जाऊं द्या ना बाळासाहेब!

जाऊं द्या ना बाळासाहेब!

#जाऊं द्या ना बाळासाहेब!  समीक्षा का काय म्हणतात ते! Film Review

Baby Bring It On

गिरीश पांडुरंग कुलकर्णी ह्या अवलिया लेखकाची दिग्दर्शित केलेली पहिली कलाकृती म्हणजे जाऊं द्या ना बाळासाहेब! हा चित्रपट. आजवरचे गिरीशचे लेखक म्हणून पाहिलेले चित्रपट हे मुख्यतः ग्रामीण जीवनावर आधारलेल्या कथेंचे होते. जाऊं द्या ना बाळासाहेब! हा चित्रपटही पूर्णतः ग्रामीण भागातील कथेवर आधारित आहे. आजवर लेखक व अभिनेता म्हणून एक वेगळीच लकब घेऊन भेटणारा गिरीश पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून भेटत असताना प्रेक्षकांच्या त्याच्याकडून अपेक्षा असणं साहजिकच आहे. पण जाऊं द्या ना बाळासाहेब! ही कलाकृती पाहताना थोडासा हिरमोड होतो. एक संवेदनशील लेखक म्हणून परिचित असलेला गिरीश आणि आजवरच्या त्याच्या कलाकृती बघून एकंदरीत काहीतरी सामाजिक विषय असेल यात शंका नव्हती. नेहमीप्रमाणे विनोदी मांडणी करून एक गंभीर विषय उलगडण्याची गिरीश कुलकर्णी यांची पद्धत आहे.

कथा आहे गावातील एका बड्या राजकारण्याच्या (मोहन जोशी) आफराट पोराची. बाळासाहेब त्यांचं नाव. अर्थात गिरीश कुलकर्णी. तर हे बाळासाहेब म्हणजे बापाच्या इस्टेटी वर ऐशो-आरामात जीवन जगणारे तरुण! बाळासाहेब म्हणजे रंगेल, मनमौजी पण चांगल्या मनाचा माणूस. एखाद्या पाटलाच्या बिघडलेल्या पोराच्या अंगात जितके खोड्या असतात त्या इथे नाहीत. पण बाळासाहेब वाईट वाटेला लागलेले नक्कीच आहेत. बाळासाहेबांना त्यांच्या वडलांचं राजकारण वगैरे आवडत नसतं. मस्त हुंदडत राहावं एवढीच त्यांची मनीषा असते. असं हे आत्मकेंद्री पात्र. त्यांच्या संगतीला असतात त्यांचे दोन जिवलग मित्र. बारा धंदे बसवलेला विकास अन लेखक असलेला चौधरी. बाळासाहेबांचं त्यांच्या वडलांच्या हट्टामुळे लग्न मोडलं असतं. अगदी वरात मागे फिरवावी लागलेली असते. मग त्यानंतर बाळासाहेबांच्या डोक्यावर थोडासा परिणाम होतो. असेच डॉक्टरचे उंबरठे झिजवत बाळासाहेब पुण्यात जातात अन तिथे अपघाताने ते बघतात उर्मी अर्थात मनवा नाईक हिच्याशी! मनवा ही स्वतंत्र विचारांची, वेगळ्या वाटेवरची मुलगी. तिच्या संपर्कात येऊन बाळासाहेब जरा विचारी होतात. किंबहुना तिच्यावर इम्प्रेशन पडावं म्हणून ते तसा घाट घालतात. बाळासाहेबांना ती आवडलेली असते. मग त्याच सगळ्या प्रकारात ते लेखक चौधरीच्या लिखानावर नाटक बसवायला घेतात. मग नाटकात काम कोण करणार? तर गावातील गावकरी. बाळासाहेबांना त्यांच्या वडलांनी एक तर आहे ते राजकारण करा किंवा काहीतरी नवीन मांडणी करून दाखवा अन बिनपैशाचे दोन माणसं तरी जमा करून दाखवा असं आव्हान. ह्यात मग डाव-प्रतिडाव आले अन राजकारणही आलं. शेवटी मग ते बसवत असलेले नाटक अन खरं आयुष्य यांत काहीतरी संबंध….

