मोहजाल- भयकथा

मोहजाल- भयकथा

मराठी भयकथा  || प्रणयकथा लिहिता लिहिता भयकथा घडली  ||  Marathi Short Story  ||  रात्र आरंभ  || अतृप्त आत्मा  || 

 

खूप रात्र झाली होती. दोन अडीच तरी वाजले असावेत. खरं तर वाटेत बस बिघडल्याने मला खूपच उशीर झाला, अन्यथा दहा-अकरा वाजताच पोचलो असतो. बसमधून उतरल्यावर थंडीची तीव्रता आणखीनच जाणवू लागली. बस स्टँड तर अक्षरशः ओस पडलेलं होतं. बसऐवेजी तिथे जनावरेच दिसत होती. दोन चार लोकं इकडे-तिकडे दिसत होती. मध्यम आकार व लोकसंख्या असलेलं शहर असूनही फार गर्दी नसल्याने मला विचित्र वाटलं.

ह्या गावात पहिल्यांदाच आलो होतो. मित्राच्या लग्नाचं निमित्त. तो खूप सांगत होता, कितीही उशीर झाला तरी फोन कर घ्यायला येतो किंवा कोणालातरी पाठवतो, पण उद्याचं लग्न असल्याने सर्वजण गडबडीत असतील असं मला वाटलं. शिवाय इतक्या रात्री त्याला फोन करणं बरोबरही वाटत नव्हतं त्यामुळे मी काही त्याला फोन लावला नाही. थेट मंगल कार्यालयावर जायचं होतं. मंगल कार्यालयाचं नाव व पत्ता व्यवस्थित घेतला होता आणि त्याने location ही whatsappवर पाठवलेलं होतं. शिवाय मंगल कार्यालय map नुसार फक्त दीड-दोन किलोमीटर दाखवत असल्याने चालत जायचं ठरवलं.

बस स्टँडच्या गेटजवळ वॉचमन शेकोटी पेटवून बसला होता. अजून दोन लोकं होती तिथे. मीही शेकोटीजवळ गेलो आणि जरा अंग शेकून घेतलं. वॉचमनशी बोललो तर तो म्हणाला ते मंगल कार्यालय जवळच आहे, पंधरा मिनिटांत चालत जाता येण्यासारखं. मलाही ते ऐकून बरं वाटलं. वॉचमन ने बाजूच्या चहा टपरीवाल्याला जागं केलं. आम्ही सिगार फुकून, चहा वगैरे घेतला. वॉचमन मोफतचा चहा घेऊन खुश झाला आणि चहा, सिगार आणि वॉचमनचेशी बोलून माझाही प्रवासाचा शीण निघून गेला. त्याला धन्यवाद देऊन मी त्याने सांगितलेल्या वाटेने निघालो. सोबत map मदतीला होताच.

Image result for चुड़ैल का फोटो

          येथे थंडी प्रचंड होती. त्यामुळे दूरवरचे गूढ वाटणारे आवाजाही ऐकू येत होते. अंगाला बोचणारी थंडी आणि स्थिर वातावरण!

मी स्वतःशीच बोलत चाललो होतो. उद्याचा दिनक्रम व इतर बाबी डोक्यात मांडत होतो. समोर एक चिंचोळी वाट दिसत होती. मी map तपासाला; ती लहानशी वाट ओलांडून गेल्यावर मोठा रस्ता लागणार होता आणि त्या रस्त्यावरच कार्यालय होतं. मी त्या वाटेवरून जाऊ लागलो. दोन्हीही बाजूंनी जुन्या इमारती होत्या. रंग उडालेल्या आणि पोपडे दिसणार्‍या भिंती, इकडून तिकडे गेलेल्या विजेच्या वाहिन्या,cables, आधीच अरुंद रस्ता अन त्यावर दोन्हीही बाजूंनी वाहने लावलेली, फुटलेल्या जलवाहिन्यांमधून उखडलेल्या रस्त्यावर वाहणारं पाणी अशा स्थितीमुळे मला तो रस्ता खूपच नकोसा वाटत होता. कदाचित हा शॉर्ट कट असावा. पण इथून लवकर निघावं वाटत होतं. मी झपाझप पाऊले उचलत होतो. एक कुत्रं रस्त्याच्या मधोमध उभं राहून विनाकारण एकटच विव्हळत होतं.

