रात्रीस खेळ चाले!

रात्रीस खेळ चाले!

#रात्रीचा खेळ संपला  ||  #शेवटाक असा का?  || #प्रेक्षकांची नाराजी  ||  #रात्रीसखेळचाले समीक्षा

रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील रहस्य मालिकेचा अखेर झाला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, विविध घटना अन पात्र यांच्यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणारी रात्रीस खेळ चाले! ही मालिका अखेर संपली आहे. 22 Oct ला ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. सगळ्या कारस्थान नाट्य-थरारा मागचा सुत्रधार नीलिमा असते हे सिद्ध झालं. पण शेवटच्या भागानंतर प्रेक्षकांनी मात्र तीव्र नापसंती दर्शवली आहे. कारण आजपर्यंत घडत असलेल्या अनेक घडामोडीवरचा पडदा उठेल अन सर्व उकल होईल ही उत्कंठा मनाशी धरून बसलेल्या प्रेक्षकांची मात्र घोर निराशा झाली आहे.

नेने वकील अन पोलिसांचा खबरी अजय यांचा खून कोण केला हयाभोवती मालिका अखेरच्या काही भागांत घुमत राहिली. पण मालिकेच्या सुरूवातीपासूनच अशा अनेक घटना अन थरारनाट्य दाखवण्यात आलं होतं जे मानवनिर्मित वाटत नव्हतं. त्यामुळे ही मालिका केवळ रहस्यप्रधान अशी मर्यादित न राहता भुताटकी प्रकारात मोडते असा समज दृढ झाला होता. पण हळूहळू कथानक पुढे सरकत गेलं आणि हे सगळं मानवनिर्मित आहे अशा घटना समोर येऊ लागल्या. मग ह्या सगळ्यांचा छडा लावण्यासाठी विश्वासराव ह्या पोलिस पात्राचा प्रवेश झाला. खरंतर ह्या एंट्री ने मालिकेत चांगलीच रंगत आली होती. आणि विश्वास हे पात्रच सर्व गोष्टी तडीस नेणार हेही एव्हाना लक्षात आलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मालिकेचा शेवट ज्या अर्धवट अन अपूर्ण स्वरूपाचा आहे तो खरच भ्रमनिरास करणाराच होता. कारण पूर्वी ज्या घटना घडल्या त्या सर्व घटना नीलिमाने केल्या असा जर तर्क असेल तर त्या कशा घडल्या हे दाखवायला हवं होतं. कारण त्या सर्व घटना केवळ एका व्यक्तीच्या क्षमतेच्या बाहेरच्या वाटत होत्या. त्या सर्व गोष्टी अखेर अनुत्तरितच राहिल्या. कदाचित त्या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण लेखक-दिग्दर्शक जोडीकडेही नसावं असं दिसत आहे.

हे प्रश्न अनुत्तरीत…

पांडू खुळा नसून शहाणा असतो? पांडू पैसे-दागिने का जमा करत असतो? माधववर हल्ला कोण केलेला असतो? म्हातारीला अण्णा दिसतात हे आजार असू शकतो, पण गणेशाक ते ‘अण्णा कुठेही गेले नाहीत, अण्णा इथेच हत’ असं का म्हणतो? छायाची बाहुलीचा काय प्रकार होता? त्या बाहुलीला पुरताना ती बाहुली हलते, जड लागते तो काय प्रकार होता? मग तीच बाहुली देविकाच्या घरात कशी पोचते??? तळघरातील हाडं कोणाची व त्यांना मारणारा कोण??? फक्त अण्णा की त्यांच्यासोबत कोण?? बर नाथाचा सगळ्या गुन्ह्यात सहभाग असले तर मग त्याला अटक का नाही? गणेशच्या गुरुला अटक का केली??? विहिरीतून छायाला आवाज का येत असतात? शेवंताचा आवाज? झाडावरून बांगड्या हलण्याचा आवाज??? नाईकांना पाण्याची भीती. अर्चिसचं पाण्याकडे आकर्षित होणं?? नाना का बडबडायचा??? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशल्या… ती एकाच वेळेस अनेक ठिकाणी कशी दिसते? ती करत असलेल्या अतार्किक गोष्टी? घरावर थाप पडणे, घरावर दगडांचा पाऊस हे काय होतं? एक तर सगळ्या भानगडी नीलिमाला एकटीला शक्य नव्हत्या. त्यात कॉंट्रॅक्ट अन जतिन सेठ नंतर आले. त्याआधी घडणार्‍या घडामोडी कोण करत होतं? नीलिमाला शेवंताचा आवाज कसा माहीत? ती ह्या गावातील नव्हतीच. मग जुने reference तिला कसे माहीत. गुन्हेगार नीलिमा तर मग रघुकाका, गण्या अन त्याच्या गुरुला अटक का केली मग???

