Category: अनुभव

भारत माता की जय!!!

भारत माता की जय!!!

टीप- अर्थ समजून घेण्याची विवेकबुद्धी असेल तरच वाचायचा त्रास घ्यावा!

गोविंद बस स्टॉपवर बराच वेळ उभा होता. सकाळी आठ वाजता येणारी एसटी अजूनही आली नव्हती. किंबहुना ती आता येईल याची शक्यताही नव्हती. आठ नंतर थेट सव्वानऊ वाजताच गाडी. तोपर्यंत बसस्टॉपवर बसून टाइमपास करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. टाइमपास व्हावा म्हणून तो स्टॉपवरच्या कोपर्‍यात ‘मोफत वाचनालय’ म्हणून एक लोखंडी कप्पा केला होता त्या दिशेने गेला. तिथे सकाळी-सकाळी पेपर टाकले जातात जे पुढील अर्ध्या तासात गावातील लोकांकडून गायब केले जातात. ते वाचण्यासाठीच नेले जातात असं नाही तर समोरचा भजेवाला रद्दी कमी पडली तरी ते पेपर उचलून घेऊन जातो. त्यालाही तसं कोण विरोध करत नाही. कारण त्या कप्प्यातील पेपर गावातील प्रत्येकाच्या घरात एकदा-न-एकदा गेलेलाच असतो. गोविंद त्या पत्र्याच्या कप्प्यामध्ये डोकावून बघतो. एकही पेपर शिल्लक नसतो. कोपर्‍यात कुठलंतरी दुमडलेलं पुस्तक दिसतं. गोविंद ते उचलतो. सावरकरांचं परिचयपुस्तिका असते ती. कोणत्यातरी पक्षाने सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यावर छोटीशी पुस्तिका तयार केलेली असते आणि इथे ठेवलेली असते. पण त्याला कोणीच हात लावत नाही. गोविंद सावरकरांना घेऊन वाचत बसतो.

काहीच वेळात ऋग्वेद स्टँडवर येतो. गोविंद ऋग्वेदपेक्षा काहीसा मोठा. येताच ऋग्वेद म्हणतो, “काय गोविंददादा, मुंबईला का?”

गोविंद उत्तरतो, “हो रे. पण आठची बस आलीच नाही. सव्वानऊच्या बसची वाट बघतोय.”

ऋग्वेद हसत म्हणतो, “एक बस वेळेवर येईल तर शपथ. पावसासारख्या वाट्टेल तेंव्हा येतात बघ. वरुन सगळ्या टपाराड बसेस आपल्या गावाला लावलेल्या… काय खरं नाय बघ!”

गोविंद वर हात करून म्हणतो, “सब भगवान भरोसे है भाई अपना…” आणि एक निश्वास सोडून म्हणतो, “पण तू काय करतोय इथे? आज सकाळपासूनच अड्डा जमवायचा का इथं?”

ऋग्वेद आपले वाढलेले केस हाताने सरळ करत म्हणतो, “नाही रे दादा, पुण्याला निघालोय. दोन वाजता राज्यासेवेचा पेपर आहे.”

गोविंद मिश्किलपणे हसत म्हणतो, “सुरूच आहे का अजून?”

ऋग्वेद नाक वाकडं करत म्हणतो, “लास्ट अटेम्प्ट!”

गोविंद हात जोडत म्हणतो, “धन्य आहे बाबा तुझी. चार वर्षे झाली रे आता. सोड हे, काहीतरी कामधंद्याचं बघ आता. किती दिवस म्हातार्‍याच्या जिवावर बसणार अजून.” हा नेहमीच अनुत्तरित राहणारा प्रश्न गोविंद विचारतोच.

थोडासा उदास होत ऋग्वेद म्हणतो, “तेच प्रयत्न चालूय दादा, पण नंबरतरी लागला पाहिजे. चार एकर शेतीवर आधीच्या पिढीने काढली, आपण स्वप्नं तरी मोठं ठेवावं की रे. एकदा सरकारी नोकरीत घुसलो की आयुष्य बनेल बघ.”

गोविंद नरमाईने म्हणतो, “खरं आहे रे तुझं, पण काहीतरी काम-धाम करत केलास हे तर म्हातार्‍याच्या खांद्यावरचं ओझं थोडं हलक होईल.”

ऋग्वेद, “ह्या गावात काय करणार? अन शहरात जाऊन करावं तर आलेले सगळे तिकडेच संपणार. त्यापेक्षा इथं राहून कधी-मधी शेतीला तर जातो.”

गोविंद हात झटकत म्हणतो, “खरय बाबा तुझं. पण तुझं एक बरं वाटतं, तू दिवसभर गावातल्या पोरांसारखा स्टँडवर बसून टवाळक्या तरी करत नाहीस.”

ऋग्वेद त्याच्या बोलण्याने जरा सावरतो. काही क्षण शांत जातात अन ऋग्वेदचं विचारतो, “पण तू कशाला निघालास मुंबईला?”

गोविंद जागेवरून उठतो, सावरकरांचं पुस्तक परत ठेवतो आणि म्हणतो, “नेहमीचच रे, आश्रमशाळेचं काम. निधी नाही, मुलं ज्यादा झालीत पण सोय नाही, साहित्य नाही वगैरे वगैरे वगैरे!”

ऋग्वेद आश्चर्याने म्हणतो, “च्यायला दादा, तुझा न आदर्श घ्यायला पाहिजे गावातल्या पोरांनी. तू जे काही करतोय ना, ते कौतुकास्पद आहे. अनाथ मुलांसाठी जे करतोस ना त्यासाठी तुला सलाम केला पाहिजे.”

गोविंद सावरकरांच्या पुस्तकाकडे हात दाखवत म्हणतो, “मला काही असं पुस्तकात बंदिस्त होऊन कुठल्यातरी वाचनालयाच्या कोपर्‍यात पडायचं नाहीये. हे मला मनापासून वाटतं म्हणून मी करतो.”

ऋग्वेद हळू आवाजात म्हणतो, “दादा, एक खरं सांगायचं, तुला मनापासून हे आवडतं?, कर्तव्य म्हणून करतोस?, नोकरी लागली नाही म्हणून करतोस? का यात छपाईचा काही मार्ग असतो म्हणून करतोस? वाईट नकोस हं वाटून घेऊ…”

गोविंद खळखळून हसतो अन म्हणतो, “छपाई अन इथे… अरे वेड्या सरकारच्या तुटपुंज्या पगारावर जगतोय मी. अनाथालयातील पोरांना महिन्याला खायला मिळालं तरी पुष्कळ झालं, मला कसलं खायला मिळणार आहे.”

ऋग्वेद, “राग आला का दादा?”

गोविंद, “नाही रे, राग कसला त्यात? मीही आधी तुझ्यासारखा नोकरीसाठी तळमळ करत होतो. एमपीएससी च्या वार्‍या मीही केल्यात. ह्या शाळेवर कशीबशी नोकरी मिळाली. गावातल्या गावात आहे म्हणून टेंपरारी करू लागलो. पण शपथ सांगतो ऋग्वेद, जेंव्हा पोरांची अवस्था बघितली ना जीव कासावीस होऊ लागला. कदाचित अतिसंवेदनशील असल्याने असेल, पण मला वाटलं देवाने या पोरांसाठीच मला इथे पाठवलं आहे. मरेपर्यंत यांच्यासाठी काही करता आलं तरी समाधान असेल बघ मला. आयुष्यात कुठल्यातरी क्षणी मनाचं ऐकावं लागतं.”

