परकाया प्रवेश!

परकाया प्रवेश!

गाव बदलताना || मराठी लघुकथा || Marathi Short Story || अनुभव || अभिव्यक्त || कथासंग्रह 

खरंच खूप त्रास होत होता. शहर सोडणं म्हणजे एक खूपच अप्रिय काम म्हणावं लागेल. पण नाईलाज असतो. नोकरीच तशी होती. एक-दीड वर्ष झाला की दुसऱ्या गावी मुक्काम हलवावा लागायचा. एक शहर किंवा गाव सोडून जाताना आत्म्याने परकाया प्रवेश केल्यासारखा वाटतो. एक शरीर सोडून दुसरं, अनोळखी शरीर. मग त्या शरीराशी ओळख करून घेण्यात वेळ जातो अन पुन्हा तिसऱ्याच शरीरात जाण्याची आज्ञा होते. सगळं मालकाच्या आज्ञे प्रमाणे! स्वतःचे काहीच मतं नसतात.

आज शेवटचा दिवस होता ह्या शहरातील. सकाळी दिनू उडप्या कडे गेलो. दाबून इडली आणि पोहे खाल्ले. ओठांवर रेंगळणारी ती चव पुढचे काही दिवस जिभेवर रेंगाळत रहावी अशी तीव्र इच्छा होती. येथे नाश्ता उत्तमच मिळतो. ह्या शहरातील खूप कमी दिवस असे असतील की मी इथे नाश्ता केला नसावा. पण चला एक व्यसन सुटलं! कसलीही सवय एकंदरीत वाईटच!

त्या गृहस्थाला, म्हणजे दिनू उडप्याला, खरं नाव काहीतरी लांबलचक आहे, त्याला माझ्यातील बदल जाणवला. त्याला ‘त्याला’ असं म्हणतोय म्हणजे वय माझ्या आसपासच असावं. तो लांब उभ्यानेच म्हणाला, काय बदाने साहेब आज काय विशेष?

त्या प्रश्नाने सुरुवातीला मी दचकलो. पोटात गोळा आला. माणसाचा चेहरा किंवा डोळे हे बोलके असतात याचा परिचय आला.

त्याला खरं कारण सांगताना जीभ जरा जड झाली. जिभेवर रेंगळणारी चव आता पळून गेली. घास तोंडातच फिरत होता. आता पोहे खावेसे वाटत नव्हते, कारण मन भरलं होत. त्या पोह्यावर ओतलेली चटणी खूपच नकोशी वाटू लागली. भरून आलं!

मी सहजतेचा आव आणत म्हणालो, पण चेहऱ्यावरचे भाव मनस्थिती दाखवत होते, आम्ही निघालो आज दुसऱ्या गावाला.

काय सांगता? कायमचे? तो उत्सुकतेने म्हणाला.

हो तातडीची ऑर्डर दिली वरून. निघावेच लागेल.

बरं झालं मीच विचारलं ना? तुम्ही स्वतःहून बोलला नाही काही?

जे भावनिक कल्लोळ नको वाटतात तेच घडत होते. मी उगाच कसातरी हसत म्हणालो, तुम्हाला इतके कस्टमर आहेत, आम्हीही एक… कोणी कोणी काय काय सांगावे तुम्हाला?

ते दुखावले गेले असावेत. ते नाराजीने म्हणाले, बस का? आम्हाला परके केलात तुम्ही. दोन वर्षे हातची इडली-पोहे खाऊ घातली, हीच कदर केली का गरिबांची?

मी जरा हळवा झालो. कसं सांगावं हा प्रश्न होता. उद्यापासून तुमच्या हातची इडली नाही हे खूपच त्रासदायक होतं.

तसं नाही हो… पण… अर्धवट बोलणं… पुढे काहीच बोलावलं नाही…

काही क्षणांत, कसेतरीच हसलो दोघेही.

जरा शांतता.

