भिक्षुकी

भिक्षुकी

मराठी कथा || कालाय तस्मय नमः ||  स्वलेखन  ||  वैचारिक वगैरे  || पाहण्यातील घटना  ||  Marathi Stories

 

सदाशिव उपरणकर गुरुजी हे तसे ज्ञानी मनुष्य. कासरी हेही तसं लहान शहर; फार मोठं नाही आणि त्याला गाव असं संबोधावं इतकं लहानही नाही. उपरणकर गुरुजींना सर्वजण सदागुरू म्हणून ओळखायचे. भिक्षुकी हेच त्यांचं जीवन. ब्राम्हण कुटुंबात जन्माला आल्याने लहानपणापासून भिक्षुकी करायचा परवाना जन्मतः त्यांना मिळाला होता. सदागुरू यांचे वडील हे विद्वान पंडित. त्यांच्याच तालमीत सदागुरू तयार झाले. त्यांना त्यांच्या क्षेत्रातील सखोल ज्ञान होतं. सदागुरू हेही विद्वान म्हणून परिचित झाले.

गावाच्या थोडसं बाहेर त्यांच्या वडलांच्या जागेतच ते अजूनही रहायचे. जागा तशी बरीच मोठी असली तरी त्यातील बरीचशी जागा फळा-फुलांच्या झाडांनी व्यापली होती. पूजेला वगैरे जाताना घरची फळं-फुलं नेण्याची सवयही होती सदागुरूंना. घर साधारण राहण्यापुरतंच होतं. त्यातच ते राहत.

भिक्षुकीला त्यांच्या वडलांनी आणि त्यांनीही कधीच व्यवसाय म्हणून पाहिलं नव्हतं. ही परंपरा ते कर्तव्य म्हणून पुढे चालवत होते. सदागुरू म्हणजे अतिशय निर्मळ मनाचा, निस्वार्थी मनुष्य असं गावातले त्यांना ओळखणारे लोक सांगत. जिथे ज्या पूजेसाठी बोलावून येईल तेथे ते दिलेल्या वेळेत पोहचणार असा नियतीचा नियम होता. संपूर्ण पुजा व्यवस्थित सांगायची, कुठेही चूक होणे हे त्यांनाच मान्य नव्हतं. यजमान जर घाई-गडबड करत असतील तर त्यांना उपदेशाचे डोस पाजून विधिवत कार्य पूर्ण करून घेणे हा सदागुरू यांचा अट्टाहास असायचा. पुजा कसलीही असो सार्वजनिक गणेशोत्सव, दुकानाचं उद्घाटन किंवा अन्य काही सर्व विधिवत पार पाडावे असा त्यांचा आग्रह. पुजा सांगून झाल्यावर किंवा जे कार्य असेल ते सांगून पूर्ण झाल्यावर यजमान हातावर जी दक्षिणा हातात ठेवली जायची त्याच्यावर डोळेही न फिरवता ती सदागुरू यांच्या सदर्‍याच्या खिशात जाऊन बसायची. दक्षिणा किती मिळाली हे त्यांच्या बायकोला त्यांचे खिसे रिकामे करताना समजायचं आणि मग सदागुरूंना.

खूप पूर्वी, अर्थात सदागुरू यांचं लग्न झालं त्याच्यानंतरचा किस्सा; एकदा सदागुरू लग्न लावण्यासाठी गेले होते. लग्न लाऊन वगैरे सदागुरू घरी आले. त्यांच्या पत्नीचं काम होतं की त्यांना मिळणारे पैसे खिशातून काढून घरकामाला घेणे. सदागुरू नंतर स्वतःला लागले तर पैसे बायकोकडून मागून घ्यायचे. त्या दिवशी लग्न लाऊन आल्यावर सदागुरूंच्या बायकोला त्यांच्या खिशातून फार कमी पैसे मिळाले. त्यांची अपेक्षा होती, लग्न लावल्यावर बरीच दक्षिणा मिळणार, पण त्यांचा अंदाज चुकला होता. त्यांनी सदागुरूंना विचारलं की लग्नासारखं इतकं मोठं कार्य करूनही इतकीच दक्षिणा? हा त्यांच्या बायकोने त्यांना याबाबत विचारलेला पहिलाच अन शेवटचा प्रश्न आणि सदागुरूंचं यावर एकदाचंच उत्तर!

