कर्नाटक ते दिल्ली

कर्नाटक ते दिल्ली

कर्नाटक विधानसभा निवडणूक  ||  राजकारण  ||  लोकसभा २०१९   ||  प्रादेशिक पक्षांचे राजकारण  ||

 

कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही लोकसभा निवडणूक 2019 च्या दृष्टीनेअत्यंत महत्वाची मानली जात होती. त्याला कारणेही तशीच होती. कोंग्रेसशासित असलेल्या निवडक राज्यांपैकी कर्नाटक हे सर्वात मोठं राज्य. ते कॉंग्रेसकडून भाजपने जिंकून घेणे म्हणजे 2019 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचं आत्मबळ कमी करण्याची नामी संधी. आणि कॉंग्रेसला कर्नाटक टिकवणे म्हणजे अस्तित्वाची लढाई होती. शिवाय मोदीलाट वगैरे कमी झाली असं ओरडून सांगाता आलं असतं.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली अन मतमोजणीही पार पडली. तिथे जो काही ड्रामा झाला तो ह्या देशाने अतिशय उत्साहाने बघितला. आजच्या ताज्या घडामोडीनुसार येडियूरप्पा ने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मग जो उपद्व्याप केला तो कदाचित भारतीय जनतेचं मनोरंजन करण्यासाठीच केलेला असावा असा दाट संशय येतो.

भरसभेत द्रौपदी वस्त्रहरण होत असताना सर्व ‘पुरुष’ षंढ आणि थंडपणे बघत बसतात तसं भारतीय जनता लोकशाहीच्या परंपरा व घटनेवर वारंवार होणारे अत्याचार हे केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून बघत बसते. एकतर आपल्याला हा सगळा व्यभिचार हवा असतो किंवा आपला कर्मावर इतका विश्वास बसला आहे की ज्याचं त्याचं ‘कर्म’ त्याच्यासोबत न्याय करेल असं म्हणून आपण स्वतःच्या कर्मावर जगत असतो. असो.

आता पुढे काय? हा प्रश्न भाजप अन भाजप विरोधकांना सतावत असेल. पुढे जाण्यापूर्वी एका चित्रपटाची कथा आठवली ती सांगतो. ही कथा तुम्हाला कादंबरी किंवा आजीकडून ऐकलेल्या गोष्टीसारखीही वाटू शकते. किंवा ती आजच्या काळात कुठे relate करायची हे तुमचं तुम्ही ठरवा.

एक भलं मोठं, वैभवशाली, संपन्न, प्राचीन राज्य असतं. एक राजघराणं गेली कित्येक तप तिथे राज्य करत असतं. पण एकदा होतं असं की त्यांच्या पिढीत एक कमकुवत राजपुत्र जन्माला येतो. त्याच्याकडून अपेक्षा तर खूप असतात, पण त्याच्याकडून त्याची पूर्तता होत नसते. लहानपणापासून प्रचंड कौतुक अन लाडात त्या राजपुत्राची जडणघडण झालेली असते. राजाला मोठी चिंता, की आपल्यानंतर आपल्या राज्याचं, आपल्या सत्तेचं काय होईल. मग तो प्रधानमंडळ वगैरे नेमतो. त्यांच्यावर राज्याची बरीचशी जबाबदारी सोपवली जाते. राजपुत्र समंजस व लायक होताच त्या मंडळाने राजपुत्राला कारभार सोपवावा असं ठरलेलं असतं. राजाचं राज्यकारभारातून लक्ष विचलित झालेलं असतं. प्रधानमंडळात चांगले-वाईट असे दोन्ही प्रवृत्तीची लोकं असतात. त्यांच्या अंतर्गत संघर्ष सुरू होतो. जनतेतही नाराजी अन असंतोष निर्माण होऊ लागतो. राज्याची घडी सगळी विस्कटते.

अचानक एक दिवस असा उजाडतो की राज्याच्या सीमेवर एक शूरवीर सेनापती लाखांची फौज घेऊन उभा टाकलेला दिसतो. त्या सेनापतीने राज्यातील असंतोष वाढवा यासाठी प्रयत्न केलेले असतात. राज्यातील काही घरभेदयांना त्या शूर सेनापतीने हाताशी धरलेलं असतं. त्याला आता राज्य काबिज करायचं असतं. पोखरलेल्या घराला पाडायला कितीसा वेळ लागतो? गाफिल राजा, अपरिपक्व राजपुत्र अन विभागलेले मंत्री याचा लाभ उठवत तो एका तडाख्यात संपूर्ण राज्य काबिज करतो. अनेक वर्षे राज्य केलेलं घराणं तडीपार होतं. त्याच त्याच सत्तेला अन प्रधान मंडळांच्या गैरकारभाराला कंटाळलेली जनता त्या शूर सेनापतीचे आभार मानू लागते अन डोक्यावर बसवते. सुखाचं नवीन पर्व सुरू झालेलं असतं. एक अध्याय संपलेला असतो.

