जंगल – मराठी भयकथा

जंगल – मराठी भयकथा

मराठी भयकथा || मराठी लघुकथा  || Marathi Horror Story || थरारकथा  ||  Fear Factor

थंडीचे दिवस होते. घनदाट जंगल पसरलेलं होतं. सगळीकडे चिडिचूप शांतता होती. अगदी पक्ष्यांचे आवाजही नव्हते. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड वृक्ष होते. उंचच उंच गेलेल्या वृक्षांच्या फांद्या एकमेकांत अडकून प्रकाशाला अडवत होत्या. पोर्णिमेच्या रात्रीचा चंद्र प्रखर असला तरी घनदाट जंगलात त्याचा क्षीण प्रकाश पडत होता.

काळ्याकुट्ट अंधाराला छेदत अन शांतातेचा भंग करत एक बस दूरवरून येत होती. त्या बसच्या दोन जुनाट हेडलाइटचा काय तो प्रकाश त्या जंगलात काळोखाला मागे दाटत होता. गाडी पुढे येत असताना आजूबाजूचा अंधार बाजूला सरकायचा अन गाडी पुढे जाताच पुन्हा अंधारात गढून जायचा. अवकाशात एखादा स्वप्रकाशित लघुतारा तुटून वाटचाल करावा तसं भासत होतं. थंडीने तर इतका कहर केला होता की जणू अंगाचा बर्फ व्हावा.

एकाएकी ती बस हळूहळू करत रस्त्याच्या मधोमध थांबली. आत काहीतरी प्रचंड गदारोळ चालू होता. काही वेळानंतर शेवटी त्या बसचा दरवाजा उघडल्या गेला अन आतून काही लोकांनी एका तिशीच्या आसपास असलेल्या तरुणाला बाहेर ढकललं. मागाहून त्याची बॅग बाहेर टाकली. तो तरुण अतिशय केविलवाण्या नजरेने त्या लोकांकडे पाहत होता. त्याला बाहेर हाकलून ती बस निघून गेली. गाडी सोडताना त्या बसच्या ड्रायवरने एक सुस्कारा सोडला अन त्याच्या तोंडच्या वाफेने गाडीचा समोरच्या काचेवर वाफ दिसू लागली.

त्या तरुणाचं आतमध्ये एका व्यक्तीशी भांडण झालं आणि तो व्यक्ति पोलिस निघाला. रागाच्या भरात त्याने ह्या तरुणाला बाहेर काढलं. कोणीही पोलीसशी भांडू इच्छित नव्हतं त्यामुळे तरुणाला अशा भयाण जंगलात एकटं का सोडता वगैरे कोणी म्हणालं नाही.

गाडी बरीच पुढे निघून गेली होती. गाडीची मागची लाल लाइट नजरेआड होईपर्यंत तो तसाच तरुण एकटक त्या गाडीकडे बघत उभा होता. गाडी थांबेल अन आपल्याला परत आतमध्ये घेतलं जाईल अशी भाबडी अपेक्षा धरून तो उभा होता. पण गाडी अर्थात थांबली नाहीच.

प्रचंड गारवा होता. त्याने डोक्याभोवती मफलर गुंडाळलं होतं. पण थंडी प्रचंड असल्याने त्याने बॅगेत असलेलं एक जुनाट स्वेटर काढलं अन अंगावर चढवलं. सगळ्यांसमोर त्या जुनाट स्वेटरची त्याला लाज वाटली असती पण आता तो विषय नव्हता. आता काय करावं म्हणून तो विचार करू लागला. आजूबाजूला प्रचंड जंगल होतं आणि रात्रीची वेळ. त्या पोलिसावरील राग निवळल्यावर त्याच्या मनात प्रचंड भीती दाटून आली होती. सगळीकडे चिडिचूप शांतता होती. मागचं गाव पन्नास तर पुढचं गाव पस्तीस-चाळीस किलोमीटर अंतरावर असावं. आता सकाळपर्यंत कसलंही वाहन येणार नाही याची खात्री त्याला होती. ह्या डोंगराळ आडवाटेने गाड्या येतच नसायच्या. गेलेली एकमेव कलेक्टर गाडी होती. सर्वात आधी त्याने शांतता दूर व्हावी म्हणून बॅगेतील रेडियो बाहेर काढून चालू केला अन तो विचार करू लागला.

