मजूर

मजूर

मराठी कथा || साहित्य  || वास्तव  || स्वलेखन  || Marathi Stories  || ठकसेन 

 

 

मालेगल्लीत मोठ्या इमारतीचं बांधकाम चालू होतं. सगळीकडे कामाची लगबग होती. गुत्तेदार खुर्ची टाकून कामाची देखरेख करत होता. पावसाळ्याचे दिवस होते. ढगाळ वातावरण असल्याने सगळीकडे जरा निरुत्साह, आळस होता. गुत्तेदार खुर्चीवर बसल्या-बसल्या दर पाच मिनिटाला मोठमोठ्याने जांभया देत होता.

मागे एक मोठी चारचाकी गाडी येऊन थांबली. गाडी इमारत बांधून घेणार्‍या मालकाची होती. गुत्तेदाराचं लक्ष तिकडे गेलं. गुत्तेदाराने चेहर्‍यावरचा आळस लगेच घालवला अन उठून गाडीच्या दिशेने चालू लागला.

मालक काम कुठपर्यंत आलं आहे हे बघायला आले होते. मालक एक-दोन दिवसाला चक्कर मारून जायचे. त्यांचा मोठा पैसा गुंतला होता. ह्या जागेत हॉटेल, दुकान, घर यांच्यासाठी शिस्तीत बांधकाम चालू होतं. जितके पैसे मालक येथे गुंतवत होते त्याच्या कितीतरी पट त्यांना यातून मोबदला मिळणार होता.

मालक गुत्तेदाराला घेऊन बांधकामाची देखरेख करत होते तितक्यात जोरात ओरडण्याचा आवाज आलं. कोणीतरी आयो… मालक… मेलो.. आता काय करू.. म्हणून जोरात ओरडत होता अन विव्हळत होता.

इतका वेळ असलेला संथपणा जरा भंग पावला. सगळे लोक गडबडीने आवाजाच्या दिशेने धावले. मालक अन गुत्तेदारही तिकडे गेले.

एक मजूर तिथे स्वतःचा उजवा पाय धरून कोकलत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो जोरजोरात ओरडत होता. आजूबाजूचे इतर मजूर त्याला धरून बसले होते, काय झालं विचारत होते. तो जखमी मजूर ओरडून सांगत होता की त्याच्या पायावर कसलीतरी फरशी पडली.

त्याचं विव्हळणं चालू होतं तितक्यात मालक अन गुत्तेदार तिथे आले.

मालकांना बघून तर तो मजूर अजून जोरात ओरडू लागला, मालक वाचवा, माझा पाय गेला… मी कायमचा लंगडा झालो… आता कसं होणार.. माझ्या लेकरा-बाळांचं कसं होणार.. असं म्हणून तो ओरडू लागला.

मालक त्याच्याकडे दयेने बघत होते.

गुत्तेदार ओरडला, एवढं ओरडायला काय झालं? जरा सावकाश घे की हणम्या. काय झालं ते तर सांग? उगा का ओरडतो?

हणम्या आता चिडला अन म्हणाला, आओ माझा जीव चाल्लाय म्हणून ओरडतोय, मला काय हौस आहे का?

आजूबाजूचे मजूर त्याचा हणम्याला समजावत होते, त्याला धीर देत होते. गुत्तेदाराने कपाळावर आठ्या आणल्या. मजूर पेटायच्या आधी शांत झालेलं बरं म्हणून गुत्तेदार जरा शांत झाला.

मालक आपुलकीने म्हणाले, काय झालं रे? कसं काय लागलं? हणम्या ओरडतच म्हणाला, चूक झाली मालक जरा, मी जरा आरामाला इथे बसलो होतो. उठताना इथल्या कडप्प्याला जरा जोर लाऊन उठाया गेलो तर कडप्पा नीट खाली आला अन मी मागे सरकायच्या आत ते कडप्पा अन विटेने भरलेलं टोपलं माझ्या पायावर पडलं. कर्म फुटलं माझं. हाड मोडलं मदलं. पायाला काय बी जाणीव होईना. आता कसं होईल माझं. मी तर आयुष्यातून उठलो बघा. कसं करू आता.

