मकर संक्रांती अन पानिपतचे युद्ध!!!

मकर संक्रांती अन पानिपतचे युद्ध!!!

संक्रांत ओढवली   ||  #Makar Sankranti And Battle Of Panipat  || संक्रांतीची जखम  ||

 

मकरसंक्रांतीच्या दिवसाची महाराष्ट्राची काळी आठवण-

२५० वर्षांपूर्वीची ही गोष्ट… १८ व्या शतकातलं ते सर्वात मोठं युद्ध… दिल्लीपासून उत्तरेकडे जवळपास १०० किलोमीटर अंतरावर पानिपत नावाची अवकाळी, अपशकुनी जागा… या जागेने नेहमीच #दिल्ली तख्ताचा पराभव केला… १४ जानेवारी १७६१…. हाच तो दिवस ज्या दिवसाने भारत किंवा #हिंदुस्तानचा इतिहास-भूगोल-संस्कृती अन भविष्यही बदलून टाकलं… १० महिने झुंज दिल्यानंतर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली युद्ध लढणाऱ्या मराठ्यांना इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं…

ह्याच युद्धातील परभवामुळे मराठेशाहीचं कंबरडं मोडलं अन कायमचं अपंगत्व आलं… मराठ्यांचा देशभर असलेला दरारा संपला… काळाची चक्रे उलटी फिरू लागली अन ते वैभव गमावलं… हे युद्ध जर पेशव्यांनी जिंकलं असतं तर भारतावर मराठ्यांची एकहाती सत्ता राहिली असती अन इंग्रज नावाचा शत्रू भारतात कधी तग धरूच शकला नसता… पण इतिहासाला हे मान्य नव्हतं!!! विपरीत घडलं आणि मराठे जिंकता-जिंकता हरले अन त्याच दिवशी भारताच्या पारतंत्र्याचा अध्याय सुरू होण्याची बीजे रोवली गेली…

#पानिपतचं तिसरं युद्ध हे आजही एक गूढ आहे. त्या युद्धात नेमकं काय झालं याबाबत आजही अनेक मतमतांतरे आहेत, पण पराभव हा पराभवच असतो जी मृत्युपेक्षाही आव्हानात्मक असतो.

पानिपत म्हणजे महाराष्ट्रीय मनावरची भळभळती जखम… कधीही न भरून येणारी जखम… ह्या जखमेच्या केवळ आठवणीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अन तत्कालीन संरक्षणमंत्री ह्या मराठी माणसाचे डोळे पाणावले.. काळीज पिळवटून गेलं केवळ ती जागा बघून…

ज्याला पानिपतचा इतिहास माहिती आहे, तो संघर्ष आणि अपमानास्पद पराभव माहिती आहे त्याला संक्रांतीला ही आठवण आल्याशिवाय राहत नाही.. कुठेतरी वाचलेल्या, ऐकलेल्या, बघितलेल्या कटू आठवणी जाग्या होतात अन संक्रांतीच्या तिळगूळची चव उतरून जाते…

२५० वर्षांपूर्वी संक्रांतीला अनेक माता-भगिनींनी आपलं सौभाग्य गमावलं… पानिपतहून येणार्‍या पराभवाच्या काळतोंड्या बातमीने पुणे अन महाराष्ट्र शोकात बुडाला होता… मरणारे तर अनेक होते, पण बेपत्ता असलेले त्याहूनही अधिक. अगदी, मराठी सैन्याचे नेतृत्व करणार्‍या सदाशिवभाऊराव पेशवे यांचंही काय झालं हेसुद्धा इतिहासाला कधी कळलं नाही. त्यांच्या पत्नी ना सौभाग्यअलंकार उतरवू शकत होत्या न सती जाऊ शकत होत्या. त्यांच्या पदरी आयुष्यभर वाटेकडे डोळे लाऊन बसणं हेच नशिबी आलं. अशा अनेक स्त्रिया, अनेक घरं होती जी आप्तांच्या जीवंत-मृत असण्याच्या बातमीने जिवंतपणी जळत राहिली… अशा अनेक गहिर्‍या जखमा त्या पराभवाने पदरी बांधल्या होत्या..

….जर…. केवळ जर हा शब्द वापरला तर पानिपतने एक वेगळाच इतिहास अन भविष्य घडवलं असतं… पण नियतीला ते मान्य नव्हतं… जिंकता-जिंकता हरलेलं युद्ध… ह्या जर ने, काळाच्या जराशा फरकाने इतिहासाने भविष्याला पराभूत केलं असं वाटत राहतं…

समुद्रकिनारी असलेलं वाळूचं महाल एका महाकाय लाटेने कवेत घ्यावं तसं अगदी तसंचं… मराठ्यांनी आपलं वैभव गमावलं अन राष्ट्राने भविष्य!!! लढणारे कोण अन मरणारे कोण? नायक कोण अन खलनायक कोण? असे प्रश्न गौण वाटतील असं युद्ध… ह्या युद्धात यमुना ही नायिका होती अन भूक नायक होता… पण मराठे अन अब्दाली यांच्या दृष्टीने ते युद्ध हा आयुष्याचा शेवटचा धडा ठरला…

याचा इतिहास सांगावा तो कमी… कथा सांगाव्या त्या कमी…

© 2016 – 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!