खजिना!

खजिना!

What Long Term Investment can give to Next Gen  

दीर्घकालीन गुंतवणूक  ||  Dematerialization  || शेअर बाजार मराठीत  || Long Term Investment

खजिना! गुप्तधन! लॉटरी! असे शब्द ऐकले की अंगावर रोमांच उभे राहतात. अचानक धनलाभ कोणाला नको असतो. पण हा धनलाभ सगळ्यांच्या नशिबी नसतो. अनेकदा अनेकजण तळघर, जुने वाडे वगैरे शोधत हयात वाया घालतात. कुठे लपवलेल्या सोन्याच्या मुद्रा, हीरे, दागिने सापडतात का ह्या अपेक्षेने. पण अशांच्या नशिबी बर्‍याचदा निराशा येते.

आज हे सगळं का आठवतं आहे? तर अशाच एका खजिना सापडलेल्या व्यक्तीची भेट झाली होती. त्याचीच ही कहाणी. त्यांना हा खजिना कुठे तळघरात, जमिनीत पुरलेला वगैरे सापडला नाही, तर तो त्यांच्या घरातच कित्येक दिवस पडून होता. फक्त तो खजिना आहे हे त्यांना माहीत नव्हतं.

एक गृहस्थ आहे. त्यांचं नाव दिनकर (बदललेलं नाव). त्यांना वडलांची जुनी ट्रंक साफ करत असताना काही कागदपत्रे सापडली. ती कागदपत्रे होती Share Certificates. दिनकरला साधारणपणे अंदाज आला की हे shares शी संबंधित काहीतरी आहे. माझ्या एका मित्राच्या माध्यमातून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. ते सगळे certificates बघितल्यावर मी दिनकर यांचं अभिनंदन केलं. ते लखपती झाले होते! त्यांच्या हाती खजिना लागला होता.

झालं असं होतं की दिनकरच्या वडलांनी दहा पंधरा वर्षांपूर्वी विविध कंपन्यांचे shares आणि Mutual Fund घेऊन ठेवलेले होते. मध्यंतरीच्या काळात दिनकर कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांना याबद्दल फार काही माहीत नव्हतं. वडील सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी शहरही बदललं. कालांतराने दिनकर यांचे वडील वारले आणि ते shares काळाच्या ओघात तसेच पडून राहिले. आणि गुप्तधन जसं खर्‍या धन्याला बोलवत असतं तसे ते certificates दिनकर यांच्या हाती लागले.

खरं तर दिनकर यांचं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. कारण हा जो योग जुळून आला तो खूप योग्य वेळी जुळून आला. पहिला भाग म्हणजे दिनकर यांच्या वडलांनी सगळे shares आणि Mutual Fund हे joint नावाने घेतले होते. म्हणजे त्यांचं नाव प्रथम आणि त्यांच्या पत्नीचं, म्हणजे दिनकर यांची आई, नाव second holder म्हणून. दिनकर यांची आई हयात असल्याने Documentation चा भाग सुलभ झाला. दूसरा भाग म्हणजे SEBI च्या नव्या नियमांनुसार 5 Dec पूर्वी Physical Format मध्ये असलेले Shares हे Demat खात्यात जमा करणं आवश्यक आहे. म्हणजे दिनकर यांना योग्य वेळी ते Certificates सापडले.

याहून महत्वाचा भाग म्हणजे, दीर्घकालीन गुंतवणूक!

दिनकर यांच्या वडलांनी त्याकाळी टप्प्याटप्प्याने जे shares गोळा केले त्यातले बहुतांश दर्जेदार कंपन्यांचे आहेत.

यामध्ये 2005 मध्ये घेतलेला Infosys चे 5 shares आहेत. त्यावेळेसची ही गुंतवणूक फार तर 1000-1500 असेल. आज यांचं Valuation काढलं तर जवळपास 40000 (चाळीस हजार) इतकं ते होतं.

