पाटील पेटले

पाटील पेटले

मराठी कथा  ||  बोधकथा  || स्वलेखन  || Marathi Story  ||  विचारवादी..

 

शेर पिंजरे में क्यों न हो, शेर ही होता है…

 

आज नरखेड जे काही छोटंसं शहराचं रूप धारण करत होतं त्यात विष्णु पाटील अन त्यांच्या पूर्वजांचा मोठा हातभार होता. विष्णु पाटलांचे पूर्वज ह्या भागाचे वतनदार होते. पाटलांचा दौलतवाडा हा तर आजूबाजूच्या शंभर गावांची शान होता. पण वतनदार्‍या गेल्या, वतन गेले, लोकशाही मोठ्या थाटात नांदू लागली होती. पाटलांच्या वंशजांनीही मोठ्या मनाने म्हणा किंवा मजबूरीने म्हणा किंवा काळाची पाऊले ओळखून म्हणा उगाच पाटीलकीचा अट्टहास धरला नाही. काळाच्या ओघात लोकशाहीचा आदर करत पाटील घराण्याने आपला रुतबा, मान-मरातब, आदर मोठ्या खुबीने जपला होता. कुठे नमतं-जमतं घेत तेही काळासोबत पुढे जात होते.

विष्णु पाटलांचे वडील, पंढरी पाटील, म्हणजे एक खंबीर राजकीय नेतृत्व होतं. इथल्या मातीतील जनतेनेही त्यांना भरभरून प्रेम दिलं. ते कर्तबगारीने मोठे झाले अन याच मातीशी मिसळून राहिले. सत्तेचा उपयोग करून ह्या भागाचा अन काही प्रमाणात स्वतःचाही विकास करून घेतला. आजूबाजूच्या गावांची, स्थानिक लोकांची मदत घेऊन नरखेड हे छोटसं गाव त्यांनी छोट्या शहरात बदलण्यासाठी बरीच मेहनत घेतली. त्यांची अख्खी हयात यात खर्ची पडली तेंव्हा नरखेड तालुका झाला.

नरखेड तालुका झाला अन सव्वा महिन्यात विष्णु पाटलांचे वडील अर्थात थोरले पाटील कैलासवासी झाले. थोरल्या पाटलांनी जाताना आपले आशीर्वाद, मोलाचे सहकारी, दौलतवाडा, अन मोठी जमीन विष्णु पाटलांच्या जिवावर सोडली होती. वतनदरी गेली, गावाचा तालुका करताना गेलेली जमीन सोडूनही मोठी जमीन विष्णु पाटलांच्या हाती होती. शहर वसवताना आपल्या जमिनीला सोन्याचे दिवस कसे येतील याची व्यावहारिक जाण थोरल्या पाटलांना होती अन तशी तजवीजही त्यांनी करून ठेवली होती.

विष्णु पाटील थोरल्या पाटलांच्या मागे दौलतीचा गाडा मोठ्या खुबीने हाकत होते. थोरले पाटील सक्रिय राजकरणातून मोठे झाले तरी विष्णु पाटलांना राजकरणात रसही नव्हता अन त्याची फार जाणही नव्हती. त्यामुळेच ते राजकारणापासून अलिप्त राहिले होते. थोरल्या पाटलांएवढा त्यांचा दरारा नसला तरी त्यांच्या मानपानात कुठलीही कमी आली नव्हती. या भागातील जनता त्यांना तितक्याच आदराने वागवायची.

विष्णु पाटलांचीही मोठ्या लोकांत ऊठ-बस होती. विष्णु पाटील तसे शांत-निवांत, सरळमार्गी व्यक्तिमत्व. कुणाच्या अध्यात-मध्यात न येता ते आपापल्या मार्गाने पुढे जायचे. विनाकारण मोठेपणा, रुबाब याचं प्रदर्शन मांडणे ते टाळायचे. त्यांच्या अशा स्वभावाने काही लोक त्यांना, “थोरल्या पाटलांवणी पाणी नाही हे!” म्हणून कमी समजायचे, पण काही जाणकार त्यांच्या अशा स्वभावाने त्यांना फायदाच होईल असं म्हणायचे.

