Category: KitabiKida

बिढार – भालचंद्र नेमाडे

बिढार – भालचंद्र नेमाडे

#Bidhar by @Bhalchandra_Nemade   #भालचंद्रनेमाडे    @चांगदेव चतुष्टय: भाग १

B.E. चं तेवढं लवकर आटपून नौकरीला लागावं. घरी निव्वळ बापाच्या खानावळीत राहिल्यासारखं वाटतं.
#बिढार #भालचंद्र_नेमाडे

Image result for bhalchandra nemade

भालचंद्र नेमाडे म्हणजे अवलिया माणूस. त्यांच्या कादंबर्‍या म्हणजे वास्तववादाचं दर्शन असतं. म्हणजे, हिन्दी चित्रपटात आजकाल #अनुराग_कश्यप चे चित्रपट जसे असतात तशाच प्रकारचा अनुभव नेमाडेंची कादंबरी वाचताना होतो. प्रसंग अन घटना गंभीर असले तरी त्यात एक व्यंग आणि विनोदी छटा असतात. वर लिहिलेलं वाक्य हे केवळ सामान्य वाक्य नसून ती अनेक बेरोजगार तरुणांची भावना आहे. कमी शब्दांत अतिशय उत्तम प्रकारे बोलणं मांडायची हातोटी. म्हणजे नौकरी लागत नाही म्हणून दोन वेळेच्या अन्नासाठी आई-वडलांच्यावर अवलंबून राहावं लागतं असे त्यातील भाव एखादा तरुण आपल्या मित्राकडे कसं बोलेल, हे क्षणात सांगून मोकळा होतो. बेरोजगार तरुण निराश, चिंताग्रस्त तर असतो पण त्याच्या बोलण्या-वागण्यात, मित्रांत उठ-बस करताना तिरकसपणा अन मर्म विनोद काही सुटत नाही. यात मनात कितीही हतबलता असली तरी ती अश्रु गाळत उगाच सहानुभूती मिळवायचा प्रकार तरुणांना नसतो. जी सल असते ती एखाद्याला नावं ठेऊन बाहेर काढण्याची कला आत्मसात झालेली असते.


BUY “BIDHAR” BHALCHANDRA NEMADE BOOK WITH DISCOUNT

बिढार. नेमाडेंची अजून एक कादंबरी. चांगदेव_चतुष्टय मधील पहिला भाग. चांगदेव पाटील ह्या तारुण्याच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच एका आजारपणामुळे निराशेच्या गर्तेत झोकला गेलेला तरुण. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेला. एकत्र कुटुंब पद्धतीत अन लहानशा गावात ‘पाटील’ म्हणून वाढलेला मुलगा, पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत येतो अन सुरू होते आयुष्याची प्रवासयात्रा. कुठलाही प्रवास सरळ अन सहज नसतो. त्यात कधींना कधी खडतर वाटा. घाट वळणे येतातच. पण ह्या प्रवासाची सुरूवातच शेवटाकडे नेणारी असेल तर त्या भल्या-मोठ्या अन अधांतरी प्रवासाची काहीच गोडी राहत नाही. उलट येतो तो वीट, तिरस्कार, संताप, चिडचिड, भय, न्युंनगंड अन नैराश्य!!! कथेतील नायक चांगदेव पाटील याला समजतं की त्याला काहीतरी अगम्य आजार आहे जो त्याला शेवटाकडे नेणार आहे तेंव्हा त्याचं भान हरपत जातं अन तो मरणाची वाट बघू लागतो. मृत्यू ह्या सगळ्या जाचातून सोडवू पाहणारा मदतनीस आहे असं त्याला वाटू लागतं. जगण्याकडे बघण्याचा त्याचा संपूर्ण दृष्टीकोण नकारात्मक होतो. आनंदाने जगण्याची ओढ अन रस निघून जातो. निष्काळजीपणा वाढत जातो. फार काय तर आपण मारून जाऊ, हेच त्याचं स्वतःला सांगणं असतं. त्यामुळे जेथे जाईल तेथे झोकून देऊन काम करायचा त्याचा इरादा असतो. त्यात एकत्र कुटुंबात वारंवार खटके उडत असतात. त्याच्या एका भावाचा अकाली मृत्यू झालेला असतो. आपला बाप आपल्यासाठी, आपल्या शिक्षणासाठी इकडे-तिकडे लबाडी करून पैसे मिळवतो अशी त्याची धारणा असते. एकत्र कुटुंबातील वाद अन कटकटी त्याला खूपच अस्वस्थ करत असतात जेणेकरून त्याचा संताप अन नकारात्मक पवित्रा वाढत जातो. आपल्याला झालेला रोग हा असाध्य आहे जो आपण घरी सांगूही शकत नाही ही बोच मनात असते. पुन्हापुन्हा, मरण हे त्याला ह्या सगळ्यातून सुटका करणारी भेटवस्तू वाटत असते. तो मग नैराष्यातून सगळं सोडून मुंबईला निघून जातो आणि रममान होतो जादुई नगरीत… मित्रांच्या सानिध्यात!!!

BUY OTHER BOOKS OF BHALCHANDR NEMADE ON FLIPKART WITH DISCOUNT

कादंबरीतील चांगदेव पाटील अन त्याची मित्रमंडळी ही बी.ए. वगैरे करणारी असतात. कादंबरीत १९६० च्या आसपासचा कालावधी उल्लेख केलेला आहे. त्या काळीही शिक्षण, नोकरी, बेरोजगारी अन राहायच्या जागेची अवस्था आजपेक्षा वेगळी नव्हती हे प्रामुख्याने अधोरेखित होतं. अशा ह्या अवाढव्य मुंबईत पोरांचा सगळा कल्ला बघायला भेटतो. तारुण्यात माणूस जितका आशावादी असतो तितकाच निराशावादीही असतो. समाजातील घटना वगैरे त्याला अस्वस्थ करत असतात अन त्याला बदलण्याची धमक अंगी आहे असा तरुणाईचा सळसळता उत्साह असतो. आपण काहीतरी नवीन करू, वेगळं करू, बदल घडवू अशी त्याची धारणा अन प्रयत्न असतात. हे सगळे तरुण, त्यांचे बसायचे अड्डे, त्यांच्या चर्चेचे मुद्दे, भांडणं, शिवीगाळ, एकमेकांवर जळणे वगैरे सदासर्वकाळ अमर असणार्‍या घडामोडी कादंबरीत आहेत ज्या कादंबरीला कायम चिरतरुण ठेवतात. आजकालच्या तरुणांचे चर्चेचे मुद्दे बदलले असतील, बसायची ठिकाणे बदलली असतील, जीवनशैली बदललेली असेल तरी मूळ भावना ह्या नेहमीच मूलभूत असतात. एकमेकांना कितीही शिव्या दिल्या, भांडणे झाली तरी असे काही मित्र असतात जे पैशाच्या, जागेच्या आणि अन्य बाबतीत नेहमीच डोळे झाकून मदत करतात. मुंबईत माणूस पैशांशिवाय, जागेशिवाय, अन्नाशिवाय जगू शकतो पण मित्रांशिवाय जगू शकत नाही असं कादंबरीतून नमूद होतं. प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात वेळ येते जेंव्हा त्याला मित्र सोडून ‘करियर’ निवडावं लागतं. ते होतच असतं. एखादा मित्र खूप श्रीमंत होतो, एखाद प्रसिद्धीच्या झोतात येतो, एखाद नशीबवान निघतो, काही तसेच धडपडे राहतात पण मनात कुठेतरी मैत्रीची ठिणगी तशीच धगधगत असते. जुने दिवस आठवतात; त्यांची लाजही असते अन अभिमानही. पण सगळं मनातच कुठेतरी हरवलेलं. चांगदेवचे मित्र सारंग, शंकर, नारायण, भैय्या, अप्पा, वगैरे अस्सल पात्रे आहेत. सगळ्यांची स्वतंत्र विचारसरणी आहे, आयुष्य आहे, भूमिका अन क्षेत्र आहेत पण तरीही सगळे मित्र आहेत. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरची तरुण मंडळी एकत्र येऊन आयुष्य नावाचा गाडा खडतर रस्त्यावरून अतिशय कष्टाने पण तितक्याच तिरकस-खट्याळ-मजेशीर पद्धतीने पुढे ढकलत असतात.

