आणखी एक रात्र गाजवलेली…!

आणखी एक रात्र गाजवलेली…!

मराठी कथा || हास्यकथा  || विनोदीकथा  || Marathi Story  || अतिशयोक्ती  ||  भन्नाट  || 

शत्रूचा आमच्या गडात घुसून हलकल्लोळ… 

वेळ तशी रात्रीची होती, मध्यरात्रच म्हणा… कथेच्या नावावरून हे कळतेच की वेळ रात्रीचीच असणार ते… आम्ही काही तुम्हाला अगदीच ‘हे’ समजत नाही.. पण कथेची सुरुवात करायची म्हणून वेळ सांगितलेली बरी… असो… झोपायची वेळ झाली असल्याने आम्ही आमच्या शयनकक्षात जाण्यापूर्वी गडाचे सर्व दरवाजे-खिडक्या तपासून पाहत होतो. ही तर आमची जुनीच सवय. निजण्यापूर्वी गडाचे सर्व दरवाजे वगैरे व्यवस्थित लावले आहेत का हे तपासून पाहत असतो… सावध राहणे हे तर आमच्या स्वभावातच आहे… रोजप्रमाणे आजही तिच रीघ ओढत होतो. पण आज एक गजहब झाला. आमच्या हातून गडाच्या एका खिडकीला बंद करण्याचे राहून गेले होते! रोज सारा गड फिरून (आमचे आम्हीच) मजबूत तटबंदी बघणे हे कैसे मोलाचे असते हे अशा घटनेने कळते… तर, खिडकी उघडी आहे हे लक्षात येताच आम्ही तातडीने ती चूक सुधारण्यास तिकडे धावलो आणि खिडकी लावून घेतली आणि ‘श्शे, पुन्हा कुचराई नको’ असं स्वतःशी म्हणत पुन्हा आमच्या शयनकक्षाकडे निघालो. (असही इतक्या रात्री कोण असणार म्हणा? ते भयकथेत असतं. मी एकटा नव्हतो वगैरे!).

खिडकी जर व्यवस्थित लावली नाही तर एखाद रातपक्षी किंवा इतर पशू-पक्षी आत येऊन गडाची नासाडी करीत सुटतात (जे आम्हास शक्यतो सकाळी दात घासताना लक्षात येते; एकदा तर आम्ही सकाळी दात घासत असताना घराच्या, आपलं गडाच्या खिडक्या उघडत होतो आणि आमचा पाय कशात तरी रूतला… आम्ही खाली पाहिले अन किळस येऊन डोळे गच्च मिटून घेतले… समोरच्या उघड्या खिडकीकडे लक्ष जाताच समजले की त्या चुकून अर्धवट उघड्या राहिलेल्या खिडकीतून काल रात्री, कोणत्यातरी प्रहरी, एक नादान मांजर आत शिरले अन घरात धुडगूस घालून झाल्यावर ज्यावर आमचा पाय पडला होता तो पराक्रम करून गेलेले समजले…

तेंव्हापासून रात्री निजण्यापूर्वी आम्ही खिडक्या तपासायची सवय जाणीवपूर्वक लाऊन घेतली…) शिवाय खिडकी-दरवाजा व्यवस्थित न लावणे हा सुरक्षेचा गंभीर मुद्दा, चोरा-दरोडेखोरांना तर असे खासे कमकुवत बाबी हव्याच असतात. पण आम्हीही कोणी अनाडी नव्हतो. असो…

आम्ही गडाची खिडकी लावलो आणि आम्हाला काहीतरी चाहूल लागली, कसलातरी दबकता, गूढ आवाज कानी पडल्याचा आभास झाला, कोणी तरी मागे उभे आहे असे वाटून गेले, भास होता की वस्तुस्थिती, अगदी नारायण धारपांच्या कथेतील परिस्थिती म्हणावी तैसी… आम्ही चटदिशा मागे वळून पाहिले आणि आमची पाचावर धारणच बसली, पिवळी होण्याच बाकी राहिलं होत (येथे पिवळी होणे म्हणजे त्या भयाण धक्क्याने अडखळून, घसरून मागे ठेवलेल्या शिळ्या वरणावर पडून कपडे पिवळे होणे)…