हे चालायचंच! म्हणून विष्णु पाटीलही याकडे कानाडोळा करायचे.

दिवस सरत होते. देशात जागतिकीकरण पसरू लागलं होतं. नरखेडही त्यात मागे नव्हतं. नरखेडही वेगाने वाढत होतं. नरखेड वाढलं, प्रगती करू लागलं तर कोणत्या दिशेने करणार याची तजवीज थोरल्या पाटलांनी आधीच करून ठेवली होती. ज्या भागात पाटील घराण्याची शेकडो एकर जमीन आहे तिकडेच शहर कसं वाढेल, त्या जमिनीला सोन्याचे भाव येऊन आपल्या पुढच्या पिढीला त्याचा कसा उपयोग होईल असा दूरदर्शी विचार थोरल्या पाटलांनी चतुरपणे करून ठेवला होता अन घडलंही तसंच.

पाटलांच्या जमिनीला सोन्याचे भाव येऊ लागले. असलेल्या शेताचे प्लोटिंग करून विकणे, उद्योगाला जमीन देणे, रेल्वेला किंवा सरकारला जमीन देणे यामुळे विष्णु पाटील यांना मोठा फायदा होऊ लागला. इतकं करूनही शहराच्या दुसर्‍या भागात पाटलांची बरीच जमीन शिल्लक होती.

एखादं निष्पाप रोपटं एका विराण जमिनीत येऊन रुजावं नंतर त्यामुळे अजून रोपटे येऊन वसावेत, त्यांची संख्या वाढावी अन नंतर त्यांची बाग व्हाही, वन व्हावं ही गोष्ट नवीन नाही. नंतर त्या वनाला काहीही केलं तरी काढता येऊ नये अशीही परिस्थिती उद्भवल्याचं आपल्याला माहीत आहेच. तेच येथे घडलं.

शहर वाढू लागलं तशी शहराची लोकसंख्याही वाढू लागली. शहरात विविध प्रकारचे लोक येऊन राहू लागले. काही आसपासच्या गावांतील असायचे तर काही दूर कुठूनतरी यायचे अन येथे येऊन काम करून पोट भागवायचे. नोकरदार वर्ग चांगली नौकरी करू लागला अन पैसे कमावू लागला. पाटलांनी केलेल्या प्लॉटला भाव येऊ लागला. नोकरदार वर्ग परवडेल तसे पैसे देऊन जागा घेऊ लागले अन आनंदाने राहू लागले. पण ज्यांना परवडत नव्हतं त्यांना कुठे राहावं असा प्रश्न पडू लागला. गावात प्लॉट घेऊन राहावं इतकी ऐपत त्यांची अजिबात नव्हती. यात सगळा मजूर वर्ग होता. हमाल, गवंडी, सुतार, लोहार, मजूर, सफाई कर्मचारी, शिपाई आणि असे अनेक गरीब वर्गाचे प्रतींनिधी.

शहर वाढत होतं अन अनेक परदेशी स्वप्न येथे साकार होत होते. पण ते साकार करण्यासाठी ज्यांचे हात राबत होते त्यांचा फार विचार कोण करत नव्हतं. हा वर्ग जमेल तेथे आडोसा घेत एक-एक दिवस पुढे ढकलत होता. ऊन-पाऊस-वारा यापासून बचाव मोठ्या कसरतीने करावा लागायचा. सभ्य लोकांना असा उघडावलेपणा डोळ्याने बघायलाही नको वाटायचा. हळूहळू ही समस्या मोठी होत गेली. लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत ही समस्या पोचली. चर्चा वगैरे घडल्या पण त्यांच्याजवळ कुठलाच पर्याय नव्हता. सरकारकडे यांची देखभाल करायला पैसे नाहीत हे मोठं कारण समोर आलं अन सगळे गप्प बसले. आता सरकारकडेच पैसे नाहीत म्हणल्यावर ह्या लोकांची तर काय पात्रता होती घरं घेऊन राहायची. पण लवकरच सरकार यांच्यासाठी स्वस्त घर योजना आणेल अशी घोषणा झाली. ह्या “लवकरच” अर्थ त्या काळी नेमका माहीत नव्हता. तात्पुरती सोय करा असा काहीतरी संदेश आला. मग काय स्थानिक प्रशासन-लोकप्रतिनिधी यांची धावपळ सुरू झाली.

