पुस्तक प्रकाशित करताय?

पुस्तक प्रकाशित करताय?

#पुस्तक_प्रकाशन  }{  #आर्थिक गणिते  }{  #लेखकांची किम्मत  }{  #ऑनलाइन जग  }{  #Publishing_Book?  }{ बनवाबनवी  }{ फसवाफसवी  }{

अलीकडेच एका मराठी पुस्तक प्रकाशकाची भेट घडली. असच मित्रासोबत बसलेलो असताना माझ्या लिखानाबद्धल विषय निघाला. मी एक कादंबरी अन एक-दोन कथासंग्रह वगैरे खरडले होते. त्यातील “संक्रमण” नावाची कादंबरी मी अगोदरच BookGanga.com वर ई-पुस्तक स्वरुपात प्रकाशित केली होती आणि इतर कथासंग्रह ह्याच वेबसाइट वर Android App च्या स्वरुपात प्रसिद्ध केले होते.

मला मित्राने विचारले की, हे सगळं साहित्य (असं तो म्हणाला. माझं लिखाण साहित्य वगैरे आहे का ते मला माहीत नाही) खर्‍या पुस्तक स्वरुपात म्हणजेच hard copy स्वरुपात का आणत नाहीस. मी आधी हसलो आणि नंतर त्याला ह्या बाबतीत ज्या काही अडचणी आहेत त्या स्पष्ट केल्या. त्याला त्यावर विश्वास बसत नव्हता. त्याने सांगितलं की त्याच्या ओळखीचे कोणीतरी प्रकाशक आहेत म्हणे. आपण जाऊन भेटू असं तो म्हणाला.

मला त्यात फार उत्साह नव्हता. कारण तिथे गेल्यावर काय वाढून ठेवलेलं आहे हे मला आधीच्या अनुभवावरून माहीत होतं. मी डोक्यातून हा विचार काढून टाकला होता. पण तिसर्‍याच दिवशी त्या मित्राचा फोन आला. बिचार्‍याने माझ्यासाठी त्या प्रकाशकाची वेळ घेतली होती. त्या प्रकाशकाने त्याला फोनवर काहीच माहिती दिली नाही. या…बसू…बोलू असं सांगितलं. मित्राचा उत्साह वाढलेला होता. तो मंनापासून माझी मदत करू इच्छित होता. लेखक म्हणजे कोणीतरी भारी माणसं असतात असा त्याचा गोड गैरसमज होता. तो मला काहीतरी ग्रेट वगैरे समजायचा. मी मनात लोळून-लोळून हसायचो.

शेवटी संध्याकाळच्या वेळी आम्ही त्या प्रकाशकांना भेटायला निघालो. आधी मी त्याला पाणीपुरी वगैरे खाऊ घातली. तो परत जाताना खाऊ म्हणत होता, पण जाताना त्याचा मूड नसणार हे मला आत्ताच माहीत होतं. आम्ही पोटपूजा करून तिकडे निघालो.

एका जुनाट इमारतीत ते ऑफिस थाटलं होतं. आम्ही आत गेलो. प्रकाशक साहेब एकटेच काहीतरी वाचत बसले होते. त्यांचा चेहरा गंभीर होता. आमच्या मित्राला बघताच त्यांनी त्याला ओळखलं. बसा वगैरे म्हणाले आणि आम्ही बसलो. ओळख-पाळख झाली. चहा पाणी झालं. मित्राने विचारलं, काही कामात होता का? ते म्हणाले, थोडंसं. ते कसलंतरी साप्ताहिक चालवत होते. त्याचं काहीतरी काम चालू होतं. मग विषयाला हात घातला. मी कादंबरीचा विषय सांगितला. त्याचं आजच्या काळाशी काय संलग्नता आहे, त्याचं सामाजिक वगैरे महत्व काय हे सांगितलं. काही प्रश्नोत्तरे झाली.

