रात्रीस खेळ चाले!

रात्रीस खेळ चाले!

#Ratris Khel Chale   || रात्रीस खेळ चाले  || मराठी मालिका  ||  काळा जादू, करणी, भानामती, बाहेरचं वगैरे

#झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले मालिकेवर प्रकाशझोत!

मालिकेतील पात्रे

रात्रीचे साडेदहा वाजले ‘डिंग डिंग डिंग डिंग’ असे धुन झी मराठीवर सुरू व्हायचे आणि दोस्तांची दुनियादारी सुरू व्हायची. पण दिल दोस्ती दुनियादारी मालिका संपली आणि त्याच वेळेत सुरू झाली नवी मालिका रात्रीस खेळ चाले! रहस्यप्रधान, गूढमय, भयसंपन्न अशी ही मालिका. मानवाला नेहमीच उत्कंठा असलेल्या भूत-प्रेत-पिशाच-आत्मा-हडळ-डाकीण-चुडेल-हाकमारी-चेटकीण आणि असल्या जगाचं दर्शन ह्या मालिकेतून घडतं. कोकण आधीच गूढ आणि रहस्यमय त्यामुळे ह्या मालिकेला चांगली पार्श्वभूमी आधीच तयार होती.

कोकणातील नाईक कुटुंब. कुटुंबातील कर्ता पुरुष अर्थात, अण्णा घरात लग्न असताना अचानक वारतात. त्यांच्यानंतर सुरू होतात ते त्यांच्या मागे राहिलेल्या मुला-सुनांचे भांडणे. मग ती संपत्ती असो, न झालेलं लग्न, पूर्वी झालेल्या घटना, प्रेम, माया ह्या प्रपंचातून ती भांडणे वाढत जातात अन रक्ता-रक्तातील दुरावा वाढत जातो. ह्या दुराव्याचा फायदा मग काही घरभेदी अन हितशत्रू घेत असतात. शिवाय घरात काही अघोरी खेळही सुरू राहतात. ह्या सगळ्यामगे काय आहे, कोण आहे, का चालू आहे हे सगळं ह्या सगळ्यावर मालिकेचं संपूर्ण कथानक बेतलेलं आहे.

अण्णांच्या नंतर घरातील मोठा मुलगा असतो तो माधव. पण तो मुळातच वेंधळा अन बावळट दाखवण्यात आला आहे. इतकी वर्षे मुंबईत प्राध्यापकी करत त्याचं आयुष्य व्यवस्थित चालू असत पण त्याचा धाकटा भाऊ अभिराम याच्या लग्नाच्या साखरपुडयाला तो गावाकडे येतो आणि तेथे घडणार्‍या विविध घडामोडींमुळे तो तिथेच अडकून राहतो. माधव हे पात्र लेखकाने भलतं रंगवलं आहे. बायकोसमोर वारंवार नमतं घेणारा, सांभाळून घेणारा, नम्र, घाबरट, भावुक असा हा माधव. कुठल्याही प्रसंगात केवळ एका विशिष्ट तारसप्तकात एखाद्याचं नाव घेण्याइतपत तो मर्यादित असतो. म्हणजे नीलिमाआआ, दत्ताआ, सरिताआ असा त्याचा नेहमीचा सुर. सॉरी, प्लीज हे तर त्याचे ठेवणीतील शब्द. पण असं असलं तरी त्याची स्वतःची अशी काही मते आहेत आणि स्वतःचे काही आडाखे आहेत. घडणार्‍या घटनांकडे तो केवळ एका दृष्टीकोणातून न पाहता तटस्थपणे त्याचा विचार करत असतो. त्याच्या बायकोचं त्या घटनांकडे अंधश्रद्धा म्हणून बघण असलं तरी तो त्या मताखाली दाबला जात नाही. किंवा घरातील इतर मंडळी त्याच्याकडे अघोरी विद्या, अनैसर्गिक प्रकार, बाहेरचं म्हणून बघत असले तरी त्यावर त्याचा पुर्णपणे विश्वास नसतो. तो प्रत्येकाच्या मतांचा आदर राखत त्यातून बाहेर पडू इच्छित असतो.

