अन्वयार्थ – तुटलेली नाती, जमलेली युती!

अन्वयार्थ – तुटलेली नाती, जमलेली युती!

समीक्षा  ||  अन्वयार्थ  ||  राजकारण   || लोकसभा २०१९   ||  युती  ||  हतबलता आणि अगतिकता

Image result for युती

स्वर्गीय अटल बिहारी वाजपायी यांचं एक वाक्य होतं, “भाई, जाए तो जाए कहाँ?” या एका वाक्यातून त्यांनी त्यांच्या पक्षाची हतबलता सांगितली होती. आज वाजपायी आपल्यात नाहीत, पण आज टीव्हीवर युतीचं जे काही बघितलं ते याहून काही वेगळं नव्हतं. दोन्ही पक्षांची अगतिकता आणि हतबलता आज दिसून आली. पण आज वाजपायी असते तर त्यांनी हेच केलं असतं का? किंबहुना त्यांनी अशी वेळ येऊ दिली असती का हे त्याला उत्तर असेल.

गेली साडेचार वर्षे युतीच्या नावाखाली सत्तेसाठी चालवलेल्या पोरखेळाची सर्वोच्च पातळी आज महाराष्ट्राने बघितली. पंचेवीस वर्षांची युती एका बाजूला आणि गेल्या पाच वर्षात शिवसेना-भाजपने केलेला चिखल एका बाजूला असं म्हणायची वेळ आली आहे. जी समज, जी दूरदृष्टी सेना-भाजपच्या आधीच्या नेत्यांमध्ये होती ती आजच्या नेतृत्वात अजिबात नाही. आधी एकत्र खेळायचं, रडीचा डाव करून एकमेकांची माथी फोडायची आणि पुन्हा एकत्रच खेळायचं असा तो पोरखेळ. हे सगळं कशासाठी केलं हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

पाच वर्षांपूर्वी लोकसभेत शिवसेनेकडून हवं ते साधून झाल्यावर भाजपने हवेची दिशा बघून सत्तेसाठी युती तोडली. त्यावेळी सामान्य जनतेपासून, पत्रकार व राजकीय क्षेत्रात शिवसेनेसाठी प्रचंड सहानुभूती होती. शिवसेनेला त्यावेळी 63 जागा जिकता आल्या त्या याच सहानुभूतीतून. पण त्यानंतर शिवसेना हतबलतेने पुन्हा भाजपसोबत जाऊन मिळाली. हेही जनतेने बघितलं आणि स्वीकारलं. झोपडपट्टीत होतो तसा रोजचा तमाशा महाराष्ट्राच्या जनतेने बघितला. मुंबई महापालिकेच्या वेळेस जो राजकीय आखाडा झाला तो तर किळसावाणा होता. गल्लीतल्या कार्यकर्त्याने एकमेकांच्या सर्वोच्च नेत्यांची अब्रू काढली. त्यानंतर गेल्या सहा महिन्यात शिवसेनेने भाजपवर जे आसूड ओढले त्याला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तोड नव्हती. इतकं सगळं होऊनही आज हे दोन पक्ष एकत्र आले हे जनतेच्या खरच पचणी पडेल का? हा साधा विचारही दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने केला नाही.

गेल्या पाच वर्षातील भाजपची सत्तानीती संपूर्ण देश बघतोय. अस्तीत्वात असलेली सरकार पाडून स्वतः सत्ता मिळवणे, पीडिपी सारख्या विरोधी विचारधारेच्या पक्षांशी युती करणे अशा अनैतिक बाबी जनतेने बघितल्या. बिहारमध्ये तर लोकशाहीला लाज वाटेल अशा घडामोडी घडल्या. पण आज जे घडलं त्यात महाराष्ट्रातील शिवसेना नावाचा पक्ष होता हे जास्त बोचणारं आहे. असं नाही की शिवसेनेने अशा राजकीय खेळी कधी खेळल्या नाहीत. बाळासाहेबांनीही असे अनेक डावपेच खेळले, भूमिका बदलल्या पण तेथे सत्ता मिळवणे हा हेतु नव्हता. पण आज जे डोळ्यासमोर दिसत आहे ते सरळसरळ सत्तेसाठी स्वतःच्या धोरणांना पायदळी तुडवणे झालं. गेली चार वर्ष (अगदी कालपर्यंत) जी आगपाखड केली ती केवळ तीन-चार जागांसाठी होती का असा प्रश्न शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडतो. आणि शिवसेनेसमोर युतीसाठी झुकायचं असेलचं तर शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न कशासाठी केले हा प्रश्नही भाजपच्या कार्यकर्त्यांना पडू शकतो.

