आभासी प्रेम

आभासी प्रेम

मराठी लघुकथा   || मराठी कथा  || प्रेमकथा  || Marathi Story  ||  आभासी प्रेम म्हणजेच Social Media वरील प्रेम  || द्वि-व्यक्तिमत्व

 

धो-धो पाऊस सुरू झाला होता. उशीरही झालेला. मी कसातरी धडपडत, भिजत बस स्टॉप पर्यन्त गेलो. रेनकोट, छत्री वगैरे सोबत बाळगणे हे मला लहानपणापासूनच भित्रेपणाचं लक्षण वाटत आलं आहे. त्यापेक्षा भिजणे नाहीतर पाऊस थांबेपर्यंत वाट बघणे हे मला जास्त आवडतं त्यामुळे थोडासा भिजलेला मी त्या बस स्टॉपवर जाऊन उभा राहिलो.

डोकं वगैरे पुसलं. केस घनदाट वगैरे असल्याने ते झटकले तर आजूबाजूला पाणी उडतं म्हणून मी इकडे-तिकडे बघून कोणी नसल्याची खात्री करून घेत होतो. एक काकू तिथे उभ्या होत्या अन पलीकडे एक तरुण मुलगी बसलेली होती. त्या मुलीला बघताच मनात प्रचंड घंटानाद सुरू झाला. भिजलेल्या केसांवरून फिरणारे हात मंदावले. काळीज धडाधड करू लागलं. फुलपाखरे वगैरेही उडाली.

ही तर भार्गवी!!!!

तसं आम्ही एकमेकांना ओळखत नाहीत. म्हणजे खर्‍या आयुष्यात आम्ही एकमेकांना ओळखत नाहीत. पण ट्विटरवर मी तिला ओळखतो अन तेथूनच तिच्या प्रेमात पडलो आहे. ती स्वप्नपरी आहे माझी.

ट्विटर वर एकदा तिचा फोटो बघितला होता आणि तेंव्हापासूनच तिच्यावर जीव जडला होता. तिचा बायो अन TL बघून तर तिच्यावरील प्रेम आणखीनच वाढलं.

मी रोज न चुकता तिच्या TL वर जाऊन तिला बघत असतो. तिच्या प्रत्येक ट्विटला RT अन Like देऊन तिचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तिला इम्प्रेस करण्याचा माझा प्रयत्न चालूच असायचा. पण ती आहे की माझी ढुंकुनही दखल घेत नाही. मी दिलेल्या रीप्लाय ळा प्रतिसाद देणं हेसुद्धा तिला कधी महत्वाचं वाटलं नाही. फॉलोबॅक तर लांबचीच गोष्ट. तिला माझ्यात अजिबात रस नसावा.

खरं तर एकतर्फी प्रेमात कधी निराशा येतच नाही. रोज नवीन अपेक्षेने नवी सुरुवात होत असते. पराभव पचवण्याची प्रचंड ताकद असते. त्यातच मी तिला कसलीच लाज न बाळगता फॉलो करायचो. पण तिला त्रास वाटेल असं वागणं मी कधी केलं नाही. मग DM असेल किंवा काहीतरी भलतेसलते रीप्लाय देऊन तिचं लक्ष वेधून घेण्याचा वेडा मोह मी कधीच केला नाही. प्रेम आणि वेडेपणा यातील अंतर कळनार्‍यातील आहे मी. ते तत्वात ही बसत नाही अन कायद्यातही!

खरं सांगायचं तर भार्गवीवर मंनापासून प्रेम होतं की नव्हतं याचीही मला शास्वती नाही. हे निव्वळ आकर्षणही असण्याची दाट शक्यता होती. कारण खर्‍या आयुष्यातही मी कोणावरतरी प्रेम करतो हे मला आभासी दुनियेत प्रवेश केल्यावर लक्षात राहायचं नाही. खर्‍या आयुष्यातही काही मुली मला आवडत होत्या.

आभासी दुनियेत गेल्यावर मला ह्या जगाचं भान राहत नसे. मी वेगळ्याच भूमिकेत वावरत असतो तेथे. कदाचित तीच भूमिका त्या भार्गवीच्या प्रेमात पडली असेल. त्या आभासी जगातील नियम वेगळे होते. तेथे ठोकताळेही वेगवेगळे होते. पण ते आकर्षण सॉलिड ताकदवान आहे.