सगळ्यांनी जरा हळहळ व्यक्त केली.

गुत्तेदारने जरा शंका काढली अन म्हणाला, आर कडप्पा काय एवढा हलका असतो का तू हात लावावा अन तो खाली यावा. अन तू खुळा आहेस का की असं कडप्प्याला धरून उठाया?

आता सगळे मजूर गुत्तेदारावर चिडले होते. माणुसकी म्हणून विचारपूस करण्यापेक्षा हा संशय व्यक्त करतोय म्हणून.

एक मजूर म्हणाला तुमाला काय खोटं वाटतय होय? इथं आमचा जीव जायची वेळ आली अन तुम्ही आमच्यावरच संशय घ्या.

मालकाने हातवारे करून गुत्तेदाराला शांत बसायला सांगितलं. मालक म्हणाले, तसं नाही ओ, पण जरा सावकाश काम करावं, आपल्या जीवाला आपणच जपायला पाहिजे. बरोबर आहे का?

हणम्या विव्हळला अन स्वतःच्या थोबाडीत मारून घेत म्हणाला, करशील का कामाच्या वेळेस आराम, राहशील का गाफिल? तू कसला राहतोस आता. तू काम करायच्या लायकीचाच राहिला नाहीस. मर आता कर्मानं.

सगळे मजूर त्याला पुन्हा समजावू लागले अन सगळं ठीक होईल म्हणून धीर देऊ लागले. कडकड खूपच वाढली. काम थांबलेलं पाहून गुत्तेदार जरा परेशान झाला. मजुरांनी त्याला पाणी दिलं अन शांत हो म्हणाले. एक-दोन मजूर म्हणाले, याला सरकारी दवाखान्यात दाखल करावं लागल. मालकाला नायतर गुत्तेदारला सोबत यावं लागल. तिथे काय खर्चा होतो ते बघावं लागल. गरीबाला दवाखाना परवडतो का मालक? अन अॅक्सिडेंट केस असली तर दाखलबी करून घेणार नाइत. उगा पोलिसाला बोलवा, तक्रार नोंदवा म्हणतील, तवर याचा जीव सुटायचा. तुम्ही चला काय ते बघा अन वाचवा गरिबाला.

तिकडे हणम्याचं ओरडणं चालूच होतं, अरे मला दवाखान्यात तर न्या नाहीतर मसणात तर नेऊन टाका. सहन होत नाय आता.

अर्धा पाऊण तास झाला हा गोंधळ चालू होता. बरं हा प्रकार बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर मागच्या बाजूने चालू होता. खाली हा प्रसंग घडला असता तर उद्योग नसलेले लोक जमा झाले असते अन गर्दी जमली असती. सध्या फक्त कामावर असलेल्या मजुरांची गर्दी होती ते एक बरं होतं.

मालक अन गुत्तेदार एकमेकांकडे बघू लागले. पोलिस ऐकून दोघांना घाम फुटला. मालकाला तर सगळं अंधारात दिसू लागलं. उगाच कोण राजकीय-सामाजिक लोक यात घुसले तर सुतावरून स्वर्ग गाठतील.

गुत्तेदार जरा उसणं अवसान आणून म्हणाला, अरे बाबांनो चूक त्याची अन आम्हाला कशाला घुसवता मध्ये. आमचा काय संबंध? आमि काय केलं?

गुत्तेदाराचे बोल ऐकून मजूर चिडले अन म्हणाले, असं कसं म्हणता साहेब, आम्ही तुमच्या कामावर आलोत, दिवसाचे पैसे देऊन तुम्ही आम्हाला विकत घेतलं, आता आमचं काय झालं तर बघावं लागल का नाय? का सोडून देणार हवेत? गरिबाला काय जीव असतो का नाय. काम तर पुरं करून घेता की आमच्याकडून, काही चुकलं तर शिव्या बी घालता, अन आता माघार कशापाई? तुम्ही कामावर बोलावलं नसतं तर आमि आलो नसतो अन हे विपरीत घडलंपण नसतं. नोकरदार माणूसला कामावर काय झालं तर कंपनी सगळी जिम्मेदारी घेतेच की. आम्हीपण तुमचे नोकरदार. तुम्हाला आमच्यासंगत हॉस्पिटलला यावंच लागल.

