शिवसेना मनसे मिलन सिद्धांत!

शिवसेना मनसे मिलन सिद्धांत!

#शिवसेना #मनसे #युती || Shivsena MNS Alliance || राजकारण की अहंकार? ||  #माझंमत  || अडचण आणि खोळंबा

मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अनेकांना असं वाटत आहे की, शिवसेना-मनसे ने निवडणूकपूर्व युती करायला हवी होती. कारण ह्या दोघांच्या मतविभाजनाचा नुकसान दोन्हीही पक्षांना झाला. युती जर असती तर बहुमत सहज मिळालं असतं. म्हणजे 30-40 जागांची कमी भरून निघाली असती असा त्या विश्लेषकांचा अंदाज आहे. अनेक मराठी पत्रकार, विश्लेषक हे बोलत आहेत. जनता अन सोशल मीडिया वर तर ह्या बोलण्याला उत आला आहे. पण खरच असं आहे का? ह्याचा वास्तविक विचार करायला हवा. राजकरणात सरळ 2 आणि 2 चार होत नसतात. पण विश्लेषक अतिशय उथळपणे अशी समीक्षा करतात याची खंत वाटत आहे. ह्या गोष्टीवर बारीकीने अन सखलपणे बघायची गरज आहे.

मुंबईत भाजपने २०० च्या आसपास जागा लढवल्या होत्या. बाकी २५ वगैरे जागा इतर पक्षांना (ज्यांना ते मित्रपक्ष किंवा सहयोगी पक्ष म्हणतात) सोडल्या होत्या. ह्या २५ पैकी एकही जागा निवडून आलेली नाही. त्यांची युती भाजपशी होती. जर भाजपची इतकी लाट असती तर त्याही जागा निवडून आल्या पाहिजे होत्या. इथेच तर युतीच्या राजकारणाची खरी मेख आहे. रामदास आठवले किंवा इतर लहान पक्षांची मते सहजपणे भाजपकडे गेली असतील पण भाजपचा जो मतदार आहे त्यातील एकानेही ह्या सहयोगी पक्षाला मत दिलं नाही.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस अन डाव्यांची युती झाली होती. त्यात डाव्यांची मते कॉंग्रेसला मिळाली पण कॉंग्रेसचा मतदार डाव्यांकडे सरकला नाही. तेच उदाहरण तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालं. कॉंग्रेसला जागांचा फायदा झाला. याच्या विपरीत बिहार विधानसभेत लालू-नितीश-कॉंग्रेस एकत्र आले आणि त्यांची एकमेकांची मते हस्तांतरित झाली आणि ते विजयी झाले.

अलीकडेच झालेल्या वांद्रेच्या पोटनिवडणुकीत नारायण राणे पराभूत झाले. त्यावेळी सेना-भाजप युती झालेली होती. त्यात विधानसभेला सेना-भाजप वेगळे लढले असताना तेथील अमराठी मते भाजपला मिळाली होती पण पोटनिवडणुकीत ती मते सेनेला मिळाली नाहीत. ती कॉंग्रेसला मिळाली.

ही सगळी उदाहरणे बघितली तर असं दिसून येईल की राजकरणात युती केल्याने मते सहजपणे हस्तांतरित होतात असं नसतं. हे खूप गुंतागुंतीचं प्रकरण आहे. जे लोक म्हणत आहेत की सेना मनसे युती झाली असती तर मनसेला पडलेली मते थेट सेनेला मिळाली असती अन शिवसेनेचे अधिक उमेदवार निवडून आले असते, तर ते साफ चूक आहे.

सर्वात पहिली गोष्ट, राज ठाकरे यांच्या हात पुढे करण्यामागे राजकारण होतं. महापालिकेत त्यांचे 30 नगरसेवक होते ते आत्ता जेमतेम 7 वर आले आहेत. हे घडू नये म्हणून त्यांची धडपड होती. सेनेच्या सहाय्याने निदान मागच्या वेळेचा आकडा तरी टिकवता यावा अशी त्यांची इच्छा होती. काहीही कष्ट न करता.! ह्या युतीचा त्यांना फायदा झाला असता सेनेला नाही. मराठी माणसासाठी मी कोणाचेही पाय चाटायला तयार आहे असं राज जाहीरपणे म्हणाले, मी कमीपणा घेईन असंही ते म्हणाले… मग आता निकाल लागले आहेत. सेनेला बहुमतासाठी नगरसेवकांची गरज आहे. मग आधी विनाअट पाठिंबा देणारे राज आता का शांत आहेत. द्या म्हणा की उघड पाठिंबा! हा झाला एक विषय.