मीच शांतता मोडली. अशीच असते हो आमची नोकरी. काही नाही साला त्यात. ओंजळीत पाणी घेऊन प्यावं तसं. तहान तर भागते पण पाणीही खूप सांडत, पण जमा काहीच राहत नाही…

त्यांनी दोन कॉफी मागवली. मला चहापेक्षा कॉफी आवडते अन मी तीच घेतो हे त्यांना माहीत होतं. उद्यापासून सांगावं लागणार ह्या कल्पनेने जरा अस्वस्थ वाटलं…

मग त्यांनी कुठे? कधी? कसे? वगैरे चौकशी केली.

नंतर ते म्हणाले, जाऊद्या हो मग ती नोकरी, माझ्यासोबत पार्टनरशिप करा, मजा येईल.

मनमोकळे हसलो दोघेही. पण मला मनात वाटलं, असं झालं तर खरंच मजा येईल. खूप सुंदर शहर हे. कायम इथेच राहावं. मस्तपैकी इथलीच मुलगी बघावी, इथेच सेटल व्हावं.

Image result for गाव

नंतर क्षणिक कल्पनासुखातून बाहेर आलो अन वस्तुस्थिती आठवली. पण… गावाकडे पैसे पाठवावे लागतात, कर्जाचा हफ्ता आहे… आत्ताच नाही सोडता येणार नोकरी… स्थिर कधी होणार… आई-अण्णा-छोट्या बहिणीचं शिक्षण…. क्षणभरात मन सर्व हेलकावे खाऊन परतलं…

प्रवाशाने गाडीलाच मुक्काम समजलं तर कसं चालेल? स्टेशन आल्यावर उतरावं लागतंच. कितीही मोठी, मखमली, आरामदायी सीट मिळाली तरी तिची संगत प्रवासापुरतीच. काळाचे घाव सोसून विस्फारलेल्या डोळ्यांनी वाट बघणार्‍या आपल्या मुक्कामावर पोचावच लागतं.

आज दिनू उडप्याने माझ्याकडून पैसे घेतलेच नाहीत. मी नाश्ता करताना माझ्या टेबलवरच बसला होता. बऱ्याच गप्पा झाल्या. एकत्र कॉफी झाली. इतके दिवस इथेच असताना वाटायचं निवांत वेळ भेटल्यावर बोलू. तो आणि मी इथेच होतो, वेळ मात्र आजच भेटला!

जाताना त्याने स्वतःकडे असलेल्या चावीला लावलेलं दिशा दाखवणारं किचन काढून मला दिलं.

आमची आठवण म्हणून असू द्यात. जाताना त्याला गच्च मिठी मारावी वाटली, पण नंतर नकोही वाटलं. ऋणांनुबंध नसले तरी ओळख अन विश्वास होता… त्यातून एक ओलावा असलेलं नातंही निर्माण झालं होतं..

कधी आलात तर येत चला… तो म्हणाला.

अर्थात येणारच, तुमच्या इडलीची चव माझ्या जिभेला कायम लक्षात राहील. तुम्हीही या कधीतरी आमच्या गावाला. तिथेही सुरू करू तुमच्या इडलीचा व्यवसाय…

हो येऊ कि. फक्त तुम्ही असा जागेवर. खोट्या विनोदावर मनमुराद हसलो दोघेही.

त्यांचा निरोप घेऊन निघालो.

खरं तर दिनूही माझ्यासारखाच परगाववरून इथे आलेला. आधी सायकलवर इडली विकली. नंतर कायमचा इथलाच झाला. माणूस म्हणून चांगला. बोलका आणि मदत करणारा.

पण एखाद्याला सोडून जाताना असंच वाटत असतं. चांगल्या आठवणीच उफाळून येतात. आपण भावुक झालेलो असतो. पण काही काळानंतर आपण सारं काही विसरूनही जातो. हा प्रवाह असाच असतो…?

