माजलेले बोके अन सोकावलेले उंदीर!

माजलेले बोके अन सोकावलेले उंदीर!

राजकीय लेख  ||  उंदीर पुराण  ||  एकनाथ खडसे  ||  भ्रष्ट व्यवस्था  ||  विधिमंडळात उंदीर ||

लहानपणी टॉम अँड जेरी हे कार्टून सर्वांनीच बघितलेलं असेल. त्या कार्टूनमध्ये टॉम नावाचं मांजर जेरी नावाच्या मस्तीखोर उंदराच्या मागावर असतं. त्या दोघांचा सतत काहीतरी दंगा चालूच असतो. यात जी धमाल होते ती खूपच मजेशीर असते. या धुडगूसामध्ये कधी टॉम जेरीवर कुरघोडी करत असतो तर बर्‍याचदा जेरी काहीतरी खोड्या काढून टॉमला ‘जेरी’स आणतो अन धम्माल मजा करतो.  पण काहीही झालं, कितीही झालं तरी दोघांमध्ये कायमचे मनमुटाव कधी होत नाहीत. कारण त्यांच्यात एक बंध असतो… निखळ मैत्रीचा!!! कितीही भांडणे झाले तरी ते एकमेकांपसून कधी लांब जात नाहीत, कारण एकमेकांशिवाय त्यांना करमत तर नसतं.

       टॉम अँड जेरी या कार्टून मध्ये मैत्रीचं हे अनोखं नातं अप्रतिमरित्या रेखाटल आहे. त्यामुळेच कदाचित लहानग्यांपासून जेष्ठांना हे कार्टून आवडतं. तसं पाहता उंदीर आणि मांजर हे एकमेकांचे हाडवैरी. एकमेकांचे नैसर्गिक शत्रू! उंदराला मारून खाणे हा मांजराचा निसर्गधर्म आणि मांजरापासून बचाव करून जगने ही उंदराची नियती! पण हे सत्य त्या कार्टून मध्ये बदलण्यात आलं आहे. असं जर खरच झालं तर काय होईल याचा विचार केला पाहिजे!!!

              महाराष्ट्राच्या विधानभवनात कितीतरी पॉइंट कितीतरी उंदीर मारले यावरून सध्या खुमासदार चर्चा सुरू आहेत. या प्रकारात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असेल असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या सगळ्या विषयाला खरी सुरुवात केली ती माजी विरोधी पक्षनेते, पूर्वाश्रमीचे बारा खात्यांचे मंत्री अन सध्या भाजपचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे! हे आरोप त्यांनी खरं तर एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या आवेशात केलेले दिसतात. त्यामुळे हे आरोप करताना ते कोणत्या भूमिकेत होते हे समजेल!

यू तो लढाई बनती ही थी

बस वजह और जगह ढुंड रहे थे

इन्तेकाम अभी बाकी है

तुम होश संभल के रहना…!

              एकनाथराव खडसे हे सध्या निर्णायक लढाईच्या तयारीत आहेत असं दिसत आहे. पक्षाकडून दिली जाणारी दुय्यम वागणूक आणि झालेला अन्याय त्यांना सहन होत नसावा म्हणून निमित्य काढून भाजपशी, सरकारशी अन फडणवीस यांच्याशी उघडपणे पंगा घ्यायचा अन वातावरण तापत ठेवायचं असा त्यांचा विचार दिसतोय. इतकी वर्षे राजकरणात विविध पदांवर काम केलेले खडसे असा हवेत अन मनमर्जि आरोप करणार नाहीत, अन तेही विधिमंडळात. या आरोपातून कोणती लढ सुरू होणार अन काय निष्पन्न होणार याचा पुरेपूर अंदाज त्यांना होता. असे स्वतःच्या सरकारवर आरोप केल्यावर माध्यमांत चर्चा तर होणारच होती आणि त्यांच्या आरोपांना भाजपमधील उथळ मंडळी नक्कीच प्रतिक्रिया देतील याची त्यांना खात्री असावी. तशी प्रतिक्रिया आयाराम राम कदम ह्या भाजपच्या प्रवक्त्यानी दिलीही अन त्याला परत प्रत्युत्तर खडसेंनी दिलंही. त्यानंतर मुनगंटीवर यांनीही तशीच प्रतिक्रिया दिली. खडसेंना हेच हवं होतं. या विषयावर चर्चा होत राहावी अन वातावरण तापत राहावं अशी त्यांची इच्छा होती. या सगळ्यातून त्यांना बंड करायला नैतिक आधार अन राजकीय पाठबळ मिळू शकलं असतं. त्यांच्या नाराजीची वारंवार चर्चा झाली असती जेणेकरून भाजप श्रेष्ठींना त्यांच्याबाबतीत काहीतरी निर्णय घेणे भाग पडले असते. मध्यंतरी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली अशी अफवाही होती. पण तूर्तास हे सगळं टळलेलं दिसत आहे. ते प्रकरण जरासं बाजूला पडलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शांत राहून, थंड डोक्याने या विषयावर फार चर्चा होऊ दिली नाही. राम कदम वगैरे मंडळींना वेळीच आवरलं असावं.