दोघांचं बोलणं सुरू असताना मुंबईला जाणारी बस आली आणि गोविंद निघाला. ऋग्वेदने क्षणभर त्याचा हात धरला आणि पुन्हा विचारलं, “दादा रागावला नाहीस न?” गडबडीतच गोविंद म्हणाला, “नाही रे वेड्या, यात कसला आलाय राग. चल निघतो, रात्री भेटू. आणि हो, शेवटचा अटेम्प्ट आहे, कर काहीतरी.” असं म्हणून तो निघून गेला.

बस सुरू झाली. एका फाटक्या सीटवर गोविंदला जागा मिळाली. खिडकीतून बाहेर बघत होता. ओसाड पडलेले रान मागे जात होते आणि खिडकीतून धूळ आत येत होती. त्याला त्या धुळीचं काहीच वावगं वाटलं नाही पण शेजारचा गृहस्थ त्रासिक चेहरा करताच त्याने खिडकी ओढून घेतली. पण हादर्‍याने खिडकी पुन्हा आपोआप उघडली जात होती. मागच्या सीटवर बसलेला एक व्यक्ति सांगू लागला, ‘भारताने बदला घेतला, पाकिस्तानवर हल्ला केला.’ बसमध्ये तीच चर्चा सुरू झाली. गोविंदने मोबाइल काढून बातम्या तपासल्या तेंव्हा त्याला कळलं की रात्री भारतीय वायुदलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार केलं. गोविंदला प्रचंड आनंद झाला. प्रत्येक भारतीयाला आनंद होईल असाच तो क्षण होता. बसमध्ये सुरू असलेल्या चर्चेत तोही सहभागी झाला. भारताच्या सामर्थ्याचे गोडवे गायले जात होते. नेहमी कटकटीत असणारे एसटी प्रवासी आज एकसुरात आनंद व्यक्त करत होते.

गाडी मुंबईला पोहोचली. ओसाड पडलेल्या माळरान आणि इमारतींचं जंगल असा तो प्रवास होता. गोविंदने आपली पिशवी घेतली आणि निघाला. गाडीतून उतरून समोर येतो न येतो तोच दोन-तीन कार्यकर्त्यांनी त्याच्या हातात पेढा टेकवला. भारताने युद्ध जिंकल्याच्या आवेशात त्या व्यक्तीने पेढे देऊन आनंदोत्सव साजरा केला होता. गोविंदलाही खूप भारी वाटलं. सामर्थ्यशील भारताचं दर्शन घडत असल्याचा अभिमान त्याच्या चेहर्‍यावर होता. देशात काहीतरी बदल होतोय, चांगलं घडतंय असं वाटत होतं. रस्त्यावर व सगळीकडे तेच वातावरण होतं. लोकं अक्षरशः विजयोत्सव साजरा करत होते. वंदे मातरम, भारत माता की जय, इंडियन आर्मी झिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कुठे-कुठे तर फटाकेही फोडले जात होते. आज सर्वांचा उर अभिमानाने भरून आला होता. घटनाही तशीच घडली होती, शत्रू राष्ट्राचं नाक जमिनीवर घासल्या गेलं होतं.

Image result for a boy carrying india flag

देशप्रेमाच्या अन अभिमानाच्या विचारांत गुंतलेला असताना कसल्यातरी आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. समोर चौकात गर्दी झाली होती. सिग्नल तोडून जाणार्‍या एका वाहनाने दुसर्‍या वाहनाला उडवलं होतं. त्यात दूसरा व्यक्ति रक्तबंबाळ होऊन रस्त्याच्या मध्यभागी पडला होता. गर्दी जमा झाली, फोनाफोन सुरू झाले अन ट्रॅफिक वाढली. गोविंद तेथे जास्त वेळ न रेंगळता लागलीच निघाला. त्याला मंत्रालयात जायचं होतं. गावातील आश्रमशाळेची अवस्था दयनीय झाली होती. अनुदान रखडलं होतं, इमारत कोसळायला आली होती, मुलांना अंथरूण-पांघरून नव्हते, चांगलं अन्न मिळत नव्हतं. आश्रमशाळेला मदत मिळावी म्हणून तो सारखे खेटे मारत होता. असे अनेक प्रवास मुंबईत फक्त या कामासाठी घडलेले होते पण काम काही होत नव्हतं. त्यामुळे तो हताश झाला होता.

गोविंद गडबडीने मंत्रालयात पोहोचला. आज तिथे जरा जास्तच गर्दी अन जास्तच सुरक्षा व्यवस्था होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे असेल कदाचित असं म्हणून त्याने ते स्वीकारलं. आज देशभर राष्ट्रभक्तीचा ज्वर उसळला होता. सामन्यातील सामान्य माणूसही सगळी सुख-दुखं विसरून देशाच्या विजयात सामील झाला होता. आजच्या या नवभारताच्या दिवशी तरी काम होईल असं गोविंदला वाटत होतं. नेहमीप्रमाणे रांगेत थांबावं लागलं. नेहमीचेच सोपस्कार झाले, किंबहुना अधिकच! तिथेही सर्व कर्मचारी देशभक्तीच्या वातावरणाने न्हावून निघाले होते. गोविंदचं काम ज्या डेस्कवर होतं तिथे तो पोचला. आज कधी नव्हे ते समोरील व्यक्ति हसरा चेहरा घेऊन बोलत होती. त्याने आधी गोविंदला पेढा दिला आणि सांगितलं, “घ्या पेढे! भारतीय सैन्याच्या कामगिरीबद्दल आम्हीच पेढे वाटत आहोत. आजचा मास्टरपीस होता. पाकिस्तानची चांगलीचं तंतरली.” गोविंदलाही आज त्याच्याशी बोलायचा उत्साह आला. भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्यापेक्षा किती सामर्थ्यवान आहे, आपल्याकडे त्यांच्यापेक्षा किती हत्यार अधिक आहेत, किती लढाऊ विमानं अधिक आहेत याची तपशीलवार चर्चा झाली दोघांत. बलाढ्य भारत, विकसित भारत यावर कसलाच मतभेद नव्हता.

शेवटी गोविंदने कामाचं सांगितलं. त्याला वाटलं आज नवीन भारत सुरू झालाय. प्रत्येकाच्या मनात राष्ट्राप्रती प्रचंड आदर आहे आणि कर्तव्यनिष्ठेची जाण आहे. त्या अधिकार्‍याने फाइल बघितली आणि सांगितलं, “होईल. पण जरा वेळ लागेल. काय, आज सगळेजण जल्लोषाच्या मूडमध्ये आहेत. देशासाठी इतका मोठा दिवस आहे ना. थोड्या वेळाने सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छोटासा कार्यक्रमही आहे त्यामुळे कर्मचारी त्या कामात अडकलेत. बघूयात आपण काय होतय ते. मी सांगतो तुमची केस वर.”

नेहमीप्रमाणे आजही रिकाम्या हातानेचं गोविंद मंत्रालयातून परतला. बदललेल्या भारताने पहिल्यांदाचं त्याचं काम केलं नाही. सकाळचा उत्साह, सकाळची जल्लोषाची भावना आता विरळ झाली होती. पुन्हा उदासीनता आली! आता पुन्हा तोच प्रवास करून गावाकडे परतायचं होतं.

