निवृत्ती

निवृत्ती

मराठी कथा  ||  अनुभव   ||  स्वलेखन  ||  Marathi Stories  ||  समारोप  ||  Send Off Speech In Marathi

 

निवृत्त होत असलेल्या कंपनीच्या चेअरमनचे समारोप भाषण…

बराच वेळ ओझं वाहिल्याच्यानंतर कुठेतरी थांबावं लागतं… कोणीतरी आपलं ओझं आपल्या खांद्यावर घ्यावं अन आपल्याला मुक्त करावं अशी मनोमन इच्छा होत असते… पण ते खांदे ओझं पेलण्यासाठी सक्षम आहेत का याची खात्री होईपर्यंत पूर्ण भार सोडून देता येत नाही…

ओझ्यातून मुक्त झाल्यानंतर एक विराट वृक्ष दिसतो… त्याच्या निर्मळ छायेखाली विराम घ्यायचा मोह आवरता येत नाही… मन अगदी निश्चल होतं… संपूर्ण प्रवासाचा शीण, थकवा निघून जातो… वादळाचे हेलकावे भोगून एखादी नौका एका संथ किनार्‍यावर विश्राम करते तसं वाटू लागतं… दुसरे खांदे आपण दिलेलं ओझं सक्षमपणे पेलत आहेत हे बघून समाधानी मन त्या विराट वृक्षासमान स्थिर अन निश्चिंत होतं…

मग त्या वृक्षाखालून उठून भ्रमंती करावी वाटते… ओझं उचलून शरीर जरी थकलेलं असलं तर मन मात्र अत्यंत प्रफुल्लित असतं… आजूबाजूच्या बागेत, फुलात ते रमून जातं… प्रवास करताना करायच्या राहून गेलेल्या गोष्टी उपभोगताना अगदी दैवी अनुभूती होते…

हलकेच ठेच लागते अन मावळतीच्या सूर्याकडे लक्ष जातं… क्षितिजाकडे पसरलेला लाल-तांबूस रंग डोळे दिपून टाकतो… मग मन भानावर येतं… सकाळी अंगावर घेतलेलं ओझं खांद्यावर-कमरेवर-डोक्यावर पेलता-पेलता वाट कधी सरत गेली अन दिवस कसा मावळत गेला याचं भानच राहिलेलं नव्हतं याची जाणीव होते… पण सूर्यनारायनाच्या साक्षीने अंगावर घेतलेली जबाबदारी त्याच्याच साक्षीने पूर्णत्वास जात आहे याचा अभिमान वाटू लागतो…

मागे वळून बघितल्यावर, अनेक संकटातून तुडवलेली लांबच लांब व खडतर वाट जेंव्हा नजरेस पडते तेंव्हा त्या प्रवासातील आठवणीने डोळे भरून येतात… वाटेत अनेकांनी दिलेला आधार, गर्ज पडल्यास दिलेला धक्का सर्वार्थाने सार्थकी लागल्याची भावना होते… इतक्या खडतर वाटेवरच्या प्रवासात कधीतरी कोणीतरी नकळतपणे केलेली मदत आठवते अन ईश्वरावरचा विश्वास अजूनच बळकट होतो… वाटेत अनेकांचा सहवास लाभला, सहकार्य लाभलं त्या सर्वांना मनापासून मिठी मारावीशी वाटते… युगायुगाची अंतरे कापून आल्याप्रमाणे आपण हात जोडून सर्वांचे आभार मानतो अन त्या वाटेकडे एक सर्द नजर टाकतो अन पाठ फिरवतो…

दिवस जरी प्रवासात गेला असला तरी संध्याकाळ अन रात्रीचा झगमगाट अनुभवण्यासाठी शरीरात नवी ऊर्जा संचारते… आयुष्याची जरी संध्याकाळ असली तरी पावित्र्याचा, मंगलमय दिवा लावून “शुभम करोति कल्याणम…” म्हणायची वेळ झालेली असते…

 

  • सुभाष शिरोडकर (माजी चेअरमन)

 

 

लिखाण – अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

© 2017 – 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!