दवाखाना – एक वेदनाघर भाग १

दवाखाना – एक वेदनाघर भाग १

#दवाखाना – एक वेदनाघर  ||  अनुभव  || निरीक्षण  ||  व्यक्त  || वेदना

दवाखाना म्हंटलं की एक नीरस अन वेदनादायी चित्र आपल्यासमोर उभं राहतं. परमेश्वराने हे शरीर निर्मित केलं अन त्यासोबत दिल्या त्या अनंत व्याधी. मानवी मनाला अन शरीराला किती प्रकारच्या व्याधी असू शकतात याची यादी केली तर ती फार लांबलचक होईल. पूर्वीच्या काळी आजारपण आली की वैद्य किंवा मांत्रिक वगैरे बोलावले जायचे. पण आता मानव इतका प्रगत झाला आहे की गल्ली-बोळात क्लिनिक अन दवाखाने झालेले दिसतात. विशेष म्हणजे यातील ९०% गर्दीने भरलेली असतात. खाण्या-पिण्याची उपहारगृहे, अन कट्टे जितके गर्दीने फुललेले असतात तितकीच ही दवाखानेही. पण तेथील गर्दीच्या भावनेत जमीन-अस्मानचा फरक असतो.

दवाखाने म्हणजे आजारी, रोगी लोकांचे गंभीर चेहरे. नाना प्रकारच्या व्याधी अन चिंता! स्मशानात जमलेल्या माणसांच्या चेहर्‍यावर दुखं असलं तरी मनात कुठेतरी आत्मा मुक्त झाला याचं समाधानही असतं. पण दवाखान्यात आलेल्या मानसाच्या अन त्याच्या आप्तांच्या चेहर्‍यावर अन मनातही केवळ गंभीर चिंता असते. शरीराला होणार्‍या वेदना समोर बसलेला डॉक्टररूपी देव संपून पुन्हा पहिल्यासारखा सदृढ बनवेल अशी आशा घेऊनच प्रत्येकजण आलेला असतो. क्षणाक्षणाला मनात उठणारे हजारो प्रश्न डॉक्टर नाडीवर बोट अन छातीवर ब्रम्हास्त्र ठेऊन क्षणात सोडवेल अशी भावना आपली असते. लाखो-करोडोचा मालक असलेला गृहस्थ किंवा गरिबातला गरीब माणूस जेंव्हा आजारी पडतो तेंव्हा शरीर सोडून त्याला संपूर्ण जग निरर्थक वाटू लागतं. आजारपण हे मनाला खात जातं अन त्यातून मुक्ति हेच आयुष्याचं सार्थक असं वाटू लागतं.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचा अॅक्सिडेंट झाला होता. त्याची गाडी वाळूवरून घसरून पडली आणि त्याचे गुडघे फुटले होते. सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. सगळे सोपस्कार झाल्यावर त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्याच्यावर उपचार चालू असताना आम्ही तेथेच बसून होतो. दवाखाना ह्या दुखाची प्रतिमा दाखवणार्‍या आरशाचा मला पहिल्यापासूनच तिटकारा होता. तेथे गेल्यावर येणारा दर्प हा संपूर्ण शरीर बधिर करणारा असतो. संपूर्ण श्वसनसंस्था पछाडुन टाकणारा तो गलिच्छ वास! शिवाय तेथे आलेल्या रोगी लोकांचे दीनवणे चेहरे अन त्यांच्या नातेवाईकांचा हतबलपणा असह्य करून टाकणारा असतो.