समोरच्या झाडाखालील रसवंतीसमोर तो उभा राहिला. एक ऊसाचा रस दिवसभरचा थकवा मिटवू शकतो याची त्याला खात्री होती. शिवाय जेवायचा खर्चही वाचणार होता. त्याने रसाचा ग्लास घेतला अन थोडासा मागे जाऊन थांबला. त्याच झाडाखाली एक म्हातारी कुठलीतरी शिळ्या भाकरीची पुरचुंडी उघडून खात होती. रसाजवळच्या माशा तिच्या अन्नावर बसत होत्या. कडक झालेल्या भाकरीचे तुकडे नसलेल्या दातांमुळे घशाखाली जाणं अवघडच होतं तिच्यासाठी. तिच्याकडे बघताच गोविंदला आश्रमातील मुलांची आठवण झाली. असेच बेवारस, दोन वेळेच्या अन्नाचे मोहताज मुलं कालही तसेच होते आजही तसेच आहेत. फक्त त्यांच्या दुखाचा काही काळासाठी विसर पडावा इतकं मोठं सुख राष्ट्राला मिळालं आहे. दिवसभर काबाडकष्ट केल्यावर एखादा मजूर चाळीस रुपयांची देशी दारू घेऊन नशेच्या अमलाखाली जातो कारण शरीराला होणार्‍या वेदना मेंदूपर्यन्त पोहचू नयेत म्हणून! नशा माणसाला प्रत्येक दुखं विसरायला लावते. धुराळा उडाला, वावटळ आलं की उखडलेल्या रस्त्यांवरचा प्रवासही निमूटपणे करावाच लागतो. एकदा का कुठल्यातरी अव्वल दर्जाच्या नशेचा अमल मेंदूवर चढू लागला की शरीराच्या अन मनाच्या सगळ्या जखमा कितीही आक्रोश करू लागल्या तरी त्यांचा विसर पडतो. मेंदू आपल्याच धुंदीत मग्न असतो. कदाचित अशीच नशा झाली असावी जी इतर सर्व पीडा क्षणात विसरायला लावत असेल. जी आपल्या कर्तव्याचं पालन करायची आठवणही करून देत नसेल, जी योग्य मार्गाचं अनुकरण करायची शिकवण देत नसेल… तीच विजयाची नशा!

रसवाल्याने रिकामा ग्लास हातातून ओढून घेतला तेंव्हा गोविंद तंद्रितून बाहेर आला. वास्तवाची धग नशेच्या गारव्यापेक्षा कैकपटीने अधिक परिणमकारक असते. त्याने रसवाल्याला विचारलं की त्या आजीबाई कोण आहेत. त्याला कळालं की त्या झाडलोटचं काम करून जगतात. साठीच्या वर वय असलेली ती वृद्ध महिला अन्न मिळवण्यासाठी झगडतेय!!! गोविंदच्या मनात कालवाकालव झाली. त्याने एक भरलेला रसाचा ग्लास घेतला आणि त्या आजींजवळ गेला. हसर्‍या चेहर्‍याने आजींच्या हातात तो ग्लास ठेवत म्हणाला, “अहो आजी आज आनंदाचा दिवस आहे देशासाठी. भारताने पाकिस्तानला हरवलं. सगळीकडे जल्लोष होत आहे. मीही आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांना रस देतोय. हा घ्या रस!”

आजीबाईंच्या चेहर्‍यावर कसलेच भाव नव्हते. त्यांनी ‘काय माहीत’ असे हात उडवले आणि रसाचा ग्लास निमूटपणे घेतला.

पैसे देऊन गोविंद परत निघाला. त्याचे डोळे भरले होते. आधीपासूनच तो अतिसंवेदनशील. कोणास ठाऊक का, पण त्याला महाभारतानंतरचा विदुर डोळ्यासमोर येत होता. त्याचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं. काय फरक पडतो, राष्ट्र  असेल, राष्ट्र नसेल! शत्रू असेल, शत्रू नसेल! समाजव्यवस्था असेल-नसेल, पण भूक असणारच आहे, गरीबी असणारच आहे. त्या वृद्धेला काय झालं, कधी झालं आणि कशासाठी झालं याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. ती मरण येईपर्यंत जगणं ढकलत होती. न ती राष्ट्रभक्त, न ती राष्ट्रद्रोही! ती मानवी अवतारात जन्म घेतलेली क्षुल्लक कोणीतरी. देशात, नव्हे जगात असे कितीक लोकं असतील ज्यांना कसल्याच गोष्टींचा काहीच फरक पडत नाही, फरक पडतो तो फक्त दोन वेळच्या पोटाची भूक भागवण्याचा!

समोरून मिरवणूक निघाली होती. तरुणांचे जत्थे जल्लोष करत निघाले होते. परिसरात ‘भारत माता की जय’ चा जयघोष दुमदुमत होता. तिरंगा वार्‍यावरती डौलाने फडकत होता. लोकांचे प्रफुल्लित चेहरे गोविंदला दिसत होते आणि क्षणात त्याला त्या म्हातारीचा अन आश्रमशाळेतील पोरांचा चेहराही दिसला. त्या तिरंग्याला बघून गोविंदने सल्यूट केला अन खोल मनातून एक आर्त किंकाळी बाहेर आली, “भारत माता की जय!!!” आणि डोळे पुसत तो गर्दीतून पुढे सरकला.

सायंकाळी बसमधून परतत असताना इमारतींच्या जंगल मागे पडू लागलं आणि ओसाड पडलेल्या माळरानावर त्याची नजर स्थिरावू लागली. त्याचं मन विषण्णतेने भारल्या गेलं होतं. गावातील बसस्टॉपवर उतरताच समोर तरुण व रिकामटेकड्या वृद्धांचा घोळका त्याला दिसला. गावातही विजयोत्सव साजरा झालेला होता. तिथेही तीच चर्चा सुरू होती. कोणीतरी जवळ येऊन गोविंदला पेढा देण्याचा प्रयत्न केला पण गोविंद ताडकन पुढे निघून गेला. समोरून ऋग्वेद येत होता. गोविंद त्याच्याकडे बघून खिन्नपणे हसला अन म्हणाला, ‘तुला खरच सरकारी अधिकारी व्हायचं आहे?’

ऋग्वेदला काहीच कळलं नाही. तो पहिल्यांदाच अशा गोविंददादाला बघत होता. जेंव्हा प्रचंड मोठा पर्वत सर करून यात्री सर्वोच्च शिखरावर पोहोचतो आणि तिथे काहीच नसल्याचं त्याला कळतं तेंव्हा त्या प्रचंड ऊर्जेच्या, प्रचंड आशेच्या मानवी मनाला अतृप्ततेची अनाहूत चाहूल लागू लागते आणि तिथून सुरू होतं ते नैराश्यपर्व! ऋग्वेदला अशीच कुठलीतरी अपरिचित चाहूल गोविंददादाच्या चेहर्‍यावर दिसली.

गोविंद आश्रमशाळेत पोहोचला. अंधारातच आत गेला. सर्वांना शांतपणे जेवायला दिलं आणि मुलं नेहमीप्रमाणे हसत-बागडत झोपायला गेली. गोविंद खुर्चीवर बसून सगळं शांतपणे बघत होता आणि कसल्यातरी विचारात बुडून गेला होता. आश्रमशाळेच्या तुटलेल्या खिडक्यांतून वारा आत येतच होता, एका घोंगडीत दोन मुले झोपली होती, गाद्या नसल्याने चवाळ्यावर फाटकी बेडशीत टाकून इतरांपेक्षा मोठ्या मुलांनी आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. खुर्चीवर भरल्या डोळ्यांनी बसलेल्या गोविंदजवळ लहानगा विष्णु आला आणि हळूच म्हणाला, ‘गोविंददादा मुंबईहून काय आणलं माझ्यासाठी?’

