ठाकरेंचे सीमोल्लंघन! – भाग १

ठाकरेंचे सीमोल्लंघन! – भाग १

ठाकरेंचं सीमोल्लंघन  ||   उद्धव ठाकरेंची #अयोध्यावारी   ||  शिवसेनेचं राज्याबाहेर पाऊल  ||  राजकारण  ||  हिंदुत्ववाद

Image result for उद्धव ठाकरे अयोध्या

दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील महत्वाचा भाग मानला जायचा. अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे दसरा मेळाव्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करायचे अन आदेश द्यायचे. ते विचारांचं सोनं घेऊन शिवसैनिक काम करत असत. पण बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा ही परंपरा चालू राहतेच का नाही अशी शंका अनेकांनी घेतली होती. पण दसरा मेळावा आजही चालू आहे. बाळासाहेबांनंतरचा दसरा मेळावा तितक्या उत्स्फूर्तपणे होत नाही हे सत्य आहे. बाळासाहेबांना ऐकायला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शिवसैनिक उत्स्फूर्ततेने येत जे आज केवळ परंपरा म्हणून येतात. पण पक्ष व ठाकरे या नावावरील निष्ठा इतकी प्रबळ आहे की शिवसैनिक प्रथा म्हणून दसरा मेळाव्याला येतात.

गेली तीन चार वर्षे दसरा मेळावा आला की उद्धव ठाकरे काय बोलणार असं प्रश्नचिन्ह उभं केलं जायचं. पण त्याच्या पुढचाच प्रश्न असायचा की उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडणार का? किंवा राजीनामे बाहेर येणार का. हा पक्षाच्या टिंगल करण्याचा विषय झाला होता. गेली चार वर्षे पक्ष ती टीका आणि टिंगल सहन करत आहे. यंदाचा दसरा मेळावा खर्‍या अर्थाने ऐतिहासिक झाला. कारण म्हणजे हा पन्नासावा दसरा मेळावा होता. या दसरा मेळाव्यात एकदाही शरद पवार यांच्यावर टीका झाली नाही किंवा कॉंग्रेसवरही टीका झाली नाही. या दसरा मेळाव्यात फक्त आणि फक्त भाजप आणि मोदींवर टीका होती. दसरा मेळाव्यात जो शिव्या खातो तोच सेनेचा खरा शत्रू असतो.

उद्धव ठाकरे यांच्याकडे भाषणाची शैली नाही हे वास्तव आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यातील त्यांचं भाषण अतिशय रटाळ झालं. नेहमीचेच मुद्दे, तेच वाक्य अन तीच टीका होती. पण या दसरा मेळाव्यातून काय भेटलं असं विचारायला गेलं तर बरच काही असं उत्तर असेल. एकतर भाषनाच्या फाफट पसार्‍यात 25 नोवेंबरला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जातील हे स्पष्ट झालं. दूसरा भाग म्हणजे, “मी तिथे जाऊन मोदींना प्रश्न विचारेन” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पत्रकारांना आणि माध्यमांना भाषणातून किंवा नेत्यांच्या विधांनातून अर्थ काढता आले पाहिजेत. पण माध्यमे येथे कमी पडताना दिसली. शिवसेनेने जेंव्हा अयोध्येचा विषय घेतला तेंव्हाच हे स्पष्ट होतं की या मुद्द्यावरून शिवसेना भाजप अन मोदींना अडचणीत आणणार. यातून हे स्पष्ट होतं की देशात पहिल्यांदाच दोन हिंदुत्ववादी पक्ष आमने-सामने उभे ठाकणार. हे काहीच दिवसात दिसून आलं. विहीप व संघ परिवाराने लागलीच 25 तारखेलाच ‘हुंकार’ करायचं ठरवलं अन शिवसेनेवर कुरघोडीचं राजकारण सुरू केलं. आता तर असं दिसतय की भाजप शिवसेनेच्या अयोध्या दौर्‍यात जाणीवपूर्वक अडचणी आणत आहे. दुसरीकडे विचार करता, मोदींचे आजपर्यंतचं राजकारण बघता त्यांनी आपले विरोधक राजकरनातून बाजूला केले आहेत; संपवले आहेत. त्यांना प्रश्न विचारणारे राजकीय विरोधक ते कोणत्याही मार्गाने संपवतात. शिवसेनेचं अयोध्येत जाऊन मोदींना याप्रश्नी जाब विचारण म्हणजे युतीचा शेवटचा धागा तोडून टाकण्यासारख आहे. कदाचित उद्या सत्तेतून बाहेर पडायची घोषणा होऊ शकते. पण एक गोष्ट स्पष्ट होतेय की शिवसेना किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख भाजपशी युती करायला इच्छुक नाही. कारण इतकं मोठं पाऊल उचलताना माघार घेणं शक्य नाही हे नेतृत्वाला माहीत असावं.

