जरीला – भालचंद्र नेमाडे

जरीला – भालचंद्र नेमाडे

#भालचंद्र_नेमाडे || Bhalchandra Nemade  || जरीला कादंबरी  || चांगदेव चतुष्टय: भाग 3 || मराठी साहित्य

मध्यंतरी नेमाडे नावच्या लेखकाच्या लिखाणाने पछाडलं होतं. नेमाडेंची पुस्तके वाचल्याशिवाय चैन पडत नव्हता. चांगदेव चतुष्टयचे सगळे भाग वाचून झाले. तसं जरीला वाचून आता बरेच दिवस झाले. यावर वाचन झाल्यावर लागलीच काही लिहिलं तर अगदी मंनापासून आलं असतं. पण काम व इतर उद्योगांच्या गडबडीत लिहायचं राहून गेलं. आज हे पुस्तक स्वतःहून हाका मारतय असं झालं. पुस्तकांच्या गर्दीतून हे स्वतः बाहेर डोकावत होतं. याला बघताच अपूर्ण कामाची आठवण झाली. आणि #जरीला बद्धल लिहायचा योग जुळून आला.

खरं तर काय लिहावं असा प्रश्न पडला तर काही वावगं होणार नाही. कारण नेमाडेंची जी शैली आणि जो विषय आहे तो थक्क करून सोडणारा आहे. अस्थिर मनाचा कल्लोळ त्यांच्या लिखाणातून वावटळीसारखा घोंगावत असतो. मनाच्या शांतीसाठी गावोगाव भटकणारा चांगदेव पाटील हे पात्र अनादी-अनंत तरुणांच्या मनाचा कल्लोळ मांडून जातो. जगण्याला अर्थ काय? हा प्रश्न जेंव्हा पडतो तेंव्हा अस्तित्वाच्या खाणाखुणा अधिक गडद होत जातात.

माणसांच्या गर्दीत (आपल्या पिढीला तर सोशल मीडिया हा महागर्दीचा कोष आहे) राहूनही आतमध्ये एकाकी आयुष्याला सामोरं जाणार्‍या चांगदेव पाटील ह्या तरुणाची कथा आहे. सतत जगण्याची धडपड अन जगणं निरर्थक वाटायचीही गडबड वाटणार्‍या तरुणाची ही कथा आहे. वरवर खूप निष्ठुर, निष्काळजी वाटणार्‍या पण आतून प्रचंड संवेदनशील आणि विचारी असणार्‍या तरुणाची ही कथा आहे. रोज येणार्‍या परिस्थितीला, संकटाला तोंड द्यायची तयारी असली तरी मोठ्या संकटांना सामोरं न जाता पळवाट शोधून त्यातून निसटू पाहणार्‍या तरुणाची ही कथा आहे. जगण्याच्या अशाच विरोधाभासात अडकलेल्या चांगदेव पाटीलची ही गोष्ट आहे.
ALSO READ BHALCHANDR NEMADE’S OTHER NOVELS

Image result for जरीला – भालचंद्र नेमाडे

जुन्या गावाचे अनुभव गाठीशी घेऊन, तेथून वैतागून चांगदेव नवीन गावात येतो. आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात करतो. आता आपण दुखी किंवा निराश व्हायचं नाही असं जाणून-बुजून ठरवतो. काहीही झालं तरी सकारात्मक राहायचा असा त्याचा निर्धार असतो. त्यात सगळ्या गोष्टी जुळूनही आलेल्या असतात. सर्वात आधी, एक चांगलं शहर मिळालेलं असतं. म्हणजे, आधीच्या गावात प्रचंड लफडी, अस्वच्छपणा, शुष्कपणा येथे नसतो. येथील वातावरण चांगलं असतं, लोक साधी सरळ असतात आणि गाव-शहर म्हणून ते चांगलं असतं. अगदी चांगदेवला पटेल असं. नंतर कॉलेजही चांगलं निघतं. नेहमीप्रमाणे येथेही जातीय राजकारण वगैरे भंपक गोष्टी असतात पण मर्यादित. त्याची झळ चांगदेवला अजिबात बसत नाही. त्यानंतर खोली आणि मित्रही उत्तम भेटतात. अजून काय पाहिजे? असा प्रश्न पडावा अशी स्थिति असते. सर्वकाही व्यवस्थित चालू असतं. मनातील एकटेपणा दूर झालेला असतो. गोतावळ्यात राहिल्याने कसलाही नैराश्य अन चिंता लागलेली नसते.