ट्विटरची खिडकी उघडताच खर्‍या जगातून आभासी जगात परकाया प्रवेश होत असतो. तो तात्या विंचू म्हणतो त्याप्रमाणे “माझा आत्मा तुझ्यात अन तुझा आत्मा माझ्यात” हा प्रकार होतो. म्हणजे माझ्याच दोन व्यक्तिमत्वे आहेत असा त्याचा निष्कर्ष निघू शकतो. हे मात्र भुलभूलय्या चित्रपटाप्रमाणे होईल. असो.

              तर ती भार्गवी तिथे बसलेली होती. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी आभासी दुनियेतील ‘हिला’ खर्‍या आयुष्यात भेटेन. पण ते म्हणतात न “life is full of surprises” वगैरे… तसा प्रकार झाला हा.

इतक्या तूफान पावसात ती अतिशय शांतपणे तिथे बसलेली होती. तीही थोडीशी भिजलेली होती. मोकळ्या सोडलेल्या केसांच्या टोकावरुन पाण्याचे काही थेंब निथळत होते. पण खरं सांगायचं तर हा पाऊस अन ते केस यापेक्षा तिचे ओठच जास्त पाणीदार वाटले मला. ती साक्षात माझ्यासमोर असणं हे मला जास्त रोमांचित करत होतं.

ती आजही खूप सुंदर दिसत होती. पण चार-दोन फोटो सोडले तर मी तिला कधी बघितलेलं नव्हतं? त्यामुळे ती नेहमी इतकीच सुंदर अन गोड दिसते का हे मी नाही सांगू शकत. तिची एक सुंदर-गोंडस-सालस छबी माझ्या मनात घर करून आहे. पण त्या निर्जीव फोटोतील सौंदर्यापेक्षा हे वास्तव सौंदर्य जरा जास्तच लाघवी होतं.

मी तिच्याकडे बघत असताना तिथे उभ्या असलेल्या काकू माझ्याकडे रागाने बघत होत्या. मी नजर फिरवली. उगाच सॅंडलं ने मार खायला नको, त्यात चिखलाने माखलेल्या सॅंडलंने मार खायची माझी कुठलीच इच्छा नव्हती. मी दुसरीकडे बघू लागलो.

धो-धो पाऊस चालूच होता. मलाही तेच हवं होतं. मी अधून-मधून भार्गवीकडे नजर फिरवत होतो. ती कधी मोबाइलमध्ये बघत होती तर कधी पावसाकडे बघत असयची.

ट्विटरवरील फोटो अन प्रोफाइलवरुन ती मस्तीखोर पण विचारी वाटायची. पण इथे ती अतिशय शांत बसलेली होती. कसलीच चुळबुळ न करता. हे, माझ्या मनातील तिच्या प्रतिमेला जरा न जुळणारं होतं. न मस्तीखोर, न विचारी… ही तर सुस्तीखोर अन बिचारी वाटत होती…

तिथे बस स्टॉप समोर एक चारचाकी गाडी थांबली. आम्ही तिघेही तिकडे बघत होतो. त्या काकू त्यात बसून निघून गेल्या. मला सोडा पण तिने निदान भार्गवीला तरी लिफ्ट साठी विचारायला हवं असं मला वाटून गेलं. इतका पाऊस, रात्र अन अशा बसस्टॉप वर एकट्या मुलीला सोडून जायला त्यांना काहीच वाटलं नाही. त्यात तिथे मी उभा. कदाचित माझ्या विश्वासावरच त्या काकूने भार्गवीला एकटं सोडलं असेल अशी जाणीव होऊन मी माझी मलाच शाबासकी दिली.

मी पाय दुखायले (असं नाटक करत) म्हणून तिथे बाकावर पण भार्गवीपासून बराच लांब बसलो. तिला मी जवळून पाहत होतो. समोरच्या पथदिव्याचा प्रकाश तिच्या चेहर्‍यावर पडत होता. ती बरीच सावळी होती. ट्विटरवरील फोटोमध्ये ती बर्‍यापैकी गोरी वाटायची. पण प्रेम आंधळं असतं. मला तिच्याबद्धल वाटणारी भावना जराही कमी झालेली नव्हती.