Image result for बिढार – भालचंद्र नेमाडे

त्या काळी असलेली परिस्थिती अन आजची परिस्थिती फारशी बदललेली वाटत नाही. लेखकांची तर तेंव्हाही अवहेलनाच होती आणि ती तशीच आजही आहे हेच दिसतं. विनाकारण बौद्धिकतेचा आव आणला तरी त्याला पोट भागवायलाही पुरेसे पैसे मिळत नाहीत. वृत्तपत्रात किती विचारांचे चन्दन उगाळले तरी शेवटी महिन्याखर रद्दीत घालतानाच त्याचं वजन ठरतं. लिहिणं वगैरे म्हणजे उपाशी मरायचे धंदे आहेत हे तेंव्हाही खरं होतं आणि आजही खरं आहे. ह्याच परिस्थितीवरून दोन पात्रांत वाद झालेला किस्सा आहे. मराठीत असं का आणि इंग्लिश अन परदेशात असं का नाही याचा वास्तविक वाद चर्चेत येतो. अशा अनेक मूलभूत अन महत्वाच्या बाबींवर कादंबरीतून मनमोकळा भाष्य आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर, रस्त्याच्या कडेला एक स्त्री पडलेली असते. तिचा कदाचित सामूहिक बलात्कार झालेला असतो आणि अजून दोन लोक तिला ‘वापरायला’ बघत असतात. ती बिचारी पाय घट्ट दाबून पडलेली असते. तो काळ अन आजचा काळ यात कितीसा फरक आहे? याचं उत्तर मिळतं. समाज वगैरे बदलतोय, विज्ञानयुग, पुरोगामित्व वगैरे अवतरलं आहे, हे म्हणजे थापा आहेत असच वाटतं. कम्युनिस्ट असलेला नारायण मर-मर मरून काम करत असतो पण शेवटी तिथे काहीतरी गफलत होते आणि शेवटी तो सगळं सोडून ‘सुखी आयुष्य’ जगण्याचा मार्ग निवडतो. हे सगळं खरं तर एका पातळीवर खिन्न करणारं असलं तरी तोच व्यावहारिक निर्णय आहे हे नारायण-चांगदेव संवादातून समोर येतं. आजचा माणूस असेल किंवा कोणत्याही काळातला, त्याला तडजोड करून आयुष्याचा रहाटगाडा पुढे चालू ठेवावा लागतो. मिळाले नाही म्हणून द्राक्षं आंबट असे म्हणणारे कोल्हे तर प्रत्येक मानसाच्या मनात दबा धरून असतातच.

भालचंद्र नेमाडे. केवळ अप्रतिम! वास्तववादी चित्रण! म्हणजे, कुठेही काहीही रूपकात्मक, नाटकीय, अतिशयोक्ति वाटत नाही. सहजपणा हाच त्यांच्या लिखाणाचा आत्मा आहे. चार मित्र भेटल्यावर किंवा सामान्य तरुण कुठली भाषा वापरतो, कसा बोलतो, कसा विचार करतो हे तंतोतंत जुळतं. नायकाला उगाचच ‘आदर्शवादी’ दाखवण्याचा प्रयत्न नाही हे विशेष. म्हणजे, सिगरेट पिणे, पैसे नसतील तर उपाशी झोपणे, पाव खाऊन दिवस काढणे, अस्वच्छ जागा, दारू, एखादा बाईचा नाद असलेला मित्र वगैरे गोष्टी ओघाने आल्याच. कादंबरी वाचत असताना राहून-राहून अनुराग कश्यप यांच्या चित्रपतील दृश्य नजरेसमोर येतात. तारुण्यात असलेली बेफिकिरी, रग, अहंकार वगैरे वारंवार उफाळून येताना दिसतो. यातील चौहान प्रकरण तर ग्रेट आहे. असले पात्र प्रत्येक रूमवर असतातच. मित्रांमध्ये बसल्यावर एकमेकांच्या वडलांना बाप, म्हातारा वगैरे म्हणायची प्रथा आजही अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे एकमेकांच्या वडलांना, तुझे वडील, तुझे बाबा वगैरे म्हणायचा सभ्यपणा नसलेल्या तरुणांची ही गोष्ट आहे.

तरुणांच्या अनेक समस्या असतात आणि रोजच्या जगण्यात असंख्य अडचणी असतात पण त्या दुखाचा उगाच बाऊ न करता, तसे निराशाचे झेंडे फडकवत न राहता शिव्या, विनोद, मस्करी, टोकाचे वाद ह्यातून तो दबाव बाहेर पडायचा. कादंबरीची भाषा म्हणजे अनौपचारिक गप्पा असल्याप्रमाणेच आहे. त्यात प्रकाशक कुलकर्णी प्रकरण हे तर फार रंगलं आहे. तारुण्यात ज्या काही भानगडींचा सामना सामान्य तरुणांना करावा लागतो, त्याची नोंद येथे सापडेल. तरुणांच्या शक्तीचा अन भावनेचा गैरवापर करून घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणारे हे आज जन्माला आले नाहीत हे कुलकर्णी प्रकरणावरून समजतं. कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. उलट पुढचा भाग वाचल्याशिवाय चैन पडत नाही. टप्प्याटप्प्याने येणारे प्रसंग रममाण करणारे आहेत. यात केवळ चांगदेव याच्या आयुष्यावर प्रकाशझोत आहे अशातला भाग नसून, त्याच्या मित्रांच्या आयुष्यावरही लक्ष वेधलं जातं. ही मित्रांची गोष्ट आहे. त्या मित्रांमध्ये आपण कुठेतरी स्वतःला सापडतोच. जगाच्या उंबरठ्यावर असलेले तरुण काळ-वेळेनुसार काय निर्णय घेतात आणि मार्गक्रमण करतात याचं रेखाटन मन स्थिर-अस्थिर कक्षेत घेऊन जातं.

जीवन नावाचा सारीपाट कधीच कोणालाच पुर्णपणे उलगडत नसतो. एक-एक सोंगटी पडत जाते. खेळ कधी रंगतो तर कधी भंगतो. सवंगडी कधी अर्ध्यावर डाव सोडून जातात तर काही सवंगड्याचा डाव आपल्याला सांभाळून घ्यावा लागतो. आयुष्याचा हा गमतीशीर #वनवास वाचताना हसू आणतो आणि भावुकही करून जातो.

तारुण्यातील सळसळतं जीवन जगलेल्या प्रत्येकाने एकदा तरी वाचावं असं पुस्तक!!!

वाचा संपूर्ण चांगदेव चतुष्टय:-

वाचा

चांगदेव चतुष्टय: भाग 2 || हुल-भालचंद्र नेमाडे

Offers On Books

Offers On Books

#Special Offers On Books  पुस्तक प्रेमी वाचकांसाठी विशेष आनंदाची बातमी… ज्ञांनपीठ पुरस्कार विजेते लेखकांच्या पुस्तकावर विशेष सवलत ऑफर… जगविख्यात अध्यात्म अभ्यासक देवदत्त पट्टनाईक यांच्या नवीन पुस्तकावरही विशेष सवलत… संधीचा लाभ घ्या!!!