आम्ही बसलेलो असताना एक म्हातारा एकटाच आला होता. त्याला कोणीतरी जबर मारहाण केली होती. कसातरी लंगडत-कन्हत तो इथपर्यंत आला होता. डॉक्टरला भेटला. डॉक्टर सहानुभूतीने त्याचं बोलणं ऐकत होते. म्हातारा कुठल्यातरी खेड्यातुन आला होता. काल रात्री त्याच्या पोराने अन सुनेने त्याला यथेच्छ बडवलं होतं असं त्याचं म्हणणं होतं. काठीने अन सळईने त्याला मारहाण झालेली होती. सांगताना तो रडत होता. डॉक्टरलाही गहिवरून आलं होतं. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. एक रात्रभर असह्य वेदना घेऊन तो दुसर्‍या दिवशी येथे आला होता. सोबत कोणीही नव्हतं. हे सगळं मन विषण्ण करणारं होतं. त्याचा x-ray वगैरे काढल्यावर समजलं की त्याचा पाय मोडला होता. हे सगळं आमच्यासमोर घडत होतं. आम्ही केवळ निपचीत अन हतबल होऊन सगळं बघत होतो. तिकडे आमच्या मित्रावर उपचार चालू होते अन तो तिकडून जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. काही मित्र तिकडे गेले, पण माझं काही धाडस झालं नाही. पलीकडे एक चाळीशीतील बाई सुई टोचवून घेण्यास नकार देत होती. तिला कदाचित सुईची भीती वाटत असेल. रडत होती. शेवटी तिला धरून सुई घुसवण्यात आली अन ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. तिने हाताला हिसका दिला अन सुई हातात घुसून भराभर रक्त बाहेर आलं. आता तिच्या ओरडण्याला सीमा नव्हती. तातडीने तिला कुठलातरी स्प्रे मारला अन औषध दिलं. ती बेशुद्ध झाली.

तिथे वरांड्यात आजारी रुग्णांचे नातेवाईकांचे बसले होते. एक तरुण आपल्या बापाच्या मृत्युच्या भीतीने हुंदके देऊन रडत होता. त्याला कोणीतरी सावरत होतं. जमिनीवर काहीतरी अंथरूण दोन बायका अन एक मुलगी बसली होती. त्यांनी डब्बा काढला अन तेथेच जेवण सुरू केलं. दवाखान्याच्या उग्र वासात लसणाच्या फोडणीचा वास मिसळला. पण किळस येत होती. ती मुलगी जेवण जात नाही म्हणून दुसर्‍या बाईला सांगत होती. एका बाकावर दोन मध्यमवयीन माणसे बोलत बसली होती. काहीतरी कागदपत्रे तपासत होती. एक स्मार्ट तरुण स्मार्ट फोनवर काहीतरी खटखुट करत बसला होता. एक खेडूत मघापसून अनेकांना फोन लाऊन पैशांची मागणी करत होता. त्याला सगळीकडून नकार येत होता. तो निराश होत होता. तितक्यात एक अॅम्ब्युलेन्स आली. चटकन मधून कोणालातरी बाहेर काढलं. सोबत पोलिस होते अन सात-आठ माणसे सोबत होती. त्या रूग्णाला स्ट्रेत्चरवरून आत नेत होते. त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता. त्याने औषध घेतलं होतं म्हणे. मला ओकारी आली. मी बाहेर थोड्या कमी अशुद्ध हवेत जाऊन उभारलो.

हे सगळं निराशादायक चित्र बघून मन हेलकावे खातं. जीवनाची यात्रा एका मुक्कामावर येऊन अस्थिर होतेच. गौतम राजाला समाजातील दुखं बघून तीव्र वेदना झाल्या अन तो सगळं वैभव सोडून निघून गेला. गेला सत्याच्या शोधत. त्याला मनशांती पाहिजे होती. ह्या सगळ्या वेदनेतून मुक्ति अन मोक्ष पाहिजे होता. तो बुद्ध झाला. सर्वसामान्य माणूस तो होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. भौतिक प्रेमापोटी माणूस काहीतरी विचित्र जीवन जगतो. शरीर हीच संपत्ती अशी म्हण खोटी वाटते अन भौतिक सुख जवळचं वाटू लागतं. शेवटी तर काहीच राहत नाही पण तो शेवटही पीडा देणारा असेल तर मग काहीच उपयोग नाही. भगवान विष्णूचे अकरा अवतार झाले म्हणे. अगदी मत्स्य अवतारपासून बुद्ध! राम हा एकवचनी होता, सत्यवचनी होता आणि भौतिक सुखाला दुय्यम मानणारा होता. नंतरचा कृष्ण हा चतुर अन भौतिक सुखाचा उपभोग घेणारा होता. अन बुद्ध सगळं त्याग करणरा. पुन्हा भौतिक सुखाला नाकारणारा होता. परमेश्वरही अवतार घेताना भौतिक सुखाला आहारी गेला अन स्वतःची चूक कळताच पुढचा अवतार पुन्हा सर्वस्व त्यागणारा!

