Category: Script

अनामिक – लघुपट

अनामिक – लघुपट

#मराठी #लघुकथा || #लघुपट  ||#ShortStory  || कथा-पटकथा  || #Script  || #Screenplay  ||  Short Film

Marathi Short Film Script For Sale  || मराठी लघुकथा विकणे आहे || Screenplay Script For Free Sale

Format Of Marathi Script ||  Screenplay Format  || How To Write Script In Format  || Concept For Short Film

संपर्क – latenightedition.in    ||  Copyright ID – 106203117489

[[[[महत्वाची सूचना – सदरील कथा ही एका लघुपटाची कथा आहे. ही पटकथा अभिषेक बुचके ह्या लेखकाच्या नावाने रजिस्टर करून त्याचे copyright घेण्यात आलेले आहेत. ही कथा विकण्यास जरी उपलब्ध असली तरी लेखकाच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करणे copyright कायद्याचे उल्लंघन ठरेल आणि वापरकर्ता कारवाईस पात्र असेल. त्यामुळे कलात्मकतेचा मान राखत कोणीही सदरील गोष्ट/कथा/पटकथा/संकल्पना लेखकाच्या परवानगीशिवाय वापरू नये. धन्यवाद!]]]]

अनामिक – लघुपट

लेखक – अभिषेक बुचके

दुपारचे चार वगैरे वाजलेले असतात. रस्त्यावरती एका लहानशा वळणावर पिवळ्या रंगाची एक शाळेची बस बाजूला थांबते. त्यातून शाळेच्या दहा-बारा वर्षांच्या काही मुली उतरून जात असतात. अंगावर शाळेचा निळा-पांढरा फ्रॉक, पाठीवर बॅग अन हातात पिशवी असा टिपिकल पेहराव असतो. अनुजाही त्यांच्यापैकी एक असते.

अनुजा पाचवी-सहावीत शिकणारी साधारण मुलगी. आपल्या आई-बाबासोबत राहणारी. एकुलती एक असल्याने जराशी लाडवलेली अन comfort zone मध्ये वावरणारी.

अनुजा गाडीतून उतरून तिच्या मैत्रिणीसोबत घराकडे जात असते. रस्त्यावरून वाहनं येत-जात असतात. नेहमीप्रमाणे चालणार्‍यांची अन दुचाकीस्वारांची गर्दी असते रस्त्यावर. त्यातून मार्ग काढून त्या दोघी लक्षपूर्वक मार्ग काढत घराकडे जात असतात. मुख्य रस्त्यापासून जरासं खाली अनुजाचं घर असतं. आतल्या रस्त्यावर गेल्यावर जरा शांतता असते अन गोंगाट कमी झाल्याने अनुजा अन तिची मैत्रीण बोलू लागतात.

अनुजाची मैत्रीण – ए अनुजा आपण आज हत्ती बागेत जायचं? नवीन ससे आलेत तिथे, माहिती का? तू तुझ्या बाबांना घेऊन ये मीही येते.

अनुजा – नाही गं, बाबा कामासाठी दुसर्‍या गावाला गेले आहेत. आता रविवारीच येतील.

अनुजाची मैत्रीण – शे यार… नाहीतर मम्मीसोबत जाऊयात का? मी विचारते माझ्याही मम्मीला?

अनुजा – नको गं, आई म्हणते मार्चची कामे चालू आहेत. तिला घरी यायलाही उशीर होतो हल्ली… तू ये जाऊन. आपण जाऊ नंतर कधीतरी…

अनुजाची मैत्रीण – हं… अनू… म्हणजे तुझी आई येईपर्यंत तू एकटीच असतेस घरी?

अनुजा – हो… का गं?

आजुबाजुने लोक जात येत असतात. वाटेत एक काकू भेटतात. त्या अनुजाला विचारतात, काय पोरींनों, सुटली का शाळा?

हो काकू, दोघीही उत्तरतात.

अनुजा विषय पुढे नेते – एकटीच असते का गं??

अनुजाची मैत्रीण थट्टा करत, हातवारे करत म्हणते – बापरे… नीट रहा बरं… नाहीतर बुगीमॅन येईल… लहान मुलं एकटं असतानाच येतो म्हणे तो… हाहाहा!

