मराठी कथा – ई पुस्तक
मराठी कथा || साहित्य || भयकथा || लिखाण || Marathi Stories By Abhishek Buchake || अभिषेक बुचकेच्या मराठी कथा || मराठी कथा e-Book || कथासंग्रह || Marathi Story Collection
जवळपास एक वर्ष होऊन गेला “मराठी कथा” हे e-book अर्थात ई-पुस्तक पब्लिश करून. गूगल वर इतक्या मोठ्या प्रमाणात दर्जेदार कंटेंट उपलब्ध असताना, विविध आशयाची अन विषयांची पुस्तके उपलब्ध असताना त्या गर्दीत माझं हे App त्यातील कथांवर कितपत तग धरू शकेल याची शंका होती. पण गेल्या वर्षभराचा प्रतिसाद बघता माझ्या शंका वाचकांनीच तडीपार केल्या. आज हे app दहा हजार पेक्षा अधिक लोकांनी वाचलं आहे हे सांगताना नक्कीच आनंद होतोय.
खरं तर App च्या मार्गात अनेक अडथळे होते. अनेकदा App बंदही पडत होतं. पण विविध अडचणींवर मार्ग काढत हे App सुरू ठेवण्याचा अट्टहास उपयोगी पडला. ह्या App मध्ये किती कथा मी टाकू शकेन किंवा त्या कितपत चांगल्या वगैरे असतील याची कसलीच खात्री नव्हती. पण समिश्र प्रतिक्रिया येत गेल्या, ज्यामध्ये सकारात्मक प्रतिक्रिया धीर देणार्या होत्या.
जसं पावसाळ्यात रोजच पाऊस पडत नाही, आणि पडणारा पाऊसही नेहमी सारख्याच तीव्रतेने पडत नाही तसंच कुठल्याच लेखकाच्या सर्वच्या सर्व कथा चांगल्या असत नाहीत. हा नियम काही अपवाद वगळता सर्वच लेखकांना लागू होतो. पण मी मुळात लेखकच नाही. मी स्वतःला लेखक म्हणवून घेणं म्हणजे अतिरेकच होईल. जे आहे ते निव्वळ काल्पनिक विश्वातील मळमळ बाहेर काढणं आहे. माझ्या लिखाणात दोन टोक असतात असं काहीजण म्हणतात. म्हणजे एका बाजूला “एक रात्र गाजवलेली!” सारखी अर्थहीन विनोदी कथा, कुठे “गाव सोडताना” सारखी भावनांची चलबिचल दाखवणारी कथा, कुठे “नरक्षी किंवा उतारा” सारख्या भयकथा, कुठे “खिडकी” सारखी रहस्यमय अन भावस्पर्शी कथा, तर कधी “मी ब्रम्हचारी” सारखी सामाजिक आशय असलेली कथा. ह्या अशा विविध प्रकारच्या कथा काही ठरवून लिहीलेल्या नाहीत. त्यांचा जन्म ओघानेच झाला. आकाशातील एखादी वीज जंगलात पडावी अन वणवा पेटावा तसं एखादी लहानशी संकल्पना, घटना, विचार ही एका कथेला जन्म घालत गेली.
ह्या सर्व कथांच्या गर्दीत तीन-चार कथांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे ज्या वाचकांना खूप आवडल्या अन त्यामुळे मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यात पहिला नंबर आहे “मी ब्रम्हचारी” ह्या आशयघन कथेचा. एका ब्रम्हचारी राहिलेल्या माणसाची व्यथा यामध्ये मांडलेली आहे. ही कथा अनेकांना भावली. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात पण वाचकाला त्यातून काहीतरी बोध घ्यावा असं वाटलं यातच मला आनंद आहे.
त्यानंतरची कथा आहे ती “नरक्षी” ही भयकथा. सहज बसल्या बसल्या काहीतरी सुचलं आणि ही कथा लिहायला घेतली. कथा कितपत चांगली आहे याबद्दल मलाही आत्मविश्वास नव्हता. पण “प्रतिलिपी” या संकेतस्थळावर एक भयकथा स्पर्धा झालेली त्यामध्ये या कथेला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळालं, अत्यंत चांगलं रेटिंग मिळालं. यामुळे जरा धीर आला की मी भयकथा लिहू शकतो.
यानंतर मला चांगला प्रतिसाद मिळाला तो “गाव सोडताना” या कथेसाठी. नोकरीनिमित्त विविध गावात राहावं लागणार्या अन मग ते गाव सोडताना मनाला लागणारी हुरहूर ही या कथेत मांडली आहे. थोडीशी भावनात्मक पद्धतीने त्याला रंग दिलेला आहे. ही कथा वाचून एक दोन वाचक म्हणाले की माझ्याही डोळ्यांतून पाणी आलं. ही एक उल्लेखनीय बाब ठरली.
आणि एक अशी कथा ज्या कथेने मला स्वतःला जे लिखाण करतो त्याबद्दल आत्मविश्वास जाणवायला लागला. खिडकी! एक छोटासा अनुभव डोक्यात होता ज्यावर काहीतरी लिहुयात म्हणून ही कथा लिहायला सुरू केली. नंतर डोक्यात प्रचंड विचारचक्र सुरू झालं अन त्या कथेची व्याप्ती मला जाणवू लागली. मग झपाटल्यासारखं ती कथा लिहून पूर्ण केली. सुरुवातील रहस्यमय आणि भुताटकी सारखी वाटणारी कथा एक वेगळच वळण घेते. एका बहीण-भावातील अतूट नातं, बंध ह्या कथेच्या शेवटाला उलगडतो. ही कथा लिहीत असताना मलाच अस्वस्थ वाटत होतं. कथा पूर्ण झाल्याच्या नंतर मलाच ती खूप आवडली. ज्या मित्रांना ती वाचायला दिली त्यांनीही चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आणि इतर वाचकांनाही या e-book मधील सर्वोत्कृष्ट कथा वाटली. मी लिहिलेली अन मलाच आवडलेली कथा वाचकांना आवडते याचं अधिक अप्रूप होतं.
अलीकडच्या काळात माझ्या प्रतिलिपी प्रोफाइलचे एक लाख वाचक झाले, माझ्या latenightedition.in या वेबसाइटचेही एक लाखांपेक्षा अधिक viewers झाले आणि “मराठी कथा” या App चेही दहा हजारांच्या अधिक वाचक झाले. काहीतरी मांडत होतो, व्यक्त होत होतो, खरडत होतो त्या कामाची पोचपावती मिळाल्यासारखं वाटत होतं म्हणून हे सगळं लिहायचा घाट घातला. वाचत रहा… प्रतिक्रिया नोंदवत रहा इतकच सांगेन… तूर्तास इतकेच…
खालील लिंकवर “मराठी कथा” हे App
https://play.google.com/store/apps/details?id=com.latenight.somethingsamajik.MarathiKatha
खालील लिंकवर प्रतिलिपी प्रोफाइल अन कथा
अभिषेक बुचके || @Late_Night1991 || latenightedition.in
© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!