पोर्णिमा ते अमावस्या!

पोर्णिमा ते अमावस्या!

#Effect Of New Moon & Full Moon on Human Mind/Soul/Heart/Psyche

#पोर्णिमा अन अमावास्येचा मानवी मनावर खोलवर परिणाम

#मनाचा कारक चंद्र

Not Science/ विज्ञान विरहित

अंधश्रद्धा म्हणा किंवा गैरसमज म्हणा पण एक अनुभव मला वारंवार येत असतो… अमावस्या किंवा पोर्णिमा तिथी असेल किंवा आसपास ची तिथी तर मन विचलित होतं… जुन्या-पुराण्या, गाडल्या गेलेल्याही आठवणी सारख्या मनात येत असतात… मन अस्थिर होतं… चंचलपणा, हळवेपणा वाढतो… सारासार विचार करायचा अन शिस्तप्रिय असलेला मेंदू सैरावैरा किंवा सैराट होतो… दिवसा काजवे चमकू लागतात…. कुठल्याही गोष्टी चटका लाऊन जातात… कधी विषन्नता, नैराश्य मनाचा ताबा घेतं… कोठुनतरी ओढलेपणा जाणवतो… शारीरिक बदल काही नसतात… नेहमीप्रमाणे कामे होतात पण मन मात्र बेचैन असतं… नको त्या गोष्टी नको त्या प्रमाणे छळ मांडतात… विझलेला विस्तव फसफसून आवाज करतो अन मधूनच भयंकर पेट घेतो… मनाला लगाम राहत नाही… मेंदूचा मनावरील ताबा सुटलेला असतो… मनाचा स्वैराचार चालू असतो… भकासपणा, रुखरुख, वाहवत जाण्याचा प्रकार ठरलेला असतो… काय करावं समजत नाही… मनातील बंद दरवाजे अचानक उघडले जातात.. पूर्वीच्या गोष्टी तर आठवतातच शिवाय भविष्याची ओढ आणि वर्तमान याच्यातील अंतर्गत संघर्ष एका पातळीवर घडत असतो जो मनाला एका वेगळ्या प्रतलात घेऊन जातो… अज्ञात वाटेवरील चमकणारे मंद दिवे अन अरुंद वाटा खुणावत असतात…. भयंकर मनोवस्था असते… कधी निर्वाण, मोक्ष, मुक्ती संन्यासत्व इथपर्यंत विचार पोचतात… अर्थात अविचार! अर्थात नेहमीच असे अन इतक्या तीव्रतेचे विचार येतात अस नाही… कमी-अधिक प्रमाणात तो परिणाम असतो, पण काही क्षणांचा तर नक्कीच असतो… कधी मार्गही सापडतात अन उत्तम चालना मिळते… पण एक परिक्रमा असते ना, एक रेंज असते ना तसं ह्या टोकाला किंवा त्या टोकाला मनाचा काटा स्थिरावत असतो… neutral नसतो हे नक्की!!!

विज्ञान काय म्हणतं याकडे लक्ष दिलं पाहिजे… अमावस्या-पोर्णिमा आणि समुद्राला ओहोटी-भरती हे सत्य विसरून चालणार नाही… दूरवर असलेला चंद्र पृथ्वीवर असलेल्या अथांग समुद्रावर आपली छाप अन वर्चस्व ठेऊन असतो… स्वतःच्या गुरुत्वाकर्षनाची ताकत सिद्ध करत असतो… त्याच्या कक्षेतील बदलाने पृथ्वीवर अनेक गोष्टी घडत असतात… अगदी पाऊस-पाणी, भूकंप, वगैरे… त्याच्या जराशा हालचालीने आपल्याकडे आपत्ती येत असतात… असा हा चंद्र!!! यावर मागे ‘जयदेव’ ने ह्याच ब्लॉग वर एक कविता रेखाटली आहे…

बारा राशींच्या विश्वात किंवा कुंडलीत चंद्राला मनाचा कारक म्हंटलं गेलं आहे… हृदय हे एक स्वतंत्र अस्तित्व ठेवणारा अवयव आहे.. रक्ताचा पुरवठा आणि पेसमेकर यावर ते काम करत असतं… रक्त हे प्रवाही असतं… समुद्रातील पाण्याप्रमाणे… समुद्राच्या पाण्याप्रमाणे… चंद्राच्या कलेचे अन कक्षेचे समुद्रातील पाण्यावर परिणाम होतात तर शरीरातील प्रवाहांवर त्याचा परिणाम होत असेलच? चंद्र हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत असतो, पृथ्वीभोवती फिरत असताना पृथ्वीवर त्याच्या गुरुत्वाचा परिणाम असतो… अनेक धर्मातील कालगणना यंत्र हे चंद्राच्या कक्षेवर अवलंबून आहेत… चंद्राला प्रत्येक संस्कृतीत मोठं महत्व आहे… त्याच्या अनेक गूढकथा, दंतकथा आहेत…

असो… काल बुद्ध पोर्णिमा झाली… मन अस्थिर होतं… तेंव्हा…

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!