पृथ्वीवरील परप्रांतीय!

पृथ्वीवरील परप्रांतीय!

परप्रांतीय मुद्दा वैश्विक   ||   Existence  ||  परग्रह आणि स्थलांतर  ||  अस्तित्वाचे प्रश्न  ||  Migration 

Image result for existence

मुंबईमध्ये स्थानिक मराठी माणूस आणि बाहेरून आलेले परप्रांतीय हा वाद नवा नाही. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच मुंबईमध्ये मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय असा वाद आहे जो आजही चालू आहे. हा वाद जसा मुंबईत आहे तसाच पुण्यातही आहे. म्हणजे, मूळ पुणेकर आणि बाहेरून आलेले नकली पुणेकर असा. याहून पुढे जाऊन म्हंटलं तर पेठेतील पुणेकर आणि अन्य पुणेकर असा खुमासदार वादही आपल्याला बघायला मिळतोच. पण पुण्यातील हा वाद मुंबईच्या वादाइतका कट्टर नाही.

जगातील कुठल्याही देशात जा, कुठल्याही भागात जा, तिथे अशा प्रकारचा वाद नक्कीच आढळेल. तो असतोच. आणि तो कायम राहीलच.

भूमिपुत्रांचे अधिकार, स्थानिक संस्कृती आणि त्यांची जपणूक यावर अनेक युद्ध झालेत आणि होत राहतील. आज हे वाद आपल्याला शहर, राज्य आणि देशापुरता मर्यादित दिसतात. दुसर्‍या राज्यातील, शहरातील लोकं ज्यांना आपण परप्रांतीय म्हणतो, ते आपल्या येथे येऊन भूमिपुत्रांच्या रोजगारावर, हक्कांवर घाला घालत असतील, येथील संस्कृती संपवून त्यांची संस्कृती येथे रुजवू पाहत असतील तर स्थानिक जनतेचा उद्रेक होतो आणि ते आपल्या पद्धतीने लढा देतात अन परप्रांतीयांना हाकलून लावायचा प्रयत्न करतात. ही आजची समस्या नाहीये किंवा एका शहर वा देशापुरती समस्या नाहीये. याचे संदर्भ खूप दूरपर्यंत जाऊ शकतात.

भारताच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर, बांग्लादेश स्वतंत्र होत असतानाच्या संग्रामात युद्धपीडित बांगलादेशी नागरिकांनीही भारतात आश्रय घेतला होता आणि मानवतेच्या दृष्टीकोणातून भारताने त्यांना आश्रय दिलाही होता पण नंतर तेच लोक आपल्याला जड होऊ लागली आणि त्यांच्या विरोधातही आवाज उचलला गेला. सुरूवातीला हा वरवर वाटणारा मुद्दा जटिल होत गेला. कुठलाही समाज किंवा एखादा व्यक्तीही येताना एकटा येत नाही तर तो आपल्यासोबत स्वतःचं राहणीमान, विचार आणि संस्कृती घेऊन येतो. स्वतःचं अस्तित्व जपत असताना त्याला ते बाजूला ठेऊन पुढे जाता येत नसतं. हे म्हणजे ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही तशातला भाग होईल.

अगदी अलीकडेच युरोपमध्येही अशा घडामोडी घडताना आपण पाहिल्या आहेत. ISIS च्या आक्रमणानंतर हजारो नागरिक स्थलांतरित होऊन आजूबाजूच्या देशात आश्रय घेत होते. तेथे त्या मुद्द्यावरून मोठं रणकंदन माजलं होतं आणि साहजिकच दोन मतप्रवाह होते.

एकंदरीत काय तर उपर्‍यांना आश्रय देऊ नये असा एक विचारप्रवाह सगळीकडे असतोच. या विचारांच्या बाजूने उभे राहणारे कट्टर विचारांचे व्यक्तिही असतात आणि विरुद्ध बाजूला वसुधैव कुटुंबकम या मानवतेच्या विचारांना मानणारे व्यक्तीही असतात.

अशीही एक मान्यता आहे, किंबहुना तसा इतिहास आहे की भारतभूमीवर आधी फक्त आदिवासी राहायचे. ही भूमी आदिवास्यांचं घर होतं. त्यानंतर बाहेरून आक्रमणं झाली आणि नवीन संस्कृतीच्या समाजव्यवस्थेचं प्रस्थान घट्ट बसलं जे आजही कायम आहे. आज आपण त्याच आक्रमकांचे वंशज आहोत असाही आरोप आहे. म्हणजे भूमिपुत्र बाजूला पडून ज्यांच्या हाती शक्ती होती ते सत्तेत बसले आणि प्रस्थापित झाले. हे एक प्रकारचं संस्कृतिक संक्रमण घडलं असं म्हणता येईल. अशा प्रकारचं संक्रमण हे केवळ राज्यात, देशात, जगातच नाही तर ब्रम्हांडात होतच राहतं. बदल हा प्रकृतीचा महत्वाचा धागा मानला जातो. उतारावरील पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे तो निसर्गसिद्ध दिशेला होतच राहतो.