जुनं वैर समोर उभं होतं… साक्षात… साक्षात… मांजर उभे…. परमेश्वरा हे काय विपरीत घडले… तुलाही रात्रीच्या समयीच ऐस्या कठीण परीक्षा का घ्याव्या वाटतात कोणास ठाऊक… का भारत-इंग्लंड मध्ये सकाळ-रात्र असा फरक असतो तसा तुझ्या आमच्या दुनियेत आहे का ते तरी सांग एकदाचं… पण आता ह्या जाब-जबाब करण्याला अर्थ नव्हता… दिव्य समोर होते… ज्या हिंस्र पशूची आम्हास इतकी भीती वाटते त्याच्या सामोरी जाण्याची वेळ आली… हा मार्जार समोरून आडवा गेला तरी भले-भले सात पाऊले मागे वळतात… भयकथांमध्ये तर ह्याचा काळा रंग देऊ-देऊ वापर करतात… ह्यांच्या भांडणात क्व्याव… क्व्याव… असा निर्माण होणारा ध्वनीने तर काचेलाही तडा जाईल… आणि तोच पशू आमच्यासमोर…!

Cat, Breed Cat, British Shorthair, Mieze

मागच्या खेपेस ह्याच मांजराने घरात घुसून पराक्रम केलेला असावा… त्याला हे घर खासे पसंद पडले असावे… पण गेल्या वेळेच्या प्रसंगापासून आम्ही ह्या प्राणी जातीवर दात-ओठ खाऊन असतो… (तो वास… उलटी… धुण्यास लागलेला वेळ…. हे परमेश्वरा!) परमेश्वर खासी वार्षिक परीक्षा घेत आहे आणि तीही गणिताच्या विषयाची अशी मनोमन खात्री पटली… पण आम्हीही कोण ऐरे-गैरे नाहीत हा तो चांगलाच जाणून होता… आम्ही घाबरलो नसलो तरी थोडेसे बिचकलो होतो…..

ते मांजर (उच्चारतानाही पापडाची जीभ होते आहे…. आपलं जिभेचे पापड होत आहे, तीही लिज्जत पापड अगदी कर्रम-कुर्रम). असो… ते मांजर आमच्याकडे आणि आम्ही त्याच्याकडे उभ्या देहाने बघत होतो… विशेष म्हणजे दोघांच्या नजरेत एकच भावना होती असं वाटत होतं… त्याची पांढरी-हिरवी नजर आणि माझी जवळजवळ पांढरीच… आम्ही हिमतीने बाजूला उडी घेतली आणि मांजर जेवणाच्या मेजावरून (टेबल बरका….) उडी घेऊन त्या खिडकीकडे झेपावले, पण त्याच्या (आणि त्याहीपेक्षा आमच्या) दुर्दैवाने आम्ही आत्ताच ती खिडकी गच्च लावून घेतलेली…! मग आमच्या सारी लक्षात गडबड आली, म्हणजे… सारी गडबड आमच्या लक्षात आली… आम्ही खिडकी लावायच्या आधी ते मांजर गडावर घुसलं होतं आणि आमच्या नजरेस चुकवून. ते सारं गडभर फिरून आलं, नव्हे हेरगिरीच ती… असो… आणि आम्ही ती खिडकी लावत आहोत हे त्याच्या ध्यानी येताच ते परतायला बघत होतं, तो एकमेव त्याच्या परतीचा दोर आहे हे त्यास खास मालूम होतं… त्याच्या परतीचा अन आमच्या ‘बचतीचा’ तो एकमेव मार्ग होता… आम्ही आमच्या पराक्रमी हातांनी ते दोर कापून काटले आपलं टाकले होते… सूर्याजी मालुसरेच जणू… असो…. त्याला तर परतीचा मार्ग सापडला नाही पण त्यामुळे ते आमच्यावर झेपायच्या आत आम्ही तेथून निसटलो… निसटलो कारण हल्ल्याच्या आधी वाघही दोन पाऊले माघार घेतो हे आम्हास भलतं ठाऊक होत… अशा प्राण्याशी लढायला आम्ही घाबरत नाही हे आम्ही ठासून सांगतो… म्हणून आम्ही त्या मुदपाकखाण्यातून (किचन) बाहेर पडलो….