आता गोविंद थांबू शकला नाही. डोळ्यातील अश्रु गालावरून घरंगळत शर्टवर पडले. अश्रु पुसत गोविंद म्हणाला, “मी न एक गोष्ट आणलीय, राष्ट्रवादाची!”  

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

देवाज्ञा

देवाज्ञा

सृष्टी
.
ही सृष्टी मीच निर्माण केली पण त्यावर माझा आज कसलाच हक्क उरला नाही। का? कारण मी निर्माण केली तशी ती आज राहिलीच नाहीच। त्यात झालेले बदल मला कधीच अपेक्षित नव्हते… बालपणीची तसबीर पाहावी तितकी ती अनोळखी झाली.. कदाचित परकीही! निर्मिती करून उपयोग नाही, संगोपन, संस्कार करता आले पाहिजेत… बापाचं कठोर हृदय होतं पण आईची माया देण्यात कमतरता आल्याने ती बिघडली… आता तीही मला मानत नाही… मानावं तरी का? केवळ जन्म दिला म्हणून तिच्यावर माझा अधिकार असू शकत नाही… ती आज जी आहे ती तिच्या स्वतःच्या पायावर उभी आहे… अंश असल्याने वंश सिद्ध होत नाही… आता वैफल्य येतंय, जे माझं होऊ शकलं असतं त्यानेच आपलेपणा नाकारला… पण मला एक अधिकार आहे. तिच्या विनाशाचा! संस्कार करू शकलो नसलो तरी शासन करायचा अधिकार निर्मात्याला असतो. ती चुकत असेल, वर्चस्ववादी होत असेल तर माझाही नाईलाज होईल! तिला संपवावे लागेल… पुन्हा नव्या सृष्टीला जन्म द्यावा लागेल… पण यावेळेस चूक नाही करायची… तिला लावारीसासारखं नाही सोडायचं… संगोपन करायचं, संस्कार करायचे!

Related image

अभिषेक बुचके   ||   @Late_Night1991

पर्वती!

पर्वती!

बदल… नियतीचा सिद्धांतच आहे. तो कधी संथपणे तर कधी अपघाताने घडतो. सदासर्वकाळ स्थिर, न बदलणारं असं काहीच नसतं. रात्रीच्या काळोखालाही पहाटेच्या प्रकाशाची आस लागलेली असतेच अन दिवसाचा थकवा सोडून प्रकाश संध्याकाळी रात्रीच्या मांडीवर शांतपणे स्थिरावतोच. प्रवास चिरंतर सुरूच असतो. तोल जाताना तोल जातोय हे कळलं तरच सावरण्याचं सामर्थ्य येतं, नाहीतर समतोल साधत फक्त निष्ठुरता अन निरसता अंगी पडते. बदल घडावा अन घडवावा… शेवट तर असाही होतोच!

Image may contain: sky, tree, outdoor and nature

पर्वतीचं सांजसमयी बदलत जाणारं रूप

Image may contain: sky, night and outdoor

अभिषेक बुचके   ||  @Late_Night1991

पर्वतीबद्दल लेख…

पर्वती

अंतिम यात्रा!

अंतिम यात्रा!

आपल्याला वाटतं की आपल्या प्रिय व्यक्तीने कायम आपल्या सहवासात रहावं। पण नियतीला ते मान्य नसतं। स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला ताटकळत ठेवणं हा तरी कुठे न्याय आहे। मरणाच्या उंबरठ्यावर उभं राहून कितीही मागे बघण्याचा प्रयत्न केला तरी उचललेलं पाऊल मागे पडत नाही। जीवनाच्या दोरीचा पीळ संपत आला की मृत्यूच्या खाईत जावंच लागतं। आयुष्याची शिदोरी संपलेली असते अन पाप-पुंण्याचा तराजू समतोल झालेला असतो तेंव्हा कुठे दीर्घ प्रवासाची शेवट होते। कधीतरी रडत रडत सुरू झालेला आयुष्याचा प्रवास परिचितांच्या साश्रु नयनांचा निरोप घेऊन संपवावा लागतो। भोग-उपभोगाच्या सीमेपार गेलेलं शरीर पंचत्वात विलीन होण्यास आसुसलेलं असतं। आत्मा मात्र काही काळ शांतपणे उभा असतो। आपणच जन्मभर केलेल्या कर्माचे प्रतिध्वनी उमटताना ऐकत उभा असतो।

इच्छा आकांक्षा राग लोभ द्वेष प्रेम जिव्हाळा माया ममता ओढ सगळं सगळं लोप पावतं। जे ह्या जगातलं आहे ते ह्या जगातच सोडून जायचं असतं। निर्मळ निरोगी पवित्र आत्मा शुभ्र वस्त्र परिधान करून फक्त स्मितहास्य करत मागे पडणाऱ्या जगाकडे बघत असतो।

आयुष्यभर केलेल्या ईश्वरभक्तीचा संचय रिता झालेला असतो। आता खऱ्या ईश्वराच्या भेटीची ओढ असते। चिरंतर प्रवासानंतर आत्मा त्या अगाथ शक्तीशी एकरूप होतो। प्रवास संपतो…

खजिना!

खजिना!

What Long Term Investment can give to Next Gen  

दीर्घकालीन गुंतवणूक  ||  Dematerialization  || शेअर बाजार मराठीत  || Long Term Investment

खजिना! गुप्तधन! लॉटरी! असे शब्द ऐकले की अंगावर रोमांच उभे राहतात. अचानक धनलाभ कोणाला नको असतो. पण हा धनलाभ सगळ्यांच्या नशिबी नसतो. अनेकदा अनेकजण तळघर, जुने वाडे वगैरे शोधत हयात वाया घालतात. कुठे लपवलेल्या सोन्याच्या मुद्रा, हीरे, दागिने सापडतात का ह्या अपेक्षेने. पण अशांच्या नशिबी बर्‍याचदा निराशा येते.

आज हे सगळं का आठवतं आहे? तर अशाच एका खजिना सापडलेल्या व्यक्तीची भेट झाली होती. त्याचीच ही कहाणी. त्यांना हा खजिना कुठे तळघरात, जमिनीत पुरलेला वगैरे सापडला नाही, तर तो त्यांच्या घरातच कित्येक दिवस पडून होता. फक्त तो खजिना आहे हे त्यांना माहीत नव्हतं.

एक गृहस्थ आहे. त्यांचं नाव दिनकर (बदललेलं नाव). त्यांना वडलांची जुनी ट्रंक साफ करत असताना काही कागदपत्रे सापडली. ती कागदपत्रे होती Share Certificates. दिनकरला साधारणपणे अंदाज आला की हे shares शी संबंधित काहीतरी आहे. माझ्या एका मित्राच्या माध्यमातून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. ते सगळे certificates बघितल्यावर मी दिनकर यांचं अभिनंदन केलं. ते लखपती झाले होते! त्यांच्या हाती खजिना लागला होता.

