ठाकरे चित्रपट

ठाकरे चित्रपट

स्व. बाळासाहेब ठाकरे  यांच्या आयुष्यावरील चित्रपट  ||  ठाकरे चित्रपटाचं समीक्षण    ||  Thackeray Movie Review 

Image result for thakre full movie

ठाकरे चित्रपट बघितला. चित्रपट म्हणून बघायला गेलात तर फार काही बघायला मिळेल असं नाही. चित्रपटात नाट्य नाही पण बाळासाहेबांच्या जीवनातील महत्वाच्या घटना उलगडून दाखवल्या आहेत. चित्रपटात ज्या महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत त्या प्रभावी वाटत नाहीत. त्यात नाट्य नसल्याने ते केवळ इतिहासच एक पान वाटतं. बायोपिक असल्याने आणि त्यातही बाळासाहेबांसारखं तेजपुंज व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावरचा बायोपिक असल्याने त्यात मुख्य घटना सोडून आजूबाजूला काही रचता येणं कठीण होतं. चित्रपटात बाळासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना जशाला तशा दाखवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. बाळासाहेबांवर जे आरोप केले जातात त्या आरोपांचं खंडन तर चित्रपटातून केलेलं आहेच पण शिवसैनिकांना नवीन ऊर्जा देण्याचा प्रयत्नही केला आहे. कृष्णा देसाई हत्या, आणीबाणीला पाठिंबा, मुस्लिम लीगशी युती, जावेद मियाँदाद प्रकरण यावर स्पष्टीकरण तर आहेच पण बाळासाहेबांचे विचार किती प्रखर आणि ठाम होते हे चित्रपटातून दिसेल. काही प्रसंग बघताना रोमांच उभे राहतात.

बाळासाहेबांनी मुंबईसह महाराष्ट्राला काय दिलं, मराठी माणूस उभं करण्यात त्यांचं काय योगदान होतं आणि त्यांनी किती त्याग केला यावर जे प्रश्नचिन्ह उभं करतात त्यांनी तर हा चित्रपट बघावाच. ज्यांना शिवसेना काय (होती?) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काय आहेत हे माहिती नसेल तर त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा.

बाळ ठाकरे हा सामान्य माणूस ते असामान्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कसा हे पाहायला मिळेल. बायोपिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आयुष्यावर आहे, मला तो बाळ ठाकरे यांचा बघायला आवडला असता. कौटुंबिक कलह आणि सततचं अस्थिर आयुष्य यात शिवसेनाप्रमुख प्रभावी होत गेले आणि हळवे असलेले बाळासाहेब हरवत गेले असं वाटतं. 2012 ला जेंव्हा बाळासाहेब गेले तेंव्हा टीव्हीवरील मुलाखतीतून आणि वृत्तपत्रातून त्यांच्या प्रियजनांच्या तोंडून जे ऐकायला, वाचायला मिळालं त्यातून बाळ ठाकरेच जास्त डोकावत होते. माध्यमांना आणि लोकांना त्यांच्यातील शिवसेनाप्रमुख हवा असायचा.  कदाचित ती समाजाची गरज होती.

संवेदनशील माणसं एका बाजूला कलतात. त्यांच्यातील हळवेपणा त्यांना कठोर बनवत जातो. सर्वांवर विश्वास ठेवणाऱ्याला परताव्यात विश्वासघात पदरी आला की तो हतबल आणि कठोर होऊन हिटलर बनतो…

बाळासाहेब प्रचंड संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्या आयुष्यातील स्थित्यंतरे खरंच हेलावून टाकणारी आहेत. व्यक्ती आणि राजकारणी म्हणून दोष असतातच पण असामान्य कर्तुत्वामुळे ते प्रतिमेपुढे तोकडे पडले की माणसाला देवपण प्राप्त होतं.

एक सांगायचं म्हणजे, 2012 साली निखिल वागळे यांनी बाळासाहेबांची मुलाखत घेतली होती त्यात जे होतं तेच चित्रपटात दृष्य स्वरुपात बघायला मिळेल.

नवाज नंबरी कलाकार आहे. त्याने बाळासाहेबांची भूमिका यशस्वीपणे निभावली. चित्रपटातील गाणं तर ठाकरे यांच्यासारखंच वादळी आहे!

बाळासाहेबांवर प्रेम असलेल्या व्यक्तीने जरूर बघावा असा चित्रपट!

ठाकरे चित्रपटातील खणखणीत गाणं…

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!