परतीचा मार्ग बंद आहे हे त्या कुकर्मी मांजराच्या ध्यानी आल्याने ते मांजर बिथरलं होतं, आणि त्याचमुळे ते सगळीकडे धावून हलकल्लोळ माजवत होतं. सगळे भांडे पाडत होतं (हवी ती गोष्ट मिळाली नाही तर स्त्री जातही असंच करते असं आम्ही ऐकून आहोत… मांजराला मावशी हा पुल्लिंगी शब्द का वापरतात हा योगायोग वाटतो की काय आपणास???) ते मांजर खिडकी-दरवाजे परत-परत तपासात होतं… ते आमच्याकडे धावलंच पण तितक्यात आमच्या हाती कपडे वाळत घालण्याची काठी, अगदी भवानी मातेच्या कृपेने, अलगद सापडली आणि आम्ही ती काठी हाती घेऊन धाडकन जमिनीवर आपटताच ते मांजर आमच्या रौद्र रूपाला (खरं तर भेदरलेलं असंच म्हणावं) घाबरून परतलं आणि त्या मघाशी सांगितलेल्या मेजाखाली जाऊन दडून बसलं… खरोखर, त्या क्षणाला ती कपडे वाळत घालण्याची काठी जणू आम्हाला भवानी मातेने महाराजांना दिलेल्या भवानी तलवरीपरमाने वाटून राहिली (खुलासा – ‘वाटून राहिली’ असा शब्दोच्चार असला तरी आम्ही वैदर्भीय नाही. तसे असतो तरी काही आक्षेप नव्हता, पण नाहीत तर काय करणार आता)

आता ते कुकर्मी मांजर आणि त्याचा जाण्याचा मार्ग त्या रस्त्यात आम्ही अगदी वीर बाजीप्रभू प्रमाणे उभे होतो… मघाच्या छोट्या विजयाने (काठी आपटणे, मांजर मागे जाने वगैरे) आमच्या अंगात दहा हत्तींचे बळ सामावले, अंगात वीरश्री संचारली होती…. आम्ही त्या मांजरला ठार मारायचं नाही पण चांगली अद्दल घडवायची ठरवलं होत…. पण… हो हो पण… मघाशी झालेल्या भांड्याचा आवाजाने आमच्या मातोश्री दचकून जाग्या झाल्या होत्या, आमचे वडीलसाहेब आणि थोरले बंधु परदेश मोहिमेवर असल्याने काय संकट आले असेल? असे त्यांना वाटले, पण त्यांना सत्य परिस्थिती समजल्यावर काही गंभीर असं वाटलं नाही, पण आम्हाला त्या घटनेचं गांभीर्य पुरतं ‘जाणवलं’ होतं….

मातोश्रीन्नी आधी आम्हास जोरदार शिव्या दिल्या, का तर आमच्यामुळे इतका धिंगाणा आणि आवाज झाला असा त्यांचा आरोप होता, त्यात मांजराच्या केसालाही धक्का लागायला नाही पाहिजे अशी गळ घातली. का तर, त्याला काही झालं तर काशीला जाऊन प्रायश्चित्त घ्यावं लागेल असे त्यांचे बोल होते… पण त्या अघोरी मांजराने आमच्यावर धाव घेऊन, हल्ला करून जर का आमचा गळा फाडला असता किंवा कोथळा बाहेर काढला असता, तरीही नंतर त्यांना काशीला जावंच लागलं असतं हे दुर्दैवाने त्यांच्या मनी आलं नाही… पण आम्ही खचलो नाही, स्वराज्याच्या सुरक्षिततेपुढे आम्ही हर आरोप झेलायला तयार होतो… त्या बिचार्‍या ‘मनी’ मुळे ही गोष्ट मातोश्रीच्या ‘मनी’ आली नाही… असो…

