आपुले मरण – नारायण धारप

आपुले मरण – नारायण धारप

#मराठी #भयकथा #गूढकथा #रहस्यकथा || नारायण धारप  || मराठी साहित्य || कथासंग्रह 

नारायण धारप हे नाव गूगल इमेज सर्च मध्ये टाकून पहा, म्हणजे समजेल हा माणूस कोण होता. ज्यांच्या कथा वाचताना भीतीने अंगावर काटा येणे ह्या पंक्तीचा अनुभव येतो ते नारायण धारप! त्यांच्या भयकथा म्हणजे खरच भीतीशी सलगी! कथा वाचताना हळूच आजूबाजूला बघावं लागतं. काही गूढ सावली किंवा अमानवी जीव आपल्याकडे बघत नाही ना याची खात्री करावी लागते.

अलीकडेच नारायण धारप लिखित आपुले मरण हा भयकथासंग्रह वाचण्यात आला. मागील अनेक कथांप्रमाणे यातही वाचकाला भीती वाटेल असं कथानक होतं. भयकथा म्हणजे केवळ भूत आत्मा वगैरेचा उल्लेख अन विद्रूप रूप अशा कल्पनांच्या बाहेर जाऊन भीती वाटेल असं वर्णनात्मक लिखाण ही नारायण धारप यांच्या खास लिखाणाची शैली. ओळींवरून फिरत जाणार्‍या डोळ्याबरोबर मनात धडधड वाढत जाते तेथे गूढ, भय, रहस्य कथालेखक यशस्वी होतो असं म्हणावं लागेल. आणि नारायण धारप त्यात शंभर टक्के यशस्वी होतात. केवळ एखाद्या जागेचं वर्णन करतानाही ती जागा केवळ डोळ्यासमोरच उभी राहते असं नाही तर ती गूढ भासूही लागते.

 

ALSO READ NARAYAN DHARAP’S OTHER HORROR STORIES

प्रत्येक माणसाच्या मनात अज्ञाताविषयी भीती असते, फक्त योग्य संदर्भ वापरुन ती भीती जागृत करावी लागते. तुम्ही एकांतात बसले आहात अन अचानक कोणाच्यातरी असल्याचा भास होऊ लागतो, मग तुम्ही सतर्क होता पण मनात आत कुठेतरी भीती दाटलेली असते. कोण असेल? ह्या कल्पनांच्या पलीकडे जे असतं ते नारायण धारप आपल्या कथेमध्ये अगदी चपखलपणे उतरवतात.

आपुले मरण मध्ये आठ कथा आहेत. त्यातील ‘भिमाक्का’ आणि ‘आपण सारी धरणीमातेची लेकरे’ह्या कथा वाचताना तर अक्षरशः भीती दाटून अंगावर काटा येतो. बाकीच्या कथा वाचतानाही गूढ अन रहस्य अगदी शेवटपर्यंत टिकून राहतं. सामान्य आयुष्यात सहज घडणार्‍या घटना एका भयकथा लेखकाच्या दृष्टीकोणातून वेगळ्याच दिशेला घेऊन जातात.

 

READ HERE OTHER HORROR STORIES

              रात्रीच्या वेळी मी घरात बैठकीत नारायण धारप यांची ‘भिमाक्का’ ही कथा वाचत बसलो होतो. घरात कोणीच नव्हतं. कथा पुढे सरकत होती. रात्रीच्या शांततेने दूरवरचे आवाज मधूनच ऐकू येत होते. एक विक्षिप्त म्हातारी एका वाड्यात एकटीच राहत असते. मदतीला म्हणून ती एका कामवालीला सोबत घेते. आजपर्यंत तिच्याकडे अनेक बायका काम करून गेल्या. काही पळू गेल्या, काहींना वेड लागलं तर काही मेल्या. ती म्हातारी अन तिच्या त्या जुन्या पडक्या वाड्याबद्दल भलत्याच चर्चा असतात. तिथे लहान मुलांचे बळी दिलेले असतात किंवा चेटकीण वगैरे. ती म्हातारी मोलकरणीला रात्री मंत्र-तंत्राच्या गोष्टी वाचायला सांगत असते. तिचं हास्य उत्कट असतं… त्या मोलकरणीला तिची भीती वाटत असते. वाड्यातून रात्रीचे चित्र-विचित्र आवाज येत असतात, गूढ सावल्या दिसत असतात. पायर्‍यावरून वर जाताना अंधार पसरलेला असतो… त्या अंधारात कोणीतरी दबा धरून बसलेलं आहे, डोळे वट्टारून बघत आहे असा भास त्या मोलकरणीला होत असतो… ती म्हातारी सतत तिला भूत-प्रेत, काळी विद्या अन भीतीच्या गोष्टी सांगत असते. अंधारातून गूढ सावल्या रात्रभर वावरत असतात, बळी दिलेले मुलं रडत असतात! रात्रीच्या वेळेस ती मोलकरणी उठते. खाली जात असते. त्या अंधारात कोणीतरी असल्याचा भास होतो. ती देवाचं नामस्मरण करत उतरत असते…. एक-एक पायरी… काहीतरी घडणार असतं… अचानक माझ्या घरात दरवाजाची कडी वाजते….

 

READ HERE OTHER MARATHI TOP STORIES

@नारायण_धारप म्हणजे अनवट वाटेवरचा लेखक. त्यांना एवढ्या कथा सुचतात कशा हाही एक गूढ प्रश्न आहे. त्यांचा ह्या बाबीतील अभ्यास भरपूर दिसतो. केवळ भूत-प्रेत नव्हे तर इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे शक्यतांच्या वर्तुलांतून त्यांची कथा पुढे जात असते. कथेला एक आलेख असतो. कधी संथ वाहत असलेल्या पाण्यात अचानक विवर पडावं किंवा त्या पाण्याच्या पोटातून कोणीतरी आक्रोश करत वर यावं असा अचानक झटका असतो तर कधी हळूहळू खोल दलदलीत अडकत जावं असा संथ पण सुन्न करणारा अंत. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी गूढता. घटनांच्या वर्णनातून कथा पुढे जात असते. स्थळ-काळ-वेळ याचं गणित त्यांना योग्य जमतं. त्यांची पात्र सामान्य असतात अन असामान्य शक्तीशी त्यांचा मुकाबला असतो.

 

ALSO READ NARAYAN DHARAP’S OTHER HORROR STORIES

लेखक कुठेच अडकत नाही हे विशेष. जी लय सुरूवातीला असते ती विविध आवर्तन घेत एका शेवटाला पोचते. वाचकवाचण्यात गढून जातो. कथा वेगळ्या जगातील परकायाप्रवेश ठरते. घाटवळन घेत कथा पुढे सरकते अन एका विलक्षण टप्प्यावर येऊन पोचते. एखाद्या सुंदर मदनिकेप्रमाणे कथेला आखीव-रेखीव सौंदर्य असतं. पण नारायण धारप यांच्याबाबतीत म्हणावं तर ती सुंदरा ही रूप धारण केलेली हडळ असते.

एकंदरीत…. भयकथा, गूढकथा, रहस्यकथा अशा अनवट वाटेवरील प्रवासी असाल तर नारायण धारप हा मुक्काम एकदा अनुभवलाच पाहिजे!

जंगल – मराठी भयकथा

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!