यात एक जमेची बाजू बघता येईल ती शिवसेनेच्या सीमोल्लंघांनाची. ठाकरे घराण्यातील व्यक्ति पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सभा घेतोय, देशाच्या राजकरणात स्वतःहून सक्रिय होतोय. बाळासाहेब असताना त्यांनी देशातील कारभार भाजपवर सोडून दिला होता. बाबरी मशीद पतन असेल किंवा मुंबईतील दंगली असतील, बाळासाहेब देशात हिंदूंचे देव झालेले होते. अमरनाथ यात्रा असेल किंवा पाकिस्तान प्रश्न किंवा बांगलादेशी विस्थापितांचा प्रश्न बाळासाहेब देशात भाजपच्या सर्वोच्च नेत्यांपेक्षा जास्त लोकप्रिय होते. त्यांनी ठरवलं असतं तर देशभरात शिवसेना वाढवायला त्यांना काहीच वेळ लागला नसता. पण युतीच्या नावाखाली त्यांनी देशाचा कारभार भाजपवर सोडून दिला. पण आता परिस्थिती बदलली आहे. भाजपला खिंडीत पकडायचं असेल तर केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातही भाजपशी सामना करावा लागेल हे शिवसेना नेतृत्वाला समजत आहे. त्यामुळेच अयोध्या दौरा हा त्याचाच एक भाग वाटतो. जे बाळासाहेबांनी कधी केलं नाही ते आज उद्धव ठाकरे करत आहेत. अर्थात यात मतांचं राजकारण तर आहेच पण भाजपशी उघड-उघड दोन हात करायची तयारीही दिसते.

भाजपला 2014 ला सत्ता मिळाली ती केवळ विकासाच्या मुद्द्यावर नाही तर अनेक छोट्या-मोठ्या मुद्द्यावर मते मिळाली. त्यात कॉंग्रेस हा मुस्लिम लांगूलचालण करतो हा मुद्दा महत्वाचा होता. भगवा दहशतवाद सारख्या व्याख्या वापरणे किंवा हिंदू अस्मिताना न गोंजारणे हेही हिंदूंना खूप चीड आणणारी बाब होती. जनतेला सरकारमध्ये हिंदूंची मते विचारात घेणारं सरकार हवं होतं. फक्त अयोध्या ही त्यांची मागणी नव्हती पण हिंदूंचा वर्चस्ववाद ही भावनाही होती. यात समान नागरी कायदा हासुद्धा महत्वाचा घटक होता. पण बहुमतात सरकार येऊनही भाजपने या मुद्यांना गेल्या चार वर्षांत एकदाही स्पर्श केला नाही. याउलट शबरीमल मंदिर, हिंदू सनांवरील कोर्टाकडून लादली जाणारी बंधने, पाकिस्तानला काबूत न अनू शकणे अशा घटना मोदींसारखा कट्टर हिंदुत्ववादी माणूस असतांनाही घडल्या. ज्या आकांक्षाने मोदींना निवडून दिलं होतं त्यातील एकही पूर्ण होऊ शकली नाही असं हिंदूंना वाटू शकतं. एका बाजूला शिवसेनेने विचारलेल्या “मंदिर का बांधलं नाही?” या प्रश्नाचं उत्तर मोदींना द्यावं लागेल आणि जर मंदिर बांधायच्या दिशेने पाऊल उचललं तर “विकासाच्या नावाने काय केलं? मंदिर बांधून प्रश्न सुटणार का?” या विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील. काहीही केलं तरी एक वर्ग नाराज होणार आहे.