पण नंतर अपघाताने संपूर्ण शहराची लाइटच जाते अन अंतर्मनातील अंधाराचा खेळ सुरू होतो. त्याच्या सोबत असलेले संगती सुट्टीनिमित्त त्यांच्या गावाला निघून जातात. त्यांच्यातील तरुण मंडळींची लग्न ठरत असतात. ह्या सगळ्याने चांगदेव अस्वस्थ होत जातो. आयुष्यात पुन्हा एकटेपणा डोकावू लागतो. सर्वचजण एकाच मार्गाने जाणारे असतात असं त्याला वाटू लागतं. मागील गावातून पारूच्या घेऊन आलेल्या आठवणी त्याला सतवू लागतात. एक वेळ अशी येते की एकटेपणात पारू आपल्या सोबत राहते अशी फसवी समजून चांगदेवची होऊ लागते. मनातील आभासाचे खेळ. तो पुन्हा अस्वस्थ होऊ लागतो. ज्या गोष्टींची भीती वाटत असते त्याच पुन्हा सुरू झालेल्या असतात. धक्के!!!
BUY NEMADE’s BOOKs WITH DISCOUNT

चांगदेव लग्नाच्या बाजारातही उतरतो. पण अयशस्वी होतो. तेथेही पुर्णपणे मानवी व्यवहार आडवे येतात. त्याने लग्नाचा कधी विचारच केलेला नसतो पण इतरांचे बघून अन सतत येणारी पारूची आठवण यामुळे तो अस्वस्थ होऊन लग्नाचा विचार अक्षरशः उतावीळपणे करू लागतो. तेथून आलेली निराशा फार बोचरी असते. त्यात त्याच्या आई-वडिलांची झालेली स्थिती हीसुद्धा त्याचं मन पोखरायला पुरेशी असते. पण तो त्या परिस्थितीशी झुंजत नाही… नेहमीप्रमाणे पलायन हाच त्याचा ठरलेला मार्ग असतो… सारं काही आलबेल चालू असताना अचानक घडलेल्या अनेक घटनांनी तो अस्थिर होतो… हे सगळं विसरण्यासाठी, लांब पळण्यासाठी तो पुन्हा नव्याने गाव बदलायचं ठरवतो… दुसरी रेघ लहान आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या बाजूला त्यापेक्षा मोठी रेघ ओढायची… हाच तो साधा प्रकार… येणार्‍या परिस्थितीला झुंजण्यापेक्षा दुसरी अशी परिस्थिती तयार करायची की ह्या परिस्थितीला अर्थ उरणार नाही…

नेमाडेंची शैली, उदाहरणं, प्रसंग, किस्से, घटना ह्या अतिशय नैसर्गिक पण अप्रतिम आहेत. संपूर्ण पुस्तकात तो कोळ्याचा जो किस्सा रंगवला आहे तो लाजवाब आहे. त्या कोळ्याची अन स्वतःची आयुष्य तुलना करणं हा चांगदेवचा खेळ मनाला खूप भावतो. तोही एकटाच, ब्रम्हचारी आहे असं त्याचं म्हणणं हेही संवेदनशीलतेचा आविष्कार म्हणावा लागेल. तो कोळीही जसा स्वतः निर्माण केलेल्या जाळ्याला जग मानत असतो, त्याच्या बाहेर जाऊ इच्छित नाही आणि स्वतःच्याच जाळ्यात अडकतो… हे प्रतिकात्मक, तुलनात्मक जे रूप दिलं आहे त्याला तोड नाही. शेवटी ती खोली सोडताना त्याच्या जीवंत राहण्यासाठी चांगदेव खिडकी उघडी ठेवतो तेही खूप भावुक आहे. वरवर निष्ठुर वाटणार्‍या चांगदेवच्या मनातील हळुवार कोपर्‍याचं दर्शन घडतं.

नेमकं काय काय सांगावं हाच खरा प्रश्न आहे. संपूर्ण कादंबरीत खालच्या मजल्यावर राहणारा, नुकतच लग्न झालेला उद्धट माणूस असं म्हणून एक पूर्ण पात्र उभं केलं आहे; कुठेही नावाचा उल्लेख नाही. त्यात कहर म्हणजे शेवटी ते लवकरच बाळाची आईबाप होणारं कुटुंब असा उल्लेख करत ते संपूर्ण घटनाच सांगतात.

एकटेपणा घालवण्यासाठी ते एका डॉक्टर बाईशी ओळख काढतात. एकटेपणा दूर करण्यासाठी दिसणारी धडपड अन कारेपणाचे गुणधर्म हेही दिसून येतात. चांगदेव स्वतःहून काकाच्या घरी जातो अन त्याचे लग्नाबद्धलचे विचार बदलतात. संसारी माणूस प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला शिकलेला असतो हे त्याला समजतं. मग तोही लग्नाचे खटाटोप करू लागतात. तेथील अवस्था नेमाडेंनी खूपच सुंदररित्या वर्णलेली आहे. तो ओलसरपणाचा प्रसंग अन चांगदेवची झालेली अवस्था ही त्यांच्या स्वयंभू अन अभिजात लेखनाचा कळस आहे. मनसाच्या आयुष्यात एक संक्रमण घडतं तो हा प्रसंग आहे. आयुष्यात कारं राहू, संसारात अडकून काय किंवा तत्सम विचार करणारा संसार वगैरे बाबतीत गांभीर्याने विचार करू लागतो. खासकरून आजच्या पिढीतील तरुण वर्गासाठी तो खूपच महत्वाचा आहे.