दिवस मोकळाच होता. रूमवर फर्रर वाजणार्‍या पंख्याखाली पडून राहण्यापेक्षा फिरणं सोयीस्कर वाटलं. थोडंसं जड वाटलं काही वेळ. असाच गाव फिरत राहिलो उगाच. सगळं शेवटचं नजरेत भरून घेत. कदाचित पुन्हा कधीच यावं लागणार नाही इथे. आणि आलो तरी बरंच बदललेलं असेल. आज दिसतंय तसं नसणार… मीही बदललेला असेन…

समोरच्या रस्त्यवर लांबसडक पायांची, काळे कपडे परिधान केलेली एक सुंदर तरुणी गाडीवरून पाय खाली टेकून उभी होती. फोनवर बोलत उभी होती. मोठे डोळे, मोकळे सोडलेले लांब केस. मेक-अप नव्हता काही. पण कानातील पसरट झुमके खूप गोड दिसत होते तिला. काही क्षणानंतर खूपच मादक वाटली. नजरेला ताण पडला. मघाशी भरून आलेलं मन आता वेगळ्याच प्रतलात वावरत होतं. हे गाव खूपच सुंदर आहे… कधीतरी इथेच सेटल होऊया… मनाशी प्रासंगिक अन खोटा ठराव पास केला…

ऑफिस मधून कालच सेंड ऑफ मिळाला होता. तो संबंध मिटला होता. खाता बंद. ऑफिसकडून एक घड्याळ गिफ्ट मिळालं होतं. आजचा दिवस आवरण्यासाठी सुट्टी होती. रात्री काहीही करून निघावच लागणार होतं.

गावात पंचमुखी हनुमानाची रेखीव मूर्ति असलेलं एक मंदिर होतं. तेथेच छानशी बागही होती. तेथे गेलो. खूप शांत, आल्हाहदायक जागा. उंच वृक्ष, सुंदर फुलांची झाडं, खेळणारी लहान मुले, पक्षांचे चिवचिवाट… इथे जर स्थायिक झालो तर मुलांना खेळायला घेऊन इथे यायचं… पुन्हा अस्थिर विचार… मंनापासून नमस्कार केला मारुतीरायाला अन निघालो… नेहमीचा चनेवाला मुस्लिम म्हातारा भेटला. चने घेतले अन बाहेर पडलो.

नंतर आठवलं कि, त्या नर्सला भेटणं अत्यंत आवश्यक वाटलं जिने सात दिवस माझी सेवा केली होती; काहीच दिवसांपूर्वी जेंव्हा मला मलेरिया झाला होता. रात्री कशालाही आवाज दिला की आपुलकीने यायची. शांतपणे, जराही चिडचिड न करता काम करायची. मित्र साले लोचट अन बिन कामाचे असतात हे तेंव्हा कळलं. फक्त भेटायला येतात सहानुभूती दाखवतात अन चौकशी करून जातात. जणू मी सश्रम कारावासाची शिक्षा भोगायला इथे दाखल झालो. पण तिथे बसून आपण जे मित्र चौकशीला आले नाहीत त्यांचा प्रतिशोध घ्यायचा विचारही करतो काही क्षण. एक मात्र नक्की, आपली जवाबदारी घेत नाहीत साले.

हॉस्पिटलला गेलो. डॉक्टर भेटले, त्यांनी ओळखलं, आपुलकीने चौकशी केली. पण डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्थिर भाव होते.

त्या नर्सला भेटून आभार मानावेत आणि “तुमच्यामुळेच मी आज असा आहे” असं औपचारिक बोलून यावं असं वाटत होतं. पण जरा निराशा झाली. त्या सुट्टीवर होत्या. मग दुसऱ्या एकीला निरोप दिला आणि गणपतीची फ्रेम असलेलं गिफ्ट त्यांना द्यायला ठेऊन आलो जे मी हॉस्पिटल मधून बाहेत पडायच्या आतच उघडलं जाणार होतं. पण ते माझं कर्तव्य होतं.