शिवसेना मतांच्या दृष्टीने भाजपला जास्त त्रासदायक ठरणार नाही कदाचित, पण सेनेच उपदरवमूल्य किती आहे हे भाजपला येणार्‍या काळात दिसेल. शिवसेनेच्या दबावाने जर भाजपने राममंदिर मुद्दा प्रामुख्याने समोर घेतला तर देशभरात शिवसेनेबाबतीत कट्टर हिंदूंच्या मनात जागा निर्माण होईल. सेनेला आज तेवढच हवं आहे. असं केल्याने भाजपमधील नाराजांना, म्हणजे निवडणुकीत ज्यांना तिकिटे मिळू शकणार नाहीत त्यांना शिवसेना हा पर्यायी पक्ष वाटू शकते. जे भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेबाबतीत केलं तेच शिवसेना देशात भाजपच्या बाबतीत करू शकते. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असं दिसून आलं की भाजपने स्थानिक पातळीवर नेत्यांची फोडफोड तर केलीच पण सोबत कट्टर हिंदू मते, जी आधी सेनेसोबत असायची, ती स्वतःकडे वळवली. अयोध्या मुद्द्यानंतर ही मते स्वतःकडे वळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल. अयोध्या आणि राममंदिर हा तसा मोठा मुद्दा वाटत नसला तरीही तो भाजपसाठी त्रासदायक ठरू शकतो. बेरजेच्या राजकरणात शिवसेनेला अयोध्या यात्रा खूप लाभदायी ठरू शकते. याला अजून एक आयाम आहे. मुंबईतील अमराठी मतांचा! मुंबईत उत्तर भारतीय आणि सोबतच गुजराती मतं लक्षणीय आहेत. उत्तर भारतात जाऊन शिवसेना त्यांच्याप्रती आपुलकी दाखवू शकते. हिंदू म्हणून एकत्र होण्याची वेळ आली तर मराठीपण आम्ही बाजूला ठेऊ असा संदेश शिवसेनेकडून गेला तर मुंबईतील काही अंशी अमराठी वर्ग शिवसेनेकडे झुकू शकतो.

Image result for अयोध्या

अयोध्या दौर्‍यामुळे राज्यभरातील कट्टर हिंदू मते सेनेच्या पाठीशी उभी राहू शकतील, देशातील राजकरणात शिवसेनेला स्थान मिळू शकेल आणि मुंबई, ठाणे पट्ट्यात अमराठी मतांची जुळवाजुळव करताना फायदा होऊ शकतो. असे तीन फायदे शिवसेनेला होऊ शकतात.

यात शिवसेनेच्या भावी राजकारणासाठी मोठा धोकाही आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव बघता ते आपल्या मुद्द्यावर कितपत ठाम राहतील यावर शंका आहे. इतकं करूनही जर भाजपाच्या थातुर-मातुर आश्वासणावर जर शिवसेनेने आपली शस्त्रे म्यान केली तर देशात व राज्यात शिवसेनेची पत उरणार नाही. शिवसेना नेतृत्व विश्वासार्हता गमावून बसेल. कार्यकर्त्यांतही दुफळी माजू शकते. जर हा मुद्दा सेनेने तितक्या गांभीर्याने हाताळला नाही आणि मधूनच सोडून दिला तर हा शिवसेनेच्या अंताची सुरुवात असू शकतो. ज्या मुद्द्यावर देशाची सरकारे बनली आणि पडली तो मुद्दा उथळपणे हाताळल्या गेला तर एक प्रादेशिक पक्ष संपवायला ‘राम’ मागे-पुढे बघणार नाही. शिवाय या अयोध्या वारीनंतर जे पडसाद उमटतील ते तितक्याच जबाबदारीने हाताळण्याचं कसब आजच्या सेनेत आहे का हाही महत्वाचा विषय आहे.

आज शिवसेनेवर जवळपास सगळेच पक्ष आणि माध्यमे टीका करत आहेत. हे साहजिकच आहे. पण हळूहळू तो क्षण जसा जवळ येतोय तसं उत्कंठा शिगेला पोहोचतीय हे मात्र नक्की. शिवसेना पक्षप्रमुखांच्या मनात काय आहे रामास ठाऊक. अयोध्येतून रामाच्या मंदीरासोबत शिवसेनेच्या नव्या समीकरणांची उभारणीही होणार आहे. जिथे 25 वर्षांपूर्वी बाबरी मशीद पाडली तिथे 25 वर्षांपूर्वीची युती तोडली जाते का? हाही उत्कंठेचा विषय आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना-भाजप युती झाली होती जी आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोचली आहे. ही अयोध्येतील रामासाठी नव्हे तर महाराष्ट्रातील शिवसेनेसाठी आर-पारचा प्रश्न आहे. दसर्‍याला ठरल्याप्रमाणे सीमोल्लंघन तर झालेलं आहे, पण आता मैदानात उतरून रनसंग्राम होतो की शस्त्रसंधी हे पाहावं लागेल.

 

पुढील भाग राज ठाकरेंच्या सीमोल्लंघांनाचा विषय!

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!