एवरेस्ट शिखरावर!

एवरेस्ट शिखरावर!

प्रेरणादायी चित्रपट  ||  पूर्णा मनावथ  ||  एक संस्मरणीय अनुभव  ||  दिशा देणारा

Image result for poorna movie

प्रेरणा म्हणजे काय? मानसाच्या आयुष्यात प्रेरणा असणं इतकं महत्वाचं का असतं? आणि प्रेरणादायी प्रवास म्हणजे नेमका काय असतो?

आज सगळीकडे राखीपोर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. बहीण भावाच्या नात्याचा हा उत्सव. योगायोगाने, नेमकं आजच “पूर्णा” हा चित्रपट बघण्यात आला. राखी पोर्णिमा हे केवळ भावा-बहिणीच नातं साजरा करायचा दिवस नसून तो भावंडांचा सण असतो. कोणाच्याही आयुष्यात पहिला मित्र-सोबती म्हणजे त्याचा भाऊ किंवा बहीण असतो. लहानपणी दोन बहिणी जितक्या जवळ असतात तितकं जवळचं कोणीच असत नाही. अगदी याच प्रकारचं बहिणी-बहिणीतील अतूट नातं पूर्णा या चित्रपटात पाहायला मिळतं.

राहुल बोस दिग्दर्शित हा चित्रपट पूर्णा मलावथ हिच्या संघर्षमय अन प्रेरणादायी प्रवासाचं सुरेख वर्णन करतो. पण ही पूर्णा कोण? खरं तर चित्रपट बघेपर्यंत हे मलाही माहीत नव्हतं. पण चित्रपट संपताच ह्या मुलीबद्दल मनात प्रचंड आदर आणि अभिमान वाटू लागला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी माऊंट एवरेस्टचं शिखर सर करणारी मुलगी!

बर्‍याचदा संघर्ष काय आहे हे संघर्ष करणार्‍यालाही माहीत नसतं. संघर्षाचा प्रवास तर सुरू झालेला असतो, त्याचा शेवट कुठे आणि कसा होईल याचं भान प्रवासाच्या सुरूवातीला नसतं. पण आपण नियतीच्या भव्यदिव्य योजनेचे साधक आहोत याचं भान आलं की प्रवासाचं गांभीर्य येतं. हा प्रवास सुरू जरी आप्तांच्या साथीने झाला असला तरी शेवटाकडे जाताना प्रवास एकट्यानेच पूर्ण करावा लागतो. आणि त्या एकांतक्षणी, त्या घटकेत धावून येतात मनाच्या गाभार्यात खोल कुठेतरी घर करून असलेल्या अमूल्य आठवणींचा ठेवा. तोच आपल्याला प्रेरणा देऊन जातो अन विश्वाची सर्व शक्ति आपल्या अंगी संचारते. मग येणारा प्रत्येक अडथळा हा त्या शक्तिपूढे गुडघे टेकतो अन अश्वमेध यज्ञ संपन्न व्हावा तसा विजय होतो.

पूर्णाच्या आयुष्यात तिच्या थोरल्या बहिणीला खूप महत्वाचं स्थान असतं. संपूर्ण चित्रपटातून जर कुठली भावना जर ठळकपणे अधोरेखित होत असेल तर ती ह्या नात्याची आहे. आयुष्यात कोणीतरी लागतो जो तुम्हाला परभवाच्या क्षणी उभं राहण्यास प्रेरित करतो. पूर्णाच्या आयुष्यात तिची मोठी बहीण हेच सर्वस्व असते. केवळ चांगलं खायला मिळेल म्हणून तेलंगणा मधील आदिवासी पाड्यातील ही मुलगी सरकारी वसतिगृहात दाखल होते. आणि तेथून एवरेस्ट सर करण्याचा जो प्रवास आहे तो अक्षरशः थक्क, स्तिमीत अन स्तब्ध करून टाकणारा आहे. राहुल बोस या सर्जनशील माणसाने ह्या चित्रपटवर घेतलेली मेहनत प्रत्येक फ्रेम अन प्रत्येक संवादातून जाणवते.