तेथून बाहेर पडलो आणि घरून आईच्या आलेल्या आदेशावर काम सुरु झालं. सणवाराला घरी जेवायला बोलावणाऱ्या आणि बरच लांब राहणाऱ्या एका नातलग मावशीला भेटायचं होतं. त्यांचा निरोप घ्यायचा होता. नेहमीप्रमाणे आजही मस्त जेवण मिळालं. मी दुसर्‍या गावी निघालो याचं मावशीला वाईट वाटत होतं. त्यांचे मिस्टर, स्वभावाने कडक किंवा मी मनात त्यांना अकडू म्हणतो, होते. मी जाणार हे समजल्याने बेहद्द खुश होते ते. माझा उगाच त्रास अन जबाबदारी वाटायची त्यांना. मागे मला मलेरिया झाला तेंव्हा खरंतर त्यांनीच केलं सगळं. त्या नर्सला ह्यांनीच माझी काळजी घ्यायला सांगितलेलं होतं. कदाचित पुढे जाऊन आपणही असेच होऊ आपण. पुरुषी स्वभाव खूप बदलत असतो असं म्हणतात.

जाताना एक किलो जामून घेऊन गेलो होतो. त्यातील तीन चार मलाही भेटले जेवताना. मावशीच्या मिस्टरना एक सुटकेस गिफ्ट दिली. त्यांना आवडली. उरलेलं आयुष्य मावशीला बोलायला मुद्दा मिळवून दिला. शेवटी नमस्कार केला आणि मी पुढे निघालो.

पाच वगैरे वाजून गेले होते. थेट रूमवर गेलो. आळस आला होता. पंखा चालू केला अन अंग पलंगावर टाकून दिलं. पंख्याच्या फर्रर आवाजाची सवय झाली होती. अंगाई सुरू झाल्यावर लहान मुलाला आपोआप नीज येते तशी मलाही झोप लागली. काहीतरी चित्र-विचित्र स्वप्नं पडली. जागं झाल्यावर आठवली नाहीत. उठल्यावर क्षणभर स्वतःचं अस्तित्व जाणवलंच नाही. कुठे आहोत? काय करत आहोत? कुठे जायचं? असे प्रश्न क्षणभर मेंदूत प्रवाह करून गेले. अंग तर बधिर पडलं होतं. पक्षाघातचा आजार झाल्यावर हात-पाय जसे जाणवत नाहीत तसं वाटलं क्षणभर. पूर्ण शुद्ध आल्यावर ताडकन उठून बसलो. डोक्याला हात लावला. स्वप्नात होतो कदाचित? आधी तो पंखा बंद केला. सात वाजले होते. तोंड धुतलं. सामान आवरून दरवाजाजवळ आणून ठेवलं. आठ वाजता ऑफिसचा शिपाई येणार होता. मदत करायला अन माझी राहिलेलं सामान घेऊन जायला. एक जाड गाडी, माठ, पडदे, OLX वर घेतलेला तुटका टेबल तो घेऊन जाणार होता. एखादा म्हातारा-म्हातारी मेल्यावर त्याचं सामान देऊन टाकतात ती आठवण झाली. ते जग सोडतात, मी हे शहर सोडत होतो. तो साडेआठला आला. दहाची रेल्वे होती. नेहमीप्रमाणे घरमालकाशी भांडण झालं. अर्धा तास त्याच्यात गेला. अशी ही बनवाबनवी मधील प्रसंग आठवला. शिपायाने येताना आपल्या दोन पोरांना आणलेलं होतं. दोघेही पाया पडले माझ्या. उगाच मोठं झाल्याची भीती वाटली. त्यांना हातात पैसे दिले. दोघांनी माझं राहिलेलं सामान घेतलं अन निघून गेले. शिपायाने येतानाच ऑटो बोलवून आणलाच होता. त्याने व मी मिळून सामान ठेवलं त्यात. ऑटोतून जाताना गाव दिसलं शेवटचं. खूप वाईट वाटत होतं.