अनुजाचा चेहरा जरासा उतरतो पण तरीही ते लपवत ती म्हणते – मी नाही घाबरत कोणाला… आणि शेजारच्या वेलनकर आजी असतात लक्ष ठेवायला…

अनुजाची मैत्रीण हसत – हाहीहू!! मी तर मस्करी करत होते, तुझा चेहरा तर बघ कसा झालाय… हाहाहा… भित्री कुठली… आणि त्या वेलनकर आजी एकट्याच असतात… तुला आठवतं न मागे मनाली काय म्हणाली होती त्यांच्याबद्धल…? ती म्हातार्‍या हडळीची गोष्ट आठवते न??? लहान मुलांना खाऊन जीवंत राहणारी…

अनुजा – तसं काही नसतं ह… जा घरी आता! नाहीतरी तुझी मम्मी फोडून काढेल उशीर झाला म्हणून….

बाय बाय

दोघींची घरं वेगवेगळ्या गल्लीत असतात. त्या एकमेकींचा निरोप घेऊन तेथून पुढे एकट्या जातात.

SCREENPLAY

SCENE1:

INT. घर – संध्याकाळ 5 pm

एक 10-12 वर्षांची शाळकरी मुलगी (पाठीवर बॅग, अंगात शाळेचा ड्रेस अन हातात बॅग) पायर्‍यांवरून चालत येते अन एका घराच्या दरवाजाचं कुलूप काढून आत जाते अन दरवाजा लाऊन घेते.

Continue:

ती मुलगी आतल्या खोलीत जाऊन बॅग ठेवते, कपडे वगैरे बदलून बाहेर हॉलमध्ये येते. हॉलची खिडकी (बाल्कनी) उघडते अन पंखा लावते. मग किचनमध्ये जाऊन बाउलमध्ये काहीतरी खायला घेऊन येते अन टीव्हीसमोर बसून निवांत खात बसते.

टेबलवर ठेवलेला फोन वाजू लागतो. एका जुन्या प्रकारच्या सामान्य (Not Smart Phone) फोनवर Aai calling असे अक्षर दिसू लागतात. ती मुलगी टीव्हीचा आवाज म्यूट करून खात-खातच फोन उचलते अन बोलू लागते.

ती मुलगी

हं आई बोल!

त्या मुलीची आई

आलीस का गं पिल्लू???

ती मुलगी जराशी चिडून म्हणते

अह! आई… कितीदा सांगितलं की मला पिल्लू नकोस म्हणत जाऊ.

आई

बरं! ठीक आहे अनुजाबाई… नाही म्हणत… कधी आली शाळेतून?

अनुजा कंटाळा आल्यासारख बोलते

रोजच्या वेळेला… आणि तू कधी येतेस???

अनुजाची आई

अगं तेच सांगायला फोन केलेला… आमच्या ऑफिसमध्ये न मोठे साहेब येणार आहेत… तुला मागे म्हणाले नाही का मार्चएंड चालूय आणि वेगळी कामं असतात म्हणून…

अनुजा

ते तू हल्ली रोजचं म्हणत असतेस…

अनुजाची आई

हो गं… पण ऐक न जरा… आज न मला थोडा जास्त उशीर होणार आहे. अकरा तरी वाजतील बघ… तुला तोपर्यंत एकटं राहावं लागेल…

अनुजा हातातला बाउल खाली ठेऊन जरा नाराजीने बोलू लागते

आईss, This Is Not Fair हा. मी इतका वेळ एकटी कशी राहू??? आणि बाबाही नाहीये… तू ये लवकर मला नाही माहीत काही.

अनुजाची आई समजावत

अगं बाबालाही ह्या वर्षी सुट्टी नाही मिळाली… मी आजपर्यंत कधी एकटीला सोडलं आहे का तुला? पण ह्या वेळेस खरच अडचण आहे गं… समजून घे न राणी. आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून नेहमीची वेळ. प्रॉमिस!

अनुजा

असं कसं गं… आणि मी काय करू तू येईपर्यंत?

अनुजाची आई

अगं अभ्यास कर किंवा तुझं कार्टून बघत बस आजच्या दिवस.

 

अनुजा

आणि माझं जेवण???

अनुजाची आई

सकाळीच करून ठेवलं आहे. किचनमध्ये आहे. भूक लागल्यावर खाऊन घे.

अनुजा चिडचिड करत

मी नाही खाणार सकाळचं.

अनुजाची आई

मी येताना ice cream आणलं तरी???

अनुजा एक मिनिट शांत राहून

अ.. ठीक आहे… पण जमलं तर लवकर ये न??? मला भीती वाटते एकटं घरी राहायची.

अनुजाची आई

मी पिल्लू म्हणल्यावर तर म्हणतेस की आता मी मोठी झाले. मोठी माणसं घाबरत नसतात.

अनुजा चिडून म्हणते

मी नाही हं घाबरत. जा. ये तू कधीही.

