3D अर्थात दिल दोस्ती दुनियादारी! समाप्त

3D अर्थात दिल दोस्ती दुनियादारी! समाप्त

#Dil Dosti Duniyadari Telecasted Last Episode

सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली झी मराठी वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी!’ ही मालिका आज संपली. मालिकेचा पहिला ‘सीझन’ संपला असला तरी हा केवळ अल्पविराम आहे असं सांगण्यात येत आहे. लवकरच ही मालिका पुन्हा सुरू होईल अशीही चर्चा आहे. पण सध्यातरी रात्री साडेदहा वाजता ‘3डी’ बघता येणार नाही.

मालिकेचा बाज खूपच वेगळा होता. नात्या-गोत्याची बंधनं नसताना माणूस मैत्रीच्या बंधनात बांधला जाऊन आनंदाने कसा राहतो हेच ह्या मालिकेतून दाखवण्यात आलं आहे. मित्र केवळ मित्र न राहता आई, बाप, भाऊ, बहीण अशी अनेक भूमिका बजावतात आणि आपल्या प्रिय मित्राला आयुष्यात पुढे चालत राहण्याच्या मार्गात मदत करत असतात. नात्याची बंधने तुटल्यावर किंवा त्यांत अविश्वास आल्यास मैत्रीची बंधने अधिक घट्ट होतात आणि नवी नाती तयार होतात. मित्राला मित्राची साथ आणि दुनियेशी करू दोन हात अशी हिम्मत देणारी मैत्री असते. रकताचं नसलं तरी हृदयाचं नातं जोडलं जातं आणि दुनियादारी केली जाते. हसणारे, खेळणारे, भांडणारे, वेळप्रसंगी समजवणारे मित्र जेंव्हा भेटतात तेंव्हा जगात छप्पर असल्याचा आधार मिळतो, कोणीतरी प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात मदत करेल ह्याची खात्री असते. मित्रत्वाची व्याख्या इथे संपत नाही तर तो ओथे सुरू होते! म्हणाल तर अगदी सोप्पं पण शोधायला गेलात तर मोठं किचकट असं हे नातं! जोडताना अन तोडताना धाकधूक वाटेल असं हे नातं! स्वतःची जेथे स्वतंत्र ओळख असते असं विश्व… मैत्रीचं…

सहा मित्र… मुलं आणि मुली… प्रत्येकाचे स्वभाव, पिंड, आचरण, व्यवहार, गाव, सुखं-दुखं, मार्ग, उद्दीष्ट, वेगळे पण तरीही ते सहा नग एकत्र राहतात… केवळ नारळाचा घड असतो तसे एकत्र न राहता एका कुटुंबासारखे एकत्र राहतात… आनंदाने राहतात… खोड्या काढणं, एकमेकांना त्रास देणं, थट्टा करणं, वेळप्रसंगी रागावणे, समजूत काढणे हे त्यांचे रोजचे उद्योग… असे हे जीव एकजीव होऊन मुंबईसारख्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये राहतात… ही आहे दिल दोस्ती दुनियादारी ह्या मालिकेची संकल्पना… मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच अशा प्रकारची संकल्पना घेऊन विनोद लव्हेकर, संजय जाधव व त्यांची टीम प्रेक्षकांसमोर येत होती… मालिकेचा नावीन्यपूर्ण अंदाज हीच सकारात्मक बाजू होती… पण लेखन अन दिग्दर्शन ह्या जोरावर मालिका अजरामर ठरली… साधी-सरळ-भोळी रेश्मा, खोडकर-भावनाप्रधान आशु, सभ्य-शहाणा सुजय, वेंधळट-निष्पाप अॅना, भांडखोर-मर्दानी मीनल, अहंकारी कैवल्य असे वैविध्यपूर्ण गुण असणारे लोक भेळ करून राहत असतात… एक चटपटीत भेळ.. कधी तिखट, कधी गोड, कधी आंबट, कधी कांदा लागल्यावर उग्र अशी भेळ… ह्या इरसाल नमूण्यांचा रोज नवा काहीतरी लोचा… कधी किंजेल, कधी राकेश, कधी निशा, कधी प्रगल्भा, कधी शाम, कधी प्रदनेश, कधी पिऊ, कधी निकम आजी… बापरे… प्रश्न एकाचा असला तरी उत्तर मिळून शोधायचा अट्टहास… अर्थात मैत्रीचा गुणधर्म… त्यातून निर्माण होणारा विनोद तर कधी भावनांचं उसळून येणं… शेवटी मैत्रीचा आधार… हीच दुनियादारी…

ही सगळी मंडळी घरच्यांशी भांडून, काहीतरी लपवून येथे एकत्र राहत असतात… कुटुंब सोडल्यानंतरचं कुटुंब… रेश्मा येथे स्वतःचं दुखं विसरून नवं आयुष्य जगू बघते, आशु जुना भूतकाळ विसरून जगू सुखाने बघतोय, अॅना हरवलेलं कुटुंब येथे शोधतेय, मीनल घरच्यांशी भांडून काहीतरी बनू बघतेय, कैवल्य वडलांशी भांडून येथे स्वतःचं स्वातंत्र्य शोधतोय, सुजय एक कुटुंब जोडतोय… घर एक, माणसे वेगळी, प्रत्येक मोत्याचा रंग वेगळा आणि जोडणारा मैत्रीचा एक धागा… प्रत्येकाची स्वप्ने वेगळी आहेत, प्राधान्य वेगळं आहे पण मैत्रीत जराही कंजूषपणा नाही… मित्रांसोबत काही गल्लत-गडबड होत असतील तर यांची प्राधान्य असतात फक्त मैत्री!!!

निरोप देणं थोडं जड असतं… पण कधींना-कधी निरोप द्यावाच लागतो… योग्य वेळेत दिला तर तेच सोईचं असतं… दोस्तीची ही दुनियादारी थांबली… रात्रीचे साडेदहा काही दिवस थोडेसे जड जातील एवढच… सध्यातरी इतकच!

ही दुनिया समाप्त होऊन भूत-प्रेतांची दुनिया सुरू करायचं झी मराठीने ठरवलं आहे दिसतं. कारण या मालिकेच्या जागी आता रोज रात्री साडेदहा वाजता ‘रात्रीस खेळ चाले’ ही गूढ, रहस्य आणि भय प्रधान मालिका येऊ घातली आहे. विशेष म्हणजे याची पार्श्वभूमी आहे कोकण! बघू ही गूढ अंधाराची दुनिया कशी असते ती!

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!