एक कविता कशी सुचली माझं मलाच कळलं नाही…

“जरी सावळी तरी लाजरी

मना लावते हुरहूर ती

स्वर कोकिळी नजर भिरभिरी

आयुष्य करते सुंदर ती

मोहक चेहरा हास्य मधुर ते

हृदयाचेही स्पंदन ती…“

तिच्याशी बोलायचा धीर होत नव्हता. पण हीच संधी होती हेही मी जाणून होतो. तसं “सुरुवात कशी करावी?” हा प्रश्न संसार बनवताना विधात्यालाही पडला असणार, तर मी कोण अशी स्वतःची समजूत काढली. पण शेवटी धीर एकवटला आणि म्हणालो,

“हेलो, तुम्ही भार्गवी न?”

मोबाइलमधून डोकं काढून ती माझ्याकडे बघू लागली. चित्रपटातील नायिका निळू फुले, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा यांच्याकडे ज्या त्रासिक नजरेने बघतात, साधारणतः त्याच नजरेने ती माझ्याकडे बघत होती.

तिच्या नजरेत, पुण्यातील लोक वैतागून “काय?” म्हणतात तोच भाव जाणवत होता.

त्या नजरेने पावसातला सगळा romanticism संपवला. मी परत हसून म्हंटलं, “मी तुम्हाला ट्विटरवर बघितलं आहे बहुतेक…?”

असा प्रश्न विचारणारा देशात मी एकटाच असेन. ट्विटरवर बघितलं म्हणे.

तिच्या चेहर्‍यावर अजिबात उत्साह जाणवला नाही. ती एक गाल तिरपा करून बळजबरी हसली आणि म्हणाली, “हो असेल. आहे मी ट्विटरवर.” इतकं माफक उत्तर देऊन ती शांत राहिली. पुढे माझं नाव वगैरे तिने विचारलं नाही.

पण तिचा आवाज खरच मधुर होता. का बस स्टॉपच्या पत्र्याच्या छतावर पावसाचा आवाज होऊन जे लयबद्ध संगीत तयार होत होतं त्यामुळे तो आवाजही मला स्वरबद्ध वाटला ते नाही सांगता येणार.

पण ती गोडच होती. नाजुक परीप्रमाणे. आज पिवळ्या कपड्यांमध्ये तर ती अजूनच सुरेख दिसत होती.

“मला तुमचे ट्विट्स आवडतात आणि ज्या रोखठोक भूमिका तुम्ही घेता त्याही…”

ती आता खुलून म्हणाली, “ओह थॅंक्स…! मी तशीच आहे.”

तिचं साजरं रूप बघून माझं मनही प्रफुल्लित झालं.

ती पुढे म्हणाली, “नाव काय तुमचं?”

मी उत्साहाने सांगितलं, “चित्तरंजन आड्कित्ते”

उत्तर कोरियाने जपानवर अणुबॉम्ब सोडल्यावर ट्रंपची प्रतिक्रिया काय असेल तसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.

मला आत्या, आई-वडील अन खानदानचं आडनाव याचा राग आला.

ती खरच, माझ्या जाचातून सोडवणूक व्हावी म्हणून अमिताभ, शाहरुख वगैरेच्या प्रतीक्षेत असल्याप्रमाणे इकडे-तिकडे बघू लागली.

माझं नाव चित्तरंजन असलं तरी ती मला माझे मित्र चिडवतात त्याप्रमाणे “चुत्त्या” म्हणणार होती.

पाऊस एक थांबत नव्हता. बसही येत नव्हती. माणूसही फिरकत नव्हता.

“काय करता तुम्ही…?” तिचा पुढचा प्रश्न.

मी आता जरा दबकत सांगितलं, “हे पाठीमागे आमचीच कंपनी आहे. मी सेल्स मॅनेजर आहे तिथे.”

“अरे व्वा! मस्तच की…” ती मंनापासून म्हणाली.

“तुम्ही इथे कशा काय?” मीही प्रश्न केला.

“एका मैत्रिणीच्या घरी आले होते. जरा उशीरच झाला.”

मी काही बोलणार तितक्यात तीच म्हणाली, “आपण अहो-जाहो करण्यापेक्षा अरे-तुरे करुयात का… मला खूप जड वाटतय हे…?” तिने परवानगी मागितली.