अनुजाची आई हसते

हो का? बरं… जेवण करून घे अन डोळे दुखेपर्यंत टीव्ही नको बघत बसू… आणि मी शेजारच्या वेलनकर आजींना फोन करून सांगून ठेवते, त्या लक्ष ठेवतील.

अनुजा

इss त्यांना नकोस सांगू. मी राहते ना एकटी.

अनुजाची आई

बरं नाही सांगत, पण तू नीट रहा म्हणजे झालं. माझ्याकडे घराची चावी आहे, तुला झोप आली तर झोपी जा. आणि दुसर्‍या कोणाला दरवाजा उघडायचा नाही.

अनुजा

बरं! अन तू इतक्या रात्री एकटी कशी येणार?

अनुजाची आई

माझी इतकी काळजी वाटते??? मी मोठी माणूस आहे म्हंटलं… हाहाहा

अनुजा

माहिती मला.

अनुजाची आई

अगं आम्हा बायकांना सोडायला वेगळी गाडी केली आहे. येते मी व्यवस्थित.

अनुजा

बरं!!!

अनुजाची आई

ठीक आहे, ठेवते आता. नीट रहा. बाय

अनुजा

बाय!!!

                                                       CUT TO:

SCENE2:

INT. घर हॉल – संध्याकाळ

आई उशिरा येणार म्हंटल्याने अनुजाला खूप कंटाळा येतो. ती आडवं होऊन टीव्ही बघत बसते. टीव्ही बघत-बघतच अनुजाला झोप लागते. टीव्ही तसाच चालू असतो. 

                                                                                                                         Fade Out:

 SCENE3:

INT. घर हॉल – रात्र 8 pm

सोफ्यावर पडलेली अनुजा हळूच डोळे उघडते. डोळे उघडल्यावर ती टीव्हीकडे अन आजूबाजूला बघते. घरात अंधार झालेला असतो. टीव्हीचा कमी-जास्त होणारा प्रकाश तेवढा हॉलमध्ये कमी-अधिक पसरत असतो.

(झोप लागली तेंव्हा बर्‍यापैकी उजेड होता, पण आता जाग आल्यावर अंधार पडलेला असतो.)

अर्धवट झोपलेपणातच ती उठून टीव्हीच्या प्रकाशात हॉलमधली लाइट लावते. मग तिला पूर्ण जाग येते. ती घड्याळात बघते तेंव्हा आठ वाजलेले असतात. ती स्वतःला म्हणते,

                        आईला तर अजून दोन-तीन तास आहेत.

एक मोठी जांभई देऊन अनुजा पुन्हा टीव्हीसमोर जाऊ बसते.

                                                 Fade Out:

SCENE4:

INT. घर – रात्र 9 pm

अनुजा घड्याळाकडे बघते. नऊ वाजलेले असतात. ती पोटावर हात ठेवते. तिला भूक लागलेली असते. ती सोफ्यावर बसूनच, मागे वळून किचनमधला अंधार न्याहाळू लागते. तिथे अंधार असतो. ती परत टीव्हीकडे बघू लागते.

पुन्हा घड्याळाकडे बघते अन जागेवरून उठते. टीव्हीच्या बाजूला ठेवलेली बॅटरी घेते अन किचनकडे जाऊ लागते.

बॅटरीचा प्रकाश किचनभर फिरवत ती हळूहळू किचनकडे जात असते. किचनच्या दरवाजाला असलेला निळा पडदा वार्‍याच्या मंद झोक्याने हलत असतो.

अनुजा आत पोहोचणार तोच बाहेर फोन वाजल्याचा मोठा आवाज होतो अन ती दचकते. ती क्षणभर घाबरून तिथेच थांबते अन फोन आहे हे लक्षात येताच ती बाहेर टेबलवर ठेवलेल्या फोनकडे धावते.

(Special Ringtone Of Laughing Man)

फोनवर बाबा कॉलिंग असा मेसेज येतो. तिच्या चेहर्‍यवरचं दडपण कमी होतं अन ती फोन उचलते.

                                                             CUT TO:

ती बॅटरी घेऊन किचनच्या दरवाजाजवळ उभी असते. किचनच्या बेसिनमध्ये ठेवलेल्या भांड्यांवर गळणार्‍या नळाच्या पाण्याचे थेंब पडून टप्प…टप्प अशा आवाजाने लय पकडली असते.

संपूर्ण किचनमध्ये बॅटरीचा प्रकाश टाकत ती दारातूनच बाजूच्या भिंतीवर असलेलं लाइटचं बटन न बघता शोधते अन सगळी बटणं चालू करते. किचनमध्ये प्रकाश पसरतो.