झालं असं होतं की दिनकरच्या वडलांनी दहा पंधरा वर्षांपूर्वी विविध कंपन्यांचे shares आणि Mutual Fund घेऊन ठेवलेले होते. मध्यंतरीच्या काळात दिनकर कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांना याबद्दल फार काही माहीत नव्हतं. वडील सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी शहरही बदललं. कालांतराने दिनकर यांचे वडील वारले आणि ते shares काळाच्या ओघात तसेच पडून राहिले. आणि गुप्तधन जसं खर्‍या धन्याला बोलवत असतं तसे ते certificates दिनकर यांच्या हाती लागले.

खरं तर दिनकर यांचं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. कारण हा जो योग जुळून आला तो खूप योग्य वेळी जुळून आला. पहिला भाग म्हणजे दिनकर यांच्या वडलांनी सगळे shares आणि Mutual Fund हे joint नावाने घेतले होते. म्हणजे त्यांचं नाव प्रथम आणि त्यांच्या पत्नीचं, म्हणजे दिनकर यांची आई, नाव second holder म्हणून. दिनकर यांची आई हयात असल्याने Documentation चा भाग सुलभ झाला. दूसरा भाग म्हणजे SEBI च्या नव्या नियमांनुसार 5 Dec पूर्वी Physical Format मध्ये असलेले Shares हे Demat खात्यात जमा करणं आवश्यक आहे. म्हणजे दिनकर यांना योग्य वेळी ते Certificates सापडले.

याहून महत्वाचा भाग म्हणजे, दीर्घकालीन गुंतवणूक!

दिनकर यांच्या वडलांनी त्याकाळी टप्प्याटप्प्याने जे shares गोळा केले त्यातले बहुतांश दर्जेदार कंपन्यांचे आहेत.

यामध्ये 2005 मध्ये घेतलेला Infosys चे 5 shares आहेत. त्यावेळेसची ही गुंतवणूक फार तर 1000-1500 असेल. आज यांचं Valuation काढलं तर जवळपास 40000 (चाळीस हजार) इतकं ते होतं.

दूसरा शेअर होता LIC चा. साधारणपणे 2003 साली LIC चे 100 shares घेतलेले असावेत. तेंव्हा त्या शेअरची किम्मत 40 च्या आसपास होती. म्हणजे 4000 गुंतवणूक. सन 2010 ला LIC ने शेअर Split केला. Face Value 10 होती ती 2 झाली. ज्याच्याकडे एक शेअर होता त्याचे पाच झाले. म्हणजे दिनकरच्या वडलांचे 100 चे 500 शेअर्स झाले. पण दुर्दैवाने 2 रुपये Face Value असलेलं certificate त्यांच्याकडे नव्हतं. मग खटाटोप करून ते मिळवलं. आता 500 शेअर्स झाले. आज LIC च्या एका शेअरची किम्मत 500 आहे. म्हणजे 2003 साली 4000 गुंतवून त्याचं आजचा Valuation अडीच लाख फक्त!

तिसरा शेअर आहे Dr Reddy’s या कंपनीचा. या कंपनीचे 2002 ला 4 शेअर्स घेतले होते आणि 2005 ला 4 शेअर्स घेतले होते. म्हणजे 8 शेअर्स. सरासरी रेट जर गृहीत धरला तर 450 हा आहे. म्हणजे एकूण गुंतवणूक 3600 रुपये. या कंपनीने 2006 साली 1:1 असा बोनस दिला आहे. म्हणजे 8 शेअर्सचे 16 शेअर्स झाले. शेअरचा आजचा भाव 2500 आहे. म्हणजे आजचं Valuation आहे 40000 च्या आसपास. शिवाय, मध्यंतरीच्या काळात Dividend ही मिळाला नव्हता.

अजून एक शेअर certificate मिळालं ते ICICI Bank याचे. बहुदा 2003 साली याचे 19 शेअर्स घेतलेले होते. त्यावेळी याची किम्मत होती 45 रुपये. म्हणजे गुंतवणूक झाली 800 च्या आसपास. दरम्यान शेअरने बरेच चढ-उतार पाहिले. शेअर 2014 साली split झाला. FV 10 ची 2 झाली. एकाचे पाच शेअर्स झाले. म्हणजे एकूण 95 शेअर्स. त्यानंतर 2017 साली 1:10 या गुणोत्तरात बोनस मिळाला म्हणजे. एकूण शेअर झाले 104 वगैरे. आजचा बाजारभाव आहे 300. म्हणजे 30000 रुपये.

यामध्ये नमूद करण्यासारखे महत्वाचे शेअर्स म्हणजे L&T आणि Asian Paints हेही होते. त्यांचं valuation ही 70000 च्या आसपास होतं.

याप्रकारचे अजून काही certificate सापडले ज्यातील काही कंपन्या बंद झालेल्या होत्या तर काही दुसर्‍या कंपनीत Merge झाल्या होत्या. त्यांचं Valuation ही साधारणपणे 50000 वगैरे होतं.

सध्या हा सगळा शेअर्स चा गोतावळा Demat होण्याच्या process मध्ये आहे. ध्यानी-मनी नसताना दिनकर यांना हा खजिना सापडला. यामध्ये नशिबाने तर महत्वाची भूमिका बजावलीच पण दिनकर यांच्या वडलांची दूरदृष्टीही तितकीच कौतुकास्पद म्हंटली पाहिजे. एकतर त्यांनी चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. दीर्घकालीन मुदतीवर असे शेअर्स नक्कीच चांगला परतावा देतात हे पुन्हा सिद्ध झालं. दूसरा भाग म्हणजे त्यांनी कागदपत्र काम व्यवस्थित केलं होतं. सगळे सर्टिफिकेट प्लॅस्टिक फाइलमध्ये व्यवस्थित जपून ठेवले होते आणि सगळे Joint नावाने होते. यामुळे dematerialization process करत असताना फार अडथळा आला नाही. पण असे शेअर्स आपल्या नावावर आहेत हे त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं किंवा काय झालं हे कोडं आहे. पण खजिना हा सगळ्यांच्या हाती लागत नसतो, तो खर्‍या वारसाच्या हातीच लागतो. तो योग्य हाती लागला याचं जास्त समाधान असतं.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991DEMATERIALIZE YOUR SHARES ONLINE

DEMATERIALIZATION अनिवार्य

देवाज्ञा

देवाज्ञा

लघुकथा  ||   मराठी कथा  ||  Marathi Story   }}  The King  || After War

 

Image result for after war king

चहूबाजूंनी विजयाचे चित्कार ऐकू येत असले तरी अंतर्मनात मावळतीचा सूर्य लालसर रंग पसरतो तसा पराभवाचे रंग स्पष्टपणे दिसत आहेत. सरतेशेवटी काय कमावलं, काय गमावलं याची गोळाबेरीज केली तेंव्हा उत्तर ऋणच येत होतं. मला विश्वाचा सम्राट उपाधी देणारं माझं सैन्य, माझे अनुयायी माझ्या मनाच्या दरिद्रीपणाचा अंदाज लाऊ शकत नाहीत.

मला युद्ध हवं होतं??? नाही! कदापी नाही!

मग मला शांतता हवी होती??? तेही नाही!

मला माझ्या असूयेला वाट मोकळी करून द्यायची होती. द्वेष व्यक्त करायचा होता. मला सूड हवा होता ज्यासाठी हे युद्ध अटळ होतं.

आता सर्वस्व मिळूनही ही विषन्नता का मग? मुसळधार पाऊस अन पुर येऊन गेल्यानंतर येते ती ही शांतता का? आता नवनिर्मिती होईल हीच आस लावून बसावी लागेल.