मग महाशय बोलायला लागले. त्यांनी टेबलवर, काचेखाली एक कोटेशन ठेवलं होतं. त्यांनी त्याचं दर्शन आम्हाला दिलं. आणि सांगू लागले… ते सांगत होते अन माझ्या मित्राचा चेहरा मात्र हळूहळू पडत होता. बिचारा निराश होत होता. मला ह्याची सवय असल्याने मी सहजपणे हे बघत होतो. महाशयांनी भारी स्कीम सांगितली… तुमची कादंबरी चारशे पानांची आहे… मग काहीतरी कॅलक्युलेशन… मग एक रक्कम सांगितली… पन्नास हजारांच्या आसपास… म्हणजे आम्ही त्यांना तितकी रक्कम द्यायची… ते हजार प्रती छापणार… त्यातील दोनशे आम्हाला देणार… ती रद्दी आम्ही घरी घेऊन यायची… बाकीच्या उरलेल्या आठशे प्रतींचं ते काहीही करणार… काहीही म्हणजे, त्या विकणार… त्यांचे वितरकांशी ओळखी असतात, ग्रंथालय वगैरे असतात तिथे त्या खपवणार… असा तो प्रकार!!!

मित्राचे डोळे मोठे होत गेले आणि नंतर चेहरा बारीक करून बसला तो. मित्राने विचारलं की यात आमचा आर्थिक फायदा काय? तर ते सर्वप्रथम खो-खो हसले अन नंतर म्हणाले की यात आर्थिक फायदा नसतो. फक्त मोठ्या लेखकांनाच royalty किंवा मानधन असतं. बाकीच्यांची हाऊस असते. त्याला मी स्वतः खुमखुमी किंवा खाज म्हणतो. महाशय पलीकडच्या कोपर्‍यात ठेवलेल्या वही-डायर्‍यांच्या गठ्ठयाकडे बोट करत म्हणाले म्हणाले, ते पहा अनेक लेखकांनी माझ्याकडे त्यांचं साहित्य दिलं आहे. ते मी वाचवं अन आवडलं तर छापावे. यावर परत हसणं. मग आम्ही ठीक आहे वगैरे म्हणून बाहेर पडलो. मोफतचा चहा बरा होता.

बाहेर आलो.

आमचा मित्र भलता संतापला. म्हणाला हा शुद्ध धंदा आहे. मी म्हणालो, मग काय सेवा करायला बसले आहेत का ते? आमची चर्चा झाली. आम्ही जर स्वतः प्रिंटिंग प्रेस मध्ये जाऊन छपाई करून घेतली तर आम्हाला पन्नास हजारांत हजार प्रती छापून मिळाल्या असत्या. पण ती रद्दी योग्य माणसांच्या हातात कशी पोचवायची?? म्हणजे वाचकांपर्यंत कशी पोचवायची? वितरण कसं करायचं? का घरोघरी डिटर्जंट घेऊन फिरणार्‍या salesman प्रमाणे घरी जाऊन स्वतःचे पुस्तकं विकायचे. आणि ग्रंथालय अन इतर दुकानांचे उंबरठे झिजवायचे.

हा विचार मी पहिल्यांदा कादंबरी लिहिली अन प्रकाशन करायच्या (गैर)विचारात पडून हिंडहिंड केली तेंव्हाच सोडून दिला होता.

आपल्याकडे दहात पाच माणसे लेखक असतात. पुण्यासारख्या शहरांत तर ते जास्त आहे. जवळजवळ सगळेच (अस्सल पुणेकर) लेखक असतात. अशा लेखकांची पुस्तके प्रकाशक कशाला छापत बसतील. त्यांना काय पैसा जास्त झाला आहे म्हणून? आजकाल प्रकाशक स्वतः विषय घेऊन एखाद्या जाणकार अन मोठ्या व्यक्तीकडे जातात अन पुस्तक लिहून मागतात. त्यांना एकदाच मानधन देतात. कारण त्या लेखकाच्या नावावर पुस्तकं खपून त्यांना पैसा मिळू शकतो.

रोज नवनवे लेखक येऊन पुस्तके छापा म्हणतील तर ते त्यांनाही अशक्य आहे. पण प्रकाशकांनी जरा नम्रपणा दाखवायला हवा. ज्याप्रकारे अनेक लेखकाचे लिखाण त्या कोपर्‍यात पडून होतं ते जरा वाईट वाटलं. कारण लेखकही मेहनत करून लिहीत असतो. बुद्धी खर्च करत असतो. त्यालाही किम्मत आहेच की. एखादा मजूर तुमच्याकडे राबला किंवा कोण इंजीनियरने तुम्हाला सॉफ्टवेअर तयार करून दिलं तर तुम्हाला पैसे मोजावेच लागतात तसा विचार करायला हवा. लेखकाची कृती फुकट घ्यायची अन त्यावर पैसा कमवायचा हा चुकीचा प्रकार आहे. म्हणजे ते प्रकाशक म्हणाले त्याप्रमाणे मीच त्यांना पैसे देणार अन आठशे प्रतींचे पैसेही तेच घेणार यात माझा आर्थिक तोटाच आहे. त्यात त्या प्रकाशकला काहीच कष्ट घेण्याची गरज नाही.

