Category: KitabiKida

The Chosen One

The Chosen One

    The Chosen One

Author -Manali Gharat

मनाली घरात यांचं “The Chosen One” हे पुस्तक वाचण्यात आलं. खरं तर इंग्रजी पुस्तक फार वाचत (वाचवत) नाहीत. म्हणजे, Harry Potter नंतर कुठलेच इंग्रजी पुस्तकं वाचले नाहीत. पण या पुस्तकाचं नाव “The Chosen One” असं असल्याने आणि Harry Potter सुद्धा The Chosen One असल्याने हे पुस्तक वाचवसं वाटलं.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून पुस्तकात नेमकं काय असेल याचे संदर्भ लागत नाहीत. पण नाव The Chosen One आहे म्हणजे काहीतरी गूढ असेल वाटतं. पुस्तकाच्या Contents मध्ये एकूण 13 chapter दिसतात. त्यावरून असं वाटतं की पुस्तकात विविध कथा असतील, कथासंग्रह असेल. त्यातील पहिला Chapter ‘The Father’ वाचायला सुरुवात केली. आई-वडील-मुलगा अशा त्रिकोणी परिवाराची कथा सुरू होते. पात्रांची ओळख होते. लागलीच दूसरा Chapter वाचायला सुरुवात केली आणि समजलं की पहिल्या भागातील कथाच पुढे सरकत आहे. एकंदरीत कादंबरी आहे हे समजलं. कादंबरी वाचताना एक असतं, एकदा पात्रांच्या आयुष्यात शिरकाव केला, त्यांची गोष्ट वाचायला सुरुवात केली, त्यांची सुख-दुखे समजायला सुरवात केली की शेवट होईपर्यंत थांबावं वाटत नाही. त्यासाठी लिखाण दर्जेदार हवं आणि कथेला गती हवी. येथे दोनहिची सांगड उत्तमरीत्या घातली. योग्य गतीने पुढे जाणारी कथा आणि आणि त्याची मांडणी छान आहे. कुठेही रटाळपणा नाही किंवा कथा थांबल्यासारखी वाटत नाही. अय्यर कुटुंबाची कथा वाचकाला पुढे घेऊन जात असते. कथेत Twist & Turn येत राहिल्याने पुढे काय होणार? हा प्रश्न वाचकाला सतत पडत असतो. एक एक करत एकूण 13 chapter संपतात आणि उलगडतो तो “The Chosen One” याचा अर्थ! शेवटाला जो जर्क आहे तो स्तब्ध करणारा आहे. वाचकाच्या डोक्यात नसलेला शेवट जेंव्हा येतो तिथे लेखक/लेखिकेचं लिखाण जिंकलेलं असतं. लेखिकेला कदाचित शेवट आधी सुचलेला असावा असं वाटतं आणि त्याच्या अवतीभोवती कथा विणली आहे असं वाटतं.

कथा आहे अय्यर कुटुंबाची आणि त्या कुटुंबातील सदस्य आदित्य हा या कथेचा ‘नायक’ आहे. कथेबद्दल फार सांगणं उचित होणार नाही, त्यामुळे पुस्तक वाचतानाच ते पदर उलगडत गेले तर वाचनातील मजा टिकून राहील.

तरुणपणी अनेकांच्या आकांक्षा असतात, स्वप्नं असतात. ती स्वप्नं त्याचा अवकाश हा वास्तविकतेच्या पल्याड स्वतंत्र अस्तित्व राखून असतो. कल्पनेत असलेलं ते विश्व साकार करण्यात तरुणपण खर्ची पडत असतं. ज्याला ते साकार करता येतं तो यशस्वी म्हणवला जातो आणि ज्याला ते मिळवता येत नाही तो आयुष्यभर स्वप्नांच्या जगात हरवलेला असतो. बर्‍याचदा ती स्वप्न आपल्या वंशजाने, अपत्याने पूर्ण करावी असा त्याचा अट्टहास असतो. पण तरुणपनीच वास्तविक जीवनातील तीव्र स्फोटांची धग जर त्या स्वप्नाच्या विश्वाला बसत असेल तर माणूस हतबल होतो आणि कधीकधी त्यातून वेगळीच प्रतिक्रिया बाहेर पडते. आदित्यच्या जीवनातही अशा काही घटना एकामागून एक घडत जातात ज्याचा त्याच्या मनावर खोल परिणाम होत असतो. आपल्याच प्रियजनांनी केलेले आघात मनावर दडपण निर्माण करतात आणि आदित्य नैराश्येच्या, एकटेपणाच्या आणि अविश्वाच्या कोशात गुंफला जातो. तेथेच खरं व्यक्तिमत्व आकार घेत असतं. कथेत अशा काही प्रभावी घटना आहेत ज्यामुळे तीव्रता जाणवते. कथेत “नातं” आणि “नातेवाईक” याला वेगळ्या दृष्टीकोणातून दाखवलं आहे. ते थोडंसं गडद वाटत असलं तरी आजच्या काळात ती शक्यता नाकारताही येत नाही. रुंद होत जाणार्‍या अंधार्‍या गुहेतून बाहेर पडल्यावर अचानक लख्खं प्रकाश दिसावा तसं 11-12 chapter मधून दाटलेल्या अंधाराचा शेवट 13 chapter मध्ये होतो.

कथेचा विषय आणि मांडणी चांगली आहे. हळूहळू वाढत जाणारी उत्कंठा हीसुद्धा चांगली आहे. पण कथा अजून वाढावली असती तर शेवटाला जो जर्क बसतो तो आणखीन हेलावून सोडणारा असता. बाकी गोळाबेरीज केली तर नक्की वाचावं असंच पुस्तक आहे. एक नमूद करण्यासारखं म्हणजे, या कथानकावर एक web series येऊ शकते. शेवटून सुरुवात केली तर अफलातून होईल. कारण दृश्य माध्यमात जर हा विषय बघायला मिळाला तर आदित्य, सिया, गौरव, अप्पा वगैरे पात्र उभी करायला, ती बघायला भारी वाटेल. शिवाय scene detailing & description यामधून ही कथा आणखीन रंजकपणे मांडता येईल.

बाकी, मनाली घरत यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा!

@Late_Night1991

मराठी कथा – ई पुस्तक

मराठी कथा – ई पुस्तक

मराठी कथा  ||  साहित्य  || भयकथा  ||  लिखाण  ||  Marathi Stories By Abhishek Buchake  || अभिषेक बुचकेच्या मराठी कथा  ||  मराठी कथा e-Book  ||   कथासंग्रह  ||  Marathi Story Collection

 

जवळपास एक वर्ष होऊन गेला “मराठी कथा” हे e-book अर्थात ई-पुस्तक पब्लिश करून. गूगल वर इतक्या मोठ्या प्रमाणात दर्जेदार कंटेंट उपलब्ध असताना, विविध आशयाची अन विषयांची पुस्तके उपलब्ध असताना त्या गर्दीत माझं हे App त्यातील कथांवर कितपत तग धरू शकेल याची शंका होती. पण गेल्या वर्षभराचा प्रतिसाद बघता माझ्या शंका वाचकांनीच तडीपार केल्या. आज हे app दहा हजार पेक्षा अधिक लोकांनी वाचलं आहे हे सांगताना नक्कीच आनंद होतोय.

खरं तर App च्या मार्गात अनेक अडथळे होते. अनेकदा App बंदही पडत होतं. पण विविध अडचणींवर मार्ग काढत हे App सुरू ठेवण्याचा अट्टहास उपयोगी पडला. ह्या App मध्ये किती कथा मी टाकू शकेन किंवा त्या कितपत चांगल्या वगैरे असतील याची कसलीच खात्री नव्हती. पण समिश्र प्रतिक्रिया येत गेल्या, ज्यामध्ये सकारात्मक प्रतिक्रिया धीर देणार्‍या होत्या.

जसं पावसाळ्यात रोजच पाऊस पडत नाही, आणि पडणारा पाऊसही नेहमी सारख्याच तीव्रतेने पडत नाही तसंच कुठल्याच लेखकाच्या सर्वच्या सर्व कथा चांगल्या असत नाहीत. हा नियम काही अपवाद वगळता सर्वच लेखकांना लागू होतो. पण मी मुळात लेखकच नाही. मी स्वतःला लेखक म्हणवून घेणं म्हणजे अतिरेकच होईल. जे आहे ते निव्वळ काल्पनिक विश्वातील मळमळ बाहेर काढणं आहे. माझ्या लिखाणात दोन टोक असतात असं काहीजण म्हणतात. म्हणजे एका बाजूला “एक रात्र गाजवलेली!” सारखी अर्थहीन विनोदी कथा, कुठे “गाव सोडताना” सारखी भावनांची चलबिचल दाखवणारी कथा, कुठे “नरक्षी किंवा उतारा” सारख्या भयकथा, कुठे “खिडकी” सारखी रहस्यमय अन भावस्पर्शी कथा, तर कधी “मी ब्रम्हचारी” सारखी सामाजिक आशय असलेली कथा. ह्या अशा विविध प्रकारच्या कथा काही ठरवून लिहीलेल्या नाहीत. त्यांचा जन्म ओघानेच झाला. आकाशातील एखादी वीज जंगलात पडावी अन वणवा पेटावा तसं एखादी लहानशी संकल्पना, घटना, विचार ही एका कथेला जन्म घालत गेली.

ह्या सर्व कथांच्या गर्दीत तीन-चार कथांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे ज्या वाचकांना खूप आवडल्या अन त्यामुळे मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यात पहिला नंबर आहे “मी ब्रम्हचारी” ह्या आशयघन कथेचा. एका ब्रम्हचारी राहिलेल्या माणसाची व्यथा यामध्ये मांडलेली आहे. ही कथा अनेकांना भावली. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात पण वाचकाला त्यातून काहीतरी बोध घ्यावा असं वाटलं यातच मला आनंद आहे.