युती ही दोन्ही पक्षांसाठी निव्वळ अगतिकता आणि हतबलता आहे. भाजपाच्या विरोधात कितीही रोष, असंतोष असला तरी शिवसेनेला केंद्रात कोणत्यातरी एका पक्षासोबत जाणं गरजेचं आहे. देशात दोन राष्ट्रीय पक्ष आहेत जे केंद्रात सत्ता स्थापन करू शकतात. एक भाजप अन दुसरी कॉंग्रेस. शिवसेना घडली ती कॉंग्रेस विरोधात उभी राहून आणि शिवसेनेची हिंदुत्ववादी विचारसरणी कॉंग्रेस कधीच स्वीकारू शकत नाही. त्यामुळे उघड युतीचा हा मार्ग संपतो. राहिला मार्ग छुप्या युतीचा, तर अशा संबंधांना कधीच लोकाश्रय मिळत नाही. ती काही काळाची व्यवस्था असू शकते. त्यामुळे उरते ती भाजपा! शिवसेनेला भाजपाशी कसलंही वैर नाही, पण आज भाजपा चालवणार्‍या मोदी-शहा या जोडीशी त्यांना फारसं ममत्व नाही. मोदी-शहा ही जोडी कर्जाच्या वसुलीला आलेल्या अधिकार्‍यांसारखे आहेत, त्यांना ‘हो किंवा नाही’ इतकंच कळतं. आजतरी भाजपा इतकाच मर्यादित आहे. याच्याशी जुळवून घेण्याशिवाय सेनेकडे कसला मार्ग नाही. जेंव्हा वेळ येईल तेंव्हा हा सर्व रोख व्याजासकट वसूल केला जाईल याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. दुसरीकडे आहे मोदी-शहा यांचा भाजप. यांना शिवसेना कशासाठी हवी आहे? तर केवळ काही जागांसाठी शिवसेना सोबत असणं गरजेचं नाही, पण शिवसेनेची उपद्रवमूल्यता इतकी आहे की ती मोदी-शहा जोडीला अन भाजपला अख्ख्या देशात बेअब्रू करू शकते. त्याची केवळ एक चुणूक शिवसेनेने अयोध्या दौर्‍यात दाखवून दिली. विरोधकांना चार वर्षात जे साध्य करता आलं नाही ते या एका दौर्‍याने साध्य झालं. भाजपला हिंदुत्ववादावर कोंडीत पकडणं! शिवसेनेची ही रोजची नवी किरकिरी भाजपला त्रासदायक ठरू शकली असती. भाजपचा जो मूळ मतदार आहे त्याच्यासमोर भाजपचं ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं असतं तर भाजपने विश्वासार्हता गमावली असती. भाजपला secular वगैरेच्या विरोधात लढाई जितकी सोपी असते तितकी ती हिंदुत्ववादी शिवसेनेच्या विरोधात सोपी राहिली नसती. महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेची हिंदू मते खाऊ शकते तर देशभरात शिवसेना भाजपची मते का खाऊ शकणार नाही हे साधं गणित आहे. शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न करूनही शिवसेना संपत नाही हे लक्षात आल्यावर भाजपला एक पाऊल मागे येण्यावाचून पर्याय नव्हता. आज जे चित्र बघायला मिळालं ते मनोमिलन नव्हतं तर निव्वळ अगतिकता होती.

शिवसेनेची नाचक्की!

