मार्गस्थ…!

मार्गस्थ…!

मराठी कथा   ||  भावनिक  || संन्यास  ||  स्वलेखन  ||  Marathi Stories  ||  काहीतरी वेगळं  ||  आत्मभान  || विरक्ती

सगळं सोडून दिलं. अजून किती काळ आठवणींना उराशी कवटाळून जगायचं. भूतकाळात जगणं म्हणजे आजचं अस्तित्व झुगारून देणे. ह्या जुन्या आठवणी म्हणजे निव्वळ दलदलीप्रमाणे असतात; जितकं त्याच्यात अडकत जाऊ तितकं अजून खोलात अडकत जाणार. म्हणूनच त्यात अडकायला नको असं ठरवलं. रात्रीचं अंगणात शतपावली करत असताना सहज आकाशाकडे लक्ष जातं आणि आठवतं की आज तर पोर्णिमा. मग त्या चंद्राच्या सौन्दर्यत आपण हरखून जातो. आठवणीही अशाच कधीतर अचानक समोर येतात अन आपण त्यात हरवून जातो.

पण आता हे सगळं थांबवायला हवं. मनावर, मेंदूवर ताबा मिळवायलाच हवा.

घरात एक पेटी होती ज्यात जुन्या आठवणींचा खजिना होता. खजिना होता की जळमट होते कोणास ठाऊक. आठवणी कोणासाठी खजिना असतात तर कोणासाठी मनाला लागलेली जळमट.

ती पेटी खूप जुनी होती. आजोबा गावाला जाताना ती घेऊन जात असत. सगळं ठरलं होतं. ती पेटी तशीच उचलली अन अंगणात गेलो. अंगणात ती पेटी आदळली तोच त्याची कडी तुटली अन त्यातील सगळ्या वस्तु बाहेर पडल्या. वस्तु कसल्या आठवणींचा खजिना… पण जुनाट अमूल्य खजिन्यावर नाग रक्षणाला फना काढून उभा असतो तसा ह्या आठवणीवरही विषारी नाग सतत पहारेकरी म्हणून तत्पर असायचा. मन त्या आठवणीकडे गेलं की नैराश्यरूपी नाग सतत फना काढून डंख मारायचा. तीव्र वेदना व्हायच्या! पण मग पुन्हा पुन्हा तिकडे वळायचं!

भूतकाळातल्या आठवणीना जितकं जपून ठेवतो तितक्या त्या वारंवार उफाळून येत असतात अन आपण काल्पनिक जगात वावरू लागतो. आजचं अस्तित्व विसरून होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसतो अन भविष्यात त्या आठवणींचं काय होईल याचा विचार करत बसतो. आधी ह्या आठवणी जपून ठेवायची मला खूप हौस होती, पण आता त्या आठवणी घराला लागलेले जळमट वाटू लागली आहेत. सगळी काढून टाकायची होती अन मन स्वच्छ करायचं होतं.

घरात शिरताच समोरच्या टेबलवर आजीने स्वतः बनवलेले एक चित्र ठेवलेलं दिसायचं. कधी निवांत बसलो अन त्याच्याकडे लक्ष गेलं की दहा-बारा वर्षांपूर्वी गेलेल्या आजीच्या आठवणी जाग्या होतात. ती मरताना आपण तिच्यासोबत नव्हतो हे शल्य मनात आजही दाटून येतं. मग तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवतात अन कधी-कधी तिच्याकडे केलेलं दुर्लक्ष आठवून मनाला तीव्र वेदना होऊ लागतात. मग झोप लागेपर्यंत तेच विचार डोक्यात लोलकासारखे फिरत राहतात. डोळ्यातून पाणी काढायची परवानगी नसते. मग आजी अनाहूतपणे स्वप्नात येते अन “तुझं काहीच चुकलं नाही रे राजा” असं सांगते तेंव्हा कुठे मनाला आधार मिळतो… सकाळ झाली की अंधुकसं आठवणारं स्वप्न विसरून जातो अन कामाला लागतो… काही दिवसांनी ते चित्र काढून पेटीत टाकून दिलं… कारण तिच्या आठवणीत रमल्यावर आजचं भान उंबर्‍याच्या आत येतच नाही. मला त्यावर नियंत्रण मिळवायचं होतं. नको असलेलं पण व्यसनासारख्या चिटकुन बसलेल्या गोष्टींना सोडून द्यायला शिकत होतो.