त्याने हातातील घड्याळात बघितलं, रात्रीचे दहा वाजून गेले होते. चालत गेलं तरी काही उपयोग नाही हे त्याला माहीत होतं. अशा गर्द जंगलात अडकून बसलो ह्या जाणिवेनेच तो अर्धमेला झाला होता. अंधाराच्या विवरात अडकल्याप्रमाणे त्याला आजूबाजूला अंधार अन उंच वृक्षांशिवाय काहीच दिसत नव्हतं. कसलाही आवाज नव्हता किंवा जीवंतपणाची कसलीच खूण नव्हती. पण रेडियोवर लागलेल्या कुठल्यातरी अनोळखी भाषेतील आवाजाने त्याला जरा हायसं वाटलं. डोळे अंधाराशी संलग्न झाल्यावर नजर जरा स्थिरावली. अंधारातही आता थोडसं दिसू लागलं. पोर्णिमा असल्याने गर्द झाडीतून येणारे चंद्राच्या शुभ्र प्रकाशाचे कवडसे भोवताल दाखवू लागले.

तो झपझप पुढे चालत होता. मन दडपणाखाली येऊ नये म्हणून तो काहीतरी गाणे गुणगुणत होता. काहीही झालं तरी नकारात्मक विचार आणायचे नाहीत हे त्याने ठरवलं होतं. आणि काहीही करून लवकरात लवकर कुठल्यातरी सुरक्षित ठिकाणी पोचायला हवं असं त्याला वाटत होतं. खूप चालल्याने एवढ्या थंडीतही आता त्याला घाम आला होता. त्याने कानाला गुंडाळलेलं मफलर सोडून खांद्यावर टाकलं. तो नशिबाला दोष देत पुढे जात होता. बराच वेळ चालून-चालून त्याला दम लागला. रेडियोवर सतत काहीतरी वाजत होतं. काही नसलं तरी रेडियोची खर…खर… त्याला हवीहवीशी वाटत होती. अशा गूढ परिसरात कसलातरी अज्ञात आवाज कानावर पडू नये म्हणून त्याची ही धडपड होती. शिवाय प्राणी असा आवाज ऐकून दूर जातात असाही त्याचा समज होता. तो एका झाडाखाली श्वास घेत थांबला. एकाएकी मोठा खर…खर असा आवाज होऊन रेडियो बंद पडला. क्षणभर त्याला काळीज बंद पडल्यासारखं वाटलं. त्याचे डोळे मोठे झाले. त्याने रेडियो खाली-वर, उलटा-सुलटा करून बघितला. काहीच झालं नाही. एकाएकी रेडियोला काय झालं म्हणून तो चक्रावला होता. इतकावेळ कुठेच न ऐकू आलेली रातकीड्यांची किर्र कानावर पडत होती. ती लय फारच अभद्र वाटत होती. तो न राहवून खाली बसला. पोर्णिमेचा चंद्र जरासा ढगाआड गेला आणि अंधार दाटला. थंडगार वार्‍याची झुळूक अंगावरच्या घामाला स्पर्शून गेली.

लांबलचक पसरलेल्या निर्जन रस्त्याकडे तो बघत होता. अचानक त्याला शुक..शुक असा आवाज आला. अंगावर काटा… त्याने डोळे मोठे केले… काळीज वेगाने धावत होतं… अंग थरथर कापू लागलं… भयंकर काहीतरी जंगलात आहे आणि ते आपल्यावर डोळे रोखून आहे असा भास त्याला होत होता. त्याचा मागे अन जंगलात वळून बघायचा धीर होत नव्हता. अंग बर्फासारखं स्थिर झालं होतं. ज्या शक्यतांचे विचार मनात येऊ नये म्हणून तो खटपट करत होता तीच घटना घडत होती.

