शकतो. पोलिस खात्यात राहूनही तो एका अपराध्यापेक्षा कमी नसतो. हा पोलिस म्हणजे रमनचा राघव!!! ह्याचं आणि रमनचं एक समीकरण योगायोगानेच जुळलं गेलेलं असतं. राघवचे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी असतात. ड्रग्स, त्यातून येणारं मानसिक, शारीरिक अन लैंगिक वैफल्य. त्यातून स्वतःवरचा ताबा हरवून बसणं. मग चतुर रमन ह्या राघवला मिळवायचा प्रयत्न सुरू करतो. रमन अर्थात नवाज हा माथेफिरु आहे का नाही असा प्रश्न पडतो. कारण त्याच्या बोलण्यात एक विचार असतो पण वागण्यात कसलेही नियम नसतात. निराकारण कोणालाही मारणे यात त्याला काहीच चूक वाटत नाही. एका विशिष्ट विचार किंवा हेतु त्या क्रूरतेमागे असतोच असं नाही.

 

 

दिग्दर्शन-

चित्रपटात मूळ कथानक असं असलं तरी ते ‘chapter’ ह्या स्वरुपात दाखवण्यात आलं आहे. अनुराग ने असा प्रकार ‘black friday’ मध्ये वापरला होता. चित्रपटाच्या सुरूवातीला ‘हा चित्रपट १९६६ च्या रमन राघव वर आधारित नाही’ असं लिहिलं होतं. पण कथा तीच आहे. दिग्दर्शक नेमकं प्रेक्षकांना का confuse करू पाहतो तेच समजत नाही. कदाचित त्या घटनेला आजच्या काळात खेचून आणण्यासाठी ही कल्पना वापरली असू शकते. अनुराग ने आजवर वेगळ्या धाटणीचे अनेक यशस्वी चित्रपट दिलेत, हाही त्यातील एक म्हणावा लागेल, पण येथे घोळ झाल्याचं जाणवत राहतं. कथेवर पकड जारी मजबूत असली तरी त्याला तितकी गती मिळालेली नाही. दोन वेगळी व्यक्तिमत्व समांतर जाऊन एकत्र भिडतात असा प्रकार दिग्दर्शक दाखवू पाहतो. ही एकट्या रमनची गोष्ट नसून रमनला हव्या असलेल्या राघवचीही गोष्ट असावी असं लेखक-दिग्दर्शकाला वाटतं. यात दोन व्यक्तिमत्व असल्याने चित्रपट तुकड्यांमध्ये दिसतो. चित्रपटात एकसंधपणा दिसत नाही. इतका गंभीर विषय असताना दिग्दर्शक प्रत्येक प्रसंगात ‘विनोदनिर्मिती’ का करू बघतो हेच कळत नाही. नवाजचं character हे psycho killer चं आहे का एखाद्या जोकर चं तेच काही वेळ समजत नाही. संपूर्ण चित्रपटभर नवाज मजेशीर गप्पा मारताना दिसतो. जोकर वरुण आठवलं की नवाजचं जे माथेफिरु character आहे ते बघून Batman मधील जोकरची आठवण येत राहते. दिग्दर्शक हे कॅरक्टर त्या संदर्भाने उभं करू पाहत असावा? दुसरीकडे, शहरात इतके खुलेआम खून पडत असताना पोलिस याबाबत गंभीर आहे का नाही असे प्रश्न पडावेत इतपत बालिशपणा चित्रपटात आहे. रमन विरुद्ध राघव असा सामना जारी दाखवायचा प्रयत्न असता तरी तो विखुरलेला दिसतो.

serial killer किंवा psycho killer यावर बरेच चित्रपट येऊन गेले आहेत. अगदी अलीकडे म्हणाल तर रितेशचा ‘एक विलन’ असोत किंवा के. के. मेननचा ‘स्टोनमॅन मर्डर’ असोत. दोन्हीही वेगळ्या धाटणीचे होते. raman raghav हा या दोनहीच्या मध्ये अडकलेला दिसतो. चित्रपटात शेवटपर्यंत काही गोष्टींचा उलगडा होत नाहीच. पण रमन ला राघव कसा मिळतो हा प्रवास शेवटाला उलगडल्यावर प्रेक्षकांना काहीसा दिलासा मिळतो.

अभिनय-

अभिनयाच्या बाबतीत चित्रपट नवाज ने पुर्णपणे आपल्या खांद्यावर घेतला आहे. बाकीचे चेहरे नवे असल्याने त्यांच्याशी समरस होण्यास थोडासा वेळ लागतो पण नवाज ने पहिल्या सीन पासून भूमिका अक्षरशः ‘रंगवली’ आहे. serial killer असून त्याचं विनोदी वाटणे, मध्येच भयावह वाटणे, मध्येच वेडसर वाटणे यासाठी नवाज ने जीव ओतून काम केलं आहे. त्याचं डोळ्याला हात लावून बघायचा प्रकार तर अप्रतिम आहे. नवाज चा आवाज आणि त्याचा कद हा कुठल्याही भुमेकेत सहजासहजी बसू शकतो. gangs of wassepur, बदलापूर, manzi ते रमनची भूमिका… ह्या सगळ्यात चपखलपणे वावरताना नवाज कलाकार म्हणून संपन्न होत आहे हे नक्की!!!

दुसर्‍या बाजूला विकी कौशिक हा नवखा कलाकारही चांगलं काम करतो, पण एक बिघडलेला पोलिस म्हणून तो त्या भूमिकेत शोभत नाही. सोबिता द्लीवला हीचंही काम व्यवस्थित आहे. छोट्याशा भूमिकेतील अमृता सुभाष अन चित्रपटातील तिचा नवरा यांचं काम सुंदर आहे.

संगीत –

नेहमीप्रमाणे संगीत सुंदर आहे. अनुरागने आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगळं संगीत देण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. सुरुवातीचं ‘कत्ले आम’ हे तर कानाला अन मनाला हवंहवंसं आहे. पार्श्वसंगीत हेही उत्तम आहे.

छायाचित्रण-

येथेही उत्तम असंचं म्हणावं लागेल. कारण वास्तववादी दिसणारा चित्रपट हे छायाचित्रांकणचं यश आहे असं म्हणावं लागेल.\

लेखन-

अनुराग कश्यप स्वतः उत्तम लेखक आहे यात वाद नाही. ह्या चित्रपटाची कथा हीसुद्धा व्यवस्थित आहे पण त्याची गुंफण चुकल्यासारखा प्रकार जाणवत राहतो. आठ chapter मधून चित्रपटाची कथा उलगडण्याचा प्रयत्न हा अर्धवट वाटतो. चित्रपट तुकड्यांत विखुरला गेला आहे असं वाटतं. कथेत स्पष्टपणा असता तर अजून बरं झालं असतं. शेवटी गूढकथेला बर्‍याच मर्यादा असतातच!

नोट:- हा चित्रपटही अनुरागच्या इतर चित्रपटांसारखाच आहे. म्हणजे, चित्रपटात दारू, सिगार, नशा, सेक्स, लैंगिकता, नागवेपणा, शिव्या, अश्लील शब्द आहेतच. आता तो असेच चित्रपट का बनवतो असे सेन्सॉर प्रश्न विचारू नको. ह्या गोष्टी पटत असतील तरच चित्रपटगृहात जा!!! तेही Big Cinemas सोडून!!!

PROMOTIONS
error: Content is protected !!