त्यानंतरची कथा आहे ती “नरक्षी” ही भयकथा. सहज बसल्या बसल्या काहीतरी सुचलं आणि ही कथा लिहायला घेतली. कथा कितपत चांगली आहे याबद्दल मलाही आत्मविश्वास नव्हता. पण “प्रतिलिपी” या संकेतस्थळावर एक भयकथा स्पर्धा झालेली त्यामध्ये या कथेला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळालं, अत्यंत चांगलं रेटिंग मिळालं. यामुळे जरा धीर आला की मी भयकथा लिहू शकतो.

यानंतर मला चांगला प्रतिसाद मिळाला तो “गाव सोडताना” या कथेसाठी. नोकरीनिमित्त विविध गावात राहावं लागणार्‍या अन मग ते गाव सोडताना मनाला लागणारी हुरहूर ही या कथेत मांडली आहे. थोडीशी भावनात्मक पद्धतीने त्याला रंग दिलेला आहे. ही कथा वाचून एक दोन वाचक म्हणाले की माझ्याही डोळ्यांतून पाणी आलं. ही एक उल्लेखनीय बाब ठरली.

आणि एक अशी कथा ज्या कथेने मला स्वतःला जे लिखाण करतो त्याबद्दल आत्मविश्वास जाणवायला लागला. खिडकी! एक छोटासा अनुभव डोक्यात होता ज्यावर काहीतरी लिहुयात म्हणून ही कथा लिहायला सुरू केली. नंतर डोक्यात प्रचंड विचारचक्र सुरू झालं अन त्या कथेची व्याप्ती मला जाणवू लागली. मग झपाटल्यासारखं ती कथा लिहून पूर्ण केली. सुरुवातील रहस्यमय आणि भुताटकी सारखी वाटणारी कथा एक वेगळच वळण घेते. एका बहीण-भावातील अतूट नातं, बंध ह्या कथेच्या शेवटाला उलगडतो. ही कथा लिहीत असताना मलाच अस्वस्थ वाटत होतं. कथा पूर्ण झाल्याच्या नंतर मलाच ती खूप आवडली. ज्या मित्रांना ती वाचायला दिली त्यांनीही चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आणि इतर वाचकांनाही या e-book मधील सर्वोत्कृष्ट कथा वाटली. मी लिहिलेली अन मलाच आवडलेली कथा वाचकांना आवडते याचं अधिक अप्रूप होतं.

अलीकडच्या काळात माझ्या प्रतिलिपी प्रोफाइलचे एक लाख वाचक झाले, माझ्या latenightedition.in या वेबसाइटचेही एक लाखांपेक्षा अधिक viewers झाले आणि “मराठी कथा” या App चेही दहा हजारांच्या अधिक वाचक झाले. काहीतरी मांडत होतो, व्यक्त होत होतो, खरडत होतो त्या कामाची पोचपावती मिळाल्यासारखं वाटत होतं म्हणून हे सगळं लिहायचा घाट घातला. वाचत रहा… प्रतिक्रिया नोंदवत रहा इतकच सांगेन… तूर्तास इतकेच…

खालील लिंकवर “मराठी कथा” हे App

https://play.google.com/store/apps/details?id=com.latenight.somethingsamajik.MarathiKatha

 

खालील लिंकवर प्रतिलिपी प्रोफाइल अन कथा

https://marathi.pratilipi.com/user/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%87-z4udmxr8la

 

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991  || latenightedition.in

मराठी कथा – e – book [Updated]

इश्क – अनिकेत समुद्र

इश्क – अनिकेत समुद्र

कादंबरी समीक्षण || मराठी साहित्य || किताबीकिडा  || ई-पुस्तक वाचन || माझंमत  || समीक्षक चश्मा

“अळवणी” ह्या भयकथा लिखाणामुळे प्रसिद्ध झालेला लेखक अनिकेत समुद्र यांची दुसरी कादंबरी वाचण्यात आली. अळवणी वाचल्यानंतर लेखकाची निराळी शैली जाणवली होती. अळवणी कादंबरीत कुठेही ओढून ताणून आणलेले प्रसंग नव्हते किंवा कसलाही बडेजाव नव्हता. कथा अतिशय संथपणे पुढे सरकत आपल्या शेवटाकडे जाते. त्यात कथेवर, त्यातील पात्रांवर कसलाही दबाव जाणवत नाही. ते आपआपल्या स्वभावानुसार निरनिराळ्या परिस्थितीत व्यक्त होत जातात.

अनिकेत समुद्रची दुसरी कथाही तशीच असेल म्हणून त्याच्या ‘इश्क’ ह्या लेखनाकडे वळलो. दोन दिवसांत कथा-कादंबरी वाचून झाली. पण ‘अळवणी’ मुळे वाढलेल्या अपेक्षा पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत याचा खेद वाटला. अळवणीमध्ये जी पात्रे, प्रसंग, स्थळ आहेत ती साहजिक अन ओघाने येणारी वाटतात आणि उलट इश्क मध्ये नेमका तोच अभाव वाटतो.

इश्क अन अळवणी या कथा अन त्यांचा बाज पूर्णतः भिन्न आहे. एक प्रेमकथा तर दुसरी भयकथा! पण इश्क प्रेमकथा ह्या समूहातही जराशी फसली आहे असं वाटतं. लेखकाने इश्क ही कथा पूर्णतः व्यावसायिक हेतूने लिहिली असेल असं क्षणोक्षणी वाटत राहतं. त्यात येणारी पात्रे, त्यांच्या पेहरावाचं सतत वर्णन, कथेतील स्थळे आणि त्यातील यांत्रिकीपणा हा जरासा खटकतो. मुळात महागडी हॉटेल, मस्त गाड्या, इंग्लिश बोलणारी मुख्य पात्र अन त्यांची जीवनशैली ही खूपच साचेबद्ध वाटू लागते. म्हणजे नेहमीच्या हिन्दी चित्रपटातील कथानकाशी सगळं साम्य वाटत राहतं. त्यात घडणार्‍य घटनाही तशाच साचेबद्ध वाटत राहतात. सर्वात मुख्य म्हणजे जे ट्विस्ट अर्थात कथेला जिथे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे तो उत्तम असला तरी तो कंटाळवाणा वाटू लागतो. आता कधी संपणार हे? अशी मनस्थिती होते. प्रेमातील ओलावा यापेक्षा कथेतील श्रीमंती याचंच जास्त दर्शन होत राहतं. हे म्हणजे भन्साळीने बाजीराव पेशव्यांचे मूळ कथानक/इतिहास बाजूला सारून त्यातील भव्य-दिव्यतेवर जसं लक्ष केन्द्रित केलं तसा प्रकार वाटतो.

              आता महत्वाची गोष्ट. इश्क! कथेत नेमकं इश्क आहे का गफलत तेच नेमकं समजत नाही. त्यातील मुख्य पात्र, कबीर. हा तर वासनेने भरलेला अन अर्धवट समज असलेला युवक वाटतो. तसा तो मध्येच हुशारही वाटतो पण नंतर पुन्हा वासनेने भारलेला वाटतो. तारुण्याच्या पहिल्या पायरीवर असताना जो उताविळपणा अन अजाणतेपणा असतो तो कबीरसारख्या लेखकाच्या स्वभावाला जुळत नाही. लेखकाला दिल और दिमाग यातील गफलत दाखवायची आहे हे समजतं पण ते खूपच हास्यास्पद होत जातं.

एखाद्याच्या आयुष्यात एकदाच किंवा एकामागून एक तीन तरुणी येतात अन ह्या पठ्ठ्याला तींनीही आवडत असतात. हे म्हणजे प्यार की आड मे झालझोल वाटू लागतो. विशेष म्हणजे त्या तरुणीही इतक्या भोळसटपणे आणि अंधपणे त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या असतात. कादंबरीच्या शेवटाला तर हा नायक अजूनच मूर्ख अन हास्यास्पद होत जातो. त्यामुळे मूळ नायक घसरला असल्याने कादंबरी जराशी नीरस होत जाते. लेखक हा विचारी अन समजूतदार असतो यावरील विश्वासच नाहीसा होतो.

https://play.google.com/store/apps/details?id=com.netbhet.book.AOWBTFBIXHMGVVTLA&hl=en

कादंबरीतील दुसरं मुख्य पात्र म्हणजे राधा. अर्थात मीरा वगैरे. हे पात्र सुरूवातीला खूप सुंदररित्या आपल्या समोर येतं. ह्या पात्राला विविध छटा आहेत. ते कल्पनेत उभं राहतं. त्या पात्राला जीव येतो. कोणीही ह्या पात्राच्या अन तरुणीच्या प्रेमात पडेल असं ते सुरूवातीला रंगवलेलं आहे. जणू तेच आता कथेला पुढे घेऊन शेवट करेल असं वाटतं पण तितक्यात रती नावाचं अजून एक पाखरू कबीरच्या जाळ्यात अडकतं. इथे तर कबीर निव्वळ चित्रपटातील शक्ती कपूर वाटू लागतो. लेखक (अनिकेत समुद्र) काय सांगू पाहत आहे ते कळतं, पण ते ज्या वळणाने अन प्रसंगाने पुढे जातं ते थोडसं पचणी पडत नाही. म्हणजे, राधा नाही म्हणाली म्हणून कबीर वस्तुनिष्ठ विचार करत आधी ब्रेक अप झालेल्या तरुणीच्या प्रेमात पडतो तर नंतर रतीच्या! इतका चंचलपणा आणि उथळपणा वाचकाला गरळ अनू शकतो. कारण हे नेमकं निरागस प्रेम आहे की अजून काही हेच समजत नाही. कदाचित इष्क हे नाव त्यामुळेच ठेवलं असेल.