#Devlok With Devdutta Pattanaik

 

#Hindu – Bhalachandra Nemade

 

#Yayati – V. S. Khandekar

 

कथा माडगूळकरांच्या

कथा माडगूळकरांच्या

#चरित्ररंग – व्यंकटेश माडगूळकर  #मराठीसाहित्य

मागच्या वेळेस बोललो त्याप्रमाणे सध्या मी माडगुळकर यांच्या साहित्यात बुडालो आहे. हयातून तेंव्हाच बाहेर येईल जेंव्हा त्यांची पुस्तके वाचून तरी संपतील किंवा मिळणं तरी संपतील. सध्या वाचलं ते ‘#चरित्ररंग’ हे अनुभव. व्यंकटेश माडगूळकरांनी कथालेखन तर केलच होतं पण चित्रपटकथाही ते लिहायचे. शिवाय शिकार, चित्रकार, थोडेफार नट, निवेदक हीसुद्धा त्यांचे गुण होते असं त्यांच्या वाचनातून दिसतं. चरित्ररंग मध्ये ह्याच सगळ्या गोष्टींचा उलगडा आहे. माडगूळकरांनी चित्रपटासाठी काही कथा लिहिल्या त्या नेमक्या कशा घडल्या. किंवा चित्रपटासाठी म्हणून लिहीलेल्या कथा नंतर चित्रपट म्हणून उभ्याच राहू शकल्या नाहीत. वगैरे कथा यात सांगितल्या आहेत. नेहमीप्रमाणे यासुद्धा कथा रंजक आहेतच. शिवाय यात माडगूळकरांनी म्हणून अनुभवलेले त्यांचे मित्र, सोबती आणि सहकारी यांच्याबद्दल लिहिलं आहे. यात अनेक दिग्गज मंडळींची नावे आहेत. त्यातील बरीचशी मंडळी साहित्य-कला क्षेत्राशी निगडीत असणं हे स्वाभाविक म्हंटलं पाहिजे. त्यांचे किस्से, अनुभव ह्या गोष्टी रंजकपणे उभ्या केल्या आहेत. त्यांनी केलेल्या अन करूनही चित्रपट पूर्ण तयार होऊ न शकलेल्या कथा यात नमूद केल्या आहेत. हे सगळे अनुभव त्यांनी ‘share’ केले आहेत. आज आपण ब्लॉग किंवा ऑनलाइन सहज पोस्ट करू शकतो तेच माडगूळकरांनी ह्या कथेमधून व्यक्त केलं आहे. फरक फक्त शैलीचा आहे. त्यांची सांगायची कला आपल्याकडे नसल्यानेच आपण माडगूळकर होऊ शकत नाहीत. अजून काय लिहावं समजत नाही. पण वाचाल तर त्यांचे अनुभव नक्कीच उपयोगी पडण्यासारखे आहेत.

WP_20160716_15_11_51_Pro WP_20160716_15_12_29_Pro

माणूस म्हणून जगत असताना आपल्या आयुष्यात अनेक मित्रमंडळी येतात. त्यातील काही जवळची बनतात तर काही फक्त सहकारीच राहतात. ह्या बाबतीत माडगुळकर श्रीमंत असावेत. लेखक #शंकर पाटील, पत्रकार-लेखक #द. मा. मिरासदार,  चित्रकार देऊसकर नंतर संपादक #पु. रा. भिडे यांच्या आठवणी त्यांनी व्यक्त केल्या आहेत. माडगुळकर, शंकर पाटील, मिरासदार यांची जमलेली जोडी, त्यांचं सोबत फिरणं, वेगवेगळे कार्यक्रम करणं यातून घट्ट होणारी मैत्री असे किस्से आपल्याही आयुष्यात घडत असतातच. ते किस्से अन त्या आठवणी उत्तमरीत्या आपल्यापर्यंत पोचवणे हेच खर्‍या लेखकाचं कर्तव्य असतं.

#भल्याची दुनिया नावाचा गोविंद घाणेकर दिग्दर्शित आणि माडगुळकर लिखित चित्रपट १९५५ ला आला होता ही आठवणही त्यांनी जगवली आहे. नंतर #देवाच्या काठीला आवाज नाही ह्या आरिजिनल नावाच्या गोष्टीवर आधारित #मुक्काम पोस्ट ढेबेवाडी नावाचा चांगला सिनेमा आल्याची कथाही चांगली आहे. शेवटची कथा, #रांजणवाडा एक चित्तरकाथा ही कथा वरवर ऐकूनही उत्सुकता जागी होते. माडगुळकर आणि #ग. रा. कामत यांनी सुधीर फडके यांच्यासाठी एक कथा लिहिली होती ती हीच. याचं दिग्दर्शन करणार होते #द. ग. गोडसे करणार होते. ही एक गूढकथा-रहस्यकथा असल्याने तो सगळं प्रकार चांगला होताच. त्यात गोडसे यांनी चित्रपट कसा दिसावा यासाठी त्याची काही चित्रे रेखाटली होती ती येथे दाखवली आहेत. चित्रेही उत्तम आहेत, रांजणवाडा ची कथा आणि ही कथासुद्धा!

एकदा वाचावं असं पुस्तक आहे.

Image result for व्यंकटेश माडगुळकर

व्यंकटेश माडगुळकर यांचं पहिलं पुस्तक वाचण्यात आलं आणि त्यांच्या लिखाणाच्या अन व्यक्तिमत्वाच्या प्रभावात गेलो. पुस्तकी शिक्षण फार नसताना स्वतःच्या अनुभवविश्वातून ते लेखक म्हणून एका उत्तुंग शिखरावर पोचले. अनेक क्षेत्रात अगदी अलगदपणे ते वावरतांना दिसतात. चित्रकला, भटकंती, शिकार या क्षेत्रातही त्यांचा मुक्त वावर होता असं त्यांच्या लेखनातून समजतं. मंनापासून जीवन जगणं म्हणजे काय ते यांच्याकडून शिकावं! अगदी एक एकर शेती घेऊन ते त्यातही समाधान हुडकतात. माणूस म्हणून हळवा असलेला माणूसच इतक्या विविध क्षेत्रात वावरू शकतो.

त्यांचं लेखन तर अप्रतिम! गावाकडील जीवन डोळ्यासमोर उभं राहतं. कुठेही कसला अतिरेक नाही. अनुभवलेलं जीवन त्यांनी विविध कथेंद्वारे मांडलं आहे. त्यांच्या प्रत्येक कथेत मानवी भावना अन त्यांच्या हळव्या मनाचा स्पर्श आढळतो. आजच्या शहरात वाढलेल्या पिढीला जर ग्रामीण जीवन अनुभवायचं असेल तर माडगूळकरांच्या कथा वाचल्याच पाहिजेत. एक salute व्यंकटेश माडगूळकरांना!!!

वाळूचा किल्ला – व्यंकटेश माडगूळकर

वाळूचा किल्ला – व्यंकटेश माडगूळकर

#Valucha Killa – Vyankatesh Madgulkar #मराठीकथा

किल्ला! प्रत्येक किल्ल्याची स्वतःची अशी ओळख असते. स्वतःचं अस्तित्व असतं अन स्वतःचा वेगळेपणा असतो. व्यंकटेश माडगूळकर ह्या लेखकही मराठी साहित्यातील वेगळी ओळख असलेला किल्ला आहे. त्यांची स्वतःची अशी लेखनशैली तर आहेच शिवाय स्वतंत्र असे किस्से आणि कथा आहेत. अशात माडगूळकरांची पुस्तकं वाचायचा नाद लागला आहे. त्यांच्या ‘वावटळ’ ह्या कादंबरीपासून सुरू झालेला हा प्रवास अजून सुरूच आहे. नुकतच त्यांचं ‘वाळूचा किल्ला’ हा कथासंग्रह वाचण्यात आला. त्यातील किस्से अन कथा वाचून एक अनुभवाचे परीघ रुंदावल्याची जाणीव होत आहे. अगदी सामान्यपणे घडणार्‍या घटनांना अन प्रसंगांना त्यांनी शब्दरूपात असं काही मांडलं आहे की माणूस त्या वातावरणात गुंगावतो.

