मलिश्काच्या निमित्ताने!!!

मलिश्काच्या निमित्ताने!!!

सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय का?

मलिश्का विरुद्ध शिवसेना वाद || मुंबई आणि पुणे  || रिचा सिंग  ||  अस्मिता आणि विकास  || #माझंमत  || RJ Malishka vs Shivsena

सोशल मीडियावर सध्या दोन प्रकार खूप गाजत आहेत. एक आहे अर्थातच मलिश्का नामक एका आरजे ने मुंबईतील समस्यांना केंद्रस्थानी धरत सध्या गाजत असलेल्या “सोनू… तुझा माझ्यावर भरवसा नाय का?” ह्या बालिश वाटणार्‍या गाण्यावर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला लक्ष केलं. आणि दूसरा मुद्दा आहे रिचा सिंग नामक एका उत्तर भारतीय तरुणीने पुण्याबाबतीत एक ट्विट केलं.

दोन्हीही ठिकाणी अमराठी (?) तरुणी आहेत. खरं तर ही एका दृष्टीने अभिमानाची बाब असायला हवी (?) की भारतातील तरुणी स्पष्टपणे एखाद्या मुद्द्यावर मत मांडून वाद घालत आहेत. ह्या धाडसाची प्रशंसा केली पाहिजे. कारण गपचूप ऐकून घेणार्‍या मुली ही संकल्पना कालबाह्य होत आहेत याचंच हे उदाहरण आहे. असो.

          तर दोन अमराठी तरुणी महाराष्ट्रातील दोन प्रसिद्ध शहरावर टिपन्नी करत आहेत. एक आहे मुंबई! जे केवळ महाराष्ट्रची राजधानी नसून देशाची आर्थिक राजधानी तर आहेच पण सोबतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूही आहे.

दुसर्‍या बाजूला आहे पुणे! ज्या शब्दातच जाज्वल्य अन स्वयंभूपणा आहे असं म्हणतात. पुणे म्हणजे महाराष्ट्रची सांस्कृतिक राजधानी, आयटी सिटि आणि पट्टीच्या पुणेकरांचं हृदय!!!

ह्या दोनही शहरांची रचना वेगळी आहे. संस्कृती वेगळी आहे. तेथील लोकांचं राहणं-वागणं वेगळं आहे. राजकारणाचा बाजही वेगळा आहे. कदाचित त्यामुळेच हे वाद उफाळून आले असता त्यावर “प्रतिक्रिया”ही वेगळ्या उमटल्या.

आधी मुंबईकडे येऊ. मुंबईतील खड्डे हा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत चालणारा मुद्दा आहे. नुकत्याच मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये हेच खड्डे अन गटारी यावरून हमरीतुमरीची भाषा झाली. खिशातील राजीनाम्याची नौटंकीही झाली. पण अखेरीस पंचेवीस वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणार्‍या शिवसेनेची सत्ता पुन्हा आली. त्या निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी असं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं. आता, तो सगळा ज्ञात अन अधोरेखित झालेला इतिहास आहे.

मुंबईतील खड्डे, गटारी अन तुंबणारे पाणी यावर सतत वाद होतच असतात. पण ते राजकारणी, माध्यमं अन त्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोक अन संस्थेकडून होत असतात. नेमकं ह्यावेळेस हा मुद्दा एका आरजे ने उचलला अन त्यावर चर्चा सुरू झाली. आता मुंबईवर आणि मुंबई महापालिकेवर जर कोण टीका करत असेल तर ती टीका शिवसैनिकांच्या मनावर लागणार हे नक्की होतं. कारण हीच मुंबई महापालिका शिवसेनेचा प्राण आहे असं म्हणतात. पण सध्या राजकरणात सगळ्यांना एकत्रित अंगावर घेणार्‍या शिवसेनेला ह्या मुद्द्यावरून इतर राजकीय पक्षांनी घेरलं आणि गदारोळ सुरू झाला.