मला आता भीती वाटत होती. ह्या रस्त्याने का आलो आहे असं वाटू लागलं. एकतर अनोळखी गाव अन अशी अवेळ. भलतं संकट आलं तर काही निभाव लागणार नव्हता. वाट अडवून जर कोणी पैसे वगैरे लुबडायचा प्रयत्न केला तर काही खैर नव्हती. मी एकदा मागे वळून बघितलं. फक्त काळोख पसरला होता. पलीकडचं टोकही व्यवस्थित दिसत नव्हतं. एखाद्या भुयारातून जात असल्यासारखं वाटत होतं. मी अस्वस्थ होऊ लागलो. माझी नजर आजूबाजूच्या इमारतींवर गेली. एका कुजकट इमारतीकडे माझं लक्ष स्थिरावलं. त्या इमारतीच्या बाल्कनीत एक खिडकी होती, अर्धवट फुटलेली. मी त्या खिडकीकडे बघत पाऊले उचलत होतो तितक्यात एक वेगळीच गहिरी, अनाहूत चाहूल लागली. मन भकास झालं. अंगात थंडी भरून आली. मी त्या खिडकीकडे बघत होतो आणि एक विक्षिप्त चेहर्‍याची बाई तेथून टक लावून माझ्याकडे बघत होती. पिवळसर चेहरा अन काळेकुट्ट डोळे. विखुरलेले केस अन अन… तिला तोंडच नव्हतं… भूत-पिशाच्च-हडळ-डाकीण-आत्मा-प्रेत असे शब्द डोक्यात घुमू लागले. मी डोळे फाडून त्या विद्रूप चेहर्‍याकडे बघत होतो. हृदयाची धडधड वाढली होती अन शरीर मात्र बधिर पडलं होतं. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता. ती हिडीस आकृती तिच्या काळ्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक बघत होती. त्या आकृतीने हात उचलला अन मला प्राणांतिक भीती वाटू लागली. बास!! काळ जणू थांबला होता. त्या खिडकीच्या आतून त्या आकृतीने आपले अभद्र हात बाहेर काढले अन ते माझ्याकडे येत आहेत असा भास मला होत होता. मघाचं ते कुत्रं मोठयाने ओरडत होतं. माझ्या पायात त्राण आले. मी भानावर आलो. हातातील बॅग टाकून मी किंचाळत पळत सुटलो. मागून कोणीतरी पाठलाग करतंय, मला ओढत आहे असं वाटत होतं पण मी धावत होतो. रस्त्याच्या जवळ जात होतो, त्या वाटेवरून दूर.

बराच धावल्यानंतर मी थांबलो. सुटलो म्हंटलं स्वतःला. त्या आठवणीनेही अंगावर काटा आला. मला धाप लागली होती. मी दम खाऊन समोर बघितलं… पुन्हा तीच वाट!!!!

मला समजलं, खेळ आत्ता तर सुरू झालाय. आता कसलीच सुटका नाही. जी भीती माणसाला अगदी लहान वयापसून सतावत असते ती आज माझ्यासमोर उभी टाकली होती. अज्ञाताची भीती असते, पण त्या अज्ञातात जे अगम्य, अघोरी शक्ति लपलेली आहे त्याची जाण मला होत होती. एकांतात असताना माणूस ज्या भीतीने अर्धमेला असतो त्या भीतीचं वास्तव माझ्या डोळ्यासमोर उभं होतं. फक्त ऐकीव असलेल्या घटना आज माझ्यासोबत घडत होत्या. मृत्युपेक्षा भीती ही वरचढ असते. भीतीला कधीच मृत्यू नसतो. जगात जाणिवा, संवेदना किंबहुना सजीव जोपर्यंत आहे तोपर्यंत भीती अमर्त्य असणार!