हा बाळबोध प्रश्न बर्‍याच प्रेमकथेत असतोच असतो. अहो-जाहो ला अरे-तुरे करण्यात कसलं पुरोगामित्व आहे मला कळतच नाही. असही लग्नानंतर “अहो इकडे या अन जाहो ते आणाजा” यातच आयुष्य जाणार असतं… तर मग ही अंधश्रद्धा का पाळावी…? पुन्हा असो.

असेच काही केबीसी-केबीसी करत-करत वेळ गेला. सायकलवर एक अण्णा चहा-कॉफी विकत होता तो आला. माझ्यातलं अध्ये-मध्ये प्रसूती कळा देणारं कवि मन परत जागं झालं…

“कडक कडक चहा

सडक सडक भिजलेली

ती चालत आली माझ्याकडे

थोडी लाजत, थोडी थिजलेली…”

आम्ही चहा घेतला. पैसे ज्याचे-त्याने दिले. ते ट्विटप लाही टीटीएमएम पॉलिसी आहे याचेच संस्कार दोघांवर.

बोलत असताना ट्विट्स चा वगैरे विषय निघाला.

“अरे चित्तरंजन, तुला कोणाच्या ट्विट्स जास्त आवडतात…?” ती म्हणाली.

मी वफा निभावत म्हणालो, “तुझ्या… मंनापासून…”

मला ही लाइन चित्रपटातील वाटली. ह्या वाक्याने ती इम्प्रेस होऊन डोळे मोठे करून माझ्याकडे बघेल अन मला बिलगेल वगैरे असे रोमॅंटिक सीन हृदयात उमटत होते.

पण तसं काही झालं नाही. पिक्चरवाले साले बंडल असतात. पहिल्या भेटीत कीस वगैरे फक्त “रामलीला” चित्रपटात होत असतात/

ती ट्विटर मध्ये डोकं घालून म्हणाली, “मला तर न, हा “अभिषेकी” म्हणून कोण आहे न त्याचे ट्विट्स भन्नाट वाटतात. थोडासा वेडा वाटतो पण खर्‍या आयुष्यात खूप मजेशीर माणूस असणार…” तिनेही मंनापासून उत्तर दिलं.

नंतर ती काही वेळ त्याच्याचबद्दल बोलत होती. मला अन माझ्या विषयाला पूर्णतः दुर्लक्ष करून ती स्वतःचाच पाढा पुढे म्हणत होती.

“तुला माहिती का तो अभिषेकी खरा कोण आहे? कोणाचं अकाऊंट आहे? फेक आहे का? काय करतो? कुठे राहतो?” असे चौकशीवजा प्रश्न मला विचारात होती.

येणार्‍या प्रश्नागणिक माझा तिच्यातील इंट्रेस्ट संपत होता. कारण तिला माझ्यात अन माझ्या आयुष्यात इंटरेस्ट नव्हता आणि मी कदाचित तिला कंटाळवाणा वाटत होतो.

ऑनलाइन प्रेम वगैरे सगळा भंपकपणा आहे असं मला वाटत होतं. तिच्याबद्धल फार माहीत नसताना मी तिच्या प्रेमात पडलो हे मूर्खपणाचं लक्षण होतं. चार फोटो अन आठ ट्विट्स बघून कोण एखाद्याची संपूर्ण प्रतिमा बनवून त्याला कुरवाळत बसून स्वतःचा मोह वाढवत असेल तर मूर्खपणाच असावा.

इतका वेळ मोहक वाटणारं भार्गवीचं हास्य मला हडळीच्या जबड्याप्रमाणे भासत होतं. आवाज वटवाघळाचा अन ते झिप्रे केस अस्वच्छ वाटत होते.माझ्या मनात मीच तिची बनवलेली प्रतिमा मीच उधळून टाकली होती. मघाशी केलेल्या कविता म्हणजे एखाद्या नेत्याचा निव्वळ दुष्काळ दौरा वाटत होता.

“किती वेळ पडणार हा पाऊस? सगळ्या गटारी तुंबून वास येतोय.” मी वैतागाने म्हणालो.

ती अल्लडपणे म्हणाली, “होईल रे कमी, बघ काय मस्त वाटतय…”

बस आली. मी क्षणाचाही विलंब न करता उठलो अन गाडीकडे निघालो. ती माझ्याकडे बघत होती.

