वसुधैव कुटुंबकम

वसुधैव कुटुंबकम

#भारतीय_मानसिकता ||  #वसुधैव_कुटुंबकम  ||  #परदेशी_नागरिकत्व  || #वंश  || #माझंमत  ||  अस्मितेचे प्रश्न

नुकतच एक बातमी आली ज्याने आपल्या भारतीयांची अन त्यातल्या त्यात महाराष्ट्राची अन त्यातल्या त्यात कोकणवासीयांची मान अभिमानाने ताठ वगैरे झाली होती. ती बातमी होती, लियो वर्‍हाडकर नावाचा मूळ भारतीय-मराठी व्यक्ति आयरलॅंड देशाचा पंतप्रधान झाला. आपल्याकडील बालिश माध्यमांनी त्यांच्या घरी जाऊन डेरा टाकला होता अन त्यातले माहीत असलेले नसलेले गुण ठासून संगितले.

भारतात जगाचा विश्वगुरू बनायची कुवत आहे हे आपण अनेकदा ऐकलं असेल. त्याचीच सुरुवात की काय म्हणून सध्या जगभरात भारतीय ‘वंशाचे’ असलेले लोक मोठमोठ्या पदांवर विराजमान होत आहेत. अगदी गूगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे कंपनीमध्येही भारतीय सर्वोच्च पदावर स्वतःच्या स्व-कर्तुत्वाने पोचले आहेत. खरं तर एकाच ‘वंशाचे’ म्हणून आपण त्यांचं कौतुक करणे अन अभिमानाने आपली छाती भरून येणे साहजिक आहे.

त्यानंतर आपण जरा राजकीय क्षेत्रात बघितलं तरी जगातील विविध देशात भारतीय ‘वंशाचे’ अनेक कर्तुत्ववान व्यक्तिमत्व आपल्याला मोठमोठ्या पदांवर विराजमान होताना दिसत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री निकी हॅले यासुद्धा मूळ भारतीय वंशाच्या आहेत म्हणे. त्यानंतर कॅनडाचे संरक्षणमंत्री हरजितसिंग सज्जन नावाचे एक मूळ शीख (भारतीय) ‘वंशाचे’ आहेत. कॅनडाच्या कॅबिनेट मंत्र्यांत जितके शीख बांधव मंत्री म्हणून आहेत तितके आपल्या भारतातही नाहीत. त्यांच्या संसदेतही बरेच शीख बांधव आहेत. अमेरिकन संसदेतही बरेच भारतीय ‘वंशाचे’ लोक निवडून आले आहेत. बॉबी जिंदाल नावाचे मूळ भारतीय ‘वंशाचे’ नेते सध्या अमेरिकेतील Louisiana ह्या मोठ्या राज्याचे गवर्नर आहेत. भविष्यात ते त्यांच्या पक्षाकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात. आणि तेथील लोकांनी निवडून दिलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एक भारतीय ‘वंशाची’ व्यक्ति असेल. नुकत्याच ब्रिटेनच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यातही बरीच भारतीय वंशाची मंडळी निवडून आली. ही यादी बरीच मोठी आहे. एकंदरीत काय तर भारतीय ‘वंशाची’ व्यक्ती बाहेरदेशात जाऊन तेथील राजकरणात स्वतःच्या कर्तुत्वाने जागा निर्माण करू शकते अन सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते.

              हे सगळं बघून आपल्या सर्वांना अभिमान वाटणे साहजिक आहे. पण आपल्या भारतात एकही परदेशी व्यक्ति अशा पदावर पोहोचणे शक्य आहे का हा विचार मनात आला. यात पहिलं नाव आठवलं ते अर्थातच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं. सोनिया यांचा राजीव यांच्याशी विवाह 1968 साली झाला होता. त्यानंतरच्या गोष्टी इतिहासात नमूद आहेत. त्यानंतर 1999 साली त्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडून आल्या. त्यांच्या परदेशी नागरिकत्व ह्या मुद्द्यावर शरद पवार वगैरे मंडळींनी तीव्र आक्षेप घेत वेगळा पक्ष काढला अन काहीच दिवसांत त्यांच्याशी आघाडी केली, त्यांच्या नेतृत्वात मंत्रिपद उपभोगलं अन आज ते त्याच पक्षासोबत आहेत. हा इतिहास आहे.

