पीपली लाईव्ह

पीपली लाईव्ह

पीपली लाईव्ह  ||   हिन्दी चित्रपट समालोचन  ||  Review  ||  चित्रपट समजून घेताना  ||

Image result for peepli live movie

माणसाला जगण्यासाठी किती पैसा लागतो. अगदी अत्यल्प पैशातही तो आनंदाने जगू शकतो. पण अधिकाधिक पैसा मिळवणे हेच त्याच्या आयुष्यचं ध्येय बनून जातं. केवळ पैसाच नाही तर जिंकणं, त्यातही प्रतिस्पर्ध्यापेक्षा मागे न पडणे याला आजच्या युगात जास्त महत्व आलेलं आहे. स्वतःच्या विजयासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. मग त्यापुढे दुसर्‍यांच्या विवंचना, वेदनांची पायमल्ली केली तरी त्याची खंत वाटत नाही. आपला समाज इतका संवेदनाहीन अन व्यवहारी विचारांचा झाला आहे. अगदी हीच संकल्पना “पीपली लाईव्ह” या चित्रपटातून अतिशय मार्मिकपणे मांडली आहे.

आपल्या लोकशाही व्यवस्थेत जे काही महत्त्वाचे भाग मानले जातात त्यात सामान्य माणूस, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि माध्यमं हे महत्वाचे भाग आहेत! पीपली लाईव्ह या चित्रपटातून ह्या सर्वांचे मुखवटे उतरवले आहेत. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जगणार्‍या यंत्रांचं यामधून दर्शन घडतं. एक संवेदनाहीन समाजाचं वास्तविक दर्शन घडतं.

एक माणूस मरतोय, आत्महत्या करतोय याबद्दल कुठलही खेद नसणार्‍या व्यवस्थेत आपण राहतोय याची जाणीव होते. एका माणसाचा मृत्यू हा केवळ एक इव्हेंट असतो. स्वतःचं स्वार्थ साधणारा! स्वतःचे हेतु साधणारा!

नथ्था आणि त्याचा थोरला भाऊ बुधीया हे भारतातील सामान्य शेतकरी. एका सर्वसामान्य शेतकर्‍याची असते तीच त्यांची विवंचना. जगणं महाग होतं तेंव्हा ते मरणाची वाट धरतात. आत्महत्या केली तर आपल्या पूर्वजांची जमीन वाचेल, मागे राहिलेलं कुटुंब तरी दोन वेळची भाकरी खाऊ शकेल हे त्यामागचं साधं गणित. गावातल्या स्थानिक राजकरणी आणि ठाकुर कडे जेंव्हा ते भाऊ स्वतःची अडचण घेऊन जातात तेंव्हा त्यानेच त्यांना मरायचा सल्ला दिलेला असतो हे विशेष. कुटुंबाच्या जगण्याचा संघर्ष, कुटुंबाची फरफट आत्महत्येने संपेल अशी भोळी आशा हा अडाणी शेतकर्‍यांना असते.

हरिणीची वाट चुकलेला पिल्लू जंगलात भटकावं अन सदा शिकरीच्या शोधात असणार्‍या लांडग्यानी त्याला शिकार बनवावं अशी घटना घडते. TRP च्या मोहात अडकलेले माध्यमांना ही आत्महत्येची बातमी कळते अन सुरू होतो मृत्युचा सोहळा! चहूबाजूंनी लचके तोडले जातात.

माध्यम! ज्यांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. जर सरकारदरबारी न्याय मिळाला नाही तर आपल्यावर झालेला अन्याय जगासमोर मांडता येतील असं हक्काचं व्यासपीठ म्हणजे माध्यमं. पण दुर्दैवाने, ज्या चौथ्या स्तंभावर लोकशाही टिकून ठेवायची जबाबदारी आहे तोच स्तंभ आज डगमगतोय आणि व्यावसायिकरणाच्या नादात आपली प्रतिष्ठा गमावतोय हे या चित्रपटातून अधोरेखित केलं आहे.

त्यांना नथ्था च्या जगण्या-मरण्याशी कसलही देणं-घेणं नाही. त्यांना फक्त प्रतिस्पर्ध्याला मागे टाकून अव्वल नंबर गाठायचा आहे. स्वतःचं चॅनल मोठं करायचं आहे. आणि त्याहीपलीकडे जाऊन त्यांना पोसणार्‍या राजकारण्यांना खुश ठेवायचं आहे.

समाजातील समस्या, अनाचार सरकारसमोर मांडायचा, जगासमोर आणायचा हे खरं कर्तव्य असणारी माध्यमे क्रमवारीच्या गणितात मागे पडू नये म्हणून नसलेल्या बातम्या निर्माण करतात, राजकारण्यांच्या इच्छेनुसार कार्य करतात ही भीषण वास्तविकता चित्रपटातून समोर येते. हे केवळ चित्रपटातच आहे असं नाही, तर चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. 26/11 चा हल्ला, याकुब मेमन फाशी, इंद्राणी मुखर्जी केस ते तैमुरचं बालपण इथपर्यंतचं सत्य तर आपण डोळ्यांनी पाहतो आहोत. माध्यमांनी स्वतःचं कर्तव्य बजावलं नाही हे तर ढळढळीत सत्य आहे.