ती संपूर्ण किचनमध्ये नजर फिरवते अन मोठा श्वास सोडते अन स्वतःवर हसते. आधी जाऊन ती तो नळ घट्ट बंद करते.

ती ताट वाढून घेत असताना मागे पडदा हलतो अन गार वार्‍याचा तिला स्पर्श होतो. ती चटकन मागे बघते पण कोणीच नसतं. ती गडबडीने ताट वाढून घेते अन लाइट वगैरे चालूच ठेऊन बाहेर टीव्हीसमोर जाऊन बसते.

                                                                   CUT TO:

 SCENE5:

INT. घर हॉल – रात्र

ती टीव्हीचा आवाज मोठा करते अन जेवत-जेवत टीव्ही बघत असते. पण ती सावध असते. अध्ये-मध्ये ती डोळे फिरवून मागे बघत असते.

टीव्ही बघत असताना अचानक लाइट जाते अन अंधार पसरतो.

अनुजा जेवणाचं ताट तसच टेबलवर ठेऊन देते अन मघाशी ठेवलेली बॅटरी हुडकते अन चालू करते. ती बॅटरी सर्व दिशेला फिरवत असते. काय करावं तिला काहीच सुचत नसतं.

ती पटकन मोबाइल हातात घेते पण काहीतरी विचार करून पुन्हा ठेऊन देते.

सोफ्यावर बसून ती सगळीकडे बॅटरीचा प्रकाश फिरवत असते. नंतर तिचं लक्ष आपल्याच पायांकडे जातं. ती हळूच सोफ्याखाली वाकून बघायचा प्रयत्न करते अन घाबरून पटकन पाय वरती घेते अन सोफ्यावर एका कोपर्‍यात जाऊन बसते.

अनुजाला अचानक कुठूनतरी बांगड्या वाजल्याचा आवाज येतो. ती घाबरून दोन्ही पायात डोकं घालून बसते. तिला घाम सुटतो अन जीव रडकुंडीला येतो.

बॅटरीचा प्रकाश जरा कमी होतो. ती बॅटरीला हातावर आदळते. अन काहीतरी लक्षात येऊन ती जागेवरून पटकन उठते अन हॉलमधल्याच कपाटांत काहीतरी शोधू लागते. तिला जे हवं आहे ते तिथे सापडत नाही म्हणून ती जरा अस्वस्थ होते. अनुजा उभी असते तिथे तिच्या चेहर्‍याइतक्या उंचीच्या टेबलवर तिच्या बाबांचं ड्रायविंग हेलमेट ठेवलेलं असतं. ती मान वळवते अन तिच्यासमोर अचानक ते हेल्मेट येतं… ती दचकते अन मागे सरकते.

अनुजा स्वतःला सावरते अन एका जागी क्षणभर उभी राहते अन बेडरूमकडे बघू लागते. बॅटरीचा प्रकाश धीमा होतो अन ती बॅटरीला ठेका देते अन प्रकाश जरा सुधारतो. ती बेडरूमकडे जात असते. हॉलमधून बेडरूमकडे जाताना भिंतीवर नजर लागू नये म्हणून लावतात तशा एका राक्षसाची प्रतिमा असते. अनुजा त्यावर प्रकाश टाकते अन देवाचं नाव घेत आतमध्ये जाते. तिचा चेहरा घाबरलेला असतो.

                                                                   CUT TO:

 SCENE6:

INT. घर बेडरूम – रात्र

अनुजा पॅसेजमधून आत बेडरूमकडे जात असते. तिचं लक्ष समोर बॅटरीच्या प्रकाशावर तर असतच पण ती सारखं मागे प्रकाश टाकून काहीतरी बघत असते, कानोसा घेत असते. कोणी पाठीमागून येत नाही नं याची खात्री करत असते.

अनुजा बेडरूममध्ये पोचते. बेडरूमचा दरवाजा हळूच आत ढकलते अन आतील सर्व दिशांचा आढावा घेते.

अनुजा बेडरूममध्ये कपाटात, ड्रॉवरमध्ये काहीतरी हुडकत असते. खाली-वर करत असते. ती बॅटरी जमिनीवर ठेवते अन खाली बसून खालच्या कप्प्यात काहीतरी बघत असते. ती खालचा दरवाजा जरा जोराने आपटते अन त्या टेबलवर ठेवलेली एक कुत्र्याची बाहुली तिच्या अंगावर पडते. नकळत तिच्या तोंडून एक किंचाळी बाहेर पडते अन हात बॅटरीकडे जातो, अनुजा मागे सरकते. ती खाली पडलेली बाहुली त्या बॅटरीच्या हलणार्‍या प्रकाशात विचित्र दिसत असते. ती स्वतःला सावरते अन ती बाहुली उचलून पुन्हा जागेवर व्यवस्थित ठेवते. तिच्या डोळ्यात पाणी तरळत असतं.