सदागुरू म्हणाले होते, पैसे कमवायचे असते तर नौकरी-व्यवसाय केला असता, आपण करतो ते पवित्र कार्य आहे, ते पैशासाठी करत नाही. धर्माने सांगितल्याप्रमाणे ते पुढच्या पिढीपर्यंत नेणे हेच आपलं कर्तव्य. जो तो आपल्या कुवतींनुसार अन त्याला माझ्या कार्याचं महत्व कितपत वाटलं यानुसार तो दक्षिणा देत असतो. भिक्षुकी यातून येणार्‍या प्राप्तीतूनच आजवर हे घर चालत आलं आहे अन यापुढेही तसंच चालेल. मी जर बघू लागलो मला किती दक्षिणा मिळते तर माझ्या अपेक्षा वाढतील अन मला मोह होईल, त्यामुळे मी कधी ते बघण्याचं धाडस करणार नाही. आपण परमेश्वराचं कार्य करतो आहोत, आपलं तो बघेल. या उत्तरावरून सदागुरूंच्या बायकोला समजून चुकलं होतं की आपली गाठ कोणाशी बांधली गेली आहे.

साधेपणाने राहून, पूर्वजांनी नेमून दिलेलं काम अन परंपरा सदागुरू पुढे चालवत होते. अंथरूण पाहून पाय पसरावे यावर त्यांचा गाढ विश्वास होता. असलेल्या पैशातूनच त्यांनी सर्व प्रपंच त्यांनी पुढे सरवकवला होता. कधी कोणासमोर हात पसरायची वेळ त्यांच्यावर आलेली नव्हती. त्यांना एक मुलगा अन एक मुलगी होती. स्वतःच्या मुलीचं लग्नही त्यांनी जेमतेमचं पार पाडलं होतं. कितीही संकटे आली, घरच्यांशीच भांडावं लागलं तरी त्यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही. त्यांच्या घरचेही त्यांच्या या स्वभावाला जाणून होते आणि तेही कधी सदागुरूंनी आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही.

त्यांचे मित्र, त्यांना ओळखणारे हेही सदागुरूंना जाणून होते. मित्रपरिवार, स्नेही यांच्या बाबतीत मात्र सदागुरू श्रीमंत होते. इतकी वर्षे गावात राहिल्याने त्यांचा अनेकांशी चांगला स्नेह होता. त्यात गावात ब्राम्हनांची दोन-तीनच घरे होती. गावातील प्रत्येकाला पूजा सांगायला सदागुरूच पाहिजे असायचे. एक तर याला आर्थिक कारणही असायचं अन सदागुरूंच्या विद्वत्ता सर्वांना माहीत होती. गावात नव्याने आलेल्या बोकिल भडजींनी तर भिक्षुकी हा व्यवसाय असतो ह्याच दृष्टीने वाटचाल केली होती. त्यांच्या घराबाहेर एक फलक टांगलेला होता ज्यावर वेगवेगळ्या पूजेला काय दर आहेत हे लिहिलेलं होतं. गावातील सर्वांना आधी सदागुरू पाहिजे असायचे अन त्यांना जमत नसेल तरच बाकीच्यांकडे ते मोर्चा वळवायचे.

सदागुरूंच्या अशा प्रसिद्धी गावातील काही भडजी त्यांच्यावर राग धरून असायचे, पण सदागुरू हे नम्र व्यक्तिमत्व, स्वतःला एखाद्या कार्याला जाता येत नसेल तर ते बाकीच्यांचीच नावे सांगायचे. सदागुरूंच्या अशा स्वभावानेच ते अजातशत्रु होते. अशाने सदागुरूंचं घरही व्यवस्थित चालायचं. पण सर्वच लोक समजूतदार नसतात; मऊ लागलं की बोटाने खणत जायची प्रत्येक समाजाची मानसिकता असते. सदागुरू मिळेल ती दक्षिणा स्वीकारत असल्याने काही लोकांनी ‘कंजूशी’ सोडली नव्हती. दहा-पंधरा वर्षांपूर्वी सदागुरूंना जेवढी दक्षिणा ते द्यायचे आजही ते तेवढीच द्यायचे. पण सदागुरूंना काहीच फरक पडत नसायचा, कारण त्यांना किती दक्षिणा मिळाली हे ते बघायचेही नाहीत अन बायकोला कधी विचारायचेही नाहीत.

