आठवणीतील गाणी अन गाण्यांच्या आठवणी…

आठवणीतील गाणी अन गाण्यांच्या आठवणी…

Arun Date  ||  अरुण दाते  ||  आठवणीतील गाणी  ||  भावगीत  ||  शुक्रतारा  || माझे अनुभव

आज सकाळी बाहेरून घरी आलो आणि टीव्हीवर अरुण दाते गेल्याची बातमी बघितली. तसं फार दुखं झालं किंवा हळहळ वाटली असं काही नाही. कारण त्यांच्याशी थेट असे ऋनांनुबंध होते असा काही भाग नव्हता. पण सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एक आवडता कलाकार, एक अप्रतिम गायक, भावगीतांचा बादशाह आपल्यात असणार नसणार ही वस्तुस्थिती मान्य केली. पण यामुळे एका प्रवासाची सुरुवात आठवली.

कधीतरी वळवाचा पाऊस पडतो अन मख्ख धुळीचे पापुद्रे चढवून बसलेल्या काचेवर पावसाचे टपोरे थेंब पडतात आणि सगळी धूळ निघून जाते… मग सगळं पारदर्शक दिसू लागतं… अगदी तसच आज वाटलं… काही स्मृती कुठेतरी खोलवर जाऊन बसलेल्या होत्या. त्यावर इतर अनेक स्मृतींचे पापुद्रे चढल्याने त्या स्मृती दुर्लक्षित झाल्या होत्या. आज अचानक त्या लख्ख जाग्या झाल्या.

मी अकरावी-बारावीला असेन तेंव्हाचा काळ. आमचं कॉलेज सकाळी सात वाजता वगैरे असायचं त्यामुळे सकाळी साडेपाचला उठावं लागायचं. त्यावेळेस माझ्यातल्या late night चा जन्मही झालेला नव्हता. वडील सकाळी-सकाळी टेपवर भावगीतांची कॅसेट लावत असत. सुरूवातीला तो वैताग वाटायचा. कॉलेजला जाण्यासाठी तयार होत असताना ती भावगीते आपसूकच कानावर पडत असत. त्या भावगीतांमध्ये अरुण दाते यांची भावगीतेही असायची. त्यावेळी संगीत-चित्रपट वगैरे कला म्हणजे करियरच्या दृष्टीने घातक विषय होते. त्यामुळे कोण अरुण दाते अन कसली भावगीते हे काही कळत नव्हतं. मग हळूहळू तीच तीच गाणी कानांवर पडू लागली. मग त्यातलं शुक्रतारा, स्वरगंगेच्या काठावरती किंवा भातुकलीच्या खेळामधली ही गाणी खूपच आवडू लागली. संगीताच्या बाबतीत मी एकंदरीतच ढ होतो अन आजही आहेच. पण ती गाणी परत परत ऐकावी वाटत होती. ते शब्द, ते स्वर मनाला स्पर्शून जात असत. मग ती गाणी ऐकायची सवयच लागली.

रात्री झोपताना टेपमध्ये शुक्रताराची कॅसेट व्यवस्थित सेट करून ठेवायचो. मग दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्या-उठल्या तोंडात ब्रश घ्यायचा अन टेप चालू करायचा. मग ती मधुर गाणी वारंवार कानावर पडू लागली अन मानवाला किती प्रकारच्या भावना असतात याची जाणीव होऊ लागली. सोया हुवा शेर जागा होतो तसा रेडियोअॅक्टिव एलिमेंट प्रमाणे विविध भावनांची फेक होऊ लागली. माणसाला व्यक्त व्हायचं असतं. तो त्यासाठी कोणता न कोणता मार्ग शोधत असतो. मनाला भिडणारी गाणी ऐकली की आपोआप व्यक्त झाल्यासारख वाटायचं.

कॅसेट

आंघोळ झाल्यावर ओल्या केसांवरून हात फिरवताना “डोळे कशासाठी…. तुला साठवून मिटून घेण्यासाठी…” असली गाणी कानावर पडायची. हा सगळा नव्या विश्वातील प्रवेश होता. आयुष्यात पहिल्यांदाच लक्ष देऊन गाणं ऐकायला सुरुवात झाली होती अन त्यांचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता वाटू लागली होती.

नाश्ता करून कॉलेजला जाईपर्यंत कॅसेटमधील विविध भावगीते कानावर पडत राहायची आणि घरापासून कॉलेजला सायकल वर जात असताना तीच गाणी गुणगुणली जायची. लहानपणी कुठलीतरी गाणी बडबड करणे यापेक्षा वेगळं काहीतरी असतं ‘हे गाणं’ असं वाटू लागलं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच गाणे वगैरे ची सवय लागली होती. मग वेळ भेटेल तसं टेप चालू होत असे. त्यावेळेस ऐकण्यासाठी आजसारखी व्हरायटी असायची नाही. आहेत ती कॅसेट लावून त्याच त्याच विश्वात रममाण व्हावं लागत असे.

जवळपास दीड वर्षे वगैरे, म्हणजे कॉलेज सुरू असेपर्यंत तीच कॅसेट सकाळच्या गडबडीत कानाला-मनाला तृप्त करत होती.

एव्हाना सीडी डीव्हीडी चा जमाना सुरू झालेला होता. कॅसेटची जागा आता सीडी ने घेतली. भावगीतांच्या बरोबरीने जुन्या गाण्यांच्या सीडीही वाजू लागल्या होत्या. संगीत समजत नसलं तरी संगीताला आपल्या मनाची अवस्था कळते की काय असं वाटायचं. कारण आपल्या मनस्थितीनुसार एखादं गाणं असायचच असायचं.