मालक स्तब्ध उभे होते, गुत्तेदाराने आणलेली माणसे आहेत त्यांनाच बोलू देत म्हणून वाट बघत होते.

गुत्तेदार म्हणाला, हे तर अडवून धरणं झालं. काही दोष नसताना अडकवता आम्हाला. आम्हाला नाइ जमायचं ते.

एक पेटलेला मजूर म्हणाला, तसं असल तर आम्हाला मजुरांच्या लीडर ला बोलवावं लागल, मग बसा निस्तरत.

मालकाला कळून चुकलं की हे आत्ता नाही गुंडाळलं तर अंगावर शेकणार, उगाच बदनामी होणार, बांधकाम तर थांबेलच पण पोलिस-कोर्ट भानगडीत अडकून जिंदगी जहन्नुम होईल. मालकांनी मध्ये पडायचं ठरवलं. गुत्तेदाराला मागे सरकवलं. त्याच्या हातात काही राहिलं नाही हे त्यांना समजलं.

मालक म्हणाले, हेबघा शांत व्हा सगळे, याला वार्‍यावर कोण सोडत नाही, आत्ता याला आधी सरकारी दवाखान्यात घेऊन जा, केंव्हाचा विव्हळतो आहे तो. जरा त्याचा विचार करा. उगा पोलिस वगैरेच्या भानगडीत पडायला आपण रिकामटेकडे नाहीत. पोलिसांच्या भानगडीत पडलो तर तुम्हाला काम-धाम सोडून पोलिस स्टेशनच्या चकरा मारत बसाव्या लागतील. ज्या पोटा-पाण्यासाठी करायचं ते बाजूलाच राहील. असं करा मी तुम्हाला काही पैसे देतो, त्याला माझ्या गाडीत घालून दवाखान्यात न्या, माझा ड्रायवर सोबत येईल, काय लागेल नाही ते सांगा त्याला, बघेल तो, उगा आमचं नाव येऊ देऊ नका. गोंधळ वाढेल. काय?

मजुरांना मालकांचा मधला मार्ग पटला. सगळ्यांच्याच भल्याचा होता.

मालकांनी खिशातून पाच हजार काढले अन एका मजुराच्या हातात दिले. मजुराने ते घेतले अन म्हणाला, मालक पाच हजारात तर औषध-गोळ्या-इंजेक्षण पण येणार नाय. हातावरलं पोट असतं आमचं. महिनाभर तिथे गुंतून पडला तर ह्याच्या घरचे उपाशी मरतील. गरिबाची अन त्याच्या गरिबीची थट्टा करू नका. तुम्ही त्याचं देणं लागता.

गूत्तेदार मागूनच बोलला, किती पाहिजेत ते तरी सांगा. मजुरांनी एकमेकांकडे बघितलं अन हणम्याला विचारलं की काय रे बाबा किती घेऊ पैसे? मालक देत आहेत?

हणम्या ओरडला, पैसे घेऊन मी काय करू आता, माझी पुरी जिंदगी खाटावर बसून जाणारय. मालक आयुष्यभर पुरणार आहेत का? मजूर हणम्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, ते बघू नंतर आता दवाखान्यापुरते किती घ्यायचे?

तुमीच बगा आता, पोटाला कमावेपतूर काय सोय ती बगा.

मालकांच्या काळजात धाकधूक वाढत होती. एक मजूर बोलला चला उचला हणम्याला अन टाका गाडीत, मी पैसे घेऊन येतो, तवर जीव जाईल याचा. पण लक्ष्मीदर्शन होईपर्यंत कोणी हणम्याला हातही लावेना. शेवटी आकडा कळाला. मालकाचे डोळे मोठे झाले. समोरून पंचेवीस हजारांची मागणी झाली. मालक, गुत्तेदार अवाक! गुत्तेदार तर खवळला अन म्हणाला, अरारा काय खेळ समजलात का? पंचेवीस हजार असतात का? एक मजूर बोलला, पोलिस, कोर्ट करत बसलो तर जास्त लागतील, वरुण बदनामी वेगळी अन कौर्टानं सांगितलं तर हणम्याला भरपाई द्यावी लागल. तुम्हीच विचार करून सांगा.

