एका लेखकाची व्यथा

एका लेखकाची व्यथा

लेखक मित्रांनो,

लेखक हा खरं तर कुठल्याही नवनिर्मितीचा जनक असतो. कल्पनेला सत्यात आणणे असो की माणसाची संवेदनशीलता जागी करणारा त्यांच्या भावनांना हात घालून त्यांच्यातील खरेपणा उघड करणे… लेखक इतक्या ताकदीचा असतो.

लेखकाच्या लेखणीने इतिहास घडतात. भले-भले राजे-महाराजेही लेखकांचा मान-सन्मान राखून असत. प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक विद्वान लेखक झाले आहेत ज्यांच्या लेखनाची, विचाराची समाजाने दाखल घेतली आहे अन त्यांनी समाजाला मार्गही दाखवले आहेत.

लेखक हा नेहमीच एखाद्या बी प्रमाणे असतो जेथून एक आनंद देणार, सावली देणारं झाड निर्माण होतं. पण आजकाल लेखकांना कितपत किम्मत आहे, कितपत मान आहे हा वादाचा विषय होत आहे. प्रत्येक गल्लीत दोन-तीन लेखक तर सहज सापडतील.

पण स्वतःच्या पायावर उभा राहिलेला मनुष्य जेंव्हा, त्याला रांगण्यापासून चालण्या-धावण्या पर्यंत ज्यांनी शिकवलं त्या जन्मदात्यांना विसरतो तिथे वाईट वाटतं.

चित्रपट क्षेत्रात तर लेखकाशिवाय काम सुरु होणं ही अशक्य आहे. लेखकही चित्रपट कसा असेल, कसा असावा ह्या बाबतीत केवळ दोन ओळींच्या संकल्पने पासून सुरुवात करतो अन अख्खा चित्रपट कागदावर उतरवतो. पण त्या कागदाचा प्रवास रिळात होईपर्यंत लेखकच गुंडाळला अन अंधुक होत जातो.

लेखकाला पद्धतशीरपणे वापरून घेण्याची रीत हल्ली बऱ्याच लोकांना अवगत होताना दिसत आहे. पैसा, ओळख, कथेचं क्रेडिट ते सन्मान यापैकी सगळ्या गोष्टी कुठल्याच लेखकाला मिळत नाही. मेंदूचा भुगा होईपर्यंत रात्र रात्र जागून तयार केलेल्या कथा-पटकथा, त्या मेहनतीचा योग्य मोबदला न देता कधी फुकट तर कधी माफक दरात ढापल्या जातात. नवख्या लेखकांना तर अक्षरशः गृहीत धरलं जातं. अनुभव घे म्हणून त्यांच्याकडून फुकटात कामे करून घेतली जातात.

चित्रपटाचे काम सुरु होईपर्यंत लेखकांना पैसे देणं ही तर अंधश्रद्धा समजली जाते. अन यदाकदाचित चित्रपट सुरूच होऊ शकला नाही तर लेखकाची मेहनत तर वाया जातेच पण पैसाही दिला जात नाही. लेखक बिचारा सगळी मेहनत पाण्यात गेली म्हणून हताश होऊन बसतो. स्क्रिप्टला कागदाचे तुकडे अन ‘अशा खूप स्क्रिप्ट पडल्या आहेत’ असं म्हणनार्‍यांचा तर अक्षरशः तिटकारा येतो.

मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यात सहाय्यक अभिनेता, नवोदित कलाकार, फ्रेश चेहरा अजून काय-काय नावाने अभिनेते-अभिनेत्री यांना बक्षीस वाटली जात असताना कथा, पटकथा, संवाद याला एकच गृहीत धरून एकच पुरस्कार असतो. हे म्हणजे जिथे उगम झाला त्यालाच विसरण्याचा प्रकार आहे. लेखक चित्रपटाच्या मुख्य प्रवाहातील समजला जातच नाही. तो फक्त एक………

मोठमोठ्या लेखकांच्या कथा स्क्रिप्ट घेऊन त्या तोडून मोडून सर्रास वापरली गेल्याचीही उदाहरणे आहेत. अशा वेळेस हतबल होण्याशिवाय पर्याय नसतो. लेखकांना स्वतःच्या हक्कासाठी संघटना स्थापन कराव्या लागतात असे दिवस आहेत. असं का होत आहे याचाही विचार करावा लागेलच. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक कमीपणाने बघण्याची काहींची मानसिकता असते. सर्वच असे असतात असं नाही पण इतर कलाकारांच्या दृष्टीने लेखकांना मानधन कमी देणे हा त्याचाच भाग आहे.

लेखक हे बऱ्याचदा संवेदनशील माणसे असतात; असं असल्याने त्यांचा व्यावहारिक पद्ध्तीने फायदा उचलला जातो. चित्रपट येऊन जातातही पण लेखकाला राहिलेल्या रकमेसाठी, कामाच्या मोबादल्यासाठी निर्मात्या-दिग्दर्शकाकडे खेटे मारावे लागतात; एखाद्या मजुराप्रमाणे!

लेखकांनीही आता सगळी निरर्थक मूल्ये बाजूला ठेऊन लेखकांनीच कठोर अन व्यावहारिक बनलं पाहिजे. हातात advance येईपर्यंत काम सुरु करू नये असा पवित्रा घेतला तर चित्रपटनगरी अन निर्माते-दिग्दर्शक भानावर येतील. लेखकाचं ना हरकत प्रमाणपत्र न मिळेपर्यंत चित्रपटच काय तर लघुपटही दाखवता येऊ नये अन महोत्सवात दाखल करून घेऊ नयेत.

तशा तर बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्या आणि करण्यासारख्या पण सुरुवात तरी व्हावी! अलीकडेच दोन-तीन वाईट अनुभव आले अन हताशपणा अन हतबलता जाणवत होती, त्यातूनच ह्या भावना उमटल्या.

धन्यवाद!

 

पुस्तक प्रकाशित करताय?

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

1 Comment on "एका लेखकाची व्यथा"

Notify of
avatar
Sort by:   newest | oldest | most voted
trackback

[…] एका लेखकाची व्यथा […]

wpDiscuz
error: Content is protected !!