आता त्याला न मारता काहीही करून गडाच्या बाहेर घातलं पाहिजे हे आमच्या मनी आलं… मग काहीही करून त्याला गडाच्या बाहेर काढायचा आम्ही चंगच बांधला, जणू अफजलखानाने विडाच उचलावा… ह्या सार्‍या गोष्टी घडत असताना, आम्हाला हे सगळं लिहायला लागेल तितका वेळ निघून गेला असावा. थोडक्यात, आता रात्रीचा एक वाजून गेला होता… ते दुष्कर्मी मांजर डोळे वट्टरुण तेथून आमच्याकडे बघत होत… आमची तर सटकलीच (कारण आम्ही ह्या गावचे जयकांत शिखरे आहोत हे मानायला तो तयार नव्हता!)… पण आमचे हात दगडाखाली अडकले होते… करणार काय? हीच श्रींची इच्छा, हे आमच्या तल्लख बुद्धीने जाणले होते… मग आम्ही विचार केला की गडाचा दिंडी दरवाजा (म्हणजे जिन्याकडे उघडणारा हो; त्याला आम्ही दिंडी अशापायी म्हणालो, कारण दूधवाला अन कामवाली त्या दरवाजातून दिंडी वाजवत यावे तसे तोंड वाजवत येतात!) उघडावा. का की, त्यातून ते निर्लज्ज मांजर तेथून गप-गुमानं निघून आपल्या मार्गाला जाईल…. पण हे होणे नियतीच्या मनात नव्हतेच मुळी, त्याने मनो’मनी’ आम्हाला छळायचं निश्चित केलं होतं… तसा आमचा गुन्हा काय? तर अनावधानाने आम्ही त्याच्या परतीचा मार्ग बंद केला हाच. पण आतातर तोही उघडून दिला होता ना? पण ते त्याला मान्य नसावं, त्याच्या हेकेखोरी ‘मनी’ कदाचित ‘बूंद से गई वो हौद से नही आती’ असं काही असावं… आम्हाला तर ते मांजर ‘कृष्णकुंज’ कडील वाटलं (सेन्सॉर)….

त्याची धुण्यावाचून (पापं) आम्हास दूसरा कुठचाही मार्ग दिसत नव्हता… आम्ही धर्मसंकटात सापडलो होतो… एका बाजूस मातोश्री त्यास त्रास देण्याच्या सख्त विरोधात होत्या, आणि आम्ही काही त्यांच्या शब्दबाहेर नव्हतो; कारण गेलो असतो तर मांजर नंतर पण त्याच्याआधी आम्हीच गडाबाहेर फेकलो गेलो असतो आणि ते मांजर खिदळत आमच्याकडे बघत बसलं असतं. अशी नामी संधी आम्ही त्याच्या हाती लागू देणे क्रमप्राप्त नव्हते. दुसर्‍या बाजूने त्याला हाणल्या शिवाय आमचा आत्मा काही काळ्या शांत झाला नसता. पण ‘मौका सभी को मिळता है’ हे आम्ही जाणून होतो आणि म्हणूनच त्याला निसटण्याची संधी आम्ही देत होतो…

ते खुनशीही आमची सय्यम परीक्षा घेत होतं. इतका मोठा दरवाजा उघडूनही ते काही हलायला तयार नव्हतं. ते तिथून अतिशय खुनशी नजरेणे आमच्याकडे बघत होतं. तीन वर्षे एखाद्या तुरुंगात असलेल्या असलेल्या वासनांध व्यक्तीने, तुरुंगातून सुटताच एखाद्या भर वयात आलेल्या सुंदर तरुणीकडे जसं बघावं तसेच, अगदी तसेच ते माझ्याकडे बघत होतं…

त्याचा राग यावा तितका कमी… पण आम्ही सय्यमी आहोत हे सर्वांना ठाऊक आहेच. ते मांजर सारखं त्या खिडकीकडे डोळे वट्टारुण एकदा तर माझ्याकडे एकदा पाहत होतं. तीच खिडकी जेथून त्याने शिरकाव केला होता. त्याची नजर दोन वेग-वेगळ्या जागेवर फिरायची पण नजरेतील भाव एकच असायचे… आम्हाला कळून चुकलं की ज्या खिडकीतून ते आलं आहे, तेथूनच परत जाण्याची त्याची मनीषा आहे… त्याची मर्जी राखणच आता आमच्या नशिबी आहे हे दुखं आमच्या मनात दाटून आलं…

