अंतिम यात्रा!

अंतिम यात्रा!

आपल्याला वाटतं की आपल्या प्रिय व्यक्तीने कायम आपल्या सहवासात रहावं। पण नियतीला ते मान्य नसतं। स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला ताटकळत ठेवणं हा तरी कुठे न्याय आहे। मरणाच्या उंबरठ्यावर उभं राहून कितीही मागे बघण्याचा प्रयत्न केला तरी उचललेलं पाऊल मागे पडत नाही। जीवनाच्या दोरीचा पीळ संपत आला की मृत्यूच्या खाईत जावंच लागतं। आयुष्याची शिदोरी संपलेली असते अन पाप-पुंण्याचा तराजू समतोल झालेला असतो तेंव्हा कुठे दीर्घ प्रवासाची शेवट होते। कधीतरी रडत रडत सुरू झालेला आयुष्याचा प्रवास परिचितांच्या साश्रु नयनांचा निरोप घेऊन संपवावा लागतो। भोग-उपभोगाच्या सीमेपार गेलेलं शरीर पंचत्वात विलीन होण्यास आसुसलेलं असतं। आत्मा मात्र काही काळ शांतपणे उभा असतो। आपणच जन्मभर केलेल्या कर्माचे प्रतिध्वनी उमटताना ऐकत उभा असतो।

इच्छा आकांक्षा राग लोभ द्वेष प्रेम जिव्हाळा माया ममता ओढ सगळं सगळं लोप पावतं। जे ह्या जगातलं आहे ते ह्या जगातच सोडून जायचं असतं। निर्मळ निरोगी पवित्र आत्मा शुभ्र वस्त्र परिधान करून फक्त स्मितहास्य करत मागे पडणाऱ्या जगाकडे बघत असतो।

आयुष्यभर केलेल्या ईश्वरभक्तीचा संचय रिता झालेला असतो। आता खऱ्या ईश्वराच्या भेटीची ओढ असते। चिरंतर प्रवासानंतर आत्मा त्या अगाथ शक्तीशी एकरूप होतो। प्रवास संपतो…

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!