चित्रपटात “तुला एवरेस्ट का सर करायचं आहे?” याचं उत्तर नसलेली पूर्णा ते “मेरको ये करने दो” असा हट्ट करणारी पूर्णा हे क्षण खूपच हळवे अन तितकेच प्रेरणादायी ठरतात. ते क्षण केवळ पडद्यावरच न राहता आपण प्रेक्षकही ते अनुभवू शकतो इतक्या प्रभावी पद्धतीने ते चित्रित केलेले आहेत. चित्रपटात एक क्षण आहे जेंव्हा पूर्णा एवरेस्ट सर करते आणि काही फ्रेम्स अतिशय silently डोळ्यासमोरून जात असतात. त्यात प्रवीण कुमार हातात फोन घेतात, गावाकडे त्या क्षणाची आतुरतेणे वाट बघणारी मंडळी जल्लोष करतात आणि पूर्णा त्या सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा घेऊन उभी असते… ते क्षण, चित्रपटातील त्या सायलंट फ्रेम्स प्रेक्षकांना एवरेस्ट वर असलेल्या शांतातेचा अनुभव करून देतात. संपूर्ण चित्रपटातील त्या मुलीचा संघर्ष बघितल्यावर त्या शांत क्षणाला पहिली भावना ही “क्या बात है, तू करून दाखवलंस!” अशीच उमटते. अश्रुंचा एक एक थेंब हा यशाच्या यज्ञात संघर्षाची, वेदनेची आहुती दिल्याची साक्ष देत असतो. तेंव्हा जाणवतं की हा चित्रपट फक्त चित्रपट नाही तर त्याहीपेक्षा जास्त काहीतरी देऊन जातोय. पूर्णा मलावथ ने तिच्या आयुष्यात जितका संघर्ष केला आहे तो ह्या चित्रपटाद्वारे आपल्या काळजाला भिडतो अन रसिकप्रेक्षक त्याच्याशी संलग्न होतो. चित्रपटाची भाषा वेगळी आहे, शैली वेगळी आहे. कोणाचंही नायकीकरण किंवा नेगेटिव shades दाखवण्यापेक्षा परिस्थितीचे गडद रंग जास्त ठसठसशीतपणे नमूद केले आहेत. प्रत्येकात चांगले वाईट गुण असतात. सिस्टममध्येही चांगल्या-वाईट प्रवृत्ती असतात. पण जेंव्हा प्रेरणादायी प्रवासाचा पोवाडा गायचा असतो तेंव्हा चांगल्या गुणांची मांडणी करून चित्र खुलवता येतं. सरकारी अधिकारी, राजकरणी ते मित्र असे अनेकजण पूर्णाच्या आयुष्यात असतात ज्यांनी केलेली मदत अन दिलेला आधार हा मोलाचा ठरतो. तोच इतरांनीही अवलंबावा हा संदेश महत्वाचा वाटतो. आयुष्यात गुरु, Guide अर्थात चांगला मार्गदर्शक भेटणं किती महत्वचं आहे हेही चित्रपटातून तितक्याच सुंदरपणे मांडलं आहे.

चित्रपटाची गती सुरूवातीला थोडीशी संथ वाटते. एखाद्या सामान्य चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही थोडासा अडखळत पुढे जात असतो. पण मध्यंतरानंतर चित्रपट जो पकड घेतो तो सर्वोच्च शिखरावर घेऊन जातो. चित्रपटाचा प्रवासही एखादं उत्तुंग शिखर सर केल्याप्रमाणे आहे. चित्रपटाला विनाकारण आर्ट मूवी करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा विनाकारण कमर्शियल मूवीचा साज चढवण्याचा प्रयत्न झाला नाही ही या चित्रपटाची विशेषता म्हंटली पाहिजे. चित्रपटाचं narration हे सर्वात प्रभावी आहे. राहुल बोसने निभावलेली भूमिकाही सुरेख जमली आहे. संगीत अजून प्रभावी करता आलं असतं पण जे गीत-संगीत आहेत ते चित्रपटाला अन विषयाला साजेसे आहेत.

वो तूफ़ान क्या, चट्टानें जिसका मोड़ दे
वो उड़ान क्या, जो ऊँचाई पे दम तोड़ दे…

चित्रपटात हे गाणं दोनदा येतं जे स्फूर्ति देणारं आहे एवढच सांगेन. कारण तो अनुभव रोमांचकारी आहे.

चित्रपटात एक संवाद आहे जो एका विशिष्ट परिस्थितीत येतो.

“तुम्हारा दिल टुट गया है| इसका मतलब ये नही की तूम कमजोर हो|”

हा संवाद खूप महत्वाचा आहे. कुठलीही लढाई जिंकणे किंवा कुठलही यश प्राप्त करने यासाठी मनाने तयार असणं गरजेचं असतं. आत्मविश्वास असला की माणूस काहीही करू शकतो. पूर्णाचे शिखराच्या दिशेने पडणारे अखेरची काही पाहुले तिच्या आयुष्यातील प्रत्येक आठवणीला जागं करत असतात. अगणित दुखाचे डोंगर करून हे यशाचं शिखर पार होत असताना तिच्या मनाची होणारी घालमेल प्रेक्षक स्पष्टपणे मेहसुस करू शकतो. एक पर्व संपलेलं असतं. उदय होत असतो. वेगाने मागे जाणारे क्षण अन हळुवारपणे स्पर्श करणारा सुखाचा क्षण! सगळं असंस्मरणीय!

संपूर्ण चित्रपट येथे बघा!

 

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

चित्रपटातील मित्र!

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!