रती कबीरच्या आयुष्यात आल्यानंतरच्या क्षणांनंतर राधा हे पात्र अचानक नकारात्मक होऊन जातं. का माहीत नाही. पण कदाचित प्रेमाच्या आशेने राधा हे पात्र वारं अंगात आल्याप्रमाणे उलट वागू लागतं. स्वतःशीच स्पर्धा केल्याप्रमाणे. अर्थात, लेखकाला जे अभिप्रेत आहे ते समजू शकतो पण कथेतून ज्या प्रकारे ते येतं ते मनाला भिडत अन भावत नाही. अळवणीमध्ये जशी पात्रे स्वतःहून उभी राहतात अन मुक्तपणे वावरू लागतात त्याच्या विरुद्ध इथे पात्रांना दिलेली चौकट ओलांडायची मुभा नसते. मग ते जरा आकसल्याप्रमाणे वाटतं. पात्रांचा नाटकीपणा हाही थोडासा अति वाटतो. म्हणजे इंग्रजी बोलणं असेल किंवा सतत दारूच्या बाटल्या असतील किंवा तत्सम चित्रपटी सीन असतील. ते टुकार वाटतात. त्यात मग रतीला कधी काकू टाइप तर कधी बोल्ड दाखवलं आहे. तो विरोधाभास वाटतो. कबीरच्या वागण्यातही विरोधाभास वाटतो. असे बारीक ओरखडे पात्रांना कुरूप करतात.

              कथेत काही प्रसंग खूपच अप्रतिम रंगवले आहेत. हे प्रसंग काळ्या ढगांना सोनेरी काठ चढवल्याप्रमाणे वाटतात. प्रतिभाशाली लिखाणाचा नमूना वाटतो. ते जग, ते शब्द, ते प्रसंग वेगळच अनुभव देतात. खासकरून राधा पळून जाऊन एका हिप्पी गटाला मिळते अन पुढे जे होतं ते लाजवाब आहे. तो प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहतो. शिवाय लेखकाने कथा लिहिण्यापूर्वी उत्तम अभ्यास आणि माहिती घेतली आहे हेही जाणवतं. त्यात जो मर्म आहे तो खूप सुंदर आहे. हिप्पी अन गोव्यातील काही प्रसंग लेखकाची प्रतिभासंपन्नता ठासून सांगण्यास पुरेसे आहेत. राधा ह्या पात्राला तिथे जो आकार मिळतो तो मोडून नवा आकार वाचक स्वीकारू शकतो का नाही हे सांगता येत नाही.

बाकी नंतर ज्या गोष्टी होतात त्या नेहमीच्या आहेत. अर्थात फिल्मी. आता कबीर कोणासोबत राहणार एवढाच प्रश्न अनुत्तरित राहिल्याने वाचन पूर्ण करायची घाई असते. वाचकाला शेवट लवकर हवा असतो. त्यात चढ-उतार किंवा हेवे-दावे हे आलेच. नेहमीप्रमाणे मदत करणारा मित्रही असतोच. विशेष म्हणजे कबीरची पहिलं प्रेम (X GF वगैरे) त्याच्या जवळच्या मित्राला जाऊन मिळतं हेही विशेष. याचा अर्थ असा की लेखकाने आजच्या तरुणाईमधील नात्यांना पटलावर मांडायचा प्रयत्न केला आहे.

कादंबरी चांगली का वाईट हे मी नाही सांगू शकत. ती कोणाला आवडेल आणि कोणाला आवडणार नाही हे स्पष्टपणे सांगता येईल. पण ती एका विशिष्ट वर्गासाठी किंवा वाचकासाठी आहे. प्रत्येकजण तिथे रमेल याची खात्री नाही. तो बडेजाव अन ती लकाकी सगळ्यांच्या आयुष्यात नसते. ती पुस्तकात किंवा चित्रपटात असते. संध्याकाळी भेटल्यावर मित्र मैत्रिणीला कोणती घ्यायची हे विचारतो तेथेच जरा नाळ तुटल्यासारखी वाटते. पण प्रेमभंगी वगैरे तरुणाईसाठी हा मसाला पुरेसा आहे. नात्यांच्या गुंत्यात अन मनाच्या भूलभुलय्यात अडकलेल्या पिढीला ही आवडेलही कदाचित. पण त्यात ओलावा नाही असं मला वाटतं. थिल्लर प्रेम नाही पण प्रेमाला अन स्वातंत्र्याला अवाजवी दिलेलं महत्व हा मुद्दा येतो. बाप मुलाला ‘प्रेमात पडलास का?’ असं विचारतो तेंव्हा जरा जड वाटतं. एकमेकांना प्रेम मिळवून देण्याचे प्रकारही आलेच. हा साचेबद्धपणा जरासा ओवरडोस होऊ लागतो.

आजकालच्या तरुणांच्या, खासकरून आयटी क्षेत्रात काम करणार्‍या तरुणांच्या आयुष्यातील हे प्रसंग वाटतात. ते खरे असूही शकतात. त्यांच्या हेतुवर शंका नाही. पण गोष्ट मनाला भिडली पाहिजे. ती जर आपल्याला कवेत घेऊन पुढे जात असेल तर अजूनच आनंद होतो. कथेतील सर्व पात्र उच्च वर्गातील वाटतात. म्हणजे ‘fun making’ वगैरे म्हणतात तसे. आयुष्यात कुटुंब, जबाबदारी यापेक्षा मित्रांच्या अन करियरच्या सानिध्यात जगणारी पिढी. ह्या पिढीला आपण कुठे जात आहोत हेच कदाचित माहीत नसतं. प्रेमाच्या संकुचित किंवा अतीव टोकाच्या व्याख्या उराशी असलेली पिढी! यांचं प्रेम खोटं नसेलही, पण ते खणखणीतही नसतं. ते conditional असतं. म्हणजे आज असं तर उद्या तसं. कादंबरीत अशीच पात्रे आहेत. पार्टी, दारू, ऑन द रॉक्स वगैरे टाइप…ती सर्वांना भावतीलच असे नाही.

अळवणी वाचून इश्क वाचू नका इतकाच सल्ला आहे!!! बाकी लेखकाला शुभेच्छा!!!

@Late_Night1991

मराठी कथा – अभिषेक बुचके

मराठी कथा – अभिषेक बुचके

मराठी कथा – अभिषेक बुचके

#Marathi || #मराठी #कथा || #Android App  ||  मराठी ई-पुस्तक  || Marathi e-book  || साहित्य

भयकथा  || थरारकथा  || रहस्यकथा  || गूढकथा || प्रेमकथा  || भावकथा  || अनुभव  || हास्यकथा  || लघुकथा  || सामाजिक कथा  || बोधकथा  ||  बालकथा  || विरहकथा  || वर्णनकथा  || 

 

“मराठी कथा” हे अॅप्लिकेशन एक मराठी ई-पुस्तक आहे. फक्त मराठी वाचकांसाठी! येथे तुम्ही विविध प्रकारच्या मराठी कथा, लघुकथा वाचू शकता. एकंदरीत विविध मराठी कथांचा संग्रह. त्यात विनोदी, गंभीर. सामाजिक, भयकथा, थरारकथा वगैरेंचा समावेश आहे. कथेव्यतिरिक्त येथे सामाजिक विषयावरील लेख आणि मराठी साहित्य यावरही लिखाण अपेक्षित आहे. ह्या मराठी ई-पुस्तकातील बर्‍याचशा कथा अभिषेक बुचके लिखित असतील तर काही कथा ह्या इतर लेखक/लेखिकांच्या समाविष्ट करण्यात येतील.

ह्या app चे वैशिष्ट म्हणजे इथे तुम्हाला वरचेवर नवीन कथा मोफत वाचायला मिळतील. लेखक एका बाजूला कथा update करत जाईल अन ती कथा तुम्हाला थेटपणे तुमच्या app मध्ये वाचावयास मिळत जाईल. त्यासाठी App update करावे लागणार नाही किंवा काहीच करण्याची गरज नाही. त्यामुळे काहीही न करता तुमच्याकडे कथांचा संग्रह वाढत जाईल.

एकदा जरूर वापरुन बघा!!!

https://play.google.com/store/apps/details?id=com.latenight.somethingsamajik.MarathiKatha

“Marathi Katha” is a Marathi e-book app, dedicated for Marathi Readers. This app contains different types of Marathi Stories and about Marathi literature.

 

HERE you can read Marathi Horror Stories, Comedy Stories, Social Stories, and Thoughtful Articles; overall you can read here Fiction and non-fiction Content.

The stories in this Marathi e-book app is mostly written by writer Abhishek V. Buchake as well as some guest writers may also participate.

The App is Dynamic. This means, the writer keeps uploading stories from his side which will automatically appear on your app in the device. So, once you install the app you will get free Marathi Stories day by day.

https://play.google.com/store/apps/details?id=com.latenight.somethingsamajik.MarathiKatha

जरीला – भालचंद्र नेमाडे

जरीला – भालचंद्र नेमाडे

#भालचंद्र_नेमाडे || Bhalchandra Nemade  || जरीला कादंबरी  || चांगदेव चतुष्टय: भाग 3 || मराठी साहित्य

मध्यंतरी नेमाडे नावच्या लेखकाच्या लिखाणाने पछाडलं होतं. नेमाडेंची पुस्तके वाचल्याशिवाय चैन पडत नव्हता. चांगदेव चतुष्टयचे सगळे भाग वाचून झाले. तसं जरीला वाचून आता बरेच दिवस झाले. यावर वाचन झाल्यावर लागलीच काही लिहिलं तर अगदी मंनापासून आलं असतं. पण काम व इतर उद्योगांच्या गडबडीत लिहायचं राहून गेलं. आज हे पुस्तक स्वतःहून हाका मारतय असं झालं. पुस्तकांच्या गर्दीतून हे स्वतः बाहेर डोकावत होतं. याला बघताच अपूर्ण कामाची आठवण झाली. आणि #जरीला बद्धल लिहायचा योग जुळून आला.

