योग आणि नशीब

योग आणि नशीब

#वास्तु_लग्न_पैसा  ||  मराठी कथा   ||  अनुभव  ||  Destiny   

बर्‍याचदा आपण वयस्कर मंडळींकडून किंवा जेष्ठांकडून ऐकत असतो, ‘शेवटी जे नशिबात असेल ते होईल.’ किंवा ‘योगायोगाची गोष्ट असते.’ हे वाक्य तर आपण नेहमीच ऐकत असतो. अशी वाक्ये ऐकल्यावर आपल्याला त्याचा कधी-कधी रागही येतो. योग किंवा नशीब वगैरे असं काही नसतं असं म्हणणरेही भरपूर आहेत. कोणाचा अशा गोष्टींवर विश्वास असतो तर कोणाचा अजिबात नसतो. बरं, याचा अन सुशिक्षित-अशिक्षित असल्याचा काहीच संबंध नाही.

वास्तु, पैसा अन लग्न ह्या योगायोगाने अन नशिबात असणार्‍या गोष्टी असतात असं बरेचजण सांगत असतात. गेले काही दिवस ह्याच ‘योगाचा’ अनुभव मला येत आहे. लग्नाच्या किंवा पैशाच्या नाही. तर वास्तूच्या!

पुण्यात आनंदनगर मध्ये गेली तीन वर्षे एका फ्लॅट मध्ये भाड्याने राहत होतो. तो फ्लॅट असाच योगायोगाने भेटला होता. म्हणजे ओळखीच्या एका गृहस्थांकडून तो मिळाला होता. चांगली साडेतीन वर्षे काढली तिथे. त्या वास्तुचं किंवा त्या मालकांचं आम्ही देणं लागत असू असा काहीतरी तो योग! म्हणजे तितके दिवस आम्ही तिथे राहिलो हे आमचं नशीब! नंतर नवीन जागेची शोधाशोध सुरू केली. २८ एप्रिलला सकाळ पेपरमध्ये एक जागेसंबंधी जाहिरात वाचली. त्या जागामालकाशी संपर्क केला आणि एक महिन्याचं advance भाडं देऊन नवीन जागा बूक करून टाकली. पण तिथे राहणारा जो आधीचा भाडेकरू होता त्याच्या घरी श्राद्ध होतं. त्यामुळे चार तारखेपर्यन्त थांबावे लागणार होते. म्हणजे जुन्या वास्तूशी अजून चार-सहा दिवस जास्तीचा सहवासयोग होता. मग चार तारखेला नवीन जागेत गेलो. व्यवस्थित राहू लागलो. पण सात-आठ तारखेला त्या मालकाचा फोन आला. त्यांना स्वतः त्या जागेत राहायचं होतं. मग काय. पुन्हा शोधाशोध! त्या मालकाविषयी अन संपूर्ण घटनेविषयी सविस्तर ‘उघडणी’ मी नंतर ‘अशी ही बनवाबनवी’ ह्या मालिकेतून करणारच आहे.

Image result for destiny quotes

आठ मे पासून पुन्हा शोधाशोध सुरू. त्या वास्तूचा योग केवळ चार दिवसच होता. नंतरचे दिवस विनियोग होता. मग शेवटी कटकट करत पुढच्या चार तारखेला ती वास्तु नावाची भंगार जागा सोडली. त्या वास्तुच्या नशिबात आम्ही कमी दिवस होतं यात त्या वास्तुचं कमनशिब अन आमचं चांगलं नशीब म्हणावं लागेल. पण नंतर मिळून तरी जागा कोठे मिळाली; तर त्याच सोसायटीत अगदी समोरचीच. सोसायटीचं नाव #शिवपुष्प होतं. मग तिथे काही दिवस काढले. त्या तिसर्‍या वास्तूत राहायला गेलो पंधरा जून ला. नंतर मग दहा जुलै ला परत त्या मालकांचा फोन. ते स्वतः त्या जागेत पुन्हा राहायला येणार होते. अवघ्या महिनाभरात त्यांचा निर्णय बदलला. मग पुन्हा शोधाशोध!