गेल्या चार वर्षात एकही असा दिवस नसेल की जेंव्हा शिवसेनेने भाजपवर आसूड ओढला नसेल. रोज नवनवीन हत्यार चालवत भाजपला घायाळ करायची रिघचं सेनेने लावली होती. यामुळे भाजपविरोधी असलेला मतदार सेनेच्या बाजूला झुकला होता. त्यात कॉंग्रेस-एनसीपी ची संपूर्ण स्पेस शिवसेनेने व्यापली होती. जर शिवसेना स्वबळावर लढली असती तर भाजपविरोधी मते प्रामुख्याने सेनेला मिळाली असती. या प्रक्रियेत शिवसेनेला स्वतःच्या पक्षाचा विस्तार करायची मोठी संधी होती. ती शिवसेनेने आज गमावली आहे. आज शिवसेनेची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे. जनतेने शिवसेनेला साथ दिली कारण ती खंबीरपणे मोदीच्या विरोधात उभी होती, पण तो मतदार आता शिवसेनेपासून कायमचा दुरावला आहे. दुसरीकडे, रोज भाजपाच्या विरोधात बोलल्याने, सरकारच्या कारभारावर टीका केल्याने सरकारमध्ये आम्ही सामील नाही आहोत अशी प्रतिमा सेनेने करून घेतली. आता सरकारबाबतीत चांगलं मत ठेऊन असलेला मतदारही सेनेपासून दुरावला. सर्वात महत्वाचं म्हणजे, शिवसेनेचा प्रामाणिक मतदार जो या कोलांटउडीने दुखवला गेला असेल तोही दुरावल्या गेला. तीनही मार्ग खुंटल्याने आजची शिवसेना खर्‍या अर्थाने अस्तित्वहीन आहे. केवळ पक्ष, नेते टिकवले अन सत्ता टिकवली म्हणजे पुन्हा निवडून येता येणं शक्य नसतं, लोकांचा विश्वास महत्वाचा असतो. तो कदाचित संपला असेल. अशा परिस्थितीत मनसे नावच्या पक्षाला खूप मोठी संधी आहे. शिवसेनेचा प्रामाणिक मतदार आज अस्वस्थ असणार जो कुठेतरी आधाराच्या शोधात असेल. आज महाराष्ट्रात राज ठाकरे हे एकटे आहेत. प्रयत्न करूनही -महाआघाडीची कवाडे त्यांना उघडली गेली नाहीत. जो नवमतदार मोदींच्या विरोधात सेनेकडे आशेने पाहत होता तो आता सैरभैर झाला असेल. कॉंग्रेस-एनसीपी सारखे पक्ष त्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होईल अशी शक्यता नाही. राज ठाकरे यांनी नेहमीची धरसोड वृत्ती सोडून कणखर भूमिका घेत मतदारांची मोट बांधायचा प्रयत्न केला तर आजपासून शिवसेना कमी व्हायला आणि मनसे वाढायला सुरुवात होईल. मनसेने स्वबळावर लोकसभेच्या काही जागा लढवल्या तर किमान एक-दोन जागी ते यशस्वी होऊ शकतात.

शिवसेनेची नीती.

जो विचार सामान्य माणूस, शिवसैनिक आणि पत्रकार करत आहेत तो विचार (किंवा भीती) सेना नेतृत्वाच्या मनात आला नसेल असं नाही. पण अगतिकता आणि हतबलता हेच त्याला उत्तर आहे. काही गणितं, काही आडाखे बांधून उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असेल यात शंका नाही. भाजपची केंद्रात स्वबळावर सत्ता येऊ नये हीच एकमेव मनीषा सेनेसह इतर सर्व मित्रपक्षांच्या मनात असेल. स्वबळावर सत्तेत आलेला भाजपा कसा वागतो याची उदाहरणे ताजी आहेत. भाजपला 200 च्या आत रोखायचं हाच मोदी विरोधकांचा एकमेव ध्यास आहे. त्यातील 23 जागा सेनेने आधीच पाडल्या आहेत. कारण त्या 23 जागा शिवसेना स्वतः लढणार आहे. उरल्या 25 जागा. त्या जागी शिवसेनेने भाजपला मदत करणं काही अनिवार्य नाही. याउलट, जालना, जळगाव, मुंबई नॉर्थ-वेस्ट यासारख्या ठिकाणी शिवसेना बंडखोरांच्या माध्यमातून भाजपाच्या जागा पाडायला हातभार लावेल. भाजपला महाराष्ट्रात 15 जागांच्या वर जाऊ न देणे ही सेनेची रणनीती असू शकते. जर केंद्रात भाजपा 200 च्या आसपास अडकली (ज्याची आज शक्यता सर्वाधिक आहे) आणि सेनेचे 15 पेक्षा अधिक खासदार निवडून आले तर शिवसेनेसाठी तोच विजय असेल. विधानसभा स्वबळावर लढवणे सेनेसाठी सोपं आहे कारण विधानसभेच्या अशा 150 अशा जागा आहेत जिथे शिवसेना कधीना-कधी जिंकलेली आहे. भाजपला नमवणे अशा वेळी सोयीचं जाऊ शकतं. उद्धव ठाकरेंच्या डोक्यात अशी रणनीती असू शकते. पण हे कितपत शक्य आहे यावर सर्व अवलंबून आहे.

