इश्क – अनिकेत समुद्र

इश्क – अनिकेत समुद्र

कादंबरी समीक्षण || मराठी साहित्य || किताबीकिडा  || ई-पुस्तक वाचन || माझंमत  || समीक्षक चश्मा

“अळवणी” ह्या भयकथा लिखाणामुळे प्रसिद्ध झालेला लेखक अनिकेत समुद्र यांची दुसरी कादंबरी वाचण्यात आली. अळवणी वाचल्यानंतर लेखकाची निराळी शैली जाणवली होती. अळवणी कादंबरीत कुठेही ओढून ताणून आणलेले प्रसंग नव्हते किंवा कसलाही बडेजाव नव्हता. कथा अतिशय संथपणे पुढे सरकत आपल्या शेवटाकडे जाते. त्यात कथेवर, त्यातील पात्रांवर कसलाही दबाव जाणवत नाही. ते आपआपल्या स्वभावानुसार निरनिराळ्या परिस्थितीत व्यक्त होत जातात.

अनिकेत समुद्रची दुसरी कथाही तशीच असेल म्हणून त्याच्या ‘इश्क’ ह्या लेखनाकडे वळलो. दोन दिवसांत कथा-कादंबरी वाचून झाली. पण ‘अळवणी’ मुळे वाढलेल्या अपेक्षा पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत याचा खेद वाटला. अळवणीमध्ये जी पात्रे, प्रसंग, स्थळ आहेत ती साहजिक अन ओघाने येणारी वाटतात आणि उलट इश्क मध्ये नेमका तोच अभाव वाटतो.

इश्क अन अळवणी या कथा अन त्यांचा बाज पूर्णतः भिन्न आहे. एक प्रेमकथा तर दुसरी भयकथा! पण इश्क प्रेमकथा ह्या समूहातही जराशी फसली आहे असं वाटतं. लेखकाने इश्क ही कथा पूर्णतः व्यावसायिक हेतूने लिहिली असेल असं क्षणोक्षणी वाटत राहतं. त्यात येणारी पात्रे, त्यांच्या पेहरावाचं सतत वर्णन, कथेतील स्थळे आणि त्यातील यांत्रिकीपणा हा जरासा खटकतो. मुळात महागडी हॉटेल, मस्त गाड्या, इंग्लिश बोलणारी मुख्य पात्र अन त्यांची जीवनशैली ही खूपच साचेबद्ध वाटू लागते. म्हणजे नेहमीच्या हिन्दी चित्रपटातील कथानकाशी सगळं साम्य वाटत राहतं. त्यात घडणार्‍य घटनाही तशाच साचेबद्ध वाटत राहतात. सर्वात मुख्य म्हणजे जे ट्विस्ट अर्थात कथेला जिथे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे तो उत्तम असला तरी तो कंटाळवाणा वाटू लागतो. आता कधी संपणार हे? अशी मनस्थिती होते. प्रेमातील ओलावा यापेक्षा कथेतील श्रीमंती याचंच जास्त दर्शन होत राहतं. हे म्हणजे भन्साळीने बाजीराव पेशव्यांचे मूळ कथानक/इतिहास बाजूला सारून त्यातील भव्य-दिव्यतेवर जसं लक्ष केन्द्रित केलं तसा प्रकार वाटतो.

              आता महत्वाची गोष्ट. इश्क! कथेत नेमकं इश्क आहे का गफलत तेच नेमकं समजत नाही. त्यातील मुख्य पात्र, कबीर. हा तर वासनेने भरलेला अन अर्धवट समज असलेला युवक वाटतो. तसा तो मध्येच हुशारही वाटतो पण नंतर पुन्हा वासनेने भारलेला वाटतो. तारुण्याच्या पहिल्या पायरीवर असताना जो उताविळपणा अन अजाणतेपणा असतो तो कबीरसारख्या लेखकाच्या स्वभावाला जुळत नाही. लेखकाला दिल और दिमाग यातील गफलत दाखवायची आहे हे समजतं पण ते खूपच हास्यास्पद होत जातं.

