जोकर – भयकथा : भाग २

जोकर – भयकथा : भाग २

मराठी कथा  ||  भयकथा  ||  Horror Story   ||  Fear Factor  ||  भय  ||  बागेतील शापित जोकर ||  अतृप्त

सकाळी जाग आली तेंव्हा बायको माझ्यावर प्रचंड संतापली होती.

उठल्यावर माझं डोकं खूप दुखत होतं. मळमळ होत होती. बायकोने लिंबू-पाणी माझ्यासमोर आणून आपटलं अन बडबड सुरू केली.किती प्यावं माणसाने? जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी. रात्रभर ओकत होतात. वाट्टेल ते बरळत होता. ड्यूटी सोडून असं पिऊन पळून आलात तर आहे तीही नोकरी जाईल. मग राहावं लागेल उपाशी. काहीतरी वाटू द्यात. उद्या साहेबाने काढलं कामावरुन तर कुठे जाणार तोंड घेऊन. काय अवतार होता रात्री… बंद करा हो घेणं आता तरी…

तिची कटकट चालू असताना मला रात्रीचा प्रसंग हलकासा आठवला. मला तो स्वप्नाप्रमाणे वाटत होता. एखाद्या भीतीदायक स्वप्नाप्रमाणे! ते खरं होतं की भास मला कळत नव्हतं. पण त्याचं ते विचकट खिदळणे अजूनही कानात घुमत होतं अन त्यानेच माझी शुद्ध आली… मी पुन्हा घाबरलो अन बायकोला सगळं एका दमात सांगितलं.

तिने ते ऐकून घेतलं अन मलाच शिव्या देत म्हणू लागली, तुमचं दारू घेणं काही आजचं नाही मला. आणि आता असल्या थापा का मारताय??? नोकरी सोडायचा विचार आहे का? मग भागणार कसं हो? मी तिला खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला पण तिने काही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मीही प्यायलेलो होतं हे खरं होतं. कारण आठवड्यातून दोन-तीनदा पिऊनच मी रात्रीची ड्यूटी करायचो. पण काल जे झालं ते खरं होतं याची मला खात्री होती.

मी चटकन उठलो अन तडक साहेबांकडे गेलो. मी रात्रीची ड्यूटी बदलून सकाळची वेळ देण्याची मागितली. त्यांनी कारण विचारलं. माझी इच्छा नव्हती पण हो-नाही करत मला सगळं खरं सांगावं लागलं अन साहेबही भयंकर संतापले.

संजय एकतर दारू पिऊन ड्यूटीवर येता. गरीब माणूस म्हणून मी कधी काही म्हंटलं नाही. पण असला मनमानी कारभार मला नका सांगू. सकाळची वेळ पाहिजे म्हणून असल्या बाता काय मारता… आणि हेबघा, असली कथा जर बाहेर कुठे ऐकवलीत तर माझ्याइतका वाईट माणूस नाही कोण. मला असल्या अफवा नकोत… चार पैसे वाढवून घेण्याचे नाटकं आहेत ही हे काही मला समजत नाही का? हे जर कुठे सांगितलात तर तुमची आहे ती नोकरी तर जाईलच पण गावात दुसरीकडे कुठेही काम मिळणार नाही याची सोय करू शकतो मी… गपचूप काम करा… अन जरा कमी ढोसत चला रात्री… नाहीतर मी तुमच्या मानगुटीवर बसेन…

साहेबांनी माझा पानाउतरा केला. तसं रेकॉर्ड खराब असल्याने माझ्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. पण मीही मग जरा गोंधळून गेलो. काल झालं ते खरं होतं की अति दारू पिल्याने झालेला भास… पण आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. दारू पिल्यावर स्वप्नातही असला प्रकार कधी दिसला नव्हता. शेवटी विचार करून-करून मेंदू थकून गेला.

नंतर मी दिवसा बागेत जाऊन आलो. त्या जोकरकडे निरखून पाहिलं… दिवसा तरी तसं काही जाणवलं नाही. तेथे सकाळच्या ड्यूटीवर असलेल्या हरदेवला विचारलं, काही गडबड वगैरे? तो नाही म्हणाला. ह्या पुतळ्याकडे लक्ष ठेवा महाग आहे, असं मी सहज म्हणालो अन निघालो.