“चल बस आली (मनात बस झालं) माझी… जातो मी… बाय…” मी तुटकपणे असं म्हंटलं अन तेथून निघालो.

“अरे पण नंबर तरी दे तुझा…” ती म्हणाली.

“ट्विटरवर बोलूच की…” असं म्हंटलं अन गाडीत जाऊन बसलो.

गाडीत जाऊन बसेपर्यंत पावसाने मला भिजवलं होतं. ती त्या स्टॉप वर एकटीच बसलेली मी खिडकीतून पाहिलं. त्या पथदिव्याचा प्रकाश तिच्यावर पडत होता. पण ती मला फार सुंदर नव्हती वाटत.

तिला एकटीला असं सोडून जाणं मला बरोबर वाटत नव्हतं. परत उतरावं वाटत होतं. पण “स्त्री-पुरुष समान” या विषयावरील तीचे ट्विट्स आठवले. त्या नियमानुसार त्या बसस्टॉप वर पुरुष-स्त्री असा भेद न होता ते एकच होते. मी विचार सोडला.

          गाडी थोडीशी पुढे आली. मेंदू अत्यंत वेगाने धावत होता. हृदयाचे ठोकेही जोरजोरात पडत होते. मला काहीच सुचत नव्हतं. कानाच्या पाळया गरम झालेल्या. मी मोबाइल काढला. ट्विटर उघडलं. माझं “रंजन” या नावाने अकाऊंट होतं. मी ते क्षणात delete केलं. खूप हायसं वाटत होतं. पाऊस पडून गेल्यावर आभाळ मोकळं होतं अगदी तसं…

मी माझं दुसरं अकाऊंट open केलं. ते “अभिषेकी” या नावाने काढलेलं होतं.

मला माझ्यातील dual personality ची प्रकर्षाने ओळख झाली. मी खरा अभिषेकी सारखा नव्हतो. मी नसलेलं रूप आभासी जगात धारण केलेलं होतं. त्याच्या प्रेमात कोणीही पडून उपयोग नव्हता, कारण तो अस्तीत्वातच नव्हता. उलट मी जसा होतो त्याकडे भार्गवी पूर्णतः दुर्लक्ष करत होती. मला खर्‍या आयुष्यात ओळखणारे माझ्या ह्या समांतर विश्व अन त्यातील विश्वाशी अपरिचित होते. मी नसलेलं जीवन जगू बघत होतो. ह्या जगात मिळत नसलेला आनंद तिथे मिळवू बघत होतो. इथे असलेली बंदिस्तता तिथे मुक्तविहार करत होती. माझ्याच खोट्या ओळखीच्या प्रभावाखाली असलेली भार्गवी खर्‍या मला ओळखूही शकत नव्हती.

              परकाया प्रवेश फारच भयंकर असतो याचा अनुभव मी घेतला होता. दोन भिन्न विश्व एकमेकांशी संलग्न होऊ पाहतात किंवा टक्कर करतात तेंव्हा खूप ऊर्जा उत्सर्जित होते. सगळं अस्ताव्यस्त होतं. विनाश संभवतो. ते नियम नियती ठरवत असते. बाकी सगळं निमित्तमात्र असतं. मी तो अनुभव घेतला होता. सत्य आणि आभासी…

खुलासा——निवेदन——–विनंती——–

ही निव्वळ काल्पनिक कथा आहे. अजिबात मनावर घेऊ नये. कुठल्याही वास्तविक किंवा आभासी जगातील तो किंवा तिच्याशी याचा अजिबात संबंध नाही. आभासी दुनियेतील गुंतागुंत दाखवण्यासाठी लिहिलेला आहे. उगाच चिकित्सा, संशय आणि वाद नकोत… चुकभुल द्यावी-घ्यावी…

   दम देतो—–

उगाच चोरीचा किंवा न विचारता इकडे-तिकडे वापरण्याचा प्रयत्न करू नका. काय, मी हे copyright केलेलं आहे. विचारून बघा, मी देईन वापरायला… 

संपर्क – latenightedition.in@gmail.com किंवा ट्वीटर वर @Late_Night1991

 

Half Day In A Barber Shop

 

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!