एखाद्याच्या आयुष्यात एकदाच किंवा एकामागून एक तीन तरुणी येतात अन ह्या पठ्ठ्याला तींनीही आवडत असतात. हे म्हणजे प्यार की आड मे झालझोल वाटू लागतो. विशेष म्हणजे त्या तरुणीही इतक्या भोळसटपणे आणि अंधपणे त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या असतात. कादंबरीच्या शेवटाला तर हा नायक अजूनच मूर्ख अन हास्यास्पद होत जातो. त्यामुळे मूळ नायक घसरला असल्याने कादंबरी जराशी नीरस होत जाते. लेखक हा विचारी अन समजूतदार असतो यावरील विश्वासच नाहीसा होतो.

https://play.google.com/store/apps/details?id=com.netbhet.book.AOWBTFBIXHMGVVTLA&hl=en

कादंबरीतील दुसरं मुख्य पात्र म्हणजे राधा. अर्थात मीरा वगैरे. हे पात्र सुरूवातीला खूप सुंदररित्या आपल्या समोर येतं. ह्या पात्राला विविध छटा आहेत. ते कल्पनेत उभं राहतं. त्या पात्राला जीव येतो. कोणीही ह्या पात्राच्या अन तरुणीच्या प्रेमात पडेल असं ते सुरूवातीला रंगवलेलं आहे. जणू तेच आता कथेला पुढे घेऊन शेवट करेल असं वाटतं पण तितक्यात रती नावाचं अजून एक पाखरू कबीरच्या जाळ्यात अडकतं. इथे तर कबीर निव्वळ चित्रपटातील शक्ती कपूर वाटू लागतो. लेखक (अनिकेत समुद्र) काय सांगू पाहत आहे ते कळतं, पण ते ज्या वळणाने अन प्रसंगाने पुढे जातं ते थोडसं पचणी पडत नाही. म्हणजे, राधा नाही म्हणाली म्हणून कबीर वस्तुनिष्ठ विचार करत आधी ब्रेक अप झालेल्या तरुणीच्या प्रेमात पडतो तर नंतर रतीच्या! इतका चंचलपणा आणि उथळपणा वाचकाला गरळ अनू शकतो. कारण हे नेमकं निरागस प्रेम आहे की अजून काही हेच समजत नाही. कदाचित इष्क हे नाव त्यामुळेच ठेवलं असेल.

रती कबीरच्या आयुष्यात आल्यानंतरच्या क्षणांनंतर राधा हे पात्र अचानक नकारात्मक होऊन जातं. का माहीत नाही. पण कदाचित प्रेमाच्या आशेने राधा हे पात्र वारं अंगात आल्याप्रमाणे उलट वागू लागतं. स्वतःशीच स्पर्धा केल्याप्रमाणे. अर्थात, लेखकाला जे अभिप्रेत आहे ते समजू शकतो पण कथेतून ज्या प्रकारे ते येतं ते मनाला भिडत अन भावत नाही. अळवणीमध्ये जशी पात्रे स्वतःहून उभी राहतात अन मुक्तपणे वावरू लागतात त्याच्या विरुद्ध इथे पात्रांना दिलेली चौकट ओलांडायची मुभा नसते. मग ते जरा आकसल्याप्रमाणे वाटतं. पात्रांचा नाटकीपणा हाही थोडासा अति वाटतो. म्हणजे इंग्रजी बोलणं असेल किंवा सतत दारूच्या बाटल्या असतील किंवा तत्सम चित्रपटी सीन असतील. ते टुकार वाटतात. त्यात मग रतीला कधी काकू टाइप तर कधी बोल्ड दाखवलं आहे. तो विरोधाभास वाटतो. कबीरच्या वागण्यातही विरोधाभास वाटतो. असे बारीक ओरखडे पात्रांना कुरूप करतात.

              कथेत काही प्रसंग खूपच अप्रतिम रंगवले आहेत. हे प्रसंग काळ्या ढगांना सोनेरी काठ चढवल्याप्रमाणे वाटतात. प्रतिभाशाली लिखाणाचा नमूना वाटतो. ते जग, ते शब्द, ते प्रसंग वेगळच अनुभव देतात. खासकरून राधा पळून जाऊन एका हिप्पी गटाला मिळते अन पुढे जे होतं ते लाजवाब आहे. तो प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहतो. शिवाय लेखकाने कथा लिहिण्यापूर्वी उत्तम अभ्यास आणि माहिती घेतली आहे हेही जाणवतं. त्यात जो मर्म आहे तो खूप सुंदर आहे. हिप्पी अन गोव्यातील काही प्रसंग लेखकाची प्रतिभासंपन्नता ठासून सांगण्यास पुरेसे आहेत. राधा ह्या पात्राला तिथे जो आकार मिळतो तो मोडून नवा आकार वाचक स्वीकारू शकतो का नाही हे सांगता येत नाही.