अगदी सुरूवातीला असलेली ‘वाळूचा किल्ला’ ही कथा अतिशय निरागस भावनेतून जन्मलेली आहे. अशा गोष्टी अनेकदा घडत असतात, असे प्रसंग अनेकदा येतात पण त्यावर लिहिणं तेही एका दर्जेदार लिखाण करणं ही निसर्गाची देणगी मानली पाहिजे. लेखकला अशा सुचण्याने त्याचं ‘लेखक’पण अगदी समृद्धतेकडे नेणारं आहे. माडगुळकर यांच्यासारखा अष्टपैलू अन बहुरंगी जाणिवांच्या व्यक्तिमत्वाने लिखाण करण्यासाठीच जन्म घेतला असावा. इतकी स्वतंत्र अन समृद्ध त्यांची लेखणी आहे.

WP_20160707_23_10_02_Pro WP_20160708_00_12_16_Pro

एका बोकडावर लिहिलेली गोष्ट, झू, खारीचे पोर ह्या तर कोणालाही हसू आणणार्‍या आहेत. अश्विन-कार्तिक किंवा ठेप ही कथा मनाला चटका लावणारी. हनुमंता, कमाई ह्या गावरीत अन समाजरीत सांगतात. वेणुगोपाळ जीवनातील न विसरणारे प्रसंग सांगतो. अशा भिन्न-भिन्न प्रकारच्या जाणिवा आणि अनुभव शब्दबद्ध करून वाचकाच्या मनाला भिडतील अशाच आहेत. शेवटी माणसाचं आयुष्य अशाच कटू-गोड आठवणी अन अनुभवांनी परिपूर्ण होत असतं. ते अनुभव लिहितो अन वाचकाला वाचताना अनुभवायला लावतो तोच खरा लेखक. ह्या पातळीवर माडगुळकर सरस आहेतच. अर्थात, त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव अन घटना रंजकपाणे येथे मांडल्या आहेत ज्या आपल्याला त्या काळात अन जगात घेऊन जातात. त्यांच्या लिखाणात येणारे गावाकडचे वैशिष्टपूर्ण शब्द हे आज हरवताना दिसत आहेत. तो काळही आज नाही. आपण आपल्या भाषा अन संस्कृतीपेक्षा बरेच दूर जात आहोत ह्याचं हे लक्षण आहे. बरचशा कथा ह्या ग्रामीण भागाचं रेखाटन करणार्‍या असल्याने शहरातील शिक्षित वाचकांना आणि ज्यांचं बालपण खेड्यात गेलं आहे अशांना अतिशय मोहक वाटतात.

मनातील भावना, आयुष्यातील अनुभव अन वारंवार उफाळणार्‍या जाणिवा ह्या तितक्याच तीव्रपणे कागदावर मांडणे यातच लेखकाची ओळख घडते. पण माडगूळकरांचं लेखन हे अतिशय निसर्गताह उमटलेली प्रतिक्रिया वाटते. त्यात ओढून-ताणून किंवा फार विचार करून कसलातरी आव आणण्याचा प्रयत्न नसतो. शांत नदीचा प्रवाह असतो तशातला हा प्रकार वाटतो.

व्यंकटेश माडगूळकरांच्या अजून एका कलाकृतीला अभिवादन! अप्रतिम आणि संग्रही असावं असं…

BUY HERE IN DISCOUNT

http://dl.flipkart.com/dl/valucha-killa-marathi/p/itmebvbrzy3tzfrg?srno=p_18&pid=RBKEBVBRKMSCBGTD&affid=buchkeabh&al=wEQE9L0IinUxVd%2FCdzcBO8ldugMWZuE7%2BW7da8XnwKR95UyszLzk8D3CDUL0RezqJNQ2UFEMcT0%3D

वावटळ – व्यंकटेश माडगूळकर

वावटळ – व्यंकटेश माडगूळकर

#Vavatal Novel By Vyankatesh Madagulkar #गांधीहत्या आणि दंगली

गांधी हत्या आणि त्यानंतर देशात ब्राम्हणविरोधात उमटलेल्या दंगली. अर्थात ह्या सगळ्या कटू आठवणी देशात एक संक्रमण घडवत होत्या. हे संक्रमण देश पातळीवर अन देशवासीयांच्या मनोविश्वाच्या पातळीवर आक्रोश करत होतं. आजही अधूनमधून ह्या जुन्या जखमांचे घाव निघाले की ती भळभळणारी जखम तीव्र वेदना देऊन जाते. ब्राम्हण कुटुंबात जन्म घेतलेल्या व्यंकटेश माडगूळकर यांच्याही मनावर ह्या वादळाने मोठा हलकल्लोळ माजवला होता. तोच आक्रोश, तीच वेदना अन त्यातून निर्माण झालेल्या भावना व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या ‘वावटळ’ ह्या कादंबरीतून प्रगट केल्या आहेत.

३० जानेवारी १९४८ च्या संध्याकाळी नथुराम गोडसे नामक जातीने ब्राम्हण असणार्‍या व्यक्तीने गांधीहत्या केली अन केवळ देशच नव्हे तर जगाच्या राजकरणाचे अन समाजकारणाचे संदर्भ अन दिशा बदलून टाकल्या. त्या एका घटनेचे पडसाद आजही टोकदारपणे उमटत असतात तर त्यावेळी त्याची तीव्रता काय असेल याची जाणीवच पुरेशी आहे. गांधींना मारणारा, त्यांच्यावर निरघुणपणे गोळ्या झाडणारा नथुराम गोडसे केवळ ब्राम्हण होता म्हणून गेली अनेक दशके-शतके ब्राम्हण समाजावर आकस अन राग धरून असणारे समाज पुढे सरसावले अन सरसकट संपूर्ण ब्राम्हण समाजावर हल्ला करू लागले. त्यात शंकर (कादंबरीतील प्रमुख पात्र) व त्याच्यासारखी केवळ जन्माने ब्राम्हण असणारी कुटुंबेही होरपळून निघतात. ज्याप्रमाणे पारधी समाजाला सरसकट गुन्हेगार ठरवण्याचा प्रकार आहे त्याप्रमाणे ब्राम्हण समाजाला सरसकट दोषी ठरवण्यात आलं. त्यात मग ब्राम्हण समाजावर जुन्या काही गोष्टींमुळे राग धरून असणारे समाज राग काढू लागले. त्यामुळे अनेकांची मने कलुचित झाली. गाव पातळीवर केवळ अविश्वास निवास करू लागला. अनेक वर्षे सुखाने नांदणारे राहणारी विविध समाजातील लोक ह्या दंगळींमुळे दूर झाली. ह्या घटनांत राजकारण्यांनी नेहमीप्रमाणे साधलेलं राजकारण हेही आलच.

शंकर नावाचा तरुण व त्याचा बालमित्र यशवंत शिक्षण-व्यवसाय निमित्ताने पुण्यात राहत असतात आणि ब्राम्हणविरोधी दंगल उसळते. त्यात त्यांचे हाल होऊ लागतात, पण शहरी भाग असल्यामुळे कायदा वगैरे अस्तित्वात असतो अन सुरक्षितता निदान अपेक्षित तर असते. अशा वातावरणात शंकर, यशवंत आणि त्यांचा अजून एक मित्र गोपू गावाकडे असलेल्या कुटुंबाच्या चिंतेने गावाकडे निघतात. वाटेत क्षणाक्षणाला असुरक्षितता वाढत जाते. प्रत्येकाचं संशयाने बघणे, झडती अशा अविश्वासाने त्यांना गावाकडे जावं लागतं. प्रत्येक घटिकेगणिक स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी, कुटुंबाची चिंता अशी त्यांची मनोदशा असते. ही प्रत्येक अविश्वासची घटना तिघांची मने कलुचित करत जातात. केवळ जातीने ब्राम्हण म्हणून अशा हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत याची त्यांना खंत वाटत जाते. आजवर आपले पूर्वज इतर जातींशी ज्या प्रकारे वागलो त्याचा राग आज आपल्यावर निघत आहे याची सल त्यांच्या मनात असते. झुंडीने येणारा जमाव कधी आपल्याला गाठेल किंवा तोच जमाव आपल्या गावाकडील घराची अन कुटुंबाची काय अवस्था करेल अशा विचारांनीच ह्या तरुणांचं मन दाटून आलेलं असतं. रडणं, निराश होणं, घाबरणं, अविश्वास, नकारात्मकता, अस्थिरता अशा गोष्टींमुळे मनात वावटळ उभं राहत असतं. देशात आलेल्या वादळाने आणि त्याचे गावापर्यंत उमटणार्‍या पडसादाने मनातील वावटळे अधिक गहिरी आणि गडद होत जातात.