संवेदनशीलता हरवलेल्या, पूर्णतः व्यवहारी बनलेल्या निष्ठुर माध्यमांचा कुरूप चेहरा चित्रपटातून विडंबनात्मक पद्धतीने समोर आणला आहे. बातमी येताच झुंडीने गावात शिरणार्‍या माध्यमांच्या व्हॅन आणि बातमी संपताच कचरा अस्ताव्यस्त टाकून गाव सोडून जाणार्‍या व्हॅन येथेच चित्रपटाचा खरा अर्थ दडलेला आहे.

राजकारण्यांना तर माणसांच्या रूपात मते दिसत असतात. मरनारा सामान्य शेतकरीही ते जातीच्या चष्म्यातून बघतात आणि प्रत्येक घटना त्यांच्या दृष्टीने मतांची बेगमी करणारा तमाशा वाटत असतो. शह-काटशहाच्या राजकरणात लोकशाही व्यवस्थेचे धिंडवडे काढले जात असतात. सत्ता-संपत्तीचा वापर करून माध्यमांना शय्यासोबती करणार्‍या ललनेप्रमाणे वापरलं जातं. मग कसलाच हिशोब राहत नाही. निर्ढावलेले राजकरणी आणि लज्जा सोडलेली माध्यमे अन दलाल बनलेलं प्रशासन देशाच्या अब्रूची लफ्तरे वेशीवर टांगतात.

People play politics. Either you are a victim or you just can clap. You don’t own the right to not to play the game.  

चित्रपट एवढंच भाष्य करत नाही. त्याचा आवाका अजूनच मोठा आहे. त्यातून सांगितलेल्या बाबी अजूनच महत्वाच्या आहेत. चित्रपटात माध्यमांसोबतच राजकरणी, प्रशासन, पोलीस प्रशासन, ग्रामीण जनजीवन, आणि शेतकरीही यांच्यावरही हा चित्रपट भाष्य करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मूळ विषय असला तरी त्याला अनेक पदर आहेत.

एका बाजूला नथ्था आणि त्याचा भाऊ राष्ट्रीय पातळीवर चमकत असतात आणि दुसरीकडे एक सामान्य शेतकरी असतो, होरीमिथा नावाचा! त्याचीही शेती जप्त झालेली असते तोही तितकाच गांजलेला असतो. पण परिस्थितीला शरण न जाता तो कष्टाने जगत असतो. आत्महत्या हा पर्याय तो निवडत नाही. जोपर्यंत शक्ति आहे, संघर्षाने तो जगतो आणि एके दिवशी त्याच स्वाभिमानाने मरूनही जातो. हा मार्ग नथ्था आणि त्याचा भाऊ निवडत नाहीत. ते पळवाट निवडतात. त्यांची अवहेलना होते. आत्महत्या हा पर्याय नाही हे अतिशय ठळकपणे, ठाशीवपणे इथे मांडण्यात आलं आहे. होरीमिथाच्या संघर्षाची कथा जगाला कळायला हवी असते पण पळवाट शोधणार्‍याची कथा माध्यमं हाताळतात, ज्यातून काहीच निष्पन्न होत नाही. प्रेरणा ही संघर्षातून येत असते, आत्मसन्मानाच्या लढाईतून येत असते. माध्यमांनी जर होरीमिथा ला हीरो बनवलं असतं तर ना राजकारण झालं असतं ना कोणाच्या मृत्युची अवहेलना. उलट समस्येच्या मुळाशी जाता आलं असतं. पण ते होत नाही ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे.

चित्रपटातून दिला गेलेला हा संदेश जागतिक आशयाचा आहे. कष्टाला पर्याय नाही. सुख साध्य करण्याची कसलीही पळवाट नाही. आळस, लाचारी पराभूत मानसिकता ही लयालाच घेऊन जाते. मात्र, जगण्यासाठी संघर्ष, कठोर मेहनत लागते. एका बाजूला मृत्युची वाट पत्करून कुटुंबाला जगवू पाहणारा नथ्था आहे तर दुसरीकडे सर्वस्व पराभूत होऊनही दिवसभर राबून, माती खणून दोन वेळची भाकरी पोटात ढकलून मृत्युला सामोरं जाणारा होरीमिथा आहे. निवड आपल्या समाजाला करायची आहे. माध्यमांनी ठरवलं पाहिजे, कोणाचं नायकीकरण करायचं. राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे कोणाच्या पाठीशी उभं राहायचं. प्रशासनाने ठरवलं पाहिजे कोणाला मदत करायची आणि सामान्य माणसाने ठरवायचं की आपल्याला काय बनायचं आहे.

लहान मुलं अतिशय एकाग्र होऊन साबणाच्या बुडबुड्यांशी खेळत असतात. त्यात त्यांना कोण आनंद होत असतो. पण हा निरर्थक, आभासी खेळ खेळण्यात गुंतलेलं मन जेंव्हा भानावर येतं तेंव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो. एक दिवस या सगळ्यातून बाहेर आलं पाहिजे ही जाणीव महत्वाची. ती आपल्या समाजाला, व्यवस्थेला कधी होईल देव जाणे.

समाज तुमच्या-माझ्यासारख्या गुण-अवगुणांनी भारलेल्या माणसांनीच बनतो. कोणच ईश्वर नसतं. पण सुंदर समाज बनवायचा असेल तर ती प्रत्येकाची जबाबदारी असते. ती प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. ही व्यवस्था रूजली पाहिजे, समाज फुलला पाहिजे. तेंव्हा “पीपली लाईव्ह” करायला जग उभं राहील.

  • – अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

चित्रपटातील मित्र!

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!