अशा भयाण जंगलात माणूस तर नक्कीच नसणार… त्याने स्वतःला प्रश्न केला…

पुन्हा एक शुक…शुक… असा आवाज आला.

त्याने सगळं बळ एकवटलं आणि तो जागेवरून उठून पळू लागला. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे, पाळतीवर आहे, पाठलाग करत आहे ही जाणीव वाढत होती. काहीतरी भयानक घातकी आपल्याशी भिडणार आहे ह्या जाणिवेनेच त्याचा थरकाप उडाला होता. तो आठवेल त्या देवाची नावे घेत होता. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून तो एकटाच पिसाट्ल्यासारखा धावत होता. आता आपण मरणार ही जाणीव बळावत होती. काहीही झालं तरी मागे वळून बघायचं नाही हे त्याने मनोमन पक्क केलं होतं.

त्याला गावातील जुन्या गप्पा-गोष्टी आठवू लागल्या. जंगलात एक हडळ वास्तव करते. मानवी रक्त प्राशन करून ती हजारो वर्ष ह्या जंगलात वास्तव्यास आहे… तिचं ते अभद्र अन भयाण वर्णन… तर्हेतर्हेने माणसाला छळायचे प्रकार… त्याला सगळं सगळं आठवत होतं… मागे इथेच काही गाड्यांचे झालेले अपघात… त्या लोकांचा आत्मा… असे अनेक किस्से त्याला आठवू लागले… ज्या घटना-गोष्टी आठवू नयेत म्हणून तो आटापिटा करत होता त्या एका झटक्यात मेंदूत फिरू लागल्या…

तो भीतीने अस्थिर झाला होता… आता आपलं काही खरं नाही हे त्याला माहीत होतं… मागून पुन्हा पुन्हा शुक…शुक असा आवाज येत होता… मधूनच तो आवाज अगदी पाठीजवळून येत आहे असं त्याला वाटत होतं…

त्याला माहीत नव्हतं, एक अमानवी सावली त्याच्या अगदी पाठीमागे आहे. त्या अमानवी जिवाचं हिडीस हास्य त्याला दिसलं असतं तर तो हृदय बंद पडून मेला असता…

              धावता-धावता त्याला एक पडकी झोपडी दिसली… त्याला जरा धीर आला.. कोणीतरी भेटेल, सोबत होईल म्हणून तो देवाचे आभार मानू लागला… त्या मोठ्या झाडाखालच्या छोट्याशा झोपडीकडे तो धावतच गेला… दरवाजावर गडबडीने थाप मारली… आतून कसलाच प्रतिसाद आला नाही… मागून मात्र कोणीतरी श्वापद वेगाने अंगावर येत आहे अशी जाणीव बळावत होती… मी आले रे!!! असा थंडगार पण अभद्र आवाज त्याच्या कानी पडला… त्याने दरवाजाला जोरात धक्का दिला… दरवाजा उघडाच होता… आत वाकून बघितलं… काहीतरी जुनं फुटकं-तुटकं सामान होतं… त्याची भिरभिरती नजर झोपडीत सर्वत्र फिरत होती… मानवी खुना तो शोधत होता… तो आत गेला… पुर्णपणे अंधार… विश्वाच्या निर्वात पोकळीप्रमाणे… त्याला भीती वाटू लागली… अंधारात कोणीतरी दबा धरून बसलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी ते अंगावर धाव घेईल अशी असुरक्षित भावना निर्माण झाली… हे बघून तो मागे वळला आणि दरवाजावर एक किळसवाणी आकृती त्याच्या नजरेस पडली… अंगावर काळी साडी… मोकळे सोडलेले लांब पांढरे केस… लाल-भडक डोळे… मोठे हिडीस दात… फाटलेला पिवळसर चेहरा… चेहर्‍यावर पाशवी हास्य… गुढग्याच्या खालपर्यन्त गेलेले पिवळे हात… ते भीतीदायक दृश्य पाहून तो मोठयाने किंचाळला… किंचाळत राहिला… तो भीतीने मागे सरकू लागला… त्याच्या धक्क्याने कमकुवत झोपडीचा मागचा भाग तुटला.. तो जमिनीवर कोसळला, पण त्याचे ताणले गेलेले मोठे डोळे त्या विद्रूप आकृतीवर होते… हातातून पडलेलं सामान तस्स टाकून तो जीवाच्या आकांताने पळू लागला… डोळ्यातून घळघळा पाणी येत होतं. आता वाचणं अशक्य असल्याची तीव्र जाणीव त्याला होऊ लागली… देवाचा धावा सुरू होता… डोळे सताड उघडे होते अन दातखिळ बसली होती… ती अमानवी आकृती अन तो विद्रूप चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता… तो देवाचं नामस्मरन करत पळत सुटला…