ज्ञान, विद्या, परंपरा यापुढे सदागुरूंनी कशालाच मोठं मानलं नाही. अध्यात्माबद्धल जेथून कोठून नवीन ज्ञान भेटायचं तेथून ते आत्मसात करत असत. धर्म, परंपरा, वेद, पुजा-पठन, श्लोक यातच त्यांचं आयुष्य गाडल्या गेलं होतं. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून स्वतःचं त्याबाबतीत काय मत आहे हेही ते लिहून काढायचे. त्यांच्या ज्ञांनाची बातमी लागल्याने चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक त्यांच्याकडे येऊन अशा विषयावर मोफत ज्ञान घेऊन जायचे. एका निर्मात्याने त्यांना मोठी रक्कम देऊ केली पण सदागुरूंनी त्यातील काहीशी ठेऊन बाकीची परत केली. ज्ञांनाची विक्री माझ्याकडून ह्या जन्मात तरी शक्य नाही म्हणून निर्मात्यांना सांगितलं. निर्माता त्यांना साक्षात दंडवत घालून निघून गेला. सदागुरूंच्या बायकोला ह्या गोष्टीचा कधी राग यायचा, कधी हेवा वाटायचा तर कधी अभिमान! पण याविषयी आयुष्यभर पुरेल असं उत्तर सदागुरूंनी त्यांना एकदाच दिलं होतं.

सदागुरूंच्या वयाची सत्तरी उलटली होती. त्यांनी काम आता बरंच कमी केलं होतं. त्यांचं काम त्यांचा मुलगा पुढे चालवत होता. त्यांचा मुलगा शंकर हाही त्यांच्याच तोडीचा होता. सदागुरूंच्या तालमीत तयार झाला होता शेवटी. अजून त्यांच्याइतकं ज्ञान त्याने आत्मसात केलेलं नसलं तरी रोजच्या पूजा-पाठ सांगायला तोच जायचा. त्यानेही कधी इतकी दक्षिणा द्या अशी मागणी कोणाकडे केली नव्हती. सदागुरूंचा आदर्श! फक्त एक बदल झाला होता, सदागुरू मिळालेल्या दक्षिणेवर कधी डोळेही फिरवायचे नाहीत तर शंकर ते मोजून खिशात ठेवायचा. पिढीचा फरक म्हणून सदागुरूंनी याकडे लक्ष दिलं नव्हतं.

सूर्य कितीही प्रखर असला तरी त्यालाही ग्रहण लागतंच. एक दिवस असा उजाडला होता जेथून उपरणकर घराण्याला ग्रहण लागणार होतं. वयाची सत्तरी उलटलेले सदागुरू अंघोळीला गेले होते अन अंघोळ उरकून झाल्यावर परतताना त्यांचा पाय घसरला अन ते तेथेच घसरून पडले. डॉक्टर वगैरे यांचा सोपस्कार पार पडला अन त्यांची पाठ मोडल्याचं निष्पन्न झालं!

पहाटे चारला उठून सूर्यनमस्कार घालणार्‍या, दिवसभर पोथी-पुस्तकासमोर बसून असणार्‍या, एखाद जागी पुजा कार्य करायला जाणारे सदागुरू आता पलंगावर पडून होते. रोज नवे-नवे औषधोपचार सुरू झाले होते. आज सत्तर वर्षांच्या आयुष्यात इतके दिवस एका जागेवर पडून राहायची वेळ त्यांच्यावर कधी आलेली नव्हती. वाढणार्‍या औषधोपचाराबरोबर त्याचा खर्चही वाढत होता. पडले सदागुरू होते पण पण कंबरडं त्यांच्या घराचं मोडलं होतं. उपचाराचा महागडा खर्च अर्थातच परवडणारा नव्हता. आयुष्यभर पाळलेल्या तत्वामुळे घरात आर्थिक सुबत्ता जेमतेम होती. सर्वकाही पोटा-पाण्यापुरते जमवले होते. सदागुरूंच्या बायकोने काटकसर करून जमवलेले पैसे तेवढेच उपयोगी येत होते.