सूर्याच्या प्रकाशात त्या जोकरचं विदूषकी तोंड फारच अवघडल्यासारखं वाटत होतं.

त्या रात्री मी अतिशय सावधपणे कामावर जायचं ठरवलं. दारूला तर स्पर्शही केला नाही, शिवाय जवळ हनुमान चाळिसाची लहानशी पुस्तिका घेतली अन एक रुद्राक्ष माळही. साडेदहा वाजता मी त्या बागेच्या गेटच्या आत पाऊल टाकलं. मन थरथर कापत होतं. काय होईल ह्या भीतीने हाता-पायाला घाम सुटला होता. गेल्या-गेल्या पुतळ्याकडे बघितलं. तो सामान्य होता. दिवसापेक्षा थोडासा भेसूर वाटत होता इतकच.

मनात भीती होतीच, पण सत्य की भास यात अडकल्याने मीही जरा साशंक होतो.मी रात्रभर अतिशय सावध होऊन फिरत होतो. स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता असल्याने डोळ्यात तेल अन कानात प्राण आणून मी संपूर्ण बाग फिरत होतो. पण माझं पूर्ण लक्ष त्या जोकरच्या पुतळ्याकडे होतं. अधून-मधून मी त्याच्याकडे एकटक बघायचो.

वार्‍याने पानांची साधी सळसळ झाली तरी काळीज थरथर कापायचं अन पोटात धस्स व्हायचं. पक्षांचे आवाज अन वाळलेल्या पानांच्या कचर्‍यातून सरपटणार्‍या प्राण्यांमुळे होणारे आवाज मनात नको नको त्या शंका उपस्थित करायचे. पण मला तेंव्हाही वाटत होतं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेऊन आहे आणि संधी मिळताच ते माझ्यावर झेपावेल.

हातात हनुमानचाळिसा घेऊन मी फिरत होतो. गळ्यात रुद्रक्षांची माळही होती. त्या रात्रीच्या घटनेने किंवा भासाने मी कधी नव्हे ते देव-धर्माच्या वाटेला गेलो होतो. ती संपूर्ण रात्र कडेकोट जागून पहारा देण्यात गेली. काहीच झालं नाही. तो जोकराचा पुतळा तसाच्या तसा होता. पण त्याच्या डोळ्यात बघितलं की ते हिरवट गहिरे डोळे अंगाचं पाणी-पाणी करायचे.

नंतरचे काही दिवसही सामान्य पण दडपणातच गेले. रात्रभर घाबरत अन अखंड सावध राहण्यात वेळ निघून जायचा. सकाळची सोनेरी सूर्यकिरणे मदतीला घवून आलेल्या देवदूतांप्रमाणे वाटायची. असं वाटायचं जणू काही उंदीर-मांजर पकडापकडीचे खेळ चालू आहेत. तो माझ्या मागावर आहे आणि काहीतरी हेतु ठेऊन आहे असं वाटायचं. मधूनच त्याचं ते ठेंगणं रूप, तो अवतार, तो फाकलेला जबडा आठवायचा अन मन विषन्न व्हायचं. मनातून सतत असं वाटायचं की ते जोकर माझ्या जीवावर उठलं आहे.

मनातील भीती जात नसल्याने मी दुसरी नोकरी शोधत होतो. दुसरी नोकरी मिळताच येथून कायमची सुटका करून घेता येणार होती. आयुष्यात इतक्या सावधपणे नोकरी कधीच केली नसेल.