सोनिया गांधी भारतात आल्यानंतर इंदिरा गांधी अन राजीव गांधी हे पंतप्रधान पदावर राहिले होते. सोनिया गांधी यांनी देशाचं राजकारण जवळून, म्हणजे अगदी सत्ताकेंद्रापसून पाहिलेलं होतं. त्यामुळे त्यांना देश माहीत नाही असा भाग नव्हता. राजकारणाचा भाग काहीही असो, पण सोनिया गांधी जेंव्हा राजकरणात आल्या तेंव्हा देशाचे राजकारण ढवळून निघालं. अक्षरशः त्यांच्याच पक्षात गोंधळ माजला अन फुट पडली. एक परदेशी बाई भारतीय राजकरणात महत्वाची भूमिका बजावत आहे हे कोणालाच मान्य नव्हतं. त्यावरून अतिशय खालच्या थराची टीकाही झाली. ते चूक-बरोबर असा काही विषय नाही. पण ज्याप्रमाणे परदेशात भारतीय वंशाच्या व्यक्तिला स्वीकारले जातं त्याप्रमाणे आपण केलेलं नाही. सोनिया गांधी यांच्या हेतुवरही शंका उपस्थित केल्या जात होत्या अन त्या आजही तशाच आहेत. मग जे भारतीय परदेशात मोठ्या पदावर विराजमान होत आहेत त्यांचा इतिहास-भूगोल माहीत नसताना आपण इथे बसून टाळ्या वाजवण्यात काय अर्थ आहे. तिकडे जिंदाल, वर्‍हाडकर, हॅले, सज्जन यांच्या हेतुवर शंका उपस्थित केलेली दिसत नाही. मग आपणच इतके कद्रू कसे? हे म्हणजे. आपला तो बाब्या अन दुसर्‍याचं ते कारटं यातला प्रकार झाला. दुसर्‍या देशात भारतीय मोठा झाला की वाहवा करायची अन भारतात परदेशी व्यक्ती मोठा होत असेल तर त्याला शिव्या द्यायच्या. वसुधैव कुटुंबकम म्हणणारा भारत तो हाच का मग?

2004 साली जनतेने सोनिया यांच्यावर विश्वास ठेऊन कोंग्रेसला मते दिली का भाजप नको म्हणून, हे सांगणं कठीण आहे. येथे सोनिया गांधी यांची बाजू घेण्याची काहीही हौस नाही हेही स्पष्ट करू इच्छितो नाहीतर देशभक्तांच्या गर्दीत मी देशद्रोही जाहीर व्हायचो. त्यांनी केलेला भ्रष्टाचार किंवा अनागोंदी कारभार यावर चर्चा होऊ शकते. पण एकंदरीत भारतीय मानसिकता मला खूप आश्चर्यचकित करणारी वाटली. एका बाजूला “वसुधैव कुटुंबकम” हे घोषवाक्य आमचं असं मिरवत जगाला उपदेश करायचा अन स्वतःच्या घरात बाहेरच्याला महत्वाची जागा देताना कद्रूपणा करायचा हा भाग पटत नाही.

परदेशातील भारतीय ‘वंशाच्या’ व्यक्ति स्वकर्तुत्वाने त्या पदावर पोचल्या, इथे सोनिया यांचं कर्तुत्व काय होतं? किंवा घराणेशाही वगैरे हा मुद्दा ग्राह्य धरला तरी त्यांच्या परदेशी असण्याबद्दल सतत शंका का उपस्थित केल्या जातात हा प्रश्न आहे. भारताचा संरक्षणमंत्री किंवा परराष्ट्रमंत्री हा परदेशी व्यक्ति आहे हे आपण कधी मान्य करू का? मुद्दा केवळ सोनिया गांधी यांच्या असण्या-नसण्याचा नाही, पण परदेशात भारतीयांना ज्या मोठ्या मनाने स्वीकारलं गेलं त्याप्रकारे आपण स्वीकारू का हा प्रश्न आहे. हा मुद्दा केवळ नागरिक नव्हे तर राजकरणी, माध्यमं, विचारवंत अन साहित्यिक इथपर्यंत जाऊन पोचतो. आपल्यात ती वसुधैव कुटुंबकम वाली भावना आहे का हाच प्रश्न आहे. मध्यप्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांचे आजी-माजी मुख्यमंत्री मूळ मराठी आहेत/होते असं अभिमानाने सांगताना मूळ उत्तरप्रदेश किंवा अन्य राज्यातला माणूस आपण मुख्यमंत्री म्हणून स्वीकारू का? हाही महत्वाचा मुद्दा आहे. जर कर्तुत्व अन जाण असेल तर आपण ‘वंश’ याच्यापुढे जाणार का हाच कळीचा मुद्दा आहे.

@Late_Night1991  || अभिषेक बुचके

शिवसेना मनसे मिलन सिद्धांत!

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!