शहराजवळ सरकारच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर या लोकांना तंबू ठोकून द्यायची असा प्रस्ताव पास झाला. पण त्यालाही फार यश आलं नाही. सरकारकडे जास्त जमीन शिल्लक नव्हतीच. सगळीकडे काहीतरी काम चालू होतं, आरक्षण होतं अन काय काय.

शेवटी एक उपाय काढला. शहरातील मोठ्या लोकांची जमीन भाडेतत्वावर किंवा ‘दान’ म्हणून घ्यायची. शोध सुरू झाला. गावातील अनेक व्यापारी अन जमीन मालकांनी यासाठी असमर्थता दर्शवली. कोणालाही ही ब्याद साडेसातीसारखी मागे लाऊन घ्यायची नव्हती. त्यातल्या त्यात सोन्याचे भाव आलेल्या जमिनीला अशा फुकट्या कारणासाठी देणं कोणालाही व्यावहारिक वाटलं नाही. एका बड्या दिलवाल्या माणसाने शहराला लागून असलेली आपली मोकळी जमीन दहा वर्षांच्या अटीवर देऊ केली, पण तेथील मध्यमवर्गीय मंडळींनी त्याला विरोध केला. मजूर वर्ग आपल्या गल्लीत नको असं त्यामागचं खरं कारण होतं. हाही पर्याय मिटला.

शेवटी प्रशासनातील एक माणूस, मजुरांचा एक प्रतींनिधी अन स्थानिक लोकप्रतिनिधी मिळून पाटलांच्या वाड्यावर गेले. जागेच्या बाबतीत ह्या भागात पाटलांएवढं कोणीच श्रीमंत नव्हतं. शहारच्या आजूबाजूला पाटलांची जमीन आहे हे काही लपून नव्हतं.

सगळी समस्या पाटलांच्या कानावर घालण्यात आली. सगळ्यांनी मिळून विष्णु पाटलांना गळ घातली अन रेल्वेच्या बाजूला असलेल्या त्यांच्या शेतजमिनीवर मजुरांना तंबू ठोकून तात्पुरतं राहायची परवानगी द्यावी. सरकार लवकरच स्वस्त घर योजना आणणार आहे अन ती पूर्ण झाल्यावर ही मंडळी आपली जागा सोडतील अशी खात्री त्यांना देण्यात आली.

लोकप्रतिनिधी, सरकार यांच्यावर पुर्णपणे अविश्वास दाखवण्याचे दिवस अजून सुरू झाले नव्हते. पाटील आपल्याला “नाही” म्हणणार नाहीत अशी त्या लोकांची अपेक्षा होती. पाटलांनी गावासाठी इतकं केलं आहे हेही करतील असं सगळ्यांना वाटत होतं. सरळमार्गी विष्णु पाटीलही याला जवळजवळ बळी पडलेच होते.

विष्णु पाटलांशी चर्चा चालू असतानाच पाटलांचे एक तरुण सहकारी त्यांना खुणावत होते. पाटलांची त्यांच्यावर दृष्टी पडली. पाटील निर्णय घेऊन मोकळे होण्याच्या आधी जरा सावध झाले. पाटील निर्णय घेणार होते पण त्यांनी जरा सावकाश घ्यायचं ठरवलं. सगळी चर्चा झाली होती.

पाटील त्या मंडळींना म्हणाले की, “आम्हाला जरा वेळ द्या, तिथे जमीन कशी आहे काय आहे हे तपशील बघतो अन तुम्हाला निरोप धाडतो.”

“हो” अशा निर्णयाच्या अपेक्षेने आलेली मंडळी थोडेसे हिरमुसले होते पण निरोप येईल या अपेक्षेने त्यांचा धीर अजून सुटला नव्हता. चर्चा झाली अन मंडळी निघून गेले.