घरी पोचल्यावर जळालेली घरं-दारं, उघड्यावर आलेली कुटुंबे बघून तीनही तरुण हतबल होतात. गावातील वैयक्तिक हेवेदावे लक्षात ठेऊन गावातील लोकांनीच गावाबाहेरच्या हल्लेखोर लोकांना, जमावाला ब्राम्हणाची घरे दाखवली जाणं ह्यामुळे अविश्वासच्या दर्‍या अधिक रुंदावत जातात. अशा प्रसंगात निवडक लोकांनी केलेली मदत हीच केवळ समाधानाची बाब!!! घरात चहा बनवायलाही पातेलं शिल्लक नाही, लुटारूंनी जाणीवपूर्वक केलेली लुबाडणूक यावर येणारा प्रचंड राग मुठ्या आवळून सहन करावा लागत असल्याचं दुखं. डोळ्यासमोर जळणारं घर, इतके वर्ष सोवळ्यात जपलेली देव रामोश्याच्या घरात ठेवण्याची वेळ येणं यातून होणारा मनस्ताप, हतबलता, निरुपद्रवी राग हे सगळं असह्य होत जातं. आपआपल्या घराची आस लागून असलेल्या तरुणांना आडवाटेने जाताना गावांवर दिसणारा जळनाचा धूर अधिकच चिंताग्रस्त करत जातो. अशा वेळेस विविध लोकांकडून येणार्‍या बातम्या खर्‍या की खोट्या याबाबतीततील असमंजस मानवी हतबलता, मानवी मर्यादा यांचं दर्शन घडवत जातं. गाडीतून उतरल्यावर एका अनोळखी गावात घुसण्याचं धाडस, तेथे माणुसकीचं न घडणारं दर्शन, त्यात बालपणीचा न्हावी मित्र मदतीला धावून येणं, जातीतील अंतर वाढलं असेल तरी मैत्रितील ओलावा दाखवून देतं!!!

                                       वावटळ      WP_20160321_14_37_16_Pro     WP_20160321_14_37_26_Pro

शंकर, यशवंत ही साधी कुटुंबे तर असल्या वावटळीत निरर्थक होरपळून निघतात. शंकरचे वडील, किंवा कुटुंब ज्यांनी उभी हयात कधी अध्यात-मध्यात केलं नाही, गावकर्‍यांच्या विश्वासावर जगलेलं आयुष्य आणि दंगलीच्या वेळी कोणीही मदतीला न येणं यामुळे ते खचतात, मनात नकळत एक अढी पडते. शेवटी एका उद्विग्न मनाने त्यांना अविश्वासापायी आपलं हक्काचं घर, जन्माचं गाव सोडून जावं लागतं. त्यांचा शेवट तिकडेच होतो. त्यांना गावातून जाऊ न देण्यासाठी आटापिटा करणारी निवडक मंडळी, डोळ्यात येणारं पाणी ह्या गोष्टींना कसलेही अर्थ उरत नाहीत.

जेंव्हा कादंबरीचा शेवट होतो, मन हेलकावे खाऊ लागतं. दुभंगलेल्या मनाला फुंकर घालणं अशक्य असतं. विश्वास तुटल्यावर कुठल्याच गोष्टीला अर्थ उरत नाही. उदास वाटू लागतं. ज्या घरात हयात गेली, तेथेच माती पडावी असं वाटत असतं आणि अचानक ते घरकुल डोळ्यासमोर जळू लागतं… केवळ घर जळत नसतं… आठवणी, स्पर्श, आत्मा विरून गेल्यासारखं वाटतं…

केवळ एक घटना एक वावटळ घेऊन येते अन सर्व उध्वस्त करून जाते. माणूस मनापासून दुखावला अन दुरावला जातो. त्याच्या तुटलेल्या तारा जुळणे याला कुठलेही मार्ग दिसत नाहीत. जातीवरून होणारे अत्याचार हे इतिहासात सर्वच समाजावर उमटलेले आहेत, त्याची धग प्रत्येक समाजाला सोसावी लागली आहे. फक्त उच्चवर्णीय म्हणून ह्या मोठ्या अत्याचारावर कुठे फार बोललं जात नाहीत. गावातील एक म्हातारा म्हणतो, ब्राम्हण समाज कधीच संपणार अन दबणार नाही, तो पुन्हा वर येईल अन वर्चस्व स्थापित करेल, ते भविष्यात होतंही, पण यातून झळकते ती जातीय अस्मिता!!!

काहीच दिवसांपूर्वी भालचंद्र नेमाडे लिखित ‘झूल’ ही कादंबरी वाचली ज्यात जवळजवळ ब्राम्हणविरोधी भूमिका मांडण्यात आल्या होत्या. त्या एका दृष्टीकोणातून योग्य असूही शकतात. प्रत्येकाची एक बाजू असते, पण तीच ब्रम्हसत्य आहे असं म्हणता येत नाही. जात कुठलीही खराब नसते, खराब असते ती परिस्थिती! परिस्थितीनुसार माणूस निर्णय घेत जातो आणि एक घटना घडते; चांगली किंवा दुर्दैवी!!

तो काळ, त्या दंगली, ती जाळपोळ लेखकाच्या मनात खोलवर रूतलेला आहे ज्याला तो ह्या कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त करतो. कादंबरीतील प्रत्येक प्रसंग काळजाला एक-एक अश्रु वाहून लिहिला गेला असल्याचं जाणवत राहतं. वाचताना श्वास रोखला जातो, इतर कुठलच भान राहत नाही. प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. घर जळताना, तिघा तरुणांची झडती घेताना, तिघा तरुणांना गाडीतून उतरवताना, ब्राम्हण समाजातील लोकांना बघून इतर लोकांचे शाब्दिक बाण ह्या सर्व गोष्टींशी, घटनांशी आपण समरस होत जातो. कादंबरीत कुठेही बडेजाव, अतिरेक वगैरे जाणवत नाही, उलट लेखकाच्या मनातील व्यक्त होत खदखद थेटपणे भिडते.

#माझंमत

गांधीहत्या झाली अन राष्ट्रपिता संपला!!! त्याचे विचार आहेत असं म्हणतात, पण १९४८ च्या ब्राम्हणविरोधी दंगली ते आजवर होत असलेल्या दंगली यात गांधी नेहमीच हरत आला आहे. गांधींचे तत्वज्ञान केवळ बोलायच्या अन पुस्तकातील पानांच्या कामाचे शिल्लक आहेत, आचरणात-व्यवहारात ते पराभूत होत असतात असं दिसून येतं.

एका वाक्यात सांगायचं तर ‘वाचलीच पाहिजे’ अशी ही कादंबरी!!!

झूल – भालचंद्र नेमाडे

झूल – भालचंद्र नेमाडे

#Zool- Marathi Novel by Bhalachandra Nemade #चांगदेवचतुष्टय भाग ४  }{   मराठी साहित्य  }{ वाचावे असे काही }{ #पुस्तकप्रेमी

भालचंद्र नेमाडे अर्थात साहित्य क्षेत्रातील एक समृद्ध अडगळ! कोसला ह्या स्वतंत्र अभिरुचीसंपन्न असणार्‍या कादंबरीपासून सुरू केलेला प्रवास उत्तरोत्तर अधिकाधिक एका अस्थिर पण जाणिवेच्या शिखरावर जाताना दिसतो. साहित्य क्षेत्रातील नेहमीच्या पाऊलखुणा पुसून त्यांनी स्वतःची अशी संपन्नतेकडे नेणारी वेगळी ओळख जपली. नेहमीच्या कादंबरीचे नियम बाजूला ठेऊन वाचकांशी थेट संवाद साधायची शैली हीच कदाचित त्यांच्या वेगळेपणाची ओळख असेल. माणसाच्या भावामनात उमटणार्‍या शंका आणि विविध वावटळे याची ओळख आपल्याला त्यांच्या लिखाणातून होत असते. कोसला, झूल, बिढार, हुल अशा स्वतंत्र अस्तित्व असणार्‍या अस्सल मराठी मातीतील शब्द हे त्यांच्या कादंबरीचे शीर्षक होतात तेथूनच वाचक वेगळ्याच मानसिकतेत प्रवेश पावतो.