              ह्या सगळ्या राजकरणात मजेशीर भाग आहे तो उंदरांचा! हा सगळा काय प्रकार आहे त्याचा काही नेमका खुलासा होताना दिसत नाही. किती उंदीर होते, किती उंदीर मारले, ते कुठे नेऊन टाकले याचे वेगवेगळे उत्तरं येत आहेत. पण यातून एक सत्य समोर आलं की, राजकारणी अन प्रशासकीय अधिकारी संगनमताने कसा ‘कारभार’ करतात.

भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी हे लोकशाही व्यवस्थेला लागलेले उंदीर असतात. संपूर्ण घराचा, धन-धान्याचा विचका केल्याशिवाय ते शांत होत नाही. तो मस्तीखोरपणा त्यांच्यात ठासून भरलेला असतो. घर पोखरून नेस्तनाबुत करणे हा तर त्यांचा निसर्गधर्म आहे. लोकशाही नावाचं घर ते गेली अनेक वर्षे पोखरत आहेत.

असे उंदीर किती आहेत, कुठे आहेत अन त्यांचा नायनाट कसा करायचा याचं औषध आपण स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षातनंतरही शोधू शकत नाही हे आपलं दुर्दैव म्हंटलं पाहिजे. 2012 साली ‘लोकपाल’ नावाचं जालिम औषध शोधलं असा गाजावाजा झाला पण त्या शोधातून काय बाय-प्रोडक्टस देशाला मिळालेत हे आपण बघत आहोतच. विशेष म्हणजे आज तेच ‘लोकपाल’ नायक आज परत एकदा दिल्लीत उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याची चर्चा कुठेही होत नाही.

या व्यवस्थेचे खरे मालक (म्हणजे असं मानायचं) असलेल्या जनतेने त्या उंदरांचा बंदोबस्त करावा, त्यांना नियंत्रणात ठेवावं, घर स्वच्छ ठेवावं म्हणून अनेकदा अनेक “बोक्यांना” घरात घेतलं अन घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पण झालं असं की ज्या बोक्याला विश्वासाने ही जबाबदारी सोपवली होती त्यानेच उंदरांशी संगनमत करून सार्‍या घरात धुडगूस मांडला आहे. आता शिल्लक असलेलं घरही धोक्यात आलं आहे. ही टॉम अँड जेरी ची जोडी स्वतःचे इस्पित साध्य करत आहे. या टॉम अँड जेरी मुळे मनोरंजन न होता शोकांतिका होत आहे असं झालय.

मालकांनीही ह्या बोक्यांना कधी जाब विचारला नसल्याने हे बोके माजले आहेत. अलीकडे 2012 साली जनतेने असा जाब विचारला अन त्यातून देशात एक संक्रमणही घडलं, पण परत दुसर्‍यांना त्याजागी निवडलं तेही बोकेच निघाले. आणि घर पुरतं पोखरून झालं तर अटकाव करणारं कोणीही नसल्याने माजुन लोळ झालेले, निर्ढावलेले, निर्लज्ज उंदीरही भलतेच सोकावले आहेत.

ही माजलेल्या बोक्यांची अन सोकावलेल्या उंदरांची युती वरचेवर घातक होत आहे. त्याला कोण वेसण घालणार हा गहन प्रश्न आहे. चर्चेचा विषय असा की, पहारेकरी म्हणून “वाघ” बसलेले असताना हे बोके अन उंदीर इतका हैदोस घालतात कसे हाही महत्वाचा मुद्दा. हा प्रश्न एकदा वाघालाही विचारला पाहिजे. वाघाचा दरारा कमी झाला की वाघही जाणीवपूर्वक डोळेझाक करतो आहे? असो!

हा उंदीर अध्याय इतक्यावर संपेल असं वाटत नाही. हा केवळ पूर्वार्ध आहे, उत्तरार्ध शिल्लक आहे असं जाणवत आहे. वरवर कितीही मजेशीर अन हलका-फुलका वाटत असला तरी याला राजकारणाचे अन भ्रष्ट व्यवस्थेचे अनेक पदर आहेत. शेवटी, “होईल जे जे, ते ते पहावे” हेच हाती. तूर्तास इतकेच!!!

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

शिवसेना मनसे मिलन सिद्धांत!

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!