              सध्या काही माध्यमं शिवसेनेची बदनामी करण्यात आघाडीवर आहेत असं दिसतय. म्हणजे ‘चप्पलमार’ अशी पंधरा दिवस ब्रेकिंग न्यूज देणे अन महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान रजा मिळावी ही सेनेच्या एका महिला नगरसेवकची मागणी यावर चर्चा घडवून आणणे इथपर्यंत हे मुद्दे आहेत. रोज काहीतरी बातम्या दाखवून शिवसेना किंवा कोंग्रेस पक्षाला नकारात्मक प्रकाशझोतात ठेवणं चालू असतं. काही माध्यमं पक्षपाती अन जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत असा माझा तरी निष्कर्ष आहे ज्याच्याशी सगळ्यांनी सहमत असणं गरजेचं नाही.

मलिश्काचा वाद वाढलाच मुळात शिवसैनिकांनी तिला दिलेल्या प्रतिसादामुळे अन आगीला वारं घालणार्‍या माध्यमांमुळे. नाहीतर हा फुकटचा publicity स्टंट आहे हे कोणीही सांगितलं असतं. कारण एका आरजे मुलीला मुंबईच्या समस्या कधीपासून कळू लागल्या. ह्या चॅनलना आपला टीआरपी वाढवायचा असतो. हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. त्यासाठी ते काहीही करतात हे जगजाहीर आहे. दुर्दैवाने शिवसैनिकांना ते समजलं नाही अन त्यांच्या मेहरबानीमुळेच तिला फुकटाची प्रसिद्धी मिळाली. आता ती स्वतःला समाजसेवक म्हणवून घेईल इथपर्यंत प्रसिद्ध झाली आहे.

पण खरा मुद्दा इथेच सुरू होतो. की मुंबईच्या प्रत्येक समस्येला मुंबई महापालिकेशी जोडणे, माध्यमांनी त्याला हवा देणे अन मग राजकरण्याणी आपला उद्योग सुरू करणे. मुळात खड्डे, तुंबलेल्या गटारी अन विविध समस्या ह्या केवळ मुंबईतच आहेत का? महाराष्ट्रातीलच काय देशातील कुठलीही (एखादा अपवाद वगळता) महापालिका किंवा सामान्य शहर काढून बघा, तिथे ह्याच समस्या यावरूनही बिकट दिसतील. मग फक्त मुंबईलाच टार्गेट करणं आणि माध्यमांनी ते डोक्यावर घेणं याला अर्थ काय? महाराष्ट्रातील इतर शहरातही मराठी माणूसच राहत असतो, तिथेही भ्रष्टाचार होतोच की. मग वर्षाकाठी त्या शहरांची एकतरी बातमी माध्यमांनी ब्रेकिंग न्यूज मध्ये द्यावी. लातूर-नांदेड सारखी शहरं (किंवा मराठवड्यातील कुठलाही शहर घ्या) माजी मुख्यमंत्र्यांची आहेत. तेथे काय परिस्थिती आहे. नागपुर आजी मुख्यमंत्र्यांचं शहर आहे. नाशिकमध्ये आधी नवनिर्माणवाले होते अन आता दत्तक आहेत आणि नुकताच झालेल्या पावसात ते शहर पाण्याखाली होतं. ठाणे कल्याण-डोंबिवली हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत…. मग फक्त मुंबईच का? तिथे जास्ततर नोकरदार, बडा व्यापारी, अधिकारी असा वर्ग असतो म्हणून का? सर्व माध्यमांची केंद्रे तिथे आहेत म्हणून फक्त तेथील बातम्या ठळक करणार का? आर्थिक राजधानी अन आंतरराष्ट्रीय शहर म्हणून तेथे राहतात त्याच माणसांना चांगल्या-उत्तम सुविधा अन लहान महापालिका शहरात राहणार्‍या लोकांना कसल्याही सुविधा चालतील असं आहे का? मुंबई महापालिकेचं बजेट कितीही असो पण इतर शहरांना त्यांच्या विकासासाठी पैसा नसतो का? केवळ शेतकर्‍यांनी बंद केल्यानंतरच, अपघात बलात्कार झाल्यानंतरच खेडी बातम्यात येणार का? तेथील नागरी समस्या मुख्य प्रकाशझोतात कधी येणार. का मुंबई-पुण्याच्या समस्यांना राज्याच्या समस्या मानून त्याच अग्रक्रमाने सोडवल्या गेल्या पाहिजेत?