लवकरच पैशांचा साठा संपत आला. सदागुरूंना ह्या सगळ्याची कुणकुण लागली होती. ते शरीरापेक्षा मनाने मोडून पडले होते. आयुष्यभर आपण पाळलेल्या तत्वांची शिक्षा आपल्याला अन आपल्या परिवाराला भोगावी लागत आहे असं त्यांना वाटत होतं. त्यांचं मन वैफल्यग्रस्त झालं होतं. सणावाराला करून घेतलेले दाग-दागिने विकायची वेळ आली होती. हे ऐकल्यावर तर सदागुरू अक्षरशः गतप्राण झाले. क्षणाक्षणाला त्यांना अश्रु अनावर होत होते. पत्नीने किंवा इतर हितचिंतकांनी दिलेल्या सल्ल्याचा आपण कधीच डोळसपणाने विचार केला नाही याची खंत त्यांना वाटत होती.

ज्या डॉक्टरकडे उपचार चालू होते त्यांचे वडील, जे डॉक्टरच होते ते सदागुरूंच्या परिचयाचे होते. तेही सदागुरूसारखेच होते. डॉक्टरकी हा सेवेचा कर्तव्य असलेला पेशा आहे असं ते मानायचे अन बर्‍याचदा मोफत, कमी पैशांत उपचार करायचे. पण त्यांचा मुलगा काळानुसार शहाणा झाला होता, आलेल्या रुग्णांकडून रग्गड पैसे घ्यायचा, किंबहुना पैसे असतील तरच रुग्ण दाखल करून घ्यायचा. नसती समाजसेवा त्याने वडलांच्या मृत्यूनंतर लागलीच बंद केली होती. त्या डॉक्टरने सदागुरूंना शस्त्रक्रिया अर्थात ऑपरेशनचा इलाज सांगितला होता. शस्त्रक्रियेचा खर्च अर्थातच अफाट होता अन उपरणकर कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेरचा होता.

आता पुढे काय? हा प्रश्न उपरणकर कुटुंबाच्या समोर ठाण मांडून उभा होता. घरातील पैसेही संपले होते अन दागिनेही विकून झाले होते. शंकरने ओळखी-पाळखीच्या लोकांकडे पैसे मागावे असा उपाय सुचवला होता पण सदागुरूंनी तो साफ नाकारला होता. आयुष्यभर ज्या ताठ मानेने जगलो त्याच ताठ मानेने संपू असा त्यांचा अट्टाहास होता. त्यांनी कोणाकडेही पैसे मागायचे नाहीत असं स्पष्टपणे सांगितलं होतं. पण आपला बाप आपल्या डोळ्यासमोर तडफडतो आहे हे शंकरला पाहावलं नाही अन शेवटी हतबल होऊन शंकरने जवळच्या काही लोकांकडे पैसे मागितले; त्यातील काहींनी हात वर केले तर काहींनी मदत करण्यास पुढाकार घेतला.

उपरणकर कुटुंबाला मदत करणे म्हणजे बुडत्या जहाजात पैसे ठेवण्यासारखं आहे हे माहीत असल्याने त्यांना पैसे देण्यास फार कोण उत्सुक नव्हतं. काहीजण तर अशा मोक्याच्या संधी शोधतंच असतात. आता घडली का अद्दल, आलं का उपयोगी ज्ञान-विद्या? का तत्व उपयोगी पडली? अशी दूषणे देण्यास सुरुवात केली होती. शेवटी काय तर, पैसे येणं अवघड होतं.