खरं तर काय लिहावं असा प्रश्न पडला तर काही वावगं होणार नाही. कारण नेमाडेंची जी शैली आणि जो विषय आहे तो थक्क करून सोडणारा आहे. अस्थिर मनाचा कल्लोळ त्यांच्या लिखाणातून वावटळीसारखा घोंगावत असतो. मनाच्या शांतीसाठी गावोगाव भटकणारा चांगदेव पाटील हे पात्र अनादी-अनंत तरुणांच्या मनाचा कल्लोळ मांडून जातो. जगण्याला अर्थ काय? हा प्रश्न जेंव्हा पडतो तेंव्हा अस्तित्वाच्या खाणाखुणा अधिक गडद होत जातात.

माणसांच्या गर्दीत (आपल्या पिढीला तर सोशल मीडिया हा महागर्दीचा कोष आहे) राहूनही आतमध्ये एकाकी आयुष्याला सामोरं जाणार्‍या चांगदेव पाटील ह्या तरुणाची कथा आहे. सतत जगण्याची धडपड अन जगणं निरर्थक वाटायचीही गडबड वाटणार्‍या तरुणाची ही कथा आहे. वरवर खूप निष्ठुर, निष्काळजी वाटणार्‍या पण आतून प्रचंड संवेदनशील आणि विचारी असणार्‍या तरुणाची ही कथा आहे. रोज येणार्‍या परिस्थितीला, संकटाला तोंड द्यायची तयारी असली तरी मोठ्या संकटांना सामोरं न जाता पळवाट शोधून त्यातून निसटू पाहणार्‍या तरुणाची ही कथा आहे. जगण्याच्या अशाच विरोधाभासात अडकलेल्या चांगदेव पाटीलची ही गोष्ट आहे.
ALSO READ BHALCHANDR NEMADE’S OTHER NOVELS

Image result for जरीला – भालचंद्र नेमाडे

जुन्या गावाचे अनुभव गाठीशी घेऊन, तेथून वैतागून चांगदेव नवीन गावात येतो. आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात करतो. आता आपण दुखी किंवा निराश व्हायचं नाही असं जाणून-बुजून ठरवतो. काहीही झालं तरी सकारात्मक राहायचा असा त्याचा निर्धार असतो. त्यात सगळ्या गोष्टी जुळूनही आलेल्या असतात. सर्वात आधी, एक चांगलं शहर मिळालेलं असतं. म्हणजे, आधीच्या गावात प्रचंड लफडी, अस्वच्छपणा, शुष्कपणा येथे नसतो. येथील वातावरण चांगलं असतं, लोक साधी सरळ असतात आणि गाव-शहर म्हणून ते चांगलं असतं. अगदी चांगदेवला पटेल असं. नंतर कॉलेजही चांगलं निघतं. नेहमीप्रमाणे येथेही जातीय राजकारण वगैरे भंपक गोष्टी असतात पण मर्यादित. त्याची झळ चांगदेवला अजिबात बसत नाही. त्यानंतर खोली आणि मित्रही उत्तम भेटतात. अजून काय पाहिजे? असा प्रश्न पडावा अशी स्थिति असते. सर्वकाही व्यवस्थित चालू असतं. मनातील एकटेपणा दूर झालेला असतो. गोतावळ्यात राहिल्याने कसलाही नैराश्य अन चिंता लागलेली नसते.

पण नंतर अपघाताने संपूर्ण शहराची लाइटच जाते अन अंतर्मनातील अंधाराचा खेळ सुरू होतो. त्याच्या सोबत असलेले संगती सुट्टीनिमित्त त्यांच्या गावाला निघून जातात. त्यांच्यातील तरुण मंडळींची लग्न ठरत असतात. ह्या सगळ्याने चांगदेव अस्वस्थ होत जातो. आयुष्यात पुन्हा एकटेपणा डोकावू लागतो. सर्वचजण एकाच मार्गाने जाणारे असतात असं त्याला वाटू लागतं. मागील गावातून पारूच्या घेऊन आलेल्या आठवणी त्याला सतवू लागतात. एक वेळ अशी येते की एकटेपणात पारू आपल्या सोबत राहते अशी फसवी समजून चांगदेवची होऊ लागते. मनातील आभासाचे खेळ. तो पुन्हा अस्वस्थ होऊ लागतो. ज्या गोष्टींची भीती वाटत असते त्याच पुन्हा सुरू झालेल्या असतात. धक्के!!!
BUY NEMADE’s BOOKs WITH DISCOUNT

चांगदेव लग्नाच्या बाजारातही उतरतो. पण अयशस्वी होतो. तेथेही पुर्णपणे मानवी व्यवहार आडवे येतात. त्याने लग्नाचा कधी विचारच केलेला नसतो पण इतरांचे बघून अन सतत येणारी पारूची आठवण यामुळे तो अस्वस्थ होऊन लग्नाचा विचार अक्षरशः उतावीळपणे करू लागतो. तेथून आलेली निराशा फार बोचरी असते. त्यात त्याच्या आई-वडिलांची झालेली स्थिती हीसुद्धा त्याचं मन पोखरायला पुरेशी असते. पण तो त्या परिस्थितीशी झुंजत नाही… नेहमीप्रमाणे पलायन हाच त्याचा ठरलेला मार्ग असतो… सारं काही आलबेल चालू असताना अचानक घडलेल्या अनेक घटनांनी तो अस्थिर होतो… हे सगळं विसरण्यासाठी, लांब पळण्यासाठी तो पुन्हा नव्याने गाव बदलायचं ठरवतो… दुसरी रेघ लहान आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या बाजूला त्यापेक्षा मोठी रेघ ओढायची… हाच तो साधा प्रकार… येणार्‍या परिस्थितीला झुंजण्यापेक्षा दुसरी अशी परिस्थिती तयार करायची की ह्या परिस्थितीला अर्थ उरणार नाही…

नेमाडेंची शैली, उदाहरणं, प्रसंग, किस्से, घटना ह्या अतिशय नैसर्गिक पण अप्रतिम आहेत. संपूर्ण पुस्तकात तो कोळ्याचा जो किस्सा रंगवला आहे तो लाजवाब आहे. त्या कोळ्याची अन स्वतःची आयुष्य तुलना करणं हा चांगदेवचा खेळ मनाला खूप भावतो. तोही एकटाच, ब्रम्हचारी आहे असं त्याचं म्हणणं हेही संवेदनशीलतेचा आविष्कार म्हणावा लागेल. तो कोळीही जसा स्वतः निर्माण केलेल्या जाळ्याला जग मानत असतो, त्याच्या बाहेर जाऊ इच्छित नाही आणि स्वतःच्याच जाळ्यात अडकतो… हे प्रतिकात्मक, तुलनात्मक जे रूप दिलं आहे त्याला तोड नाही. शेवटी ती खोली सोडताना त्याच्या जीवंत राहण्यासाठी चांगदेव खिडकी उघडी ठेवतो तेही खूप भावुक आहे. वरवर निष्ठुर वाटणार्‍या चांगदेवच्या मनातील हळुवार कोपर्‍याचं दर्शन घडतं.

नेमकं काय काय सांगावं हाच खरा प्रश्न आहे. संपूर्ण कादंबरीत खालच्या मजल्यावर राहणारा, नुकतच लग्न झालेला उद्धट माणूस असं म्हणून एक पूर्ण पात्र उभं केलं आहे; कुठेही नावाचा उल्लेख नाही. त्यात कहर म्हणजे शेवटी ते लवकरच बाळाची आईबाप होणारं कुटुंब असा उल्लेख करत ते संपूर्ण घटनाच सांगतात.

एकटेपणा घालवण्यासाठी ते एका डॉक्टर बाईशी ओळख काढतात. एकटेपणा दूर करण्यासाठी दिसणारी धडपड अन कारेपणाचे गुणधर्म हेही दिसून येतात. चांगदेव स्वतःहून काकाच्या घरी जातो अन त्याचे लग्नाबद्धलचे विचार बदलतात. संसारी माणूस प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला शिकलेला असतो हे त्याला समजतं. मग तोही लग्नाचे खटाटोप करू लागतात. तेथील अवस्था नेमाडेंनी खूपच सुंदररित्या वर्णलेली आहे. तो ओलसरपणाचा प्रसंग अन चांगदेवची झालेली अवस्था ही त्यांच्या स्वयंभू अन अभिजात लेखनाचा कळस आहे. मनसाच्या आयुष्यात एक संक्रमण घडतं तो हा प्रसंग आहे. आयुष्यात कारं राहू, संसारात अडकून काय किंवा तत्सम विचार करणारा संसार वगैरे बाबतीत गांभीर्याने विचार करू लागतो. खासकरून आजच्या पिढीतील तरुण वर्गासाठी तो खूपच महत्वाचा आहे.

लग्नासाठी मुलगी बघायला गेल्यावार चांगदेवची अवस्था हीसुद्धा खूप जातिवंत उदाहरण आहे आणि त्यातूनही चांगदेवच्या बाबतीत होणारे बादल लेखक उठावदारपणे दाखवून देतो.