लग्नासाठी मुलगी बघायला गेल्यावार चांगदेवची अवस्था हीसुद्धा खूप जातिवंत उदाहरण आहे आणि त्यातूनही चांगदेवच्या बाबतीत होणारे बादल लेखक उठावदारपणे दाखवून देतो.

आपण कधीच पैशाच्या किंवा बाबतीत गंभीर विचार केला नाही हा प्रश्नही त्याला एक क्षण पडतो. गावचे पाटील-वतनदार असलेले त्याचे पूर्वज पैशाला मोहताज झालेले असतात. आपली तर दमडीचीही मदत नाही याचीही त्याला खंत वाटते. आयुष्यात काय मिळवलं किंवा काय गोळाबेरीज केली ह्याचं उत्तर त्याच्याकडे नसतं. केवळ निरर्थकपणे ध्येयशून्यतेने जगत असलेले बेफिकरी आयुष्य एवढाच काय तो प्रकार असतो. एव्हाना सहज पैसे उडवणारा किंवा पैशांची पर्वा न करणारा चांगदेव निष्ठुर अन व्यवहारिकपणे जुने स्नेही पवार यांच्याकडे राहिलेले पैसे मागतो… चांगदेवमध्ये दिसणारे बदल किंवा काय असेल ते, लेखक त्याला जज करत बसत नाही. तो जसा वाहत जाईल, मुक्त संचार करत जाईल, एखाद खर्‍या व्यक्तीप्रमाणे तसा त्याला वावर आहे. अशा चांगदेवमुळेच कादंबरी रंजक होत जाते. शेवटी सर्व चांगलं घडत असताना पाल चुकचुकते अन ते गाव, ते कॉलेज, ती मंडळी सोडून जायचा निर्णय चांगदेव घेतो. शहरात असलेल्या अंधारापेक्षा मनात उमटलेला अंधार त्याला जास्त पोखरत असतो. त्यापासून पळण्यासाठी तो हा निर्णय घेतो.

तुम्हे डर है की मै उससे हार जाउंगा?

नही… मुझे डर है की आप जान-बुझकर उससे हारणा चाहते है…

The Dark Knight Rises चित्रपटातील Batman/Bruce Wayne आणि Alfred यांच्यातील हा संवाद येथे चांगदेवला तंतोतंत लागू होतो असं मला वाटतं.

जरीला म्हणजे चांगदेव चतुष्टय मधील मधील तिसरा भाग. पण इतर तीन भागांच्या मानाने हा भाग थोडा वेगळा मानला पाहिजे. विशेष करून येथे नेमाडेंनी संय्यत लेखन केलं आहे. इतर तीन भागात जरा किस्से अन रंजकतेचा भाग जास्त आहे. पण येथे चांगदेवच्या मनावर होणारे संक्रमण, स्थित्यंतर हे खासकरून समोर येतात. इतर तीनही पुस्तकांत चांगदेवला काहीतरी कष्ट आणि अडचणी असतात म्हणून तो ते गाव सोडतो पण येथे तो सर्व व्यवस्थित असतांनाही सर्व सोडतो. शिवाय येथे फार राजकीय-जातीय उदाहरणं आणि गोंधळ नाही. काही तज्ञ मंडळी म्हणतात नेमाडेंच्या पुस्तकात वसाहतवाद, ब्राम्हणवाद वगैरे भानगडी आहेत. असेलही… पण ते पात्र तसं वाहत जातं, त्यावर नेमाडेंच्या वैयक्तिक विचारांचं ओझं नाही किंवा त्यांचे अन चांगदेवचे विचार वेगळेच असावेत असं मला वाटतं. जरीलामध्ये तरी तसे अंदाज चुकीचे ठरतात.

तरुण पिढी स्वतःचं एक विश्व घेऊन असते. ते बर्‍याचदा आभासी असतं. त्या पिढीला व्यक्त होण्याचे मार्ग कमी आहेत (आता तसं नाही). ती पिढी स्वतःच्या अटींवर जगू इच्छिते. जगात किंवा आधी असलेल्या गोष्टी रूढ चाली ह्या त्यांना नको असतात पण त्याच्यातही किंबहुना त्यातच एक जगण्याचा मार्ग असतो. नित्य जीवनात येणारे प्रसंग कलाकृतीत विशिष्ट अंगाने मांडून जीवनाचं मूल्य सांगितलं असावं. जीवनातील प्रत्येक गोष्टी आणि घटनांना संदर्भ असतात पण ते आपल्या पातळीवरच जुळतील असं काही नाही. त्याची एक किम्मत अन मार्ग असतो. पण धडपड ही चालू असते… निर्जीव नाहीत हे सिध्ध करण्यासाठी… कधी एकट्याने तर कधी सोबतीने…

Image result for जरीला – भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडे

वाचा
चांगदेव चतुष्टय: ४ – झूल – भालचंद्र नेमाडे

इथे पुस्तके घ्या:

वाचा —

झूल – भालचंद्र नेमाडे

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

1 Comment on "जरीला – भालचंद्र नेमाडे"

Notify of
avatar
Sort by:   newest | oldest | most voted
wpDiscuz
error: Content is protected !!