मागे वळून बघायचं नाही हे त्याने मनाशी पक्क केलं होतं. पण तो पळत असताना मागून एक गगनभेदी किंचाळी उमटली. सारं जंगल शहारून उठलं. विचित्र अन पाशवी आवाज उमटू लागले. जणू काही दाही दिशांनी अंगावर कोणीतरी आक्रमण करायला उतावीळ झालं असावं.

मी आले… तुझीच वाट बघत होते… थांब… असा आवाज चित्रविचित्र तर्‍हेने येत होता.

त्या आवाजाने विचलित होऊन त्याने एक क्षण मागे वळून बघितलं अन त्याच्या लक्षात आलं की ती आकृती तिथेच उभी राहून मोठयाने हसत आहे… त्या हडळीचे पिवळसर हात लांब लांब होत त्याच्याकडे येत होते… त्या काळ्याशार रस्त्यावरून तो धावत होता. त्याच्या समोर धुकं दाटलं होतं. त्याचा धावायचा वेग कमी झाला. धुक्यात काहीतरी उभं ठाकलेलं होतं. त्याची भिरभिरती नजर ते शोधू लागली. पाठीमागून एक हात त्याच्या खांद्याला स्पर्श करत होता. त्या थंडगार अन अभद्र स्पर्शाने तो गरथून गेला अन जमिनीवर कोसळला. तो रांगतच मागे सरकू लागला. तो मागे कशालातरी थडकला. गडबडीने त्याने मागे बघितलं तर त्या घरात दिसलेली हडळ मोठाले दात काढून त्याच्याकडे एकटक बघत होती. आता मात्र त्या चेहर्‍यावर छद्मी अन रागीट भाव होते. त्याचं हृदय वेगाने धावू लागलं… डोळे फिरू लागले… अंग ताठ झालं… आणि हृदय भीतीने बंद पडत गेलं. त्या हडळीने हाताच्या पंज्याने त्याचा फडशा पाडला. रस्त्यावर रक्ताच्या चिळकांडया वाहत होत्या. लांबून रेडियोची खर्र..खर्र पुन्हा सुरू झाली… ती हडळ मोठ्या आनंदाने त्याचं मांस भक्षण करत बसली होती….

—समाप्त—

सर्व हक्क सुरक्षित @ latenightedition.in

-*-*- वाचा अशाच मराठी कथा -*-*-

नवीन मराठी कथासंग्रह

मराठी पत्रकार

एक संध्याकाळ!

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

2 Comments on "जंगल – मराठी भयकथा"

Notify of
avatar
Sort by:   newest | oldest | most voted
trackback

[…] जंगल – मराठी भयकथा […]

trackback

[…] जंगल – मराठी भयकथा […]

wpDiscuz
error: Content is protected !!