Image result for जाऊ द्या ना बाळासाहेब चित्रपट

अभिनय –

अभिनयाच्या बाबतीत तर सर्वांनी कमाल केली आहे असं म्हणावं लागेल. गिरीश कुलकर्णीने आजपर्यन्त बर्‍याचदा ग्रामीण भूमिका साकारल्या आहेत. ही त्यापेक्षा नक्कीच वेगळी आहे, पण बाज अन लहेजा तोच वाटतो. पण चेहर्‍यावरचे हावभाव अन एकंदरीत मिश्किलपणा त्याने मस्त रंगवला आहे. पाटलाचा निर्बुद्ध पोर हे सुरूवातीला थोडं अति वाटतं पण गम्मत आणि विनोद म्हणून तो आपण सहज पचवू शकतो. मध्यंतराच्या आधीचा बाळासाहेब अन नंतरचा बाळासाहेब यांत बराच फरक आहे जो गिरीशने अतिशय उत्तमपणे टिपला आहे. गिरीशची ही भूमिका जारी वेगळी असली तरी त्याला नेहमीच्या पठडीतून बाहेर काढणारी वाटत नाही. मध्यंतरी पुणे 52 किंवा अग्लि चित्रपटात त्याने ह्या चौकटीतून बाहेर पावले टाकली होती जी यशस्वी झाली होती. पण पुन्हा ग्रामीण भागातील भूमिका हे अभिनेता म्हणून त्याची वाढ खुंटवणारं वाटतं. नेहमीप्रमाणे गिरीशने ही भूमिकाही उत्तम पार पाडली असंच म्हणूया शेवटी. बाकी बाळासाहेबांचे मित्र म्हणून दिसणारे विकास, योगेश यांच्याही भूमिका उत्तम झाल्या आहेत. लेखक चौधरी तर अगदीच जमून आला आहे. त्याच्या हावभावातून व्यक्त होणारी हतबलता, नैराश्य, कधी धूर्तपणा हा कोणत्याही मानसाच्या स्थायी भावाला जागृत करणारा वाटतो. मोहन जोशी यांनीही आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. सुरुवातील गाणं चालू असताना तर काही सेकंदाचा सीनमध्ये मोहन जोशींनी जो वात्रट मिष्किलपणा दाखवला आहे तो कमाल आहे. रीमा लागू यांना एका वेगळ्या शैलीत बघायला मिळालं यात आनंद आहे. त्यांचा अभिनय ‘perfect’ असतो. वेगळी भूमिका असली तरी भूमिकेला फार काही हाताला आहे असं वाटत नाही. काही सीन वगळता त्यांचं पात्र थोडसं निशब्द वाटतं. म्हणजे बाळासाहेब अन त्यांच्या वडलांतील दुवा असलेल्या आईसाहेब किंवा पहलवान ह्या विनोदनिर्मिती यातच गुंग असतात. भाऊ कदम नेहमीप्रमाणे चौकार मारून मोकळा होतो आणि क्षणभर डोळ्यात टचकण पाणीही आणतो. बाकी मनवा नाईक सुंदर दिसतेच अन सुंदर अभिनयही आहे. सईला ह्या भूमिकेत घेण्याचा अट्टहास का? हा प्रश्न पडतो. ह्या भूमिकेत तिला imagine करणं जरा जड जातं. तिच्याकडून काहीतरी अजून चांगलं नक्कीच अपेक्षित आहे.

कथा –

गिरीश हा संवेदनशील अन उत्तम लेखक आहे. त्याच्या लिखाणात एक मार्मिक विनोद असतो. त्याच्या लिखाणाला एक वेगळाच फॉर्म आहे. एका उंचीवरून सुरू झालेली कथा दुसर्‍या उंचीवर जाताना किती घाटवळण घेत जाते हे गिरीशलाच माहीत असतं. ही कथा मात्र कुठल्यातरी घाटात घुटमळते. कथा उत्तम आहे पण कथेचा शेवट काहीतरी वेगळा असेल अशी अपेक्षा असते. चित्रपटाच्या सुरूवातीला ग्रामीण विनोद अन अतिशयोक्तिचा मारा आहे. तिथे माणूस हास्यात खिळून जातो. पण नंतर कथा खुंटल्यासारखी वाटते. मध्यंतरानंतरही काही कंटाळवाणे सीन आहेत. प्रेक्षकांना शेवट काय होईल याची उत्कंठा अन घाई लागते. शेवटी ही गाडी अपेक्षित वळण घेत अपेक्षित ठिकाणीच पोचते. हा प्रकार काही रुचत नाही. शेवटचा नाटक करताना भाषण हा प्रकार तर बालिश वाटू लागतो. पुण्यात असं काही घडलं असतं तर पुणेकरांनी भयंकर ‘अपमान’ केला असता. नाटक करत असताना अन दुसर्‍यांच्या तोंडून पुस्तक वाचून बाळासाहेब अचानक बदलतात अन बापाच्या विरोधात बंड करून उभे राहतात हा प्रकार काही समजत नाही.