मध्यंतरी एका रात्री बागेतून काठी वाजवत फिरत असताना एक प्रसंग घडला. मी ठक__ठक अशी काठी वाजवत संपूर्ण बाग फिरत होतो. काठीचा आवाज येताच एक मांजर समोर येऊन उभं राहिलं. त्या काळ्या रात्री काळंभोर मांजर समोर आलं. बागेच्या बाहेरून कुत्र्यांचे मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. मी मनातून खूप घाबरलो. त्या मांजराचे घारे-हिरवे-पिवळे डोळे त्या रात्री खूप भीतीदायक वाटत होते. ते मांजर माझ्या पाठीमागे फिरत होतं. मी जात होतो तेथे ते यायचं. मी त्याला हाकललं तरीही चित्रविचित्र आवाज करत, गुरगुरत ते माझ्यासोबत चालायचं. मग त्या गर्द झाडीच्या वाटेतुन, ट्रॅकवरुन जात असताना मधूनच लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. ते हसणं सामान्य वाटत नव्हतं. कोणीतरी मला चिडवत आहे, माझ्यावर संतापून आहे असं ते हास्य होतं. मी हनुमान चाळिसा काढून मोठ्याने वाचू लागलो. तो आवाज एक-दोनदाच आला.

त्या रात्रीही माझी गाळण उडाली होती. पण खात्री पटली की ही जागा आता शापित झाली आहे, पहिलेसारखी राहिली नाही. ते जोकर याला कारणीभूत आहे का दुसरं काही, ते मला समजत नव्हतं. बागेत कोण हळूच एखादा मुडदा गाडला असेल, किंवा पलीकडे वाहणार्‍या नाल्यात तर नेहमी काहीतरी मेलेलं असतच; कदाचित त्याचा आत्मा भटकत असेल, असे नाही नाही ते विचार मनात येत.

तो हसण्याचा आवाज ऐकून मला काहीतरी आठवलं अन मी धावत त्या जोकरच्या पुतळ्याकडे गेलो. पुतळा जागेवर आहे का हे बघायला. मी लांबूनच तो पाहणार होतो. पुतळा तेथेच होता. पण आज उत्तररात्रीच्या शुष्क प्रकाशात तो पुन्हा भयावह वाटत होता. त्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेला लहानसा पिवळ्या दिव्यामुळे त्या पुतळ्याची सावली समोरच्या बाजूला पडत होती. ती सावलीही मला खूप भयानक वाटली. खासकरून त्याची हातात हात घेतलेली कृती अन चेहर्‍यावरील हिशेबी भाव यामुळे तो जोकर विनोदी न वाटता खूप बेरकी, घातकी अन कपटी वाटायचा. मला त्याचा खूप राग आला. मी दूर उभा होतो. त्याला चार शिव्या हासडून मी पुन्हा दुसरीकडे गेलो. तशा थंडीत, रात्रीच्या वेळी अन आडवाटेला कसलाही मानवी आवाज हा अशक्यच होता. अन तो आवाज आला की अंगावर काटा यायचा.

दूरवरून येणारे गाड्यांचे आवाज काने तृप्त करत अन मानवी वस्तीची खूणगाठ सांगत. पण कितीही केलं तरी मी एकटाच तेथे असायचो ज्याचं दडपण मला यायचं.

त्या रात्रीचा लहान मुलाच्या हसण्याच्या आवाजाचा प्रसंग मला अजूनच सावध करून गेला. मी आता अखंड सावधपणे फिरायचो. दरम्यान, मी त्या जोकरची इकडे-तिकडे चौकशी केली तेंव्हा समजलं की तो जोकराचा पुतळा एका सर्कसचा आहे. सर्कसचा मारवाडी मालक कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करून मेला अन त्याच्या एक-एक वस्तु लिलाव करून विकून टाकल्या. त्यात हा पुतळा तेथून कोणीतरी विकत घेतला अन ह्या उद्यानाला गिफ्ट म्हणून दिला. त्या पुतळ्याचा इतिहास फार काही बरा नव्हता. आणि ही गोष्ट मला अजून भयभीत करायला पुरेशी होती.

दोन-चार दिवसात मला दुसरीकडे नोकरी लागणार होती. बँकेच्या बाहेर वॉचमन म्हणून काम मिळेल अशी शक्यता होती. पगारही बरा होता. जीवाला चोर-दरोडेखोर यांपासून धोका असला तरी कायमची दहशत पाठ सोडणार होती. कसेबसे चार-सहा दिवस काढावे अन मोकळं व्हावं असं ठरवलं.