मालकांला समजलं की ही शुध्द्ध लुबाडणूक सुरू आहे. पण त्यांचे हात दगडाखाली होते. मालक राग गिळून गप्प राहिले अन म्हणाले, ठीक आहे, माझ्याकडे आत्ता वीस हजार आहेत ते घ्या अन बाकीचे नंतर देतो पाठवून हणम्याला. चला निघा आता, मला एक क्षणही उशीर नकोय, नाहीतर सगळं सोडून पोलिस करत बसावे लागतील.

मालकांचे निर्वाणीचे बोल ऐकून मजूर जरा मवाळ झाले. हातात आलेलं निसटू नये म्हणून ते गपचूप तयार झाले.

मालकांनी ड्रायवरला बोलावलं अन पाच मिनिट त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत उभे राहिले. ड्रायवरने पैसे आणले. मालकांनी सगळ्यासमोर वीस हजार हणम्याच्या हातात दिले. मालक पैसे देताना म्हणाले, सगळे साक्षी आहात की मी हणम्याला पैसे दिले.

पैसे हणम्याच्या हातात दिलेले पाहून एक-दोन मजुरांना दुखं झालं. हणम्यासोबत कोण जाणार याची घाई होऊ लागली. गुत्तेदार ओरडला, सगळेच जाताय की काय? दोघं-तिघं जा अन बाकीचे इथे थांबा. काहींचा हिरमोड झाला. ड्रायवर गाडी घेऊन हॉस्पिटलला गेला. राहिलेलं काम कसं-बसं चर्चा करतच चालू राहिलं.

मालकांनी संध्याकाळी गुत्तेदारला सांगितलं की, उद्यापासून सात-आठ दिवस काम बंद ठेवा अन नंतर जेंव्हा काम सुरू कराल तेंव्हा मला आजपैकी एकही मजूर पुन्हा नको, नाहीतर आपला करार रद्द. गुत्तेदर जरा घाबरला, त्याने मालक सांगतील तसं केल्याशिवाय पर्याय नव्हता.

Hammer, Wrench, Repair, Work, Industry, Service

काही दिवसांनंतरची गोष्ट. हाच हणम्या एका जागेवर झाडतोडणी करत होता. अशोकाचे, गुलमोहोराचे, नारळाचे, बदामाचे, निलगिरीचे, आंब्याचे असे झाड तोडायचा कार्यक्रम चालू होता. आठ-दहा लोक काम करत होते. हा हणम्या गुलमोहोर तोडायचं काम करत होता. तो एका फांदीवर चढला अन दुसरी फांदी तोडत होता. अचानक आवाज झाला अन हणम्या फांदीवरून खाली पडला. तो बोंबलू लागला. गर्दी जमली. मालक आले. पुन्हा सगळा मागच्यावेळेसचा किस्सा घडू लागला. ह्यावेळेस त्याचं माकडहाड मोडलं होतं. हणम्याने तीस हजार मालकाकडून वसूल केले.

हणम्या आता माजला होता. पैशाला हपापला होता अन कष्टाला चुकत होता. नाटकं करून, श्रीमंतांना फसवून तो चैन करत होता. त्याला जगण्याचा नवा मार्ग सापडला होता. एखाद्याला एखाद्या वाईट गोष्टीची चटक लागली की त्याचं व्यसन लागतं अन तो वाहवत जातो. हणम्याचंही तसच झालं होतं. चाळीशीच्या आत असताना तो अशा मार्गाला लागला होता. प्रत्येकवेळी नवीन कामावर जायचं. तिथे कोण ओळखीचं नाही ते बघायचं अन योग्य संधी साधून आपला डाव टाकायचा. एक-दोघाला बरोबर घ्यायचं अन पैसा कमवायचा असा त्याचा बेत ठरलेला असायचा. हणम्या वरचे-वर नवनवीन बकरे कापू लागला होता.