दुसरी गोष्ट म्हणजे राज हे शीघ्रकोपी अन तडकाफडकी निर्णय घेणारे आहेत. सेनेशी युती करून त्यांचे 25 एक नगरसेवक निवडून आले असते आणि कदाचित निवडणुकीनंतर एखाद्या लहानशा मुद्द्यावरून त्यांचे उद्धव यांच्याशी किंवा महापालिकेत मतभेद झाले असते (जे अपरिहार्य आहे) तर ते एका फटक्यात सेनेच्या विरोधात गेले असते. म्हणजे तेलही गेलेले तुपही गेले! सेनेने राज यांच्यावर एकाही सभेत टीका केली नाही… त्याउलट राज यांनी उद्धव यांच्यावर लागलीच वैयक्तिक आरोप केले. राज यांच्या मनासारखं झालं नाही तर ते भूमिका बदलतात हे सर्वश्रूत आहे.

आता मुख्य विषय. जर का सेना-मनसे निवडणुकीआधी एकत्र आले असते तर मराठी मते एकत्रित नक्की झाली असती पण अमराठी मतांचं काय??? मराठी माणूस एकत्र येतो आहे असं म्हटल्यावर मुंबईत अमराठी मतं एकसंधपणे भाजपाच्या पाठीमागे उभी राहिली असती, आणि सर्वच मराठी मते सेनेला किंवा मनसेला पडत नाहीत (असं खुद्द राज म्हणतात) मग भाजपने निवडक मराठी अन बहुसंख्य अमराठी मतांवर सहज शंभरी गाठली असती. ह्या वेळेस सेनेला अमराठी मतेही नेहमीपेक्षा बरी मिळाली आहेत. सेनेचे 3-4 अमराठी उमेदवारही निवडून आले आहेत. अमराठी भागात सेनेने कधी नव्हे ते जागा मिळवल्या आहेत, ज्या अमराठी वर्गामुळे निवडून आल्या. शिवसेना राजसोबत गेले असते तर ह्या दहा-बारा जागा अशाच गेल्या असत्या.

Image result for uddhav thackeray and raj

जर उद्धव यांनी राज यांच्याशी यूती केली असती तर त्यांना निदान 30-40 जागा तरी सोडाव्या लागल्या असत्या. स्वबळावर लढतानाही सेनेत बंडखोर उभे राहिले आणि त्यातील 2-3 अपक्ष तर काही इतर पक्षातून निवडून आले. राज यांना जागा दिल्या असत्या तर बंडखोरी अजून वाढली असती आणि अजून जागांचे नुकसान झाले असते. ज्याचा फायदा भाजपला झाला असता. ह्या गोष्टींचा विचार करणेही गरजेचे आहे. दादर, जिथे सर्वाधिक मराठी माणूस आहे तिथे हे मतविभाजण जास्त होऊन भाजपचा उमेदवार निवडून आला असता तर वेगळी स्थिती होती. पण तेथेही पुर्णपणे शिवसेना निवडून आली. तिथे मनसेला तीन-चार जागा सोडाव्या लागल्या असत्य तर सेनेतील असंतोष उफाळून आला असता अन भाजपने त्याचा फायदा उठवला असता.