ह्या सगळ्यातून सांगायचं एकच आहे. योग! म्हणजे मी तीन महिन्यांत तीन जागा बदलल्या. म्हणजे त्या तीन वास्तूंचं अन त्या तीन मालकांचं मी काहीतरी देणं लागत असतो म्हणे! त्या शिवपुष्प सोसायटी मधले कर्मकठिण तीन महीने हे माझ्या नशिबात लिहिले गेले होते. त्या तिन्ही वेळेस स्वतः मालक त्या-त्या जागेत राहायला येणार होते. एकाचा निर्णय चार दिवसांत बदलला. एकाचा महिन्याभरात. पण त्यापेक्षा महत्वाचा भाग म्हणजे ते तीन महीने ती वास्तु अन माझा योग जुळून आला होता. योग चांगला नव्हता हा भाग नशिबाचा!

त्यातच अजून एक वास्तु योग जुळत होता. भाड्याच्या घरात राहून उगाच भलते योग नशिबी येत होते म्हणून मग स्वतःचं घर बघत होतो आम्ही. बराच शोध घेतल्यावर एक वास्तु सापडली. चांगली होती. सगळं व्यवस्थित होतं. आमच्या सगळ्या गरजा व मागण्या त्या वास्तूकडून पूर्ण होऊ शकल्या असत्या. वास्तु पसंत पडली. पैशांचा प्रश्न आडवा येत होता पण तोही बेमोसमी ढगांप्रमाणे पुढे सरकत गेला. वास्तु अन आमचा योग जुळत होता पण पुन्हा माशी शिंकली. त्या वास्तूवर काहीतरी लहानशी कोर्ट केस, तीही ग्राहक न्यायालयात चालू होती. पुढे सरसावलेले हात पुन्हा मागे आले. जुळत असलेला योग अर्धवट राहिला. ती पसंत पडलेली वास्तु नशिबी नव्हती! ती वास्तु आमच्या अन आम्ही त्या वास्तूच्या नशिबी नसू कदाचित. अन वास्तु खरेदीचा योग नसावा. तत्पूर्वी अशीच एक घटना घडली होती. आम्हाला एक वास्तु पसंत पडली होती. पण नंतर समजलं की ती ईमारतच अंनधिकृत असून, रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत जाणार आहे. तेथेही योग जुळला नाही. वास्तु घेताना पैसे देणे-घेणे व्यवहार असतात. आपण त्याचं देणं अन आपल्याकडून त्याचं येणं असा काहीतरी तो योग असतो म्हणे. त्यात वास्तु ही जीवंत असते असं आपल्याकडे मानतात. त्या वास्तूशी आपलं जितकं काही देणं-घेणं आहे ते होतच.

वर म्हंटल्याप्रमाणे वास्तु, लग्न अन पैसा ह्या गोष्टी नशिबात अन योगात असतात. मी शेअर मार्केट मध्ये काम करतो. तिथे तर पैसा अन नशीब-योग यांचा खूप जवळचा संबंध असतो. आज विकलेला शेअर उद्या दुपटीने वाढतो तेंव्हा काल विकल्याचं दुखं असतं पण तेंव्हा समजतं की इतकाच पैसा आपल्या नशिबी होता. किंवा लग्नाचं म्हणाल तर जुळत असलेल्या गाठी केवळ क्षुल्लक कारणाने तुटतात आणि पुन्हा काहीतरी कारणाने त्याच जुळल्या जातात. हे योग असतात.

मूल जन्मल्यावर सटवाई त्याचं नशीब लिहून जाते, असं आपल्याकडे मानलं जातं. पण मग योगायोगचं काय? ते घडणारे किंवा न घडणारे योगायोग कुठे लिहिलेले असतात?

—*—

अभिषेक बुचके  }{   @Late_Night1991

गल्लोगल्ली नटसम्राट!!!

© 2016 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!