ज्या हितचिंतकांनी मदत केली त्यांच्याकडून शंकरने पैसे घेतले होते. शंकरने पैशांची व्यवस्था झाली आहे ऑपरेशन करूया असं जेंव्हा सदागुरूंना सांगितलं तेंव्हा सदागुरूंनी पैसे कोठून आले याची विचारणा केली.

शंकरने घाबरतच सत्य परिस्थिती सांगितली तेंव्हा सदागुरू प्रचंड संतापले. झोपून असलेले सदागुरू सर्व शक्ति एकवटुन जागेवरून उठले अन कोप अनावर झाल्याने त्यांनी शंकरला थोबाडीत लगावली अन नंतर स्वतःच जोरजोरात रडू लागले. ते पैसे परत करेपर्यंत अन्नाचा त्याग करीन अशी धमकी त्यांनी दिली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने शंकरसमोरही पर्याय नव्हता. आता सगळ्यांना समजून चुकलं होतं की सदागुरू उरलेलं आयुष्य झोपूनच राहणार. पण सदागुरूंना हे मान्य नव्हतं. त्यांच्या मनाने कसलीतरी तयारी केली होती. आयुष्यभराच्या घटना त्यांच्या डोळ्यासमोरून जात होत्या, अनेकांचे शब्द ऐकू येत होते, खंत वाटत होती! मनाला एका काळ्याकुट्ट अंधाराने घेरलं होतं. स्वतःचा, स्वतःच्या तत्वांचा राग होता तो.

अशाच एका काळ्याकुट्ट रात्री सदागुरू कसेबसे उठले. त्यांनी घरातून एक पांढराशुभ्र पंचा घेतला, लालभडक कुंकू घेऊन ते पाण्यात कालवलं अन त्या लाल रंगाने त्या पांढर्‍या पंच्यावर काहीतरी रेखाटलं. क्षणाक्षणाला त्यांच्या डोळ्यातून पाणी बाहेर पडत होतं, पाठीत होत असलेल्या तीव्र वेदनेचा विसर त्यांना केंव्हाच पडला होता. सर्व शक्ति एकवटली होती. सदागुरू त्यांच्या अध्यायनाच्या-पठणाच्या खोलीत गेले तेथील कागदावर काहीतरी लिहिलं. रंगवलेला पंचा घेऊन ते घराच्या मुख्य फाटकाजवळ गेले. तो पंचा तेथे टांगला अन मट्ट्कन खाली बसले. डोळ्यातील अश्रु आता थांबले होते.

संपूर्ण आयुष्य शांतपणे काढलेल्या सदागुरूंची शेवटची धडपड घरातील कोणालाही ऐकू आली नव्हती. घरच्या अंगणात सदागुरूंनी जीव सोडला होता. ह्या घटनेची माहिती शंकरला भल्या पहाटे लागली. सदागुरू जग सोडून गेले होते. शरीरापेक्षा मनाला तीव्र क्लेश करून घेत त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. निर्मळ, निस्वार्थी मनुष्याचा असा अंत झाला होता.

सदागुरूंनी चिठ्ठीत लिहिलेलं होतं की “माझ्यामुळे व माझ्या कठोर तत्वपालनामुळे आज माझ्या कुटुंबावर नामुष्कीची वेळ आली आहे. मला क्षमा करा. मी जग सोडतो आहे, तत्व सोडणं मला शक्य नाही!”

सदागुरू यांनी जेथे अखेरचा श्वास सोडला होता तेथे तो रंगवलेला पंचा होता. त्यावर लिहिलं होतं, शंकर तुझ्यासाठी… आणि खाली सर्व प्रकारच्या पुजा अन कार्यांचे दर लिहिलेले होते. हे बघितल्यावर घरच्यांना शोक आवरणे अजूनच कठीण झालं होतं. स्वतः तत्व पाळून ते मुलाला शहाणपण शिकवून गेले.

सदागुरू गेल्यावर शंकरने तो फलक घरातच ठेवला होता, पण त्याच्या वागण्यात आमुलाग्र बदल झाला होता.