मला अचानक अक्षयची आठवण आली. दिनू उडप्याकडे भेट झाली होती आमची. चांगली मैत्री झाली होती. पण नंतर भांडण झालं. माझा मोबाइल मागितला होता त्याने वापरायला… मी म्हणालो होतो, जीव माग पण मोबाइल नको… बोलाबोलीत वाद झाला अन मग भांडण… त्याला सहज भेटून जावं हे विसरलोच… जाऊदे! भोसडीचा आजारी असताना मला बघायला तरी कुठे आला होता… मरूदेत! असले फुक्कड मित्र काय करायचे.

रेल्वे स्टेशन आलं. सामान उतरवत होतो तेवढ्यात एकाने सामानाला हात लावला. मी ओरडणार इतक्यात त्याच्या चेहर्‍याकडे लक्ष गेलं… अक्षय होता तो… मला भेटायला आला होता… भांडण संपलं… बास बोलाचाली झाली… त्याने त्याचा नवा मोबाइल दाखवला… त्या शिपायाला पैसे दिले… त्याचे डोळे भरले होते… तुम्ही निघालो साहेब, बरोबर नाई वाटलं… कितीदातरी आपण बसलो होतो… तुमीच मला ऑफिसात समजून घेणारे होतो… आठवण ठिवा गरिबाची… चल रे असं काही नाही… तू चांगलं काम करतोस… मी नाही आता, बसणं कमी कर… जा आता घरी… कधी काही लागलं तर फोन कर… वाईट वाटून घेऊ नको… ऑफिसमध्ये फक्त दांडगेसाहेबांशी नीट रहा, बघ कसं सगळं ठीक होईल… चल निघ बरं… नाहीतर मलाही वाईट वाटेल…

तो निघून गेला. खरं वागत होता की घेण्याचं निमित्य शोधत होता कोणास ठाऊक. असो. चालायचं!

अक्षय गाडी निघेपर्यंत थांबला. शेवटची सिगारेट झाली. चल मग भेटूया! गाडी सुटताना दोघांच्याही तोंडी हे वाक्य आलं. त्याने हात उंचावर केला, मीही हात केला… गाडी पुढे निघाली… आत जाऊन बसलो… आयुष्य नक्कीच एक पुस्तक असतं. त्यात धडे असतात, प्रकरणं असतात, प्रकार असतात, अध्याय असतात… आज एक अध्याय संपला होता… आता नव्या अध्यायाला सुरुवात होणार होती… उद्यापासून व्यस्त कामात काहीच आठवणार नव्हतं… फक्त जेवताना, कॉफी घेताना, नाश्ता करताना, सिगरेट ओढताना, पायी फिरताना अन झोपताना आठवणी येणार होत्या… काहीच दिवस… परकाया प्रवेशाशी संलग्न होईपर्यंत… फक्त फर्रर आवाज करणारा असू नये…

रात्रीच्या अंधारात खिडकीतून बाहेर बघितलं. दूरवरचे लाइट चमकत होते. अनेक खेडी, अनेक शहरे असतात… आपला एखाद-दुसर्‍याशी संबंध येतो… अनेक खेडी, शहरे, माणसे, झाडे मागे पडत होती… अनोळखी सगळी… अंधारात गूढ वाटणारी… गाडीच्या वेगाशी कधीच स्पर्धा न करणारी… स्थिर उभी असलेली… असाच भग्न विचार करत असताना खिडकीला टेकूनच रात्री कधीतरी झोप लागली… सकाळी जाग आली… परकाया प्रवेश झाला होता…!

-*-समाप्त-*-

latenightedition.in

— खालील लिंक वर अशाच कथा वाचा —

नवीन मराठी कथासंग्रह

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

1 Comment on "परकाया प्रवेश!"

Notify of
avatar
Sort by:   newest | oldest | most voted
trackback

[…] परकाया प्रवेश! […]

wpDiscuz
error: Content is protected !!