आपण कधीच पैशाच्या किंवा बाबतीत गंभीर विचार केला नाही हा प्रश्नही त्याला एक क्षण पडतो. गावचे पाटील-वतनदार असलेले त्याचे पूर्वज पैशाला मोहताज झालेले असतात. आपली तर दमडीचीही मदत नाही याचीही त्याला खंत वाटते. आयुष्यात काय मिळवलं किंवा काय गोळाबेरीज केली ह्याचं उत्तर त्याच्याकडे नसतं. केवळ निरर्थकपणे ध्येयशून्यतेने जगत असलेले बेफिकरी आयुष्य एवढाच काय तो प्रकार असतो. एव्हाना सहज पैसे उडवणारा किंवा पैशांची पर्वा न करणारा चांगदेव निष्ठुर अन व्यवहारिकपणे जुने स्नेही पवार यांच्याकडे राहिलेले पैसे मागतो… चांगदेवमध्ये दिसणारे बदल किंवा काय असेल ते, लेखक त्याला जज करत बसत नाही. तो जसा वाहत जाईल, मुक्त संचार करत जाईल, एखाद खर्‍या व्यक्तीप्रमाणे तसा त्याला वावर आहे. अशा चांगदेवमुळेच कादंबरी रंजक होत जाते. शेवटी सर्व चांगलं घडत असताना पाल चुकचुकते अन ते गाव, ते कॉलेज, ती मंडळी सोडून जायचा निर्णय चांगदेव घेतो. शहरात असलेल्या अंधारापेक्षा मनात उमटलेला अंधार त्याला जास्त पोखरत असतो. त्यापासून पळण्यासाठी तो हा निर्णय घेतो.

तुम्हे डर है की मै उससे हार जाउंगा?

नही… मुझे डर है की आप जान-बुझकर उससे हारणा चाहते है…

The Dark Knight Rises चित्रपटातील Batman/Bruce Wayne आणि Alfred यांच्यातील हा संवाद येथे चांगदेवला तंतोतंत लागू होतो असं मला वाटतं.

जरीला म्हणजे चांगदेव चतुष्टय मधील मधील तिसरा भाग. पण इतर तीन भागांच्या मानाने हा भाग थोडा वेगळा मानला पाहिजे. विशेष करून येथे नेमाडेंनी संय्यत लेखन केलं आहे. इतर तीन भागात जरा किस्से अन रंजकतेचा भाग जास्त आहे. पण येथे चांगदेवच्या मनावर होणारे संक्रमण, स्थित्यंतर हे खासकरून समोर येतात. इतर तीनही पुस्तकांत चांगदेवला काहीतरी कष्ट आणि अडचणी असतात म्हणून तो ते गाव सोडतो पण येथे तो सर्व व्यवस्थित असतांनाही सर्व सोडतो. शिवाय येथे फार राजकीय-जातीय उदाहरणं आणि गोंधळ नाही. काही तज्ञ मंडळी म्हणतात नेमाडेंच्या पुस्तकात वसाहतवाद, ब्राम्हणवाद वगैरे भानगडी आहेत. असेलही… पण ते पात्र तसं वाहत जातं, त्यावर नेमाडेंच्या वैयक्तिक विचारांचं ओझं नाही किंवा त्यांचे अन चांगदेवचे विचार वेगळेच असावेत असं मला वाटतं. जरीलामध्ये तरी तसे अंदाज चुकीचे ठरतात.

तरुण पिढी स्वतःचं एक विश्व घेऊन असते. ते बर्‍याचदा आभासी असतं. त्या पिढीला व्यक्त होण्याचे मार्ग कमी आहेत (आता तसं नाही). ती पिढी स्वतःच्या अटींवर जगू इच्छिते. जगात किंवा आधी असलेल्या गोष्टी रूढ चाली ह्या त्यांना नको असतात पण त्याच्यातही किंबहुना त्यातच एक जगण्याचा मार्ग असतो. नित्य जीवनात येणारे प्रसंग कलाकृतीत विशिष्ट अंगाने मांडून जीवनाचं मूल्य सांगितलं असावं. जीवनातील प्रत्येक गोष्टी आणि घटनांना संदर्भ असतात पण ते आपल्या पातळीवरच जुळतील असं काही नाही. त्याची एक किम्मत अन मार्ग असतो. पण धडपड ही चालू असते… निर्जीव नाहीत हे सिध्ध करण्यासाठी… कधी एकट्याने तर कधी सोबतीने…

Image result for जरीला – भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडे

वाचा
चांगदेव चतुष्टय: ४ – झूल – भालचंद्र नेमाडे

इथे पुस्तके घ्या:

वाचा —

झूल – भालचंद्र नेमाडे

आपुले मरण – नारायण धारप

आपुले मरण – नारायण धारप

#मराठी #भयकथा #गूढकथा #रहस्यकथा || नारायण धारप  || मराठी साहित्य || कथासंग्रह 

नारायण धारप हे नाव गूगल इमेज सर्च मध्ये टाकून पहा, म्हणजे समजेल हा माणूस कोण होता. ज्यांच्या कथा वाचताना भीतीने अंगावर काटा येणे ह्या पंक्तीचा अनुभव येतो ते नारायण धारप! त्यांच्या भयकथा म्हणजे खरच भीतीशी सलगी! कथा वाचताना हळूच आजूबाजूला बघावं लागतं. काही गूढ सावली किंवा अमानवी जीव आपल्याकडे बघत नाही ना याची खात्री करावी लागते.

अलीकडेच नारायण धारप लिखित आपुले मरण हा भयकथासंग्रह वाचण्यात आला. मागील अनेक कथांप्रमाणे यातही वाचकाला भीती वाटेल असं कथानक होतं. भयकथा म्हणजे केवळ भूत आत्मा वगैरेचा उल्लेख अन विद्रूप रूप अशा कल्पनांच्या बाहेर जाऊन भीती वाटेल असं वर्णनात्मक लिखाण ही नारायण धारप यांच्या खास लिखाणाची शैली. ओळींवरून फिरत जाणार्‍या डोळ्याबरोबर मनात धडधड वाढत जाते तेथे गूढ, भय, रहस्य कथालेखक यशस्वी होतो असं म्हणावं लागेल. आणि नारायण धारप त्यात शंभर टक्के यशस्वी होतात. केवळ एखाद्या जागेचं वर्णन करतानाही ती जागा केवळ डोळ्यासमोरच उभी राहते असं नाही तर ती गूढ भासूही लागते.

 

ALSO READ NARAYAN DHARAP’S OTHER HORROR STORIES

प्रत्येक माणसाच्या मनात अज्ञाताविषयी भीती असते, फक्त योग्य संदर्भ वापरुन ती भीती जागृत करावी लागते. तुम्ही एकांतात बसले आहात अन अचानक कोणाच्यातरी असल्याचा भास होऊ लागतो, मग तुम्ही सतर्क होता पण मनात आत कुठेतरी भीती दाटलेली असते. कोण असेल? ह्या कल्पनांच्या पलीकडे जे असतं ते नारायण धारप आपल्या कथेमध्ये अगदी चपखलपणे उतरवतात.

आपुले मरण मध्ये आठ कथा आहेत. त्यातील ‘भिमाक्का’ आणि ‘आपण सारी धरणीमातेची लेकरे’ह्या कथा वाचताना तर अक्षरशः भीती दाटून अंगावर काटा येतो. बाकीच्या कथा वाचतानाही गूढ अन रहस्य अगदी शेवटपर्यंत टिकून राहतं. सामान्य आयुष्यात सहज घडणार्‍या घटना एका भयकथा लेखकाच्या दृष्टीकोणातून वेगळ्याच दिशेला घेऊन जातात.

 

READ HERE OTHER HORROR STORIES

              रात्रीच्या वेळी मी घरात बैठकीत नारायण धारप यांची ‘भिमाक्का’ ही कथा वाचत बसलो होतो. घरात कोणीच नव्हतं. कथा पुढे सरकत होती. रात्रीच्या शांततेने दूरवरचे आवाज मधूनच ऐकू येत होते. एक विक्षिप्त म्हातारी एका वाड्यात एकटीच राहत असते. मदतीला म्हणून ती एका कामवालीला सोबत घेते. आजपर्यंत तिच्याकडे अनेक बायका काम करून गेल्या. काही पळू गेल्या, काहींना वेड लागलं तर काही मेल्या. ती म्हातारी अन तिच्या त्या जुन्या पडक्या वाड्याबद्दल भलत्याच चर्चा असतात. तिथे लहान मुलांचे बळी दिलेले असतात किंवा चेटकीण वगैरे. ती म्हातारी मोलकरणीला रात्री मंत्र-तंत्राच्या गोष्टी वाचायला सांगत असते. तिचं हास्य उत्कट असतं… त्या मोलकरणीला तिची भीती वाटत असते. वाड्यातून रात्रीचे चित्र-विचित्र आवाज येत असतात, गूढ सावल्या दिसत असतात. पायर्‍यावरून वर जाताना अंधार पसरलेला असतो… त्या अंधारात कोणीतरी दबा धरून बसलेलं आहे, डोळे वट्टारून बघत आहे असा भास त्या मोलकरणीला होत असतो… ती म्हातारी सतत तिला भूत-प्रेत, काळी विद्या अन भीतीच्या गोष्टी सांगत असते. अंधारातून गूढ सावल्या रात्रभर वावरत असतात, बळी दिलेले मुलं रडत असतात! रात्रीच्या वेळेस ती मोलकरणी उठते. खाली जात असते. त्या अंधारात कोणीतरी असल्याचा भास होतो. ती देवाचं नामस्मरण करत उतरत असते…. एक-एक पायरी… काहीतरी घडणार असतं… अचानक माझ्या घरात दरवाजाची कडी वाजते….

 

READ HERE OTHER MARATHI TOP STORIES

@नारायण_धारप म्हणजे अनवट वाटेवरचा लेखक. त्यांना एवढ्या कथा सुचतात कशा हाही एक गूढ प्रश्न आहे. त्यांचा ह्या बाबीतील अभ्यास भरपूर दिसतो. केवळ भूत-प्रेत नव्हे तर इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे शक्यतांच्या वर्तुलांतून त्यांची कथा पुढे जात असते. कथेला एक आलेख असतो. कधी संथ वाहत असलेल्या पाण्यात अचानक विवर पडावं किंवा त्या पाण्याच्या पोटातून कोणीतरी आक्रोश करत वर यावं असा अचानक झटका असतो तर कधी हळूहळू खोल दलदलीत अडकत जावं असा संथ पण सुन्न करणारा अंत. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी गूढता. घटनांच्या वर्णनातून कथा पुढे जात असते. स्थळ-काळ-वेळ याचं गणित त्यांना योग्य जमतं. त्यांची पात्र सामान्य असतात अन असामान्य शक्तीशी त्यांचा मुकाबला असतो.

