पर्वती

पर्वती

पर्वती  ||  मराठी कथा || Marathi Story  || अनुभव ||  भटकंती || मराठी साहित्य  || आवडती जागा

आज जवळपास दोन वर्षांनी तिची भेट झाली. मध्यंतरीच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात तिची आठवण तर यायची पण भेट मात्र घडत नसे. तिची आठवण आली की एखाद्या जुनाट खिडकीतून थंड वार्‍याची झुळूक येऊन अंग शहारून जावं तसं वाटायचं. पण आज मात्र तिला भरपूर वेळ द्यायचं ठरवलं होतं मी. त्यासाठी आज खास वेळ काढून आलेलो…

तिला भेटल्यावर मन अगदी शांत व्हायचं. मुळात तीच फार शांत अन समंजस होती. निदान मला तरी तसाच अनुभव आहे. त्यामुळे तिचा सहवास हा नेहमी सुखावून टाकणारा असायचा. मन हलकं व्हायचं. विचारशून्य!

खरंतर तिचा अन माझा परिचय अलीकडच्या चार एक वर्षांतील. पुण्यात प्रथम आल्यानंतर तिची सहजच भेट झाली होता. पहिल्या भेटीत वगैरेच तिच्यावर जीव जडला होता. तसा तिचा इतिहास माहित होता मला… पण तिच्या इतिहासापेक्षा तिच्या भूगोलात मला जास्त रस होता किंबहुना त्या भूगोलामुळेच मी तिच्या प्रेमात वगैरे पडलो असेन. कदाचित?

जीव नेहमी जीवंत मनुष्यातच जडला जावा असं काही नाही, प्रेम नेहमी माणसावरच व्हावं असंही काही नाही, मन मोकळं फक्त माणसापाशीच होतं असही नाही… खळखळून ओसंडनार्‍या समुद्राच्या लाटेला हवा असतो फक्त एक किनारा… कवेत घेणारा… भरती असोत की ओहोटी, फक्त साथ देणारा..

प्रेम, आकर्षण याचा नेहमीच सौंदर्याशी संबंध असतो असं नाही, त्यात बंध असतात जिव्हाळ्याचे. मग ते भौतिक असो, किंवा मनाचं सौंदर्य असो किंवा अजून काही.

मी जिच्याबद्दल बोलतो आहे तीही काही एखादी सुंदर तरुणीच असावी असंही काही नाही… अर्थात येथे “ती” म्हणजे एक वास्तू आहे… पर्वती… पुण्याची पर्वती… जिचं स्थान अढळ आहे ती पर्वती… पुणेकर जिच्यावर प्रेम करतात ती पर्वती…

जवळपास चार किंवा पाच वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा पर्वतीवर गेलेलो. बास! तीच पहिली भेट तिच्या प्रेमात पडायला पुरेशी होती. प्रचंड मेहनत करून, मोठ्या कठीण पायऱ्या चढून, मांडीतून कळा निघत असतांनाही, घाम पुसत वरती पोचल्यावर जो सुखद अनुभव होतो त्याला तोड नाही. अंगाला भिडणारं थंडगार वारं मनाला तृप्त करतं आणि नुकताच लागलेला थकवा क्षणात लुप्त होतो. गोंगाट आणि वर्दळ यापासून दूर आल्यानंतर लाभलेली शांतता अंतर्मुख करून सोडते. आत गेल्यानंतर जो कोणता देव आहे त्याला मनापासून हात जोडले नाही जोडले तरी मन शुद्ध पवित्र होतंच होतं. बर्फाळ प्रदेशात गरम शेकोटी लावून बसल्यासारखा मेंदूही स्तब्ध झालेला असतो.

पाच रुपये देऊन वरती बुरुजावर जाऊन बसल्यावर सर्व चिंता अन विवंचना दूर होतात. तिथून जे पुण्याचं अन आजूबाजूच्या परिसराचं विहंगम दृश्य दिसतं ते प्रपंच चालवून मेटाकुटीला आलेल्या, तहानलेल्या जीवाला अमृतापेक्षा नक्कीच कमी नसतं.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पुणं, इतिहासाच्या ठळक पाऊलखुणा मिरावणारं पुणं, झाडा झुडुपांमध्ये आच्छादून गेलेलं पुणं. तिथे बुरुजावर जाऊन बसल्यावर जगाच्या आयुष्याची कोडी निरर्थक वाटू लागतात. स्वतःचं अस्तित्व विसरून जातो. निश्चलपणा येतो. बुद्धाची शांतता लाभते. विशेष म्हणजे जगाशी जोडणाऱ्या, वेळी अवेळी डोकं खाणार्‍या फोनमध्ये नेटवर्क नसतं. संपूर्ण एकांत! शांततेचेही प्रतिध्वनी असतात ते इतक्या तीव्रतेने मनात उमटत असतात की त्या आवाजात इतर सर्व गोंगाट धूसर होऊन जातात.