ग्रॅजुएशनला प्रवेश घेतला तसं अनेक प्रकारची गाणी ऐकू लागलो. पण त्यात अरुण दाते यांच्या भावगीतांची जागा कधीच कोणी घेऊ शकलं नाही. भावगीते खरच खोलवर दडलेल्या भावनांना हात घालत असत. त्यात अरुण दाते यांचा सुमधुर आवाज, तो स्वर ऐकला की कधी-कधी निश्चिंत तर कधी-कधी बेचैन व्हायचं. त्यात कॉलेजमध्ये एखाद्या सुंदर मुलगी दिसली की “मान वेळावुनी धुंद बोलू नको, चालताना अशी वीज तोलू नको…” हे गाणं आठवायचंच आठवायचं. आपल्याला आवडणार्‍या मुलीला मनातल्या मनात म्हणायचो, “तू अशी जवळी रहा…” पण शब्दांचा-भावनांना कृतीची जोड कधी मिळाली नाही.

कॉलेजमधील कल्पनाविश्वात गाण्यांना एक वेगळच महत्व असतं. आपण स्वतः वेगळ्याचा कल्पना घेऊन जगत असतो. वेगळ्याच मितीत वावरत असतो. विविध प्रकारची गाणी त्या कल्पनेला आणखीनच वारं घालत असतात. तेंव्हा अरुण दाते यांची भावगीते असोत किंवा किशोर कुमारचे गाणे हे सर्वात जवळचे मित्र वाटायचे. त्या गाण्यांमधील खट्याळपणा, विरह, अबोल प्रीती, एकटेपणा तर कधी आयुष्याची शिकवण विचार करायला भाग पाडायची. कोण समजून घेवो न घेवो पण ही गाणी कायम हृदयाच्या जवळ असायची… थेट भिडायची… आपल्या अव्यक्त भावना व्यक्त करता याव्यात यासाठीच ह्या गाण्यांची निर्मिती झाली आहेत असं वाटायचं.

सीडीचा जमाना जाऊन मोबाइल अन कम्प्युटरमध्ये गाण्यांनी घर केलं होतं. कम्प्युटरवर भावगीतांच्या स्वतंत्र फोल्डरमध्ये अरुण दाते यांनीच सर्वाधिक जागा व्यापली. कॉलेजात ही भावगीते ऐकायला लाज वाटायची. अनेकांना ही माहीतही नसत. आपण मागासलेले तर नाही ना असंही वाटायचं. पण भावगीतांची संगत कधी सुटली नाही.

सबमिशनचं बोरिंग काम कॉपी पेस्ट करत असताना ही गाणी चालूच असायची. काऊंटर स्ट्राइक चा किंवा एज ऑफ एंपायर चा गेम लावण्यापूर्वी विविध आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट चालू करायची अन कंटाळा येईपर्यंत खेळत बसायची. समोर हाणामारी चालू असायची अन कांनातून मेंदूत धुंद गाण्यांची झिंग चढली जायची. हे रसायन खूपच वेगळं होतं. डोळ्यासमोर मिशन, कानावर सुमधुर गाणे… एकंदरीत सुख असायचं.

एका क्लिकवर उपलब्ध असलेले गाणी आता झोपतानाही संगत करू लागली आहेत. मोबाइलवर मूडप्रमाणे गाणी लावून झोपायची सवय लागली होती. #LateNightSong असतातच अशी. ऐकली नाहीत तर झोप येत नाही आणि ऐकली तर झोपच उडते. दिवसभर दावणीला बांधून ठेवलेल्या जनावराला काही वेळ मुक्त संचार करू द्यावा लागतो. #LateNightSong हीच ती वेळ असते कदाचित. त्यात येशील, येशील येशील… राणी पहाटे पहाटे येशील किंवा दिवस तुझे हे फुलायचे, सखी शेजारणी, प्रेम हे माझे-तुझे ही गाणी असायचीच असायची.

Image result for arun date

सुर मागू तूला मी कसा.. जीवाना तू तसा मी असा…

दोनच दिवसांपूर्वी अरुण दाते यांचा वाढदिवस झाला होता. मध्यंतरी त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दलही काही बातम्या आल्या होत्या. आज अरुण दाते आपल्यात नाहीयेत. पण ती अजरामर गाणी पहाटेच्या गोड स्वप्नांप्रमाणे कायम आपल्या सोबत असणार आहेत. ती गाणीच कदाचित आपल्यासाठी अरुण दाते आहेत. अरुण दाते आठवणीत राहोत किंवा न राहोत पण त्यांच्या स्वरांच्या माध्यमातून भूतकाळातील स्मृती गोठवल्या आहेत. त्यांची गाणी, ते स्वर हे त्या स्मृतींना स्मृतिकोशातून बाहेर आणण्यासाठी ट्रीगर म्हणून काम करत राहतील.

गेली काही दिवस किशोर कुमारच्या गाण्यांनी मेंदूवर अमल केला होता. दोन-तीन महीने झाले कसलीच भावगीते ऐकलेली नव्हती. पण आज अरुण दाते गेले अन भावगीतांचा भूतकाळ जागा झाला. आता येणारी काही दिवस सतत तेच तेच गाणे ऐकल्याशिवाय चैन पडणार नाही.

स्वरांच्या आकाशगंगेतील एक अढळ शुक्रतारा म्हणून अरुण दाते सतत चमकत राहतील. पहाटेला दिसलेल्या ह्या मोहक तार्‍याने मला आकर्षित केलं. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं सांगणारे अरुण दाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

 

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!