मी मागे वळून बघितलं. मागेही तीच वाट होती आणि पुढेही तीच वाट. आता मृत्युने मला कचाट्यात पकडलं होतं. भयभीत झालेला मी आता फक्त शरणार्थी म्हणून उभा होतो. कुठल्याही बाजूने मृत्यू आता माझ्यावर झडप घालायला सज्ज होता. पण त्या अपेक्षित मृत्युचा चेहरा विद्रूप अन पछाडलेला असू नये असं वाटत होतं. वाघाच्या पिंजर्‍यात बकरीला सोडावं तशी अवस्था झाली होती माझी.

थरथरत्या शरीराने मी पुढे चालू लागलो. आजुबाजुने अनेक विखारी नजारा मला बघत आहेत अशी जाणीव तीव्र होत होती. हळूहळू मेंदूवर कसलीतरी नशा चढत होती.

मी पुन्हा त्या इमारतीजवळ पोचलो. वर बघायची माझी हिम्मत होत नव्हती, पण मान आपोआप त्या दिशेने वळाली. ती बाल्कनी आता स्वच्छ होती. तिथे बल्बचा मंद पिवळसर प्रकाश पसरला होता. त्या बाल्कनीत एक अतिशय सुंदर, सुरेख अन मादक स्त्री ग्रीलला रेलून उभी होती. अंगावर फिक्कट निळ्या रंगाचा गाऊन दिसत होता. अतिशय गोरी. लालबुंद ओठ लांबूनही दिसत होते. छान, मोठे हरिणीसारखे पण मोहक डोळे. ते रूप बघून मी भारावून गेलो. असं सौंदर्य मी उभ्या आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं. ऐन तिशीतील ती स्त्री अतिशय कामुक नजरेने माझ्याकडे बघत होती. ती जरा फिरली अन तिच्या देहाचा घाटदार डोलारा मला दिसत होता. तिच्या कमरेवरून अन तिरकस व समोर आलेल्या वक्षांवरून माझी नजर हटत नव्हती. मन आक्रोश करत होतं. ती स्त्री हसून मला बोलावत होती. मनातल्या मनात मी तिचं चुंबन घेऊन तिला बाहुपाशात घेतलंही होतं. ऐन तारुण्यात अशी संधी मी सोडणार तरी कशी!! मी तिच्या भेटीसाठी आसुसलो होतो. तिच्या माझ्या मिलनाचे चित्र मी मनात रंगवलं होतं.

माझं माझ्या शरीरावर काहीच नियंत्रण राहिलेलं नव्हतं. हा सगळा आभासी खेळ आहे हे मेंदूला कोण सांगणार?त्या शक्तीच्या विवरात मी अडकलो होतो. त्या मादक स्त्रीकडे पडणारं प्रत्येक पाऊल मला मृत्युच्या दलदलीत ओढत होतं. माझं भक्षण करून त्या शक्तीला कदाचित स्वतःच्या अस्तित्वाचं वलय वाढवायचं असेल किंवा माझ्या शरीरातील रक्ताचा थेंब न थेंब प्राशन करून ती अतृप्त आकृती आपली भूक भागवू इच्छित असेल. माझं काय होणार हे अघोरी, हिडीस आकृतीने आधीच ठरवलेलं असणार. पण माझ्या वेदनादायी मृत्युशिवाय त्या आकृतीला आपलं इस्पित साध्य करता येणार नव्हतं हेही निश्चित. त्या विक्षिप्त प्रेतात्मा आकृतीला मी पाहिलं तेंव्हाच त्या आकृतीने मला जाळ्यात ओढायचा प्रयत्न केला असणार, पण तिच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर मी निसटतो आहे हे पाहून कदाचित मला चकव्यात अडकवण्याचा खेळ त्या शक्तीने केला. माझं शरीर आणि मेंदू तर त्या शक्तीने आपल्या वशात केलं होतं.

मी त्या स्त्रीच्या देहाच्या मोहात हळूहळू त्या दिशेने सरकत होतो. माझी पाऊले त्या इमारतीच्या आत पडत होती. एका कुजकत लाकडी जिन्यावरून मी पहिल्या मजल्यावरील त्या खोलीकडे जात होतो जिथे ती कामुक स्त्री होती. मला न रस्ता माहिती होता न तिथे पुरेसा प्रकाश होता; तरीही मी त्या दिशेने जात होतो. कारण माझ्या मेंदूवर प्रभावी असलेली ती शक्ति मला स्वतःकडे ओढत होती. त्या जुनाट घाणेरड्या जिन्यावरून जाताना, विश्वाच्या एका पोकळीतून दुसर्‍या पोकळीत प्रवास करतोय की काय अशी पुसटशी जाणीव मला होत होती. मागून क्षणभर कसलातरी आवाज आला जो माझी पाऊले थांबवत होता, पण तो लागलीच तो लोप पावला.