ती मंडळी निघून गेल्यावर पाटलांनी टोपे नावच्या त्या तरुण सहकार्‍याला “काय झालं?” असं विचारलं.

टोपे म्हणाले की, “मालक त्यांना जर ती जमीन दिली तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. न सुटणारी ब्याद ते कायमचे आपल्या गळी मारायचा प्रयत्न करत आहेत.”

पाटलांना अर्थ कळाला नाही, त्यांनी सविस्तर सांगायला सांगितलं. टोपे सुरू झाले.

मालक, एक तर जी जमीन ते मंडळी मागत आहेत त्याची आजची किम्मत सोन्याहून चमकदार आहे. त्यात आपल्याला त्यातून चांगलं शेतकी उत्पन्न येतं. ती जमीन जर त्या लोकांच्या ताब्यात गेली तर आपल्याला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्या जमिनीत मजूर लोकच राहतील कशावरून? ही लोक पैसे घेऊन कोणालाही तंबू ठोकून देतील अन रहा म्हणतील. त्या लोकांकडून पैसे घेतील. मजुरांना पुढे करून काही लोकांचा त्या जमिनीवर डोळा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही मालक.

पाटील अजूनही पुर्णपणे समाधानी नव्हते.

“ते म्हणाले ना पर की स्वस्त घर योजनेत या मजुरांना धाडू अन जमीन मोकळी करून देऊ.”

टोपे आता तावातावाने बोलू लागले. हो बरोबर आहे. पण ती योजना सुरू कधी होणार अन पूर्ण कधी होणार? त्यात ह्या सगळ्यांना घरं मिळणारच का? न मिळालेले लोक पुन्हा कुठं जाणार? आपली जागा सोडणार का? अन तेथे राहणारे मजूर भलतेच कोण निघाले तर? त्यांनी आपली सोन्यासारखी जागा सोडली नाही तर?

टोपेंनी अनेक व्यावहारिक शंका उपस्थित केल्या.

पाटील जरा अस्वस्थ झाले अन म्हणाले, “आपल्याशी या भागात अशी बेईमानी कोण करल असं वाटत नाई… अजून इतके वाईट दिस आले नाहीत…”

टोपे न राहवून म्हणाले, मालक जुने दिवस कवाच गेले अन नवे दिवस चांगले असतील याची कोण शास्वती? अन लोकशाहित सगळ्यांना बराबर मानतात… माफ करा मला… नंतर कायद्यापुढे आपलाही मुलाहिजा राखला जाणार नाही.

पाटील विचार करून म्हणाले, “मग कसं करायचं म्हंतुस???”

टोपे जराही न थांबता म्हणाले, “सरळ नाही म्हणून टाका.”

पाटील तोंड वाकडं करत म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी या भागासाठी काय नाही केलं, माझी वेळ आली तर मी कसा मागं फिरू, लोकात काय नाक राहील… आपली पाटिलकी नाही टिकणार मग…”

टोपे नुसते कपाळावर आठ्या आणून उभे होते.

शेवटी बराच मेंदू अन वेळ जाळल्यावर दोघांनी एक मार्ग काढला. शहराच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या अन जरा कमी किम्मत असलेल्या पाटलांच्या जमिनीवर त्या मजुरांनी राहावं.

त्या मंडळींना निरोप गेल्यावर ते लागलीच हजर झाली.

पाटलांचा निर्णय ऐकून ते अवाक झाले. पाटील असा निर्णय घेतील असं त्यांना वाटलं नव्हतं. पण पाटलांनी आपला नाईलाज असल्याचं सांगितलं.

मजुरांना कामाच्या ठिकाणापासून खूप दूर यावं लागेल अशी मेख काढण्यात आली. टोपेंनी यावर आधीच काम केलं होतं त्याप्रमाणे त्यावर पाटलांनी येण्या-जाण्यासाठी उपाययोजना सुचवल्या अन त्यातून रोजगार निर्मिती होईल असंही सांगितलं.