नेमाडेंची ‘झूल’ ही कादंबरी वाचण्यात आली. चांगदेव पाटील, एक तिशीतील तरुण प्राध्यापक एका नवीन शहरात स्वतःचं निरर्थक आयुष्य घेऊन येतो. तेथे त्याची ओळख होते विचारांशी संसार असणार्‍या इतर प्राध्यापक मंडळींशी. भोळे, चिपळूणकर, चांगला देशपांडे, देसाई वगैरे मंडळी ही त्याच्या आयुष्यात एक भाग म्हणून वावरू लागतात. कादंबरीत अमरावती शहरातील पुराणिक नावच्या महाविद्यालयात ही मंडळी प्राध्यापकी करत असतात. पुराणिक हे ब्राम्हण पुढार्‍यांची सत्ता असलेलं ठिकाण. त्यात हे सगळे समानता वगैरे विचारांचे. ह्या लोकांचा संस्थेवरील ब्राम्हण मंडळींशी वैचारिक संघर्ष असतो. चांगदेव मग ह्या सगळ्यात एक भाग म्हणून जगू लागतो. स्वतःच्या पूर्वष्यातील घटना विसरून तो येथे नव्याने जगू लागतो. जगण्याला मार्ग सापडतो पण दिशा नसते. निरर्थक आयुष्य सुरूच राहतं.

जातीने धनगर असलेले भोळे, चांगला देशपांडे, संस्थाचलक माठुराम, ठोसरे, भल्ला, छोटा मेंदू मोठा आणि मोठा मेंदू छोटा असलेलं देशपांडे, कुलकर्णी ला कुकर्णी वगैरे आडंनावांचा वापर म्हणजे नेमाडे यांच्या कौतुक करायला मिळालेली संधीच.

कादंबरीत जातींचा थेट उल्लेख आहे. त्याहूनही पुढे जायचं म्हणजे, यात ब्राम्हण समाजाला नकारात्मक दृष्टीकोणातून दाखवण्यात आलं आहे. धनगर असलेला भोळे हा भिडस्त अन तापट दाखवण्यात आला आहे. तोच विरोधी पक्षनेता असतो. चांगदेव त्यातल्या त्यात तटस्थ असतो असं दिसतं. किंबहुना तो ह्या सगळ्यात पडू इच्छित नसतो. कादंबरीत जातीयता हाच मुख्य विषय असला आणि तसं टोकदार लिखाण असलं तरी त्यातून द्वेष किंवा तिटकारा दिसून येत नाही. ह्यात दोन्ही बाजूचा दृष्टीकोण दाखवण्यात थोडी काटकसर केली आहे. मुलं-मुलं बसल्यावर कॉलेज, प्रिन्सिपल वगैरेंच्या कुचाळक्या जशा करतात त्यातलाच प्रकार यात दिसतो. चार स्त्रिया एकत्र जमा झाल्या की उणे-दुणे सुरू होतात असं म्हणतात, पण पुरुषांच्या बाबतीतही ह्यात फार फरक पडत नसतो. विरोधी गट जमा होतो आणि सत्ताधारी गटाला नावं ठेऊ लागतो तो प्रकार येथे सर्रास दाखवण्यात आला आहे. कादंबरीतील प्रत्येकजण स्वतःला योग्य जागेवर उभा आहे असं समजून बोलत असतो; खर्‍या जीवनातही आपण असेच वागत असतो, आणि हीच कादंबरीची जमेची बाजू आहे. Realistic लिखाण. उगाच अलंकारिक शब्दात पात्रांना अडकवण्याचा प्रयत्न लेखक करत नाही. तुम्ही आम्ही चार-चौघात बोलतो ते विषय, तीच भाषा आणि तोच वात्रटपणा!!!

 

BUY “ZOOL” OF BHALCHANDR NEMADE ON FLIPKART WITH DISCOUNT
भारतात जातीयता नसून ती मनमानात भिनून बसली आहे. जातीला जातीविषयी विश्वास नसतो आणि स्वतःच्या जातीविषय विनाकारण अभिमान असतो. कादंबरीत एक वाक्य आहे, उद्या जर महारांचं राज्य आलं तर निम्मे ब्राम्हण स्वतःला महार म्हणून घेतील! खरं तर यात वास्तव आहे. स्वतःला सत्तेजवळ जाता यावं म्हणून लालची लोक असतातच. त्याला जातीचे संदर्भ नसतात. मानवी स्वभाव असतात. ह्यातूनच जातीयता वाढली आणि टिकली. सत्तेत असणारा वर्ग ह्या न त्या कारणाने स्वतःची सत्ता टिकवतो ज्यात समाजाचं हित अहित फार लक्षात घेतलं जात नाही. कालही तेच होतं, आजही तेच आहे आणि उद्याही तेच राहणार! काल जातीचे संदर्भ होते, आज लोकशाही/हुकुमशाही वगैरेंचे आहेत उद्या ज्ञानाचे असणार?

 

BUY OTHER BOOKS OF BHALCHANDR NEMADE ON FLIPKART WITH DISCOUNT

कादंबरीचा बाज ‘नेमाड’पंथी आहे. सहज, साधी बोली भाषा हे नेमाडेंच्या लिखाणाचं वैशिष्ट. चार मित्र जमल्यावर जे जे विषय चर्चा करतात ते ते ह्यात त्या चौकडीच्या तोंडी आहेत. नेमाडे स्वतःच्या आयुष्यात जेथे व्यक्त होऊ शकले नाहीत आणि जेथे व्यक्त झाले त्या घटना येथे असतील असा माझा अंदाज आहे. अगदी जातीयता, स्त्रिया, हस्तमैथुन आणि काय काय… बाकी मजा तर कादंबरीत आहेतच… कादंबरीत अनेक ठिकाणी अश्लील वाटू शकतं असं लिखाण आहे. चुळबुळे आणि गोगटे हा किस्सा तर कहर आहे. पोफळे बंगल्यातील गमतीजमती, त्याच्या तरुण मुली हे किस्से अनेकन तरुणांच्या आयुष्यात येऊन गेलेले असतात. आदर्शवादी जीवन जगणार्‍या भोळे सरांना लेख-पुस्तक वगैरे लिहिण्यासाठी स्वतःच्या बायका-मुलांना माहेरी पाठवावं लागतं, चिपलुंनकरला गोरी आणि सुंदर मुलगीच बायको म्हणून पाहिजे असते, देसायाला कोड फुटलेला असल्याने तो मनातल्या मनात न्युंनगंड घेऊन जगत असतो असे प्रत्येकाचे प्रश्न असतात. असे प्रश्न जे तुमच्या आमच्या आयुष्यात असतातच. ह्या सगळ्या पसार्‍यात चांगदेव पाटीलही एक असतो. त्याला एक आजार असतो जो त्याचं जीवन नीरस करायला पुरेसा असतो. ह्या सगळ्या दुष्काळात टुरिस्ट हॉटेल वर राहणारी समवयीन राजेश्वरी ही त्याच्या आयुष्यातील हिरवळ! तिच्यासोबत चांगला वेळ जातो हे माहीत असूनही तिच्याशी भेटता न येणं याची असलेली खंत. जगायला काय अर्थ आहे असा प्रश्न प्रत्येकालाच असतो, पण प्रत्येकजण त्याला एक उत्तर शोधून स्वतःच्या मनाचं समाधान करून घेत असतो आणि येईल ते आयुष्य जगत असतो. इतरांना दोष देणं, निराशा, पैसा, समाधान, लैंगिगता वगैरे ह्यातील बाबी अनेकांच्या आयुष्यात असतात; चांगला-वाईट किंवा असेल तसा माणूस आपआपल्या मार्गाने जीवन जगत असतो. मृत्यू हे अंतिम सत्य माहीत असलं तरी निरर्थक मृगजळात जाणीवपूर्वक अडकवून घेऊन तो जीवनाला शेवटच्या सत्यापर्यंत पोचवत असतो. चांगदेवही त्याच प्रयत्नात असतो.