दूसरा शेअर होता LIC चा. साधारणपणे 2003 साली LIC चे 100 shares घेतलेले असावेत. तेंव्हा त्या शेअरची किम्मत 40 च्या आसपास होती. म्हणजे 4000 गुंतवणूक. सन 2010 ला LIC ने शेअर Split केला. Face Value 10 होती ती 2 झाली. ज्याच्याकडे एक शेअर होता त्याचे पाच झाले. म्हणजे दिनकरच्या वडलांचे 100 चे 500 शेअर्स झाले. पण दुर्दैवाने 2 रुपये Face Value असलेलं certificate त्यांच्याकडे नव्हतं. मग खटाटोप करून ते मिळवलं. आता 500 शेअर्स झाले. आज LIC च्या एका शेअरची किम्मत 500 आहे. म्हणजे 2003 साली 4000 गुंतवून त्याचं आजचा Valuation अडीच लाख फक्त!

तिसरा शेअर आहे Dr Reddy’s या कंपनीचा. या कंपनीचे 2002 ला 4 शेअर्स घेतले होते आणि 2005 ला 4 शेअर्स घेतले होते. म्हणजे 8 शेअर्स. सरासरी रेट जर गृहीत धरला तर 450 हा आहे. म्हणजे एकूण गुंतवणूक 3600 रुपये. या कंपनीने 2006 साली 1:1 असा बोनस दिला आहे. म्हणजे 8 शेअर्सचे 16 शेअर्स झाले. शेअरचा आजचा भाव 2500 आहे. म्हणजे आजचं Valuation आहे 40000 च्या आसपास. शिवाय, मध्यंतरीच्या काळात Dividend ही मिळाला नव्हता.

अजून एक शेअर certificate मिळालं ते ICICI Bank याचे. बहुदा 2003 साली याचे 19 शेअर्स घेतलेले होते. त्यावेळी याची किम्मत होती 45 रुपये. म्हणजे गुंतवणूक झाली 800 च्या आसपास. दरम्यान शेअरने बरेच चढ-उतार पाहिले. शेअर 2014 साली split झाला. FV 10 ची 2 झाली. एकाचे पाच शेअर्स झाले. म्हणजे एकूण 95 शेअर्स. त्यानंतर 2017 साली 1:10 या गुणोत्तरात बोनस मिळाला म्हणजे. एकूण शेअर झाले 104 वगैरे. आजचा बाजारभाव आहे 300. म्हणजे 30000 रुपये.

यामध्ये नमूद करण्यासारखे महत्वाचे शेअर्स म्हणजे L&T आणि Asian Paints हेही होते. त्यांचं valuation ही 70000 च्या आसपास होतं.

याप्रकारचे अजून काही certificate सापडले ज्यातील काही कंपन्या बंद झालेल्या होत्या तर काही दुसर्‍या कंपनीत Merge झाल्या होत्या. त्यांचं Valuation ही साधारणपणे 50000 वगैरे होतं.

सध्या हा सगळा शेअर्स चा गोतावळा Demat होण्याच्या process मध्ये आहे. ध्यानी-मनी नसताना दिनकर यांना हा खजिना सापडला. यामध्ये नशिबाने तर महत्वाची भूमिका बजावलीच पण दिनकर यांच्या वडलांची दूरदृष्टीही तितकीच कौतुकास्पद म्हंटली पाहिजे. एकतर त्यांनी चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. दीर्घकालीन मुदतीवर असे शेअर्स नक्कीच चांगला परतावा देतात हे पुन्हा सिद्ध झालं. दूसरा भाग म्हणजे त्यांनी कागदपत्र काम व्यवस्थित केलं होतं. सगळे सर्टिफिकेट प्लॅस्टिक फाइलमध्ये व्यवस्थित जपून ठेवले होते आणि सगळे Joint नावाने होते. यामुळे dematerialization process करत असताना फार अडथळा आला नाही. पण असे शेअर्स आपल्या नावावर आहेत हे त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं किंवा काय झालं हे कोडं आहे. पण खजिना हा सगळ्यांच्या हाती लागत नसतो, तो खर्‍या वारसाच्या हातीच लागतो. तो योग्य हाती लागला याचं जास्त समाधान असतं.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991DEMATERIALIZE YOUR SHARES ONLINE

DEMATERIALIZATION अनिवार्य

© 2018 – 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!