ती मंडळी मनापासून खुश नव्हती. पण पाटलांना थेट बोलताही येईना अन याचक म्हणून आले म्हणून जे पदरात पडेल ते घ्यावं लागत होतं. टंगळमंगळ करत ती मंडळी तयार झाली. काहीच नसल्यापेक्षा काहीतरी असणं बरं असा विचार त्यांनी केला असावा.

जमीन कोणती द्यायची, कशी द्यायची ही सगळी जबाबदारी पाटलांनी टोपे यांच्यावर सोपवली. टोपे विश्वासाचे होते. शिवाय शिकलेला माणूस. त्यांनी लागेल तितकीच जमीन आखून दिली. दिलेल्या जमिनीला संरक्षण भिंत उभी करून दिली जेणेकरून न दिलेल्या जागेत कोण घुसू नये. कोण राहणार, किती राहणार याची बारीकपणे नोंद करण्यात आली. दानधर्म पण व्यावहारिकपणे आणि चोख केला गेला. काम फत्ते झालं होतं.

 

बरीच वर्षे उलटली. पाटील आता थकले होते. नरखेड आता नटलं होतं, चारी दिशेने वाढलं होतं. राजकरणी, प्रशासन, सरकार यांच्यावर विश्वासाचे दिवस मावळले होते. जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या, अपेक्षा केली नसावी तितक्या वाढल्या होत्या. पाटलांनी पुढच्या पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती केवळ जमिनीच्या व्यवहारातून जमवली होती. त्याकाळी टोपे म्हणाले ते ऐकलं ते बरं झालं असं पाटलांना वाटत होतं. जी जमीन आधी मागितली होती त्या एका जमिनीवर पाटलांची गगनचुंबी इमारत उभी होती अन त्यांची शान वाढवत होती. जुना दौलतवाडा ढासाळत होता.

विष्णु पाटलांचा स्वभाव अजूनही बदलला नव्हता. शहर चारही बाजूंना वाढलं होतं. सरकारचं ‘लवकरच’ धोरण अजून सुरूही झालं नव्हतं. ज्या बाजूची जमीन मजुरांना दिली होती तिकडेही शहर मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्या जमिनीलाही मोठी किम्मत होती. पण ती जमीन आता पाटलांच्या ताब्यात नव्हती. मजुरांना दिली तेंव्हापासून त्यांनी त्या जमिनीवर पायही ठेवला नव्हता. त्यांना जे अपेक्षित नव्हतं तेच झालं होतं. तेथील मजूर केंव्हाच गायब झाले होते, त्यांनी इथे जमीन भलत्याच कोणालातरी विकली होती. तंबू तर सहा महिन्यात उडाले अन मग पत्र्याचे अन भिंतीचे पक्के घरं आले होते.

पाटलांना आता मनस्ताप, पश्चाताप होत होता. प्रश्न पैशाचा नव्हता, विश्वासाचा अन त्याच्या घेतलेल्या गैरफायद्याचा होता. जमीन पाटलांची, दान किंवा तडजोड म्हणून काही काळासाठी ती दिली मजुरांना. मजुरांनी परस्पर सौदा करून भलत्यालाच विकली.

पाटील हतबल होते. टोपे यांनी कष्ट करूनही आजूबाजूची जमिनीवर अतिक्रमण झालं होतं. पाटलांना क्लेश होत होते. टोपे यांना पाहिलं की पाटलांना ती जमीनच आठवायची. सगळी अवैध वस्ती असल्याने तेथे चांगले प्रकल्प उभा राहत नव्हते. आजूबाजूची जमीनही उपयोगी पडत नव्हती. तेथे राहणार्‍या परक्या लोकांची मगरुरी होती ती वेगळीच. पाटलांनी एकदा पोलिसात तक्रारही केली अन जमीन परत मिळवण्याचे प्रयत्नही केले पण सगळं निष्फळ गेलं. लोकशाही नांदत होती. जमीन दिली नाही तर पाटिलकीला डाग लागेल या भीतीने विष्णु पाटलांनी ती जमीन दिली होती, पण जमीन दिल्याने तोंडघशी पडून पाटीलकीला अन त्यांच्या दरार्‍याला डाग पडतोय याची खंत त्यांना होती.