मला पराभवाचे भय नव्हते. मला टीकेचेही भय नव्हते. पण आता भय वाटते आहे… जेंव्हा मृत्यूनंतर विधात्याच्या समोर सर्व हिशोब द्यावे लागतील तेंव्हा मान झुकता कामा नये. सर्वत्र विनाशानंतर चांगल्या समाजाच्या निर्मितीचं उत्तरदायित्व मला स्वीकारावं लागेल.

बुद्धिबळात प्यादे असोत, वजीर किंवा राजा, सगळेच दुसर्‍यांच्या हातातील सोंगाट्या! पूर्वजन्मातील पुण्याचं-पापाचं काहीतरी संचित असेल म्हणून इतरांपेक्षा वेगळी भूमिका, राजाची भूमिका मला निभवावी लागते.

करतकरविता तो, मी केवळ निमित्तमात्र!

जेंव्हा-जेंव्हा अपयश येईल तेंव्हा-तेंव्हा हे युद्ध गरजेचं होतं का? हा पहिला प्रश्न उभा राहील. काही मार्गांवर परतीचा प्रवास शक्य नसतो. येणारा प्रवास अजूनच कठीण असणार आहे…  ईश्वरा मार्ग दाखव!

(#देवाज्ञा कथेतून)

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

 

उत्तरायण – कर्ण का आवडतो?

मै फ़िक्र को धुवे में उडाता चला गया! 

मै फ़िक्र को धुवे में उडाता चला गया! 

बरबादीयों का जश्न मनाता चला गया, मै #फ़िक्र को धुवे में उडाता चला गया! 
Related image
गाडी वेगाने पुढे जात असताना एखादं सुंदर दृश्य मनभरून बघता येतच नाही। वाऱ्याच्या वेगासोबत ते मागे निघून जातं अन आपण मान वळवून त्याला बघण्याचा, मनात साठवण्यासाठी धडपडत असतो।
ते दृश्य पूर्णपणे न दिसल्याने हुरहूर तर असतेच। पण एखाद्या चित्रकारचं अर्धवट रेखाटलेलं, अपूर्ण चित्र बघावं तसं वाटतं। आपण मनातच स्वतःच्या #कल्पनाशक्तीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत सुटतो, त्यात रंग भरून त्याला मनाप्रमाणे सजवू बघतो।
पण सगळं निरर्थक असतं! हातात कुंचला घेऊन, रंग घेऊन त्याला पूर्ण करण्याची आपली क्षमता नसते।
#आयुष्य तरी वेगळं काय आहे??? निघून गेलेल्या क्षणांबद्दल, घटनेबद्दल आज आपण काहीही करू शकत नाही हे माहीत असतांनाही विनाकारण त्या भूतकाळाला काल्पनिक रंग चढवत असतो अन #भविष्य कल्पित असतो!
सगळं सोडून द्यावं अन मनसोक्त जगावं आणि म्हणावं…
गम और खुशी में फर्क मेहसुस ना हो जहां
मै #दिल को उस मकाम पे लाता चला गया… 
अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991
http://latenightedition.in/wp/?p=3225

एवरेस्ट शिखरावर!

एवरेस्ट शिखरावर!

प्रेरणादायी चित्रपट  ||  पूर्णा मनावथ  ||  एक संस्मरणीय अनुभव  ||  दिशा देणारा

Image result for poorna movie

प्रेरणा म्हणजे काय? मानसाच्या आयुष्यात प्रेरणा असणं इतकं महत्वाचं का असतं? आणि प्रेरणादायी प्रवास म्हणजे नेमका काय असतो?

आज सगळीकडे राखीपोर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. बहीण भावाच्या नात्याचा हा उत्सव. योगायोगाने, नेमकं आजच “पूर्णा” हा चित्रपट बघण्यात आला. राखी पोर्णिमा हे केवळ भावा-बहिणीच नातं साजरा करायचा दिवस नसून तो भावंडांचा सण असतो. कोणाच्याही आयुष्यात पहिला मित्र-सोबती म्हणजे त्याचा भाऊ किंवा बहीण असतो. लहानपणी दोन बहिणी जितक्या जवळ असतात तितकं जवळचं कोणीच असत नाही. अगदी याच प्रकारचं बहिणी-बहिणीतील अतूट नातं पूर्णा या चित्रपटात पाहायला मिळतं.

राहुल बोस दिग्दर्शित हा चित्रपट पूर्णा मलावथ हिच्या संघर्षमय अन प्रेरणादायी प्रवासाचं सुरेख वर्णन करतो. पण ही पूर्णा कोण? खरं तर चित्रपट बघेपर्यंत हे मलाही माहीत नव्हतं. पण चित्रपट संपताच ह्या मुलीबद्दल मनात प्रचंड आदर आणि अभिमान वाटू लागला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी माऊंट एवरेस्टचं शिखर सर करणारी मुलगी!

बर्‍याचदा संघर्ष काय आहे हे संघर्ष करणार्‍यालाही माहीत नसतं. संघर्षाचा प्रवास तर सुरू झालेला असतो, त्याचा शेवट कुठे आणि कसा होईल याचं भान प्रवासाच्या सुरूवातीला नसतं. पण आपण नियतीच्या भव्यदिव्य योजनेचे साधक आहोत याचं भान आलं की प्रवासाचं गांभीर्य येतं. हा प्रवास सुरू जरी आप्तांच्या साथीने झाला असला तरी शेवटाकडे जाताना प्रवास एकट्यानेच पूर्ण करावा लागतो. आणि त्या एकांतक्षणी, त्या घटकेत धावून येतात मनाच्या गाभार्यात खोल कुठेतरी घर करून असलेल्या अमूल्य आठवणींचा ठेवा. तोच आपल्याला प्रेरणा देऊन जातो अन विश्वाची सर्व शक्ति आपल्या अंगी संचारते. मग येणारा प्रत्येक अडथळा हा त्या शक्तिपूढे गुडघे टेकतो अन अश्वमेध यज्ञ संपन्न व्हावा तसा विजय होतो.

पूर्णाच्या आयुष्यात तिच्या थोरल्या बहिणीला खूप महत्वाचं स्थान असतं. संपूर्ण चित्रपटातून जर कुठली भावना जर ठळकपणे अधोरेखित होत असेल तर ती ह्या नात्याची आहे. आयुष्यात कोणीतरी लागतो जो तुम्हाला परभवाच्या क्षणी उभं राहण्यास प्रेरित करतो. पूर्णाच्या आयुष्यात तिची मोठी बहीण हेच सर्वस्व असते. केवळ चांगलं खायला मिळेल म्हणून तेलंगणा मधील आदिवासी पाड्यातील ही मुलगी सरकारी वसतिगृहात दाखल होते. आणि तेथून एवरेस्ट सर करण्याचा जो प्रवास आहे तो अक्षरशः थक्क, स्तिमीत अन स्तब्ध करून टाकणारा आहे. राहुल बोस या सर्जनशील माणसाने ह्या चित्रपटवर घेतलेली मेहनत प्रत्येक फ्रेम अन प्रत्येक संवादातून जाणवते.