तिकडे राज्य पराभूत झालेला राजा आपल्या राजपुत्राला तयार करायचे प्रयत्न करत असतो. कारण राजपुत्रालाच गादीवर बसण्याचा अधिकार असतो. आहे त्या सोंगटीवरच डाव जिंकायचा असतो. राजपुत्रालाही आता झळ पोहोचत असल्याने तो जागा होतो. सोबत राहिलेले प्रधानमंडळ अन सैन्यही जरा सावरतं. राजा आपल्या परीने आपल्याला पराजित केलेल्या त्या शूर सेनापतीशी संघर्ष करत असतो. पण इतक्या मोठ्या परभवानंतर अन तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी तो संघर्ष अपुरा पडू लागतो. छोट्या-मोठ्या चकमकी होतात पण प्रत्येक ठिकाणी पराभव होऊ लागतो. आधीचा शूर सेनापती आता महाराजा झालेला असतो. विरोधात कोणीच नाही हे बघून तोही मस्त राहतो.

काही वर्षे अशीच जातात. राजपुत्र हळूहळू समजदार होऊ लागतो. आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय, आपल्या जीवनाचं लक्ष काय हे त्याला समजू लागतं. ज्या ठिकाणी आपण असायला हवं तिथे कोणीतरी दुसरंच बसलं आहे. आपला अधिकार आपल्याला मिळायला हवा. ज्या चुका झाल्या त्या सुधारायला हव्यात असं त्याला वाटू लागतं. राजपुत्र राजाच्या नेतृत्वाखाली लढाईच्या मैदानात उतरू लागतो. पण मखमली गालिच्यांच्या खाली पाय ठेऊन माहीत नसलेल्या राजपुत्राला युद्ध आणि संघर्ष वगैरे झेपत नाही. तो युद्धाच्या मैदानात कसाबसा उभा राहतो, पण आत्मविश्वास नसल्याने तो म्हणावी तेवढी लढतही देऊ शकत नाही. सैन्यालाही राजपुत्राच्या क्षमतेवर विश्वास नसतो. पण अंनुभावातून आणि लोकांच्या आलोचनेतून तो शिकत असतो. राजपुत्र स्वतःमध्ये सुधारणा करत असतो.

राजपुत्राचा अन त्या शूर सेनापतीचा विविध पातळ्यांवर छोटा-मोठा संघर्ष होत असतो, पण राजपुत्रला नेहमी पराभवाची धूळ चाखावी लागते. पण हळूहळू तो शूर सेनापतीला समजून घेऊ लागतो. त्याचा विजय कशात आहे हे जेंव्हा राजपुत्राला समजतं तेंव्हा तो सावध होतो अन वेगळ्या पद्धतीने कामाला लागतो.

मोठ्या लढाईची तयारी सुरू असते. पण तत्पूर्वी छोट्या-मोठ्या लढाया होत राहतात. बहुतेक वेळा राजपुत्र पराभूत होतो, पण प्रत्येक लढाईदरम्यान त्याच्यात सुधारणा होत असते. तिकडे महाराज झालेला शूर सेनापतीला राजपुत्र अजूनही भोळसट अन अनाडी वाटत असतो. त्याचं मिळवलेल्या राज्यावर उत्तम शासन करण्यापेक्षा राज्याची सीमा वाढवण्यात जास्त लक्ष असतं. नवा महाराजा अन जुना राजपुत्र यांच्यातील रोजच्या लुटुपुटूच्या लढाईला जनताही वैतागते.

आता लढाया अटीतटीच्या होऊ लागतात. शूर सेनापतीला राजपुत्र चांगली टक्कर देत असतो. लढाईतील एखादा क्षण जिंकून जाणे हेसुद्धा राजपुत्राला खूप महत्वाचं वाटत असतं. शूर सेनापतीही सावध होतो. सोबतचे अतृप्त साथीदारही अंतर्गत कलह निर्माण होतील अशी परिस्थिती निर्माण करत असतात. साम-दाम-दंड-भेद वापरुन जिंकलेल्या लढाईपेक्षा राजपुत्राचा वाढणारा आत्मविश्वास शूर सेनापतीला धोकादायक वाटत असतो.