त्या रात्री मी शांतपणे उद्यानाच्या गिरट्या घालत होतो. उजव्या हातात काठी, डाव्या हातात हनुमानचाळिसा होती. मी शांतपणे फिरत असताना अचानक पोटात कळ लागली. आज पाहुणे आले म्हणून घरी बोकड कापलं होतं. चापून खाल्लं! पण आता फिरताना पोटात कळ येत होती. मी कंट्रोल करत फिरत होतो पण काही केल्या कंट्रोल होईना. शेवटी बागेच्या कोपर्‍यात असलेल्या स्वच्छतागृहात जायच्या हेतूने मी तिकडे वळलो. घाईघाईत तिकडे गेलो. पोटातून जोराची घंटा वाजत होती. मग मी धावतच तिकडे गेलो. स्वच्छतागृहातील अस्वच्छता कपड्यांना लागू नये म्हणून मी गडबडीने वरचे कपडे काढून आत गेलो.

मोकळं होऊन बाहेर आलो तेंव्हा समोर काढून ठेवलेले कपडे कोठेच दिसेनात. मग लक्षात आलं की मी हातातील बॅटरी, काठी, हनुमानचाळिसा पुस्तिका अन गळ्यातील रुद्राक्ष माळ काढून ठेवली होती. गडबडीत कसलच भान राहिलं नव्हतं. ते सगळं कुठेतरी गायब आहे म्हणजे काहीतरी गडबड होती. धोका होता? मन बेभान होऊन धावू लागलं. मी आत गेल्यावर कोणीतरी येऊन गेलं होतं. कोण? इतक्या रात्रीचं कोण? खरं तर उत्तर पहिल्या क्षणाला मनात आलं होतं पण मन-मेंदू ते मानायला तयार नव्हते.

रात्रीचे बारा वाजून गेले असावेत. मी कान टवकारून प्रत्येक ध्वनी ऐकू लागलो. अंधारात डोळे रोखून काहीतरी शोधत होतो. मला समजलं होतं की हे सामान्य नाही. तो जोकरच हे करत असणार. माझ्या मनातील शंका क्षणात खरी ठरली. आसमंतातून दाही दिशांतून विक्षिप्त हसण्याचा आवाज येत होता. मला तो आवाज परिचित होता! पहिल्या रात्री तोच आवाज माझा पाठलाग करत होता. अंगावर शहारा आला. आता काहीतरी अघोरी होणार हे मी जाणलं होतं. माझ्या डोळ्यांतून पाणी येत होतं. मी धावायचा प्रयत्न करणार पण पायात अवसानच नव्हतं. समोरच्या झाडीतून, अंधारातून एक आकृती येताना मला दिसली. मी एकटक तिकडे बघत होतो. फार विलंब लागला नाही.

ती आकृती माझ्याकडे हात पसरून म्हणाली, मी आलो… आज तर यावच लागेल… चल…तोच… जोकर… त्या रात्री दिसलेला… दुर्दैवाने तो भास नव्हता… तोच बुटका देह, विद्रूप चेहरा, रक्ताळलेला, लांब जबड्यातून बाहेर आलेले पिवळसर सुळे, रुंद कपाळावर गडद काळ्या भुवया अन तीच घातकी हिरवट नजर… माझी भंबेरी उडाली… तो विचकट हसत माझ्याकडे येत होता.

मी स्वतःला सावरत पळू लागलो तसा तो अजूनच आनंदाने अन विक्षिप्त हसत होता. तो शांतपणे माझ्यामागे चालत येत होता. मी त्या उद्यानात सैरावैरा धावत होतो.

सगळे दिवे अचानक बंद झाले. आकाशातून येणारा प्रकाशही नव्हता. आभाळ दाटलं होतं. थंडगार वारं अंगावरच्या घामाला स्पर्शून जात होतं. मागे वळून बघितलं तर त्याचे ते लाल मोजे घातलेले हात लांब-लांब होत माझ्याकडे येत होते. मी ठेचकळत होतो, धावत होतो पण थांबत नव्हतो. समोर झुडुपा-झाडांची गर्दी होती. मी त्या कोपर्‍यात जाऊन बसलो. तोंड दाबून रडत होतो.