चित्रपटात “तुला एवरेस्ट का सर करायचं आहे?” याचं उत्तर नसलेली पूर्णा ते “मेरको ये करने दो” असा हट्ट करणारी पूर्णा हे क्षण खूपच हळवे अन तितकेच प्रेरणादायी ठरतात. ते क्षण केवळ पडद्यावरच न राहता आपण प्रेक्षकही ते अनुभवू शकतो इतक्या प्रभावी पद्धतीने ते चित्रित केलेले आहेत. चित्रपटात एक क्षण आहे जेंव्हा पूर्णा एवरेस्ट सर करते आणि काही फ्रेम्स अतिशय silently डोळ्यासमोरून जात असतात. त्यात प्रवीण कुमार हातात फोन घेतात, गावाकडे त्या क्षणाची आतुरतेणे वाट बघणारी मंडळी जल्लोष करतात आणि पूर्णा त्या सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा घेऊन उभी असते… ते क्षण, चित्रपटातील त्या सायलंट फ्रेम्स प्रेक्षकांना एवरेस्ट वर असलेल्या शांतातेचा अनुभव करून देतात. संपूर्ण चित्रपटातील त्या मुलीचा संघर्ष बघितल्यावर त्या शांत क्षणाला पहिली भावना ही “क्या बात है, तू करून दाखवलंस!” अशीच उमटते. अश्रुंचा एक एक थेंब हा यशाच्या यज्ञात संघर्षाची, वेदनेची आहुती दिल्याची साक्ष देत असतो. तेंव्हा जाणवतं की हा चित्रपट फक्त चित्रपट नाही तर त्याहीपेक्षा जास्त काहीतरी देऊन जातोय. पूर्णा मलावथ ने तिच्या आयुष्यात जितका संघर्ष केला आहे तो ह्या चित्रपटाद्वारे आपल्या काळजाला भिडतो अन रसिकप्रेक्षक त्याच्याशी संलग्न होतो. चित्रपटाची भाषा वेगळी आहे, शैली वेगळी आहे. कोणाचंही नायकीकरण किंवा नेगेटिव shades दाखवण्यापेक्षा परिस्थितीचे गडद रंग जास्त ठसठसशीतपणे नमूद केले आहेत. प्रत्येकात चांगले वाईट गुण असतात. सिस्टममध्येही चांगल्या-वाईट प्रवृत्ती असतात. पण जेंव्हा प्रेरणादायी प्रवासाचा पोवाडा गायचा असतो तेंव्हा चांगल्या गुणांची मांडणी करून चित्र खुलवता येतं. सरकारी अधिकारी, राजकरणी ते मित्र असे अनेकजण पूर्णाच्या आयुष्यात असतात ज्यांनी केलेली मदत अन दिलेला आधार हा मोलाचा ठरतो. तोच इतरांनीही अवलंबावा हा संदेश महत्वाचा वाटतो. आयुष्यात गुरु, Guide अर्थात चांगला मार्गदर्शक भेटणं किती महत्वचं आहे हेही चित्रपटातून तितक्याच सुंदरपणे मांडलं आहे.

चित्रपटाची गती सुरूवातीला थोडीशी संथ वाटते. एखाद्या सामान्य चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही थोडासा अडखळत पुढे जात असतो. पण मध्यंतरानंतर चित्रपट जो पकड घेतो तो सर्वोच्च शिखरावर घेऊन जातो. चित्रपटाचा प्रवासही एखादं उत्तुंग शिखर सर केल्याप्रमाणे आहे. चित्रपटाला विनाकारण आर्ट मूवी करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा विनाकारण कमर्शियल मूवीचा साज चढवण्याचा प्रयत्न झाला नाही ही या चित्रपटाची विशेषता म्हंटली पाहिजे. चित्रपटाचं narration हे सर्वात प्रभावी आहे. राहुल बोसने निभावलेली भूमिकाही सुरेख जमली आहे. संगीत अजून प्रभावी करता आलं असतं पण जे गीत-संगीत आहेत ते चित्रपटाला अन विषयाला साजेसे आहेत.

वो तूफ़ान क्या, चट्टानें जिसका मोड़ दे
वो उड़ान क्या, जो ऊँचाई पे दम तोड़ दे…

चित्रपटात हे गाणं दोनदा येतं जे स्फूर्ति देणारं आहे एवढच सांगेन. कारण तो अनुभव रोमांचकारी आहे.

चित्रपटात एक संवाद आहे जो एका विशिष्ट परिस्थितीत येतो.

“तुम्हारा दिल टुट गया है| इसका मतलब ये नही की तूम कमजोर हो|”

हा संवाद खूप महत्वाचा आहे. कुठलीही लढाई जिंकणे किंवा कुठलही यश प्राप्त करने यासाठी मनाने तयार असणं गरजेचं असतं. आत्मविश्वास असला की माणूस काहीही करू शकतो. पूर्णाचे शिखराच्या दिशेने पडणारे अखेरची काही पाहुले तिच्या आयुष्यातील प्रत्येक आठवणीला जागं करत असतात. अगणित दुखाचे डोंगर करून हे यशाचं शिखर पार होत असताना तिच्या मनाची होणारी घालमेल प्रेक्षक स्पष्टपणे मेहसुस करू शकतो. एक पर्व संपलेलं असतं. उदय होत असतो. वेगाने मागे जाणारे क्षण अन हळुवारपणे स्पर्श करणारा सुखाचा क्षण! सगळं असंस्मरणीय!

संपूर्ण चित्रपट येथे बघा!

 

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

चित्रपटातील मित्र!

चित्रपटातील मित्र!

चित्रपटातील मित्र!

दिये जलते हैं, फुल खिलते हैं बड़ी मुश्किल से मगर, दुनिया में दोस्त मिलते हैं… 

आज #मैत्रीदिन अर्थात #FriendshipDay2018 मैत्रीचं नातं चित्रपटांतून अनेकदा उलगडलं आहे। चित्रपटांतून कौटुंबिक नात्यांपेक्षा मैत्रीचं नातं अधिक ठळकपणे व्यक्त केलं गेलं यातच या नात्याचं वैविध्य लक्षात येईल। अशाच भावलेल्या व्यक्तिरेखा अन त्यांच्यातील मैत्री! #फिल्मीचक्कर

#HarryPotter ची मूळ कथाच मैत्री अन प्रेमाच्या नात्यावर आधारित आहे। त्यातील हॅरी अन रॉन यांची मैत्री वेगळ्या दर्जाची आहे। एका बाजूला मसिहा असलेला, प्रसिद्धीच वलय असलेला, टॅलेंटेड हॅरी अन दुसरीकडे त्याचा मंद, बावळट, गरीब मित्र रॉन! ईर्षा हे मैत्रीचा पहिला शत्रू!इतकं असूनही दोघांची मैत्री टिकते। जीवाला जीव देणारे मित्र म्हणतात तसे हे मित्र होतात। एकमेकांच्या प्रत्येक सवयी असणारे हे मित्र एकमेकांची पालकांप्रमाणे काळजी घेत असतात| ह्या दोघांच्या मैत्रीत येते Hermione जिच्यावरून मनमुटाव होतात। शेवटच्या संघर्षापर्यंत ही मैत्री अतूट राहते। रिअल लाईफमध्येही या तिघांची मैत्री तितकीच निर्मळ असल्याचं दिसतं। #फिल्मीचक्कर

Image result for harry potter and ron

#मराठी चित्रपट इतिहासात मैलाचा दगड म्हणजे अशीही बनवाबनवी! रूम पार्टनरला कटवायला बघणारे मंडळी जगात वावरत असताना मित्रांसाठी “रिस्क” घेणारा धनंजय माने अन त्याचे मित्र या चित्रपटातून समोर येतात। मित्रासाठी काहीही म्हणतात ते हेच| चित्रपटात कितीही धमाल दाखवली असली तरी असे मित्र मिळायला भाग्य लागतं। #फिल्मीचक्कर