Image result for रात्रीस खेळ चाले

ह्या व अशा अनेक प्रश्नांची उकल होईल ह्या आशेने प्रेक्षक गेली अनेक महीने न चुकता ही मालिका बघत होते. पण मालिका संपली अन हे प्रश्न तसेच मागे ठेऊन गेली असं म्हणायची वेळ आली आहे. ह्या प्रकारामुळे शिखरावर पोहचत असलेला माणूस अचानक घसरून खाली कोसळतो असा अनुभव येत आहे. रहस्यप्रधान, गूढ, भय मालिका बघण्यात मजाच ही असते की त्याचा शेवट सगळ्यांना हवाहवासा असतो. हे कोण करतं? केवळ ह्या एका प्रश्नासाठी लोक खिळून बसतात. पण हेच मूळ प्रश्न अनुत्तरित राहिले. मालिका अगदी नारायण धारप यांच्या कादंबरीसारखी वाटली. प्रत्येक घटनेचं बारीक वर्णन, भय-गूढतेची निर्मिती. कथेला त्यात गुंफत पुढे नेणं आणि अखेर काही क्षणांत किंवा गडबडीत सर्व विषयाचा पसारा आवरणे!!! अरे, काय चाल्लय हे??? हा पसारा आवरून जागच्या जागी ठेवणे हे उद्दीष्ट असायला हवे. त्यामुळे अखेरचे भाग लोकांना तृप्त करू शकली नाही हे खरं….

शेवटच्या भागात तर विश्वास प्रत्येकावर पुन्हा तेच-तेच आरोप करत सुटतो. एक क्षण वाटतं की आता तो पांडूला उघडं पाडणार, पण अगदी अनपेक्षितपणे तो नीलिमावर आरोप करतो, अख्खी मालिका दीड-शहाण्या टेचात वावरणारी नीलिमा लागलीच सगळं कबुल करते आणि आणि…. संपलं…….. This Is Not Done!!!

पण….

अशा अनेक त्रुटींसह ह्या मालिकेने आपला निरोप घेतला आहे. पण मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं यात शंका नाही. मालिकेतील प्रत्येक पात्र जीवंत वाटत होतं. प्रत्येकाशी काहीतरी जिव्हाळा वाटत होता. तो नाईक वाडाही बोलका होता. वेडा पांडू कधी चिरड, कधी हास्य, कधी सहानुभूती मिळवायचा. प्रत्येकाचा अभिनय चांगला होता. कथा-दिग्दर्शनही छान होतं. संगीत तर अजरामर. एक उत्तम, उत्कृष्ट, शाही भोज झाल्यावर केसर पान खाताना चुना जास्त होऊन जीभ खराब व्हावी हे सर्वथा नको…

….इतकं होऊनही एक सांगतो, मालिका प्रेक्षकांच्या मनातून कधीच ‘विसरलय’ अशी होणार नाही.

रात्रीस खेळ चाले!

© 2016 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!