माधवची बायको नीलिमा ही एक संशोधक असते. गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर ती दीड-शहाणी असते. किंवा आधुनिक भाषेत सांगायचं म्हंटलं तर ती पुरोगामी असते. गावाकडे होणार्‍या घटनांकडे ती अंधश्रद्धा या एकाच नजरेतून बघत असते. ती वस्तुनिष्ठ वागणारी एक करती स्त्री असते. तिचा गावातील लोकांकडे बघण्याचा एकंदरीत दृष्टीकोण हा नकारात्मक असतो. सामाजिक वगैरे काम करणारी असल्याने ह्यांच्यापेक्षा आपण बुद्धीने अन कृतीने जरा उजवे आहोत असा तिचा समाज असतो. तिच्या स्वतःच्या मतापुढे ती कोणाचेच मत ग्राह्य धरत नाहीच, शिवाय स्वतःच्या नवर्‍याला अन मुलाला त्या मतांवर विश्वास ठेवावा असं तिचं म्हणणं असतं. एकंदरीतच ती वर्चस्ववादी स्त्री असते.

तिसरी महत्वाची भूमिका आहे ती दत्ताची. दत्ता माधवनंतरचा अण्णांचा दूसरा मुलगा. माधव मुंबईला गेल्यावर दत्ता हाच गावकडचा सगळा कारभार बघत असतो. अण्णांच्या नंतर सगळी जबाबदारी त्याचीच असते आणि तो ती उचलतही असतो. माधव एकंदरीतच निलीमाच्या धाकात असल्याने तो ज्या काही घटना घडत आहेत त्यात पारंपरिक उपाय करू शकत नाही. पण दत्ताला सर्व प्रकारे सर्व काही करणं भाग असतं.  घराचा डोलारा सांभाळणे हा तो स्वतःचं कर्तव्य समजतो. त्याची बायको सरिता ही जरा गरम डोक्याची असते. गावातील गृहिणी असते त्याप्रमाणेच ती वागत असते. संपत्तीच्या वाट्यात काहीच महत्वाचं न आल्याने तिचं मन खट्टू झालं असतं. घरासाठी सगळं करूनही हातात काहीच न आल्याने ती निराश असते ज्यातून चिडचिडेपणा बाहेर पडत असतो. तिचा एक मुलगा वेगळ्याच विश्वात वावरत असतो तर मुलगी अजून शिकत असते. आलेल्या वाट्यातून घर आणि मुलांचं भविष्य दत्ता-सरिताला अवघड दिसत असल्याने दोघेही नाराज असतात. ही त्यांची मूळ व्यथा असते.

तिसरे सुपुत्र आहेत अभिराम चिरंजीव. हे तर गुढग्या बाशिंग बांधलं करून तयार असतात ते फक्त लग्नासाठी. यांच्याच साखरपुडयात अण्णा अचानक वारले असतात. त्यामुळे हिच्या होणार्‍या बायकोला, देविकाला, अपशकुनी ठरवलं जातं जे ह्यांना कदापी मान्य नसतं. लग्न केलं तर हिच्याशीच एवढाच त्यांच्या आयुष्याचा भाग. कुठलीही घटना लग्नाच्या मुद्द्यापर्यंत नेऊन पोचवतात हे. देविकाशी लग्न एवढाच काय तो यांचा अट्टहास, त्यापुढे सगळं निरर्थक. तिकडे देविका हे काय रसायन आहे अजूनही काही कळत नाहीये. ती नेमकं कोणत्या बाजूने आहे हेच कळत नाहीये.

छाया ही अण्णाची मुलगी. तिचं लग्न झाल्याच्या रात्रीच तिचा नवरा मेला असतो. तेंव्हापासून ती येथेच राहते. जाताना अण्णा तिच्या नावावरही काहीतरी ठेऊन जातात. पण तिची व्यथा वेगळीच असते. तिला एकटेपणा सतावत असतो. घरात तिच्याशी कोणी बोलणारही नसतं. भविष्यात आपली काय दशा होईल एवढीच चिता तिला सतावत असते. घडलेल्या वाईट घटना आणि समोर आलेलं निष्क्रिय-निरर्थक आयुष्य यामुळे आपलं नशीब फूटकं हे तिच्या मेंदूत पक्क झालेलं असतं.