मुळात मुंबई आणि इतर शहरं हा मुद्दा महत्वाचा आहे. सगळ्यांना शहरातील समस्यांवर तोडगा पाहिजे. कारण त्यांना चांगलं राहणीमान पाहिजे असतं. छोटी शहरं ही दुर्लक्षितच राहतात.

Image result for Malishka vs shivsena

                   आता थोडं अस्मिता अन राजकारण ह्या मुद्द्यांकडे वळलं पाहिजे. मलिश्काने मुंबई महापलिकेला टार्गेट केलं अन शिवसैनिकांनी मलिश्काला. यामुळे भाजप अन मुंबईपुरतं अस्तित्व उरलेल्या मनसेला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण हीच भाजपा गेली पंचेवीस वर्षे महापालिका सत्तेत आहे आणि सध्या यांचेच मुख्यमंत्री आहेत. रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते मलिश्काने जरी महापालिकेकडे वर्ग केले असले तरी त्याची जबाबदारी भाजपची आहे. दुसरीकडे, मनसे तर जमेल तशी तलवार चालवायला बघत असते. हीच मनसे यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती व्हावी यासाठी आग्रही होती. ते जर घडलं असतं अन मलिश्काने असं गाणं केलं असतं तर आज मनसैनिक मलिश्काच्या घराबाहेर खळ खटॅक करताना दिसले असते.

शिवसैनिकांनी उथळपणा केला हे खरं. पण सध्या राजकारण इतकं गढूळ झालं आहे अन शिवसेना त्यात एकटी असल्याने मलिश्काचा बोलवता धनी दुसराच कोणीतरी असेल असं त्यांना वाटलं असावं. शिवाय त्या गाण्यात मुंबईतील प्रत्येक समस्येला थेट महापालिकेशी जोडलं आहे. जसं सामान्य माणूस सध्या देशातील प्रत्येक गोष्टीला मोदींशी जोडतो. मुंबईतील समस्यांवर आवाज उठवायचा अधिकार मुंबईत राहणार्‍या प्रत्येकाला आहेच. त्या सुधारायला हव्यात यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक आहे. पण त्या गाण्यातून BMC वर ज्या प्रकारे हल्ला चढवला तो नक्कीच द्वेषातून आलेला वाटतो. त्यांचं म्हणणं असं की, मुंबईकराचा BMC वर बिलकुल भरवसा नाय. इतक्या उथळपणे हे होतं की त्याला त्याच प्रकारे उत्तर आलं. पण पाचशे कोटींचा दावा हा संतापतून आला असावा. डेंगूच्या अळ्या मात्र उत्तम स्ट्रोक होता. कारण दोन माणसं बोलताना, एकाने दुसर्‍याची चूक दाखवली तर दुसराही पहिल्याची चूक दाखवतोच. तो मानवी स्वभाव आहे.

आता महत्वाचा मुद्दा आहे मराठी माणसाचा. मराठी हा मुद्दा मुंबई पट्टा अन उर्वरित महाराष्ट्र यात खूप वेगवेगळा आहे. मुंबईतील मराठी माणूस अन मराठीच्या वाढीसाठी सतत कार्यरत असणारा कार्यकर्ता हा विभागलेला आहे. त्यात दोन बंधु अन त्यांचे दोन पक्ष यामुळे फुट आहे असं दिसतं. आज जो प्रकार चालू आहे तो निव्वळ मुंबईतील समस्या याच्याशी निगडीत आहे असं वाटत नाही. आज रेडियोएफएम वाल्यांनी दूसरा विडियो टाकला आहे ज्यात थेटपणे शिवसेनेवर वार करण्यात आले आहेत. इतकं धाडस कुठलातरी राजकीय वरदहस्त अन पाठबळ असल्याशिवाय कोणीही करणार नाही. सुरुवात जरी अराजकीय असली तरी नंतर त्याला राजकीय ‘पाठबळ’ मिळालेलं दिसत आहे. सध्याची माध्यमं ही भाजपच्या मर्जीतील आहेत असं म्हणतात. मग त्यात एखादं रेडियो चॅनेल काय चीज?