Related image

आजोबांची ती पेटीही खूप विचित्र होती. त्या पेटीच्याही आठवणी होत्या. आजोबा गावाला जाताना ती वापरायचे, पण मी लहान असताना त्यांनी मला ती देऊन टाकली. लहानपणी शाळेची पुस्तके वगैरे त्यात ठेवायचो. मग ती कायमस्वरूपी माझीच झाली. मग त्या पेटीत वाट्टेल ते ठेवायला लागलो. आजोबांनी मला दिलेली तेंव्हा तिचा रंग निळसर होता, पण माझ्या आठवणींचा भार सोसत ती कधी गंजून गेली हे लक्षातच आलं नाही. आठवणींचा गोतावळा सांभाळत सांभाळत माझ्या मनाप्रमाणेच तिचीही दयनीय अवस्था झाली होती. नको साला अडकायला!

ती पेटी उघडली. त्या पेटीतून फ्रेंडशिप बॅंड चा एक संचचं बाहेर पडला. लहानपणी फ्रेंडशीप डे ला सगळे मित्र ते बॅंड बांधायचे. त्यातल्या जवळच्या मित्रांनी बांधलेले बॅंडस जपून ठेवलेले होते. शंकरने बांधलेला बॅंड दिसताच गहिवरून आलं. तो कमी वयातच वारला होता. खूप जवळचा मित्र होता. सुरूवातीला आठवण यायची पण मग ती स्मृती कुठेतरी मेंदूच्या अडगळीत जाऊन पडली. आज हा बॅंड दिसताच त्या कुप्पीतून ती बाहेर आली. पण भावुक व्हायचं नाही हे आधीच ठरवलं होतं.

मग मला काहीतरी आठवलं अन त्या पेटर्‍यातील सामानत ती वस्तु धुंडाळू लागलो. सामान खाली-वर केल्यावर त्यात जांभळ्या रंगाची ती डायरीसारखी वस्तु सापडली. स्लमबुक!!! ते उघडताच आठवणींचे अनेक पक्षी अंगावर धावून आले. अनेक मित्रांचे नाव दिसत होते, त्यांचे आवडते रंग, खाद्य वगैरे वगैरे मी बघू लागलो. लहानपणी काय काय फॅड असतात. मोठेपणी या गोष्टी क्षुल्लक वाटत असल्या तरी त्यावेळेस त्याना खूप महत्व असायचं. जसे-जसे पानं उलटत गेलो आणि आता मात्र डोळ्यातून पाणी येत होतं. मी इतका कसा दुर्दैवी की त्यातील एकाशीही आज मी संपर्कात नव्हतो. आज ते कुठे आहेत हेही मला माहीत नव्हतं. खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं. डाव्या छातीत जोरजोरात आवाज येऊ लागले. मी डोळे पुसले अन ते पुस्तक लांब फेकून दिलं.

सावरायला बराच वेळ लागला. पण आज सगळं संपवायचं मी ठरवलं होतंच. त्यात एक डबी दिसली. हसू आलं. मी ती आधाशासारखी उघडली. त्यात लहानपणी पडलेले दात जपून ठेवले होते. इथे आता फक्त चिकट काहीतरी दिसत होतं. मी स्वतःशीच हसलो. किती लहान लहान गोष्टीत विश्वाचं सुख मानायचो तेंव्हा… कुठे बिनसत गेलं अन स्वतःशी खेळणं सोडून दिलं…? आयुष्याचा पसारा इतका वाढवत गेलो अन स्वतःचं मन मात्र पोकळ होत असल्याच विसरून गेलो. पण आता विचार नाही करायचा… बास…

कधीतरी कार्यक्रमानिमित्त भेटवस्तू म्हणून दिलेली पुस्तके दिसली. त्यातली काही वाचायची राहूनच गेली होती. त्यावरचे नाव वाचले अन ती ती माणसे डोळ्यासमोर उभी राहिली. ती कदाचित मेलीही असतील आता!

मोठ्या भावापासून लपवलेले पाच रुपयाचा बंदा दिसला. तो मात्र परत खिशात ठेवला. वाटणी मागताना दोघांनीही ह्या पाच रूपयांचा हिशोब केला असता तर वाटणीच झाली नसती. हळहळ वाटली. पण आता परत उकरून नाही काढायचं. चला पुढे! छोड दो!