बस, तिची माझी ती पहिलीच भारावून टाकणारी भेट… मी तिच्या प्रेमात होतो… तिचं माहित नाही… तिचा इतिहास कितीही जाज्वल्य, कितीही प्रेरणादायी, कितीही दुःखदायक असो… त्याची तमा नसते… पण तिचा जो भूगोल आहे तो मात्र सुन्न, अंतर्मुख करून टाकणारा आहे… खरं तर मुलीच्या बाबतीतही काहींचा असाच समज असतो… तिच्या दिसण्यावरूनच खरं तर तिच्याकडे आकर्षिले जाणारे अधिक असतात… मग तिचं मन, तिचा इतिहास काहीही असो… पण मला समजलेली पर्वती ही शांत, समजूतदार, मितभाषी असावी… फक्त होकार नकार देत संवाद साधणारी…

आज दीड दोन वर्षांनी पर्वती वर जाण्याचा योग आला… तशी ती जिवलग असली तरी तिची भेट जरा दुर्मिळ झाली होती… ती तिथेच होती, मीच दुरावले होतो… एखादी प्रिय वस्तु रोज डोळ्यासमोर असते तेंव्हा काही वाटत नाही, पण ती विलुप्त होताना यातना देते… पण आज खूप वेळ काढून तिला भेटायला आलो… पण ती मागे होती तशी राहिली नव्हती… चांगली-वाईट असा बदल नसला तरी काळ आणि परिस्थिती यामुळे सगळा फरक पडलेला… ती नटली होती. अजूनच सुंदर दिसत होती. आजूबाजूला चांगले वृक्ष लावले अन वाढवले होते. स्वच्छता होती. मागे आलेलो तेंव्हा कुत्र्याचं एक लहान पिल्लू दिसलं होतं. काळ्या-पांढऱ्या रंगाचे. छान गुबगुबीत. आम्ही त्याच्याशी थोडा वेळ खेळलो होतो. आज आल्यावर एक मोठा कुत्रा दिसला. कदाचित तेच पिल्लू असावं. रंग ढंग तर तसाच होता. मनात घालमेल झाली. खूपच वेगळं काहीतरी वाटलं. एका लांबलचक अंधार्‍या बोगद्यातून बाहेर आल्यासारखं वाटत होतं. काळ कसा निघून गेला हे लक्षातच आलं नाही. आज मात्र त्या कुत्र्याच्या जवळ जाण्याचं धाडस नाही केलं. कोणास ठाऊक त्याच्या लक्षात मी होतो की नाही.

पुढे गेलो. दम लागल्याने थोडंसं थांबलो. बाजूला नजर फिरवली. झाडामागे तरुण प्रेमी जोडपे मस्ती करत होते. कोणीतरी ‘तो’ कोणातरी ‘तिच्या’ मांडीवर डोकं ठेवून होता. माझ्या दृष्टीचा मला हेवा वाटला. कितीही झाडा-झुडुपांच्या अडथळ्यातून आतलं दृश्य पाहण्याचा! मागे आलेलो तेंव्हाही अशीच जोडपी दिसली होती. त्यांच्यापैकी काहींचे आतापर्यंत resultsही आले असतील असा खट्याळ विचार येऊन गेला. अशा जोडप्याना तर पर्वती खूपच मोलाची वाटत असणार.

सगळं अनुभव करून झाल्यावर वर पोचलो. पाय दुखत होते. धाप लागली होती. घाम आला होता. जरा वेळ बाहेरूनच कट्ट्याला उभं राहून खाली पाहत होतो. झाडांच्या आडून पुणे दिसू लागलं होतं. थंडीचे दिवस असल्याने गारठा चांगलाच जाणवत होता. तिथे एक तरुण बसला होता. त्याच्या चेहर्‍या प्रचंड निराशा दाटली होती. काहीतरी गमावून, कुठल्यातरी संकटातून चालला असावा. त्यालाही पर्वती जवळची वाटत होती. त्याच्या डोळ्यातील गूढ शांतता अन पर्वतीची शांतता सारखीच भासली.