पाटील बरेच थकले होते. मरायच्या आधी काहीही झालं तरी जमीन परत मिळवायची असा प्रण त्यांनी केला होता. लोकशाहीत लवकर काहीच होत नसतं याचा शोध उशिरा लागला होता.

पाटलांनी वकिलांची फौज उभी केली अन जमीन मिळवण्याचे प्रयत्न वेग धरू लागले. पाटील घराण्याचं रक्त त्यांना दाखवून द्यायचं होतं.

एक दिवस उजाडला अन पाटलांचा आनंद गगनात मावेना. न्यायालयाने निकाल दिला की पाटलांनी मोठ्या मनाने दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण हे न्यायविरोधी आहे, पाटलांना ताबडतोप जमीन परत मिळावी.

आता पाटील थांबणार नव्हते. विष्णु पाटील पेटले होते. पाटलांनी सगळी शक्ति पणाला लावली. ओळखी-पाळखीच्या सर्व मोठ्या नेत्यांना हाताशी धरलं. पोलिस अन स्वतःची शंभर-एक पहलवान लोकांची फौज घेऊन पाटील त्या जमीनिसमोर उभे राहिले. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्या जमिनीला पाटलांचे पाय लागले होते. जमीनही शहरून उठली होती. जमिनीवर अवैधपणे राहणार्‍या लोकांचा धिंगाणा सुरू होता. मारामारी, बाचाबाची सुरू होती. अनेकांनी पाटलांना धीर धरा, शांतपणे घ्या, मागे व्हा असं सांगितलं. पण पाटलांनी मागे होण्याचं साफ नाकारलं. टोपे स्वतः सगळं समोर होऊन आवरत होते.

लोकांना बाजूला करून घरं पाडायला सुरुवात झाली होती, पण सीमेंट-विटाचे घर हातांनी पडेनात. शेवटी बुल्डोजर आला. लोक अजून खवळले. काही येऊन बुल्डोजर समोर आडवे झाले. पाटलांना राहवलं नाही. मेंदू तप्त झाला होता अन रक्त सळसळत होतं. झालेल्या विश्वासघाताने अन इतक्या वर्षाच्या प्रतिक्षेने ते चवताळून उठले. पाटील बुल्डोजरकडे धावले. हातातील काठी फेकून दिली. पाटील ह्या वयात स्वतः बुल्डोजरवर चढले. सगळे त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघू लागले. अंगावर शहारा आला. लोकंही घाबरली. त्यांचा रुद्रावतार प्रथमच दिसत होता.

पाटलांच्या पवित्र्याने आता समोरचा विरोधही मवाळ झाला.

पाटलांनी डरकाळी फोडली अन बुल्डोजर घरांवर फिरू लागला. बघता बघता अनेकांचे संसार कोसळले. लोकं हाय देऊ लागले. पाटलांना शिव्या देऊ लागले. पण गावातील लोकांनी पाटलांच्या हिमतीला दाद दिली होती. मोठ्या मनाने केलेल्या मदतीला लोकांनी गैरफायदा घेतला होता. चीड होती. पाटलांनी सगळी घरे जमीनदोस्त केली.

जमीन मोकळी झाली.

ती पाटलांची जमीन होती. पाटील बराच वेळ तेथे उभे राहून मोकळ्या अन स्वतःच्या मालकीच्या जमिनीकडे अभिमानाने पाहत होते.

आज प्रथमच नरखेडने विष्णु पाटलांचं असं रूप पाहिलं होतं. पाटलांचं खरं रक्त समोर आल्याची चर्चा सुरू होती. अनेकांना पंढरी पाटलांची आठवण झाली. शांत असणारे पाटील पेटलेले पाहून अनेक जणांना कौतुक वाटत होतं. उदो उदो चालू होता.

दुसर्‍या दिवशी सर्व स्थानिक वृत्तपत्रात विष्णु पाटलांना विजयी घोषित केलं होतं अन नायकाच्या रूपात दाखवलं होतं.

एका वृत्तपत्राची पहिल्या पानावर बातमी होती, “पाटील पेटले!!!”

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in

Some More Stories…. अजून कथा वाचा… 

खिडकी: भाग १

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!