पण ही त्याची एखादी खेळी तर नसावी ना? की आम्ही त्याच्यासमोर ती खिडकी उघडाया जावे आणि त्याने झेप घेऊन आमचा गळा धरावा… छे….छे….छे… आम्ही गाफिल असूचं शकत नव्हतो…. भावनेच्या आहारी जावून निर्णय घेणे आम्ही नेहमीच टाळत आलो आहोत… मग आम्ही शक्कल लढवली (गेल्या दीड-दोन तासाच्या लढाईमुळे आमची शकल बिघडली होती म्हणून!) आम्ही पटकन लगतच्या खोलीत गेलो अन झटकन परत आलो ते हातात उशी घेऊनंच… काय म्हणता? आमच्या हातात तर काठी होती असं का… हो पण आमचा दूसरा हात अजून शाबीत होता म्हंटलं… मग काय… एका हातात उशी आणि दुसर्‍या हातात काठी हे आमचं रौद्र रूप पाहून भले भले घाबरले असते, पण त्या नादान मांजरला जिवाची फिकीर नसावी, तो आमच्या ह्या तेजोमय रूपाकडे ढुंकूंनाही पाहत नव्हता आणि पाहिलाच पाहिला तरी त्याच्या भावना खुंकार होत्या…

आम्ही बळ एकवटलं, धैर्य दाखवलं आणि तसेच त्या मूदपाकखाण्यात थेट शिरलो… एव्हाना मनात विविध भावना जमा होऊ लागल्या होत्या, लहानपणी गणितात नापास झाल्यावर पिताश्रिंच्या सामोरे जाण्यास जेवढे घाबरलो नसू तितके आज घाबरलो होतो. काय करणार प्रसंगच बाका होता. आई भवानीने ऐसी कठीण परीक्षा घेण्याचे योजले होते त्यापुढे कोणाचे ते काय चालावे….

आम्ही चलाखीने मेजावर असलेलं भांडं काठीच्या एका तडाख्याने पाडले, आणि आमच्या अचूक अंदाजाप्रमाणे ते नीच मांजर धाय मोकलून (क्व्याव… क्व्याव… असा आवाज) ओरडत बाहेर निघाले अन सैरावैरा धावत सुटले (ह्यावरून आम्ही मैदानी लढाईत किती सामर्थ्य दाखवू शकतो हे सार्‍यांच्या लक्षात आलेच असेलच?)

शत्रू बिथरल्याचे पाहून मग तितक्याच चपळाईने आम्ही ती खिडकी त्याच काठीने ढकलून उघडली ज्यावर मांजराचा इतका वेळ डोळा होता… ती खिडकी उघडून आम्ही मागे वळतो न वळतो एवढ्यात ते.. ते.. ते.. मांजर सगळीकडे बोंबलून भटकून झाल्यावर आमच्या मागून आले आणि घात झाला… दगा….दगा…..दगा… सैरावैरा पळतो आहे ऐसे दाखवून ते आमची त्या खिडकीनजीक येण्याची वाटंच पाहत होतं… त्याने आमच्या अंगावर जोरदार उडी घेतली आणि आमची पिवळी झालीच (पुन्हा एकदा सांगतो, आम्ही घसरून तेथे ठेवलेल्या शिळ्या वरणावर पडलो आणि आमची पिवळ्या रंगाची पॅंट अजूनच पिवळी झाली) आणि उगाच आम्हाला भीती दाखवून ते मांजर त्याच्या मनोमन इच्छेप्रमाणे त्या खिडकीतून बाहेर केंव्हाच पळून गेलं होतं….

ह्या सार्‍या घटना घटेपर्यंत रात्रीचा एक प्रहार संपला होता… त्या भयानक संग्रामानंतर सारी रात्र आम्ही झोपू शकलो नाही… रातभर उगा येरझार्‍या मारत होतो… गडाची तटबंदी कशी मजबूत करावी यावर सोचत होतो… अखेर ज्यासाठी ते पातळ आपलं पाताळयंत्री मांजर आमच्या गडावर घुसलं होतं ते दूध आम्ही प्राशन केलं आणि गप-गुमान आमच्या बिस्तरात जाऊन पडलो… रात्रभर स्वप्ने आली पण झोप काही येऊ शकली नाही…..! ही रात्र गाजवली होती की निव्वळ जागवली होती कोण जाणे?

===समाप्त===

@Late_Night1991

रहस्यकथाही वाचून बघा… 

खिडकी: भाग १

© 2014 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!