मुंबई महापालिकेत भाजप सत्ता काबिज करू शकली नाही. ती सत्ता मिळावी म्हणून वाट्टेल ते प्रकार केले होते. नुकतच खुद्द मुख्यमंत्री म्हणाले की जैन समजामुळे भाजपला मुंबईत यश मिळालं. मुंबईत पंचेवीस वर्ष मराठी पक्षाची सत्ता आहे हे अमराठी लोकांना खुपत असेलच. सतत मुंबई महापालिकेला गैरकृत्यांसाठी चर्चेत ठेवलं जातं. हा निव्वळ योगायोग असावा का?

महाराष्ट्र किंवा देशातील अशी कोणती महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिथे भ्रष्टाचार होत नाही. सगळीकडे आलबेल कारभार आहे अन फक्त मुंबईत काय तो भ्रष्ट कारभार चालू आहे असा समज पसरवला जातोय. यातील एकही ‘समाजसेवी’ पुणे-नाशिक-औरंगाबाद-ठाणे-नागपुर इथे प्रश्न विचारायला पुढे सरसावत नाही. आता विरोधी पक्षांना ती आरजे म्हणजे देवदूताप्रमाणे वाटत असणार. पण त्यांच्या कृत्यामागे राजकारण असू शकतं. दूसरा विडियो तर त्याचच द्योतक आहे.

यात विदूषकी भाग म्हणजे, नीतेश का नीलेश राणे यांनी मलिश्काची बाजू घेतली. हेच राणे झेंडा चित्रपटाच्या वेळेस ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ मानायला तयार नव्हते अन त्यांनी अवधूत गुप्ते यांना काय वागणूक दिली ती संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे.

यात मनसे सारख्या पक्षाने जी भूमिका घेतली ती अपेक्षितच होती. कारण सतत शिवसेनेला अडचणीत आणायचं राजकारण करायचा त्यांचा प्रयत्न असतो. निवडणुकीच्या वेळेस सहानुभूती मिळवायची अन इतर वेळेस टोकाचा विरोध. जिथे त्यांची एकवेळ सत्ता होती त्या नाशिकवर असं गाणं त्यांनी सहन केलं असतं का? किंवा चित्रपट वगैरे बंद पाडणारे हेच असतात. मनसे नेते मराठीसाठी बेळगावात मराठी माणसावर अत्याचार करणार्‍या कन्नड संघटनेशी हातमिळवणी करायला तयार असतात पण मुंबईतील एकाही मुद्द्यावर त्यांचं शिवसेनेशी मतैक्य का होत नसावं?

ह्या सगळ्यावरून मी शिवसैनिक किंवा सेनासमर्थक असेल अशी सर्रास टिपन्नी होऊ शकते. पण हे माझं उघड मत आहे. शिवसेना मुंबईत फक्त समाजसेवा करते, बिलकुल भ्रष्टाचारी नाही, मुंबई त्यांनी खूप सुंदर बनवली असा माझा दावा अजिबात नाही. शिवसेनाही इतर पक्षांप्रमाणेच आहे. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार ही तर सर्वांचीच लक्षणे. त्यांनी कारभार सुधारायला हवा हेही खरं. पण मुंबई अन महापालिका शिवसेनेची आहे असं गृहीत धरून सगळं राजकारण चालत असतं ते खरंतर चुकीच आहे.

धर्माच्या, जातीच्या, प्रांताच्या नावाखाली विकासाचे प्रश्न झाकले जातात हे सर्रास होतं. पण मुंबईत विकासाच्या नावाखाली अस्मितेचा मुद्दा झाकोळला गेला पाहिजे असा बर्‍याच मंडळींचा प्रयत्न असतो. लातूरसारखा जिल्हा अनेक दशके कोंग्रेसच्या ताब्यात आहे. यातून दोन मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल झाले. त्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर एखादा पक्ष अनेक दशके राज्य करतो हे काही नवीन नाही. तो काही खूप विकास करतो असंही नाही. मुंबईत इतर पक्षांची सत्ता आली तर मुंबई चकाचक होईल याची ‘हमी’ कोण देऊ शकतं का? मग निदान मराठीचा मुद्दा हाताळणारी शिवसेना काय वाईट? मुंबईत एखादा मराठी अस्मिता (निदान मुखी तरी असणारा) बाळगणारा पक्ष गेली पंचेवीस वर्ष अधिराज्य कसा गाजवतो ही सल अनेक मनांमध्ये आहेच. येथे मराठी माणूस एकसंध नाही उभा राहिला याची खंत वाटते.