एके दिवशी राजपुत्र शूर सेनापतीच्या पूर्वीच्या मूळ राज्यात जाऊन हल्ला चढवतो अन त्याच्या राज्याचं मोठं नुकसान करतो. राजपुत्राचा पराभव होतो तरीही त्याने शूर सेनापतीच्या राज्यात जाऊन त्याला घाम फोडला ही बातमी वार्‍यावर पसरते. इतर राज्यांच्या विखुरलेल्या फौजा आता एकत्रित येऊ लागतात. आपापली राज्ये परत मिळवायची असतील तर सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे ही गरज लक्षात येते.

एक प्रचंड मोठी लढाई होते. अगदी अटीतटीची! तुंबळ हाणामारी! दोन्हीही बाजूचं सैन्य कामी येतं, पण अखेर मोठ्या संघर्षाने राजपुत्राचा अन सहकारी राजांचा विजय होतो. हा विजय विरोधी राज्यांच्या एकत्रीकरणसाठी महत्वाचा ठरतो.

कधीही पराभव न पाहिलेल्या अजेय शूर सेनापतीचा सततच्या पराभवाने कणखर झालेल्या राजपुत्राशी अखेरचा सामना होणार असतो. जीवन-मरणाच्या ह्या लढाईत सबंध देशाचं भवितव्य ठरलेलं! आता बघायचं एकच की, हिसकावून घेतलेलं सिंहासन शूर सेनापती टिकवतो की आपल्या पूर्वजांची परंपरा चालवण्यासाठी राजपुत्र आपला अधिकार परत मिळवतो.

ही कथा सहज सुचली म्हणून सांगितली. याचा संबंध कसा आणि कुठे लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कर्नाटकात जे झालं ते झालं. आता मुद्दा उरतो की पुढे काय होणार. मोदी-शहा जोडीला हरवता येतं, त्यांच्याशी संघर्ष करता येतो अन त्यांना अडवताही येऊ शकतं हे कर्नाटकच्या निवडणूकीचा निष्कर्ष. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रादेशिक पक्षांना कॉंग्रेस ही भाजपपेक्षा थोडीशी जवळची वाटू लागली आहे. कारण केंद्रीय सत्ता, भाजपची साधन-संपत्तीची आमिष-दहशत आणि भाजपकडे असलेला मोठा आकडा हे सगळं झुगारून जेडीएस ने कॉंग्रेसचा आधार घेतला हे महत्वाचं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे स्वतःकडे मोठा आकडा असूनही कॉंग्रेसने जेडीएस ला ‘विनाअट’ पाठिंबा दिला. ही सगळी बदलत्या काळाची समीकरणे म्हंटली पाहिजेत. भाजपचा सध्याचा नूर आणि सुर कुठल्याही प्रादेशिक पक्षांना पटणारा नाहीये.

भाजपची धोरणं किंवा विचारधारा यापेक्षा भाजपची राजकीय महत्वाकांक्षा ही प्रादेशिक पक्षांना जास्त धडकी भरवणारी. प्रादेशिक पक्ष व प्रादेशिक अस्मिता धुळीस मिळवून भाजप विविध राज्ये गिळंकृत करू पाहतोय हे एव्हाना प्रादेशिक शक्तींना कळालेलं आहे. मित्रपक्षांच्या आधारे राज्य मिळवायचं आणि नंतर मित्रपक्ष संपवायचे हे मोदी-शहांच्या भाजपचं वर्तन न पटणारं आहे. शिवसेना, टीडीपी, नितीशकुमार वगैरे वगैरे ही उदाहरणे ताजी आहेत. त्यामुळे भाजपशी कधीना कधी संघर्ष करावाच लागणार हे अटल सत्य मानून प्रादेशिक पक्ष भाजपच्या विरोधात एकसंध उभी राहताना दिसत आहेत.