शंकर आता स्वतः किती दक्षिणा घेणार हे कार्यक्रम ठरवतानाच सांगत असे. त्यानेही इतर अनेक भटजी यांच्याप्रमाणे हे क्षेत्र ‘व्यवसाय’ म्हणून निवडलं. पूर्वी जिथे एक-दीड तासात एका गणेशाची स्थापना तो करत असे आता मात्र एक-दीड तासात तो तीन-चार गणेशोत्सव मंडळात पुजा सांगू लागला. घरातील बाग तोडून त्याने तेथे वेदिक अन धर्मशास्त्र याच्या शिकवण्या सुरू केल्या होत्या.

मोठ-मोठी लोकं तेथे त्यांच्या मुलांना संस्कार मिळावेत म्हणून आणून सोडत.

मोठ-मोठ्या व्यापरांना लक्ष्मीप्राप्ती व्हावी, टिकून राहावी म्हणून तो त्यांच्या नावाने जप करून मोठ्या दक्षिणा मिळवत होता. ज्योतिषशास्त्र शिकून त्यातूनही व्यापार वृद्धिंगत करायची खटपट त्याने चालवली होती.

शंकर आता पेट्रोलचे भाव वाढले म्हणून येण्या-जाण्याचा खर्चही घेऊ लागला होता. सदागुरू यांचा मुलगा त्यांच्याइतकच विद्वान-ज्ञानी म्हणून लोक त्याच्याकडे कमी बघायचे पण त्याने बापाचे तत्व मोडून सरस्वतीचा उपयोग लक्ष्मी प्राप्तीसाठी करतो असं म्हंटलं जायचं.

केवळ सरस्वतीची उपासना केली तर त्याचा सदागुरू होतो असं शंकरला राहून-राहून वाटे. सदागुरू गेल्याच्या एका वर्षाच्या आत त्याने दोन छोट्या गाड्या विकत घेऊन दारासमोर उभ्या केल्या होत्या.

सर्वकाही व्यावहारिक करायचं हे शंकरच्या मनाने आणि मेंदूने कठोरपणे ठरवलं होतं. ज्ञानपेक्षा आजचं जग पैशाला महत्व देतं हे शंकरला सदागुरू यांच्या परिस्थितीवरून समजलं होतं. सगळी क्षेत्र कात टाकत होती, काळाबरोबर बदलत होती तर आपण का बदलू नये हा प्रश्न इतक्या वर्षानी शंकरला पडत होता.

डॉक्टर, वकील, नेते, अधिकारी, व्यापारी, कलाकार सगळेच काळानुसार बदलले तर आपण का नाही बदलायचं? सर्वांनी मोठ्या बंगल्यात राहायचं, गाड्यांत फिरायचं, त्यांच्या मुलांनी भारी हॉटेलात जायचं, भारी कपडे घालायचे अन आम्ही काय अजूनही केवळ परंपरा, ज्ञान ह्याच गोष्टीत अडकून राहायचं का??? आमचं कार्य पवित्र असं म्हणून केवळ मनाला समाधान मिळू शकत होतं; पण त्या पवित्र कामाचे फळं मात्र दुसराच कोणीतरी चाखतो आहे असं त्याला वाटे. ज्या लोकांनी आयुष्यभर सदागुरू यांच्याकडून जवळजवळ मोफत सेवा करून घेतली. ज्ञानी, नम्र, निर्मळ म्हणून कौतुक केलं त्यातील एकानेही त्यांना पडत्या काळात आधार दिला नाही. शेवटी सारं जग पैशाचं भुकेलं झालं आहे.

ज्यांनी आयुष्यभर सदागुरूंची एकाच दक्षिणेवर बोळवण केली ते शंकरचे ‘रेट्स’ बघून म्हणतात… कलियुग आले हो… सदागुरू गरीब होते बिचारे, देतील तेवढी भिक्षुकी घ्यायचे… आता भिक्षुकी म्हणजे सगळा बाजार झालाय!!!

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in || @Late_Night1991

 

खालील ई-पुस्तकात अशाच काही कथा वाचायला मिळतील… जरूर भेट द्या…

नवीन मराठी कथासंग्रह

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!