नीलिमा येडी हाय! – राखेचा

नीलिमा येडी हाय! – राखेचा

#रात्रीस खेळ चाले  की रात्रीस वेळ चाले  || मालिकेची दशक्रिया  || भानामती, भुतं, हडळ वगैरे आणि अनिस

रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरू झाली तेंव्हा खूप उत्सुकता होती. तशी ती अजूनही टिकून आहे पण छोटी कथानक घुसवून ती अर्धवट सोडून दिली जात असल्याने निरास होतो आहे. संगीत ऐकल्याशिवाय मजा येत नाही… हमं…हो…हमं…हो… वगैरे… अजूनही रहस्य टिकून आहे पण एक विषय घेऊन कथा जरा पुढे न्यावी असं वाटत आहे. नाहीतर ‘ते माका काय माहीत’ असं व्हायला नको…

पण आज विषय दूसरा आहे. विषय आहे निलीमाचा आणि त्यासारख्या असंख्य वृत्तींचा. नीलिमा हे पात्र काय असेल आणि कसं असेल हे सुरुवातीलाच कळलं होतं, पण ते आता अजूनच विक्षिप्त होत आहे. नीलिमा सारख्या असंख्य व्यक्ति आज समाजात वावरत आहेत. त्यांना स्वतःला सामाजिक कार्यकर्ते वगैरे म्हणवून घ्यायची हौस असते. त्यांना दुसर्‍यात नेहमी दोष दिसत असतात आणि स्वतः म्हणजे नैतिकतेचे महामेरू असल्याचा भास होत असतो. तशांचा हा समाचार…

नीलिमा स्वतःला वैज्ञानिक वगैरे म्हणवून घेते. त्यात समाज सुधारक आणि पुरोगामी विचारांची पण. शिवाय प्रॅक्टिकल विचार करणारी. पण अशा लोकांच्या वागण्याबाबत खूप प्रश्न पडतात. विशेषतः त्यांच्यात ‘मला सगळं माहिती’ असा अहंकार तर मला खूप चीड आणतो.

पहिली गोष्ट म्हणजे पेहराव. जैसा देस वैसा वेस असं आपण म्हणतो. अगदी दुसर्‍या देशात जाताना तेथील पेहराव करायचा प्रयत्न करतो. पण गावाकडे जायचं म्हंटलं की आपला ‘मॉडर्न’ पोशाख आणि रूप मिरवायची आवड अशा अनेकांना असते. त्यावर काही कोण बोललं की मग, ‘हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्य आहे’ अशा बाता ते मारतात. पण मग खेड्यातील एखादा शहरात आला आणि त्याला शहरी तरिके माहीत नसल्याने तो तसाच गावातल्याप्रमाणे राहतो तेंव्हा तुम्ही त्याला गावांढळ म्हणता! म्हणजे त्यांच्या तेथे तुम्ही गेलात तरी तुम्हीच शहाणे आणि ते तुमच्या येथे आले तरी तुम्हीच शहाणे. हा अहंकार आहे.

दूसरा मुद्दा. यांना परंपरा अन पारंपरिक प्रथा आवडत नाहीतच शिवाय विरोध असतो. म्हणजे लग्नात अक्षता म्हणून तांदूळ वाया घालू नये असं वाटतं, मेल्यानंतरच्या विधी तर निरर्थक आहेत असा त्यांचा समाज असतो. असतीलही. मग हेच एखाद्या गरिबाला वाटू किंवा हा निरर्थक खर्च आहे असा त्यांचा अट्टहास असतो. ठीक आहे. सुरुवात तुमच्यापासून करू. तुम्ही तुमच्या रहाणीमन आणि इतर गोष्टींवर अमाप खर्च केलेला चालतो. भारी मोबाइल, कपडे, गाड्या अन अशा अनेक गोष्टींवर केलेला खर्च तुम्हाला दिसत नाही. बर्थडे वर लाखोंच्या पार्ट्या दिलेल्या चालतात पण पारंपरिक सण आणि प्रथा म्हंटलं की तुमची नाके मुरडतात. ही तुमची सामाजिक जाण!