आत गेलो. आज दर्शन घेतलं नाही. पाच रुपये देऊन वरती जाऊन बसलो. आज एकटाच होतो. तिच्यासोबत मुक्त संवाद होणार होता. जुन्या प्रेयसीप्रमाणे ती आनंदाने बिलगेल, गळ्यात पडेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. कदाचित तिच्यावर असलेल्या संस्कारा मुळे! पण एका जवळच्या मैत्रिणीप्रमाणे तिने माझ्या हातात हात दिला. तिचा तो थंडगार हात अंगावर शहारा आणणारा होता. बराच वेळ मी त्या बुरुजावर एकटाच बसलेला होतो. पुण्याचं मोहक सौंदर्य पाहत होतो. डोंगरांच्या कुशीत वसलेलं पुणं हे खूप मोठ्या ‘गावा’प्रमाणे वाटतं. ढगाशी सलगी करणारे उंच डोंगर दिसतात, आकाशात मुक्तपणे संचार करणारे पक्षी दिसतात, लांब कुठेतरी विमान दिसतं, त्या विमानाने एका रेषेत सोडलेलं धूरांचे निशाण दिसायचे.

तिथे बसल्यावर, पुण्यातील विविध स्थळ कुठे आहेत हा खेळ होतोच. मग सारस बाग दिसते, सप महाविद्यालय अन त्याचं मोठं मैदान दिसतं, मोठ्या इमारती, त्यांच्यावर असलेले लाईटचे भले मोठे फलक दिसतात. हे बऱ्याच दिवसांनी बघत असल्याने आत कुठेतरी जुन्या स्मृती जाग्या होत होत्या आणि नव्याने साठवणूक ही होत होती. मनात आठवणीची साठवण उमलून आली की मैत्रीचा पीळ अजूनच घट्ट होतो.

काळाच्या ओघात तिने अनेक घाव सोसले, अनेक सोहळे पाहिले, वैभवाची साक्ष दिली… आजही ती त्याच कणखरपणाने उभी होती… तिच्या मनात अनेक जळमटे असतील, पण त्याचा गाजावाजा तो कधीच करत नाही. येणार्‍या प्रत्येकाला आंनंदून टाकायचा तिचा प्रयत्न असतो.

बराच वेळ तिच्याशी गप्पा मारत बसलो होतो. अंधार पडला होता. रात्रीच्या चांदण्यात तिचं सौंदर्य अन अढळपणा अजूनच खुलून दिसत होता. शहरात दूरवर चमकणारे पिवळसर दिवे अन आकाशात चमकणार्‍या पांढर्‍याशुभ्र चांदण्या तिला स्वतःच्या मोहक अस्तित्वाची जाण करून देत होते. एक स्वतंत्र्य स्वयंभू बेट…

अनेक दिवसांचा तान-तणाव अन मेंदूवरचे मोकळे झाल्याप्रमाणे वाटत होते. मनसोक्त बोलावं ते हिच्याशी. हिच्या मांडीवर शांतपणे बसून एक नवीन ऊर्जा अंगात संचारते. ती सगळं ऐकून घेते. मैत्रीचे बंध अजूनच घट्ट झाले होते. इतक्या दिवसांनंतर झालेली भेट, पण कोठेही आकसलेपण नव्हतं. मनातील गुंता, कोडे मोकळे झाल्यासारखे वाटत होते. तिचं सौंदर्य, तिचा दिलदारपणा जराही कमी झालेला नव्हता.

कोणीतरी असावं ज्याच्याशी सर्वकाही बोलता यावं. ज्याच्याशी अतूट बंधने असावीत. ती बंधने जखडून ठेवण्यासाठी नकोत, मुक्तपणे वावर करता यावा यासाठी असावीत. खर्‍या आयुष्यात अनेक मित्र असतात. पण लोभ, राग, स्वार्थ याचा स्पर्श झाल्याने नात्यात गढूळता येते. त्या सजीव मित्रांची खात्री देता येत नाही. स्पर्धेच्या युगात त्यांना आपल्या पुढे जायचं असतं. त्यांच्याशी सर्व गोष्टी share करता येत नसत.

त्याउलट आहे पर्वतीचं. तिची मैत्री निस्वार्थ, निर्मळ अन अबोल आहे. हा बंध न तुटणारा आहे. ती मला आहे तसं स्वीकारते. मैत्रीचा बंध यापेक्षा काय तो वेगळा…

===समाप्त===

RELATED STORIES || संबंधित पोस्ट….

Parvati – Pune

गाव सोडताना…

© 2017 – 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!