तिथेच बाजूला तिची फवोरेट गणेशा बाहुली असते. ती जवळ जाते अन त्याच्याशी बोलते, माय फ्रेंड गणेशा, मला भीती वाटत आहे… पण आईला नाही सांगता येणार.. मी मोठी झालेय म्हणून सांगितलं आहे तिला. मी घाबरलेलं तिला कळायला नको. ती बाहुलीला एकदा जवळ घेते अन परत ठेऊन देते.

ती दुसर्‍या कपाटातून काहीतरी बाहेर काढते. तो मेणबत्तीचा पॅक असतो.

ती स्वतःलाच काहीतरी सांगते, काडीची पेटी तर किचनमध्ये असेल आता? असं म्हणताच तिच्या चेहर्‍यावर तणाव स्पष्ट दिसू लागतो.

कुठूनतरी लांबून कुकरच्या शिट्टीचा आवाज येत असतो, कुत्री विव्हळत असतात. कबुतरांची फडफड अन गुटरगू चालू असते, हॉर्नचा आवाज, मध्येच काही कबुतरं कुठल्यातरी पत्र्यावर बसून आवाज होत असतो. अशा चित्र-विचित्र अवजांची सरमिसळ ऐकून तिला प्रचंड भीती वाटत असते. हे सगळे आवाज तिच्या कानात घुमत असतात. ती कान घट्ट दाबते अन तेथून बाहेर पडते. बेडरूमचा दरवाजा लाऊन पुढे जाते.

                                                                   CUT TO:

SCENE7:

INT. घर – रात्र

अनुजा पॅसेजमधून किचनकडे जात असते. मागून आपल्याकडे कोणीतरी पाहत आहे असं तिला वाटत असतं. ती दोन्हीकडे बघत पुढे जात असते. एका हातात मेणबत्त्या अन दुसर्‍या हातात डिम होत चाललेली बॅटरी घेऊन ती पुढे जात असते. कुठलातरी दरवाजा वार्‍याने हलतो अन जोरात होतो. अनुजा त्या आवाजाच्या भीतीने किचनकडे वेगाने धावत जाते.

अनुजा किचनच्यामध्ये शिरायच्या आत जरावेळ तिथेच थांबून विचार करते अन निर्णय घेऊन आत जाते.

काडेची पेटी ओट्यावर कुठेतरी असते म्हणून ती शोधू लागते. बॅटरी अजून डिम होते. ती गडबडीत काडेची पेटी शोधू लागते. तिला कोपर्‍यात काडेची पेटी दिसते अन ती घेण्याच्या गडबडीत तिचा धक्का एका भांड्याला लागतो अन ते भांडं पडून मोठा आवाज होतो. त्याच वेळेला बॅटरी पुर्णपणे बंद पडते अन तिच्या हातून निसटते. पूर्ण अंधार पसरतो. अनुजाला काहीच दिसत नाही अन सुचत नाही. ती जागेवर फिरते. तिचं लक्ष मागे जातं. एका कोपर्‍यात उंच पोत्यावर काही पिशव्या अन एक टोपलं ठेवलेलं असतं. तिला तेथे वेगळीच आकृती भासू लागते. कोणीतरी तेथे दडून बसलं आहे अन आपल्याकडे बघत आहे असं तिला वाटतं. तिचा धीर सुटतो. ती जिवाच्या आकांताने अंधारात पळू लागते.

अनुजा भीतीने सैरावैरा पळत घराच्या बाहेर पडू लागते. मुख्य दरवाजा उघडते. कोणीतरी पाठीमागून आपल्यावर चालून येत आहे असं तिला वाटतं. ती दरवाजा उघडते अन समोर एक बाई उभी असते… अचानक लाइट येते अन लख्खं प्रकाश होतो. ती अनुजाची आई असते. घाबरलेली, रडवलेली अनुजा आपल्या आईला बिलगते. रडू लागते.

अनुजाच्या आईला काय झालं आहे हे माहीत नसतं पण ती अनुजाला जवळ घेते अन म्हणते…

            काय झालं ग पिल्लू???

-*-*-*-समाप्त-*-*-*-

Kindly Notice :- The Script/Screenplay/Story/Concept/Theme/Title mentioned here is legally copyrighted. No one can use this without the permission of writer Abhishek Buchake.  

Copyright ID – 106203117489

CONTACT HERE – latenightedition.in

जंगल – मराठी भयकथा

error: Content is protected !!