मालिकेत जे दाखवत आहेत ती अंधश्रद्धा आहे यात दुमत नाही. पण दरवेळेस ‘कोणीतरी मुद्दाम करतय’ किंवा ‘यात काहीतरी कट आहे’ शिवाय ही अंधश्रद्धा आहे, तुम्ही मूर्ख आहात अशी जाणीव करून देणे यात गर्व आहे आणि अहंकारही… स्वतःला सगळं कळतं याच्यातला. पण मालिकेत नीलिमाकडे कसलीही उत्तरे नसतात. कशाचाच शोध ती घेऊ शकत नसते. कुठलेच अर्थ लागत नाहीत. उलट जे घडत आहे ते ‘बाहेरचं’ आहे असं दिसत असूनही ते दुसर्‍यांना मूर्खात काढतात ते बरोबर वाटत नाही. आपल्याला ज्यातलं समजत नाही त्यावर बोलू नये हा साधा संकेत ते न पाळता ‘ज्ञान पाजळत’ सुटतात.

आता महत्वाची गोष्ट. ही लोक स्वतःचा स्वार्थ आला की प्रॅक्टिकल होतात. एरवी पैसा गरीबला द्या, पैसा काय करायचा, आम्ही सामाजिक कार्य करतो वगैरे ते म्हणत असतात पण नीलिमा जेंव्हा जमीन देऊन टाकायची वेळ येते तेंव्हा काय करते? तर तिच्याही हातून ती जमीन सुटत नसते. मग त्या मोहाला ते एक व्यवस्थित गोंडस असं नाव देतात. काय तर future planning वगैरे.  नीलिमा तर तिकडे परस्पर जमिनीचा सौदा करत असते. हे काय म्हणावं? हे कसले सामाजिक आणि पुरोगामी विचारांचे? हे तर स्वार्थी लोक. स्वतःचा स्वार्थ बघणारे अन सरड्याप्रमाणे रंग बदलणारे. स्वतःला हव्या असलेल्या वस्तूसाठी, स्वतःच्या हेतुसाठी ते एका गोंडस नावाचा आधार घेऊन लपतात.

अशा प्रकारच्या वृत्तीची अनेक माणसे आपल्या समाजात वावरत असतात. यांचा एक समज असतो, आपण शिकलेले, चार पुस्तकं वाचतो, इकडे-तिकडे फिरतो अशा गोष्टींमुळे आपण समाजातील इतर लोकांपेक्षा जास्त हुशार आहोत. आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे आणि ते योग्यरीत्या व्यक्त करता येतं म्हणून अडाण्यांना चार गोष्टी शिकवायचा आपला अधिकार आहे आणि त्यांच्यावर हुकूम गाजवायचा आपला हक्क आहे. अशांना मग अहंकार असतो. रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेतील नीलिमा हे त्यांचं प्रातींनिधिक उदाहरण आहे. जिथे-तिथे स्वतःचा शहाणपणा दाखवायचा आणि इतरांना मूर्खात काढत राहायचं असाच त्यांचं वागणं असतं. मालिकेतील नीलिमा हे पात्र पुर्णपणे ग्रे अन ब्लॅक शेड कडे झुकणारं आहे. स्पष्ट बोलण्याच्या नादात दुसर्‍यांना दुखावणं, त्यांना कमीपणा दाखवणं हा तर त्यांच्या वागण्यातील प्रमुख घटक. सोयीनुसार अर्थ काढणे आणि त्यानुसार वागणे हेच त्यांना अभिप्रेत असतं. ह्या मालिकेत नीलिमा येड्याप्रमाणे वागते असं बरीच मंडळी मानतात… त्यामुळे हा लेख!!!

नोट- ही टीका नीलिमासारख्या वृत्तीच्या व्यक्तींवर आहे. कोणा एका एका व्यक्तिला आणि कलाकाराला किंवा संघटनेला दुखावणे हा हेतु सर्वथा नाही.

रात्रीस खेळ चाले!

© 2016 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!