बाकी नंतर ज्या गोष्टी होतात त्या नेहमीच्या आहेत. अर्थात फिल्मी. आता कबीर कोणासोबत राहणार एवढाच प्रश्न अनुत्तरित राहिल्याने वाचन पूर्ण करायची घाई असते. वाचकाला शेवट लवकर हवा असतो. त्यात चढ-उतार किंवा हेवे-दावे हे आलेच. नेहमीप्रमाणे मदत करणारा मित्रही असतोच. विशेष म्हणजे कबीरची पहिलं प्रेम (X GF वगैरे) त्याच्या जवळच्या मित्राला जाऊन मिळतं हेही विशेष. याचा अर्थ असा की लेखकाने आजच्या तरुणाईमधील नात्यांना पटलावर मांडायचा प्रयत्न केला आहे.

कादंबरी चांगली का वाईट हे मी नाही सांगू शकत. ती कोणाला आवडेल आणि कोणाला आवडणार नाही हे स्पष्टपणे सांगता येईल. पण ती एका विशिष्ट वर्गासाठी किंवा वाचकासाठी आहे. प्रत्येकजण तिथे रमेल याची खात्री नाही. तो बडेजाव अन ती लकाकी सगळ्यांच्या आयुष्यात नसते. ती पुस्तकात किंवा चित्रपटात असते. संध्याकाळी भेटल्यावर मित्र मैत्रिणीला कोणती घ्यायची हे विचारतो तेथेच जरा नाळ तुटल्यासारखी वाटते. पण प्रेमभंगी वगैरे तरुणाईसाठी हा मसाला पुरेसा आहे. नात्यांच्या गुंत्यात अन मनाच्या भूलभुलय्यात अडकलेल्या पिढीला ही आवडेलही कदाचित. पण त्यात ओलावा नाही असं मला वाटतं. थिल्लर प्रेम नाही पण प्रेमाला अन स्वातंत्र्याला अवाजवी दिलेलं महत्व हा मुद्दा येतो. बाप मुलाला ‘प्रेमात पडलास का?’ असं विचारतो तेंव्हा जरा जड वाटतं. एकमेकांना प्रेम मिळवून देण्याचे प्रकारही आलेच. हा साचेबद्धपणा जरासा ओवरडोस होऊ लागतो.

आजकालच्या तरुणांच्या, खासकरून आयटी क्षेत्रात काम करणार्‍या तरुणांच्या आयुष्यातील हे प्रसंग वाटतात. ते खरे असूही शकतात. त्यांच्या हेतुवर शंका नाही. पण गोष्ट मनाला भिडली पाहिजे. ती जर आपल्याला कवेत घेऊन पुढे जात असेल तर अजूनच आनंद होतो. कथेतील सर्व पात्र उच्च वर्गातील वाटतात. म्हणजे ‘fun making’ वगैरे म्हणतात तसे. आयुष्यात कुटुंब, जबाबदारी यापेक्षा मित्रांच्या अन करियरच्या सानिध्यात जगणारी पिढी. ह्या पिढीला आपण कुठे जात आहोत हेच कदाचित माहीत नसतं. प्रेमाच्या संकुचित किंवा अतीव टोकाच्या व्याख्या उराशी असलेली पिढी! यांचं प्रेम खोटं नसेलही, पण ते खणखणीतही नसतं. ते conditional असतं. म्हणजे आज असं तर उद्या तसं. कादंबरीत अशीच पात्रे आहेत. पार्टी, दारू, ऑन द रॉक्स वगैरे टाइप…ती सर्वांना भावतीलच असे नाही.

अळवणी वाचून इश्क वाचू नका इतकाच सल्ला आहे!!! बाकी लेखकाला शुभेच्छा!!!

@Late_Night1991

मराठी कथा – अभिषेक बुचके

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!