मी त्या खोलीसमोर उभा होतो. ती फिक्कट निळ्या गाऊनमधील मस्त स्त्री समोर उभी होती. मला बघताच ती शांतपणे हसत होती. त्या हास्यात कसलाही लाजरेपणा किंवा ओढ नव्हती; ते अतिशय हिशोबी अन कुत्सित हास्य होतं. काहीतरी जिंकल्याच्या आविर्भावात असतात तसं. माझ्या घशाला कोरड पडली होती. शरीरात मुंग्या धावत होत्या. कधी एकदा तिच्यावर तुटून पडू असं होत होतं; पण मेंदूतील कुठलातरी भाग अजूनही जागृत असावा जो माझे पाय त्या खोलीत पडण्यापासून रोखत होता. मी तिच्या देहावरून माझी लोभी नजर फिरवत होतो तेंव्हा तिने वरचा गाऊन उतरवला आणि तिचे गोरेप्पान हात मला दिसू लागले. तिचं घाटदार शरीर अजूनच उठावदार वाटत होतं. मी माझे पाय उचलले अन त्या खोलीत जाऊ लागलो. बाहेरच्या किलकिल्या प्रकाशाने तिची सावली खोलीतील भिंतीवर पडत होती. एक विक्षिप्त अन अमानवी पद्धतीची ती सावली होती. पण मला त्याचं भान नव्हतं. मी थेट तिच्या गळ्यात जाऊन पडलो. तिचं उबदार शरीर माझ्या सर्वांगाला स्पर्श करत होतो. माझ्या मेंदूला आता कसलंच स्ववलय राहिलं नव्हतं. भूल दिल्याप्रमाणे मी बेशुद्धीत होतो. मी तिच्या शरीरशी सलगी करत असताना तिच्या शरीराची रूपरेषा बदलली जात होती. ते मोहक, मादक, सुंदर रूप लोप पावत होतं आणि तिथे एक अक्राळ-विक्राळ, विद्रूप अन अमानवी रूप आकारास येत होतं. पण मला त्याचं भान नव्हतं. लहान मूल कसं हातात दिलेल्या चॉकलेटशी खेळत बसतं, पण दुसरीकडे त्याच्यावर उपचार चालू असतात; तशीच माझी अवस्था होती. त्या शरीराला खरं मानून मी त्याच्याशी प्रणय करण्यात व्यग्र होतो, म्हणजे त्या आभासात होतो, आणि इकडे माझ्या शरीराच्या चिरफाड करणारा देह आकार घेत होता.

अत्यंत गलिच्छ रूप ते. पिवळसर शरीर, काळेकुट्ट डोळे, लांब पसरलेले पांढरट केस, वेडावाकडा चेहरा आणि तोंडाच्या ठिकाणी मात्र आता एक गोल अन तीक्ष्ण दात असलेला जबडा दिसत होता. त्या कुबट वासाला मी शरीराचा गुलाबसुगंध मानून ओठांनी चुंबन करत होतो. ते पाशवी हात माझ्याभोवती आवळले जाण्यासाठी सज्ज होत होते. आता मी मृत्युच्या दरवाजात उभा होतो.

एक किंकाळी उमटली अन ते हात माझ्या शरीराच्या आरपार जाणार तेवढ्यात आगीचा एक गोळा त्या विद्रूप चेहर्‍यावर बसला अन ती आकृती किंचाळत मागे कोसळली. एक फटका माझ्या डोक्यावरही बसला आणि ब्रम्हांड फिरून आल्यासारखा मी जागेवर आलो. डोकं खूप दुखत होतं पण ते ताळ्यावर आलं होतं.