भाजपची कोंडी!

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जनमानस कॉंग्रेसच्या विरोधात होतं आणि मोदींच्या प्रेमात होतं. 2014 ची निवडणूक सर्वार्थाने वेगळी होती, पण 2019 ची निवडणूक सामान्य आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात. गेल्यावेळी भाजपला मिळालेलं यश अनपेक्षित होतं. ते पुन्हा मिळवणं कठीण आहे. देशात विरोधकांचं एकत्रीकरण सुरू आहे. विशेषतः प्रादेशिक पक्षांनी भाजपला रोखायचा विडाच उचलला आहे. उत्तर प्रदेशचं मैदान भाजपसाठी अनुकूल नाही. पश्चिम भारतात गेल्या वेळेस सारखं अभूतपूर्व यश पुन्हा मिळू शकत नाही. दक्षिणेत भाजपला फार वाव नाही. पूर्वोत्तर, बंगाल, ओरिसा ही राज्ये भाजपसाठी आज महत्वाची आहेत. यात महाराष्ट्रात आज असलेलं संख्याबळ टिकवणे भाजपासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आजच्या पत्रकार परिषदेत शहा यांनी एक प्रकारे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरीच व्यक्त केली. उद्धव यांनी ‘चौकीदार चोर है’ असं म्हणूनही पुन्हा मातोश्रीच्या पायर्‍या चढणे ही निव्वळ अगतिकताच आहे. पुन्हा एकदा, लोकसभेत शिवसेनेला वापरुन घ्यायचं आणि विधानसभेत ‘पटक देंगे’ करायचं हेच अमित शहा यांच्या डोक्यात असणार. युती केल्याने शिवसेनेच्या जागा निवडून आणणे भाजपसाठी गरजेचं आहे कारण, शिवसेनेचा उमेदवार पडला तर कॉंग्रेस आघाडीचा निवडून येऊ शकतो. जर भाजपा पुन्हा स्वबळावर केंद्रात सत्तेत आली तर त्याच क्षणाला शिवसेना संपवण्याचं काम अधिक ताकदीने हाती घेतलं जाईल. त्यावेळी शिवसेनेच्या हातात कुठलंही हत्यार (राम मंदिर वगैरे) शिल्लक नसेल.

राजकारण निर्दयी लोकांनी सामन्यांच्या भावनेचा फायदा उचलूनच केलं जातं. त्याला कुठलाही पक्ष किंवा नेता अपवाद नाही. राजकारणाची गटार दुर्गंधीच असते. ती उघडली की सामान्यांना नाके मुरडावी लागतातच. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात गेलात तरी असलेच राजकारणी असतील. सत्तेपुढे शहाणपण नसतं. गरीबी हटाव, मंदिर वही बनाएंगे, संपूर्ण क्रांती, शायनिंग इंडिया, अच्छे दिन ही सगळी जनतेला मूर्ख बनवल्याचे उत्कृष्ट चेहरे आहेत. हल्ली मराठी, हिंदुत्व, सेक्युलरिसम, विकास हे हल्लीचे चेहरे. काळ बदलत जातो, माणसाची प्रवृत्ती काही बदलत नाही. सत्ता ही अनादी अनंत सत्य आहे, मी नाही मिळवली तर दूसरा कोणीतरी मिळवेल, जो मिळवेल तो इतरांना गुलाम बनवेल.

@Late_Night1991

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!