यामध्ये कुठल्याही मुलीची कसलीच आठवण नाहीये हीसुद्धा एक कटू आठवण म्हणावी लागेल.

खजिन्यातून चमकणारा हिरा किंवा मणी चमकावा तसा जुन्या फोटोंचा संच दिसला. अतिशय काळवंडलेला अन धुळीने खराब झालेला. तो उघडायची हिम्मत होत नव्हती. पण हात आपसूकच तिकडे वळले अन ते फोटो मी बघू लागलो. अनेक फोटो होते. अनेकजण नव्याने आठवू लागले. त्या धुळीने माखलेल्या अन त्या पिवळसर फोटोतून मायेची ऊब माझ्यापर्यंत पोहोचत असल्याची जाणीव होत होती. मित्र, भावंडे, नातेवाईक यांचे फोटो बघून गहिवरून आलं. कम्प्युटरची खूप मोठी मेमोरी फोटोंनी व्यापली असतांनाही ह्या निवडक फोटोंची सर त्यांना कधीच येणार नव्हती. पण ही स्मृतीसुद्धा मला जीवंत ठेवायची नव्हती. तोही बाजूला टाकून दिला.

त्या पेटीत बर्‍याच वस्तु सापडल्या. प्रत्येकाची खास काहीतरी आठवण होती म्हणूनच त्यांना त्या पेटीत जागा मिळाली होती. घरात अशा कितीतरी वस्तु असतात ज्या केवळ आठवणीच्या नावाखाली जागा अडवून ठेवतात. मनातील एक-एक स्वतंत्र कोपरा त्यांच्यासाठी आरक्षित ठेवलेला असतो, पण तो आपल्या मर्जीवर कुठे उघडतो. ते अनियंत्रित होऊ लागतं अन सगळा विचका होतो.

त्या सगळ्या वस्तु परत त्या पेटीत टाकून दिल्या. घरातून रॉकेल आणलं अन अंगणातच त्याची भडाग्नी दिली. आग लावून टाकली. सगळ्या सगळ्या स्मृती, आठवणी जाळून टाकल्या. त्या पेटीसोबत माझ्या आत्म्याचा एक भागही जळत होता. मी देहभान विसरून रडू लागलो. माझ्या शरीरातून कसलीतरी ऊर्जा निघून जातेय असं वाटत होतं. कोणत्यातरी जवळच्या मानसाच्या चितेला उभं असल्याप्रमाणे वाटत होतं.

काही वेळ मी अंगनातच बसून होतो. कवटी फुटेपर्यंत थांबतात तसं जुन्या आठवणींचे चलचित्र डोळ्यासमोरून पुसट होईपर्यंत तसाच बसलो. संध्याकाळ झाली होती. मी घरात गेलो. मोठं अन सर्वात अवघड काम झालं होतं. गडद आठवणीला मूठमाती दिली होती. आता छोट्या मोठ्या आठवणी अन स्मृतींना मारायचं होतं. समोर मी स्वतःच्या हाताने बनवलेल्या कागदांच्या आकृत्या होत्या. त्या क्षणात मोडून टाकल्या. गाडीच्या चावीला असलेलं गिटारचं किचन मला खूप लकी आहे असं मी समजायचो. तेही टाकून दिलं. सोशल मीडियावर जे accounts होते तिथे Good By केला अन ते बंद केले. बँक खातीही बंद केली होती. माझं अस्तित्व अन आठवणी मी पुसून टाकल्या होत्या. कसल्याच पाऊलखुणा ठेवल्या नाहीत.

घरातील इतर वस्तु घेऊन जाण्यासाठी लोक आले. सगळं सामान घेऊन गेले. फक्त माझ्या गरजेपुरता, म्हणजे मानवाला मूलभूत गरजा भागवण्यासाठी जी किमान साधने लागतात ती तेवढी होती. घराचा ताबा मावशीकडे द्यायचं ठरवलं होतं.