मागून कसल्यातरी कवितेच्या, मंत्रांच्या किंवा तत्सम कसल्यातरी ओळी कानावर पडत होत्या. मी मागे वळून बघितलं तर अंधुकपणे मला तो मघाचा वॉचमन दिसला. एका हातात मशाल अन दुसर्‍या हातात भगव्या रंगाचं कापड गुंडाळून तो ते शब्द उच्चारत होता. त्यात वारंवार ‘अग्निदेव’ असा शब्द ऐकू येत होता. मला आठवलं ह्या गावाचं नाव ‘अगनसेव’ आहे.

ती अमानवी आकृती अत्यंत त्वेषाने किंचाळत होती. ती खूप संतापाने आमच्याकडे बघून ओरडत होती. त्या वॉचमनने मला आपल्या पाठीमागे लपवलं आणि ती अग्नि अर्थात मशाल त्या आकृतीच्या दिशेने करत तो ते शब्द उच्चारत होता. आम्ही हळूहळू तेथून बाहेर पडलो. ती आकृती आमच्यामागे येऊ बघत होती पण त्या वॉचमनने ती संधी तिला दिली नाही. अर्धवट जळका चेहरा घेऊन, शिकार सुटली ह्या संतापाने आमचा सर्वनाश करू इछित होती; पण ते शक्य नव्हतं. आम्ही धावतच बाहेर आलो. परतत असताना मी त्या बाल्कनीकडे बघितलं तर मला पुन्हा तिथे ती मोहक स्त्री दिसत होती. पण तो वॉचमन मला ओढून त्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर नेत होता. मी मृत्युच्या दारातून परतलो होतो.

          पहाटे मला जाग आली तेंव्हा मी बसस्टँड मध्येच होतो. वॉचमन माझ्याकडे एकटक बघत होता. मी पुर्णपणे शुद्धीवर आल्यावर आम्ही चर्चा केली. यातून मला एक वेगळच सत्य समजलं. हे गाव अंधारछाया म्हणून कुप्रसिद्ध होतं. इथे नकारात्मक शक्तींचा वास होता. पण एका ऋषींनी अग्निदेवाची उपासना करून देवाला येथे निवास करण्याची विनंती केली जेणेकरून इथला अंधकार कमी होईल. त्यानंतर अग्निदेवाच्या आशीर्वादाने पवित्र झालं आणि मानव येथे राहू लागला. ज्या नकारात्मक शक्ति येथे राहायच्या त्या अग्निला घाबरून लुप्त झाल्या. त्या ऋषींनी तो मंत्र निर्माण केला होता. त्या मंत्राचा उच्चार करताच अग्निदेव त्याला नकारात्मक शक्तींशी लढायला मदत करेल.

वॉचमन म्हणाला, आमचे पूर्वज आधी गावाचे रक्षक होते जे आता आम्ही वॉचमन बनून राहिलो. पण अजूनही त्या शक्तींशी आमचा सामना होतच असतो. तुम्हाला एकटा ह्या रस्त्यावरून जायला सांगितलं तेंव्हाच मला चुकल्यासारखं वाटलं. गावातील मूळ लोक अग्निदेवची उपासना करतातत्यामुळे ते निर्भय असतात, पण तुम्ही बाहेरचे बघून तुमच्यावर त्या शक्ति आघात करतील हे लक्षात आल्यावर मी तुमच्या मागावर आलो. तुम्ही हातातील बॅग टाकून धावत सुटला तेंव्हाच मला गडबड जाणवली. त्यामुळे मशाल घेऊन मी तुमच्या मागावर आलो. वाचलात तुम्ही. ती रक्तपिपासू शक्ति होती. आभासी जाळ्यात अडकवून ती शिकार करते. तुमचा दोष नाही त्यात.

मी देवाचे अन देवाप्रमाणे धावून आलेल्या त्या वॉचमनचे मनापासून आभार मानले. त्याच्यामुळेच मला नवीन जीवन मिळालं होतं. मी बचावलो होतो,पण ही भयानक आठवण मला आयुष्यभर पुरून उरणार होती.

===समाप्त===

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991  || latenightedition.in

“मराठी कथा” android e-book

खालील लिंकवर अजून भयकथा वाचा… 

जोकर – भयकथा : भाग १

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!