Image result for अशीही बनवाबनवी

खालील फोटो मैत्रीची व्याख्या पूर्ण करायला पुरेसा आहे। जेंव्हा जेंव्हा मैत्रीची उदाहरणे दिली जातील तेंव्हा तेंव्हा जय-वीरू जोडीचं नाव घेतलं जाईल। आयुष्यात स्वतःचं कोणीही नसताना एक मित्रच कुटुंब असतो। खोड्या काढणारा, हट्ट करणारा अन मित्रासाठी जीव देणाराही! ये दोस्ती… #फिल्मीचक्कर

Image result for शोले

चित्रपटांतूनच का, तर #कार्टून्स मधूनही मैत्रीचं नातं उलगडण्यात आलं आहे। मिकी-प्लूटो-गुफी-डोनाल्ड वगैरे वगैरे। पण ह्या सगळ्यांमध्ये सर्वात अवखळ म्हणजे टॉम अँड जेरी! अशीही मैत्री असू शकते? हा प्रश्न लहानपणी पडायचा। पण अशीच मैत्री दिलखुलास असू शकते हे आज कळतंय! #फिल्मीचक्कर

Image result for tom and jerry

मित्र कोण असतो? सोबती? ओळखीचा? हमदर्द? ह्या सगळ्या भिंती मोडून मैत्रीचं नातं दिसतं बॅटमॅन आणि गॉर्डन मध्ये! या मैत्रीचे संदर्भ वेगळे, हेतू वेगळे पण निकोप मैत्री हीच। “तू कोण आहेस?” या खुलाशाची गरज न पडणे। तुझं असणं दिलासा देणारं ही जाणीव! दुसऱ्या भागात शेवटचा सिन म्हणजे तर त्या मैत्रीचा सर्वोच्चबिंदू! बॅटमॅन नसण्याची खंत सर्वाधिक गॉर्डनला असते। लहानपणी खांद्यावर ठेवलेला कोट ते हिरो कॅन बी एनीवन… असा तो मैत्रीचा प्रवास थक्क करून टाकणारा आहे। #फिल्मीचक्कर

Image result for i never cared who you were

नादाला लावणारे मित्र तर चिकार असतात, पण वाईट मार्गावरून परावृत्त करणारे मित्र खऱ्या मैत्रीची साक्ष देतात. #जंजीर मधील विजय-शेरखान हा तोच मैत्रीचा धागा. शेरखान विजयच्या सांगण्यावरून काळे धंदे सोडतो अन विजय एक चांगला माणूस घडवतो। त्यातील “यारी है इमान…” #फिल्मीचक्कर

Image result for जंजीर

जी मैत्री सभ्यपणाच्या पुढे गेलेली असते, जिथे एकमेकांना मान देणं गौण समजलं जातं ती मैत्री खूपच हळवी असते अन शेवटच्या श्वासापर्यंत टिकते। गणप्या भाडखाऊ अन राम्या डुकराची अवखळ अन हृदयस्पर्शी मैत्रीचा बंध #नटसम्राट मध्ये उत्तमरीत्या व्यक्त केला आहे।  सुखदुःखात साथ देणारे मैत्रीचे हात। मनातील सल न सांगता समजेल असा मित्र आणि मागितलं तर विषही देणारा मित्र! बास, और क्या होती है ये #दोस्ती ईर्षा असूनही, ती उघडपणे व्यक्त करूनही टिकते ती मैत्री! कारण we are friends #always #फिल्मीचक्कर

Image result for natsamrat

दिल चाहता है! या चित्रपटाची कथा तीन मित्रांच्या मैत्रीभोवती रचलेली। थट्टा जास्त झाली की, त्यातून मन दुखावलं गेलं की मैत्रीत दुरावा निर्माण होतो पण कालांतराने ते विसरून पुन्हा एकत्र आलेल्या मित्रांची ही कथा। #फिल्मीचक्कर

Image result for दिल चाहता है

 

बाबू मोशाय… #आनंद चित्रपटाच्या मूळ कथेपेक्षा आनंद आणि बाबू मोशाय हे मैत्रीचं नातं जास्त गाजलं। हा दोघांचा एकमेकांसोबत पहिला चित्रपट. पण यातील संवाद अन scene मनाला भिडणारे आहेत. मैत्रीचं हळवं नातं चित्रपटातून समोर येतं sometimes… #फिल्मीचक्कर

Image result for आनंद मूवी

मित्र हा मित्र असतो, मग तो कसाही असोत! त्याला त्याच्या गुण-अवगुणांसोबत स्वीकारावं लागतं। crazy friends म्हणजे काय हे बघायला मिळेल #hangover series मधून। तुफान हसू येत असताना अचानक डोळेही ओले होतात! पण मित्रांसाठी काहीही करावं लागतं… #फिल्मीचक्कर

Image result for hangover movie

असे कितीतरी चित्रपट आहेत ज्यामध्ये मैत्रीचे वेगवेगळे पैलू दाखवून दिले आहेत। सैराट मधील लंगड्या, सल्या असोत किंवा अभिमान चित्रपटातील लक्षात राहणारा अश्राणी असो, असे मित्र पूर्वजन्मीचं पुण्य असेल तरच मिळतात.

अशीच मैत्री थ्री इडियटस, मुन्नाभाई मध्येही बघायला मिळते. थ्री इडियटस मध्ये बेपत्ता झालेल्या मित्राला शोधायचं काम करतात. सर्किट आणि मुन्ना मधील मैत्री खूप भावते. आई-बापासारखे एकमेकांना सांभाळणारे मित्र असले की जिंदगी मज्जानी लाईफ!

बरेचसे चित्रपट आहेत ज्यामध्ये मित्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। ही यादी इथेच थांबवूयात… पण कर्ण-दुर्योधन यांच्याबद्दल बोलल्याशिवाय हा थ्रेड पूर्ण होणार नाही…

कर्ण-दुर्योधन यांच्या मैत्रीत खरेपणा होता की निव्वळ स्वार्थ होता याबद्दल मतमतांतरे आहेत। पण दुर्योधनाच्या मनातील सल समजून घेणारा, त्याला आधार देणारा कर्णच होता।जगाने अपमानित केलेल्या कर्णाला दुर्योधनाने न्याय दिला।ही मैत्री नक्कीच वेगळी होती।त्यात स्वार्थ असेलही पण आडपडदा नव्हता।

Image result for कर्ण आणि दुर्योधन

मैत्रीचं नातं बनवता येतं, टिकवता येतं, नाकारताही येतं। आपल्याकडे चॉईस असतो। चितेची लाकडे रचल्यावर तर रक्ताची दूरदूरची नातीही येतात पण घरापासून स्मशानात घेऊन जाणाऱ्या गर्दीत आसवे गाळणारी, हमसून रडणारे चार मित्र तर असावेत। नाहीतर वर गेल्यावर ईश्वराला उत्तर देताना मागे वळून पहावं लागेल।

भावंडांची मित्र होतात, मित्रांची भावंडे…

#मैत्रीदिन #HappyFriendshipDay2018 #FriendshipDay

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991  ||  @Abhireal1991

मैत्रीबद्दल एक काल्पनिक कथा… 

तोच असे सोबती…

error: Content is protected !!