WP_20160227_01_23_23_Proकादंबरीत कोठेही झाकलेपणा जाणवत नाही. जे आहे ते बोलण्यातील स्पष्टपणा असतो त्याप्रमाणे स्पष्टपणे मनाला भिडत जातं असं लिखाण आहे. तसं पाहता कादंबरी म्हणजे जीवनातील प्रसंगांचं वर्णन असतं. सर्वांचं आयुष्य सारखं नसलं तरी प्रत्येकाला एक मन असतं ज्यात स्वतंत्र भावनांचा कल्लोळ चालू असतो. आयुष्यात असे टप्पे अनेक येतात जे कधीच संपू नयेत असं वाटतात. पण भविष्यात त्या टप्प्याकडे बघितलं तर तेथेच आयुष्याची सर्वाधिक कसोटी लागलेली असते आणि तेथेच जीवनाला अर्थ मिळालेला असतो. भोळे सरांची भेट जेंव्हा जुन्या वर्गमैत्रिणीशी होते आणि तिचा नवरा एक सरकारी अधिकारी आहे. त्याची संपत्ती, वैभव पाहून स्वतःच्या आदर्शांचं पीक निरर्थक वाटू लागतं. जेंव्हा माणसाकडे समोरच्याला सांगण्यासारखं काही नसतं तेंव्हा जीवनातील रंग निघून जाऊ लागतो, म्हणून सांगण्यासारखं काहीतरी हुडकण्यात धन्यता मानणारा माणूस असतो. प्रत्येकाच्या प्राथमिकता ठरलेल्या असतात. कोणी दूसरा त्याला काय समजेल हे अलाहिजा. ब्राम्हण संस्थाचालक यांना नावे ठेवणारी मंडळीमध्ये ब्राम्हणही असतातच. त्यात सत्तेची फळे चाखता यावी म्हणून ईकडून तिकडे जाणारी लोकही असतात. चार बहीणींची लग्ने असतात म्हणून नेहमी दबून राहणारा देशपांडेही समोर येईल ते सहन करत दिवस काढत असतो. उपकुलगुरूपद मिळावं म्हणून राज्याच्या सरकारला अडचणीत असणारे माठुराम आणि त्यांचे समर्थकही असतात. कादंबरीत ब्राम्हण वृत्तीला दोष देण्यात आला आहे. अर्थात तो एका बाजूच्या दृष्टीकोणातून केलेली समीक्षा आहे. प्रत्येकाला एक बाजू असते. ती चूक की बरोबर कोण ठरवणार?

शैक्षणिक संस्था, विद्यापीठे ही राजकारण्यांची अन राजकारणाची अड्डे आहेत ही जुनीच परंपरा आहे आजची नव्हे हे ह्या कादंबरीतून अधोरेखित होतं. तरुणांना राजकारणासाठी वापरलं जातं हेही जुनंच सत्य आहे. शिक्षण कमी आणि भानगडी जास्त अशी विद्यालये, महाविद्यालये आपल्याकडे कमी नाहीत, त्याचं उदाहरण म्हणजे कादंबरीतील घटना.

नेमाडेंची शैली, कथेचा जिवंतपणा, स्वतःच्या जीवनातील काही प्रसंगाशी समरस होण्यासाठी असेल किंवा मनाच्या गाभर्‍यातील जाणिवेला वाट करून देण्यासाठी असेल. अस्सल अभिरुचिसंपन्न साहित्य. एकदा ही कादंबरी वाचलीच पाहिजे.

 

भालचंद्र नेमाडे: साहित्य क्षेत्रातील एक समृद्ध अडगळ!

बिढार – भालचंद्र नेमाडे

वाचा संपूर्ण चांगदेव चतुष्टय:-

लेखनशैली म्हणजे काय???

लेखनशैली म्हणजे काय???

घटना:-> दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला.

-> ही बातमी विस्ताराने लिहा.

नवकथा

मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला.  तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.

 

नवकविता

स्टेशनसमोरची रंगहीन टपरी

पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी

अंग चोरून पडलेली

वडे तळणाऱ्या माणसाच्या

कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब

ठिबकतायत

पुढ्यातल्या कढईत

टप टप टप

येतोय आवाज

चुरर्र चुर्र

ही खरी घामाची कमाई

पुढ्यातल्या

टवका गेलेल्या बशीतला

वडा-पाव खाताना

त्याच्या मनात येउन गेलं

उगाचच

 

ललित

दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.

.

‘वडा-पाव द्या हो एक’ मी म्हटलं.

.

‘एक का, चार घ्या की’, मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा!

 

शामची आई व्हर्जन

‘शाम, बाळ खा हो तो वडा-पाव’, पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, ‘अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!’

 

जी ए  कुलकर्णी व्हर्जन

रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या  मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.

 

गो. नि. दांडेकर व्हर्जन

हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, ‘आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो’. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?

 

ग्रेस व्हर्जन

विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव  खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!

 

Source:- WhatsApp

Prophecy In ‘Sankraman’ = Today’s Indian Share Market

Prophecy In ‘Sankraman’ = Today’s Indian Share Market

आज शेयर बाजाराकडे जर नजर फिरवली तर लाल निशाण आपल्या नजरेत मुक्काम केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय शेयर बाजार हा पडझडीचे रोज नवे विक्रम बनवत आहे. अनेक बड्या अन नामांकित कंपन्या ह्या त्यांच्या वार्षिक नीचांकावर जाऊन पोचल्या आहेत. बँकिंग सेक्टरची परिस्थिती तर आयसीयू मध्ये असलेल्या म्हातार्‍या रुग्णाप्रमाणे झाली आहे. रोज स्थिती खालावत आहे.

जागतिक अर्थव्यवस्था, चिनी चाल, क्रूड ऑइल, चलन अवमूल्यन, दुष्काळ ह्या सगळ्या पडणार्‍या शेयर बाजाराला कारणीभूत आहेत. त्यात जीएसटी, भूसंपादण यांसारखी अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी विधेयकं संसदेत पास होत नाहीयेत. त्यात मग केंद्र सरकार अर्थात मोदी यांच्याकडून हवी असलेली दिशा अन प्रगतीचा वेग उद्योग व सामान्य जगताला दिसत नाहीये. सत्ताधारी पक्षाने, राजकीय परिस्थिती हातात आहे असं भासवण्याचा प्रयत्न कितीजरी केला तरी तशी परिस्थिती नाहीये हे नक्की.

#संक्रमण या कादंबरीत आजच्या परिस्थितीचं अचूक वर्णन

सध्या देशात आर्थिक, सामाजिक अन राजकीय क्षेत्रात ज्या घडामोडी होत आहेत त्या, जवळजवळ वर्षभरापूर्वीच आमच्या एक लेखक मित्राने त्या एका कादंबरी रूपात बांधल्या आहेत.

“संक्रमण” नावाच्या कादंबरीत अभिषेक बुचके या लेखकाने सध्याच्या परिस्थितीशी साधर्म्य असणारी एक गोष्ट सांगितली आहे. त्यात मग राजकीय परिस्थिती, शेयर बाजार, शेती अन इतर सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. केतन नावाचा तरुण शेयर बाजाराच्या चक्रात अडकून दलदलीत खेचला जातो. शेयर बाजारही देशातील राजकीय परिस्थितीनुसार गटांगळ्या खात असतो. श्रीपाद नावाचा एक तरुण शेतकरीही ह्या सगळ्या प्रक्रियेतून तावून-सुलाखून निघत असतो. कादंबरीतील अनेक संदर्भ, घटना ह्या आजच्या चालू काळातील वाटतात.