ह्या सगळ्यापेक्षा एक उत्तम अन सहज-सोपा प्रकार आता समोर उभा आहे. ऑनलाइन जग!

स्वतःच्या कृती, लेखन तुम्ही ह्या जगात सहज प्रकाशित करू शकता. बूकगंगा सारखे प्लॅटफॉर्म खूप उपयोगी आहेत. अगदी नाममात्र पैशांत तुम्ही स्वतःच्या पुस्तकाची ई-आवृत्ती काढू शकता. आज जवळजवळ सगळेच लोक स्मार्ट फोन वापरतात. त्यांना हे पुस्तकं कधीही विकत घेता येतील अशी सोय आहे. शिवाय पैसे देवाण-घेवाण यात सगळी प्रक्रिया ऑनलाइन असल्याने कसलाच अविश्वास किंवा गोंधळ नाही. हजार लेखक आले तरी त्यांना सामावून घेण्याची ह्या माध्यमाची ताकत आहे. उगाच उंबरठे झिजवण्यात काही अर्थ नाही. काळाची पावले ओळखली पाहिजेत.

#भालचंद्र नेमाडेंची #बिढार ही कादंबरी वाचली होती. त्यात एक किस्सा आहे. त्यात एक तरुण एक अप्रतिम कादंबरी लिहितो पण त्याला प्रकाशक फसवतो. सगळे डोर प्रकाशकाच्या हातात असतात. मेहनत याची असते पण प्रकाशक ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. ही घोर समस्या आहे. लेखकांना अशी वागणूक अन किम्मत म्हणजे फार वाईट!

@व्यंकटेश माडगुळकर हेही याबद्धल लिहितात. त्यांच्या काळीही लेखकांना आर्थिक स्थैर्य नव्हतं. प्रपंच चालवण्यासाठी काहीतरी वेगळा उद्योग करावा लागतो. लेखकाच्या लेखनावर पैसे लावणारा प्रकाशक पैसा कमावतो अन लेखक फक्त ‘नावापुरता’ राहून ‘नामानिराळा’ होतो. परदेशात लेखकांना मान अन किम्मत आहेच शिवाय मोठा आर्थिक पाठींबाही मिळतो. त्यांची कदर आहे तिकडे.

आपल्याकडे आज चेतन भगत किंवा अजून तरुण लेखक केवळ लेखन यावर पैसे कमावत आहेत. काही लेखक ऑनलाइन लिहिणं पैसे कमवतात. उत्तम आहे. जुने-जाणते जेष्ठ लेखकही आज स्थैर्य प्राप्त करून आहेत. पण सुरूवातीला त्यांनाही ह्याच अवहेलनेतून जावे लागले असेल.

@पू ल देशपांडे यांच्यासारख्या जेष्ठ-श्रेष्ठ लेखकलाही अनेकांनी पैशाला फसवलं होतं. तरी आजचा काळ थोडासा सुखदायी म्हणावा लागेल. कारण टीव्ही, चित्रपट अन जाहिरात क्षेत्र खूप विस्तारलं आहे जेणेकरून अनेक लेखकांना नियमित पैसे मिळत आहेत.  जो मूळरूपाने लेखक आहे. जो कादंबरी-कथा लिहून पारंपरिक पद्धतीने त्या प्रकाशित करू इच्छितो त्याचं अवघड आहे एकंदरीत! पण दहात दोन चांगली उदाहरणे आहेत. बाकी अजून अंधारात चाचपडत आहेत.

माझा मित्र संतापला होता. पण सगळी चर्चा झाल्यावर जरा ताळ्यावर आला. जाताना परत पोटपूजा झाली. आजच्या भेटीनंतर त्याच्यालेखी लेखकांची किम्मत कदाचित कमी झाली असावी.

 

एका लेखकाची व्यथा

© 2016 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!