 

ALSO READ NARAYAN DHARAP’S OTHER HORROR STORIES

लेखक कुठेच अडकत नाही हे विशेष. जी लय सुरूवातीला असते ती विविध आवर्तन घेत एका शेवटाला पोचते. वाचकवाचण्यात गढून जातो. कथा वेगळ्या जगातील परकायाप्रवेश ठरते. घाटवळन घेत कथा पुढे सरकते अन एका विलक्षण टप्प्यावर येऊन पोचते. एखाद्या सुंदर मदनिकेप्रमाणे कथेला आखीव-रेखीव सौंदर्य असतं. पण नारायण धारप यांच्याबाबतीत म्हणावं तर ती सुंदरा ही रूप धारण केलेली हडळ असते.

एकंदरीत…. भयकथा, गूढकथा, रहस्यकथा अशा अनवट वाटेवरील प्रवासी असाल तर नारायण धारप हा मुक्काम एकदा अनुभवलाच पाहिजे!

जंगल – मराठी भयकथा

नवीन मराठी कथासंग्रह

नवीन मराठी कथासंग्रह

#मराठी_कथासंग्रह   #लघुकथा    #अनुभव   ई-पुस्तक   Marathi e-book Something_सामाजिक

आपल्या आजूबाजूला रोज नवीन काहीतरी घडत असतं. जगण्यात रोज नव्याने येणारा दिवस काहीतरी घेऊन येत असतो. रोज घडणार्‍या ह्या घटनांचा आपण कधी सखोल विचार करतो तर कधी दुर्लक्षही करतो तर कधी आपल्याला त्या घटनांत काहीच वेगळं वाटत नाही. पण केवळ माणसाची नजर त्या घटनेला ओलांडून आपल्या रोजच्या आयुष्यात गढून जात असली तरी संवेदनशील मन लाभलेल्या कुठल्याही निरीक्षकाला त्यात काहीतरी आमुलाग्र असं वेगळेपण जाणवत असतं. मनाच्या गाभार्‍यातून काहीतरी ऊर्जा उत्सर्जित होते अन त्या तीव्रतेने त्या घटनेला जाऊन भिडते. नेहमीच त्याचा परिणाम दृश्य स्वरुपात असत नाही. पण उर्जेला एक रूप, एक मोकळा मार्ग मात्र हवा असतो. प्रत्येक माणूस तो मार्ग आपल्या परीने चोखाळत असतो. व्यक्त होण्याच्या मर्यादांना वेसणमुक्त करून मुक्त संचार करायला सोडून द्यावं लागतं. अशातूनच एक नैसर्गिक कलाकृती निर्मित होते. त्याला त्या निरीक्षकाच्या नजरेतून विशिष्ट असे कोन असतात. सगळ्यांनाच ते जाणवतात-मानवतात असेही नाही… पण त्या विस्तीर्ण गर्दीच्या गाभार्‍यात काहीतरी दडलेलं नक्कीच लक्ष ओढून घेतं…


—मोफत मराठी पुस्तक वाचा—

माणूस म्हणून आपण समाजात वावरत असतो. स्वतःची एक ओळख निर्माण करत असतो. पण प्रत्येक ओळखीचे स्वतंत्र्य पैलूही असतात. समाजात घडणार्‍या काही घटनांचे साक्षीदार म्हणून एका लेखकाने केलेले खास वर्णन हे “Something सामाजिक” ह्या कथासंग्रहात वाचायला मिळेल. समाज हा कधी समुद्रासारखा वरून खळखळणारा अन आतून शांत असतो, कधी चंद्राप्रमाणे शीतल, कधी सूर्याप्रमाणे प्रखर, कधी नदीप्रमाणे निर्मळ तर कधी वाळ्वंटासारखा रुक्षही असतो… पण समाजात सतत नवीन संक्रमण घडत असतं… ते कधीच एका टप्प्यावर येऊन थांबत नाही… काळाप्रमाणे समाज, त्यातील व्यक्तिमत्व, त्यांच्या समस्या अन त्यावर विचार करायचे दृष्टीकोण बदलत जातात… येत जाणारं स्थित्यंतर अन त्यातून येणारे नवे प्रश्न हे अनादि-अनंत आहेत…

लेखक अभिषेक बुचके लिखित “Something सामाजिक” ह्या कथासंग्रहातही आजच्या समाजातील अशाच काही कथांचा समावेश आहे. काळाप्रमाणे आजच्या लोकांच्या बदललेली समस्या अन त्यांचं परीक्षण येथे वाचायला मिळेल. आजकाल लग्न न करण्याचं फॅड अन त्यातून निर्माण झालेली स्थिती ही पाहिल्याच “मी ब्रम्हचारी” ह्या कथेत सापडते… काळाशी समरून न राहिलेल्या एका गृहस्थाला उशिराने आलेली जाग… कामाच्या ओझ्यापुढे प्रेमही जड वाटणारी पिढी… वृद्ध लोकांची अमर समस्या… परंपरेपेक्षा व्यवहारी जाणीव… टेक्नॉलजीमुळे हरवती ओळख… आधुनिक काळातील खर्‍या अंधश्रद्धा…. अशा विविध विषयांवर कथा आपल्याला ह्या Android App रूपी ई-पुस्तकात सापडतील…

Here u can download Abhishek Buchake’s free marathi e-book app…….

खालील लिंकवर तुम्ही डाऊनलोड करू शकता मराठी ई-पुस्तक… अगदी मोफत…. फक्त Android Mobile वर… 

https://play.google.com/store/apps/details?id=com.latenight.somethingsamajik.bannerexample2&hl=en

     

संक्रमण – नवीन मराठी कादंबरी

हूल – भालचंद्र नेमाडे

हूल – भालचंद्र नेमाडे

#हूल  #भालचंद्रनेमाडे  }{  #चांगदेव चतुष्टय – भाग 2  }{  मराठी साहित्यImage result for हूल – भालचंद्र नेमाडे

जग हे खरच भूलभुलय्या आहे. भूलभुलय्याच्या प्रदेशात अडकलेल्या माणसाला अनेक मार्गांची यात्रा करावी लागते. त्यातून सुटण्यासाठी प्रत्येक मार्ग जोखावा लागतो. वाटेत कधी वाटसरु मिळतात, तर कधी साथीदार. कधी निवार्‍याला, कधी आडोशाला थांबल्यावर त्यालाच घर समजून राहायचा लोभही होतो. पण मार्ग सोडता येत नाही. मार्गक्रमण करत राहावं लागतं. मागे राहतात त्या फक्त पाऊलखुणा अन आठवणींचा ओलावा. पुन्हा जगण्याच्या प्रवाहात झोकून द्यावं लागतं… मरणाच्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी…

#चांगदेव पाटील. कोसला मधील #पांडुरंग सांगवीकरनंतर नेमाडेंच्या कादंबरीतील  नायक. अनेक मान्यवर मानतात की पांडुरंग अन चांगदेव हे दोन भिन्न व्यक्तिमत्व आहेत. काहीतरी साम्य असलं तरी भिन्न स्वभावाचे दोन स्वतंत्र पात्र. पण माणसाच्या आयुष्यात स्थित्यंतरं येत असतात. आयुष्यात भेटत जाणारी माणसं अन घडणारे प्रसंग हे माणसाच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडत असतात. गोंधळलेला अन निराशाग्रस्त असलेला पांडुरंग अनेक भावनात्मक संक्रमणातून अन भावनिक गुंतागुंतीमधून पार पडल्यावर एका अशा पातळीवर पोचतो जेथे त्याला स्वतःला व्यक्त होण्याची एक कला गवसते. ती निराशेतून जन्मलेली असते पण त्याला एक अहंगंडाची किनार असते. पांडुरंग एका कोषातुन दुसर्‍या प्रकारच्या कोषात जाऊन बसतो. भीतीच्या, न्युंनगंडच्या अन निराशेच्या भावनेला तो मुक्तता, भिडस्तपणा अन रांगडेपणात बदलतो आणि जन्म घेतो चांगदेव पाटील!

एका मोठ्या अन एकत्र कुटुंबात जन्मलेला चांगदेव शिकायला मुंबईसारख्या शहरात येतो. लहानपणापासून हुशार असलेला चांगदेव मुंबईत आल्यावर जीवनाशी संघर्ष करू लागतो. आपला बाप बनवाबनवी करून आपल्याला शिकवू पाहत आहे ही सल त्याच्या मनात असते. त्यात एका गूढ आजाराने तो ग्रासल्या जातो. जीवनापेक्षा मरण अधिक प्रिय वाटू लागतो. परिस्थितीशी सामना करण्याऐवजी तो त्यापासून पळत असतो. पण नंतर प्रकाशाचे किरण दिसू लागतात. त्याचा आजार बरा होतो. आता आपण ‘मरून जाऊ’ ते आता आपल्याला ‘जगायला हवं’ असा त्याच्यात बदल होतो. पण मुंबईमधील शुष्क जीवन, तेथे सहन करावा लागलेला त्रास, रोजची जगण्याची धडपड यापासून तो दूर जाऊ बघत असतो. त्याला दूर कुठेतरी गावात जाऊन आरामात आयुष्य जगावं वाटत असतं. आयुष्याबद्धलची एक रोमॅंटिक संकल्पना मनात घेऊन तो वाटचाल करत असतो. जुने सगळे पाश तोडून टाकावे अन नवीन स्वप्नांच्या प्रदेशात जाऊन सहवास करावा असं त्याला वाटत असतं. ते जुनं कळकटलेलं अन दुखाची किनार असलेलं बिढार मागे टाकून तो पुढची वाटचाल करू लागतो. सुंदर अन रम्य कल्पनेच्या विश्वाची चाहूल लागलेली असते. मृत्युने हूल दिलेली असते.. जुनं ओझं विसरून जुनं बिढार तेथेच टाकून तो नवीन अन स्वतःच रंगवलेल्या जगात जात असतो!