सर्वात महत्वाचं म्हणजे चित्रपटाच्या कथेत नावीन्य असं वाटत नाही. असे चित्रपट हिंदीत येऊन गेले आहेत. बाळासाहेब तर अगदी राजा बाबू किंवा अक्षय कुमार वाटतात. आजची निम्मी तरुणाई फेसबूक वर आहे अन निम्मी बॅनर वर हे शब्द बरच काही सांगून जातात. समाजात काहीतरी वेगळं राजकारण काहीतरी वेगळी मांडणी तरुणांनी करावी असा कथेचा मतीतार्थ आहे. पण वाट थोडीशी चुकल्याप्रमाणे वाटते. बिघडलेले बाळासाहेब, उर्मी, लेखक, मग काहीतरी प्रकल्प, पाडला जाणारा वाडा, सईचं लग्न, सुधारलेले बाळासाहेब, आईसाहेबांचा आशीर्वाद आणि गावकर्‍यांचं नाटक यात कुठेतरी ताळमेळ सुटल्याप्रमाणे वाटतो. गाडी थेट जात नाही, जरा जास्तच वळण घेत जाते त्यामुळे खूप गोंधळल्यासारख होत जातं. एका ऊतम विषयाला थोडं विसकटल्याप्रमाणे कथा मिळते, तेही गिरीशकडून हे रुखरुख लाऊन जातं.

दिग्दर्शन –

दिग्दर्शक म्हणून गिरीशचा हा पहिलाच चित्रपट. पण गिरीशने ती जबाबदारी लीलया पेलली आहे असंच वाटतं. सुरुवातीच्या गाण्यापासून ते शेवटच्या वाड्यातील भागापर्यंत एक दिग्दर्शकीय दृष्टीकोण दिसून येतो. कुठेही नवखेपणा वाटत नाही. अगदी चित्रपटाची शीर्षक नावे देताना ‘पेशल अभिनय’ वगैरे जे अस्सल गावरण शब्दांची उधळण केली आहे ती संकल्पना भारीच आहे. सुरूवातीला गाणं चालू असताना काही घडामोडी घडतात तेही सुंदरच म्हणावं लागेल. सगळी locations पुणे व आसपासची आहेत. FTII मधले मोजके सीन आहेत त्यातही नायिका/मनवा सिगरेट वगैरे ओढते वगैरे ओढते आहे अन वैचारिक बोलते आहे हे खूपच अति होतं. कारण तिथे नेहमी तेच दृश्य असतं. बाकी दिग्दर्शक म्हणून गिरीश कमी पडला नाही. पुढे त्याच्याकडून अजून उत्तम कलाकृती बघायला मिळतील हे नक्की!

संगीत –

अजय-अतुल यांचं संगीत हे चित्रपटातील एक पात्र असतं. चित्रपटाच्या सुरुवातीच्या डॉल्बी गाण्यापासून ते शेवटच्या गोंधळापर्यन्त सगळीच गाणी उत्तम आहे चित्रपटासाठी महत्वपूर्ण आहेत. मोना डार्लिंग गाणं गरजेचं नव्हतं अन खूपच भिकार वाटतं. पण अजय-अतुल ह्यांनी जे संगीत दिलं आहे ते अप्रतिम आहे. त्या संगीतामुळे चित्रपटाला एक वेगळीच शोभा येते. सैराट नंतर ही त्यांच्या संगीताची मेजवानीच म्हणावी लागेल. उत्तम!

थोडक्यात काय —-

थोडक्यात काय तर, चित्रपटात अर्भाट विनोद आहेत जे तुम्हाला हसवतात. ग्रामीण ठसका आहे. काही क्षण भावनात्मक प्रसंगही आहेत. उत्तम संगीत आहे. उत्तम अभिनय आहे. वेगळी मांडणी हुकली आहे. थोडीशी अतिशयोक्तिही होते. महत्वाचं म्हणजे एक गंभीर विषय आहे. गोळाबेरीज म्हणाल तर एकदा बघून यावा असा चित्रपट आहे. फार अपेक्षा न ठेवता अन फार निराशाही होणार नाही!!! तुमचे शंभरपैकी 65-70 रुपये वसूल होतील.

ती सध्या काय करते?

© 2016 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!