अजून एक काम राहिलं होतं. काल रात्री बसून एक यादी तयार केली होती. आयुष्यात काय-काय करायचं राहून गेलं, कुठे काय करायला हवं होतं, सगळ्या आकांक्षा, अपराध, न्युंनगंड, अहनगंड वगैरे वगैरे त्या यादीत होत्या. आई-वडलांची माफी मागितली होती. मला स्विमिंग शिकायची खूप इच्छा होती, ती कधीच शिकू शकलो नाही. कॉलेजमधील एका मेडमसोबत शारीरिक संबंध ठेवले होते ती आयुष्यातील मोठी चूक वाटायची. मित्राला पैसे असतांनाही आर्थिक मदत केली नव्हती. परदेशी जायचीही इच्छा होती. अशी वीस एकवीस नंबरपर्यन्त यादी होती. आता हे सगळं मनातून-मेंदुतून काढून टाकायचं होतं. ते परत एकदा वाचलं आणि एक मोठा निश्वास सोडून त्यालाही काडी लावली.

पूर्ण तयारी झाली होती. कधीतरी ठरवल्याप्रमाणे मी संन्यास घेत होतो. उद्या ४५ वा वाढदिवस होता. खूप पूर्वी डोक्यात जे होतं ते खरं करण्याची वेळ आली होती. इतकी वर्षे ह्या देहाने जगातील भौतिक सुखाचा पुरेपूर आनंद लुटला होता. उपभोगी, विलासी जीवन जगलो होतो. अनेक चुका केल्या. आता बास करुयात हा विचार आला. सगळं त्यागून मोक्ष व मुक्तिच्या मार्गावर निघावं असा निश्चय झाला होता.

जगात आपलं असं काय असतं? आठवणी अन स्मृती वेगळ्या केल्या तर आपल्या असण्या नसण्याला काहीच अर्थ नसतात. जगात कोणाच्याच लक्षात आपण नसू तर आपलं ह्या भूतलावावर काहीच अस्तित्व नाही आणि आपल्या आठवणीत, स्मृतीत कोणीच नसणं म्हणजेही आपलं असं कोणी नसणं ज्यांच्यासाठी आपण असावेत. शेवटी ह्या आठवणीमुळेच तर भूतकाळ, वर्तमान अन भविष्य आहे. या आठवणीच जर मोडून टाकल्या तर आपण ईश्वराच्या भेटीला निघालेले निर्मळ आत्मा म्हंटला पाहिजे. एका बिंदुचं अस्तित्व अन रेषेचं अस्तित्व यात फरक असतो.

सगळ्यात महत्वाचं आहे ते “सोडून देणे’! म्हणजे कसलाच मोह, माया न ठेवणे. कसलीच आसक्ती न ठेवणे. जीव अडकून राहील असं काहीच नसणे. एखादी गोष्ट जाऊ देणे यापेक्षा प्रभावी त्याग कुठलाच असू शकत नाही. एखादी गोष्ट माझी असणे म्हणजे काय? तर आपल्या मेंदूने त्या वस्तूवर मान्य केलेली मालकी. तीच मालकी जर मेंदूने सोडून दिली तर ती वस्तु आपल्याशी बांधील नाही. आपल्याकडे आपल्या मालकीच्या असलेल्या वस्तु देऊन टाकणे हा मोहातून मुक्त होण्याचा पहिला मार्ग. एखाद्या बॅगेत काहीच नसते म्हणजे ती हलकी असते तसं मनात-मेंदूत काहीच नसणं हेसुद्धा तसच! मुक्त!

मी माझ्या सर्व स्मूती, आठवणी, भौतिक संपत्ती, भावना सर्व त्यागून आपल्या मार्गाला प्रस्थान करणार होतो. संन्यास घेतोय म्हणजे भगवी वस्त्रे घालून गावोगाव फिरणार नव्हतो, पण जवळ गरजेपुरताच घेऊन पुढे जाण्याची वेळ आयुष्यात आली होती. अगदी प्रकृतीच्या नियमांनुसार. प्राणीही असेच राहतात. त्यांनाही काही देणं घेणं नाही ह्या जगाशी. जन्माला आले अन जगले एवढच त्यांचं आयुष्य. उगाच फालतू भानगडीत ते पडत नाहीत. त्यांना भावना नसतात असं नाही, पण त्या नैसर्गिक असतात. मानवाने प्रत्येक ठिकाणी कृत्रिमता आणून ठेवली आहे. ती मला सोडायची आहे… सोडतो आहे… एखाद्या प्राण्याप्रमाणे निसर्गाच्या नियमांनुसार जगायचं अन त्याच मार्गाने जात असताना मरून जायचं होतं… मागे वळून बघायची गरज नव्हती… कसले बंधन ठेवायचे नव्हते…

मी मार्गस्थ झालो होतो…

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

निवृत्ती

 

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!