कॉंग्रेस आधी आजच्या भाजपसारखी वागायची म्हणून तत्कालीन भाजपचे नेते अटलजींच्या नेतृत्वाखाली 28 प्रादेशिक पक्ष एकत्रित झाले. तेंव्हा कॉंग्रेसविरोधात (केवळ पक्ष नव्हे तर कॉंग्रेसच्या एककल्ली व अहंगड असणारी विचारधारा) एकत्रीकरण झालं होतं. तेंव्हाच्या माजोरी कॉंग्रेसपुढे नम्र, सभ्य अन उदारमतवादी अटलजी वाजपाई प्रादेशिक पक्ष व नेत्यांना जवळचे वाटत होते. आज हीच सगळी प्रक्रिया कॉंग्रेसच्या बाजूने व भाजपच्या विरोधात होऊ लागली आहेत. मोदी हे इतरांचं ऐकत नाहीत आणि मनाचा कारभार करतात हे खरं दुखणं आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष, नेते व अस्मितांना काहीच वाव राहिला नाही. त्या नेत्यांना व पक्षांना राहुल गांधी यांच्यासारखा सहजासहजी झुकवता येईल असा नेता जर केंद्रात असला तर हवच आहे. दिल्लीतील बादशाह थोडासा कमजोर असणे हे छोट्या राज्यांना फायदेशीर ठरतं हा जुना इतिहास आहे. पण आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचं अशा भूमिकेत असणार्‍या भाजपला रोखल्याशिवाय प्रादेशिक पक्षांना अर्थ उरणार नाही हे सत्य आहे.

गुजरातची निवडणूक ही राहुल गांधी यांची एक नेता म्हणून प्रतिमा उभी करण्यासाठी पुरेशी आहे. आता इतर प्रादेशिक पक्षांना फक्त स्वतःची ताकत वाढवून ती कॉंग्रेसच्या पाठीशी उभी करायची आहे. आज जर कॉंग्रेस पडती भूमिका घेऊन ‘भाजपला रोखणे’ हा एकमेव अजेंडा घेऊन काम करत असेल तर लोकसभेची निवडणूक भाजपला कठीण जाऊ शकते. मोदींची एकाधिकारशही सध्या कोणालाही नको आहे. प्रादेशिक पक्षांना राज्यातील सत्तेत अधिक स्वारस्य असतं. कॉंग्रेस आणि भाजपा यांना केंद्रीय सत्तेत जास्त रस असतो. प्रादेशिक पक्षांना जर त्या-त्या राज्यात ताकत दिली अन तेथे हस्तक्षेप होणार नाही याची ग्वाही दिली तर ते केंद्रात सत्तेत येण्यासाठी कॉंग्रेसला मदत करू शकतात.

अशी बातमी आहे की, कर्नाटकात कॉंग्रेसने जेडीएस ला विनाशर्त पाठिंबा देऊन भाजपचे सरकार येण्यापासून रोखावे, यासाठी इतर राज्यातील काही प्रादेशिक नेत्यांनी प्रयत्न केले होते. येणार्‍या लोकसभा निवडणुकीतही कदाचित हीच रणनीती अवलंबली जाईल. काहीतरी करून कॉंग्रेसला उभं करायचं. कॉंग्रेस जर 150 चा आकडा गाठू शकली आणि भाजप स्वबळावर बहुमतापासून दूर राहिली तर देशातील इतर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात. देवेगौडा, गुजराल हे ज्या स्थितीत पंतप्रधान बनले किमान तशी स्थिती निर्माण होऊ देणे यातच भाजपचा पराभव असणार आहे. कारण कॉंग्रेस व इतर पक्षांना भाजप (मोदी) सत्तेवर नको असणं हे जास्त महत्वाचं वाटतं.

एक मुद्दा अधोरेखित केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. तो म्हणजे शिवसेनेचा! कॉंग्रेसने जो विचार करून जेडीएस ला सत्ता दिली तो विचार शिवसेनेसाठी खूप आनंददायी आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जर भाजप स्वबळावर निवडून येऊ शकली नाही तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊ शकतात. यात जर शिवसेनेला इतर दोघांपेक्षा (आजच्या परिस्थितीनुसार) जास्त जागा मिळाल्या तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी सेनेला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. मध्यंतरीच्या काळात तशा हालचालीही झाल्या होत्या. सध्या शिवसेनेचा स्वबळाचा जोर हा त्याचसाठी असावा. कारण स्वतः स्वबळावर निवडून येण्यापेक्षा भाजप स्वबळावर निवडून येणार नाही इतकीच काळजी सेनेला सध्या घ्यावी लागणार आहे.

गुजरात विधानसभेची निवडणूक ही ट्रिगर होती. कर्नाटकची निवडणूक हा पहिला प्रयोग आहे. लोकसभा निवडणूक हे खरं संघर्षाचं मैदान असेल. येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत स्वतः निवडून येण्यापेक्षा विरोधकाला अडवण्याचे खेळ जास्त खेळले जातील. ज्याची रणनीती उत्तम असेल तोच लोकशाहीच्या ह्या सर्कसचा रिंगमास्टर असेल.

-8-8-8-समाप्त-8-8-8-

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

माजलेले बोके अन सोकावलेले उंदीर!

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!