जंगलातही असाच नियम आहे. जो अधिक सामर्थ्यशाली त्याचच राज्य. जंगलात अन्न हीच प्रमुख गरज असते. जिथे अन्न मिळेत तिथे प्राणी जातात. तिथे समाजव्यवस्था नसली तरी अस्तित्वाचे प्रश्न असले की संघर्ष होतो. जो जीवंत राहतो तो जिंकतो आणि सत्ता प्रस्थापित करतो.

देशादेशात, राज्याराज्यात असे स्थानिक विरुद्ध बाहेरचे असे वाद आहेत ते ठीक आहे पण जर समजा दोन ग्रहांमध्येही जर असे वाद उद्भवले तर???

म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की समजा कितीतरी हजार वर्षांनी पृथ्वीचा अंत झाला आणि मानवाने पर्याय म्हणून दुसर्‍या ग्रहावर, जिथे सजीव जगू शकतो अशा ग्रहावर, आश्रय घ्यायचा ठरवला आणि तेथे आधीचेच काही सजीव राहत असतील तर??? या घटनेत तेथील जीव हे भूमिपुत्र आणि मानव हा परकीय आक्रमक असेल हे उघड आहे.

इथे पहिला प्रश्न येतो, तेथे जे कोण असतील ते आपल्याला स्वीकारतील का??? आणि समजा त्यांनी आपल्याला नाही स्वीकारलं आणि आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असेल तर आपण त्यांच्यावर हल्ला करून त्यांचं अस्तित्व संपवून आपलं बस्तान बसवणार का? म्हणजे आपण त्यांच्यासाठी परप्रांतीयांप्रमाणे (परग्रहवासी) असू. जर ते आपल्यापेक्षा अधिक ताकदवान असतील तर ते आपल्याला प्रत्युत्तर देऊन पराभूत करू शकतात. नसेल तर आपण त्यांना पराभूत करून तेथे आपली संस्कृती वसवू शकतो.

दुसर्‍या बाजूने विचार केला, जर समजा त्यांनी आपल्याला स्वीकारायचं ठरवलं तर आपण तिथे त्यांच्या पद्धतीप्रमाणे, त्यांच्या जीवनशैलीप्रमाणे राहू शकू का? की आपण स्वतःच्या मानवी संस्कृतीप्रमाणे राहू? तेथील जीवनशैली आपल्याला अंगीकरता येण्यासारखी नसेल तर नक्कीच आपण ती अवगत करू शकणार नाहीत. मग आपण स्वतःला शक्य आहे तसा तगून राहण्याचा प्रयत्न करू. आपण जर तेथे आपल्या संस्कृतीप्रमाणे राहू लागलो तर कालांतराने हळूहळू त्यांची संस्कृती नामशेष करून आपण स्वतःची संस्कृती सिद्ध करू. म्हणजे ज्याची भीती आपल्याला इथे मुंबईत वगैरे वाटते ती विश्वाच्या नियमात दुसर्‍या ग्रहावरही लागू पडते. म्हणजे एकंदरीत आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असेल तर आपण त्यांचा विचार करत बसणार नाही.

बरं, आता यापेक्षा थोडासा उलटा विचार करुयात. समजा अचानक एके दिवशी पृथ्वीवर काही परग्रहावरील सजीव आले आणि त्यांनी मानवावर हल्ला सुरू केला आणि पृथ्वीवर बस्तान बसवायचा प्रयत्न केला तर??? समजा त्यांचा ग्रह नष्ट झालेला असेल आणि त्यांना पृथ्वी हा त्यांच्यासाठी अनुकूल ग्रह वाटत असेल तर ते पृथ्वीवरील सर्वात प्रबळ असलेल्या माणसाला नष्ट करून पृथ्वी ताब्यात घ्यायचा प्रयत्न नक्कीच करणार आणि स्वतःचं घर बनवणार.

अशी एक मान्यता आहे की, पृथ्वीवर डायनसोरांचं अस्तित्व होतं अन येथे त्यांचंच राज्य होतं. परग्रहावरील काही जीव सजीवसृष्टी नांदू शकेल अशा ग्रहाच्या शोधात असताना पृथ्वीवर आले आणि त्यांनी डायनसोर्स या प्रजातीचा नाश केला (कारण डायनसोर हेच पृथ्वीवरील प्रबळ जीव होते) आणि स्वतःला सुलभ अशी पृथ्वी घडवली आणि त्या परग्रहवासीयांना आज आपण “मानव” म्हणून ओळखतो. तुम्ही कधीतरी “पृथ्वीवर मानव उपराच” हे पुस्तक वाचलं असेल त्यासंबंधित आहे ही संकल्पना.

स्व-अस्तित्वासाठी शेवटच्या श्वासपर्यंतचा लढा हा प्रकृतीचा पहिला नियम आहे. कुठलाही सजीव स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, जगण्यासाठी आणि स्वतःची प्रजात (कुटुंब) जगावण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. मग तो प्राणी, वनस्पति, मानव किंवा कुठला अमानवी जीव असला तरी हा नियम त्याला लागू होतोच. एकंदरीत, सगळा ताकदीचा खेळ आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःचं घर राखण्यासाठीची धडपड. छोटयातील छोटी आणि प्रचंड मोठी घटना, गोष्ट ही प्रकृतीच्या नियमानुसारच चालते. त्याला आपण काहीही नाव दिलं तरी Creation & Destruction हा सृष्टीचा मूलभूत नियम आहे.

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!