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4906663093036979620?BookName=Sankraman

BookGanga.com

होरपळ – कथासंग्रह – प्रदीप पाटील

होरपळ – कथासंग्रह – प्रदीप पाटील

#Horapal – Marathi Book by Pradip Patil

नुकतंच प्रदीप पाटील लिखित होरपळ हा कथासंग्रह वाचण्यात आला. ग्रामीण अन कृषिजीवन यांच्यावर आधारित सर्व कथा आहेत. कृषी अन शेतकरी यांच्याशी संबंधित कथा आहेत म्हणजे ती व्यथा असणार यात काही नवीन सांगायला नाही; कारण ग्रामीण अन कृषी जीवनात व्यथेशिवाय सांगण्यासारखं काहीच नाही. असो.

लेखकाची लिखाणाची एक स्वतंत्र शैली आहे. कथा वाचायला सुरू केल्यावर ती संपेपर्यंत वाचक गुंतून राहतो. पुस्तकाचं वैशिष्ट म्हणजे कथेत एक जीव आहे, लय आहे. लेखकाने ग्रामीण भागातील जीवनाचं चांगलं वर्णन केलं आहे. ग्रामीण राहणीमान, ग्रामीण बोली-भाषा, तो बाज, तो स्वभाव लेखकाने चांगला टिपला आहे. आपल्या गावांत ना-ना तर्‍हेचे लोक राहतात; चांगले, वाईट, स्वार्थी, कपटी, प्रेमळ, विश्वासू, मदतगार, लोभी, आगलावे अशा आतरट स्वभावाचे लोक असतात हे यातील विविध कथांमधून समोर येतं. फक्त काही ठिकाणी जरा अति झालं आहे असं वाटतं. एखाद्या प्रसंगात किंवा संकटात कोण कसं वागेल याचा अंदाज नसतो, तेथे थोडीशी अतिशयोक्ति केल्याप्रमाणे वाटते.

कथेमध्ये ग्रामीण भागातील सर्वच लोक कसे साधे, बिचारे, गरीब आहेत असं सांगितलं नसून चूक-बरोबर असे व्यक्तिमत्व असतात हे कठोरपणे अधोरेखित केलं आहे. गावचे पाटील, त्यांच्या मुलाचं लग्न, त्यात अंथरुणापेक्षा पाय मोठे पसरल्यावर उघडं पडणे हे तर आजच्या काळातील प्रखर उदाहरण आहे. स्वतःकडे असलेल्या संपत्तीपेक्षा जास्त बडेजाव करण्यात गावातील घराणी भिकेला लागली हे सत्य नाकारून चालणार नाही.

पहिल्याच कथेमध्ये एका शिकलेल्या माणसाची शेती कशी असते हे सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो अगदी वास्तव आहे. ते एकमेव सत्य उदाहरण नाही म्हणा. शिकलेले कितीतरी लोक गावात जाऊन यशस्वीपणे शेती करत आहेत अशीही अनेक उदाहरणे आहेत. चुकणारा चुकायचा तेथे चुकतोच अन सुधारणारा सुधारतोच!

खतासाठी शेतकर्‍याची होणारी वणवण असेल ही खरी व्यथा आहे. शेतकर्‍याला प्रत्येक पावलावर झगडावं लागतं ही गोष्ट खरी आहे. पण प्रत्येक गोष्टीला पर्याय असतात. सरकारवर अवलंबून राहून कुठलीही मोहीम तडीस जात नाही हे सत्य आहे. खत म्हणाल तर ते गावात तयार येऊ शकतं. यात अनेक अडचणी आहेत तेही खरं; मात्र लेखकाने असे पर्याय असलेली कथा सांगितली असती तर आनंद झाला असता.

गावातल्या म्हातारीची एका पलंगासाठी गावातल्याच माणसाने केलेली फसवणूक ही गावातही अमानवी जीव राहतात असच सांगते. गावात काही सगळेच चांगले असतात अन ते एकमेकांची फसवणूक करत नाहीत, त्यांनाच माणुसकी असते अशातला काही भाग नाही. तेथेही माणसासारखे माणसे असतात जी चुकतही असतात.

आज गावातील शेतकरी तरुणांचे लग्न होत नाहीत ही मोठी कर्मकठिण समस्या आहे. आपला नवरा शेतकरी असावा असं कोणत्याही मुलीला वाटत नाही इथवर आपला समाज गेला आहे. भलेही कमी पगाराची असो, पण मुलाला नौकारीच असावी असं प्रत्येक मुलीला अन तिच्या बापाला वाटतं. अर्थात, आजची शेतकरी अन ग्रामीण भागातील परिस्थितीच याला जबाबदार आहे. शेती असलेला नवरा चालतो, पण शेतकरी नवरा नको’ अशी वाक्ये उगाच जन्म घेत नाहीत. यावर आधारित तरुणाची अन त्याच्या सधन बापाची कथा मनाला चटका जाते.

होरपळ
होरपळ

गावातील लोक राजकारण हा विषय म्हणला की कशी पेटून उठतात यावर एक चांगली कथा आहे. गावाच्या भल्यापेक्षा राजकारण अन त्यात येणारे अहंकार, मोठेपणा वगैरे गोष्टींवर गावात जास्त वेळ वाया जातो हे आपलं दुर्दैव आहे. खेड्यापाड्यात सहकाराच्या किंवा इतर प्रकारच्या निवडणुकीतून ज्या प्रकारचं राजकारण पोचलं आहे ते खिन्न करून टाकणारी गोष्ट आहे.

अशा अनेक कथा लेखकाने सांगितल्या आहेत. कुठे-कुठे सत्य परिस्थिती आहे तर कुठे थोडीशी अतिशयोक्ति आहे. लेखक एका विशिष्ट विचारसरणीचा आहे किवा तसा त्याच्यावर पगडा आहे हे प्रत्येक कथा वाचताना जाणवत राहतं. लेखकाची स्वतःची अशी वैयक्तिक मतं आहेत ज्या दृष्टिकोनातून तो सर्व ग्रामीण भागाकडे पाहत आहे असं वाटत राहतं. अर्थात, गावकर्‍यांना जेथे कानपिचक्या द्यायच्या आहेत तेथे त्या देण्यात आल्या आहेत यात वाद नाही. नेहमीच शेतकरी-गावकरी सोडून इतर सर्व चुकीचे असं न म्हणण्याचं शहाणपण नक्कीच आहे ह्या कथांमध्ये.आजवर अशा आशयाच्या अनेक कथा-कादंबर्‍या येऊन गेल्या आहेत, त्यात ही कादंबरी थोड्या-फार प्रमाणात वेगळी नक्कीच आहे. कथेत किंवा लेखनशैलीत थोडसं वैविध्य असलं तरी त्याच-त्याच व्यथा आहेत. शेळी जाते जिवानिशी अन खाणारा म्हणतो वातड कशी? अशातील ही गत आहे. तेच तेच अन कित्येक वर्षांपासून न सुटणारे प्रश्न पाहून माणूस कंटाळतो; भोगणारा आत्महत्या करून निकाल लावतो तर वाचणारा पान किंवा चॅनल बदलून किंवा डोळे-कान मिटून घेऊन शांत राहतो. लेखक नांदेड व परिसरातील असल्याने भाषा-प्रदेश व इतर गोष्टी तेथीलच आहेत. ही कथांची पार्श्वभूमी आहे.

गावातील माणूस नियोजनात, शिक्षणात, बदलत्या काळानुसार बदलण्याच्या गणितात कमी पडतो आहे.   सांगायचं झालं तर तेच-तेच सांगावं लागेल. असो.

कथासंग्रह एकदा वाचण्यासारखा नक्कीच आहे एवढच सांगतो.

error: Content is protected !!