एका दवाखान्यात एक आजी आहेत. त्यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. त्यांना माणसे ओळखता येत नाहीत. भूतकाळ आठवतो पण समोरची माणसे ओळखता येत नाहीत. स्वतःच्या पतीला अन मुलाला त्या ओळखत नाहीत. एकुलता एक मुलगा परदेशी. कधीतरी त्यांना भेटायला येतो. पण आजी त्याला ओळखत नाहीत. तो स्वतःची सुटका करून घेतो. ओळखतच नाही तर येऊ कशाला म्हणतो? आजोबा एकटे सगळं ओढत असतात. पैशांची कमी नाही. आजी मात्र कशाही असल्या तरी जगल्याच पाहिजेत असा त्यांचा अट्टहास. त्यांच्याशिवाय त्यांचं कोणीच नाही. ती गेल्यावर एकटे सडू अशी त्यांना भीती. स्वतःच्या स्वार्थापाई ते आजीला जगवतात. ओळखत नसली तरी रोज वेळच्या वेळी तिला खाऊ-पिऊ घालतात. स्वतः कसेतरी जगतात. त्या आजी शरीराने इतक्या बारीक झाल्या आहेत की सलाईन लावायला त्यांची शिर सापडत नाही. सगळ्या हाताला सुई घुसवल्याचे व्रण. शेवटी सेंटर लाइन म्हणून घशात छिद्र पाडून तेथून औषधोपचार… आजी नुसत्या तगमग करायच्या. मृत्यू दे म्हणून सतत परमेश्वराला हात जोडायच्या. आजोबा हमसून-हमसून रडायचे. त्यांना हे बघवत नसत.

अस्थिर विश्वाचे, अस्थिर मनाचे आपण केवळ एक नश्वर प्राणी आहोत. शरीराला वेदना ह्या मृत्यूपर्यंतचं मानवी दुखं आहे. मनाला वेदना ह्या तर मृत्यूपश्चातही पाठ सोडत नाहीत. अनेक अवयवांचे, अनेक पेशींचे बनलेले हे शरीर शेवटी पंचत्वात विलीन होतेच. बारा वर्षाला, अर्थात एका तपात ह्या शरीराच्या प्रत्येक पेशी बदललेल्या असतात. माणूस बदलतो का? सय्यम हा एक अमूल्य दागिना आहे. बुद्धाप्रमाणे सर्वस्व त्यागून मनशान्ती शोधत आपण जाऊ शकत नाहीत. स्वामी विवेकानंद मृत्यू पावले तेंव्हा त्यांच्या शरीरात ४० व्याधी गृह करून होत्या असं म्हंटलं जातं. परमेसवर परमात्मा सहनशक्ती देओ… अंग्निदिव्यातून पार पडायची… 

to be continue…

दवाखाना – एक वेदनाघर भाग २

© 2016 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

1 Comment on "दवाखाना – एक वेदनाघर भाग १"

Notify of
avatar
Sort by:   newest | oldest | most voted
trackback

[…] वाचा -> दवाखाना: एक वेदनाघर […]

wpDiscuz
error: Content is protected !!