              दूसरा मुद्दा होता तो रिचा सिंग नावाच्या एका अमराठी तरुणीने पुण्यावर केलेले ट्विट. अर्थात पट्टीच्या पुणेकरांनी तिची दिवसभर हजेरी घेतलीच म्हणा. आपल्या स्वगृही परतल्यावर त्यांना दृष्टान्त झाला अन पुण्यावर ट्विटत सुटल्या बाई. एकतर हे इथे राहतात. मराठी न शिकता हिंदीतच कारभार करतात. मराठी शिकणे ह्यांना गरजेचं वाटत नाही. आणि सगळं झाल्यावर ह्यांना दृष्टान्त होतात. हे म्हणजे रक्ताचे पाणी करून पोराला शिकवणार्‍या आईबापाला पोरगं मोठं झाल्यावर ‘तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही. साधा कम्प्युटरही घेऊन दिला नाही, गाडीही घेऊन दिली नाही’ असं म्हणण्यातील प्रकार आहे. उद्या जर त्या मलीश्काला काही झालं अन मुंबई महापालिकेतील कर्मचारी किंवा तिची टीका ‘झोंबलेल्या’ व्यक्तीने मदत नाकारली तर मग काय? म्हणजे सगळ्या सोयी घेणार हे आणि मग वाट्टेल तशी टीका करणार.

त्या रिचा सिंगच्या वक्तव्यावर सगळे पुणेकर एकत्रित येऊन प्रतिक्रिया देऊ लागले. तो प्रकार मलीश्का प्रकरणात दिसला नाही. कारण मुंबईतील मराठी माणूस विभागलेला आहेच हे सत्य आहे. शहरावर, पालिकेवर होणारी टीका त्यांना सेनेवरील टीका वाटली तर दुसरीकडे पक्ष, महापालिका, विकास वगैरे सगळं विसरून #सरसकट पुणेकर #निकष न बघता #तत्वत: तिच्यावर तुटून पडले. एकंदरीत #पुणेकरांची ही नस खूपच भारी आहे. पू. लं. म्हणतात तसं, पुणेकरांना पुण्याबद्धल जाज्वल्य अभिमान आहे. पक्का पुणेकर रोज एकमेकाशी भांडेल, उरावर बसेल पण बाहेरचा कोणी आला तर मिळून त्याला उरावर घेतील. पेठेतला अन उपनगरीय अशा पुणेकरात वाद असले तरी मुंबईच्या माणसाची ते दोघे ‘पुणेकर’ म्हणूनच खेचत असतात.

मुंबई व महापालिकेवरील टीका शिवसेनेनी मनावर घेतली अन पुण्यावर झालेली टीका पुणेकरांनी मनावर घेतली हा फक्त भेद आहे. कारण पुण्यातील माणसावर पक्षीय शिक्का कधी उमटत नाही. असला तरी पुणेरी टोपीखाली तो झाकला जातो. उलट मुंबईतील माणसाच्या मनात पक्ष घर करून असतात. कोण शिवसेनेचा, कोण मनसेचा तर कोण भाजपचा. मुंबईकर यापेक्षा ती ओळख गडद वाटते. पुणेरी स्वभावात दिसणारा हा एकसंधपणा मुंबईतील मराठी माणसात दिसत नाही. अर्थात पुणेकर हा स्वयंभू असतो तो भाग वेगळा.

ह्या दोन प्रकरणात दोन शहरातील, त्यात राहणार्‍या माणसांतील, स्वभावातील, अस्मितेतील अन राजकीय समजतेतील भेद स्पष्टपणे दिसतो. समान असलेल्या घटनेवर दोन शहरं कशी भिन्न प्रतिक्रिया देतात हे विशेष!

|| कुठे चूक झाली असेल तर क्षमा!  ||

विकास, अस्मिता, राजकारण आणि मतदान

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!