चांगदेव एका लहानशा शहरात जाऊन पोचतो. काहीही करून जुन्या आठवणीच्या प्रदेशातून त्याला बाहेर पडायचं असतं, त्यासाठी तो वाट्टेल ते सहन करायची त्याची तयारी असते. स्वतःची ध्येय, आशा-आकांक्षा घेऊन तो येथे आलेला असतो. लाथ मारू तेथे पाणी असा विश्वास त्याच्या मनात असतो. पण लवकरच त्याचा स्वप्नभंग होऊ लागतो. शिक्षणाचं झालेलं बाजरीकरण, जनावरासारखे वर्गात कोंबलेले विद्यार्थी, त्यांना शिकवण्याचा दिखावा करणारे मास्तर, कॉलेजमधील जातीय वातावरण आणि शहरातील कोरडेपणा त्याला असह्य होत असतो. मुंबईतून ज्या सुंदर स्वप्नांचं चित्र रंगवून तो इथे आलेला असतो त्याचा पूर्ण बोजा वाजतो. रोमॅंटिक कल्पनाविश्वाची हूल!!! त्याचे जे आदर्श, तत्व वगैरे असतात ते सगळे खुंटीवर टांगून ठेवायच्या कामाचे असतात असं त्याला वाटू लागतं. आयुष्य हे संघर्ष अन तडजोडी करूनच जगलं जातं हे त्याला दिसू लागतं. रोज उगवून मावळणार्‍या सूर्याप्रमाणे येथेही कटिबद्ध पण अंधारं आयुष्य असतं.

Image result for हूल – भालचंद्र नेमाडे


BUY BOOK WITH DISCOUNT

चांगदेव नीरस आयुष्य जगत असतो. येणारा दिवस पुढे ढकलत असतो. त्या गावात फार पाऊस पडत नसल्याने तेथील राहणीमानात शुष्कपणा त्याला जाणवतो. कार्‍या मुलांना शहरात राहायला जागा मिळत नसते. गावभर लफड्यांचा उत आला आहे असं वातावरण त्याला दिसू लागतं. मग कमरेखालचे विनोद आलेच! इडली-दोसा आणि लिंबू सरबतही मिळत नाही म्हणून त्याचा चिडचिडेपणा वाढत जातो. वर्गात त्याला टारगट पोरं शिकवूही देत नसतात. त्यात कॉलेजमधील राजकरणात त्याला त्रास होऊ लागतो. अशा अनेक कारणांमुळे ज्या सुखाच्या अन समाधानी आयुष्याच्या कल्पना घेऊन तो येथे आलेला असतो त्या खोट्या ठरतात. मुंबईतील जीवनापेक्षा येथील जीवन अधिक नीरस अन भकास आहे हे त्याला पटतं. नेहमीप्रमाणे त्याला येथेही अवलिया साथीदार मिळतात. सतत ‘… असं म्हंटलं तर फार वावगं होणार नाही’ असं म्हणणारा गायकवाडसारखा साथीदार त्याला भेटतो. ते दोघे एकाच लॉजवर राहत असतात. त्या गायकवाडकडे पैसा आहे पण याला लग्नाला किंवा शरीरसुखासाठी पोरगी भेटत नाही. तो सतत त्याच विचारात अन प्रयत्नात गढलेला असतो. शेवटपर्यंत त्याला ते काही भेटत नाही. चांगदेवचे मित्र प्राध्यापक पवार यांच्या कुटुंबाशी त्याचा घरोबा वाढतो. त्यांच्याही आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात अशाच अडचणी असतात. मग  बोलण्यात सतत ‘काम’विषय येतात. त्यात शिकवण्या घेणारे झोपे हे तर ह्या सगळ्या प्रकरणात मास्टरी केलेले असतात. ह्या सगळ्यांच्या संवादातून गोष्ट पुढे सरकत जाते. कार्‍या असलेल्या माणसाच्या मनातील भाव नेमाडेंनी येथे अगदी व्यवस्थित फुलवले आहेत. गावात फिरताना त्याला गरीबीचं दर्शन होतं. काय परिस्थितीतून मुलं शिक्षणासाठी येतात याचं भान येतं. गरीबीपाई होणारं धर्मांतर याचीही त्याला चीड येते. तो वरचेवर अस्वस्थ होत जातो. मन दुभंगल्यासारखं होतं. तो आतून गलबलायला लागतो. झालेला भ्रमनिरास अन समोर येणारं चित्र यातून त्याची निरसता पुन्हा डोकं वर काढू लागते. तो पुन्हा निराशेत ढकलल्या जातो.

पण अशा अधांरलेल्या आयुष्यात पारू सावनूर नावाची ख्रिश्चन तरुणी येते. त्याचं मन पुन्हा उभारी घेऊ लागतं. अनेकांकडून जिच्याबद्धल बरं-वाईट ऐकलेलं असतं तिच्यात तो गुंतत जातो. तिच्या अबोल डोळ्यात अन मुक चेहर्‍यात त्याला स्वतःचं अस्तित्व जाणवू लागतं. ज्या भौतिक जगापासून तो दूर पळत असतो, तो पुन्हा तिच्यासाठी त्यात गुंतत जातो. पगारातील वर राहिलेल्या पैशांचं काय करावं असा प्रश्न पडणारा चांगदेव काही पैशांसाठी नोकरीवर लाथ मारायला तयार असतो. तिच्यात तो इतका गुंतलेला असतो की त्याला कसलच भान राहत नाही. आपण काय करत आहोत? असा गोंधळून टाकणारा प्रश्न तो स्वतःला विचारतो. पण नंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा येतो. हा प्रसंग ज्याप्रकारे घडतो त्यात थोडा नाटकीयपणा वाटतो. मग पुन्हा निराशेच्या गर्तेत तो ओढल्या जातो. खोलीत पडून राहून तो अजूनच अस्वस्थ अन विचलित होत जातो. त्याला काहीही करून गाव सोडायचं असतं. मग पुन्हा पायपीट. गावोगावी नोकरीसाठी भटकणे! त्यात संस्थेचं झालेलं बाजरीकरण त्याचा पुरता भ्रमनिरास करणारं असतं. तो मास्तरी पेशाच्या ज्या स्वर्गकल्पनात असतो त्या धुळीला मिळाल्या जातात. पण ते शहर सोडायचं अन बरं शहर पकडून अगदी झोकून द्यायचं तो ठरवतो. मागे सोडून आलेलं नकोसं बिढार ते मखमली स्वप्नांना हूल असा हा प्रवास पूर्ण होतो!!!

संपूर्ण कादंबरीत चांगदेव हे पात्र अतिशय स्वतंत्ररित्या समोर येतं. नेमाडेंनी त्या पात्राला मुक्त करून त्याला त्याच्या विचाराने वाढायची मोकळीक दिलेली जाणवते. चांगदेव हा हट्टी, अहंकारी तरीही संवेदनशील तरुण आहे. त्याला स्वतःचे तोडकेमोडके का असेनात विचार अन तत्व आहेत. तो केवळ त्याला त्याची ध्येय असली तरी तो आयुष्याच्या बाबतीत गोंधळलेला आहे. तो भिडस्त आहे. संतापी आहे. त्याला परिणामांची पर्वा नाही. नेमाडेंनी ह्या पात्राला एका वास्तववादी तरुनाप्रमाणे प्रस्तुत केलं आहे. कधी दिवसभर अंथरुणावर लोळत असलेला चांगदेव तर कधी उत्साही, संचारी, गावोगाव फिरणारा चांगदेव भेटतो. अत्यंत लहरी. एरवी तुसडेपणा जाणवणारा स्वभाव कधी बदलेल याचीही काही ग्वाही नाही. त्याच्यावर कसलच नियंत्रण नाही. खोली मिळवून दिली नाही म्हणून पवारसारख्या मित्रावर चिडणारा चांगदेव किंवा वर्गात मुलांना बदडणारा चांगदेव किंवा पारू सावनूरशी अलगद वागणारा चांगदेव… कुठेच हिशोबी वागणं नाही! वार्‍यासारखं! नेमाडेंनी चांगदेवला हवं तसं वागायचा, संचार करायचं स्वतंत्र दिल्यानेच असं अजरामर पात्र जन्म घेतलं! तो कुठल्याही पठडीतील नाही… सामान्य तरूनाप्रमाणे तो वागतो येथेच त्या पात्राचा विजय आहे.