आता महत्वाचा मुद्दा. मनसेला जी मते पडली ती युतीनंतर सेनेला मिळालीच असती असही नाही. कारण सेनेवर नाराज असलेला मराठी माणूसच मनसेला मत करतो. ज्या वर्गाला असं वाटत असेल की सेनेने मुंबईचा अन आपला विकास केला नाही (जो प्रचार मनसे त्यांच्या जन्मापासून करत आहे) तर अशा युतींनंतर त्या वर्गाने सेनेला मतदान केलं असतं का? उलट सेना मनसे वेगळे लढल्याने सत्ताधारी वर्गाच्या (सेनेच्या) विरोधात मत करणारा मनसेला मिळाला अन भाजपची काही मते कमी झाली असती. मुंबईत सर्वाच्या सर्व मराठी माणूस सेना किंवा मनसेला मत देत नाही. हे उघड आहे. जशी कॉंग्रेस, भाजपने किंवा इतरांनी शिवसेनेच्या विरोधात मते मिळवली तशीच मनसेने! शिवसेना-मनसे युतीचा फायदा फक्त मराठी पट्ट्यात झाला असता. म्हणजे दादर, शिवडी, परळ. पण तिथे असेही शिवसेना निवडून आली आहे. त्यामुळे शिवसेनेची मते मनसेला अन मनसेची मते शिवसेनेला हस्तांतरित होतात ही भुलथाप आहे. मनसे जेंव्हा निर्माण झाली तेंव्हा हा प्रश्न थोड्या प्रमाणात होता. त्याचा फटका 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला बसला. पण नंतर असं दिसून आलं की, मनसे इतरांचीही (म्हणजे तरुणांची) मते खेचत आहे. मनसे स्थापित झाल्यापासून तीन महापालिका निवडणुका झाल्या आहेत. त्या तीनही निवडणुकीत शिवसेना मोठा पक्ष म्हणून पुढे आली आणि आपला आकडा टिकवून सत्ताही मिळवू शकली…

ठाण्यात मनसे उभी असतांनाही सेना स्वबळावर आलीच. नाशिकमध्ये मनसेचे कितीही मासे सेनेने गळाला लावले तरी मनसेची मतं सेनेकडे न जाता भाजपकडेही बर्‍याच प्रमाणात गेली. तीच अपेक्षा मुंबईत होती.

फक्त एक गोष्ट अपेक्षित आहे. जर खरच ठाकरे बंधूंच्या मनात (अहंकार बाजूला ठेऊन) युती करायची इच्छा असेल तर ती स्थानिक पातळीवर, निवडक ठिकाणी आणि छुप्या पद्धतीने करावी.

आता राहिला विषय शिवसेना कुठे कमी पडली मग? मराठी माणसाचे दुर्दैव होते असेच म्हणावे लागेल. शिवसेनेचा आकडा 97 पर्यन्त गेला होता पण केवळ नशीब साथ न दिल्याने अघटित घडलं. सात, पंधरा, पन्नास अन ईश्वरी चिठ्ठी अशाने जागा गमवल्या. मनसेचा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. उलट मनसे जर उभी नसती तर सेनेवर नाराज असलेली मते भाजपला मिळाली असती. सेना नेतृत्वाने हाच विचार केला असावा. मतदार यादयांत प्रचंड घोळ होता. काही प्रमाणात विकास न झाल्याचा रागही असावा आणि सत्ता-संपत्ती-साधन यापुढे एका पातळीनंतर हतबलता येतेच.

भाजपा अमराठी मतांसह मराठी मतासाठी काहीही करत होता. पण चार गुजराती मतांची मदत मिळावी म्हणून हार्दिक पटेलला बोलावलं तर मराठी माणसाला ते पटत नाही. हे कुठेतरी मराठी माणसाला समजायला हवं. राजकारण हा आकड्यांचा खेळ आहे, त्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. ज्या भाजपने आज केला आहे. नवीन मराठी तरुणांना, ज्यांची बोली भाषा आता इंग्लिश आहे त्याला मराठी वगैरे काही समजत नाही… त्यांना हवा आवडते…. चुकत आहे तो मराठी माणूस… केवळ भौतिक सुविधा नाही मिळाल्या म्हणून अस्मिता सोडून देणारा… आज मुंबई अन बेळगाव येथील परिस्थिती सारखी होत आहे. विचार मराठी माणसाने करावा… केवळ भौतिक विकास हवा की ओळख सांगणारी अस्मिता!!!

जय महाराष्ट्र

खालील लेखही एकदा वाचा… ह्याच ब्लॉग वर… 

शिवसेनेची अडलेली वाढ?

शिवसेनेची अडलेली वाटचाल?

झुकल्या वाकल्या माना या शिवमंदिरी!

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

1 Comment on "शिवसेना मनसे मिलन सिद्धांत!"

Notify of
avatar
Sort by:   newest | oldest | most voted
Vihang
Guest

lekh ekangi vatla….thik aahe tumhala shiv senevar baddal prem aahe…pan hya lekha peksha `JAGATA PAHARA’ varil Bhau Torsekarancha lekha jast parinaam karak vatla.

wpDiscuz
error: Content is protected !!