२३ वर्षे भयाची…

२३ वर्षे भयाची…

#किल्लारी_भूकंप  #Killari_Earthquake   #भयकंप

आज लातूरमधील किल्लारी भूकंपाला तेवीस वर्षे पूर्ण झाली. गणेश विसर्जन करून गाढ झोपलेल्या लोकांच्या आयुष्यावर नियतीने घाला घातला. पहाटे चार वाजता भयानक हादर्‍यांनी जमिनीने आपला जबडा उचकटला अन घास घेतला अनेक निष्पाप जीवांचा. साडेसहा रिश्टर स्केलच्या या भूकंपानं  आठ हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. हाहाकार माजला. मृत्युचे भयाण स्वरूप देशाने पाहिले. रक्ताचा सडा अन मृत शरीरे पाहून वेदनाही बोथट झाल्या. घर, संपत्ती तर गेलीच पण गेले आप्तांचे जीव! जमिनीच्या धक्क्याने झालेले नुकसान भरून आलेही पण मनावर बसलेले तीव्र धक्के काही शांतपणे जगू देत नव्हते अन नाहीत. आजही ह्या गावात भूकंप ह्या शब्दाची भीती आहे. पिढ्या गेल्या पण भय संपत नाही. अधूनमधून साधारण असलेले भूकंपाचे धक्केही तेथील लोकांना रात्र-रात्र घराबाहेर काढण्यास हतबल करतात.

किल्लारी गावाला 1993 पूर्वी  सतत भूकंपाचे धक्के बसत होते आणि मोठ्या भूकंपानंतरही ते बसत राहिले. घाबरलेले लोक शेतात झोपडय़ा करून राहात होते. पण  अधिकारी, लोकप्रतिनिधी  सर्व काही आलबेल असल्याचं सांगत होते. न घाबरता गावात राहायला या, असं आवाहन करत होते. या भागात अग्निजन्य खडक असल्यानं मोठय़ा भूकंपाचा अजिबात धोका नसल्याचं भूवैज्ञानिक सांगत होते. शेवटी तर पत्रकार परिषद घेऊन लोकांना आवाहन करण्यात आलं. हळू-हळू लोक गावात राहायला येऊ लागले . आणि 30 सप्टेंबर 1993 ला  तो विनाशकारी भूकंप झाला.16 हजार लोक जखमी झाले. 52 गावं पूर्णपणे उध्वस्त झाली. 13 जिल्ह्यांना या भूकंपाचा धक्का बसून अकराशे कोटींची हानी झाली. किल्लारीच्या भूकंपात लातूर आणि उस्मानाबाद पट्टय़ातील ५२ गावे उद्ध्वस्त झाली होती.

सरकारी आकड्यांनुसार ७ हजार ९२८ जणांचा त्यात मृत्यू झाला. प्रत्यक्षात अनेकांचे मृतदेह मिळाले नाहीत. त्या घटनेला आता २३ वर्षे झाली. भूकंपाच्या वेळी लहान असलेली पिढी आता तारुण्यात आहे. त्या तरुणांनी आपल्या जगण्याची लढाई नव्याने सुरू केली आहे. भूकंपात आप्तांना गमवावे लागणे हे वेदनादायी होते. मात्र, अशा समस्यांवर काळ हेच त्यावरचे एकमेव औषध असते.

या काळात भूकंपग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी निकराचे प्रयत्न केले. राज्यातला सर्वात मोठा पुनर्वसन प्रयोग म्हणून किल्लारीचे उदाहरण दिले जाते. मात्र, भूकंपग्रस्त भागातील नागरिकांचे मानसिक पुनर्वसन अखेरपर्यंत झालेच नाही.

01_1443585505 03_1443585506 08_1443585512 09_1443585512

 

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!