ह्या सगळ्यात कौतुक करावं लागेल नेमाडेंच्या शैलीचं. नेमाडेंनी एक-एक पात्रात अक्षरशः जीव ओतला आहे. गायकवाड, पवार, झोपे, शबीर, पारू, प्रिन्सिपल किंवा सरबतवाला मारवाडी… प्रत्येकाचं एक वागणं आहे… स्वतंत्र रूपरेषा… स्वतंत्र अस्तित्व… संपूर्ण कादंबरीत पुरुषांचं कारेपण अन त्यांचं लैंगिक भूक यावर बरच भाष्य आहे. तारुण्यात अतिशय महत्वाची असणारी लैंगिक समाधानाचा मुद्दा नेमाडेंनी बरोब्बर हेरला आहे. येथे कुठेही अडून-अडून भाष्य नाही. प्रत्येक मुद्द्यावर थेट भाष्य आहे. पुरुषाचा स्त्रीकडे बघायचा दृष्टीकोण कसा असावा यावर कसलं तात्विक भाष्य नाही, तर पुरुष बाईबद्धल काय विचार करतात हे वास्तववादी चित्रण आहे. पारू सावनूरची बदनामी असेल किंवा पवारांचं वाड्यातील भाडेकरू बायांशी असलेले संबंध असोत… नेमाडे कोठेच तात्विकतेचे डोस पाजत नाहीत. जे समाजात आहे त्याच्याशी त्यांना कर्तव्य आहे. गायकवाड किंवा झोपेसारखी मंडळी तर स्त्रीसुखासाठी आसुसलेली असतातच. त्यात झोपेसारखी बेरकी लोक स्वतःचं हित कसही साधून घेतात तर गायकवाडसारखी घाबरट शेवटपर्यंत उपाशीच राहतात. पण स्त्रियांकडे कसाही दृष्टीकोण असला तरी शायरी अन दर्दभरे गाणे वाजल्यावर गायकवाडसारखी लोकही प्रेमावाचून अस्वस्थ वाटतात अन बर्फासारखी वितळून जातात. प्रत्येकाच्या मनात एक कोपरा असतो जेथे संवेदनशीलता लपलेली असते. तारुण्य, प्रेम, शरीरसुख यावर अस्सल वर्णन कादंबरीत येतं. पण ते उपदेश किंवा भाषणवजा नसून संवादातून पुढे येतं. मानवी भावनेतून त्याचं मोल उलगडत जातं.

 ALSO READ BHALCHANDR NEMADE’S OTHER NOVELS HERE

नेमाडेंनी येथे जातीयवादावरही भाष्य केलं आहे. केवळ जातीय नव्हे तर धार्मिकही! गरीबी किंवा इतर कारणांसाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले अजूनही परंपरेने हिंदुच आहेत. पण हिंदूंनीच त्यांना परकं केलं आहे असं पारू सावनूरच्या उदाहरणातून समोर येतं. त्यांचं कुटुंब किंवा पूर्वज धर्मांतरीत असतात. पण त्यांच्यातील स्त्रियांना अजूनही हिंदूमध्ये येण्याची आस असते, त्यासाठी ते हिंदू नवरा शोधत असतात. इकडे चांगदेव तिला असा भेटतो जो तिला तिच्या धर्मासहित स्वीकारायला तयार असतो. दोन मन अन दोन धर्म यातील गोंधळलेपण समोर येतं. येथे नेमाडे यांचा देशीवाद विनाकारण लुडबूड करत नाही हे विशेष. हा प्रसंग चांगदेवच्याच नजरेतून घडत जातो. त्यात मग उदारमतवादी असलेले ख्रिश्चन प्रिन्सिपल हेही आले. कॉलेजमध्ये असलेलं राजकारण हेही त्याचच प्रतीक. येथे सर्वात महत्वाचा एक प्रसंग आठवतो. म्हणजे आज मराठा आरक्षण वगैरे मागण्या चालू आहेत त्याच्याशी निगडीत.

गायकवाड, जो लॉजवर चांगदेवसोबत एकत्र राहायचा, त्याचं पवार, चांगदेवचे प्राध्यापक मित्र, यांच्या लांबच्या बहिणीशी लग्न जुळवण्याचं चालू असतं. गायकवाड हे रुबाबदार, पैसेवाले अन त्यांचे काका तर मंत्री… असं कुटुंब. आणि पवार हे मूळ वतनदार. त्यांची लांबची बहिणही एका बड्या घराण्यातील. दोघेही एकमेकांना पसंत करतात, पण त्या मुलीच्या राजघराण्यातील व्यक्ति ह्या गायकवाडच्या इतिहास खणून काढतात. त्यांच्यात कोणीतरी कुणबी अन इतर बाह्य लग्न केलेलं आढळून आल्यावर ही जुळत आलेली सोयरीक मोडते. हा प्रसंग नेमाडेंनी अतिशय गमतीशीर पण प्रामाणिकपणे रंगवला आहे. येथे मराठा-कुणबी-वतनदार वगैरे पदर उघडे होतात. असो.

कादंबरीत कुठे-कुठे अतिरेक होताना जाणवतो. काही प्रसंग असे रंगवले आहेत जे सामान्य जीवनात दुर्मिळतेने घडतात. मध्येच थोडी अश्लीलताही डोकावते. विनाकारण येणारे पाचकळ संवाद अन वात्रटपणाही आहे. अर्थात, तो वाचकाला सुखावून जातो. वाचताना अनुराग_कश्यप चे सिनेमे आठवतात. कुटुंबासोबत बसून न पाहता येण्यासारखे चित्रपट. पण त्यातही एक मिश्किल अन मर्मपणा असतो.
BUY OTHER BOOKS BY BHALCHANDR NEMADE ON FLIPKART WITH DISCOUNT

काही प्रसंग अन क्षण तर अतिशय अभिरुचिसंपन्नतेचा आविष्कार करणारे अन जाणिवांशी भिडणारे आहेत. मनात दाटून येणारी अस्वस्थता अन चलबिचल काही प्रसंगांतून नेमाडेंनी अतिशय खुबीने सादर केली आहे. नेमाडेंचं लेखन म्हणजे केवळ शब्द अन प्रसंग नसून त्यात रोजच्या जगण्याशी निगडीत भावनांचे कल्लोळ दिसतात. त्यांच्या संवेदनशीलातेची खोली प्रचंड आहे. जीवनाने जीवनाला हात धरून मार्ग दाखवावा असा प्रवास वाटतो. ह्या कादंबरीत सुरुवातीपासून सुखाच्या जवळ जाऊन सुखाने हुल द्यावी अशा घटना आहेत. मग ते तात्विक अन आशावादी जीवनाबद्धल असोत, पारू सावनूर असो, गायकवाड, पवार यांचे किस्से असोत.. ते हुरहूर लाऊन जातात… अर्धवट वाटेतच प्रवाशाने प्रवास सोडवा असं काहीतरी वाटतं… पण कादंबरीच्या शेवटाला हुलीमणी काहीतरी सांगतो ते चांगदेवला पटतं… आयुष्य चालतच असतं… तुमची इच्छा असो व नसो…

एकाकी जीवनाचं फॅड असणार्‍या नंतर एकाकी पडत जाणार्‍या जगाशी संघर्ष करत जग समजू पाहणार्‍या तरीही जीवनाला तुरुंग समजणार्‍या संवेदनशील पण फटकळ तरुण मनाचा धांडोळा ह्या कादंबरीत अन एकंदरीतच #चांगदेव चतुष्टय अन नेमाडेंच्या लेखनात आढळतो. कादंबरी आपल्याला हसवते पण तरीही कुठेतरी मनाला हुरहूर लावून जाते. शोकांतिका म्हणजे केवळ रडण्यात अन रडवण्यात नसून ती मनाला भिडणारी असावी; तशीच नेमाडेंच्या नायकाची ती आहे. नित्य जीवनात सामान्यपणे घडणार्‍या प्रसंगातून उकल होणार्‍या भावना हे नेमाडेंच्या शैलीचं वैशिष्ट म्हंटलं पाहिजे. एक वैशिष्टपूर्ण कलाकृती असं म्हंटलं पाहिजे.

आयुष्य जगण्याची रीत असते. पण ती समजावी लागते. कोणाला ती समजता समजता काळ लोटून जातो. केवळ दिवस ढकलत जाणे म्हणजेही आयुष्य असतं? का काहीतरी वेगळ्या कल्पनाविश्वाने भारलेलं स्वतंत्र विश्व असतं? चांगदेव अजून त्यात अडकला आहे. तो भूलभुलय्याचे मार्ग तुडवत पुढे जात आहे. त्याला वाटसरु भेटले, त्यांना मागे सोडून तो मार्गक्रमण करत आहे. त्याचा प्रवास सुरूच आहे…!

प्रत्येकाने एकदातरी वाचावीच!

ALSO READ BHALCHANDR NEMADE’S OTHER NOVELS HERE->

 

वाचा —

जरीला – भालचंद्र नेमाडे

Harry Potter and The Cursed Child

Harry Potter and The Cursed Child

#HarryPotterandTheCursedChild    #JKRolling New Released Book

Discount Offer by Amazon and Flipkart for the fans of @Harry-Potter.

J.K. Rolling recently released the 8th part of Harry Potter books series. And here is special discount offers to buy the book Harry Potter and Cursed Child.

Hurry up…. Limited stock…

हॅरी पॉटर ह्या सर्वांच्या चाहत्या अन लाडक्या superhero ची कथा सर्व जगाने डोक्यावर घेतली होती. त्याचे आजवर सात पुस्तक अन चित्रपट येऊन गेले. कथेच्या लेखिका जे. के. रोल्लिंग्स यांनी ह्याच पुस्तकाचा आठवा भाग प्रकाशित केला अन त्यावर चाहते अक्षरशः तुटून पडल्याचे चित्र आहे. हे पुस्तकही रेकॉर्ड ब्रेक विक्री करणार यात वाद नाही. ह्या पुस्तकाच्या प्रती बाजारात येताच संपल्याच पाहायला मिळत आहेत. अनेकांना तीव्र इच्छा असूनही हे पुस्तक मिळत नाही. पण latenightedition.in आपल्यासाठी मदतीला धावून आलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण amazon आणि flipkart कडून काही प्रती राखून ठेवल्या आहेत. special discount offers सहित ह्या प्रती आपण लवकरात लवकर मिळवाव्या… मर्यादित काळाची ऑफर आहे… आपल्या वेबसाइट च्या माध्यमातून जांनार्‍यांसाठीच ही सुविधा उपलब्ध आहे… चाहत्यांनी संधीचा लाभ घ्यावा…

वेबसाइट वर येऊन amazon किंवा flipkart च्या बॅनर वर क्लिक करा जे आपल्याला त्या-त्या sites वर घेऊन जाईल आणि खरेदी करा…

error: Content is protected !!