एके दिवशी हणम्या असाच एका इमारतीवर मजूर म्हणून कामाला होता. त्याला आज डाव साधायची हुक्की आली. त्याने परिस्थितीचा अंदाज घेतला अन त्याने डाव टाकला. तो ओरडू लागला, विव्हळू लागला, बोंबलू लागला. नेहमीप्रमाणे गर्दी जमली, मालक आले अन हणम्याला वाटलं की नेहमीप्रमाणे आपण आपला डाव साधू.

पण दैव वाईट लोकांचं नेहमीच साथ देत नसतं हे त्याला माहीत नसावं.

ह्या इमारतीच्या मालकाबरोबर अजून एक मोठा माणूस आला. त्याने हणम्याकडे बघितलं अन त्याच्या चेहर्‍यावर आनंदाची, जिंकल्याची, इस्पित साध्य झाल्याची भावना होती.

दुसरीकडे हणम्याने त्या दुसर्‍या माणसाकडे बघितलं अन तो थोडा अस्वस्थ झाला. त्याला असुरक्षिततेची भावना जाणवू लागली.

तो दूसरा मोठा माणूस म्हणजे ते मालक होते ज्यांच्याकडे हणम्याने कडप्पा पायावर पडून पाय तुटल्याचा बहाणा करून वीस हजार रुपये लाटले होते. हे पूर्वीचे मालक इथल्या इमारतीच्या मालकाचे मित्र होते अन सहज इथे उपस्थित होते अन योगायोगाने ही घटना घडली.

आता हे पूर्वीचे मालक म्हणाले, येऊ द्या पोलिस, जाऊया आपण हॉस्पिटलला.

हणम्या बिथरला अन म्हणाला, नको जास्त नाही काही, घरी जाऊन पडतो म्हणजे बरा होईल, गरीबला सवय असते याची. जातो मी.

मालकाने त्याला तेथेच थांबवलं अन आपल्या ड्रायवरला बोलावलं. ड्रायवरने हणम्याला ओळखलं अन त्याचे खरे पराक्रम सगळ्यांना सांगितले.

मालक आता तावातावाने बोलत होते, गेल्या वेळेसच मला ह्याचे नाटकं लक्षात आले होते पण माझा नाईलाज होता म्हणून मी शांत बसलो. माझ्या ड्रायवरला हॉस्पिटलमध्ये पाठवलं अन तिथल्या डॉक्टरशी ओळख काढली. माझा ड्रायवर चार-सहा दिवसांनी तिथे गेला. डॉक्टरने हणम्याला तपासाल्याचे अन फार दुखापत नं झाल्याचे रीपोर्ट चार दिवसांनी दिले. तोपर्यंत हणम्या गायब झाला होता. डॉक्टरला सांगितलं की हा माणूस परत इथे आला तर कळवा. डॉक्टरने आपलं काम चोख पार पाडलं अन हणम्या तीन-चारदा येऊन गेल्याचं कळालं. याचा धंदा माझ्या लक्षात आला होता. मी पोलिसांना सगळं सांगितलं अन पोलिसांनी याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. आज इथे आल्याचं कळताच मी मुद्दाम इथे आलो कारण इथला मालक माझा मित्र आहे. आज याला रंगेहात पकडलं.

मालक म्हणाले, हणम्या आता तुझे हात, पाय, कंबर मोडली तरी तू काहीच नाही म्हणू शकणार कारण ते अवयव तुझे आधीच मोडले आहेत. हणम्या मालकाचे पाय धरून रडू लागला. पोलिस आले अन हनाम्याला घेऊन गेले.

एक मजूर एक ठकसेन म्हणून जेरबंद झाला होता.

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in  || @Late_Night1991

READ SIMILAR STORIES HERE … वाचा अशाच काही कथा… 

मराठी कथा – अभिषेक बुचके

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!