आता महत्वाची बाब आहे ती म्हणजे अण्णांच्या दुसर्‍या खात्याची. अण्णा हयात असताना त्यांचं लग्नाशिवाय दुसरं एक खातं असतं. शेवंता तिचं नाव. शेवंता हे अंनधिकृत खातं असल्याने त्यांचं अधिकृत खातं तिला जिवंतपणी घरात येऊ देत नाही. ह्या भांडणात शेवंता वाड्यासामोरच्या झाडाला फाशी घेऊन मरते. पण तत्पूर्वी शेवंता अन अण्णा यांच्यात सुशल्या (सुषमा) ही जमा होते. अण्णा असेपर्यंत ती घरातील गडी नाथाच्या घरात राहत असते. पण अण्णा जाताना तिला घरात घ्या अशी अट इच्छापत्रात टाकून जातात. त्यामुळे तिला घरात घेणे हे कायदेशीर बाब असते. ही सुशल्या काही सरळ रसायन दिसत नाही. हिच्या मनात विश दिसत आहे. घरातील इतरांची बरबादी अशीच तिची इच्छा असते.

आता नंबर आहे तो अण्णांच्या मागे राहिलेल्या पत्नीचा अन ह्या सगळ्यांच्या आईचा. आता अण्णा गेल्याने ती हतबल झाली आहे. एकतर घरात घडणार्‍या भयानक घटना, भावंडातील भांडणे यामुळे त्रस्त आहे. ह्या सगळ्याने घराची घडी तर कोलमडली असतेच, पण सर्व घराणं कोसळेल अशी तिची भीती असते. त्यामुळे जमेल तसं, आपल्या शक्तीने ती हे सर्व सावरत असते. घरातील सगळ्या गोष्टी आपल्या परीने सांभाळणे एवढच तिच्या हातात असतं.

नंतर महत्वाची पात्रे आहेत ती गुरव आणि नेने वकिलांची. अण्णा अकाली गेल्याने आणि घरातील भेद लक्षात आल्याने हे दोघे स्वतःचा हेतु साधू पाहत असतात. नेने वकील तर उघडउघड अण्णांची संपत्ती लाटू पाहत असतात. गुरव यांचा हेतु अजून उघडा पडला नाही. पण नीलिमाने केलेल्या अपमानाचा बदला हा त्यांचा अहंकाराचा विषय असू शकतो.

कथेतील इतर पात्रे आहेत पूर्वा, गणेश (दत्ता-सरिता) चे मुलं, अर्चिस (माधव-नीलिमा पुत्र), विसरभोळा-वेडा पांडू, घरगडी नाथा अन त्याची बायको. यातील गणेश हा काळ्या विद्या, भविष्य वगैरे असल्या गोष्टींच्या आहारी गेलेला असतो. मालिकेत पुढे त्याला चांगले दिवस असतील असं वाटत आहे. पूर्वा ही समजूतदार, कामाळू वगैरे आजीबाई प्रकार आहे. अर्चिस म्हणजे निरर्थक भटकणार्‍या प्राण्याप्रमाणे इकडून तिकडे भटकत असतो. पांडू हा विसरभोळा-वेडा असा सांग काम्या प्राणी वाटत असला तरी तो तसा नाही याची मला खात्री आहे. त्याचं तिथे असण्याला काहीतरी अर्थ आहे. मालिकेत त्यालाही महत्वाचं काम असावं असा अंदाज आहे. नाथा हा अण्णांचा विश्वासू नोकर. तो सरळमार्गी दिसत असला तरी त्याची बायको तशी नाही. त्याच्याही मनात काही आडाखे आहेत पण अजून तो शांत आहे.

to be continue…

अभिषेक बुचके लिखित || @Late_Night1991

नीलिमा येडी हाय!

© 2016 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!