तो हसण्याचा आवाज अचानक थांबला. मी काही क्षण शांत बसलो अन मान बाहेर करून अंदाज घेऊन लागलो तेंव्हा मला काहीच दिसलं नाही. अचानक पाठीमागून, त्या झुडुपांच्या अंधारातून एक थंडगार हात माझ्या डोक्यावर आला अन पुन्हा तो थंडगार आवाज,

‘तू वाचू शकत नाहीस आज… माफ कर… चल…’

तो माझ्या बाजूलाच होता. चेहर्‍यावर अभद्र भाव असले तरी तो चेहरा हसरा ठेवत होता. त्याचे हिरवट डोळे माझ्यावर गाडले गेले होते. त्याला इतक्या जवळून पाहून माझी वाचा बसली. त्याचा तो थंडगार हात माझ्या डोक्यावरुन खांद्यावर अन गळ्याकडे सरकू लागला तसा मी सारी ऊर्जा एकवटून मोठ्याने किंचाळत बाहेर पडलो. माझा आवाज बाहेर जाऊन उपयोग नव्हता. मदतीला कोणीच येणार नव्हतं.अंधाराच्या उदरात माझे दुबळे पाय वेडेवाकडे पडत होते अन तो शापित जीव माझ्यामागे लागला होता. माझी छाती भरून आली. मी अडखळत एका जागेवर जाऊन पडलो. खूप दम लागला होता. आजूबाजूला मिकी माऊस, डॉनल्ड डक आणि इतर बाहुले-पुतळे दिसत होते. मी चक्रवलो. मती गुंग झाली. मी जोकरचा पुतळा असायचा तिथे पोचलो. पण त्याच्या जागेवर कोणीच नव्हतं. बागेतील दिवे बंद-चालू होऊ लागले. मेंदू ब्लॉक झाल्यासारखा होत होता. मागून दोन हात माझ्या मानेभोवती आवळले गेले. त्या थंडगार हातांना मी ओळखलं. हे त्याचेच होते. जोकर…

जोकर!!!

हळूहळू तो फास आवळत गेला. ते विक्षिप्त हास्य कानात घुमू लागलं. काहीतरी तीव्र माझ्या पाठीत घुसलं. कदाचित त्याचे दात असावेत… त्याचा जबडा माझ्या शरीरावर सूरीसारखा फिरत होता. अखेर मृत्युने मगरमिठी मारली होती. त्या दिवशी केवळ ईश्वराच्या दयेने वाचलो… नंतरही एकदा वाचलो… पण शेवटी काळ आला होता…

हळूहळू शरीर बधिर होत गेलं, तरीही त्याच्या विक्षिप्त हसण्याचा आवाज कानात घुमत होता आणि ते हिरवट गहिरे डोळे नजरेसमोर दिसत होते. ते थंड हात लक्षात होते. शेवटी अंधाराने घेरलेली प्राणज्योत मालवली.

देहाची पीडा संपली होती. पण आत्म्याचे हाल अजून बाकीच होते. मी त्या पुतळ्याच्या, त्या निर्जीव नसलेल्या पुतळ्याच्या आत होतो. एका अंधार्‍या जगात. तेथे सर्कस चालू होती. अतृप्त आत्मे, काही जबरदस्तीने कैद केलेले तर काही स्वेच्छेने तेथे होते. एक मारवाडी त्यांना नियंत्रित करत होता. त्याची नजर मला खूप हिशोबी अन बेरकी वाटली. तो माझ्याकडे बघून विक्षिप्त हसत होता. रात्रीच्या गडद अंधारात मी त्या पुतळ्याच्या आतून माझाच मृत पडलेला देह बघत होतो. रक्ताळलेला! माझा आत्मा त्या सजीव शरीरातून ह्या निर्जीव नसलेल्या पुतळ्यात येऊन पडला होता. मीच त्या जोकराच्या अंतर्धानात विसावलो होतो!!! आता ह्या जगाची चाकरी सुरू झाली होती!!!

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in

पहिला भाग…

जोकर भाग १ – भयकथा

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!